मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अर्थात

लेखक – श्री. अच्युत गाेडबाेले

प्रकाशक : बुकगंगा

पृष्ठ: ५४४

मूल्य: ४९९₹ 

हे पुस्तक एकाच वेळी अनेक पातळ्यांवर रचलेलं आहे. एका पातळीवर इथे आधुनिक अर्थशास्त्राची तत्त्वं अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत.

दुसऱ्या पातळीवर हा चक्क एक सामाजिक इतिहास आहे. म्हणजे अगदी पुराणकाळापासून, मध्ययुगातल्या सरंजामशाहीपासून, भांडवलशाहीच्या उगमापर्यंत आणि अगदी २००० सालाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटापर्यंतच्या काळाचा हा अर्थशास्त्रीय इतिहास आहे. पैसा कसा सुरू झाला, बँकिंग, कंपन्या, स्टॉक एक्स्चेंजेस वगैरेही कशा सुरू झाल्या हे सगळं यात आहे.

तिसऱ्या पातळीवर यात अर्थशास्त्रज्ञांची अतिशय विस्मयकारक चरित्रंही वाचायला मिळतील.

यात अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या विचारसरणींची आणि त्यांच्यातल्या वादांविषयीचीही खोलवर चर्चा आहे आणि त्यातलं काय बरोबर आणि काय चूक आहे त्याचा निर्णय वाचकांवर सोडलेला आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीला अर्थशास्त्राच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतलाय आणि नंतर ‘अर्थशास्त्राचा गाभा‌’ या विभागात अर्थशास्त्राची तत्त्वं अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहेत.

त्यानंतर अर्थशास्त्राचा इतिहास पाच भागांत सांगितलाय. शेवटचा विभाग आजच्या प्रश्नांसाठी राखून ठेवलाय.

या पुस्तकामुळे निदान काही वाचकांना तरी अर्थशास्त्राचा जास्त खोलवर अभ्यास करावा असं वाटलं, त्यातलं चैतन्य जाणवलं, त्यात जगाला दिपवून टाकेल असं संशोधन करावंसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपले आहेत असं वाटून ते सोडवावेसे वाटले तरी या लिखाणाचं चीज होईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नवा परीघ…  लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ नवा परीघ…  लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : नवा परीघ

लेखिका : आश्लेषा महाजन 

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

कवयित्री, लेखिका आश्लेषा महाजन यांचा दिलीपराज प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला ‘नवा परीघ’ हा कथासंग्रह नुकताच वाचला. यापूर्वी त्यांच्या कविता, आणि त्यांनी लहानांसाठी लिहिलेली-अनुवादित केलेली पुस्तकं, कादंबरी हे साहित्यप्रकार मी वाचले होते. १२ जुलै १९६१, पानशेच्या पुरावर आधारित असलेल्या कादंबरीवर मी पुस्तक परिचयदेखील लिहिलेला आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता त्यांचा ‘कथा’ हा साहित्यप्रकार मात्र माझ्या वाचनात आलेला नव्हता. आणि त्यामुळेच हा नवा कथासंग्रह नक्की कसा असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.

‘नवा परिघ’ या कथासंग्रहात सुरुवातीलाच मनोगतामध्ये आश्लेषा महाजन यांनी त्या कथासंग्रहाकडे का वळल्या किंवा कथा हा साहित्य प्रकार त्या कशा दृष्टीने पाहतात याचं उत्तम आणि प्रामाणिक कथन केलं आहे. एक वाचक म्हणून ते मनाला सहज स्पर्शून जातं. आपण एखादा साहित्यप्रकार का लिहितो आहोत, त्याची नक्की गरज काय आहे, हे एखाद्या लेखकाला/लेखिकेला समजणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या या मनोगतातून मला जाणवलं.

आणि पुढेही तोच प्रामाणिकपणा, तिच वैचारिक समज त्यांच्या प्रत्येक कथेतून दिसून येते. सद्यस्थितीतल्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या अशा या कथा आहेत. मुखपृष्ठावर दाखवल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याची विशिष्ट चौकट कुठेतरी नव्याने साधायला हवी, त्यात थोडी मोकळीक असायला हवी किंवा आजकालच्या भाषेत जरा स्पेस असायला हवी हा दृष्टिकोन यातल्या काही कथांमधून प्रकर्षाने जाणवतो. लेखिका मूलतः कवी मनाच्या आहेत किंबहुना कविता हा त्यांचा व्यक्त होण्याचा स्वाभाविक कलाप्रकार आहे त्यामुळे कथेमध्ये येणारी तरलता, काही प्रसंगांना विशिष्ट प्रकारे उद्धृत करणं, प्रत्येक गोष्टीचा शेवट ठराविक साच्यातून न करता तो वाचकाच्या दृष्टिकोनातून त्याला ठरवू देणं असेही काही प्रयोग या कथांमध्ये केल्याचं आढळतं. पण विशेष म्हणजे कथेमध्ये कुठल्याही स्वरूपात दोन ओळींची का होईना कविता घालण्याचा मोह प्रकर्षाने टाळलेला आहे. सुरुवातीच्या मनोगतातच त्यांनी सांगितलं कविता हा अतिशय उत्कट आणि हृदयस्थ प्रकार जरी असला तरी काही विचार, काही गोष्टी यांच्यासाठी मोठा परिघ असणं आवश्यक ठरतं आणि म्हणूनच त्या विषयांना त्यांनी कथा रूपात मांडलेलं आहे. या दृष्टिकोनातूनसुद्धा ‘नवा परीघ’ हे नाव या संग्रहाला साजेसं आहे असं म्हणता येईल.

यातल्या कथा निरनिराळ्या मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. आणि त्यांचं एकत्रिकरणं केलेलं आहे. त्यामुळेच काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यात लेखिका स्वतःच्याच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखाद्या नात्याकडे किंवा स्त्री-पुरुष सहजीवनाकडे कशी विविध दृष्टीतून पाहते हे स्पष्टपणे दिसून येतं. तसंच या कथासंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कथेला थेट सुरुवात होते. प्रास्ताविक आढळत नाही. आणि कुठलाही प्रकारचा पाल्हाळीकपणा न जाणवता घट्ट आकृतीबंध असलेला कथाऐवज आपल्याला वाचायला मिळतो. मोजकी पात्रं, त्यांच्यातले संवाद आणि गरजेपुरती येणारी त्यांच्या अवतीभवतीची पात्रं, त्यांची पार्श्वभूमी असे या कथांचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

सुख आणि दुःख या आपल्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छाप आणि काटा या सारख्याच त्या आपल्या आयुष्याला चिकटलेल्या असतात. आणि अनेकदा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी समसमान असतं. क्वचित प्रसंगी एखाद्याचं कमी जास्त असू शकतं, पण पूर्णविरोधाभास किंवा पूर्ण एकांगी असं आयुष्य सामान्य व्यक्तींच्या पदरी खूप कमी वेळा येतं. हा सुखदुःखाचा ‘तोल’ अतिशय उत्तमरीत्या या कथांमधून साधला आहे‌.

सर्वच कथा वाचनीय आहेत. पण विशेष परिणाम करतात त्या म्हणजे मेकअप, प्लाझ्मा, गादी, लेप, जीवन है अगर जहर, व्हेंचर पायलट, एकतानता. यातली प्लासिबो आणि श्रद्धा या कथांचा अजूनही विस्तार झाला असता तर चालला असता हे ही खरं. पण कदाचित मासिक किंवा अंकातल्या शब्द मर्यादेमुळे हे बंधन आलं असावं असं वाटतं. प्रत्येक कथा साधारणपणे ८ ते १० पानांची आहे आणि एकूण १६ कथांचा यामध्ये समावेश आहे. यातल्या बऱ्याच कथांवर उत्तम प्रकारच्या लघु फिल्म होऊ शकतील. याबाबत लेखिकेने खरंच विचार करायला हवा. साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या, जीवनातल्या अनेक प्रसंगांना सहजपणे, प्रामाणिकपणे सामोरे जाणाऱ्या, कुठलाही विशिष्ट प्रकारचा सूर न लावणाऱ्या या कथा सर्वसाधारण व्यक्तीला आपल्या जिव्हाळ्याच्या वाटतील अशाच आहेत.

एकूणच या कथांमध्ये मानवी नातेसंबंधांवर जास्त भर दिलेला आहे. मुळात मानवी नातेसंबंध ही गोष्टच अतिशय गुंतागुंतीची, समजायला क्लिष्ट, हाताळताना हळुवार आणि तितकीच पारंपारिक ओझ्यात जखडलेली बाब आहे हे नक्की. तंत्रज्ञानाच्या किती सुविधा उपलब्ध झाल्या, आर्थिक स्थितीचा एकूण स्तर जरी उंचावला तरीदेखील मानवी मनाच्या काही गरजा आणि काही क्षमता-अक्षमता देखील आपल्या आयुष्याला व्यापून उरतात त्यांची बीजं रुजतात आणि नकळत विचारप्रवृत्तही करतात. या कथांमध्ये ती तळाशी रुजलेली बीजं स्पष्टपणे दिसून येतात. त्यांच्यावरच या कथांची निर्मिती झाली आहे हे स्पष्टपणे जाणवण्या इतक्या या कथा नितळ आणि निर्मळ आहेत. त्यामुळे त्या जास्त भावतात.

नव्या परिघातल्या या कथा एकदा तरी आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “राजधुरंधर ताराराणी” -लेखक : श्री राजेंद्र घाडगे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “राजधुरंधर ताराराणी” -लेखक : श्री राजेंद्र घाडगे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : राजधुरंधर ताराराणी 

लेखक: राजेंद्र घाडगे

पृष्ठ: २५२

मूल्य: ३७५ ₹ 

छत्रपती शिवरायांच्या ज्येष्ठ स्नुषा महाराणी ताराबाईसाहेब यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर मोगल सम्राट औरंगजेब याच्याविरुद्ध दिलेला लढा हा जगाच्या इतिहासातील एक देदीप्यमान लढा म्हणून ओळखला जातो. ताराबाईच्या या कामगिरीस जगाच्या इतिहासात खरोखरच तोड नाही. परकीय शत्रू मुगल सम्राट औरंगजेब, त्याचबरोबर स्वकीय शत्रू छत्रपती संभाजीपुत्र शाहूराजे आणि नानासाहेब पेशवा यांच्याविरुद्ध ताराबाईंचा झालेला राजकीय संघर्ष हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे.

महाराणी ताराबाईंनी हिंदवी स्वराज्यरक्षणासाठी केलेला संघर्ष, त्यांचे बौद्धिक गुणकौशल्य, धैर्य, राजनीतिकौशल्य, स्वराज्यनिष्ठा, नेतृत्वगुण आदी गोष्टी इतिहासप्रेमींना या पुस्तकातून जाणून घेता येतील सध्याच्या काळात भले तलवारींच्या जोरावर लढाया होत नसतील; परंतु राजकीय, सामाजिक आणि प्रसंगी कौटुंबिक परिस्थितीवर मात करतानासुद्धा मनुष्याचे नीतिधैर्य किती मजबूत असले पाहिजे, तसेच आपण आपला स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा, नैतिकता कशी जोपासली पाहिजे, याची शिकवण ताराबाईंच्या या जीवनचरित्रातून आत्मसात करता येईल आणि म्हणूनच महाराणी ताराबाईंचे हे चरित्र घराघरांत आणि मनामनांत पोहोचले पाहिजे, असे वाटते.

ठळक वैशिष्ट्ये

१) दुर्मीळ अशा असंख्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले पुस्तक.

२) लेखकाचे अभ्यासात्मक विवेचन,

३) ताराबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा निपक्षपातीपणाने घेतलेला आढावा.

४) एक पराक्रमी स्त्री म्हणून ताराबाईच्या व्यक्तिमत्त्वाला आणि प्रतिभेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन.

५) नव्या जुन्या पिढीतील सर्व इतिहासप्रेमीसाठी एक अतिशय वाचनीय असा हा खास ग्रंथ.

लेखकाविषयी…….

राजेंद्र घाडगे हे एका नामांकित विमा संस्थेतून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. इतिहास लेखनाच्या अनुषंगाने पाहायचं झालं, तर ते नव्या पिढीतील एक प्रतिभावंत इतिहास अभ्यासक म्हणून ओळखले जातात. या ग्रंथासह इतिहासविषयक त्यांची एकूण पांच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच राजेंद्र घाडगे हे राज्य पुरस्कार प्राप्त लेखक असून, ते उत्तम व्याख्याते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत

इतिहास संशोधकांनी, अभ्यासकांनी आणि चिकित्सक वाचकांनी ताराबाईंचा हा अद्भुत असा जीवनप्रवास समजून घ्यावा आणि आपल्या गावागावांतील शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांना, ग्रंथालयांना तसेच आपल्या जवळच्या स्नेही, मित्र, नातेवाईक मंडळींना वाढदिवस, विवाह समारंभ आदी विशेष निमित्ताने हा ग्रंथ भेट द्यावा. त्यानिमित्ताने ताराबाईंचे कार्यकर्तृत्व घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  द कारगिल गर्ल 

लेखक : गुंजन सक्सेना 

अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके 

मुखपृष्ठ फोटोग्राफ – लेफ्टनंट कर्नल अनुपकुमार सक्सेना आणि अगंग गुणवान, अनस्प्लॅश

मुखपृष्ठ रचना – नीरज नाथ

पृष्ठे:२१६

मूल्य : ३६०₹ 

फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त) फ्लाइंग ब्रँचमध्ये कमिशन प्राप्त करणाऱ्या पहिल्या मोजक्या स्त्री अधिकाऱ्यांपैकी त्या एक असून, भारतीय स्त्रीवर पडलेला छाप पुसून टाकण्यासाठी त्यांनी नेटाने लढा दिला आहे. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी निवडण्यात येणाऱ्या स्त्री अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणसत्रासाठी त्यांची निवड होऊन त्यांना चित्ता/चेतक (ऑलवीट III) या युनिटमध्ये उधमपूर इथे पाठवण्यात आलं. फॉरवर्ड एअरकंट्रोल हे त्यांचं मुख्य काम होतं. युद्धाच्या धामधुमीत त्या हेलिकॉप्टरमधून हवाई मदत (बॅटलफिल्ड एअर स्ट्राइक – युद्धभूमीवर हवाई हल्ला) आणि निकट हवाई साह्य देत होत्या. तसंच, युद्ध करणाऱ्या विमानांना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं, हा त्यांच्या कामाचा भाग होता.

भारतीय वायुसेनेत (इंडियन एअरफोर्स) अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं, हे गुंजन यांनी या पुस्तकात अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितलं आहे. कारगिल युद्धात क्लासिक बीएएस पद्धतीने हल्ला करण्याऐवजी, जीपीएसच्या आधारे बॉम्बहल्ला करण्याची मुख्य पद्धत अमलात आली असताना, बॉम्ब लक्ष्यावर नेमके कुठे पडत आहेत, या संदर्भात गुंजनच्या युनिटने अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवली होती.

सीझफायर झाल्यानंतर १०८ स्क्वॉड्रनच्या अधिकाऱ्यांना टार्गेट भागापर्यंत नेणं, तसंच जिथे ३ आणि ८ डिव्हिजन हेडक्वार्टर्सचं काम सुरू होतं तिथे भेट देणं, ही कामगिरी गुंजनवर सोपवण्यात आली होती.

गुंजन यांना ‘द कारगिल गर्ल’ ही यथायोग्य उपाधी प्राप्त झाली. युद्धभूमीवर प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या त्या भारतीय सेनेच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांच्यासारख्या स्त्री अधिकाऱ्यांची भारतीय वायुसेनेला आवश्यकता आहे. इतर तरुण स्त्रियांना प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन आपल्या देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहण्याची प्रेरणा अशा अधिकारी स्त्रिया नक्कीच देऊ शकतात.

“पूर्ण भरलेली ‘इन्सास’ असॉल्ट रायफल आणि एक रिव्हॉल्वर माझ्या हेलिकॉप्टरमध्ये नेहमी असे. माझं हेलिकॉप्टर जर शत्रूच्या सीमेत कोसळलं, तर मला युद्धबंदी केलं जाईल, या शक्यतेची जाणीव मला सतत होई. तरीसुद्धा, मी जे करायला हवं, ते मी करत राहिले. युद्धाचा गोंधळ तुम्हाला अति विचार करूच देत नाही.” – – गुंजन सक्सेना

सन १९९४ मध्ये वीस वर्षांची गुंजन सक्सेना म्हैसूर इथे जाणाऱ्या रेल्वेत बसली. चौथ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (स्त्रियांकरता) पायलट कोर्सच्या निवडप्रक्रियेकरता उपस्थित राहण्यासाठी ती निघाली होती. प्रशिक्षणाचे खडतर चौऱ्याहत्तर आठवडे पार पाडल्यानंतर गुंजन सक्सेना दुन्डिगल इथल्या एअरफोर्स अॅकॅडमीतून उत्तीर्ण होऊन पायलट ऑफिसर म्हणून बाहेर पडली.

दि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात पाकिस्तान्यांनी शिरकाव केल्याची बातमी स्थानिक धनगरांनी आणली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत हजारो भारतीय तुकड्या त्या घुसखोरांना घालवून देण्याच्या उद्दिष्टाने पर्वतांवरच्या भीषण युद्धात गुंतल्या. भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’चा पुकारा केला. प्रत्येक पायलट त्यासाठी हजर होता. तोवर युद्ध सुरू असलेल्या भागात स्त्री पायलटला कधी पाठवण्यात आलं नसलं तरी वैद्यकीय स्तरावर जखमींना उचलून आणणं, रसद पुरवठा आणि इतर कामांसाठी त्यांना तैनात केलं जाई.

सक्सेनासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच वेळ होती. द्रास आणि बटालिक प्रांतात लष्करी उतारू घेऊन जाणं, सुरू असलेल्या युद्धातून जखमींना उचलून आणणं, ही कामं ती करत होतीच. शत्रूच्या स्थानाबद्दल आपल्या वरिष्ठांना ती अतिशय तंतोतंत माहितीही देत होती. तिच्या एका उड्डाणादरम्यान पाकिस्तानी रॉकेट मिसाइलपासून ती अगदी काही इंचांनी वाचली होती. या सर्वांतून निडरपणे आपलं कर्तव्य पार पाडत सक्सेनाने ‘द कारगिल गर्ल’ ही उपाधी प्राप्त केली.

तिची ही प्रेरणादायक कथा तिच्याच शब्दांत…

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आधुनिक भस्मासुर  

… अकाली जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय

लेखक : मंदार गद्रे 

 (औषधांपासून मुक्ती देणारा ‘डॉक्टर’)

पृष्ठे: १८४

मूल्य: २७०₹ 

लेखकाचे मनोगत

जीवनशैलीचे आजार जगभरात धुमाकूळ घालतायत. आज जवळपास प्रत्येक घरामध्ये हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, पीसीओडी, फॅटी लिव्हर, किडनीचे विकार, विस्मरण बळावले आहेत. या सर्व आजारांशी लढताना जगभरातच सामान्य माणूस आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्या नाकी नऊ आलेले आहेत. आणखी एक चिंतेची बाब अशी की हे सर्व चित्र दिवसेंदिवस बिघडतच चाललं आहे.

या आजारांमागचं जीवशास्त्र स्पष्ट समजून घेण्याची आज मोठी गरज आहे. त्याशिवाय ‘हा पदार्थ खा किंवा तो टाळा’ या प्रकारच्या वरवरच्या सल्ल्यांपेक्षाही मूलभूत असं मानवी आहाराचं शास्त्र मांडण्याची नितांत गरज आहे.

हे आजार जिथून निर्माण झाले, तिथेच ते सोडवण्याची उत्तरंही शोधावी लागतील. नाहीतर, कुठेतरी रानात हरवलेली वस्तू, केवळ उजेड आहे म्हणून रस्त्यावरच्या दिव्याखाली शोधण्याचीच चूक आपण करू खरं तर करतोच आहोत.

जीवनशैलीच्या आजारांवरची औषधं ही मुख्यतः लक्षणांवर तात्पुरता उपाय करणारी आहेत. म्हणजे आग लागलेली आहे, त्यातून काळा धूर येतो आहे, तर तो धूर इकडे-तिकडे पसरवून त्याचा त्रास कमी करणे असलं काम ही औषधं करतात. अश्या पंख्यांचा एक मर्यादित उपयोग जरूर असतो, पण म्हणून आपण असे पंखे लावून आग तशीच ठेवत नाही! ती विझवण्याच्या मागे लागतो! त्याचमुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की जीवनशैलीच्या आजारांशी लढण्यासाठी, औषधं-शस्त्रक्रिया ही मुख्य उत्तरं नाहीतच!

‘जीवनशैलीत योग्य बदल करा’ हे आपण शेकडो वेळा ऐकलं असेल. पण म्हणजे नक्की काय, आणि महत्त्वाचं म्हणजे तसं का-याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतच नाही. मतप्रदर्शनाच्या मार्गाने हे सल्ले आपल्याला दिले जातात, आणि विज्ञानाचा विद्यार्थी ह्या नात्याने माझं त्यामुळे कधीही समाधान झालं नाही. माझी ही जिज्ञासा मला मानवी उत्क्रांती, जैव रसायन, आंतरिक आरोग्य अश्या अनेक वाटांनी घेऊन गेली. ह्या प्रवासात जे सापडलं ते सुसंगतपणे मांडावं, ह्या सर्व विषयातलं सौंदर्य बाकीच्यांपर्यंत पोचवावं अश्या तीव्र इच्छेने हे पुस्तक लिहून झालं आहे.

आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी मी अश्या दृष्टिकोनाच्या शोधात होतो ज्यातून योग्य उपाय सहज समजून यावेत. हे उपाय विज्ञानाचा मजबूत आधार असलेले, आणि रोजच्या आयुष्यात करण्याजोगे असावेत. पण हे उपाय नुसतेच न सांगता त्यामागचा दृष्टिकोन आणि विचारसंगती सांगावी म्हणून हा लेखनप्रपंच!

मानवी आहार आणि वर्तनातली मूलभूत आणि चिरकाल टिकणारी अशी काही तत्त्वं आहेत आणि ती वापरून जीवनशैलीच्या रोगांची आगच मुळातून विझवता येते! आपलं जैव-रसायन समजावून घेऊन, आहार आणि वर्तनात योग्य बदल करून, शरीराला अश्या स्थितीला नेता येतं की जिथे हे रोग शरीरात राहू शकत नाहीत! रोग परतणं, आणि त्यामुळे लक्षणांवर दिलेली औषधं सुटणं हे केवळ परिणाम आहेत. मुख्य काम हे शरीराला आतून स्वस्थ-सुदृढ करण्याचं आहे! या विषयाचा खोलवर अभ्यास करून आता हेच काम मी करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे डॉक्टर मंडळीही त्यांच्या शरीरातली अशी आग विझवायला येतात! आंतरिक आरोग्याचा अभ्यासक म्हणून मी डॉक्टरांचाही डॉक्टर झालोय-औषधांपासून मुक्ती देण्याचं काम करतोय. आरोग्यावरच्या पुस्तकाचा लेखक माझ्यासारखा अभियंता कसा याचं खरं उत्तर हेच आहे.

अनुक्रमणिका ::: 

१. सत्यकथा

२. आपली नेमकी समस्या काय आहे?

     पहिली अडचणः जीवनशैलीच्या आजारांचं भयानक वास्तव 

     दुसरी अडचणः माहितीचा भडिमार तिसरी अडचणः मूलभूत विचाराचा अभाव

३. आरोग्य म्हणजे नक्की काय?

आंतरिक आरोग्याची कसोटी

. शरीराकडे आपण कसं पाहतो? संप्रेरकांची निरोगी क्रिया आणि बिघडलेली क्रिया

. ग्लुकोज, इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध

     शरीरातली समस्थिती (Homeostasis) इन्सुलिन विरोध

. रोगांच्या मुळाशी जातांना 

७. इन्सुलिन आणि जीवनशैलीचे आजार

. इन्सुलिन आणि लठ्ठपणा

. आपण इथवर कसे आलो?

१०. इन्सुलिन विरोध आणि उच्च रक्तदाब

११. कोलेस्टेरॉल बद्दल थोडंसं..

१२. इन्सुलिन आणि हृदयविकार

१३. इन्सुलिन आणि थायरॉईड

१४. इन्सुलिन आणि पीसीओडी

१५. इन्सुलिन आणि मूत्रपिंडांचे आजार

१६. इन्सुलिन आणि फॅटी यकृत (Fatty Liver)

१७. इन्सुलिन आणि अल्झायमर्स, विस्मरण

१८. इन्सुलिन आणि अकाली वृद्धत्व

१९. मानवी आहाराचा मूलभूत आराखडा

२०. आपण अन्नाकडे कसं बघतो?

२१. अ) काही प्रमुख गैरसमज : स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, आणि कर्बोदकं 

     आ) काही प्रमुख गैरसमज मीठ, तंतुमय पदार्थ, फळं

२३. काही तंत्र आणि मंत्र

२४. दीर्घ आजारांचं (आणखी!) व्यापक चित्न कीटोजेनिक (कीटो) डाएट म्हणजे काय?

२५. धोक्याची घंटा आणि काही चांगल्या बातम्या! हळूहळू बदलणारे जागतिक चित्र

भारतातील आंतरिक आरोग्याच्या चळवळीचे जनक : dLife चे अनुप सिंग!

– – – अनुपचा कमी-कर्बोदकं (Low-Carb) पॅटर्न! dLife चा प्रवासः आज आणि उद्या!

शेवटी – माझ्या काही केसेस!

….

वर मुद्दामच पुस्तकाची अनुक्रमणिकाही दिलेली आहे जी पुस्तकातल्या तपाशीलाबाबत पुरेशी बोलकी आहे.

या पुस्तकात लेखक मंदार गद्रे यांनी व्यक्त केलेले त्यांचे मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा वेगळा परिचय करून देण्याची गरजच उरत नाही असं मला खात्रीने म्हणावसं वाटतं.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : येसूबाई

लेखिका : सुलभा राजीव

प्रकाशन:उत्कर्ष प्रकाशन

चौथी आवृत्ती 

पृष्ठ:४९३ 

मूल्य:६००/

कितीही संकटं आली तरीही खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारे चरित्र! महाराणी येसूबाई!

पती छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुध्द कट शिजला. घरच्याच मंडळींनी कारस्थानं केली!सासूबाईंनी शंभुराजांना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले होते!स्वराज्याचे निम्म्याहून अधिक कारभारी कारस्थानात गुंतलेले! माहेर वतनदारीसाठी विरोधात गेलेलं……… सासर आणि माहेर दोन्ही परके!तरीही संभाजी महाराजांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या! नऊ वर्षांचा तो संभाजी महाराजांच्या राज्याचा झांजवती काळ, रोजच लढाई!

आप्तांच्या फितुरीने केलाला घात!पती छत्रपती संभाजी महाराजांना झालेली कैद आणि पतीची क्रूर हत्या!छत्रपती संभाजी महाराजांची जिवंतपणी आणि बलिदान झाल्यानंतरची विटंबना! रायगड स्वराज्याची राजधानी! राजधानीवर चालून आलेला शत्रू!रायगड शर्थीने झुंजायचा….. पतीच्या निधनाचे दुःख करत बसायला ही वेळ मिळाला नाही!

रायगडाचा पराभव! आणि तब्बल २९ वर्षांची कैद!ज्या स्वराज्यासाठी हे सर्व भोगलं त्यासाठी परत भाऊबंदकी आणि ताराराणी यांच्याशी कलह… तरीही येसूबाई उभ्या राहिल्या! त्यांच्यावर आलेली संकटं इतिहासातील कोणत्याही स्त्रीवर आलेली नाहीत, इतकी वाईट आणि भयंकर! तरीही त्या लढत राहिल्या… आपल्यासाठी एक आदर्श जीवन उभे राहिले…. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण प्रत्यक्ष जीवनात उतरणार ही महान त्यागमूर्ती “महाराणी येसूबाई”!

महाराणी येसूबाई!छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना कुळमुखत्यार म्हणून नियुक्त केले होते! श्री सखीराज्ञी जयति!

छ्त्रपती संभाजी महाराजांसारख्या परम प्रतापी राजपुत्रासोबत ज्यांचा विवाह झाला आणि गाठ बांधल्या गेली स्वराज्याच्या रक्षणाची! त्या सोबत येणाऱ्या अग्नीदिव्यांशी! त्यागशी आणि हौतम्याशी!

आयुष्याची २९ वर्षे कैद! त्या आधीचा गृह कलह! कट आणि कारस्थाने! पतीची, स्वराज्याच्या छत्रपतींची क्रूर हत्या! त्यात ही खचून न जाता नऊ महिने रायगड लढविणाऱ्या येसूबाई! धोरणी मुत्सद्दी आणि त्यागाची मूर्ती म्हणजे येसूबाई! पोटाचा पुत्र लहान असल्याने राजाराम महाराज यांना छ्त्रपती म्हणून अभिषिक्त करणाऱ्या त्यागमुर्ती! राजाराम महाराजांना रायगडावरून सुखरूप जिंजी कडे पाठवून देतात आणि स्वतःला मात्र जन्माची मोगली कैद!

डॉ सदाशिव शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेली ही भव्य कादंबरी!

तब्बल ४२ संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन लिहिलेली ही कादंबरी वाचताना वाचक इतिहासाचा भाग होऊन जातो ! लेखिकेने अतिशय नेकिने आणि मेहनतीनं आणि मोठ्या कष्टानं ही कादंबरी लिहून पूर्ण केली आहे. कादंबरी लेखन चालू असतानाच लेखिका स्वतः ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत होत्या. प्रचंड वेदना आणि भयंकर असे उपचार चालू असताना अभ्यास आणि लेखनात खंड पडणार नाही याची काळजी घेत होत्या. त्यांनी त्या दुर्धर रोगावर यशस्वी मात केली. आपल्याला ही अमूल्य अशी कादंबरी मिळाली….. नियतीशी झुंज देण्याची प्रेरणा मात्र त्यांना झुंजार येसूबाई यांच्याच जीवनातून मिळाली !२९ वर्षे कैदेत राहूनही त्यांनी हार मानली नाही! कदाचित लेखिकेच्या या परिस्थितीमुळे पुस्तकात मुद्रणदोष शिल्लक राहिले असतील असं वाटतं. हे मुद्रण दोष असूनही कादंबरीची साहित्य म्हणून जी उंची आहे ती अतिशय भव्य आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा, संभाजी सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या लोकप्रिय कादंबऱ्या असताना महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणं खूप आव्हानात्मक काम होतं… जे लेखिकेने पूर्ण केलं आहे.

प्रत्येकाने हे चरित्र वाचून आत्मसात केलं तर आयुष्यातील संकटाना सामोरे जाण्याची तयारी होईल… लहान लहान संकटाना सामोरे जाताना मोडून पडणारी आपली पिढी खंबीर होऊन उभी राहील !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ वेध अहिल्याबाईंचा – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वेध अहिल्याबाईंचा” – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ वेध अहिल्याबाईंचा “ 

लेखक : डॉ. देवीदास पोटे.

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स 

पृष्ठ : ५११ 

किंमत : रु. ९००/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती देश वर्षभर साजरा करत आहे. या वर्षात आपणही निश्चित कोठे न कोठे सहभागी होणार असू, काही कार्यक्रम स्वतः घेणार असू… अशा वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा “वेध अहिल्याबाईंचा” हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा. ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सर्व दृष्टीनं लिहिलेला ग्रंथ… ज्यात देवींच्या चरित्रापासून त्यांच्यावर लिहिलेल्या कवनापर्यंत… समग्र ! प्रत्येकाच्या घरी असावा असा हा ग्रंथ!

“अहिल्याबाईंची तुलना रशियाची साम्राज्ञी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी होते. ” असं लॉरेन्स म्हणतो….

अहिल्याबाईं होळकर विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आहे. ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राज्य योगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगीनी होती. प्रजाजनांची लोक माता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे. अहिल्याबाई हे समर्पित कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा अविष्कार या ग्रंथात आणि समर्थपणे मांडला आहे. अहिल्याबाईच्या कारकिर्दीतील इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे आणि लोककल्याणकारी कार्याचे पैलू पुन्हा पुन्हा वाचावे, अभ्यासावे, स्मरणात ठेवावे आणि अनुसरावे असे आहेत. हा ग्रंथ आपल्या सर्वांना एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असा विश्वास आहे. *

ग्रंथात एकूण १०९ प्रकरणे, शेकडो संदर्भ ग्रंथ आणि चित्रे आहेत.

त्यातील एक प्रकरण आहे, ‘ अहिल्याबाई :मान्यवरांच्या नजरेतून ! ‘ येथे संक्षेपाने उल्लेख करतोय. जगातील अनेक कीर्तिवंत, बुद्धिवंत, साहित्यिक, विद्वानांनी, राजांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बाबत काढलेले उद्गार या पुस्तकाच्या या एका प्रकरणात आहेत…

महादजी शिंदे म्हणतात, ‘अशा महान मातेच्या पोटी जन्म घ्यावा. ‘ तर प्रथम तुकोजी होळकरांची वाक्य आहेत, ” साक्षात मार्तंड येऊन बोलला तरी मातोश्रींच्या पायाशी अंतर होणार नाही. “

जदुनाथ सरकार लिहितात, “अहिल्याबाईबद्दल माझा आदर माहेश्वरातील त्यांच्याविषयीची कागदपत्रे पाहून अमर्याद वाढला. राज्यपदारुड असता, मालकीची धनदौलत असता साधेपणाने राहणारी, धार्मिक प्रवृत्तीची महिला म्हणजे साक्षात देवी आहे. तिने देवळे बांधली, घाट बांधली, दान धर्मात पुष्कळ पैसा खर्च केला. जमिनी, गावे इनाम दिली. महेश्वरातील त्यांच्या वास्तव्यामुळे महादजी शिंदे सारख्याचा पराक्रम गाजला. तिच्या सहकार्याशिवाय महादजीस राजकारणात महत्त्व मिळाले नसते. “

या प्रकरणात इतर अनेक मान्यवरांची आदरांजली आणि उद्गार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा समग्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा इतका सुंदर आहे.

ह्या ग्रंथाचे प्रकाशक कै. माधवराव जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांनी हे फार मोठे कार्य केलं आहे… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती” – लेखक – श्री सुरेन्द्रनाथ सेन  – मराठी अनुवाद – श्री रोहित पवार ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती” – लेखक – श्री सुरेन्द्रनाथ सेन  – मराठी अनुवाद – श्री रोहित पवार ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती 

(परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज) 

मूळ लेखक : सुरेंद्रनाथ सेन

मराठी अनुवाद : रोहित पवार

पृष्ठे:३७२ 

मूल्य: ४९९₹ 

परकीय प्रवाशांनी शिवरायांचे लिहिलेले चरित्र आणि समक्ष भेटून केलेल्या नोंदी यांचा हा एक अस्सल दस्तावेज…..

सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथली संस्कृती, लोकांचे राहणीमान यांबद्दल त्यांनी आपल्या प्रवासवर्णनांतून, अहवालातून किंवा चरित्रातून नोंदी करून ठेवल्या. काही परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून, काहींनी त्यांना समक्ष भेटून नोंदी केल्या.

या सर्व परकीय प्रवाशांनी केलेल्या या नोंर्दीचा इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी एक शतकापूर्वी केला होता. त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींसाठीचा एक अस्सल दस्तऐवज आहे.

संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी द ग्वार्द

शिवाजी महाराजांचे स्वप्न अगदी कौतुकाने ऐकणारा फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे

शिवाजी महाराजांच्या सुरतलुटीचे वर्णन करणारा डच अधिकारी फ्रांस्वा व्हॅलेंटाइन

रायगड किल्ल्याचे ‘अभेद्य’ असे गुणवैशिष्ठ्य सांगणारा इंग्रज व्यापारी थॉमस निकल्स

शिवराज्याभिषेकास स्वतः उपस्थित राहून राजधानी रायगडावरील या सोहळ्याचे वर्णन करणारा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंडेन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे बारकावे सांगणारा फ्रेंच अधिकारी फ्रांस्वा मार्टिन

– – – अशा अनेक परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उभे राहते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – मायबोली रंग कथांचे

संपादक – सचिन वसंत पाटील

प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई

पृष्ठ संख्या – १८८

मूल्य – ३०० रुपये

नुकताच एक कथासंग्रह वाचला. ‘मायबोली, रंग कथांचे’. या कथासंग्रहाचे वेगळेपण असे, की या बोली भाषेतील निवडक कथा आहेत. बोली भाषा म्हंटलं, की आपल्याला चटकन आठवतात, त्या म्हणजे वर्‍हाडी, दख्खनी, मालवणी, अहिराणी, कोकणी, ठाकरी, आगरी इत्यादि. पण यात अशा काही बोली भाषेतील कथा आहेत, ज्यांची नावे मी तरी प्रथमच वाचली. उदा. तावडी, पोवारी, झाडी, लेवा गणबोली, गोंडी बोली, तडवी भिल, भीलाऊ या बोली भाषेतील कथाही यात आहेत. या कथांचे संकलक आणि पुस्तकाचे संपादक सचीन वसंत पाटील आहेत आणि प्रकाशक आहेत, शब्दान्वय प्रकाशन, मुंबई.

श्री सचिन पाटील

सचिन पाटील यांनी संपादकीयात लिहिले आहे, असे पुस्तक काढायची कल्पना मनात आल्यापासून सगळी जुळणी करेपर्यंत चार वर्षे गेली. काही मासिकातून, दिवाळी अंकातून आलेल्या कथा वाचून, काही मित्र परिवाराकडे चौकशी करून, काही त्यांचे स्वत:चेच मित्र होते, त्यांच्याशी बोलून त्यांनी कथांचे संकलन केले. गोवर्धन पर्वत उचलण्यासारखेच हे काम. त्यांनी ते लीलया केले, असे मी मुळीच म्हणणार नाही. त्यांनी त्यासाठी भरपूर परिश्रम केले. बोली भाषेशी संबंधित पुस्तके वाचली. कथाकारांशी आणि मित्रांशी चर्चा केली. गुगलवरून माहिती मिळवली. त्या माहितीवर केवळ विसंबून न राहाता, तज्ज्ञांशी त्याबाबत चर्चा केली. यातून सिद्ध झाले पुस्तक ‘मायबोली रंग कथांचे’.

पुस्तकाची मांडणी अगदी नेटकी आहे. सुरूवातीला संपादकियात बोलीभाषांचे महत्त्व विषद केले आहे. त्यांतर विविध २२ बोलीभाषांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती बोलीभाषा कोणत्या प्रदेशात बोलली जाते, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्या भाषेत लिहिणारे महत्त्वाचे लेखक-लेखिका कोणते इ. माहिती येते. नंतर बोली भाषेतील २२ कथा आहेत. प्रत्येक कथेखाली आपल्याला अपरिचित शब्दांचे अर्थ दिले आहेत. अर्थात अनेक शब्दांचे अर्थ द्यायचे राहूनही गेले आहेत. कथांच्या शेवटी ती लिहिणार्‍या कथाकारांचे संक्षिप्त परिचय दिले आहेत. तिथे त्या त्या लेखकांचे फोन – मोबाईल नंबर दिले असते, तर वाचकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया कळवता आल्या असत्या. मलपृष्ठावर मराठी अभ्यासक डॉ. संदीप सांगळे लिहितात, ‘प्रमाण भाषेला समृद्ध करण्याचे काम बोलीभाषा करतात. प्रमाण भाषा ही मुख्य रक्तवाहिनी सारखी काम करते, तर बोली भाषा या तिच्या धमण्या आहेत. आपला खास असा भाषिक ऐवज त्या मराठीला दान करतात. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. त्यांची विपुल अशी शब्दसंपदा आहे. भाषेला ऐश्वर्यसंपन्न बनवण्याचे कार्य ग्रामीण भागातील बोली करत आहेत. ’ 

पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक, वेधक, समर्पक आहे. वारली शैलीतील हे चित्र आहे. फेर धरून कथानृत्य करणार्‍या भाषा भगिनी वर्तुळ करून नाचताहेत आणि या वर्तुळाच्या मधे तारपा नावाचे वाद्य वाजवणारी स्त्री दिसते आहे. आदिवासी नृत्याच्या वेळी लाकूड आणि कातडे यापासून बनवलेले हे वाद्य वाजवले जाते. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर फेर धरून नाचणार्‍या स्त्रिया आणि तारपा वाजवणारी स्त्री पांढर्‍या रंगात आहे. ते वाद्य जणू म्हणते आहे, ‘आमच्याकडे बघा… आमच्याकडे बघा… ’ प्रतिकात्मक असे हे मुखपृष्ठ वाटले मला.

या कथासंग्रहातील पहिली कथा आहे, ‘डफडं’. डॉ. अशोक कोळी हे या कथेचे लेखक. ‘कोरोना’सारख्या जागतिक महामारीमध्ये खेडेगावातील आलुतेदार, बलुतेदार, पुजारी, मागतकरी यांची कशी उपासमार झाली, ते यात सांगितलं आहे. घरादाराच्या पोटासाठी डफडं वाजवून उपजीविका करणारा माणिक. या काळात काही न मिळाल्याने कसा हतबल होतो, त्याचा आक्रोश या कथेत मांडला आहे. कथाशयाबरोबरच त्या भागातील, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीची, प्रथा-परंपरांची माहितीदेखील यात होते. गावात लग्न -समारंभ, नवस फेडणे इतकंच काय मर्तिकाच्या वेळीही मिरवणूक काढायची रीत. त्यावेळी डफडं वाजवून माणिकला पैसे मिळत. तशीच अमोशा (अमावास्या) मागायची पद्धत, या चाली-रीतीही कळून येतात. कोरोनामुळे मिरवणूकीवर बंदी आली आणि माणिकचं डफडं वाजवणं थांबलं. बायकोलाही अमोशा मिळाली नाही. त्याच्या दैन्यावस्थेचं वर्णन यात आहे.

‘ह्या मातयेचो लळो’ ही मालवणी बोलीची कथा सरिता पवार यांनी लिहिलीय. जमिनीच्या कामासाठी पम्याला त्याची आई बोलावून घेते. सकाळी आपणच रुजवलेली, जोपासलेली झाडं-पेडं, त्यांची हिरवाई बघून पम्या हरखून जातो. कामासाठी कणकवलीला जाताना त्याला वड, पिंपळ, चिंचेची झाडे आठवतात. ती रस्ता रुंदीकरणात पाडलेली असतात. हा विकास की विध्वंस? पम्याच्या मनात येतं. परतल्यावर घराभोवतीची बाग- नारळी, पोफळी, वेगवेगळ्या फळांची झाडं त्याच्या मनाला आनंद देतात. कणकवली, सिंधुदुर्ग या प्रदेशातील निसर्गाचं मोठं सुरेख वर्णन यात आहे, तसेच माय-लेकरातील संवादही मोठे चटपटीत आणि वाचनीय आहेत. शेवटी पम्या मुंबईची एका चाळीतली भाड्याची खोली सोडून गावी परतायचे ठरवतो, हे मोठ्या सूचकतेने लेखिकेने सांगितले आहे.

‘लाखीपुनी’ ही अहिराणी बोलीतील कथा लतिका चौधरी यांनी लिहिलेली आहे. लाखीपुनी म्हणजे राखी पौर्णिमा. गंगू शेतात निंदताना (खुरपणी ) गाणी (लोकगीतं) म्हणते. गाणी म्हणताना तिला भावाची आठवण येते. भाऊ मोठा झालाय बंगला, गाडी… त्या धुंदीत बहिणीला विसरला, तिला वाटतं. राखी बांधायला भाऊ नाही, ती कष्टी होते. शानूर, तिची मैत्रीण. दोघी एकत्र काम करणार्‍या. बहिणीसारख्याच. शानूर आपल्या नवर्‍याला सालीमला इशारा करते. तोही शेतात कामाला आलेला असतो. शानूर त्याच्या कानात काही-बाही सांगते. ती गंगूला म्हणते, ‘गंगू मेरी बहेना, यह तेरा धरमका मुहबोला भाई. ले लाखी बांध ले. भाई की याद आ रही है ना?’ गंगू काय करावं, या विचारात पडते. तशी ती म्हणते, ‘जात, रंग, धर्म, भेद इसरी मानवता धर्म देखानी नजर हाऊ सण देस. इतली ताकद या भाऊ बहिननी लाखी बांधनमा शे. ‘ मग गंगूने हसत हसत सालीमला राखी बांधली. हसत हसत दोन अश्रू गंगूच्या गालावर ओघळले. शानूरही खूश झाली. इतक्यात फटफटीचा आवाज आला. कोर्‍या फटफटीवरून गंगूचा भाऊ आला. ‘गंगूताई लाखी भांद. ‘ खिशातून राखी काढत तो म्हणतो, ‘बैन, नोकरी, पैसा, सवसारना लोभमा दूर र्‍हायाणू, पण नातागोताशिवाय जगणं म्हंजी जगनं नै हाई समजनं नी उनू भेटाले लाखीपुनीनं निमित्त देखी. ’ एकूण काय, गोड शेवट. भाषाही मोठी मधुर आहे. त्यावर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो. भाऊ-बहीण उराउरी भेटतात. गंगू राखी बांधते आणि नंतर निंदणीच्या आपल्या कामाला लागते. काम करता करता गाते,

‘आठवला भाऊ परदेशीचा बेईमान, लाखीपुनीले आला चोयी लुगड घेवून मानियेला भाऊ जातीचा मुसलमान, सख्ख्या भावापरीस त्याचं आहे ग इमान बहिणीला भाऊ एकतरी ग असावा, पावल्याचा खण, एक रातीचा इसावा.’

‘बंधे मूठ की ताकद’ या पोवारी बोली भाषेतील कथेत लेखक गुलाब बिसेन यांनी एकतेचे महत्त्व आणि त्यामुळे मिळणारे यश अधोरेखित केले आहे. वैनगंगेच्या खोर्‍यातील सितेपार गावात घडलेली कथा. आमदार फंडातून गावातील मुख्य रस्ता सिमेंटचा करायचे ठरते. रस्ता होतो. आमदारांच्या हस्ते उद्घाटन होते आणि महिन्याच्या आत त्यात घातलेल्या सळ्या बाहेर येऊ लागतात. गावातील ‘युवा-शक्ती’ नावाचा समूह, सरपंच, आमदार, ठेकेदारांना जाब विचारतात. पण ते दाद देत नाहीत. आमदार उडवा-उडवीची उत्तरे देतो. सरपंच ‘युवा-शक्ती’त फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. पण ते शक्य होत नाही. त्यांना पोलिसांचा धाक दाखवतो. पण ही बहाद्दर मुले घाबरत नाहीत. पेपर, फेसबुक, ट्विटर या माध्यमांचा उपयोग करून बातमीचा प्रसार करतात. मुख्यमंत्र्यांना ई-मेल करतात. झाल्या प्रकाराची चौकशी होते. दोषी ठेकेदारावर कारवाई होते आणि ‘बंधे मूठक् ताकदको दर्शन पूर गावाला भयेव. ’ याही बोलीवर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो.

‘इंद्रधनुष्य नी एकलव्य धनुष्य ‘ या पावरा बोलीतील कथेत संतोष पावरा हे लेखक शेवटी म्हणतात, ‘लाखो आये द्रोनचार्य, समय अभी डगमगायेगा नाही. नया एकलव्य आ गया हई, दान अंगठे का अभ होगा नही!’ ते असं का म्हणाले, कथा वाचूनच समजावून घ्यायला हवं.

या संग्रहातल्या ‘आठवण’ – माणदेशी बोली- डॉ. कृष्णा इंगोले; ‘उजाले की ईद’- दख्खनी; उमाळा – कोल्हापुरी – सचीन पाटील; आशा अनेक उल्लेखनीय कथा आहेत. खरं तर सगळ्याच २२ कथा वाचनीय आहेत. त्या प्रत्यक्ष वाचूनच त्याची गोडी, नादमाधुर्य, लय अनुभवायला हवी.

यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास, प्रचार, प्रसार व्हायला हवा. ‘मायबोली रंग कथांचे’ हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. या प्रयत्नाची दखल घेऊन की काय, संपादक सचिन वसंत पाटील यांना नुकताच ‘रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार ‘ सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. सुरेन्द्र रावसाहेब पाटील यांनी प्रदान केला आहे.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” – लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” – लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा

लेखक: डॉ. शैलेंद्र देवळाणकर (सुप्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक)

पृष्ठे: ३७६

मूल्य: ४९९₹ 

परराष्ट्र धोरण या विषयाशी सामान्य माणसाचा संबंध काय, असं बहुतेकांना वाटत असतं. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ अशी एक जीवशास्त्रीय संज्ञा आहे; त्यानुसार भूमध्यसागरी प्रदेशात कुठेतरी एखाद्या फुलपाखराने आपले पंख फडफडवले की, पर्यावरणावर त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. परराष्ट्र धोरण हा विषय अगदी असाच आहे. दूरवर दिल्लीत बसून सरकार जी ध्येयधोरणे ठरवतं त्याचा परिणाम गल्लीत राहणाऱ्या माणसांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होतच असतो.

शीतयुद्धोत्तर काळात जगाच्या पटलावर नव्या आर्थिक व राजकीय महासत्ता उदयास येत आहेत. जागतिक आणि ऐतिहासिक अंतर्वळणे बदलून टाकणाऱ्या घटना जगभरात घडत आहेत. या सगळ्यांत भारत कुठे आहे? आज ‘विश्वबंधू’ म्हणून आपलं परराष्ट्र धोरण राबवणारा भारत महासत्ता बनू शकेल का? जागतिक दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, तेलाचे राजकारण आणि विकसित भारताची बलस्थाने आणि आव्हाने या सगळ्यांचा ताळेबंद एका तज्ज्ञाच्या लेखणीतून.

भारताचे पूर्वीचे व आजचे परराष्ट्र धोरण, त्या अनुषंगाने भारताचा आर्थिक व सांस्कृतिक राजनय, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी या सगळ्यांचा ऊहापोह प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या पुस्तकात आपल्या अभ्यासपूर्ण आणि विश्लेषक शैलीत केला आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची लवकरच शतकपूर्ती होईल. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपण विकसनशील भारताला विकसित भारत बनविण्याचं व्यापक उद्दिष्ट ठेवलं आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण कोणत्या क्षेत्रांत आमूलाग्र बदल करण्याची आणि त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, हे प्रामुख्याने डॉ. देवळाणकर आपल्याला सांगतात.

या पुस्तकाची सहा गटात विभागणी केली आहे.

गट 1 

विकसित भारताचे आधारस्तंभ

गट 2 

परराष्ट्र धोरण — वर्तमानाला कोणते तोरण?

गट 3

भारतापुढील आव्हाने 

गट 4

जागतिक राजकारणातल्या सोंगट्या

गट 5

विकासाच्या क्षितिजांकडे वाटचाल (राष्ट्रीय पातळीवर)

गट 6

विकासाच्या क्षितिजांकडे वाटचाल;(आंतरराष्ट्रीय स्तरावर)

विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांचे अभ्यासक, पत्रकार, प्राध्यापक आणि हा विषय समजून घेण्यास उत्सुक असणाऱ्या प्रत्येक नागरिकास हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल.

लेखक परिचय : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

तीन दशकांपासून परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे संशोधक आणि विश्लेषक. या विषयातील तज्ज्ञ विश्लेषक म्हणून डॉ. शैलेंद्र देवळाणकर आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि ते यशवंतराव चव्हाण सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. पुढे त्यांनी एम. फिल नंतर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी इथून ‘आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण’ या विषयावर पीएच. डी. केलेली असून गेली अनेक वर्षे ते या विषयावरील संशोधन आणि लेखन करत आहेत. यापूर्वी या विषयावरील प्रकाशित झालेली त्यांची चौदा पुस्तके स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पत्रकारांना, संपादकांना मोलाचे मार्गदर्शन करणारी ठरली आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ते विविध माध्यमातून सखोल विश्लेषणाद्वारे मार्गदर्शन करत आलेले आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते संशोधक, शिक्षक, लेखक आणि प्रशासक अशा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares