प्रार्थना म्हणजे ती नाही. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…!
प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करते–, ही खरी प्रार्थना…!!
जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…!!
जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.
प्रार्थना म्हणजे कंपनं असतात. एक भाव असतो. एक भावना असते. एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो. मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!
? श्री स्वामी समर्थ ?
सग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
काही वर्षांपूर्वी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच, पुण्याजवळ रात्री मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले. पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी हाकलून लावले. दुसऱ्या दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणाऱ्या एका जंगलात पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो. एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळासारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते. त्या बांधवाकडे पाणी मागितले. पण पाणी थोडे अन आम्ही 25 जण– शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच. पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता. अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले,
” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “. यावर तो आदिवासी म्हणाला– “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “– तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणाऱ्याचा धर्म कोणता ? मन प्रश्नांनी भरून गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की हा आदिवासी म्हणतो तो? जशी रात्र उतरत होती तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला होता. हातातली पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते. कुत्र्यात देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता, आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुसऱ्या धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता. ते शत्रू वाटत होते. पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली. त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. खूप काहीतरी गवसल्याचा आनंद तेव्हा मनात दाटला होता.
—-हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत. माणसाला माणसाचा शत्रू बनवणारा, परस्परांच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?
संग्रहित…. !
प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ देव-बीव सगळं झूठ आहे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
“देव-बीव सगळं झूठ आहे..थोतांड आहे..’मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थेटर ‘ च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात..”
डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता कि “मी आज किटी-पार्टीला जात आहे.मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात की जेवा”…
डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..
लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं..”देव-बिव सगळं झूट आहे” -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही यावर ठाम..जगात एकच सत्य..’मेडिकल सायन्स’..बाकी सब झूट है’..
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली
“बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय”……
हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स..”
“साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही ‘ देव ‘च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल…हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला..”
डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते याच विचारात दंग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ?
चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो…चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक ‘सत्कृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही?
आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो…
डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती..त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..
एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता…
डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…..!!
प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
-अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती होते, ते उठून उभे राहिले आणि लिंकनना उद्देशून म्हणाले, ” मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका की तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते.”
सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं की याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे, आणि त्यांची लायकी दाखवली आहे.
मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठेपणा सिद्ध करतात, तेही अगदी शांतपणे—– लिंकन ही असेच !!
—-सभागृह काय होणार याकडे जिवाचा कान आणि डोळ्यात जीव आणून पहात होतं.
प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली , आणि त्याला म्हणाले,
“सर, मला माहित आहे हे, की माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते. तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत की ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट बनवत होते, कारण त्यांच्यासारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं.”
—“ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते, त्यांच्या हातात जादू आणि कला होती. त्यांनी बनवलेल्या चप्पल-बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते, आपलं संपूर्ण मन आणि कसब त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय? कारण हे कसब मलाही अवगत आहे की हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा. मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन– पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!”
—-सर्व सभागृह बधिर झालं होतं, कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. अब्राहम लिंकन ही काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.
यातून एकच गोष्ट लक्षात घ्या, प्रसंग कसाही असो, आपला तोल जावू देवू नका.
कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या.
” आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” –हे वाक्य मनावर कोरून ठेवा.
आणि— कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मन:शांती ढळू देवू नका.
“काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो— तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते..!!
सिग्नलला सोनचाफ्याची फुले विकणाऱ्या त्या मुलीला पैसे देऊन तोच सोनचाफा तिलाच भेट दिल्यावर तिच्या मळलेल्या डोळ्यात उठलेली आनंदाची चमक म्हणजे दिवाळी…
केरसुणीचा फडा घेताना त्या आज्जीशी किंमतीची घासाघीस न करता दोन केरसुण्या घ्यायच्या आणि वर दहा वीस रुपये जास्त दिल्यावर, त्या आज्जीच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्यांमधून झिरपणारे मंद हसू म्हणजे दिवाळी…
दुकानात गेल्यावर जे आवडते ते घेण्यासाठी आपल्याजवळ पैसे आहेत याची ज्या दिवशी पहिल्यांदा जाणीव होते तो क्षण म्हणजे दिवाळी…
दमलेल्या तिला, “दमलीस ना ? बस जरा वेळ… मी तुला मस्तपैकी चहा देतो…” ही दिवाळी…
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घामाघूम होऊन आवराआवरी केल्यावर लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या डब्यातून भरताना तिच्या मनांत ओतप्रोत झिरपत जाणारा तो खमंग आपलेपणा म्हणजे दिवाळी…
ऑफीसला निघालेलो असताना, तिने समोर यावं आणि हातांमधे चार पाच मोगऱ्याची फुलं ठेवावीत… हा मोगऱ्याचा गंध म्हणजे दिवाळी…
आपला मुलगा मोठा, समजूतदार झाल्याचा क्षण म्हणजे दिवाळी….
“बाबा, यंदा तुम्हांला आणि आईला मी नवीन कपडे घेणारेय…” हे ऐकायला येण्याचा क्षण म्हणजे दिवाळी…
“आज्जी, आजोबा, चला आज लाँग ड्राईव्हला घेऊन जातो तुम्हांला…” हे शब्द ऐकणं म्हणजे दिवाळी…
आपल्याला ऑफीसचा बोनस कधी मिळतोय याची वाट न बघता, मावशींना पूर्ण पगार आणि बोनस दिल्यावर, त्या फरशी पुसणाऱ्या मावशींच्या डोळ्यातला आनंद म्हणजे दिवाळी…
परस्परांतील हेवेदाव्यांची, झाल्यागेल्या मतभेदांची जळमटं दूर करुन, ते सगळं विसरुन एकत्र येणं म्हणजे दिवाळी…
☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’ गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.
देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.
कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !
गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला; तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.
एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’
मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.
परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!
“परमेश्वरही संकटाच्या वेळी कुणाला ना कुणाला आपल्यासाठी प्रसादच म्हणून पाठवत असतो, फक्त तो प्रसाद आपण व्यवस्थित ग्रहण करायला हवा. त्या प्रसादाची किंमत करता यायला हवी.”
देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈