ऑस्ट्रेलियातील एका आजोबांची ही गोष्ट आहे.हे आजोबा रोज पहाटे समुद्रकिनारी फिरायला जात.जाताना हातात एक टोपली असे.किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे.
अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले, ” आजोबा, तुम्ही हे काय करता?”
आजोबा हसले आणि म्हणाले, “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो.अगं, भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात ; पण त्यांची चाल मंद असल्याने ते पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अशांना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.”
ही गोष्ट वाचल्यावर वाटले, की असे अनेक आजी-आजोबा समाजातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलां-मुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडायला मदत करतात.
लेखक :अज्ञात
संग्राहिका : सुश्री निलिमा ताटके
ठाणे.
मोबाईल 9870048458
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हेमलकशाचे देव… श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
देवा, या हेमलकशाच्या देवाला, आदिवासींच्या आधारवडाला, उदंड आयुरारोग्य दे!
बाबांचे चिरंजीव,डॉक्टर प्रकाश आमटे दुर्धर आजारावर उपचार घेऊन परतलेत, हे ऐकून त्यांच्या कार्याविषयी केवळ जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या मराठी माणसाचा देवावरचा विश्वास दृढ झालाय. हेमलकशाचा माडिया आदिवासी तर अत्यंत सुखावला असेल, यात शंकाच नाही.
डॉक्टर आणि मंदाताई यांचा पर्लकोटा नदीच्या पुलावर फिरायला गेल्याचा फोटो वायरल झालेला पाहिला आणि देवाचे आभार मानण्यासाठी हात आपोआप जोडले गेले.
मित्रांनो, माडिया आदिवासी,डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे या दाम्पत्याला देव मानतात आणि म्हणून देवाने या वंचित, गरीब आदिवासींच्या देवाचे आयुरारोग्य सांभाळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया.
बाबा आमटेंच्या या सुपुत्राने, अत्यंत हलाखीत जगणाऱ्या माडिया आदिवासींचे जीवन जगण्यायोग्य करण्यासाठी केलेली अतिशय खडतर आणि जीवन झोकून देणारी धडपड ‘प्रकाशवाटा’ हे त्यांचं पुस्तक वाचून कळते.
धड कपडेही अंगावर न घालणाऱ्या या माडिया आदिवासींना कपडे घालायला, अन्न म्हणून फक्त आंबिलावर विसंबून जीवन कंठणाऱ्या वा केवळ जनावर मारून खाणाऱ्या आदिवासींना भाज्या कशा बनवतात, कशा खातात आणि कशासाठी खातात हे माहीत नसणाऱ्या माडियांना त्या पिकवायला व खायला त्यांनी शिकवलं. माडिया भाषेशिवाय कोणत्याही भाषेचा गंध नसलेल्या या अतिमागास जमातीला शिक्षण, आरोग्य या सुविधा त्यांच्या हेमलकशात अहोरात्र उपलब्ध करून देणाऱ्या या सिद्धहस्त डॉक्टर, इंजिनियर, आणि इतर व्यावसायिक एकाच ठिकाणी एकवटलेल्या अवलियाला,देवा,उदंड आयुरारोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
समाजसेवेचे भांडवल करून, छोट्या- मोठया कार्याचा सोस पुरा करतांना, सोशल मीडियामध्ये फोटो टाकून आपला उदोउदो करून घेणाऱ्या आजच्या तथाकथित समाजधुरीणांच्या डोळ्यात अंजन घालणारे त्यांचे छोटेखानी ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे काम हे दीपस्तंभ बनून समाजाचे मार्गदर्शन करतेय याची त्यांना ना जाणीव असेल, ना खंत.
आपल्या जन्मदात्यांच्या पावलावर पाऊल टाकून, किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन, वंचित आदिवासींच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे आणि मंदाताईंचे हात असेच कार्यरत राहून, आपणा सर्वांना प्रेरणा देत राहोत ही श्रीचरणी प्रार्थना!
असंख्य पुरस्कारांनी गौरविलेले डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या या पुस्तकात एका ठिकाणी लिहितात, “शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. इथे आदिवासींची होत असलेली फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्कांबद्दल त्यांनी सजग व्हावं, हा शाळा सुरु करण्यामागचा आमचा हेतू होता. आज जेव्हा तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कंडक्टरला माझी मुलं पकडतात आणि जाब विचारतात, तेव्हा माझ्या दृष्टीने इथे शाळा सुरु केल्याचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो.” केवढा मोठा पुरस्कार!इतर कोणत्याही पुरस्कारांच्या पेक्षा मोठा!
असो. बाबा आमटेंच्या या सुपुत्राला उदंड आयुरारोग्य मिळो ही पुन्हा एकदा विधात्या चरणी प्रार्थना.
लेखक :श्री.विजय लक्ष्मण गावडे
संग्राहिका : सौ. शशी नाडकर्णी- नाईक.
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पंचवीस वर्षापूर्वी माझी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली.
प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरी साठी.
आधी देशात, नंतर परदेशात.
त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की आता यापुढे आपणच आपल्या साठी. (खरंतर ही खूणगाठ मुलं जन्माला आली तेव्हाच बांधली होती, की वीस पंचवीस वर्षांनी पाखरं घरटं सोडून उडून जाणार).
एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. आपली सर्व कामे आपणच करायची.
शक्यतो कुणावर अवलंबून रहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच !!
त्या काळात हा शब्द नव्हता पण ‘आत्मनिर्भर’ झाले.
घरात कंप्यूटर असून कधी हात न लावणारी मी, पन्नासाव्या वर्षी क्लासला जाऊन कंप्यूटर शिकले. मुलांना मेल करु लागले. पुढे फेसबुक, व्हाट्सअँप, स्काईप, व्हिडिओ कॉल …टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं मीही सगळं वापरायला शिकले. मुलं पुढे पुढे धावताहेत… आपण थोडं चालायला तरी हवं. नाहीतर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल.
केल्याने होत आहे रे….. आधी केलेची पाहिजे !!
आत्मविश्वास वाढत गेला. आता कोविडच्या काळात ऑनलाईन व्यवहार सोपे झाले. खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाईन करायला शिकले. काही अडले, तर विनासंकोच कुणाला विचारते.
आता मी एकटी रहाते. मुलांशी संपर्क असतोच. आपली आई चांगली खंबीर आहे, हा विश्वास मुलांनाही आहे.
सुदैवाने प्रकृती चांगली आहे. लहानपणापासून केलेला व्यायाम आणि संतुलित आहार-विहार यामुळे हे साध्य झाले आहे.
नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वतःचे छंद आहेत. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कधी पडत नाही.
एक गोष्ट नक्की…. आपण दुसऱ्यासाठी होईल तेव्हढे करत रहावे… आपल्यावर वेळ आली तर कोणीतरी नक्की धावून येतील. आधी प्रेम द्यावे आणि मग प्रेम घ्यावे…
“एकमेका करू सहाय्य” हा आजच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.
आज तरुण असलेल्या पिढीलाही मी हेच सांगेन… म्हातारपणासाठी जशी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक फिटनेससाठी व्यायाम आणि मानसिक फिटनेससाठी आवडीचा छंद जोपासा… स्वतःचे विश्व निर्माण करा….आणि मुख्य म्हणजे झाल्यागेल्याची खंत करणे सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.
आणि हो, हे सर्व एका दिवसात निर्माण होत नाही. तरुण वयातच याची सुरुवात करावी लागते. तरच म्हातारपण सुखाचे होईल !
लेखिका :उषा फाटक
संग्राहिका: मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला भाषण देत होता, “पैसे कमव आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा.मी तुला आज एक दिवस देतो. घराच्या बाहेर पड आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी”…..आणि तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती.
ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली.. इकडे जा, तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले, ‘अरे हो. खरंच की. आपण ही पैसा कमावू शकतो. मग का आपण शिक्षित असूनही इतके दिवस घालवले?’
घरी आली. नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, वेळेवर शाळेत पाठवणे , नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता, जेवण बनवले आणि खोलीत गेली.
नवरा आला आणि म्हणाला, ” काय मग? कळाले असेल आज, मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसलीयस.”
तिने काही न बोलता त्याला एक लिस्ट दिली. त्यात तिने घरात घालवलेली अनेक व्यर्थ वर्षे व मार्केट मध्ये त्या कामांसाठी मोजावी लागणारी किंमत यांची यादी होती.
तिने सुरुवात त्याच्याच आई-वडिलांपासून केली होती. ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली, त्याला एकदम घाम फुटला.
सासू-सासऱ्यांची सेवा, ज्याला मार्केटमध्ये केअरटेकर म्हणतात. पगार – ₹20,000
मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबीसीटिंग म्हणतात. पगार ₹15000
घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात.पगार ₹5000
आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक,ज्याला मार्केटमध्ये कूक म्हणतात.पगार ₹10000
घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केटमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारा होस्ट म्हणतात. पगार ₹5000 अशा प्रकारे तिने नवऱ्याकडे महिन्याच्या ₹55000 पगाराची मागणी केलेली होती.
मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला, तिची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती.
तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करुन सगळं काही करत असते. एक आईच मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यांच्याकडे चांगले लक्ष देऊ शकते.
गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून, आई आणि बायको ह्यांचं कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते. त्यांना कमी लेखू नका.
लेखिका: सुमन नासागवकर, अमळनेर.
संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
* तुम्ही गाडीतून जाताना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, “दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं…
गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.
*कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं “थँक यू” ऐकायला मस्त वाटतं….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
– अज्ञात
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
इन्फोसिस फौंडेशनची विश्वस्त या नात्याने मला रोज ढिगाने पत्रे येतात. येथे आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना आर्थिक मदत देत असतो. स्वाभाविकच गरजू आणि मदतीची फारशी गरज नसलेले, असे दोन्ही प्रकारचे लोक आम्हांला पत्रे लिहितात. या दोन्ही प्रकारच्या लोकांमधून नेमके खरे गरजवंत ओळखून काढणं, हे खरं तर फार कठीण काम आहे.
अशीच एक सोमवारची सकाळ. त्या दिवशी पत्रांचा नुसता पाऊस पडला होता. मी एकेक पत्र वाचत होते. माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं, “मॅडम एक लग्नपत्रिका आली आहे व त्यासोबत एक हस्तलिखित खाजगी चिठ्ठी पण जोडली आहे. तुम्ही त्या लग्नाला जाणार आहात ?”
मी कॉलेजात अध्यापनाचं काम करत असल्याने मला माझ्या विद्यार्थ्यांकडून नेहमीच लग्नाची बोलावणी येत असतात. त्यामुळे ही पत्रिका माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांचीच असेल असं मला वाटलं. पण पत्रिका उघडून वाचल्यावर मात्र वधू-वरांच्या नावांवरूनही काहीच बोध होईना.
सोबतच्या चिठ्ठीत हस्ताक्षरात लिहिलं होतं, “मॅडम, तुम्ही जर लग्नाला आला नाहीत, तर ते आम्ही आमचं दुर्भाग्य समजू.”
मुलाचं वा मुलीचं नाव काही केल्या मला आठवत नव्हतं. पण उत्सुकतेपोटी मी त्या लग्नाला जायचं ठरवलं.
पावसाळ्याचे दिवस होते. लग्नस्थळ शहराच्या पार दुसऱ्या टोकाला होतं. एकदा क्षणभर तर असंही वाटलं, “कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीच्या लग्नाला इतक्या दूर जाण्यात काही अर्थ आहे का ?”
लग्नसमारंभाच्या जागी पोचले, तर ते अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न दिसत होतं. स्टेजवर फुलांची भरगच्च आरास केली होती. सिनेसंगीत मोठ्यांदा वाजत होतं. त्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. पावसामुळे मुलांना बाहेर अंगणात खेळता येत नव्हतं. त्यामुळे बरीच मुलं हॉलच्या आतच लपंडाव खेळून धुमाकूळ घालत होती. स्त्रियांच्या अंगावर बंगलोर सिल्क, म्हैसूर क्रेप सिल्क अशा साड्या होत्या.
व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधू-वरांकडे मी निरखून पाहिलं. कदाचित त्यांच्यातील कोणी माझा विद्यार्थी असेल, नाही तर एखादे वेळी दोघेसुद्धा असतील. तिथे त्या गर्दीत मी उभी होते. कुणाची ओळख नाही, पाळख नाही. काय करावं ते मला समजेना.
इतक्यात एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्हाला वधू-वरांना भेटायचंय का ?”
मग मी त्यांच्यापाठोपाठ स्टेजवर गेले, स्वत:ची ओळख करून दिली आणि त्यांना ‘वैवाहिक जीवन सुखाचे जावो’, अशा शुभेच्छा दिल्या. ते दोघे खूप आनंदात होते. ‘यांची नीट विचारपूस करा’, असं नवऱ्यामुलाने त्या वृद्ध गृहस्थांना सांगितलं. तरीही माझ्या मनात तो प्रश्न वारंवार डोके काढतच होता. ‘हे लोक कोण आहेत ? त्यांनी ही अशी चिठ्ठी मला का पाठवली असेल ?’
ते गृहस्थ मला जेवणाच्या हॉलमधे घेऊन गेले व त्यांनी मला खाण्यासाठी फराळाचे आणले. आता मात्र फार झालं. हे लोक नक्की कोण, हे जाणून घेतल्याशिवाय मी काहीही खाणार नाही, असं मी ठरवलं.
माझ्या मनाची चलबिचल पाहून ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, “मॅडम,मी नवऱ्यामुलाचा पिता. ही जी मुलगी आहे ना मालती, हिच्या प्रेमात माझा मुलगा पडला. आम्ही दोघांचं लग्न ठरवलं. साखरपुडा झाल्यानंतर मालतीच्या अंगावर कोड उठलं. माझ्या मुलानं लग्न करण्यास नकार दिला. आम्हांला सर्वांनाच खूप वाईट वाटलं. तिच्या घरच्या लोकांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. कुटुंबातील वातावरणच सगळं बिघडून गेलं. घरातील ताणतणाव सहन होईना, म्हणून माझा मुलगा वारंवार लायब्ररीत जाऊन बसे. एक महिन्याने तो माझ्यापाशी आला, आणि म्हणाला, मी मालतीशी लग्न करण्यास तयार आहे. आम्हांला सर्वांनाच आश्चर्य वाटलं व आनंदही झाला. आज आता लग्न आहे.”
पण तरीही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नव्हतं. या सगळ्यात माझा संबंध कुठे आला ? पण त्या प्रश्नाचं उत्तर वरपित्याने लगेच दिलं.
“मॅडम, या काळात त्यानं तुमची ‘महाश्वेता’ ही कादंबरी वाचली होती, असं आम्हांला मागाहून समजलं.” ते म्हणाले, “माझ्या मुलाची परिस्थिती पण अगदी त्या पुस्तकातल्या गोष्टीसारखीच होती. त्याने ती कादंबरी किमान दहा वेळा वाचली व त्यातील मुलीचं दुःख त्याला जाणवलं. त्याने एक महिनाभर विचार केला आणि ठरवलं- आपण त्या कादंबरीतल्या माणसाप्रमाणे आता आपली जबाबदारी झटकून टाकून नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करत बसायचं नाही. तुमच्या कादंबरीनं त्याच्या विचारांमधे परिवर्तन घडवून आणलं. “
आता काय घडलं ते माझ्या लक्षात आलं.
त्यानंतर मुलाच्या वडिलांनी एक पार्सल आणलं व अत्यंत आग्रहाने मला या भेटीचा स्वीकार करायला लावला. मी जरा घुटमळले. पण त्यांनी ते जबरदस्तीने माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले, “ही साडी मालतीने खास तुमच्यासाठी आणली आहे. ती तुमच्याशी नंतर बोलणार आहे.”
पाऊस जोराने कोसळू लागला. हॉलमधे पाणीच पाणी झालं. माझी सिल्कची साडी भिजत होती. पण मला त्याचं काही वाटलं नाही. मला खूप खूप आनंद झाला होता. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीच्या योगाने कोणाचं आयुष्यच बदलून जाईल, असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं.
मी जेव्हा कधी ती साडी नेसते, तेव्हा मला मालतीचा आनंदाने उत्फुल्लित झालेला चेहरा आणि महाश्वेता पुस्तकाचं मुखपृष्ठ डोळ्यासमोर तरळतं. माझ्याकडे असलेली ती सर्वात मौल्यवान साडी आहे.
लेखिका :सुधा मूर्ती.
अनुवाद :लीना सोहनी
संग्राहिका :भावना राजेंद्र मेथा, महाड, रायगड.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बसणे’ शब्दाचे विविध अर्थ ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
वसंत सबनीस मुलाखत घेत होते.
त्यांनी पु लं ना विचारले –
“तुम्ही प्रत्यक्षात लिहिलेले नाटक रंगभूमीवर उभं करता – असं असताना आम्ही ते ‘बसवले’ असे का म्हणता?”
पु ल :- “त्याचं असं आहे, लिहिलेले नाटक नीट ‘बसवलं’ नाही, तर प्रेक्षक उभे राहून चालायला लागतात आणि नीट ‘बसवलं’ तर नाटक उभं राहून चालतं आणि प्रेक्षक शेवटपर्यंत ‘बसून’ राहतात.
त्यातून मला प्रेक्षकांसाठी नाटक लिहायची खोड आहे. त्यामुळे चालणारे नाटक आणि ‘बसणारे’ प्रेक्षक असे गणित जमवायचे असेल, तर त्या नाटकाला आधी नीट ‘बसवावं’ लागतं.
बाकी मराठीतील, ‘बसणे’ हे क्रियापद जरा अवखळच आहे. धंदा चालेनासा झाला, तरी धंदा ‘बसला,’ असं आपण म्हणतो आणि चालला तर जमदेखील ‘बसतोच’.
धंदा जमला तर धंदा ‘बसला’ असं म्हणत नाही. पण प्रेम जमलं तर प्रेम ‘बसलं’ असं म्हणतो, आणि नाटक चाललं की चांगलं ‘बसलं’ आहे म्हणतो आणि नाही चाललं तरी नाटक ‘बसलं’ म्हणतो.
मला वाटतं ‘बसण्या’ विषयी इतकं ‘बस’ झालं!”
— ह्याला म्हणतात भाषेवरील प्रभुत्व.
लेखक :अज्ञात
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈