मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

डिसेंबर १९७७…. कोयना एक्सप्रेस धडधडत निघाली होती …

गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड खिडकीतून बाहेर पाहत होते…. अनेक आठवणी मनात दाटून आल्या होत्या. पंचवटीच्या प्रांगणातील आठवणींनी मन भरून येत होते …गीतरामायणाचे ते भारलेले दिवस..लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद…रेकॉर्डिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत गदिमांकडून गीत मिळवण्यासाठी झालेली धावपळ.. पंचवटीच्या दारात प्रभाकर जोगांना पाहून “आला रे आला ,रामाचा दूत आला.. आता गाणं घेतल्याशिवाय तो काही जाणार नाही..” असे ओरडणारे गदिमा. 

त्यांच्या समोर हसत खिदळत बागडणारे … गीतांचा तगादा लावल्यावर गदिमांच्यातले लहान मूल म्हणत होते…. 

” गीताकांत स. पाड ,पिडाकांत ग. माड …नाही कशाचीच चाड, मी ही भारलेले झाड…मी ही भारलेले झाड…. “

आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देऊन दोन मित्र सीताकांत लाड व गदिमांचा ‘नेम्या’ (नेमिनाथ उपाध्ये) परतीच्या प्रवासाला निघाले होते.. गदिमांबरोबर लहानपणापासून असलेल्या  ‘नेम्या’ ला प्रत्येक स्टेशनावर आपल्या अण्णाच्याच आठवणी येत होत्या.. रात्री अपरात्री किर्लोस्करवाडीला उतरल्यावर तीन मैल चालत कुंडलचे प्रवास … गारठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत उबेसाठी स्मशानात घालवलेल्या त्या भयानक रात्री … तेथे केलेले मुक्काम… शंकराच्या भूमीत गदिमांनी धडाधडा केलेले ‘शिवलीलामृताचे’ प्रवचन.. अगदी आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु- क्षणार्धात गतस्मृतीत भरारी घेत होते.

‘मिरज’ स्टेशनच्या आधी लांबून काही अस्पष्ट स्वर येते होते… कोणीतरी गात होते …. एकदम खड्या आवाजात…

“उद्धवा अजब तुझे सरकार…. “

एक आंधळा भिकारी गात गात पुढे सरकत होता .. 

गाडीच्या कम्पार्टमेन्टमधे काही कॉलेजियन्सचा ग्रुप रमी खेळत बसला होता … बोचऱ्या थंडीला ‘बुढा मर्कट’ ब्रँडची साथ होतीच… मैफल रंगात आली होती. 

त्यांच्यापैकीच एकजण ओरडला “अरे साल्यांनो,गदिमा सुरु झालाय ! ऐका की !”

या आवाजाने अर्धवट झोपेत असलेला कोपऱ्यातला घोंगडी पांघरून बसलेला म्हाताराही कान टवकारून उठून बसला… 

भिकाऱ्याने खड्या आवाजात परत सुरुवात केली… 

” झाला महार पंढरीनाथ “… 

“एक धागा सुखाचा” …” इंद्रायणी काठी” … भिकारी गात होता …

नेम्या व लाड खिडकीजवळील आपल्या जागेवरून आनंद घेत होते.. पल्लेदार आवाज.. त्यात काहीसे उच्चार दोष. … शब्द – ओळी वरखाली झालेल्या .. 

पण आधीच ‘रम’लेली मंडळी अजून गाण्यात रमून गेली होती.. 

त्या युवकांपैकीच कोणीतरी फर्माइश केली “म्हण .. आणखी म्हण … पण फक्त गदिमांच हं !” 

भिकारी म्हणाला ” त्यांचीच म्हणतो मी साहेब,दुसरी नाही. या लाइनीवर खूप खपतात .. कमाई चांगली होते.. त्यांना काय ठावं, त्यांच्या गीतांवर आम्ही कमाई करतो म्हणून .. “

गरीब भिकाऱ्याचा स्वर थोडा हलल्यासारखा वाटला….आवंढा गिळून भिकारी म्हणाला….

” ते गेले तेव्हा दोन दिवस भीक नाही मागितली साहेब !… ” 

या आंधळ्या गरिबाला कोठून कळले असावे आपला अन्नदाता गेला-रेडिओवरून ?,गदिमा गेले तेव्हा महाराष्ट्रात अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या .सगळेच शांत होते,डब्यातल्या सगळ्यांनी आपापल्या परीने त्याचा खिसा भरला… तो पुढे सरकत होता… 

गदिमांचा तो आंधळा भक्त गातच होता..

तूच घडविसी, तूच फोडिसी, 

कुरवाळिसी तू तूच ताडीसी

न कळे यातून काय जोडीसी

देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार 

विठ्ठला, तू वेडा कुंभार….

हळू हळू त्याचा आवाज परत अस्पष्ट होत गेला.. कोयना एक्सप्रेसची धडधड परत वाढत गेली.. तरुण मंडळी परत आपल्या कामात ‘रम’माण झाली.

म्हटले तर काहीच घडले नव्हते … म्हंटले तर खूप काही घडून गेले होते… 

एका महाकवीच्या हृदयाची स्पंदने …. एका भिकाऱ्याच्या हृदयाची स्पंदने… जणू काही फरक राहिलाच नव्हता… काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झालेले ते कोण होते?.. 

सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवणारा असा महाकवी आता परत होणार नव्हता…

 – सुमित्र माडगूळकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.

प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई…!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.

मला एक “अशिक्षित” आई हवी आहे, जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्या बरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि माझे बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा  “जास्त वेळ” असेल.

ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.

जेंव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.

आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.

मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.

इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका  संपूर्ण वर्गात ऐकू आला.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्ग शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते मोबाईल च्या नादाला लागून हिरावून घेऊ नका! ते परत कधीच येणार नाही. 

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यम सुद्धा परत गेला — ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ ☆ यम सुद्धा परत गेला — ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

गुरूजींना न्यायला आलेला यम सुध्दा परत गेला…!!

 

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं,

गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं.

 

न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात,

चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात.

 

एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक,

तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक.

 

यमाचं बोलणं ऐकून गुरुजी लागले रडू,

खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू.

 

कोरोनाने पोरांची शाळा होती बंद,

आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद.

 

फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन,

मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन.

 

ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला,

गुरुजींचा डान्स पाहून तोही फार हसला.

 

यमालाही आठवलं त्याचं बालपण,

दाटून आला गळा त्याचा, गहिवरलं मन.

 

आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून,

उद्या येतो म्हणत यम गेला आल्या पावली निघून.

 

दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर,

गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर.

 

काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम,

केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब.

 

सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन,

किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून.

 

करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती,

पोरांचीही काढायची आहेत बँकेमधे खाती.

 

आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती,

डोक्यामध्ये नुसती गणगण, काय आणि किती?

 

शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा,

तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा.

 

शेवटची ही संधी गुरुजी आज नक्की देईन,

पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन.

 

गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन,

आपण गेलो तर काय होईल? आपल्याला नाही पेन्शन.

 

म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार,

शाळेकडे गुरुजी झाले स्कूटरवरती स्वार.

 

तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहीतरी ध्यानात,

गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात.

 

यम म्हणाला, गुरुजी आज इकडं कसं काय?

तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय.

 

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी,

आजचा दिवस थांब, उद्या जाऊ आपण स्वर्गी.

 

काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी,

तुमच्या अशा वागण्यानं ड्युटी धोक्यात येईल ना माझी.

 

आजच्या दिवस यमा, घे रे गड्या समजून,

किर्द दुरुस्ती, दाखल्याचेही काम आहे पडून.

 

उदयापासून सुरु आहे CO साहेबांचा दौरा,

कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा.

 

परवापासून खेळायची आहे टॅगची पण इनिंग,

पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग.

 

नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी,

लसीकरणाचीही पार पाडायची आहे जबाबदारी.

 

पोरांच्या परीक्षा, मग तपासायचे पेपर,

नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर.

 

कामाच्या हया ताणाची डोक्यात झालीय भेळ,

आमच्याकडं नाही यमा मरायलाही वेळ..

 

खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा,

कांदा मुळा भाजी आमची, खडू आणि फळा.

 

पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम,

त्यांच्यामधेच दिसतो रहीम, त्यांच्यामधेच राम.

 

फुकट पगार म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव,

हरकत नाही, आज माझा घेऊन टाक जीव.

 

यमाला आलं गलबलून सारं काही ऐकून,

तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून.

 

वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार,

सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार.

 

टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून,

परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून.

 

जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं,

नरक आणि स्वर्ग इथंच आहे सगळं.

 

कामाशी काम करून घडवा नवा भारत,

कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत…!

 

— समस्त शिक्षक वर्गाला सविनय समर्पित —

 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 14 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 14 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२१]

माझी नौका मला हाकारलीच पाहिजे

हाय रे दैवा!

किनाऱ्यावरचे ते सुस्त क्षण!

 

धरती पुष्पमय करून वसंताने

आपले काम केले आहे आणि

या कोमेजलेल्या निष्प्राण फुलांचे ओझे घेऊन

मी मात्र आळसावून थांबलो आहे.

 

लाटांचा खळखळाट वाढला आहे

किनाऱ्यावरच्या सावलीत

पिवळी पानं साद घालीत गळतायत

 

अरे! कुठल्या पोकळीत टक लावून बसलास?

दूरच्या किनाऱ्यावरून ऐकू येणाऱ्या

गीतांच्या ओळी तुला

भारून टाकीत नाहीत काय?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन… – कवयित्री : सुश्री मेघा देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मन… – कवयित्री : सुश्री मेघा देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मन वाभरं वाभरं 

देहा हातून फरार

किती बांधू दावणीला

स्थिर नाही घडीभर

 

देह श्रोत्यात बसला

मन आत बडबडे

ऐकू कुणाचे कळेना

दोघे घालती साकडे

 

मना हरणाचे पाय

देह हातावर घडी 

आज्ञा अन अवज्ञेची

आत चाले रेटारेटी

 

देह समजूतदार

बंद ठेवी सारी दारं

मन मांजर चोरटी

मनातल्या लोण्यावर

 

देह शिक्षित शहाणा

मन येड खुळं बेणं

देह हसे दुसऱ्याला

मन हसे स्वतःवर

 

देह चुलीपाशी रत

मन फिरे रानोमाळ

देही हिशेब नेटका

मनी कवितेची ओळ

 

देह टापटीप घडी

मन द्रौपदीचं वस्त्र

देहा लाज अतोनात

मन दत्त दिगंबर

 

देह घर आवरत 

मन आवरतं विश्व 

देह कार्यशील मग्न

मन आठवांत रत

 

देह जागच्या जागी

मन दूर दूर झरे

देह दिनचर्या घडी

मन वेल्हाळ पसरे

 

देह पाही याची डोळा

मना अलौकिक दृष्टी

देह पाही पान फूल

मनी मंतरली सृष्टी

 

देह संसार टुकीचा

मन पसारा अमाप

देह कपाटाचे दार

मन चोरखण आत.

 

देह जाचतो टाचतो

मन मखमल मऊ 

देह वचक दरारा

मन म्हणे नको भिऊ

 

देह जड जड भिंत

मन झिरपती ओल

देह रंग सजावट

मन गहराई खोल.

 

देह मन देह मन

जरी तळ्यात मळ्यात

देहा मनाचे अद्वैत 

भरी घडा काठोकाठ

कवयित्री – सुश्री मेघा देशपांडे 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कर्मफळ आणि नियती….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ कर्मफळ आणि नियती…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

 हजारो गाई जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते, तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणार्‍या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात  मोठमोठ्या देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यु त्यांची ताटातूट करतो. सतीसावित्रींचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्य पद लाभूनही, सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्युसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतानी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितली, तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली.  मृत्यू राजा-रंक, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा काहीही भेद करीत नाही. बुद्धिबळाच्या पटावर जरी राजा, वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरीत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते.  हे सारे लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्में , भगवंतस्मरण,  नामस्मरण ,दानपुण्य केलं पाहिजे, कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजा पर्यंत , नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह चितेपर्यंत सोबत करतात. बरोबर येतात ती कर्में,पुण्य, भगवंत नामाचे गाठोडे—-

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऋतु गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ऋतू गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

ऋतु गाभुळताना…

झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं..मान्सून एक जुनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च,एप्रिल..२४तासएसी,कुलर,पंख्यालाआचवलेलं शरीर..पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट, साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…समजावं तेंव्हा ऋतु गाभुळतोय.

ऐटीत झाडावरुन मोहीत करणारे.बहावा,पलाश,गुलमोहर…वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात.झाडावरचं कै-यांचं गोकुळ रिकामं होउन गेलेलं असतं,एखादा झाडावरच पिकलेला आंबा,खाली पडून केशर कोयसांडतो.जांभुळ,करवंदाचा काळा,जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

आईआजीची लोणच्या,

साखरंब्याची घाई,कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग,गच्ची  गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तूआडोश्याच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड…समजावं ऋतु गाभुळतोय.

 ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते.उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात,डाळपन्हं,आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.तेंव्हा खुशाल समजावं

ऋतु गाभुळतोय.

दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी..काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो,मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता…असाच दमुन जातो.भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो.गच्ची,दोरीवरच्या कपडे,गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..तेंव्हा खुशाल समजावं..ऋतु गाभुळतोय.

निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होऊन जातं,उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं ,वीज,गडगडाटानं.. रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..धावपळीची होते.

झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात.

 मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात.. खुशाल समजावं तेंव्हा..ऋतु गाभुळतोय.

उंबर्‍यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपण ही आतुरतो….तेंव्हा अगदी खुशाल समजावं…ऋतु गाभुळतोय……

 –  अनामिक 

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

‘A’ for Appreciation (अर्थात प्रशंसेचा प्रयत्न) 🤗

नुकत्याच एका मैत्रिणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच…” एव्हढं केलं मी हिचं , पण दोन शब्दांचं  कौतुक नाही. ” वास्तविक त्या मैत्रिणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली… सासूला देखील ठाऊक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेने करत नाहीत, सून करते… अगदी प्रेमानं … …

गरज आहे ती आवर्जून बोलून दाखवायची.

नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..

कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो…. 

दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनाने, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो… जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते. 

छान तयार होऊन भिशीला स्वागत करणाऱ्या मैत्रिणीकडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते.  तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट- जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रिणीला आपण नटवी म्हणतो, तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरंतर समस्या बरेचदा हीच असते की, आपण काही म्हणतच नाही.

एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले… इतरांची प्रतिक्रिया– “मिळणार नाही तर काय? हिने दुसरं केलंच काय वर्षभर … मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीन.”

दुसरीच्या मुलीला 65% मिळाले.  प्रतिक्रिया– “जरा लक्ष नाही दिलं हिने.  सदा घराबाहेर..”

गम्मत आहे ना ! अहो सोपं आहे. दोघींकडेही जा. मनापासून अभिनंदन करा … आईचे कौतुक करा।  काय लागतं हो याला … हां , मन मात्र जरासं मोठं लागतं. 

.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रिण म्हणाली.. ” मला नाही बाई येत असं लगेच चांगलं म्हणता… जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते.” 

“का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ?” 😆

क्षणभंगुर आयुष्य साधं सोपं असावं .. कशाला हव्यात या पट्ट्या आणि मोजमापं… 

स्त्री स्त्रीची शत्रू असते की नाही माहित नाही . पण ही तारीफ न करण्याची वृत्ती मात्र स्त्रीची फार मोठी शत्रू आहे. एखादीच्या उत्साहाला, चैतन्याला, एव्हढेच काय पहाडासारख्या कर्तृत्वाला ही नामोहरम करते. 👊🏻

 प्रशंसा म्हणजे लांगुलचालन किंवा चमचेगिरी निश्चित नाही … ती उत्स्फूर्तपणे हृदयातून व्यक्त होते .. काही स्त्रियांना दिसेल त्या मैत्रिणीला ” काय बारीक झालीस ग ! ” असे म्हणायची सवय असते. … ही प्रशंसा नव्हे… 😆

एखादीच्या कर्तृत्वाची .. गुणांची .. संघर्षाची दखल घ्यायला काय हरकत आहे? दूध पाण्यातूनही वेगळं करतो तो राजहंस … आणि सडलेलं कुजलेलं खातो तो गिधाड. स्वतःला विचारा एकदा काय व्हायला आवडेल?

आयुष्याच्या एकाच पटावर राहत असलो तरी आपण प्रतिस्पर्धी खचितच नाही . लक्षात घ्या… एखादीचे घर मस्त सुरेख नटवले म्हटले, की आपले कचराडेपो होत नाही. “छान वळण लावलेस ग मुलांना”  असे दुसरीला  म्हटले की आपली मुले काही उनाड होत नाहीत. एखादी झक्कास स्वयंपाक करते म्हणून मी काही  कांदू होत नाही किंवा एखादी स्मार्ट  म्हणून मी गबाळी असे होणे नाही. 

प्रशंसेचे दोन शब्द मोठा चमत्कार करतात… आंतरिक प्रेरणा , जगण्याची नवी उमेद, चैतन्य देऊन जातात. प्रशंसेच्या दोन शब्दांची भूक दुसऱ्या कशाने भागत नाही. बघा एकदा करून ही जादू… त्यापेक्षा कित्येक पट positive energy तुमच्याकडे rebound होऊन येईल.. शंकाच नाही.

आपण स्त्री आहोत ..निसर्गाची सर्वश्रेष्ठ कलाकृती… जी स्वतःमधील सारे ओज तेज सगुणात साकारते अपत्यजन्माने.

वाणीवाटेही हाच सृजनाचा साक्षात्कार होऊ देत. 

A = appreciation– हळूहळू सवय होऊ द्यात… आयुष्य सुरेख होइल…  तुमच्या एकटीचं नाही,  तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीचं. 👍🏻

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  रिकाम्या खुर्चीचं रहस्य… समीर थिटे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ रिकाम्या खुर्चीचं रहस्य… समीर थिटे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

…एकदा एक तरुण मुलगी एका संतमहात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”

का नाही…? नक्कीच येईन मी…” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही…नाही…तसं नाहीये.” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही…अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.”

“परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला.”

“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय.”

त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मे हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका.”

पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला…पण काल सकाळी ते देवाघरी गेले.”

“त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं…जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”

त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा.”

प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं ।

देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिं अचन्चलं ॥

हिंदू धर्मात असलेली ही प्रार्थना अत्यंत गहन आहे.

या प्रार्थनेद्वारे भक्तानं प्रभूकडे तीन इच्छा मागितल्या आहेतः-

१. कोणत्याही शारीरिक वेदनांविना मृत्यु

२. प्राथमिक आवश्यकतांची पूर्तता होईल असं साधं आयुष्य (महाल माड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया)

३. आणि कोणत्याही प्रसंगी डगमगणार नाही अशी प्रभूचरणांवर अढळ श्रद्धा

(एका इंग्रजी कथेचा स्वैरानुवाद – समीर अनिल थिटे)

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 13 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 13 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२०]

कमळ उमललं, तेव्हा

माझं मन वाऱ्यावर नव्हतं

त्याच्या उमलण्याची जाणीवच

मला तेव्हा नव्हती

माझी परडी रिकामी होती,

 माझं दुर्लक्ष झालं होतं

 

आता स्वप्नातून जागा झाल्यावर

दु: खाणं सावट माझ्यावर पसरलं.

दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा

मधुर सुगंध मला जाणवू लागला.

 

पूर्णत्वाचा ध्यास घेऊन

वसंताचा अस्पष्ट, आतुर गंध

माझ्या काळजात ठेवून गेला

 

तो गंध माझ्या इतका जवळ होता,

त्याचा परिपूर्ण गोडवा

माझ्या ह्रदयात उमलला होता.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares