मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनासक्त… ☆ सुश्री स्वाती सुरंगळीकर ☆

सुश्री स्वाती सुरंगळीकर

परिचय

शिक्षण : MSc BEd,  Ex लेक्चरर (नागपुर)

कवयित्री- एकपात्री कलाकार

  • कवितांचे केवळ वाचन ;पठण किंवा गायन न करता माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून कविता सादर करण्याची वेगळी शैली.
  • गेल्या 25 वर्षांपासून ; देश विदेशात (अमेरिका, कॅनडा,  ऑस्ट्रेलिया, दुबई ) काव्य सादरीकरणाचे एकपात्री प्रयोग सुरू.”दिलखुलास” चा 500 वा प्रयोग नुकताच नागपूर येथे सादर झाला.
  • चारोळी संग्रह, ३ कवितासंग्रह
  • काव्यवाचनाची ध्वनीफीत आणि एकपात्री कार्यक्रमाची DVD प्रकाशित.
  • इंटरनॅशनल पोएट्री फेस्टीव्हल अ भा साहित्य संमेलन,  विदर्भ साहित्य संमेलन, औंध साहित्य संमेलन (पुणे), पुणे फेस्टिवल, भीमाफेस्टिवल, अ .भा. नाट्य संमेलन नागपूर
  • इ टीवी मराठी च्या साहित्य दरबार कार्यक्रमात सहभाग.

सन्मान –

  • वर्ष २०२२ चा मानाचा “बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार” प्राप्त.
  • काव्यशिल्प पुणे च्या काव्यस्पर्धेत प्रथम पुरस्कार;
  • रंगत संगत प्रतिष्ठान चा “हास्यरंगत “सन्मान;
  • कै माई देशपांडे प्रतिष्ठान चा काव्यगौरव पुरस्कार;
  • ‘पद्मगंधा प्रतिष्ठान‘ नागपुरचा “काव्यपद्म” व’अभिव्यक्ती’ ‘वैदर्भीय लेखिका संस्थेचा, “लक्षवेधी कवयित्री” सन्मान

? कवितेचा उत्सव ?

☆ अनासक्त… ☆ सुश्री स्वाती सुरंगळीकर ☆

त्याच्या मुखी हरिनाम ,

तो भक्तीत रंगलेला…

तीही  प्रपंचात दंग,

करी संसार चांगला !

*

सदा त्याच्या वागण्यात,

विरक्ती ही दाटलेली…

तिची सर्वांवर छाया,

नाही माया आटलेली!

*

विठोबाच्या दर्शनाला,

निघाली घरून दोघं…

डोईवर होतं थोडं,

घर-संसाराचं ओझं !

*

आड-वाटेवर त्याने,

पाहिले सोन्याचे कडे…

कसे लपवावे त्यास?

मनामध्ये प्रश्न पडे !

*

या संसारी बायकोचे,

जर का गेले लक्ष…

ती घेईल उचलून,

आहे ना संसारदक्ष !

*

कड्यावर हळू त्याने,

लोटली थोडीशी माती…

निघाला वेगाने पुढे,

घेत कानोसा मागुती !

(चमकून ती म्हणाली..)

अहो ! काय केले तुम्ही?

मती तुमची फिरली!

सांगा तुम्ही कशापायी?

माती ,मातीनं झाकली !

*

गेला तुम्ही विसरून,

माऊलीची शिकवण…

सोने चांदी हीरे मोती,

असती मृत्तिकेसमान !

असती मृत्तिकेसमान !!

© सुश्री स्वाती सुरंगळीकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंधाराचा कावा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ अंधाराचा कावा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

अंधार वाढतो आहे

नीत डोळे उघडे ठेवा

भिववितो बंद डोळ्यांना

तो अंधाराचा  कावा  – –

*

बंद पापण्या आत

स्वप्नांचा असतो गाव

कणभरही भीती नसते

धाबरण्या नसतो वाव – – 

*

अंधारी  डोळे मिटले

 मन बागलबुवा होते

 मग उगा भासते काही

 जे अस्तित्वातच नसते – – 

*

 सरावता अंधारा डोळे

 अंदाज बांधता येतो

 अंधारात वावरायाला

 तो साथ आपणा देतो – –

*

  अंधार भोवती फिरतो

  वेगळाली घेऊन रूपे 

  हिमतीचा प्रकाश असता

  होते मग सार सोपे – –

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिव्यात ज्योती जळत राहिली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

दिव्यात ज्योती जळत राहिली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 तूफानांशी लढत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 रक्ताला या मनस्वितेचा

 जन्मजात अभिशाप असावा

 म्हणुन कदाचित घुमटामध्ये

 नाद निनावी घुमत असावा

*

 सूर आतला जपत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 वर्मावरती घाव कुणाचा

 छिन्नभिन्न नभ, धरा फाटली

 हळूहळू मी केली गोळा

 शकले माझी विखूरलेली

*

 राखेतुनही उठत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 अभिजाताच्या साहित्याने

 अक्षरांस या दिधली दीक्षा

 एकच भाषा रक्ताश्रूंची

 एकच अग्नी, अग्निपरीक्षा

*

 मंत्र दिशांचे पठत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 कधी अचानक गोठुन गेले

 प्राणामधले निर्झर सारे

 माझ्या सोबत अंत कथेचा

 वाटे आता सरले सारे

*

 घटात अमृत भरत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 सवंग पेठा अनुबंधाच्या

 लागू होत्या अटी नि शर्ती

 उपचारास्तव केवळ उरल्या

 उचंबळाच्या रेशिमगाठी

*

 बहिष्कृतासम भ्रमत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 सरतिल दुःखे विझतिल वणवे

 गातिल पक्षी रानोरानी

 वीराण्यांवर निशागितांच्या

 झरेल नक्षत्रांचे पाणी

*

 स्वप्नास्तव या जगत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुगी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ सुगी… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

घाम जिरला जिरला

पिकं आलया तुर्‍याला

जणू शरदाचं चांदणं

जखडलं शिवाराला

*

पिकं आलया भराला

चालं सुगीचा घयटा

घाई घाईच्या चालीनं

चालं रानाकडं वाटा

*

नको येऊस पावसा

नको पदराची लुटं

भल्या आशेनं ठेवली

होती कुरीवरी मुठ

*

नाय कुठला आसरा

शेतावरी जीव सारा

अवकाळी पावसाचा

नकोच रं गळी फासा

*

सारं जग मज म्हणे

हाय जगाचा पोशिंदा

भुख भागवितो माझी

खाऊन भाकर कांदा

*

धन-धान्याच्या रासी

 हे भाग्य मजपासी

 गाढ झोपेत निजतो

कधी राहून उपासी

*

येती सुगीचं दिस

हाच दिवाळी दसरा

शरदाच्या चांदण्याचा

मळणीला तो आसरा

*

दिस कलला मिटाया

लखलख पाय वाटा

कष्टा-भाग्यानी उजळं

माझा कुणब्याचा ओटा

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 236 ☆ शब्द प्रवास… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 236 – विजय साहित्य ?

☆ शब्द प्रवास ☆

अक्षरांचे एक बीज

कोणी काव्यात सांडले

जीवनाच्या पारंबीला

उभे आयुष्य टांगले…!

*

माय झाली त्याची कथा

बाप झाला कादंबरी.

अनुभव पाठीराखा

सुख दुःखाच्या संगरी…!

*

अक्षरांची झाली भाषा

भाषा साधते संवाद.

लेख, कविता, ललित

प्रतिभेची लाभे दाद…!

*

दिली शब्दांनीच कीर्ती

दिले शब्दांनीच धन

शब्दानांच जाणवले

लेखकाचे अंतर्मन…!

*

मिळालेले पुरस्कार

अंतरीचे शब्दमित्र

जीवलग दोस्तापरी

व्यासंगाचे शब्दचित्र…!

*

साहित्यिक प्रवासात

अर्धचंद्र गुणदोषा .

स्वभावाचा समतोल

असुयेच्या कंठशोषा…!

*

नाही शब्दांची कविता

नाही कविता अक्षर .

साधकाने वाचकाला

देणे द्यायचे नश्वर…!

*

साहित्याच्या दरबारी

कुणी नाही सान मोठा

प्रसिद्धीच्या लालसेत

होऊ नये शब्द खोटा…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाऊबीज… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

भाऊबीज सुश्री नीलांबरी शिर्के 

माहेरचे संस्कार घेऊन

ती सासरी नांदण्या जाते

आपुलकीच्या वर्तनातुनी

आपलेसे  सर्वांना करते

*

ती नसते तिथल्या रक्ताची

मुले  पण त्यांच्या  वंशाची

निसर्गाची हिच संरचना

होऊन जाते ती त्या घरची

*

भाऊबीजेचा दिन येता

ओढ लागते माहेराची

तबकातील दो निरांजने

एकेक पुतळी दो डोळ्यांची

*

त्या डोळ्यांच्या ज्योतीसह

भावाचे ती औक्षण करते

बळीराजासम राज्य इश्वरा

भावासाठी मागत रहाते

*

भावाचे औक्षण करताना

नात्याला आयुष्य मागते

नाम कपाळी डोई अक्षदा

माहेराचा ती दुवा सांधते

🪔🪔

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “दिवाळी…“ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवाळी…🪔 ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

 शत दीप तेवताना, उजळो ज्योत अंतरीची,

 स्नेहभावासंगे आज, जपा, कृतज्ञता मनी!

 वसुबारसेला करिता, पूजा गाय-वासराची,

 अन्नदाता कृषिवल, नको विसराया आम्ही!

 जन्मदाते माय-बाप, गुरूजन, आप्त-स्नेही,

 संस्काराचे दिले धन, मशागत या मनाची!

 आज नमूया तयांना, ठेवूनिया माथा पायी,

 हात डोईवर त्यांचा, आशीर्वादाची शिदोरी!

 धनत्रयोदशीला पूजता, धन आणि धन्वंतरी,

 सामाजिक स्वास्थ्य आहे, आपलीच बांधिलकी!

 अज्ञान नि दुर्गुणांचा, नरकासुर हा मारूनी,

 सन्मार्गाने जोडू धन, हीच पूजा लक्षुमीची!

 जनकल्याणाचे भान, सय बलि-वामनाची,

 चोख व्यापार – व्यवहार, खरी पूजा चोपडीची!

 करी दृढ यमद्वितिया, भाऊ-बहिणीची प्रिती,

 यम-धर्माचे स्मरण, नित्य असावे जीवनी!

 संगे पंचपक्वान्नांच्या, करता दिवाळी साजरी,

 विसरा न वंचितांना, घास भुकेल्याच्या मुखी!

 सण-वार, परंपरा, जपणूक संस्कृतीची,

 समाधान लाभे मना, घरी-दारी, सुख-शांती !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली शुभेच्छा – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपावली शुभेच्छा – –🪔 ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

 उजळोत लक्ष वाती तुमच्या घरात साऱ्या

दीपावली शुभेच्छा वाटा मनात साऱ्या

*

वातीस लावताना पाहू वळून मागे

काळात बाल्य लपले गाऊ स्वरात साऱ्या

*

पाऊल वाजले बघ जाग्याच आठवांचे

व्हावी मनात जागा होत्या तळात साऱ्या

*

येताच बारसाला दारात गाय गो ऱ्हा

वात्सल्य मायचेही दाटे तनात साऱ्या

*

अभ्यंग स्नान होई लावून गंध उटणे

आरास ही दिव्यांची उजळे नभात साऱ्या

*

लक्ष्मीस पूजताना दारास तोरणेही

आतीष थाट मोठा भरला दिशात साऱ्या

*

बापास पाडव्याला ओवाळणे मुलीचे

राहोत प्रेम वेडया बहिणी जगात साऱ्या

*

भावास वेळ नाही प्रेमास तोड नाही

लांबून लक्ष त्याचे माया उरात साऱ्या

*

दीपावलीत घ्यावा आनंद जीवनाचा

टाळा प्रदूषणाला भरल्या सुखात साऱ्या

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोजागिरी पौर्णिमा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोजागिरी पौर्णिमाश्री प्रमोद वामन वर्तक ☆


उजळे कृत्रिम प्रकाशाने 

राजाबाईचा टॉवर सुंदर,

देवी सरस्वतीचा वरदहस्त

त्याच्या कायम शिरावर !

*

उभा थोड्या अंतरावर 

ई. सी. जी. अर्थव्यवस्थेचा,

होती रावाचे रंक मोहाने

सल्ला देतो तुम्हां मोलाचा !

*

चमके गगनात दोघांमधे

कोजागिरीचा शुभ्र शशी,

सुंदर नजारा चंद्रकिरणांचा 

अंधाऱ्या निळ्या आकाशी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 248 ☆ सावित्री… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 248 ?

सावित्री ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तो — अगदी लहान असल्यापासून

पाहिलेला,

चाळीशीचा तरूण,

कळलं तो शेजारच्या इस्पितळात येतो–‐-

डायलिसीस साठी!

 

मानवी शरीराला,

खूप जपूनही,

कधी काय होईल,

सांगता येत नाही !

 

आम्ही उभयता खूपच,

हळवे झालो होतो…..

त्याला भेटायला गेल्यावर!

सोबत असलेली त्याची पत्नी,

चेहर्‍यावर काळजी, पण—

ठामपणे त्याच्या पाठीशी उभी !

आणि घेत ही होती,

तितक्यात निष्ठेने—

त्याची काळजीही !

 

नंतर समजलं,

त्याच्या शस्त्रक्रियेविषयी….

त्याची पत्नीच देणार होती,

स्वतःची एक किडनी !

 

नतमस्तकच,

त्या तरूणीसमोर!

सावित्री अजूनही—

जन्मते या इथेच,

विज्ञानाची कास धरून,

आणि स्वतःच्या जीवावर,

उदार होऊन,

 घडवते नवऱ्याचा पुनर्जन्म,

याच जन्मी !

कुण्या यमाची याचना न करता,

आपल्या शरीरातला—

एक नाजूक अवयव,

करते बहाल,

पतिप्रेमासाठी!

 

ही सावित्री मला “त्या”

सावित्रीपेक्षाही खूपच

महान वाटते–

जीवच ओवाळून टाकते–

जोडीदारावर,

नातं निभावत रहाते आयुष्यभर !!

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares