मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरा आनंद, खरे सुख … ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ खरा आनंद, खरे सुख… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

१०० लोकांचा एक समूह, आयुष्यावर वक्तव्यकरणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होता …

त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून हॉलमध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले. प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला…

नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५ मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!! इतक्या भरगच्च फुग्यांतून स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५ मिनिटे संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू शकला नाही !!

… नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला. वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका…. अश्याप्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि दोनच मिनिटांत प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!! सगळे खूश झाले. 

यावर तो वक्ता बोलू लागला…… “आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे ! प्रत्येक जण आनंद, सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो आहे… परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे याची कुणालाही कल्पना नाही… स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेले असतात. इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्या बदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे….”

….  हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला….नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल..! माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय.. जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं .. कारण त्याला माहितीये …  माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं !

विश्वास उडाला की आशा संपते !

काळजी घेणं सोडलं की प्रेम संपत !

म्हणून,…..  स्वप्न पाहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या !

आयुष्य खूप सुन्दर आहे.  त्याचा आनंद घ्या.

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शोध स्वतःचा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ शोध स्वतःचा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला.

सात दिवसांनंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली.

पहिला प्रवासी : “ भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो. तुम्ही मला ओळखलंत का?”

दुसरा प्रवासी : “ नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, एवढं मात्र खरं…”.

पहिला प्रवासी : “ सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात… तुम्ही तर माझे गुरु   निघालात….!” 

दुसरा प्रवासी : “ कसे काय?” 

पहिला प्रवासी : “ काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत सात दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही ! तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय ?” 

दुसरा प्रवासी : “ माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चापाण्यासाठी काही पैसे होते.” 

पहिला प्रवासी : “ मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?” 

दुसरा प्रवासी : “ मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेव्हा मी हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे, इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात ! तुम्ही  तुमचं स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही, तर मग तुम्हाला काहीही सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची ?

तात्पर्य : ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडं बघायला आपल्याला वेळच नाही !  ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू, तेव्हाच आपण आपले सर्व प्रश्न सोडवू.

जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे !

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त एक फोन कॉल…” ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फक्त एक फोन कॉल…” ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

पंचाऐंशी वर्षाच्या आईला पन्नाशी पार लेक फोन करते. खरंतर भरपूर वाचन वगैरे करणारी आई, तरीही वय बोलायचं ते बोलणारच. फोन केला आणि काय म्हणतेस विचारलं, तर आई फक्त “चाललंय चाललंय” असं उदास स्वरात म्हणत राहते. क्वचित काही तब्येतीचं छोटंमोठं.

कधीतरी अचानक फोन करत लेक विचारते, “अगं कोकणात केळीच्या पानावर दशम्या करायचे बघ किंवा मेथांबा केला पण तुझ्यासारखा नाही झाला….. त्याची रेसिपी सांग ना जरा , आज फार आठवण आली त्या चुलीची आणि चुलीवरच्या दशम्यांची , ‘ तुझ्यावाल्या ‘ मेथांब्याची.”  इथे ‘ तुझावाला ‘ या शब्दाला वेगळंच वजन मिळतं. 

वास्तविक लेकीचा मेथांबा अप्रतिम झालेला असतो. 

तर…. तिकडे आईच्या डोळ्यात आलेली चमक इकडे लेकीला आतून जाणवते. दिसत नसतं तरी लेकीला जाणवतं आई उदासपणा टाकत सरसावून बसलेली….. 

आई तिच्या सवयीप्रमाणे अगदी बेसिक पासून सुरु करते— ” तांदूळ धुवून स्वच्छ फडक्यावर, घरातल्या घरात सावलीत वाळवायचे ……. ” 

” तुला सांगते ….अमूक स्वच्छ, तमुक एकसारखं,  ढमूक कडकडीत वाळवून…! !”

— रेसिपी चालूच राहते. ठाऊक असलेल्या गोष्टी, लेक हं हंss , अच्छा अच्छा म्हणत ऐकत राहते. ओठांवर मंद हसू खेळत राहतं. मेथांब्याच्या भांड्याकडे बोट दाखवत नवरा खूणेनं विचारतो, ” मेथांबा झालाय ना, मग हा फोन कशाला?” ती त्याला खूणेनं गप्प करते. फोन चालू असतो.

चुलाण्याचा सुगंध आणि दशम्यांची चव , मेथांब्याचा जमून आलेला पिवळट काळसर केशरी रंग तन मन भरून व्यापून राहतात. 

लेकीला स्वतःच्या घरात पडलेली पन्नास कामं दिसत असतात, पण हे एक्कावनावं त्याहून फार मोठं, मोलाचं. 

— आई बोलते …. आई बोलत राहते. 

— लेक शांत झालेली असते. 

लेक आईची आई होऊन जाते. फार मोठ्ठं चमकदार काहीच घडलेलं नसतं.. फक्त एक फोनकॉलच तर असतो. 

छोट्या गोष्टीही अशा आभाळ भरून टाकतात —– 

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जमणं …. न जमणं… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले  ?

☆ जमणं …. न जमणं… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

“… मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत… गेली छत्तीस वर्षं संसार केलात…

आमच्या पिढीला का गं जमत नाही  हे ?” … तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली. 

चार वर्षं मज्जेत बॉयफ्रेन्ड असलेल्याचा, आठ महिन्यापूर्वी हजबन्ड झाल्यानंतरचा हा राग होता.

” प्रश्न विचारलास, का ?” पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 

” उत्तर हवंय, का ?”

“ हो,उत्तर हवंय “, लेक म्हणाली. 

“असे आहे न बाळा,” आई सहजच म्हणाली, …. 

… आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो. तुम्ही ‘ जमलं तर पाहू ‘ म्हणताय. 

… आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं; तुमच्या काळात ते केलं जातं….. 

… आम्ही साथीदार व्हायचो; तुम्ही पार्टनर बनवता.…..   

… आमच्यात प्रेम ही सहजता होती; तुमच्यात तो अट्टहास झालाय….. 

… आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं; तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं….. 

… आमच्या वेळी मैत्री विश्वासात रुपांतरीत व्हायची; तुम्ही जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय …  

… आम्ही कविता स्वतः लिहायचो; तुम्ही फक्त त्या फॉरवर्ड करताय….. 

… आमचे जीवनसाथी होते; तुमचे बॉयफ्रेन्ड नि गर्लफ्रेन्ड आहेत….. 

… आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम ‘ सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहिजे  म्हणून केलं जातंय…..  

… आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं.        

… तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे, तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे….. 

… आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल  

…  याची कॅलक्युलेशन्स असतात…..  

… आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात…..  

… आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय….  

… आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत….  

… आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय…. 

… काय आहे बाळा, जमणं – न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. आणि क्षमता जाणीवपूर्वक डेव्हलप करायची असते..! …….. “ 

जगता आलं पाहिजे… मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो तेव्हा पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे……. 

आयुष्य खूप सुंदर आहे… भरभरून जगता आले पाहिजे…… 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मातीची माती करणं थांबवशील का रे माणसा ?☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 मातीची माती करणं थांबवशील का रे माणसा ? 🌼 संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

दररोजचं सकाळचं फिरणं आटपलं की पाच ते दहा मिनिटे काळ्या मातीत पडून शवासन करणे हा माझा शिरस्ता आहे. रोजच्याप्रमाणे शवासनात डोळे मिटून शांत पडलो होतो. तेवढ्यात कानात काहीतरी कुजबुज ऐकू आली. हळूच एक डोळा उघडून पाहिलं, भोवताली कुणीच नव्हतं. आवाज तर येतच होता. मग दोन्ही डोळे उघडून पाहिले,  तरीही कोणी दिसत नव्हतं.आवाजाचा भास आहे असं समजून दुर्लक्ष करून पुन्हा डोळे मिटून पडणार एवढ्यात थोडा चढलेला स्त्री स्वर कानी पडला. “ अरे भोवताली काय बघतोस ? कानाजवळ बघ. मी माती बोलतेय. तुला निसर्गाची हाक ऐकू येते म्हणून तुझ्याशी बोलायचे आहे.” 

… आणि ती पुढे बोलू लागली.  मी फक्त ऐकत होतो.

“ जमिनीचा सर्वात वरचा थर म्हणजे माती. थोड्याशा जाडीचा आमचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. पण आम्हाला नष्ट व्हायला तुफान पाऊस ,वादळीवारा पुरेसा आहे. ही संकटं कधीतरी येतात, त्यामुळे आम्हाला त्याची फारशी चिंता वाटत नाही. पण तुम्हा मानवाने सुरू केलेले पिकाऊ जमिनीत बांधकाम, सततचं उत्खनन व रासायनिक औषधी खतांचा अतिरेकी वापर यांमुळे जीव अगदी नकोसा झाला आहे. खरं तर मी बोलणारच नव्हते. 

मीसुद्धा तुमच्या माणसातल्या स्त्री जातीसारखीच…

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 39 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 39 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

६५.

माझ्या आयुष्याच्या भरून वाहणाऱ्या

या कपातून माझ्या देवा,

कोणते दैवी पेय तुला देऊ?

 

” हे माझ्या कवि! माझ्या नजरेतून तुझी निर्मिती

 मी पहावी यात तुला आनंद आहे का?

 माझ्या कानांच्या दारात शांतपणं उभं राहून

 तुझीच चिरंतन संगीत रचना

 ऐकायची आहे का?”

 

 माझ्या मनात तुझे विश्व शब्दजुळणी करते आहे.

तुझा आनंद त्यात संगीत भरतो आहे.

 

प्रेमानं तू मला तुझं सारं देतोस

आणि तुझा सारा गोडवा त्यात भरतोस.

 

६६.

माझ्या देवा!

संध्यासमयीच्या अंधूक प्रकाशात

माझ्या खोल अंतर्यामी जी भरून राहिली आहे,

सकाळच्या उजेडात जिनं आपला पडदा बाजूस

सारला नाही तीच माझ्या अखेरच्या गीतात

दडलेली माझी भेट असेल.

 

शब्द काकुळती आले,पण व्यर्थ!

तिला वश करू शकले नाहीत.

त्यांनी उत्सुकतेने आपले हात पुढे केले.

 

माझ्या ऱ्हदयाच्या गाभाऱ्यात

तिला बसवून मी देशोदेशी भटकलो.

माझ्या आयुष्याचे चढ-उतार

तिच्याभोवती वर खाली झाले.

 

माझे विचार, माझ्या कृती,

माझी निद्रा, माझी स्वप्नं यावर तिचंच

अधिराज्य होतं, तरी ती परस्थच राहिली.

 

किती माणसं आली, माझं दार खटखटून गेली

आणि निराश झाली.

 

तिला समोरासमोर कुणी कधीच पाहिलं नाही.

तू तिला ओळखावसं अशी वाट पहात

ती स्वतःच्या एकटेपणात तशीच राहिली.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

📖 वाचताना वेचलेले  📖

 ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मुलांना जबाबदार  बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘ हेल्दी निग्लिजन्स ‘ हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन. या ‘दोन बाय दोन’,च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात. लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.

त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास, या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची. मुलं अगदी जखडून गेली, कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.

आईची प्रतिक्रिया, ‘ मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा किती लक्ष द्यायचं? ‘

” तू जरा जास्तच लक्ष देते आहेस.” रेणूताईंनी म्हटलं ,” थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे. जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर ताबा ठेवलास तर कसं चालेल? जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.” 

मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना, हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच, पण न जाचणारं ! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय यावर विश्वास ठेवायला हवा. आपण ते बुडेल ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे, थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात त्याप्रमाणे, ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं, असं तोंडानी बोलत, मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं. आपण ‘ मूल ‘ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’

ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा (अधून मधून) राजीनामा द्यायला हवा.

लेखक : श्री शिवराज गोर्ले

प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

बहिणी…..​​

दुःख  वाटून घेणाऱ्या…. सुख वाटत जाणाऱ्या

सल्ला देणाऱ्या …. सल्ला घेणाऱ्या 

खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या 

आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या 

स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणाऱ्या 

शाबासकीची पहिली थाप पाठीवर देणाऱ्या .

खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या.

 

​​बहिणी ….. 

आयुष्याला मिळालेलं एक वरदान.

जागेपणीचं स्वप्न छान …. पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान.

सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान

मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर

हळुवार हात पुसतात डोळ्यातले नीर

उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर

 

​​बहिणी ….. 

गातात नाचतात, खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम.

त्या सुगरण असोत  नसोत…. प्रत्येक  घास वाटतो अमृताहून गोड.

बहिणीत नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती… लहान थोर… शहर गाव.

बहीण असते एक सरिता ….. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी……. 

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ !! पन्नाशी पार करतांना !! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

!! पन्नाशी पार करतांना !!  … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा एका पन्नाशी ओलांडलेल्या आणि साठीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, 

” मित्रा, पन्नाशी ओलांडल्यावर आणि साठीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असं तुला वाटतंय? ” 

— यावर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे……… 

— आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय

— मला याची जाणीव झालीय की, आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही, की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

— आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! 

— आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

— आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.

— आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

— आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.

— ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहिती नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.

— आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.

— आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

— आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

—  आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

— मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!

— आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.

 — आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जाऊन रडतो. त्याच्या तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असल्याची भावनाही मनात येते.

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

— आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा पन्नाशी ओलांडताना !! —

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आतून तुटलेली माणसं ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ आतून तुटलेली माणसं ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात.  त्यांचं इमोशनल होणं कालांतराने बंद होत जातं.

आतून तुटलेली माणसं फारशी व्यक्त होत नाहीत. त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागलं असेल काहीतरी.

२+२=५ कुणी म्हणालं तरी ते “it’s okay” म्हणून निघून जातात.

ती माणसं वाद टाळतात, माणसांशी बोलणं टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं.

काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात,आणि यातच खरा शहाणपणा असतो.

थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interference  नको असतो.  कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते, म्हणून मग ते  सेल्फ dependent होतात.

आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते, संकटांची काळजी नसते.  कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे इमोशनल होण्यापासून ते mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात आतून तुटण्यापासून होते….!

म्हणून……

” कभी कभी दर्द भी अच्छा होता है । “

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print