मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 60 ☆ कुठे हरवली प्रीत… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 60 ? 

☆ कुठे हरवली प्रीत… ☆

(दश-अक्षरी…)

कुठे हरवली प्रीत सांगा

तुटला कसा प्रेमाचा धागा…०१

 

स्नेह कसे आटले विटले

तिरस्काराचे बाण रुतले…०२

 

अशी कशी ही बात घडली

संयमाची घडी विस्कटली…०३

 

मधु बोलणे लोप पावले

जसे अंगीचे रक्त नासले…०४

 

तिटकारा हा एकमेकांचा

नायनाट ऋणानुबंधाचा…०५

 

अंधःकार भासतो सर्वदूर

लेकीचे तुटलेच माहेर…०६

 

भावास बहीण जड झाली

पैश्याची तिजोरी, का रुसली…०७

 

कोडे पडले मना-मनाला

गूढ उकलेना, ते देवाला…०८

 

माणूस मी कसा घडवला

होता छान, कसा बिघडला…०९

 

राज विषद, मन मोकळे

सु-संस्कार, सोनेचं पिवळे…१०

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह आणि मन ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

? देह आणि मन ! ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

देह आपला

     असतो कह्यात,

मन असते

     बरेच वाह्यात !

 

देह असला

     जरी धरेवरी,

मन नाठाळ

     मारी भरारी !

 

देह रंगात

     रंगवी स्वतःला,

मन शोधी

     आपला कुंचला !

 

देह धरी ताल

      गोड अभंगावर, 

मन मोहीत

      होई लावणीवर !

 

देह मन जयाचे

        झाले एकरूप,

लोकां दिसे तो

        संत स्वरूप !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एखादा सूर…. ☆ निरंजन उजगरे

? कवितेचा उत्सव ?

☆ एखादा सूर…. ☆ निरंजन उजगरे ☆ 

 

एखादा सूर जर भिडलाच काळजाला

तर निःसंकोचपणे वाहू द्यायचं असतं

पापण्यांना….

वाटा तर वेगळ्या होणारच

नाती तर पुसट होणारच

आठवणी तर सलणारच

आणि या सा-यांना

गुंफित जाणारा एखादा सूर

पापणीला साद घालणारच…..

हे भिडणारे सूर

ही छायागर्भ गाणी

अदृश्यातून जणू पाहतात कोणी…

 

तुमच्या आमच्या काटेरी आयुष्यावर

जमून आलेल्या या दवाच्या थेंबाना

आपण कधी नाकारायचं नसतं…

पापण्यांना निःसंकोच

वाहू द्यायचं असतं…

 

 – निरंजन उजगरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धागे…. ☆ श्री राजकुमार कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ धागे…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

लोक ते माझेच होते

काचते धागेच होते

 

उध्दटांच्या त्या ‘अरे’ ला

शब्दही ‘का..रे..’च होते

 

दाटले अश्रू सुखांनी

हाय! ते खारेच होते

 

झोपली गात्रे थकूनी

श्वास हे जागेच होते

 

प्रश्र्न ते सोपे; परंतू

उत्तरांनी पेच होते

 

सोबतचे ऐनवेळी

राहिले मागेच होते

 

हाक मी होती दिली अन्

पांगले सारेच होते

 

शांततेच्या अंतरंगी

वादळी वारेच होते

 

गर्द रात्री साथ द्याया

दूरचे तारेच होते

 

जे खरे होते यशश्री

नेहमी साधेच होते

 

रंक वा राजा असू दे

शेवटी प्यादेच होते

 

पाठ राखाया सुखाची

दुःख हे आलेच होते

 

जे दरिद्री ते; मनाचे

आपल्या राजेच होते

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेटकरी….. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नेटकरी….. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

नेटकरी –  ही एक नवीन जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटक-यांना समर्पित

(आदरणीय साने गुरूजींची माफी मागून ?)

आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण

 

मिडीया चॅनेल उठतील

बातम्या सा-या पेरतील

‘मेटा-कुटीला’ सारे येऊन पेटवूया हे रान ?

 

कोण आम्हा अडवील

कोण आम्हा रडवील

अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण

 

नेटक-यांची फौज निघे

‘पुढे ढकलणे ‘ चोहीकडे

विनोदी टोमणे, मिम्स हीच आमची जान

 

पडून ना राहू आता

मारुया शाब्दिक लाथा

‘नेटकरीच’ कामकरी, भांडणावर ठाम

 

आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण

 

( नेटकरी)  अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बिपीन रावत आणि सहकारी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ? बिपीन रावत आणि सहकारी ??

(अपघात दुर्घटना:08/12/2021)

 

डाव साधला काळाने अन्

विकट हासले कोणी

मातृभूमीचा एक हुंदका

ऐकू आला कानी.

विजयपताका लहरत होत्या

कोठून आले वादळ

कुशीत बसता कसे यान ते

बनले कर्दनकाळ.

वेढून सा-या सीमा होता

धाक,दरारा पसरत

सूर्य कसा हा लुप्त जाहला

भयाण अंधारात.

पंख छाटता जसा जटायू

हतबल झाला होता

मातृभूमीच्या अंकावरती

टेकविला हो माथा.

धन्य जाहली पंचभूते ती

सामावून घेतले

आई,तुझिया चरणावरती

वाहियली ही फुले.

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 84 – आभाळाची प्रीत अनोखी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 84 – आभाळाची प्रीत अनोखी ☆

कशी कळावी धरणीला।

अथांग उंची सोडून येते

रोज सखीच्या भेटीला।।धृ।।

प्रातः समयी बघुनी भास्करा

मनी लालीमा खुलते ग

रोज साजनी दाह साहुनी

ओढ अनामीक जळते ग।

तरीही आणतो रोज नव्याने

चंद्र चांदणे भेटीला।।१।।

 

मित्र कसा हा आग ओकतो

किती लाही फुटावी देहाची।

मीही बरसतो अवकाळी

मग तुफान वर्षा गारांची।

इंद्रधनुही साद घालतो

या सुखावलेल्या धरणीला।।२।।

 

नवतीवाणी रोज नटावी

  हा शालू नेसुनी ग पाचूचा।

तुला पाहुनी किती झुकावे

नको अंत पाहू या मैत्रीचा।

आभासी हे मिलन आपुले

परी तोड नसे त्या गोडीला।।३।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जन्मोजन्म आम्ही रचला अभंग ☆ दिलीप पु. चित्रे

दिलीप पु. चित्रे 

Dilip Chitre Whois

(सप्टेंबर १७, १९३८ – डिसेंबर १०, २००९)

? कवितेचा उत्सव ?

☆ जन्मोजन्म आम्ही रचला अभंग ☆ दिलीप पु. चित्रे ☆

 

जन्मोजन्म आम्ही रचला अभंग

जगाचा वादंग सामावून

 

ना मोजल्या मात्रा चालताना यात्रा

असे आमरण व्याकरण

 

उठाठेव करा शब्दार्थांची तुम्ही

आम्ही ओळीतच पांगलेलो

 

मृदंगाशिवाय आम्ही दंगलेलो

विसरून सारी ताललय.

 

दिलीप पु. चित्रे

चित्र साभार :  www.xwhos.com/person/dilip_chitre-whois.html

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ठराव ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ ठराव ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

आठवतो का तुजला

शाळेचा रस्ता आपुला

भेटत होतो आपण

सकाळच्या प्रहराला

 

खेळ सुरपारंब्याचा

आठवतो का तुजला

गप्पा गाणी मजेदार

ताण नव्हता कसला

 

चिमणीच्या दातानेच

खाऊ तोडून खाल्लेला

आठवतो का तुजला

सुविचार लिहिलेला

 

उच्च स्वरात प्रार्थना

घरचा अभ्यास भला

खेळाचा तास पहिला

आठवतो का तुजला

 

आठवतो का तुजला

दक्ष करी घंटानाद

सरस्वती प्रांगणात

दिलेली प्रेमळ साद

 

तो दिवस परीक्षेचा

आठवतो का तुजला

नावडता तरी होता

सहज ची संपलेला

 

आज किती दिवसांनी

मनी तरंग उठले

आठवते का तुजला

मोरपीस वहीतले

 

पाहता मनी हसले

सांगावा तो धाडला

ठराव आधीच झाला

आठवतो का तुजला

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

११/११/२०२१

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 104 – नाती जपूया ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 104 – विजय साहित्य ?

☆ नाती जपूया  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 

आद्य गुरू मायबाप

स्थान त्यांचे अंतरात

नाती जपूया प्रेमाने

भावस्पर्शी काळजात …१

 

आज्जी आजोबा घराचे

सौख्य समृध्दी दालन

तत्त्वनिष्ठ संस्कारांचे

ध्येयवादी संकलन … २

 

काका, काकू, मामा,मामी

आत्या मावशीचा बोल

कधी धाक , कधी लाड

भावनांचा समतोल …३

 

मित्र मैत्रिणीचे नाते

काळजाचा गोतावळा

सुख दुःख समाधान

असे उरी कळवळा …४

 

नाते बंधु भगिनींचे

वैचारिक छत्रछाया

घास अडतसे ओठी

धावतसे प्रेममाया …  ५

 

नाते सहजीवनाचे

लेणे सासर माहेर

नाती जपूया प्रेमाने

देऊ काळीज आहेर…६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares