मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

??

☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तसं बघायला गेलं तर मी कोणी फार महान व्यक्ती वगैरे नाही की मी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहावं आणि लोकांनी ते कौतुकानं वाचावं. पण शहापूरसारख्या आदिवासी भागात जगण्यासाठी रोजची तारेवरची कसरत करत, मी LIC सारख्या नामांकित वित्तीय संस्थेतून मॅनेजर पदावरून निवृत्त होणं, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं यश आहे. 

माझ्या या यशात वाटेकरी असलेल्या माझ्या कुटुंबियांइतकाच अनेक जणांचा हातभार, सहकार्य या प्रवासात लाभलं. कोणतेही नातेसंबंध नसताना, निःस्वार्थ वृत्तीने मदत करणारी अनेक माणसं भेटली, या साऱ्यांविषयी मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि आजीवन राहील. आणि ती व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच ! 

तर अशाच एका व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती म्हणजे शीलामामी ! शीला शिवराम लेले. ही वर्षाची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मामी बरं का ! राजामामा, मामी त्यांची दोन मुलं-स्वाती – सचिन आणि वर्षाचे आजी-आजोबा अशी सहा माणसं या कुटुंबात होती. आधी हे भिवंडीला राहायचे, नंतर ठाण्यात, नौपाड्यात आले. बहुतेक मामाचं मुंबईत ऑफिस आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आले असावेत. मामीचं घर तसं लहानच, म्हणजे स्वैपाकघर आणि बाहेर एक खोली. तिथेच लागून जिना होता. 

रानडे म्हणजे शीलामामीचं माहेर ! या रानड्यांच्या घरातच वरच्या मजल्यावर लेले कुटुंब राहात होतं. स्वैपाकघराला लागून आणखी एक खोली होती ती रानड्यांच्या वापरात होती. त्यांच्या बाहेरच्या बंदिस्त व्हरांड्यातून वरती यायला दुसरा जिना होता. स्वैपाकघरातच एका सेटीवर वर्षाचे आजोबा झोपलेले असायचे. त्यांचं वय नव्वदच्या आसपास असेल. त्यांचं सगळं बिछान्यावरच करावं लागायचं. शीलामामीच करायची सगळं, तेही विनातक्रार ! बाहेरच्या खोलीत सेटीवर वर्षाची आजी, त्याही पंच्याऐंशीच्या आसपास ! जेमतेम स्वतःचं स्वतः आवरायच्या. त्यांची तब्येतही नरम-गरम असायची. 

सकाळी मामाचा डबा, मुलांची शाळा आणि बाकी सगळं घरकाम, मामी हसतमुखाने करायची. शिवाय इतर कलाकुसरीची कामंही हौसेने चालू असायची. रूखवताच्या वस्तू, मोत्यांची महिरप इत्यादि… 

तर या घराशी माझा संबंध आला तो १९८१ पासून. शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातून एस. एस. सी. झाल्यावर आम्ही दोघींनी अकरावीला मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्सला प्रवेश घेतला. अकरावी – बारावी आमची काॅलेजची वेळ दुपारी १.४५ ते ५.४५. शहापूरहून बसने आसनगाव ला यायचं आणि मग ११ वाजताची गाडी पकडून काॅलेजला जायचं. गाडी १२.३५ ला मुलुंडला आणि १२.४० ला आम्ही काॅलेजमध्ये पोचायचे. मग  एक तास बहुतेक लेडीजरूममध्ये डबा खाऊन आणि नंतर बसून काढायचो.  म्हणून मग अधून-मधून आम्ही दोघी मामीकडे जायला लागलो. 

मुलुंडच्या अलीकडचे स्टेशन ठाणे आणि स्टेशनपासून शाॅर्टकटनी दहा मिनिटात मामीच्या घरी ! अर्धा तास तिथे बसून परत ठाणे स्टेशन आणि काॅलेजला ! मामी नेहमीच हसतमुखाने स्वागत करायची. वडी, लाडू, शंकरपाळे, बिस्किट काहीतरी खाऊ नेहमीच हातावर ठेवायची. घरून आणलेली डब्यातली पोळीभाजी खायला बसलो तर नंतर गरम-गरम वरण-भात खायला लावायची. चाचणी परीक्षा असो की वार्षिक, आम्ही दोघी कायम मामीकडे राहायला जायचो. 

शहापूर – आसनगावहून मुंबईकडे जायला, त्यावेळी अगदी मोजक्या गाड्या होत्या. एक गाडी गेली की तीन तासांचा विराम. एकदा बस लेट झाल्याने आमची सकाळची गाडी चुकली आणि त्यामुळे प्रिलिमचा पेपर देता आला नाही. त्यावेळी इतर वाहनांनी रस्त्यामार्गे जाणं अवघडच होतं आणि शिवाय खिशालाही परवडलं नसतं. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी ठाण्यात दाखल व्हायचो. स्वैपाकघराला लागून असलेली वैद्यांची खोली मग परीक्षा संपेपर्यंत आम्हाला दिलेली असायची. आणि त्याबद्दल रानडे कुटुंबियांनीही कधी नापसंती व्यक्त केल्याचं मी ऐकलं/अनुभवलं नाही.

रात्री जागून अभ्यास असो, पहाटे लवकर उठून करायचा असो, मामी सेवेला तत्पर असायची. चहा-खाणं, जेवण आपुलकीनं हातात आणून द्यायची. आणि याबाबतीत वर्षात आणि माझ्यात कधीच कोणताच भेदभाव नसायचा हं ! वर्षा तिच्या सख्ख्या नणंदेची मुलगी, तिची भाची, तिचं कोडकौतुक केलं तर एकवेळ समजण्यासारखं आहे. पण मी त्या भाचीची मैत्रीण, तरीही माझेही अगदी तस्सेच लाड केले जायचे. कुठले ऋणानुबंध असतात हो हे ! खालच्या रानडेआजी देखील काहीतरी गोडधोड मुद्दाम आणून द्यायच्या आम्हाला. वर्षाची आई आणि मामी, या नणंद-भावजयीचं नातं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा ! इतकं समजूतदारपणाचं, आपुलकीचं नातं खरंच दुर्मिळ आहे. 

आम्ही एस. वाय. बी. काॅमला असतानाच वर्षाचं लग्न झालं. वर्षाच्या लग्नाच्या आधीच तिची आई अंथरुणाला खिळली. कित्येक महिने हाॅस्पिटलमध्येच होती. लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. पण मामा-मामींनी खंबीरपणे उभं राहून सगळं व्यवस्थित पार पाडलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात वर्षाचे बाबा अचानक गेले. पुढे काही दिवसांनी आईही गेली. वर्षाचं माहेरपण, बाळंतपण हे देखील मामींनीच केलं, आणि तेही अगदी पोटच्या लेकीप्रमाणे, हे मी स्वतः बघितलं आहे. 

काॅलेज संपलं. नोकरी, लग्न, संसार या व्यापात मीही गुरफटले. मामीही मुलांचे संसार, नातवंडं यात रमलेली. त्यामुळे वारंवार भेट काही होत नाही. वर्षाकडेच तिची विचारपूस करते. पण मागच्या वर्षी आमची वर्षाकडे भेट झाली. माझा कवितासंग्रह अलवार तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि गळामिठी, न बोलता खूप खूप देऊन गेली.

आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मातृवत निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी मामी मला कायमच वंदनीय आहे. 

अधिक मासानिमित्त या आगळ्यावेगळ्या प्रेममूर्तीला साक्षात दंडवत. आणि ही शब्दभेट- —- कृतज्ञतेची ! 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी देशाला बांधिल आहे का? हा प्रश्न अंतर्मुख करणाराच आहे.  जेव्हां  मी माझं स्वतःचं जगणं तपासून पाहते तेव्हां या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच मला प्रश्न विचारते की देशासाठी मी नक्की काय करते?  काय करू शकते आणि आतापर्यंत काय केलं?

सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन आपण देशाचे रक्षण तर करू शकत नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जगताना निदान एक चांगली नागरिक म्हणून तरी जगले का? नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या मी काटेकोरपणे पाळल्या का?  अशा विविध प्रश्नांचं एक काहीसं अस्पष्ट पण सकारात्मक उत्तर मला नक्कीच मिळतं की आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सलोख्याचे वातावरण निदान आपल्यामुळे बिघडणार नाही याची मी काळजी घेतली. घेत असते. 

देशाने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकते/ शकतो हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो आणि मग एका प्रातिनिधीक  स्वरूपामध्ये देश माझा मी देशाचा या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाची देशाप्रतीची बांधिलकी काय असायला हवी आणि कशी याचं एक व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.

सर्वात प्रथम म्हणजे हा देश माझा आहे,  मी या देशात जन्मलो आहे आणि या देशाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी विश्वाच्या नकाशावर एक परिपूर्ण, स्वावलंबी, लोकशाहीची खरी तत्त्वं बाळगणारा  समृद्ध देश, म्हणून स्थान मिळावे ही भावना रुजली पाहिजे.  

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. का?  याची अनेक कारणे आहेत.  अगदी वैज्ञानिक, तांत्रिक,  डिजिटल क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती जरी केली असली तरी देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निवारण किती परसेंट झालं आहे हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. भूकबळी, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमजुती, जातीयवाद, धर्मभेद,  स्त्रियांचा अनादर,  त्यांची असुरक्षितता,  त्यातूनच होणारे बलात्कारासारखे गुन्हे, हुंडाबळी, केवळ मतांचे, सत्तेसाठीचे राजकारण,  बेकारी, महागाई,कायदेपालनाच्या बाबतीतली उदासीनता, अशा अनेक भयानक भुजंग विळख्यात आजही आपला देश आवळलेला आहे.  उंच आकाशातली  एखादी भरारी आपण नवलाईने पाहतो त्याचवेळी आपल्या जमिनीवरच्या पायांना चावे घेणार्‍या विंचवांचे काय करायचे?  हा विचार मनात नको का यायला?

ज्यावेळी आपण आपल्या देशाच्या बांधिलकीबद्दल भाष्य करतो तेव्हा जमिनीवरच्या समस्यांचे निराकरण प्रथम झाले पाहिजे असे मला वाटते.  इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही.  शासनाचे नियम ते पाळतात.  नियम मोडणाऱ्याला— मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा ही होतेच.  स्थानिक प्रशासनाने नियमांची जी चौकट घातली आहे, ते बंधन न मानता कर्तव्य मानून त्याचे पालन केले जाते. आपल्याकडे मात्र येथे शांतता राखा असे लिहिले असेल तेथे हमखास कलकलाट असतो.  येथे थुंकू नका—नेमके तिथेच पिचकार्‍यांची विचकट रांगोळी दिसते.  नो पार्किंग पाटीच्या ठिकाणीच वेड्यावाकड्या गाड्या लावलेल्या दिसतात.  कृपया रांगेची शिस्त पाळा या ठिकाणीच माणसांची झुंबड उडालेली दिसते.  स्वच्छता राखा तिथेच कचऱ्याचा डोंगर असतो.  यातून एकच मानसिकता झिरपते की नियम हे मोडण्यासाठीच असतात जणूं . तेव्हा भारतीय घटनेने  दिलेले अधिकार, स्वातंत्र्य आणि सुजाण नागरिक म्हणून जगतानाची कर्तव्ये या सगळ्यांचे संतुलन, एक जबाबदार नागरिक म्हणून ठेवणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  गरज फक्त कडक कायद्यांची नव्हे तर गरज सदसद्विवेक बुद्धीची आहे.  कायदा व सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिक म्हणून जगताना आपणही पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे. 

पर्यावरणाचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी करणे, अन्नाची नासाडी न करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी बळीराजा, त्यांच्या समस्या जाणून, तळागाळातील लोकांशी संवाद साधून, एकसंध समाजाची वज्रमूठ— साखळी बांधणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हीच देशभक्ती आहे.  देशा प्रतीची आपली बांधिलकी आहे.

निसर्गाचं वावर कसं मुक्त मोकळं असतं !  त्यात पेरलेलं, उगवलेलं यावर जसा किडे, मुंग्या, कीटक, पक्षी यांचाही अधिकार असतो तसंच आपण कमावलेलं फक्त आपलंच नसतं.  त्यातलं काही समाजाचं देणं म्हणून बाजूला ठेवावं लागतं, ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे.  मी, माझे कुटुंब, माझा समाज आणि माझा देश या स्तरांवर आपलं शांततापूर्ण जीवन अवलंबून असतं.

रस्त्यांवरचे अपघात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भूकंप, वादळे,  अवकाळी पाऊस, पिकांची नासाडी,  शेतकऱ्यांची आत्महत्या, दहशतवाद, राजकीय आयाराम गयारामांच्या बातम्या आपण मीडियावर ऐकतो, पाहतो. आणि हळूहळू अलिप्त होतो कारण आपली वैयक्तिक गुंतवणूक त्यात नसते.  कधी रंजकता, कधी  बेचैनी अस्वस्थता जाणवते पण ते अल्पकालीन असते.  सजगपणा, डोळसपणा आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता असणे म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी ठरते.  कोणीतरी करेल पेक्षा मी का नाही? ही मानसिकता तयार झाली पाहिजे. मी माझ्या देश बांधवांसाठी, उपेक्षित, वंचित घटकांसाठी काय करू शकतो /शकते हे माणुसकीचं भान जपणं म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी जपणे आहे. 

देशासाठी जगतानाच्या अनेक व्याख्या आता बदलत चालल्या आहेत.  पूर्वी शाळेत तास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना होत असे. शाळा सुटताना वंदे मातरम म्हटले जायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर याची शिकवण असायची.  या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात असं जरी नसलं तरी त्यातली भावनिक, राष्ट्रीय गुंतवणूक जाणवत नाही.  १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन असण्यापेक्षा सुट्टी साजरी करण्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस ठरत आहेत याचं वाईट वाटतं.  देशाचा इतिहास समजून घेणे,  हुतात्म्यांचे बलिदान स्मरणं आणि त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शपथ पूर्वक आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचं धोरण  मनाशी आखणं ही देशाशी आपली बांधिलकी आहे.

या देशात आपण राहतो तिथे फक्त स्वतःपुरता विचार करून जगण्यापेक्षा मी केलेलं कोणतही काम या देशाचं अखंडत्व भंग करणारं नसेल याचं भान जपणं म्हणजेच देशाशी बांधील राहणं  ठरेल.

एक आठ नऊ वर्षाची भारतीय मुलगी दहा-बारा राष्ट्राच्या पंतप्रधानांना आमच्या पिढीसाठी पाणी आणि प्राणवायू ठेवा अशा मजकुराची पत्र पाठवते तेव्हा जाणवतं की  उगवत्या पिढीवर सामाजिक संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीने पेलणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

मला हा लेख का लिहावासा वाटला?” याचे उत्तर हे असू शकतं की देशाशी बांधिल राहताना मी देशासाठी काय करू शकते याची पुनश्च उजळणी व्हावी म्हणूनच …

🇮🇳 ।। वंदे मातरम् ।। 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य” 🇮🇳 ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य… 🇮🇳” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

भारत माझा देश आहे

.. पण माझ्या देशात भारत आहे का ?

 

सारे भारतीय माझे बांधव आहेत

.. माझे सारे बांधव भारतीय आहेत का ?

 

माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

.. माझ्या प्रेमाच्या यादीत देश कुठे आहे ?

 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि .. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

,, देशाची समृद्धी कोणत्या चॅनलवर दाखवतात ?

.. परंपरांचा अपमान पदोपदी दिसतोच परंतू

.. अभिमानास्पद परंपरांची माहिती कुणाला आहे?

 

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

.. पाईक होणे सोडा पण परंपरा झुगारण्यातच धन्यता मानणारी माणसेच हार घालून मिरवतात

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन

.. पालक, गुरुजन व वडिलधा-यांचा अपमान होणार नाही येवढेतरी घडते असे दिसते का ?

 

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।

.. सामान्य माणसाशी सौजन्याने कोण वागते हो ?

 

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।

.. निष्ठा या शब्दाच्या ख-या अर्थाशी किती जणांचा संबंध येतो ?

 

 त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

.. स्वत: व्यतिरिक्त कुणाचे कल्याण अथवा समृद्धी वा सौख्य यांचा विचार करणारे किती हो ?

बोले तैसा न चाले त्याची

सध्या वंदितो आम्ही पाऊले.

कराल विचार निदान आज ?

बनवायचा भारत महान ?

…. “१५ ऑगस्ट” – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🇮🇳

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

??

☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

लहान असतो तेव्हा इतकं अप्रूप असतं ना ‘फ्रेंडशिप डे’ चं…

फ्रेंडशिप बँड निवडताना माझी अमुक रंगाची लेस फिक्स म्हणजे फिक्स. सगळ्यांना कळायला हवं आणि लक्षात राहायला हवं की हा फ्रेंडशिप बँड मी बांधलाय. पण माझ्या बेस्ट फ्रेंडला मात्र हा स्पेशल बँड हां ! यात मणी आहेत, ह्यात तिचं नाव ओवून घेतलंय, तिच्यासाठी स्पेशल अंगठी घेतलीये, वगैरे वगैरे.

लहानपणीचे दिवस, नजरेसमोर आता बसलेल्या चिमणीने भुर्रकन उडून जावे, तसे पटकन निघून जातात. मोठे झाल्यावर बालपणीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आपण जणू लहानपणीच्या स्वतःलाच शोधत असतो. त्यांच्या डोळ्यात आपल्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे प्रतिबिंब आपल्या आठवणींना उजाळा देत राहतं.

शाळेतून कॉलेजात, कॉलेजमधून ऑफिसमध्ये जाताना काही जणांची आपल्या आयुष्यात भर पडते, तर काहीजण नकळत वजा होतात. ही बेरीज वजाबाकी होता होता काही जण मात्र या हिशेबात नेहमी आपल्या सोबत राहतात. ही शिल्लक म्हणजेच आपली खरी मिळकत असते, बरं. हा आपला खजिना म्हणजेच आपले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !

… कधी आपण एकाकी बसल्यावर हलकेच पाठीवर हात ठेवणारे…

… आपण इतक्यात रडणारच की तितक्यात पांचट जोक मारून हसवणारे….

… एकाच गोष्टीवरची वारंवार चर्चा, थोडीशी नापसंतीने, पण हजार वेळा मन लावून ऐकणारे….

… टेन्शनमध्ये असलो की ‘ सब ठीक हो जाएगा ‘, ‘ ऑल इज वेल, जस्ट चील ‘, असे टिपिकल डायलॉग मारणारे….

… व्हाट्सअप वरच्या एका रिप्लाय वरून तुमचा मूड ओळखणारे….

… तुमचं दिखाऊ हसू आणि तुमचं खळखळणारं गडगडाटी हास्य तोंडपाठ असलेले….

… असे हे आयुष्यातले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !

मोठे झाल्यानंतर मैत्रीची परिभाषा बदलत जाते. कारण वयापरत्वे माणूस अधिक गुंतागुंतीचा होतो

पण जर कोणती गोष्ट तशीच राहत असेल तर ती असते ” भावना “!…

… प्रत्येक संकटात मित्रासोबत खंबीर उभं राहायची भावना….

… मित्राला काहीतरी दुखावत असेल तर त्या गोष्टीपासून मित्राला प्रोटेक्ट करायची भावना….

… मित्राला मनसोक्त व्यक्त होण्यासाठी त्याचा आधार बनायची भावना….

… मित्राचे सुखदुःख ऐकून त्याला ‘ एक्सपर्ट ॲडव्हाइस ‘ द्यायची भावना…

… मित्र जास्त हवेत उडायला लागला तर त्याला जमिनीवर आणायची आणि मित्र अंधारात असेल तर त्याला प्रकाशात खेचून आणायची भावना…..

… आणि ह्या भावनेलाच तर “मैत्री” म्हणतात.

… हा लेख माझ्या सगळ्या ‘ स्पेशल फ्रेंडशिप बँडस ‘ साठी समर्पित…

©  डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

जवळपास तीन वर्षे होत आली मीनाला भेटून ! मी आणि अलका तिला भेटून आलो आणि आठ दहा दिवसातच मीना गेल्याचे कळले आम्हाला! तिचे ते टपोरे डोळे डोळ्यासमोरून जाईनात! त्या डोळ्यात तेव्हा ना ओळखण्याची खूण होती, ना आमच्या अस्तित्वाची जाणीव! ना स्पर्शाची! तरीपण ती मनात कुठेतरी हलली असेल, तिला व्यक्त करता आलं नाही तरी!

मीना आमची लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण! शोभा, अलका, मीना आणि मी! चौघींची खूप गट्टी होती. मीना आणि मी किती वर्ष शाळेत एका बाकावर बसत होतो. हसत – खिदळत होतो, भांडत होतो, आणि पुन्हा गळ्यात गळे घालत होतो. दुर्दैवाने आम्ही नववीत असतानाच तिचे वडील गेले आणि मीना आपल्या आईबरोबर पुण्याला आपल्या मोठ्या भावाकडे शिफ्ट झाली. मॅट्रिक झाल्यानंतर एस्. पी. कॉलेजला शिक्षण घेत असतानाच ती डेक्कन वर एका लायब्ररीत पार्ट टाइम जॉब करत होती. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा स्वभाव होता तिचा! त्या काळात ती आणि मी भेटत होतोच. ग्रॅज्युएशन नंतर दोघींचीही लग्न एकदमच ठरली. अगदी रुखवताची तयारी सुद्धा दोघींनी मिळूनच केली!

लग्न झाली आणि आम्ही आपापल्या संसारात गुरफटलो! कधीतरी खुशालीचे पत्र जाई एवढेच! तिला दोन मुलगे, मला एक मुलगा आणि एक मुलगी.. संसार गाडी रुळावरून चालू होती. आणि अचानक एक दिवस मीनाला ब्रेन ट्यूमर निघाल्याचे कळले. तिचे मोठे ऑपरेशन झाले. त्यातून ती सही सलामत बाहेर पडली! पण दुर्दैवाने तिच्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन ते अकस्मात गेले. दोन लहान मुले घेऊन मीना पुण्यात सासरच्या घरी परत आली. हे सगळे कळल्यावर खूप वाईट वाटले. तिला आता स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे होते. म्हणून तिने मूकबधिर शिक्षणाचा कोर्स केला आणि नोकरीला सुरुवात केली. नोकरीचे ठिकाण लांब होते, पण सासू-सासर्‍यांच्या आधाराने तिने आपली नोकरी सुरू केली. यथावकाश मुलांची शिक्षणं झाली. नोकरीतून रिटायरमेंट घेऊन मुलांसह आनंदाने राहायची स्वप्ने मीना बघू लागली. मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्याने सहकार नगर मध्ये फ्लॅट घेतला. आता सुखाचे दिवस आले होते. मध्यंतरीच्या काळात मी एकदा तिला भेटून आले.

धाकटा मुलगा इंजिनियर होऊन दिल्लीला नोकरीला लागला होता. मीना त्याच्याबरोबर दिल्लीला गेली. पण काय झाले कोण जाणे ?पुन्हा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. ट्रीटमेंट चालू होती, पण आता तिला खूपच त्रास होत होता. म्हणून ती पुण्याला मोठ्या मुलाकडे आली, पण त्यानंतर तिने अंथरूणच धरले. मी आणि अलका तिला भेटायला गेलो. पण ती आता जाणीव नेणीवेच्या पलीकडे होती.

तिच्याकडे बघून खूप काही आठवत होते. ते शाळेचे दिवस, खूप खळखळून हसणे, बडबड करणे, दंगा करणे, हे सगळे आठवले, पण आता त्यातले काहीच नव्हते !ती आम्हाला ओळखत सुद्धा नव्हती. रत्नागिरीचे फाटक हायस्कूल ही आमची शाळा! लहानपणापासून आम्ही एका वर्गात, एका बाकावर! शाळेच्या स्नेहसंमेलनात प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायचा उत्साह! खेळात, नाचात, नाटकात सगळीकडे भाग घ्यायचा. रत्नागिरी गाव लहान, त्यामुळे सगळेच एकमेकांच्या ओळखीचे !कुणाच्या बहिणीचा, मावशीचा, वहिनीचा कुठलाही कार्यक्रम असू दे आमची तिथे हजेरी असायची! विशेष करून मंगळागौर जागवायला आवडायची. रात्रभर जागायचं, पहाटे घरी यायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन रात्री किती मजा केली, याची चर्चा करायची. असे मजेचे दिवस होते ते!

आम्हा सर्व मैत्रिणींचे केस लांब होते. रत्नागिरीत फुले भरपूर !त्यामुळे रोज डोक्यात फुलांचा गजरा किंवा फुले असंतच! परीक्षेच्या दिवसात कैऱ्यांच्या फोडी तिखट मीठ लावून शाळेत आणायच्या आणि सगळ्यांनी त्या आंबट चिंबट गप्पा मारत खायच्या. मधल्या सुट्टीचा डबा तर वर्ग चालू असतानाच संपायचा! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज बंदरावर जाऊन भेळ खायची आणि सूर्यास्त झाला की घरी यायचे, असे फुलपाखरी दिवस होते ते!

मीना आमची जिवाभावाची मैत्रीण! रत्नागिरीत असेपर्यंत केलेल्या या गमती जमती ती पुण्याला गेली तरी आम्ही जेव्हा एकत्र भेटत असू तेव्हा चवी चवीने बोलल्या जायच्या! ती वर्षे मागे पडली. सगळ्या जणी बोहल्यावर चढलो आणि वेगवेगळ्या दिशेला, वेगवेगळ्या घरात नांदायला गेलो. मुले बाळे झाली. संसारात रमलो, पण ते लहानपणचे दिवस काही स्मरणातून गेले नव्हते! वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकत्र येत होतो. तीच मीना आजारी आहे असं कळतात मी आणि अलका तिला भेटायला गेलो. तिच्याशी जरा बोलता येईल असे वाटत होते, पण कसचे काय, तिची अवस्था बघून अक्षरशः भडभडून आले! तिच्या सुनेने तिला आम्ही मैत्रिणी आलोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या डोळ्यात आम्हाला ती ओळख पटण्याची खूण दिसेना. खूप वाईट वाटले. तिला भेटून आल्यानंतर काही दिवसातच ती गेल्याचे कळले, पण डोळ्यासमोरून तिचे ते टपोरे डोळे जाईनात !आता तीन वर्षे होतील पण आज मीनाच्या आठवणीने मन भरून आले. नकळत डोळे पाणावले. “मैत्री” म्हणजे काय ते जाणवते आता! इतके वय झाले तरी हा रेशीम बंध तुटत नाही… हीच खरी मैत्री !

(वरील लेख लिहून काही वर्षे झाली, पण अजूनही “मैत्री” म्हंटले की ही माझी जिवाभावाची मैत्रीण आठवते. लहानपणीची ती मैत्री काळजातील असते हेच खरे)

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कृष्ण चिंतन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “कृष्ण चिंतन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म. हा कुणा व्यक्तीचा जन्म नाही. किंबहुना व्यक्तीच्या निमित्ताने नवाच एक विचार पुढे आला आहे.  व्यक्ती काल्पनिकही  असू शकेल. पण व्यक्तीपेक्षा तो विचार खरा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे चरित्र यातून हा विचार आपल्यापुढे मांडता येतो असे मी मानतो. 

लहानपणी श्रीकृष्णाने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा, गाई वासरांची पूजा करण्याचा विचार मांडला.  म्हणजेच परंपरा कितीही जुनी असली तरी जे जुने आहे ते पवित्रच आहे असे न समजता, कालमानपरत्वे जुन्या परंपरांचा विचार टाकून दिला पाहिजे. कालमानानुसार जे नवे विचार आहेत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. ( वाचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ — लेखक वि. दा. सावरकर) श्रीकृष्णाने गीता सांगितली, परंतु गीतेच्याद्वारे त्याने तत्वज्ञान सांगितले ते महत्त्वाचे.

‘मी सर्वकाही आहे, मी असे करतो, मी जगाचा आदि आहे, अंत ही आहे.’  असे तत्वज्ञान त्याने मांडले आहे असे वरकरणी वाटते.  परंतु हे तत्त्वज्ञान म्हणजे ‘ मी-पणा ‘ नसून, ‘ मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या प्रकारचे तत्त्वज्ञान मी मानतो. मी जो उपदेश करतो ते तत्वज्ञान मी स्वतः अंगिकारतो असे त्याचे म्हणणे आहे.  मी म्हणजे कुणीही व्यक्ती. माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ इतकाच की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या दृष्टीने या विश्वाचा अंत होणार आहे.   

श्रीकृष्ण मानला जर विश्वाचा शासक, तर त्याचे असे म्हणणे की जो सर्वोच्च पदावर आहे तो तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये कोणतीही सक्रिय मदत करणार नाही. तो फक्त तुम्हाला तत्वज्ञान सांगेल.  कृष्ण म्हणतो ‘ न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार ‘ म्हणजेच सर्वोच्च शासक हा तुम्हाला काही युक्तीच्या गोष्टी सांगेल परंतु तो स्वतः तुमच्या जीवनाच्या युद्धात तुमच्या बरोबर सामील होणार नाही. सक्रीय मदत करणार नाही.  उलट त्याचे सैन्य हे तुमच्या विरोधात लढणार आहे.  त्याच्या सैन्याला तुमच्या भल्याचं काहीही घेणं देणं नाही.  हीच परिस्थिती आज आणि पूर्वीही दिसते आहे नाही का?  शासन कोणतेही असो  तुमच्या बाजूने लढणारे फक्त  तुमचे चार पाच जण असतात जे खरे मनापासूनचे हितचिंतक आणि मित्र असतात.  तेच फक्त तुम्हाला मदत करतील. पण लढणारे फक्त तुम्ही आहात.  त्यामुळे सर्वोच्च शासकाने कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार केला असला तरी  प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. ती लढाई लढण्यासाठी अंधश्रद्धांची झापडे आणि परंपरांच्या कुबड्या उपयोगाच्या नाहीत.  

सकारात्मक विचार, जपलेली नाती आणि आयुष्यासाठी लढण्याची जिद्द हीच फक्त उपयोगाची आहे. मला वाटते हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अनुभवत आहोत.  म्हणून हा आजच्या काळातील जगण्याचा महत्त्वाचा विचार आहे असे मला वाटते. 

… राम-कृष्ण चरित्रातून अजूनही बरेच विचार आपल्याला जगण्यामध्ये समजून घ्यावे लागतील. 

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्री… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ मैत्री… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

मैत्री मैत्री मैत्री,

काय असते ही मैत्री ? .. नातं कोणतं हे?

नात्याच्या पार पल्याड काहीतरी…. जिवलग, सखी, मैत्रीण, मित्र …. हीच खरी मैत्री. 

 

या मनीचं त्या मनाला सहज, चटकन, उमगतं, भावतं .. ही मैत्री. 

शब्दांच्या पलीकडील उमगतं ..  ही मैत्री….. डोळ्यातून कळतं ही मैत्री. 

आवाजातून समजतं  ही मैत्री,…. हालचालीतून जाणवतं ही मैत्री. 

… मनाच्या गाभाऱ्यात घट्ट रुतून बसते ही मैत्री,

 

आनंद, दुःख, समाधान, असमाधान, राग, प्रेम,जळफळाट, तडफड.. यातलं काहीही .. 

.. .. व्यक्ततांना आत बाहेर नाही,ही मैत्री,

भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना …. हात देते ही मैत्री,

 

सल्ला, मसलत, मार्गदर्शन करते, ही मैत्री. …

सप्तसुर छेडताना,अलवार मिंड देणारी ही मैत्री,

प्रेम, धमकी, योग्य-अयोग्य हे समजवणारी ही मैत्री,

चूक घडता,सावरायला येणारी ही मैत्री,

मदत मागणारी आणि मदत करणारी…. ही मैत्री.

 

हक्काने रागावणारी, झटकन राग विसरून जाणारी ही मैत्री,

मैत्रीची व्याख्या नाही,

भावभावनांचे रेशीम धागे, म्हणजे मैत्री !

ओढ भेटीची म्हणजे मैत्री ! गुज सांगते,असते मैत्री !!!!

 

आयुष्यात माझिया, मोल तिचे अनमोल,

तारले तिनेच मला, …. या संसार सागरातून… 

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वरकडे जाताना रस्त्यात रश्मी चौक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरचं थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर इंग्रजीमध्ये “मेडस्टोन ” लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.

आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डनमध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.

गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी..  पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा…………

बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लंबिंगचे सामान, रंगाचे सामान, ब्रशेस, स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोठया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार. पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.

पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे, त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपूर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांच्या आईचे चित्रकार एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबलवर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची. त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे.  येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा. 

त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच…डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली… ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी… डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ….ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला

‘ डॉल ‘ म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच ‘ पेस्तन ‘ म्हणे…………

हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक यांची गर्दी होत असे.

माझी आणि त्यांची ओळखही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली 

‘ वेल डन माय बॉय’ !

मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची…….पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत… टिपिकल पारसी टोन…

पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाटमध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो. डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले. 

पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो, कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा.  पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा  ” दुर्मिळ ” मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना 

अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. “तू चांगला ट्राय करते……असाच होते, पन तुला जमेल…….”..मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली ” Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?” मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .. .ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे, रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .

मला चित्रात पाचगणीची थंड हवा, धुके, वारे हे सगळे दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य……….” असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहिजे…….फॉग एकदम पिक्चरमंधी घुसला पाहीजे…….”  सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.

मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . ” तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला ” त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले. 

एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहिली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.

1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो.

कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्गचित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे ……

त्यांनी मला एक कल्पना सांगितली.  मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतु चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र जीवाचे… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ मैत्र जीवाचे… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

तशी मैत्री तर जमते पुष्कळांशी 

पण जीवाचं मैत्र ….. ते जुळत नाही सर्वांशी ….. 

 

हे जीवाचं मैत्र ……. 

    याला ना स्थळकाळाचे .. ना वयाचे बंधन 

           ना कसल्या औपचारिकतेचं कुंपण …… 

    असे ना कुठलीही जातपात 

            त्याने फरकच पडत नाही त्यात …… 

     तो..की.. ती, हा प्रश्नच नसतो मुळात 

            कारण तो उगवतच नाही मनाच्या तळात …… 

     नाही अपेक्षा सततच्या भेटीगाठींची 

            नाही गरज सततच्या संवादाची …… 

      याला लागत नाही कुठलेच 

             व्यावहारिक देणे – घेणे …… 

कारण …… 

       कारण हे तर मनाच्या आत आत …. 

              “ प्रेमळ निरपेक्ष स्नेहाने नटलेले लेणे “ …. 

 

      मी तर सजलेय या लेण्याने …… 

               तू …? ……. 

© सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बार्बी/ BAR- B ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

बार्बी/ BAR- B ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

काल पोरांना हा सिनेमा दाखवायला थेटर वर सोडायला गेलेलो. सिनेमा बघायला आलेले सगळेचजण ‘गुलाबी’ ड्रेसमधे आलेले (  मुलंही याला अपवाद नव्हती)

मजा वाटली या जनरेशनची. पिक्चरच्या थिमला साजेसा पेहराव.

(काही महिन्यांपूर्वी आलेल्या “बाईपण भारी देवा” या सिनेमालाही बायकांचा ग्रुप साधारणपणे सिनेमातील व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने नटून जाताना बघितला )

नाही तर आम्ही.  अनेक सिनेमे तर शाळेच्या खाकी चड्डी,पांढरा शर्टवर पाहिलेत. 

त्यावेळेला असं काही नव्हतं नशीब नाहीतर ‘शहेनशहा’ बघायला हाताला प्लॅस्टर घालून जावं लागलं असतं अन ‘टारझन’ च्या वेळी पानं लावून. 

बार्बीचं गाणं तसं ऐकिवात आहे. त्यातील एकही इंग्रजी  शब्द कळत नाही. आज सहज गुगल वर त्याचे लिरिक्स वाचले. त्यातील एका कडव्यातील  शेवटचे वाक्य  👇

I’m a Barbie girl, in the Barbie world

…….

………..

Imagination, life is your creation

आता या ओळीत जीवन जगण्याचे सार वगैरे दडलेले असेलही पण

 #माझी_टवाळखोरी # चं मर्म तरी दुसरं काय आहे? 

(माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे– ती जास्त रंगते जेव्हा आम्ही  A पेक्षा B साईडला बसतो.  शाळेत ही ‘ब’ तुकडी भारी देवा असं उगाच नाही म्हणायचो आम्ही 😌)

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print