सुश्री प्रभा सोनवणे
साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 114
☆ निरोप ☆
सरत्या वर्षाचा निरोप घेताना,
मनात दाटून येताहेत ,
कितीतरी आठवणी……
या विषाणूंनी शिकवलंय बरंच काही,
पण मनातल्या विषवल्ली,
अजून तग धरून
काहीजणांच्या!
कटू गोड क्षणांचा एक डोह,
मनात तुडुंब भरलेला!
सोडून द्यायचे काही…काही जपायचे,
मोरपीसासारखे!
सरत्या वर्षाचा निरोप घेताना,
मन प्रगल्भ व्हायला हवं,
जायलाच हवं सामोरं,
पेलायला हवीत काळाची आव्हानं,
निरोप गतकाळाचा घेताना,
व्हायलाच पाहिजे अधिक धीट,
खंबीर आणि जागरूक ही !
निरोप द्यायलाच हवा,
नैराश्याला, उदासीनतेला!
आणि आभार मानायलाच हवेत,
गतवर्षाने बहाल केलेल्या,
जिवंतपणाला !!
सरत्या वर्षाला निरोप घेताना…..
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011