मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथापौर्णिमा – लेखिका : सुश्री पूनम छत्रे ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ कथापौर्णिमा – लेखिका : सुश्री पूनम छत्रे ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆ 

(एका वेगळ्या पद्धतीने पुस्तक परिचय) 

लेखिका : पूनम छत्रे 

प्रकाशक :  रसिक आंतरभारती

पृष्ठ संख्या – १७६

मूल्य : रु.२७०

कुठून कसा कोण जाणे पण कोरोना सगळीकडे पसरला. या राक्षसाने भिषण रूप घेतले आणि सगळ्यांना घरातच बसायची वेळ आली. लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि कामानिमित्ताने बाहेर जाणारी, घरचे बाहेरचे मुलाचे सगळे सांभाळून आपला छंद जोपासणारी पूनम घरातच बंद झाली.

किती अवघड असते ना असे राहणे? मग काय लोकांचे अंतर्भूत गुण बाहेर आले आणि सोशल मिडियावर बरेच ऍक्टिव्ह राहू लागले.

पूनमही काय करता येईल याचा विचार करू लागली आणि शेजारच्याच बिल्डिंगमधे होम क्वारंटाईन असलेल्या निनाद आणि त्याच्या बाबांविषयी समजले. त्यांच्याच सोसायटीत दंगापार्टी चालू असल्याचा संतापही आला आणि लोकांना चांगली बुद्धी देण्यासाठी अनुदिनी अनुतापे प्रार्थना तिने केली.

आपल्याच विचारात कधी टिव्ही लावला हे तिच्याही लक्षात आले नाही. पैठणीचा होम मिनिस्टरचा रिपीट टेलिकास्ट चालू होता. त्यात पैठणी जिंकलेली सीमा तिच्या ओळखीचीच होती. पैठणी जिंकून सुद्धा ती नेसून तिची निगा राखणे तिला किती अवघड होते हे सगळे तिला माहित असल्यानेच सीमाच्या मनाची घालमेल जाणून पूनमच सुन्न झाली. आधी हाताला चटके च्या ऐवजी आधी मनाला चटके बसले होते.

या चटके बसलेल्या मनाचा ती पराभव होऊ देणार नसली तरी तिच्या ओळखीच्या सुधीरच्या आईची अवस्था पूनमला आठवली. आपल्या म्हातारपणी कोणाला आपले काही करायला लागू नये म्हणून मिस्टरांच्या माघारी टोकाचे उचललेल पाऊल बूमरँग होऊन तिला कायमचे विकलांग करते या घटनेने अतिशय व्यथित झाली.

तरी तिच्या मनाचा वटवृक्ष घट्ट मुळे रोऊन सकारात्मकतेच्या पाराने डौलाने उभा होता. आपल्या मुलांना आकाशात भरारी मारायला मोकळीक दिलेल्या बाबांना आपल्या गावाकडील मंदिराच्या जिर्णोद्धाराचा प्रसंग  आठवून पूनमला पण छान शिकवण मिळाली.

मग उगाचच मैत्रिण रमा आणि तिचा मित्र सत्यजीत यांची आठवण होऊन त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होताना अर्थात त्यांच्या हृदयी वसंत फुलताना झालेल्या स्थित्यंतराने ओठावर स्मित आले.

दुसरी मैत्रिण हेमांगी आणि गौरव यांचे प्रेम सफल नाही झाले तरी त्यांचे एकमेकांवर किती निस्सिम प्रेम होते याची आठवण झाली.

मग उगाचंच  ओळखीतल्या एका अंजलीने केलेला  पुनर्विवाह आठवला आणि बिजवर नवर्‍याची मुलगी सोनालिकाने तिचा आई म्हणून स्विकार करण्यासाठी केलेला प्रयत्न डोळ्यांपुढे तरळला.

कंटाळून पूनमने जरा स्वत:ला आडवे केले आणि आईचा फोन आला. सहजच मनात आले या कोरोनाने मोठ्या माणसांना पण टेक्नॉलॉजी शिकवली आहे ना? किती सहजतेने वरच्या पिढ्या सुद्धा नवे तंत्रज्ञान वापरत आहेत नव्या गोष्टी शिकत आहेत मग कौतूकाने अशाच एका व्हॉट्सअप आई चे उदाहरण आठवले.

वाटले या नव्या जमान्याने मुलांना परदेशाचे वेड लावले असले तरी तेथे स्वत:चे हाल होऊ नयेत म्हणून स्वावलंबी होऊ घातलेली मुले आपल्या आईच्या नाळेशी अधिक दृढ होतात .त्यांची या देशाशी आईशी संस्काराशी असलेली नाळ कधीच तुटत नाही.  याचेच उर्वी आणि सुजाताचे उदाहरण तिने बोलता बोलता आईला सांगितले पण•••

तिने पुन्हा टिव्ही लावला रिपीट टेलिकास्टच दाखवले जात होते.  त्यावर कॅमेरामन जग्गुचे नाव पाहून घरदार सोडून कॅमेरामन झालेला जग्गू दिवाळीच्या निमित्ताने तरी घरी गेला. अशा परत आपल्या फॅमिलीत जाऊन फॅमिलीवाला जग्गू  मनात येऊन गेला.

अस्वस्थ पूनम या कुशीवरून त्या कुशीवर होत होती रिकाम्या मनाचिये गुंती उतारवयात एकमेकांचे आधार होऊ पहाणार्‍या सुलू आणि मुकुंदाची कथा आठवली.

कूस बदलली त्या सरशी खरे मित्र मैत्रिणी असलेल्या शुभंकर अमृताची आठवण जणू एकमेकांना तुझ्या नसानसात मी असल्याची जाणिव देत आहेत अशी अनुभूती दिली.

छताकडे पहात असताना दूरचे कोणीतरी अभंग अबिर आठवले आणि मुले अनुभवातून कशी शहाणी होतात, शिकतात हे अभंग वाणी च्या स्वरूपात मनात नाचून गेले.

पुन्हा कोरोनाची आठवण येऊन रोज कोणी ना कोणीतरी गेल्याच्या बातम्या कानावर येतच होत्या. तसाच कोणाचा तरी फोन आला आणि कामवाली बाई शारदा जी नाईलाजाने हॉस्पिटलमधे कोरोनाच्या पेशंटची सेवा करत होती ती गेल्याचे समजले. वाईट जरी वाटले तरी मरणाने केली सुटका  असा विचार देखील आला.

उलट सुलट विचारांची माला पूनमच्या डोक्यात फिरतच होती. बस्स तिने ठरवले आपण आता या काळात कथा लिहायच्या. त्या निमित्ताने असे अनेक प्रसंग अनेक व्यक्ती आठवयाच्या आणि ते अनुभव आपल्या शब्दात मांडायचे.

तिने ठरवले आणि तिचा कोरोनाचा काळ खरच लिखाणात ते लिखाण  फेसबुकसारख्या सोशल मिडियावर  प्रकाशित करण्यात  सुसह्यतेने पार पडला.

मग वेध लागले ते कथासंग्रह काढण्याचे. पण आपले लिखाण सगळ्यांना आवडेल का? कोण काढेल आपला संग्रह असे विचार कस्तुरीमृगासारखे स्वत:लाच पडत गेले. आणि या लेखकांमधे होते कुरूप वेडे  अशा राजहंसाचे लिखाण असल्याचे मित्र मैत्रिणिंकडून सांगितले गेले. 

अनेक कथांपैकी १५ कथा निवडून कथापौर्णिमा नामकरणही झाले.

शैलेश नांदुरकर यांनी पुढाकार घेऊन पुस्तकाची निर्मिती केली, रसिक आंतरभारतीच्या सुनिता नांदुरकरांनी २८ आक्टोबर २०२३ला संग्रह प्रकाशितही केला. पुस्तकाचे मूल्य केवळ रु.२७० एवढे आहे.

असे वेगवेगळे नातेपैलू असलेल्या कथा वेगवेगळ्या भावना मनात जागृत करतात. त्याला वास्तवतेचे एक अधिष्ठानही लाभलेले आहे त्यामुळे कथा मनाला भावतात.

निसर्गरम्य परिसरात धुंद रात्रीच्या वेळी छान चंद्रप्रकाशात जणू आपले मन मोकळे करत आकाशाच्या छत्रीखाली लेखीका पूनम छत्रे आपल्या कथा सांगायला आली आहे. त्या तेवढ्याच उत्कटतेने आपण सर्व ऐकाल म्हणजे वाचाल हा विश्वास वाटतो .

परिचय : वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परदेशात मोठमोठ्या चित्रांचे लिलाव होतात आणि त्याला करोडो रुपये मिळतात. मला फार आश्चर्य वाटायचे, काय असतं एवढं या चित्रात? का त्याला एवढी किंमत मिळते? कशी ठरते ही किंमत.

कुतुहल म्हणून मी काही चित्रे त्या दृष्टीने पाहिली आणि नंतर त्याची कथाही वाचली तर समजले की वरवर दिसते तसे ते चित्र नसतेच मुळी. त्यामधे खूप गूढार्थ सामावला आहे. ही चित्रे मॉडर्न आर्ट म्हणून विक्रीस ठेवलेली होती. 

अचानक पुरुषोत्तम सदाफुले सरांच उजेडाचे मळे पुस्तक हाती पडले आणि त्या मुखपृष्ठाकडे पहातच राहिले. खरोखर मॉडर्न आर्ट असलेले चित्र वाटले.

सहज बघितले तर असंख्य उडणारे पक्षी••• थोडं नीट पाहिलं तरं माणसाच्या डोक्यातून आलेले विचार पक्षी••• 

परंतु जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि त्यातील गहनता जाणवत गेली•••

मध्यभागी असणारी माणसाची आकृती ही फक्त माणसाची नसून कारखान्यात जाम करणार्‍या एका कामगाराची आहे. कामगारांच्या समस्या कारखान्यातील प्रश्नांमुळे निर्माण झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी कामगाराचे हृदय कारखान्याच्या आकाराचे जणू काळीज चिरले जात आहे हे दर्शवते. त्या समस्यांचे विचार पक्षी रुपाने उडू पहात आहेत.

कामगाराचे मन जरी हिरवे असले तरी आजूबाजूचा परिसर प्रदुषणामुळे पिवळा पडत चालला आहे आणि याच प्रदुषणात जगणे अवघड होऊन हे पक्षी हा परिसर सोडून उडून जात आहे आणि बिचारा कामगार जरी अवघड झाले तरी असहाय्य होऊन या प्रदुषणात, कारखान्यात होरपळत आहे.

कामगारांचे प्रश्न कोण सोडवेल? मी सोडवू शकेन का? कसे सोडवता येतील हे प्रश्न या कामगार विषयीच्या प्रश्नांची पाखरे डोक्यात घिरट्या घालत आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारणा सगळ्यांनी विशेषतः कामगारांनी तरी विसरली नाहीच पाहिजे म्हणून हा क्रांतीसूर्य सतत कामगाराच्या विचारात तळपत आहे. कामगारांबद्दलचे विचार त्याला मूर्त रूप येत नसल्याने हा अर्धाच सूर्य तळपत आहे हे सांगणंयासाठी लाल रंगाचा सूर्य आणि त्याची पांढरी आभा दाखवली आहे. 

कारखान्याच्या भोवती वाढणारा कचरा, त्यातून निघालेले धुरांचे पक्षी,बाहेर पडणारी रसायने यातून कामगारांचे जीवन धोक्यात येऊन कामगार हिरवा- निळा पडत आहे. 

अगदी लहान मुलाच्या नजरेतून बघितले तर ती लहानमुलाची आकृती आत लाल मधे पांढरे आणि खाली हिरवे असलेले कलिंगड खाण्याचा विचार करत आहे. पण हे कलिंगडही म्हणावे तितके शुद्ध राहिले नाही हे दुर्दैव.(माहित आहे की कलिंगड आणि लेखन यांचा दुरान्वयेही काही संबंध नाही पण लहानमुल सहज असे म्हणेल म्हणून तोही अर्थ निघू शकतो असे सुचवायचे आहे)

असे अनेक सांकेतिक विचार प्रश्न घेऊन येणारे हे चित्र आणि त्याला तितक्याच सच्चतेने उत्तर देणारे सच्चेपणा आणि निरागसता यांचे प्रतिक असलेले निळंया रंगातील आकाशाचेही निळेपण घेऊन येणारे वाचकांच्या मनात फुलवणारे उजेडाचे मळे.

खरेच असे मॉडर्न आर्टने खुलणारे  सरदार जाधव यांचे हे वेगळेच चित्र मुखपृष्ठ म्हणून निवडणार्‍या प्रतिमा पब्लीकेशनच्या डॉ.दीपक चांदणे ,अस्मिता चांदणे आणि लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तक: निसर्गाची निळाई

कवी: अजित महाडकर 

प्रकाशक: शॉपीजन

पृष्ठे ७५, किंमत  २५०/—

कवी अजित महाडकर यांचा निसर्गाची निळाई हा काव्यसंग्रह अलीकडेच शॉपिजन प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ५१  कविता आहेत. या सर्वच कविता निसर्ग आणि नैसर्गिक भावभावनांशी निगडित आहेत. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे की यात वृत्तबद्ध, कृष्णाक्षरी, संगीताक्षरी, अष्टाक्षरी, शिरोमणी, जपानी हायकू, तांका असे विविध काव्यप्रकार लीलया हाताळले आहेत.  त्यामुळे हा काव्यसंग्रह वाचताना एकात अनेक असा सुखद अनुभव येतो.

अजित महाडकर हे एक सिद्धहस्त  प्रतिभावंत कवी आहेत.  त्यांच्या कविता वाचताना विशेष करून जाणवते ती त्यांची अतिशय सरल अशी काव्य भाषा.  एक एक फुल धाग्यात सहजपणे ओवावे इतकी साधी त्यांच्या काव्याची गुंफण असते. काव्याचे शास्त्र आणि नियम सांभाळूनही भाषेच्या काठीण्यापासून, क्लीष्टते पासून  त्यांची कविता दूर असते आणि म्हणूनच ती वाचकाला कवींच्या विचारांपाशी सहजपणे घेऊन जाते.

कवी महाडकरांच्या सर्वच कवितांचा हा स्थायीभाव असल्यामुळे त्यांच्या कविता मनात घर कराव्यात इतक्या बोलक्या आहेत आणि आपल्या वाटणाऱ्या आहेत.

या कवितासंग्रहातील भक्तीरसातील आरत्या व अभंग वाचताना जाणवते की कवीची वृत्ती धार्मिक, परोपकारी आणि श्रद्धाळू असली तरी कुठेही अंधश्रद्धेचा भाव त्यात नाही.

भगवंत या अभंगात ते लिहितात

भेटा भगवंत ।मानवी रूपात ।

नका देवळात। जाऊ रोज ।।

भगवंत हा मनुष्य रूपातच आपल्या सभोवती असतो. आई-वडिलांच्या रूपात, रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या वैद्याच्या रूपात, असंख्य दात्यांच्या दातृत्वाच्या रूपात तो भेटत असतो.

मर्म संसाराचे या कवितेत ते लिहितात

करिता काम धाम 

जपावे रामनाम

मनोमनी

या संगीताक्षरी  काव्यरचनेत गृहस्थधर्म आणि भक्तीमार्ग यांची अगदी सोप्पी सांगड त्यांनी घातलेली आहे.

निसर्गाची अत्यंत ओढ असलेल्या या कवीच्या लेखणीतून शब्द उतरतात ,

देणे निसर्गाचे जपून ठेवावे 

*त्याला का उगा नष्ट करावे ।*।

किंवा ,

झरा निर्मळ असेल का तिथे?

खरा आनंद डुंबण्याचा घेऊया 

या कृष्णाक्षरी काव्यातून सुंदर जीवन कसे जगावे, निसर्ग कसा जपावा याचे प्रबोधनच जणू होते.

लेखणी, कविता, प्रतिभा याच कवीच्या खऱ्या सख्या आहेत.

हाती येईल त्या लेखणीने 

काढते नक्षी कागदावर 

स्वतःच हसते पाहून नक्षी 

आनंद होतो अनावर …

कवीचे हे मनस्वी आणि हृदयस्थ बोल किती मधुर आहेत! जीवन म्हटले म्हणजे सुख दुःख, निराशा, प्रेम आणि वियोगाचाही अनुभव येतोच. अशा या भावभावनांचे प्रतिबिंबही महाडकरांच्या कवितेमध्ये उमटलेले आहे.

कातरवेळ या कवितेत ते लिहितात

सागरकिनारी कातर वेळी 

असता प्रिया जवळी 

संसाराची सुख स्वप्ने 

पाहतो आम्ही आगळी …

निसर्गाच्या सहवासात माणसांची छोटी छोटी स्वप्ने कशी खुलत जातात हेच या ओळीतून व्यक्त होते.

मन संवेदनशील असले की एखाद्या साध्या दृश्यानेही ते उमलते त्याचीच प्रचिती देणाऱ्या या ओळी,

 डेरेदार झाड बागेतले 

रंगीत फुलांनी बहरले 

पाहुनी तो रम्य नजारा 

*मन माझे आनंदाने फुलले.*.

वाह क्या बात है!  निसर्गातच आनंद भरलेला आहे हो! फक्त तुमची पंचेद्रिये जागी असली पाहिजेत. मग जीवन हे सुंदरच होते. किती सुरेख संदेश कवीने या साध्या ओळींतून दिला आहे!

या संपूर्ण काव्यसंग्रहात कवीने ईश्वर, बारा ज्योतिर्लिंगासारखी स्थळे, कृष्ण, अर्जुन, झाडे—पाने, पक्षी, प्रिय सखी, गुरु, घर, कन्या, अगदी घरात वावरणारा मोती कुत्रा यावर इतकी सुरेख काव्य टिपणे केली आहेत  की वाचक त्यात सहजपणे रमून जातो.

दुसऱ्यांना सुखी ठेवण्याची 

कला आहे ज्यांच्यात 

एक आशेचा किरण 

दिसतो मला त्यांच्यात ..

किंवा ,

संस्कार या कवितेत ते लिहितात

डोक्यावरी पिडीतांच्या 

हात फिरवी मायेचा 

दिसे मला त्यांच्यामध्ये

 एक किरण आशेचा…

मनात सहज येते, सभोवताली माजलेल्या स्वार्थी, मतलबी, अनाचारी जगातही सुखाचा किरण शोधणाऱ्या या कवीची सकारात्मकता किती योग्य आहे, महान आहे!

 चंद्र प्रकाश 

तुझा चेहऱ्यावर

 दिसे सुंदर ..

असे हायकू आणि 

 

ऋतू बदल 

निसर्गात घडतो 

तरी फुलतो 

संघर्ष करूनिया

 नव्याने बहरतो ..

अशा तांका काव्यातून झिरपणारे हे काव्यबिंदू मनाला खूप सुखवतात.

निसर्गाची  निळाई ही शीर्षक कविता सृष्टीच्या निळाईचा सुंदर अविष्कारच घडवते.

स्वच्छ निर्मळ चमके

निळे पाणी सागराचे

घेई  उंच उंच लाटा

फेडी पारणे नेत्रांचे ..

किती सुरेख आहे ही स्वभावोक्ती!

खरं म्हणजे यातली प्रत्येक कविता वाचकाला विविध भावभावनांचा अनुभव तर देतेच पण जीवनातले मधुकण टिपण्यासाठी एक चोचही देते .

सुरेख आणि सहज साधलेली यमके, ठिकठिकाणी विखुरलेली स्वभावोक्ती, चेतनागुणोक्ती, उपमा, उत्प्रेक्षांसह उलगडत चाललेला हा काव्यप्रवास अपार सुखद, समाधानाचा आहे.

या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लेखिका व कवयित्री सौ. संपदा देशपांडे लिहितात,

शब्द बनती कविता 

तोच असे सिद्ध कवी..

त्यांचं लिहिणं किती सार्थ आहे हे या कविता वाचल्यावर  लक्षात येते.

अजित महाडकर यांच्या या चौथ्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देताना कवयित्री सानिका पत्की यांनीही महाडकरांच्या कविता म्हणजे सहज, सुंदर, साधे, सोपे व भावनेच्या जाणिवांना स्पर्श करणारर्‍या असे भाष्य महाडकरांच्या काव्यरचनांबद्दल केले आहे.

काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि सुंदर आहे.

संपूर्ण निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला अथांग निळा सागर, क्षितिजाच्या रेषेवर टेकलेलं निळं आभाळ आणि मुक्त विहरणारे निळसर जलद. केवळ अप्रतिम!

कवी श्री. महाडकर त्यांच्या मनोगतात नम्रपणे लिहितात, “या कविता तुम्हाला आवडतील अशी आशा आहे”

सर! या कविता आमच्या अंतरीच्या कप्प्यात बंदिस्तच होतील एवढेच मी म्हणेन.

कवी अजित महाडकरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या  पुढील  साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय : राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘चांदणे शब्दफुलांचे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘चांदणे शब्दफुलांचे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – चांदणे शब्दफुलांचे

लेखक- श्री विश्वास देशपांडे

प्रकाशक-सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे  

पृष्ठसंख्या- १६८ पाने

मूल्य-२०० रुपये

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव 

कोजागिरीच्या मनोरम चांदण्या रात्री अर्थात २८ ऑक्टोबर २०२३ ला चाळीसगावचे जेष्ठ आणि प्रथितयश साहित्यिक श्री विश्वास देशपांडे यांचे ‘चांदणे शब्दफुलांचे’ हे नवे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक वाचल्यावर लक्षात आले की यातील काही लेख समाजमाध्यमांवर आलेले होते. मात्र एक सलग पुस्तक वाचतांना तेच लेख नवे रूप लेऊन आल्याचे जाणवले. जणू चांदण्या रात्रीच्या गोड स्वप्नाची अनुपम अशी अनुभूती जागृतावस्थेत परत अनुभवली. पुस्तकाचे शीर्षक उत्कंठावर्धक आणि देखणे आहेच आणि त्याला साजेशी गर्द निळाईच्या पार्श्वभूमीवर फुललेली कुमुदिनी मुखपृष्ठावर अतिशय आकर्षक दिसते. विश्वास सरांच्या ललित लेखांचा सुरेख कोलाज या आधीच्या पुस्तकांत अनुभवलेला आहे. मात्र या पुस्तकात कोलाज आहे तो विभिन्न व्यक्तिरेखांचा! याला कोलाज म्हणणेच योग्य, कारण प्रत्येक व्यक्तिरेखेची रूपरेषा, मांडणी आणि सजावट वेगवेगळी आहे! मग या सर्वांना जोडणारा एक धागा कोणता तर यातील सर्व मानवी व्यक्तिचित्रे काही सांगतात, बोलतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. कांहींचे व्यवसाय उच्चभ्रू तर कांही रोजच्या जीवनातले आपले भागीदार, कांही प्रसिद्धीच्या उंचच उंच शिखरावर विराजित तर कांहींच्या रोजच्या जीवनात अन्न, वस्त्र अन निवारा शोधण्याची धडपड सुरु! असे या पुस्तकातील विविधरंगी अन विविधगंधी व्यक्तिरेषांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले कोलाज वेगळेच सौंदर्य दर्शवते.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

शीर्षकाच्या नावाच्याच ‘चांदणे शब्दफुलांचे’ या पहिल्या लेखातच वाचकांचे मन एका सुवर्णयुगात पोचते. बालगंधर्व आणि पु ल यांच्यावरचा हा लेख म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर ज्यांच्या गौरवान्वित अन वलयांकित प्रतिमा कायम कोरल्या गेल्या आहेत, त्या दैदिप्यमान सूर्य चंद्र यांची जणू ‘ज्योतीने तेजाची केलेली आरती’! नारायणराव आणि पुरुषोत्तम या दोन नावातील साम्य साधत लिहिलेला हा अप्रतिम लेख म्हणजे गरम जलेबी अन थंडगार रबडीचे पौष्टिक अन रुचकर कॉम्बो! आता रंगमंचाचा पडदा उघडल्यावर जसे एकाहून एक सरस नटसम्राट रंगमंचावर अवतरतात, तद्वतच हे लेख कागदावर अवतरल्यावर जणू त्या रंगमंचाच्या लखलखीत प्रकाशाला चार चांद लागत आहेत असे वाटते. लावण्याचा गाभा असलेले देखणे महान संतूरवादक दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावरील लेख विश्वास सरांच्या संगीताविषयी असलेल्या गहन जाणीवा आणि ज्ञानाची साक्ष देतात. तसेच ते दिवंगत झाल्यावर हा लेख लिहिलेला असल्याने पुरुषी सौंदर्याची मूर्तिमंत प्रतिभा अन प्रतिमा आणि संतूरला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणाऱ्या या दिग्गज वादकाचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! याच संगीतदालनात ज्यांच्या स्वरात आणि संगीतात ईश्वरी साक्षात्कार होतो, असे संगीतकार गायक हेमंतकुमार यांच्यावरील लेख खूपच वाचनीय असा आहे.

हा झाला एक रंग! मात्र सरांचा आवडीचा अन अभ्यासपूर्ण वाचन, लेखन, भाषण आणि चिंतनातून साकार झालेला भक्तिरंग त्यांना अन त्यांच्यासंगे आपल्यालाही सावळ्या रंगाची बाधा प्रदान करतो. विठू माउली, भगवान परशुराम, ज्ञानेश्वर माउली, गोंदवलेकर महाराज, गणेश उत्सव इत्यादी विविध लेखांतून झिरपत गेलेली दिव्य प्रकाशशलाका थेट आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात चैतन्याचे तेजस्वी दीप उजळून टाकते. यासोबतच भेट झालेली नसतांना देखील भेटीची आस धरून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली समर्पित करीत लिहिलेला लेख असाच हृदयंगम आहे. बाबासाहेबांचे विस्तीर्ण जीवन पटल आपल्यासमोर उलगडण्यात लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप दिसून येतो. विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वे वेचताना लेखकाच्या सामाजिक जाणीवा अत्यंत प्रखर आणि दूरदर्शी आहेत हेच दिसून येते. वनस्पती शास्त्रज्ञ ल्युथर बरबँक, पोलिओची लस शोधून मानवाला निरामय अक्षत जीवन प्रदान करणारा डॉक्टर जोनास साक, कीटकनाशकांचे दुष्परिणाम शोधत नामधारी अन माजलेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांशी दोन हात करणारा डॉक्टर टायरॉन हेज, सिंगापूरला नाव, रूप अन वैभव प्रदान करणारा ली क्कान यु, क्रांतिसूर्य हेमंत सोमण, सेरेब्रल पाल्सीग्रस्त, पण जिच्या आकांक्षांचा वेलू गगनाला भिडला आहे अशी स्फूर्तीदायिनी आणि चैतन्यमयी वल्लरी करमरकर आणि इतरही व्यक्ती या ललित लेखांच्या मांदियाळीत आपल्याला भेटतील.

सामाजिक व्यक्तिरेखांसह या पुस्तकात सुखनैव नांदणाऱ्या विश्वास सरांच्या नात्यातील अन आसपास वावरणाऱ्या व्यक्तींना देखील आपण जणू प्रत्यक्ष भेटतोय असा भास होतो. शीर्षस्थानी अर्थातच लेखकाच्या तीर्थरूप ‘आई’ आहेत. आई अन मुलाचे भावनिक प्रेममय नाते उलगडणारा हा लेख देवघरातील शांतपणे तेवणाऱ्या पावन नंदादीपाची स्मृती जागवून भावविभोर करून जातो. या पुस्तकात लेखकाने चित्रविचित्र व्यवसायातील मंडळी एकाच पंगतीत आरामात ऐसपैस बसवली आहेत. मिस्त्री, गवंडी, नाभिक अन कल्हईवाला यांच्या सोबत ज्ञानवंत गुरुमूर्ती सर, उच्च विद्याविभूषित डॉक्टर गोपाळ देशपांडे अन त्यांच्या स्वयंप्रकाशित सौ. विभा हे देखील या पंगतीत आहेत. लेखांची नावे अनवट आणि उत्सुकता ताणणारी पण मॅटरमध्ये अन मीटर मध्ये चपखल बसणारी (दोन उदाहरणे देते-वल्लरीवरच्या लेखाचे नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ तर नाभिकांवरील लेखाचे शीर्षक-‘सर जो तेरा चकराये’). लेखकाचे गीत-संगीताचे उपजत अन अद्ययावत ज्ञान असे संपूर्ण पुस्तकातून प्रतिबिंबित होत राहते.  

मंडळी, या पुस्तकाच्या व्यक्तिविशेषांकात एकंदरीत ३६ लेख आहेत. अशा रचनेची एक खासियत असते. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो, आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र मॅटर बघावे तर पूर्णत्वास पोचलेले!

विश्वास सरांच्या लेखनशैलीविषयी त्यांच्या आधीच्या सात पुस्तकातून ओळख झाली, ती या पुस्तकांतून वर्धिष्णू झाली. साधी सोपी सरळ भाषा! गुंत्यात गुंता नाही, मात्र अनुभव ‘गुंतता हृदय हे’ असाच! भ्रमर एकदा का मधुर मधुकणांची आस बाळगून कमलदलात गुंतला की बाहेर येण्याचं विसरून जातो, तद्वतच हे पुस्तक वाचायला सुरुवात केलीत की शेवटचे पान येईस्तोवर आपण थांबत नाही. (आले तरी दोन पर्याय आहेत, एक तर यातील आपल्या आवडत्या प्रांतातील लेखांचा फिरफिरुनि आस्वाद घ्यावा अथवा याच कोजागिरीला लेखकाची प्रकाशित झालेली आणिक दोन पुस्तके आहेतच! मंडळी, त्यांच्याविषयी नंतर!)    

वाचकहो, प्रत्येक लेखाचा उहापोह करण्याचा मोह मी जाणीवपूर्वक टाळलाय. आपणही उत्सुक व्हावे आणि आणखी काय काय असेल बरं यात, हा प्रश्न स्वतःला विचारत हे पुस्तक वाचावे, हा माझा एकमेव उद्देश आहे! आता माझा सवाल ऐका मंडळी! सूर्याची धगधगीत उग्र किरणे नाहीत, उन्हाचा रखरखाट नाही, तर मुग्ध, मनोहर, शांत, शीतल, सौम्य, पवित्र आणि धवल चंद्रप्रकाशाची जाळी विखुरलेली आहे. निशिगंधाच्या धुंद सुगंधाने आसमंत अन आपलं मन भारून टाकलंय. या नीरव शांततेत काळ्याभोर रंगाच्या अन चांदण्यांच्या टिकल्यांचे नक्षीकाम असलेल्या चंद्रकळेच्या महावस्त्राने नटलेल्या निशेचे निश्चल मनमोहक सौंदर्य अनुभवायचे आहे कां? मग या पुस्तकातील शब्दफुले कधीही वेचा, चांदण्या रात्रीच्या निखळ सौंदर्याची आपल्याला नक्कीच भुरळ पडेल, हा झाला माझा अनुभव! अन तुमचा?

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

छान दाट निळे ••• काळे भासणारे आकाश ••• त्यात असंख्य लुकलुकणार्‍या चांदण्या, तारे तारका••• या सगळ्या गोपिकांत शोभून दिसणारा कृष्ण जणू हा पूर्णचंद्र••• पृथ्वीवर डोंगरांवर झाडांवर पाण्यात सगळीकडे सांडणारा हा लक्ख प्रकाश ••• हे सगळे पाहताना भान हरपलेले एक प्रेमी युगूल तळ्याकाठी झाडाखाली बसलेलं ••• हितगूज करण्यात मश्गूल असलेलं••• 

सुंदर लोभस असे हे चित्र. कोणत्याही रसिक मनाला भुरळ घालणारं•••

पण काय सांगते हे चित्र? फक्त पौर्णिमेची रात्र आहे एवढच? मला नाही तसे वाटतं••• 

हे संपूर्ण चित्र कितीतरी कथा सांगतेय असे वाटतं

०१) धरती आणि आकाश यांना जोडणारी ही डोंगराची रांग दु्रून चांगली दिसत असली तरी त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार, खाचाखळगे यांचे दर्शन त्या युगुलाला देते. त्याचेच स्पष्ट प्रतिबिंब पाहून ते विचार करू लागले••••

०२) आयुष्यात कितीही अंधार असला तरी ब्लू मूनची रात्र कधीतरी येतेच जीवनात. याचा अनुभव ते दोघे घेत होते•••

०३) दोघेही व्याकूळ••• समदु:खी••• आपापली कथा, व्यथा सांगताना तो पूर्णचंद्र त्यांच्या कथा ऐकायला केव्हा झाडावर विसावला हे त्यांना कळलेच नाही•••

०४) नर्गिस राजकपूरचा प्रभाव असलेले दोघे झाडाची छत्री करून एकत्र त्यामधे गुजगोष्टी करत असताना चांदण्याची बरसात होत आहे•••

०५) आपल्या जीवनाचा निर्णय घेताना साशंक असणारे ते दोघे••• विचारमंथनातून त्यांच्या अंतरंगावर ऊमटलेल्या लहरी••• यातून त्यांच्या जीवनात एक शरदचंद्रीय निर्णयाची आलेली जीवन उजळणारी कोजागिरी पौर्णिमा •••

अशा अनेक कथांचे कथन करणारे केशरयुक्त रंगाचे कथापौर्णिमा हे शब्द•••

लेखिकेच्या नावाप्रमाणेच पुनवेची छत्री घेऊन आपल्या शब्द चांदण्यांना लकाकते रूप देऊन प्रत्येक कथेतून साराचा पूर्णचंद्र घेऊन येणार याची ग्वाही••• 

तरीही एक कहाणी मला या चित्रातून समजली ती  कवितेतून सांगावी वाटते .

☆ सुरेल मैफिल ☆

रात सांगते एक कहाणी

चमचमणा-या ता-याची

गज-याला स्पर्श करून 

गंधाळणा-या वा-याची

 

वारा गाई एक गाणे 

लकेर घेऊन हास्याची

मंजूरवाने पुलकीत होऊन 

मोहरणा-या प्रितीची

 

प्रीत छेडी एक तराणा

साथ तया आरोहाची

अवरोह ये मागूती

सुरूवात मल्हाराची

 

मल्हार हा भारी जीवन

साथ तया असे तुझी 

भूपाळी ते भैरवी

सुरेल मैफिल दोघांची 

हे सगळे म्हणजे कथापौर्णिमा या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ. या कथा संग्रहात १५ कथा असल्याने दिलेले कथापौर्णिमा हे नाव संयुक्तिक असले तरी कितीतरी कथाबिजे मनात देणारे हे मुखपृष्ठ आहे एवढे नक्की. 

इतके बोलके मुखपृष्ठ करणार्‍या गंगाधर हवालदार यांना धन्यवाद आणि या मुखपृष्ठाची निवड केली म्हणून रसिक आंतरभारतीचे प्रकाशक नांदुरकर आणि लेखिका पूनम छत्रे यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆

☆ पुस्तकांवरबोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆ 

लेखिका : मनुबहेन गांधी 

प्रकाशक : नवजीवन प्रकाशन 

लांबी रुंदीला छोटेसे व पानेही 56 इतकेच व फक्त 15₹ किंमत असणारे नवजीवन प्रकाशनाचे हे पुस्तक तसे महत्वाचेच व आशयघन ही.

गांधींची नातेवाईक मनुबहेन गांधी यांचं ‘भावनगर समाचार’ मध्ये प्रकाशित झालेल्या डझनभर लेखांचे हे पुस्तक होय.                 

मनुबहेन यांचा हा लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. बापूजींच्यासोबत एका कठीण काळात नोआखली मध्ये राहण्याचा भाग्ययोग त्यांना लाभला. तत्संबंधीचा हा महत्वपूर्ण असा ऐतिहासिक दस्तऐवजच मानला पाहिजे.          

बापूजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर यात उलगडताना आपणाला पहायला मिळतात. काही प्रसंगांमधील बापूजींचे वागणे कसे होते. व त्यांची वैचारिक पातळी किती उच्च दर्जाची होती ते या लेख संग्रहातून जाणवते. जसे मनुबहेन यांना नोआखलीतील शांततेच्या कामासाठी रात्री २ वा. उठवताना सांगितलेला महत्वाचा संदेश. 

बापूजींचे सहकारी सतीशबाबू यांनी एक झोपडी तयार केली होती जीचे एक-एक भाग लहान मुलांनाही वाहून नेता येतील व कुठेही ती झोपडी वसवता येईल. जेणेकरून बापूजींना त्यानिमित्ताने या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कामात थोडी उसंतही मिळावी. परंतु, एकदा एका गावात ती झोपडी वापरल्यानंतर त्या गावातील भयंकर परिस्थिती पाहून आपणाला अशा झोपडीत ही राहण्याचा अधिकार नाही असे जाणून त्या झोपडी चे रुपांतर एका लहान इस्पितळात करण्यास सांगितले. असे अनेक प्रसंग आपणास वाचण्यासाठी मुळातूनच हे पुस्तक वाचायला हवे.  धन्यवाद !

परिचय –  श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-7 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-7 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने मी प्रस्तावनेसह एकूण सात भागांच्या पुस्तकांवर लिहित गेले. भागवत कथा ही कोटी सूर्याच्या तेजाएवढी आहे. मी त्यापुढे फक्त काजवा आहे. तरीही मी त्यावर लिहिण्याचे धाडस केले आहे. वाचकांनी ते गोड मानले असेल अशी अपेक्षा करते. आजच्या सातव्या दिवसाच्या पुस्तकावर लिहिताना मला खूप आनंद होतो आहे. या ज्ञानसागरातील एक बिंदू तरी मला वेचता आला, तो तुम्हासारख्या सुजाण वाचकांसमोर ठेवता आला. याचा तो आनंद आहे. यात काही संशोधन, पांडित्य प्रदर्शन अजिबातच अभिप्रेत नाही. संस्कृत भाषेचे थोडे फार ज्ञानही मला इथे उपयोगी पडले आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीस लेखकाने यानंतरच्या समाप्ती विषयी सांगितले आहे. ते असे– की सात दिवस सात पुस्तकांचे वाचन वा श्रवण करावे. रोजच शेवटी आरती करावी. त्यासाठी या भागाच्या शेवटच्या पानांवर लेखकाने संस्कृत व प्राकृत भाषेत भागवताची आरती दिली आहे. आठव्या दिवशी सामुदायिक रीत्या अठरा अध्याय गीता व विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावे. महाप्रसाद करून हा सप्ताह संपवावा. असे लेखकाने स्पष्ट केले आहे.

या पुस्तकाची सुरुवात अकराव्या स्कंधाने होते. हा श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध आहे. शुकाचार्य परीक्षिताला यादवांच्या विनाशाची कारणे सांगतात. प्रथम नारद व वसुदेव यांची भेट झाली. वसुदेवाला नारदांनी भागवत धर्माचे महत्त्व सांगितले आहे. भगवद् भक्तांचा श्रेष्ठ धर्म म्हणजे,

कायेन वाचा मनसेंन्द्रियैर्वा

बुद्ध्यात्मना वानुसृत् स्वभावात् |

करोति यद्यद् सकलं तदस्मै

नारायणेति समर्पयेत् तत् ||

असे नारदांनी सांगितले आहे. सर्व प्राणिमात्रात परमेश्वर आणि आपल्या आत्म्यात सर्व प्राणिमात्र आहेत. असे जो पाहतो तो खरा सर्वश्रेष्ठ भगवद्भक्त! असे भगवद् भक्ताचे लक्षण येथे दिले आहे.

भागवताचा हा कथा भाग म्हणजे केवळ गोष्टीरूप नाही तर येथे केवळ जीवनाचे तत्त्वज्ञानच महर्षी व्यासांनी सांगितले आहे. जीव, शरीर हेच आत्मा असे समजतो. कर्माची फळे भोगतो. हेही विशद केले आहे. मुनींनी सृष्टीच्या अंताची प्रक्रिया सांगितली आहे. शंभर वर्षे सतत अनावृष्टी होईल. नंतर सांवर्तक नावाचे मेघ शंभर वर्षे मुसळधार वर्षाव करतील. मग प्रलय होईल. पृथ्वीवरील सुखे लगेच नष्ट होणारी आहेत. भागवताच्या अभ्यासाने जीव तरुन जाऊ शकतो, इत्यादी तत्त्वज्ञान सांगितले आहे. शुकाचार्य सांगतात की ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, इंद्रिये हालचाल करतात, ती शक्ती म्हणजे परमात्मा !! चराचर सृष्टीतील भगवंताची पूजा कशी करावी हे पुढे सविस्तर सांगितले आहे.

यानंतर विष्णूंनी जे चोवीस अवतार घेतले त्यांचे थोडक्यात वर्णन आले आहे. पुढे चार युगातील पूजा पद्धती कशा कशा होत्या,त्या त्या देवतांचे वर्णन केले आहे. लाभाच्या दृष्टीने कलियुग श्रेष्ठ आहे. कारण केवळ भगवंताचे नामस्मरण, कीर्तन, श्रवण यानेच या युगात मोक्ष मिळतो. असे लेखक म्हणतात.

यानंतर ब्रह्मदेवासह सर्व देव ऋषीमुनी द्वारकेत येऊन कृष्णाला भेटतात. ब्रह्मदेव श्रीकृष्णाला परत वैकुंठाला यावे अशी प्रार्थना करतात. तेव्हा यादव कुलाचा विनाश झाल्यावर मगच मी वैकुंठाला येईन असे श्रीकृष्ण म्हणतात. उद्धव मात्र श्रीकृष्णाच्या सह वैकुंठास जाण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा कृष्ण उद्धवाला उपदेश करतात. हा उपदेश म्हणजे सुद्धा फक्त जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. श्रीकृष्ण त्यासाठी उद्धवाला अवधूत या विरक्त, आत्मानंदात मग्न असणाऱ्या तरुणाची कथा सांगतात. तो विरक्त का असतो? याचे उत्तर म्हणजे “अवधूत गीता” आहे. या अवधूतानेच हा सर्व उपदेश केला आहे, असा वृत्तांत सांगून श्रीकृष्णांनी उद्धवाला सुखदुःखाची अशाश्वतता कशी असते, हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. अनेक छोटे मोठे दाखले व गोष्टी या ठिकाणी आल्या आहेत. सत्संगतीचे महत्त्व, भक्ती व ध्यान यांचे महत्त्व, सर्व अष्टसिद्धींचे विवेचन करून भगवंत उद्धवाला — कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी विभूतीची पवित्र स्थाने सांगितली– तीच स्थाने सांगतात. सर्व प्राणिमात्रातील आत्मा मीच आहे वगैरे वगैरे.

यानंतर चार वर्ण, चार आश्रम स्वीकारताना लोकांनी कसे वागावे, याचा उपदेश कृष्ण उद्धवाला करतात. ते कसे कठीण आहे हेही इथे सांगितले आहे. पुढे वैराग्य युक्त ज्ञान,भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग यांचे सविस्तर विवेचन श्रीकृष्ण करतात. पुढचे, शुद्ध काय, अशुद्ध काय याचे वर्णन तर आजच्या काळातही प्रत्येकाला उपयोगी पडणारे आहे.

अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोsपि वा |

य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यंतर:शुचि: ||

या मंत्राने कोणत्याही कर्माच्या कर्त्याची शुद्धी होते, असे श्रीकृष्ण सांगतात.

मूलतत्त्वे किती? प्रकृती- पुरुष यात भेद की अभेद? याविषयी उद्धवाच्या शंकेचे निरसन श्रीकृष्णाने केले आहे. उद्धवाने एक प्रश्न विचारला आहे की, विद्वानांनाही दुष्ट लोकांनी केलेले अपमान सहन होत नाहीत. मग सामान्यांना ते कसे शक्य होईल? यावर श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केला, तो “भिक्षु गीता” म्हणून प्रसिद्ध आहे. “मी” ही भावनाच या सर्वाला कारणीभूत ठरते. यानंतर सांख्य तत्त्वज्ञान, सत्व, रज, तम या तीन वृत्ती यांचे वर्णन आले आहे. पुढे पुरूरवा व उर्वशीची छोटी कथा आली आहे. श्रीकृष्ण उद्धवाला कर्मयोग पूजा पद्धतीची माहिती देतात. ज्ञानयोग भक्तीयोग वगैरे सविस्तर सांगून श्रीकृष्ण उद्धवाला बद्रिकाश्रमात जाण्याची आज्ञा देतात. भागवत धर्माचे चिंतन केल्याने तू जीवन्मुक्त होशील असे सांगतात.

यानंतरचा कथा भाग– द्वारकेत काही उत्पात सुरू होतात. ही यादवांच्या विनाशाची चिन्हे असतात. यावर श्रीकृष्ण सर्व यादवांसह प्रभासक्षेत्री शंखोद्धार तीर्थाला जाण्याचा पर्याय शोधतात. तिथे मद्य पिऊन सर्व यादव आपापसात लढले व यादव कुळाचा विनाश झाला. बलरामही समुद्र काठावर योगधारणा करीत बसले व सदेह पृथ्वीतल सोडून गेले. श्रीकृष्णही एका पिंपळाच्या झाडाखाली डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून बसून राहिले. त्याचवेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने हरीण समजून कृष्णाच्या पायावर अणकुचीदार बाण मारला. तो बाण जमिनीवर पडला. त्या भिल्लाने जवळ येऊन पाहिले तर त्याला चतुर्भुज श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्याला श्रीकृष्ण म्हणाले,” हे सारे माझ्या इच्छेनेच घडले आहे. मी आता तुला वैकुंठप्राप्ती देतो.” त्याच वेळी कृष्णाचा सारथी दारूक रथ घेऊन तिथे आला. त्याला सर्व हकीकत सांगण्यास कृष्णाने द्वारकेस धाडले. तो खिन्न मनाने द्वारकेस गेला. त्याने हस्तिनापुरासही हे वर्तमान कळविले. पुढचे वर्णन श्रीकृष्णाचे निजधामाला जाणे आणि द्वारका नगरी समुद्रात पूर्ण बुडणे याचे केलेले आहे. परमेश्वराच्या अवतार समाप्तीनंतर इथे अकरावा स्कंध समाप्त होतो.

बाराव्या स्कंधाच्या सुरुवातीला शुकाचार्य पृथ्वीवर पुढे कोणकोणत्या राजांनी राज्य केले, याची परीक्षिताला माहिती देतात. कलियुगात लोक कसे वागतील, जगतील याचे पूर्ण वर्णन, आजच्या काळात जे घडते आहे, तसेच तंतोतंत भागवतात केले आहे. पण त्यावर कलियुगातील दोषांवरचे उपायही सांगितले आहेत. प्रलय, युगे, कल्प यांचे वर्णन करताना शुकाचार्य सांगतात की, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक व नित्य हे चार प्रलयाचे प्रकार आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की, आपण मरणार! ही बुद्धी तू आता सोडून दे. कारण आत्मा अमर आहे.

परीक्षित राजाचा देह भस्मसात झाल्यावर त्याचा पुत्र जनमेजय सर्पयज्ञ करतो. ही कथा आली आहे. बृहस्पती त्याला उपदेश करतात. मग तो सर्पयज्ञ थांबवतो.सूत महर्षींनी शौनकांना ही कथा सांगितली. ते शौनकांना वेदविस्तार, विभागणी याविषयी विवेचन करतात. प्रथम शब्द ॐकाराविषयीची माहिती पुढे दिली आहे.

पुराणे म्हणजे काय? ती कोणती आहेत? याचे थोडक्यात वर्णन पुढे लेखकाने केले आहे. यानंतर मार्कंडेय ऋषींची कथा सांगितली आहे. त्यांना नरनारायणांनी वर दिला. त्यात त्यांनी प्रलयही अनुभवला. त्यांना नरनारायणांनी – तुम्ही कल्पांतापर्यंत अजरामर व्हाल, त्रिकालज्ञ व्हाल, पुराणांचे आचार्य व्हाल असा वर शंकरांनी प्रदान केला. पुढे सूर्याच्या सृष्टीचक्राचे वर्णन आले आहे. सनातन धर्म म्हणजे काय? हे पुढे शौनकांनी सूतांना सांगितले आहे. शिवाय पहिल्यापासून भागवतात कोणते विषय आले आहेत? त्या सर्व कथानकांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. थोडक्यात — भागवतमहिमा वर्णिलेला आहे. अठरा पुराणांची प्रत्येकी श्लोक संख्या किती? हे सांगितले आहे. अकरावा स्कंध हे भगवंताचे मन तर बारावा स्कंध हा भगवंताचा आत्मा आहे. असे लेखक म्हणतात.

यानंतर लेखकाने ब्रह्मदेव, नारद, वेदव्यास, शुकाचार्य यांना वंदन केले आहे.

सर्वात शेवटी परमात्म्याला वारंवार नमस्कार करून लेखकाने भगवंताची प्रार्थना केली आहे.

इथे बारावा स्कंध समाप्त होतो व सातव्या दिवसाचा कथा भाग संपतो.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर परब्रम्ह परमात्म्याचे समग्र दर्शन घडविले आहे.

भवे भवे यथा भक्ति: पादयोsस्तव जायते |

तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत: प्रभो ||१||

*

नामसंकीर्तनं यस्य सर्वपाप प्रशमनम् |

प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरीम् परम् ||२||

सर्वात शेवटी हे दोन श्लोक दोन वेळा म्हणून, सर्वांनी पोथीची पूजा करून, नैवेद्य आरती करावी व जयजयकार करावा असे लेखकाने सांगितले आहे. हा श्लोक म्हणजे भागवताचा उपसंहार आहे. संपूर्ण भागवत श्रवणाचा निष्कर्ष म्हणून, सर्व दुःखे दूर करून, निरंतर आनंद देणाऱ्या या भगवंत मूर्तीचे आपाद मस्तक ध्यान करून त्याच्या चरणारविंदाला नमस्कार करूया.

 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

इथेच मी प्रस्तावनेसह लिहिलेले आठ भाग संपले. भागवत कथेवरील सात पुस्तकांचे वाचन, अभ्यास आणि तोडके मोडके का होईना, पण विवेचन करण्याचे बळ मला परमात्म्यानेच दिले. हे माझे महद्भाग्य आहे. यात जर काही चुकत असेल तर आपण मोठ्या मनाने क्षमा करावी.

 प्रज्ञा मिरासदार — पुणे

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “सुवर्णसुखाचा निर्झरू” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “सुवर्णसुखाचा निर्झरू” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आकाशात तांबूस आभा ••• तोच तांबूल रंग जमीनीवर सांडलेला••• या दोघांना सांधणारी डोंगराची रांग•••डोंगर माथ्यावर चमचमणारी सोनेरी किरणे असलेला सोन्याचा गोळा•••

अहाहा नेत्रसुख देणारे हे सुंदर चित्र••• उगवत्या सूर्याचे आहे का मावळतीच्या सूर्याचे आहे हे समजणे कठीण. 

पण काय सांगते हे चित्र? फक्त सकाळ किंवा संध्याकाळ झाली आहे एवढेच  ? नक्कीच नाही. 

१.झरा म्हटले तरी एक सदा पुढे जाणारा चैतन्याचा स्रोत जाणवतो. पण या सोनेरी रंगामुळे हा झरा रुपेरी न रहाता सोन्याचा होऊन जातो. 

२.झर्‍याचा उगम नेहमीच डोंगरमाथ्यावरून होतो.  हा सोन्याचा झरा पण डोंगर माथ्यावर उगम पावला आहे. 

३.  पुढे पुढेच वाहणारा हा स्रोत अनेक आशेची, यशाची, प्रगतीची रोपटी वाढवतो आणि याच रोपट्यांचे डेरेदार वृक्षात परिवर्तन होणार असल्याची ग्वाही देतो. हे सांगताना या सोनेरी वाटेवर चितारलेली छोटी झुडुपे आणि वर मोठ्या झाडाची फांदी एक समाधानकारक लहर मनात निर्माण करते.

४. जमीन आणि आकाश सांधणारे डोंगर खूप मोठा आशय सांगतात. जमिनीवर घट्ट पाय रोऊन उभे राहिले तरी आकाशा एवढी उंची गाठता येते.

५. तुमच्या मनात आले तर तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता .ते सामर्थ्य तुमच्यामधे आहे .फक्त त्याची जाणिव सूर्यातील उर्जेप्रमाणे तुम्ही जागवा.

६. सूर्यातून ओसंडणारी ही आभा दिसताना जरी लहान दिसली तरी तिचा विस्तार केवढा होऊ शकतो हे प्रत्यक्ष तुम्ही जाणा.

७. जैसे बिंब तरि बचके एवढे।

     परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे।

     शब्दांची व्याप्ति तेणें पाडे।

     अनुभवावी।। (श्रीज्ञानेश्वरी : ४-२१३)

ज्ञानेश्वरीतील या ओवी प्रमाणे तुम्ही स्वत: जरी लहान वाटलात तरी तुमच्यातील सामर्थ्य तुमचे कर्तृत्व यामुळे तुम्ही मोठे कार्य निश्चित करू शकता या आदर्शाची आठवण करून देणारा हा दीपस्तंभ अथवा तेवती मशाल वाटतो .

८. त्यापुढे आलेला देवळाचा भाग , देवळाची ओवरी, त्यावर विसावलेला माणूस ••• हे सगळे जे काही माझे माझे म्हणून मी गोळा केले आहे ते माझे नाही .हे या परमात्म्याचे आहे याची जाणिव मला आहे हे मनापासून या भगवंताच्या दरबारात बसून मी भगवंताला सांगत आहे. असा अर्थ प्रतीत करणारे हे चित्र वाटते .

०९. देवाला जाताना नेहमी पाय धुवून जावे. तर मी देवळात जाताना या सुवर्णसुखाच्या झर्‍यात पाय धुवून मी तुझ्याकडे आलो आहे .हे सांगत आहे.

१०. हे सगळे नक्की काय आहे हे सांगायला सोन्यासारख्या पिवळ्या धम्मक अक्षरांनी लिहिलेले सुवर्णसुखाचा निर्झरू हे शिर्षक.

११. यातील निर्झरू या शब्दाने त्यातील लडिवाळपणा जाणवतो. आणि हा निर्झर सुवर्णाचाच नाही तर तसेच सुख देणारा आहे हे सांगतात.

१२. ना सकाळ ना रात्र, ना जमिनीवर ना आकाशात, ना मंदिरात ना मंदिराबाहेर, ना दृष्य ना अदृष्य अशा परिस्थीतीत नरसिंहासारखे  ना बालपणी ना वृद्धापकाळी घडलेले हे परमात्म्याचे दर्शन आहे असे वाटते .

अशा छान मुखपृष्ठासाठी सुनिल मांडवे यांना धन्यवाद.

अशा छान मुखपृष्ठाची निवड केल्याबद्दल प्रकाशक सुनिताराजे पवार आणि लेखक  एकनाथ उगले यांचे आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पाचवा कोपरा (मराठी कथासंग्रह) – – लेखिका – प्रा. सुनंदा पाटील ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  पाचवा कोपरा (मराठी कथासंग्रह) – लेखिका – प्रा. सुनंदा पाटील ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆ 

लेखिका                 प्रा.सुनंदा पाटील 

प्रकाशक               शब्दान्वय प्रकाशन, मुंबई

पृष्ठे                       136

मूल्य                     रु 250/-

प्रा. सुनंदा पाटील

प्रा. सुनंदा पाटील यांचे जेष्ठ नागरिकांना समर्पित केलेला कथासंग्रह आजच वाचून पूर्ण केला.

कथा वाचनापूर्वी लेखिकेचे मनोगत ही वाचले होते ते जरा मनात धाकधूक ठेऊनच !  याचे कारण अस कि जेष्ठंना सूचना, सल्ला, पर्याय हे सतत मिळत असतात . सांगणाराही मदत करण्याच्या उद्देशाने किंवा त्रास कमी करण्याच्या हेतूनेच सांगत असतो. पण प्रत्येक घरातील माणसांची  पध्दत व आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने हा सल्ला वापरता येतोच अस नाही.अशावेळी जर मानसिकरित्या  संभ्रमीत असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळतो तो प्रत्यक्ष अश्या परिस्थितीतून वाट काढणाऱ्या आपल्या सहकारी मित्रांची. नेमकी हीच उपलब्धी या कथांनी दिली आहे.

कथासंग्रहातील कथा जेष्ठांच्या असल्या तरी वैविध्य पूर्ण आहेत.  एकट्याने रहाताना आपली पेंटिंग ची आ्ड जपणार्या भरारी मधील सुनिताताई असोत किंवा वाटचाल मधल्या शारदबाई वागळे असोत , आपल्या छंदांना त्यांनी म्हातारपणीच्या काठीचा मान दिला, तर मनात ओसंडून वाहणाऱ्या मायेला मला आई हवी अस म्हणणाऱ्या मुलाला माधवीताईंनी आईची माया दिली. रिटायर झालेल्या अण्णांना पैशाची नड भासू लागली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची संस्कृत ची आवड हेरून पौरोहित्याचा मार्ग दाखवला विक्री या कथेतील मनोहरपंतांनी आपल्या भावांचे नाते पैशापेक्षा जास्त मोलाचे मानले. मोकळा श्वास मधील अक्कानी तर मला जोरदार धक्काच दिला.  ज्या आक्का देवासमोर माझ्याआधी माझ्यापतीचे निधन होउदे असे मागणे मागत होत्या त्या घर सोडायची हिमंत बांधतात वजरा छोट्या गावात घर घेऊन स्वतंत्र राहू बघतात ही धीराची कल्पना आहे.

ज्या कथेचे नाव कथा संग्रहाला दिले आहे ती पाचवा कोपरा ही कथाही  वास्तवाशी नाते सांगणारी आहे.घरात उपर्यासारखी मिळणारी वागणूक, साध्या साध्या गोष्टी वर लादलेली बंधने, आवडीच्या गोष्टींना मुद्दाम अडथळे आणणे या सर्व गोष्टींना वैतागून श्रध्दाताई वृध्दाश्रमात रहायला जातात व तेथे आपला लिखाणाचा छंद पुरा करतात .हे सर्व करताना त्यांनी आपला मनाचा मोठेपणा जपला आहे.  त्या मुलाला आपल्या अकौंटमधले पैसे काढून मोठे घर घेण्यास सुचवतात. आपल्या घरातील माणसांना कमी लेखू नये, क्षमता ही स्वतंत्र गोष्ट आहे त्याचा आदर करायला शिक हेही त्या सांगायला विसरत  नाहीत. अत्यंत भावपूर्ण शब्दांत लेखिकेने कथेचा शेवट केला आहे. 

सर्व कथांचे तात्पर्य मात्र सर्व जेष्ठांनी लक्षात ठेवले पाहिजे ..  ते म्हणजे जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देउ नये अशी आपली जुनी म्हण. ही मात्र वारंवार प्रचितीस  येते.

लेखिकेने आपल्या मनोगतात आपले विचार व्यक्त करतानाही ही अपेक्षा ठेवली आहे. पुस्तकाच्या समारोपाच्या कथेनंतर वाचकाचाही हाच विचार पक्का झाला तर लेखनाचे सार्थक झाले असे होईल. 

सर्व जेष्ठांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

परिचय : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-6 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-6 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

श्रीकृष्णाच्या अद्भुत लीलांनी व कथांनी युक्त असा भागवतातील दहावा स्कंध म्हणजे जणू भागवताचा आत्माच!! मागील भागात आपण या दहाव्या स्कंधातील पूर्वार्ध पाहिला. (पाचव्या भागात).आता या दहाव्या स्कंधाचा – पर्यायाने-  श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध पाहू या.

सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने वेदस्तुती या कथा भागाने केली आहे. शब्दांनी वर्णन न करता येणाऱ्या परब्रम्ह परमात्म्याची वेदांनी केलेली ही स्तुती आहे. भागवत ग्रंथामध्ये दशम स्कंधाच्या ८७ व्या अध्यायातील हे २८ श्लोक म्हणजे वेद वेदांताचे सार आहे असे लेखक म्हणतात. वाचायला फारच कठीण असणाऱ्या पण सुंदर संस्कृत श्लोकांनी आणि  या वेदस्तुतीने सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने केली आहे.

नंतर लेखक पुन्हा श्रीकृष्ण चरित्राकडे वळले आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला कंसवधा नंतरची कथा सांगतात. कंस हा जरासंधाचा जामात होता. जरासंधाच्या दोन मुली अस्ति आणि प्राप्ति या कंसाच्या पट्टराण्या होत्या. कंस वधा नंतर त्या पित्याकडे गेल्या तेव्हा जरासंधाला दुःख व संताप झाला. त्याने तेवीस अक्षौहिणी सैन्यासह मथुरेला वेढा घातला. संपूर्ण यादव कुळ नष्ट करण्याचे ठरवले. श्रीकृष्णानेही पृथ्वीवरील हा दैत्य भूभार कमी करण्याचे ठरवले. आकाशातून सूर्यरथासारखे तेजस्वी दोन रथ पृथ्वीवर उतरले. कृष्णाने एक बलरामाला दिला. श्रीकृष्णाचा दारुक नावाचा सारथी होता. यानंतरच्या या तुंबळ युद्धाला सुरुवात कशी झाली, परस्परांशी कसे युद्ध खेळले गेले , शस्त्रविद्या वगैरेचे अतिशय रोचक, अंगावर काटा आणणारे वर्णन लेखकाने केले आहे. जरासंधाचा पूर्ण पराभव करूनच श्रीकृष्ण मथुरेला परतले. जरासंध पुन्हा मगध राज्यात परतला. पण नंतर असेच तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने एकूण सतरा वेळा मथुरेवर हल्ला केला. प्रत्येक वेळी त्याचे सारे सैन्य नष्ट करून श्रीकृष्णाने त्याला उदारपणे सोडून दिले. पण भूभार नष्ट केला.

अठराव्या वेळी कालयवन नावाचा म्लेंच्छ तीन कोटी सैन्य घेऊन आला. हे संकट महा भयंकर आहे . हे जाणून श्रीकृष्णाने समुद्रात बारा योजने दूर विस्तीर्ण नगरी विश्वकर्म्या कडून वसवून तिथे सर्व यादवांना सुरक्षित ठेवले. हीच द्वारका नगरी होय!! या नगरीचे वर्णन लेखकाने अत्यंत सुंदर केले आहे. त्या नगरीतून बाहेर पडणाऱ्या श्रीकृष्णाचा कालयवनाने पाठलाग केला. कालयवनाला एका गुहेपर्यंत आणून मांधाता राजाचा मुलगा मुचकुंद याचे कडून त्याला भस्मसात करविले. ही मुचकुंदाची कथाही खूपच सुंदर रंगविली आहे. श्रीकृष्ण रणांगणातून पाठ दाखवून पळाले म्हणून त्यांना रणछोडदास नाव पडले . जरासंधही त्यानंतर पुन्हा युद्धास आला त्या युद्धाचेही वर्णन खूपच रंजक आहे.

यानंतरची रम्य व रसाळ कथा रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणी हरण याची आहे. ही कथा प्रत्यक्ष वाचावी अशीच आहे.स्वयंवरानंतर कृष्णाने जमलेल्या सर्व राजांच्या देखत रुक्मिणीला रथात बसवले. शिशुपाल व रुक्मिचा पराभव केला (रुक्मि हा रुक्मिणीचा भाऊ !) आणि श्रीकृष्ण रुक्मिणीस घेऊन द्वारकेला गेले. शंकराने कामदेवाला (मदनाला) भस्म केले. तेव्हा मदनाने पुन्हा देह मिळावा म्हणून भगवंताची प्रार्थना केली होती. तोच कामदेव, भगवंत व रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्माला आला. त्या प्रद्युम्नाची छोटी कथा पुढे आली आहे .नंतर श्रीकृष्णाचा जांबवती व सत्यभामाेशीही विवाह झाला. पुढे स्यमंतक मण्याची मनोरंजक कथा आहे. यानंतर श्रीकृष्णाने कालिंदी व इतर स्त्रियांशी विवाह केल्याची कथा आहे. तसेच श्रीकृष्णांनी इंद्राचे छत्र बळकावणाऱ्या नरकासुरास ठार केल्याची रम्यकथा लेखकाने वर्णन केली आहे. त्याने बंदीवासात टाकलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी भगवंताने तितकी रुपे घेऊन विवाह केले. श्रीकृष्णाने एकदा गंमतीने रुक्मिणीच्या पती प्रेमाची परीक्षाही घेतली. ही कथा खूप छान रंगविली आहे.

यानंतर श्रीकृष्णाच्या मुख्य आठ राण्यांची नावे सांगितली आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, सत्या (नाग्नजिती), कालिंदी, लक्ष्मणा, मित्रविंदा, भद्रा अशा या आठ राण्या!! या राण्यांच्या मुलांची ही नावे सांगितली आहेत .या  सोळाहजार स्त्रियांनाही प्रत्येकी दहा मुले झाली असल्याचा उल्लेख आहे. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मिची कन्या रुक्मवती हिच्याशी तर प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याचा विवाह रुक्मिची नात रोचना हिच्याशी झाला होता.  बाणासुर दैत्याची मुलगी उषा! हिचे अनिरुद्धावर प्रेम होते. त्याचे सुंदर वर्णन कथाकाराने केले आहे. त्यावरून बाणासुराचे श्रीकृष्णाशी युद्ध झाले. त्याला कृष्णाने मुक्ती दिली.

या आणि यापुढील काही कथा आपल्याला माहीतही नसाव्यात. श्रीकृष्णाची मुले खेळत असताना त्यांना कृकलास नावाचा पर्वतप्राय खेकडा दिसला. श्रीकृष्णाने त्याला विहिरीतून बाहेर काढले. तो पूर्वजन्मी इक्ष्वाकूचा मुलगा नृग नावाचा दानशूर राजा होता. या नृग राजाला त्याची चूक नसताना केवळ गैरसमजाने खेकड्याचा जन्म मिळाला ही कथा आहे.

एकदा बलरामांनी गोकुळाला भेट दिली, त्याचे वर्णन पुढे दिले आहे. पुढची कथा स्वतःला श्रीकृष्ण समजणाऱ्या पौंड्रकाची आहे. त्याच्याशी युद्ध करून कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडविले. काशी राजाचा वध केला. ते पाहून सुदक्षिण नावाचा काशीराजाचा मुलगा श्रीकृष्णावर चालून आला. त्याचाही वध कृष्णाने सुदर्शन चक्राने केला व काशीनगरीही भस्मसात केली. बलरामांनीही काही अद्भुत पराक्रम केले. त्याच्या कथा शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितल्या आहेत. द्विविद नावाच्या वानराचा वध बलरामाने केला. तो सुग्रीवाचा मंत्री होता. पण नरकासुराचा परममित्र होता. बलरामाने हस्तिनापुरास जाऊनही खूप पराक्रम  गाजविला. कौरव घाबरले. दुर्योधनाने बलरामाला बाराशे हत्ती, एक लाख वीस हजार घोडे, सहा हजार सुवर्ण रथ आंदण दिले.

नारद मुनींनी एकदा द्वारकेस जाऊन श्रीकृष्णाचा संपूर्ण संसार व परिवार पाहिला. या कथेनंतर श्रीकृष्णाची दिनचर्या लेखकाने वर्णन केली आहे. नंतर भीमाकरवी श्रीकृष्णाने युक्तीने जरासंधाचा वध करविला. ही कथा आहे. जरासंधाने बंदी बनवलेल्या सर्व राजांची मुक्तता श्रीकृष्णाने केली. शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर त्याचा सुदर्शन चक्राने वध केला. तीन जन्म तो वैरभावनेने का होईना कृष्णाचाच जप करीत होता. त्यामुळे शिशुपालाला कृष्णाने मुक्ती दिली.

मयासुराने निर्माण केलेल्या भवनात दुर्योधनाची फजिती झाली. तेव्हा द्रौपदी त्याला हसली. मग दुर्योधन संतापला. ही कथा थोडक्यात सांगितली आहे. यानंतर शाल्व या शिशुपालाच्या मित्राचा वध, बलराम कौरव पांडवांच्या युद्धात निष्पक्ष म्हणूनच राहिले, ते तीर्थयात्रेस निघून गेले ही कथा आहे. बलराम नैमिषारण्यात आले. प्रभास क्षेत्री गेले. तिथून द्वारकेस परतले. या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले. त्याचे वर्णन लेखकाने केले आहे.

यानंतरची कथा सुदाम्याची आहे. ही कथा सर्वांनाच ज्ञात आहे. ती लेखकाने फारच सुंदर वर्णलेली आहे. सुदाम्यावर कृष्णाने अनुग्रह केला. यानंतर श्रीकृष्ण खग्रास सूर्यग्रहणाचे वेळी स्यमंतपंचक या क्षेत्री गेले. तिथे त्यांची नंद यशोदा व इतर गोपगोपींची भेट झाल्याचे वर्णन आहे.द्रौपदीने सर्व कृष्णपत्नींची  भेट  घेतल्याची  कथा  पुढे  आली आहे.वसुदेवाने श्रीकृष्णा कडून कर्माचा निरास कसा होईल याविषयी सर्व तत्त्वज्ञान समजून घेतले. श्रीकृष्णांनी देवकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिला कंसाने मारलेली तिची सात मुले देखील ब्रह्मदेवाकडून आणून आईला त्यांची भेट घडविली.

पुढे सुभद्रा हरणाची कथा आहे. बहिणीच्या स्वयंवराचे वेळी तिचे हरण करण्यास अर्जुनाला श्रीकृष्णाने मदत केली. हा कथा भाग आहे. यानंतर वृकासुराची कथा आहे. त्याने शंकराची आराधना करून- मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून जावा- म्हणून वर मागितला. त्यामुळे पृथ्वीवर हाहा:कार माजला. श्रीविष्णूंनी एकदा बटूचे रूप घेऊन त्याला सांगितले की शंकराने तुला खोटा वर दिला आहे. तू त्याची प्रचिती पहा. असे म्हणून त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि त्याला युक्तीने भस्मसात केले.

शेवटी द्वारकेचे वैभव व कृष्ण महिमा या वर्णनाने दहाव्या स्कंधाची व सहाव्या दिवसाच्या कथा भागाची समाप्ती होते.

सहाव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर विष्णूंच्या गळ्यातील वैजयंती माळेचे चित्र आहे. तिच्यात मुक्ता, माणिक्य, मरकत, इंद्रनील,हीरक ही पाच रत्ने गुंफलेली असतात. ती पाच रंगांची व गुडघ्यापर्यंत लांब असते. ही माला पंचमहाभूते व पंचतन्मात्रा यांचे प्रतीक आहे.

पंचरूपा  तु या  माला वैजयंतीगदाभृत: |

सा भूत हेतुसंघाता  भूतमाला च वै  द्विज ||

(विष्णपुराण)

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈