श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वरकडे जाताना रस्त्यात रश्मी चौक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरचं थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर इंग्रजीमध्ये “मेडस्टोन ” लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.

आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डनमध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.

गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी..  पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा…………

बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लंबिंगचे सामान, रंगाचे सामान, ब्रशेस, स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोठया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार. पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.

पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे, त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपूर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांच्या आईचे चित्रकार एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबलवर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची. त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे.  येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा. 

त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच…डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली… ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी… डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ….ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला

‘ डॉल ‘ म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच ‘ पेस्तन ‘ म्हणे…………

हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक यांची गर्दी होत असे.

माझी आणि त्यांची ओळखही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली 

‘ वेल डन माय बॉय’ !

मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची…….पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत… टिपिकल पारसी टोन…

पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाटमध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो. डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले. 

पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो, कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा.  पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा  ” दुर्मिळ ” मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना 

अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. “तू चांगला ट्राय करते……असाच होते, पन तुला जमेल…….”..मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली ” Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?” मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .. .ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे, रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .

मला चित्रात पाचगणीची थंड हवा, धुके, वारे हे सगळे दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य……….” असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहिजे…….फॉग एकदम पिक्चरमंधी घुसला पाहीजे…….”  सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.

मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . ” तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला ” त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले. 

एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहिली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.

1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो.

कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्गचित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे ……

त्यांनी मला एक कल्पना सांगितली.  मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतु चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments