सुश्री प्रभा सोनवणे

कवितेच्या प्रदेशात # 136 
☆ माझी वटपौर्णिमा… ☆
कुणीतरी विचारलं सकाळी
चेष्टेने, “तुमचा हा कितवा जन्म”?
माझाही तोच सूर, “सात पूर्ण झाले,
हा आठवा, म्हणूनच,
नो कमिटमेंट “
वडाला फे-या मी कधीच घातल्या नाहीत!
लग्नानंतर काही वर्षे,
घरातल्या ज्येष्ठ बायका करतात
म्हणून धरला उपवास,
काही वर्षे कुंडीतल्या फांदीची पूजा !
आणि अचानक आलेली जाग,
नारी समता मंचावर आलेली…
तेव्हा पासून सोडून दिलं,
स्वतःच्या नावापुढे सौ.लावणं !
श्रावणात सवाष्ण जेऊ घालणं,
आणि “हळदीकुंकू” करणंही !
मी नाहीच स्वतःला “स्त्रीवादी”
म्हणवण्या इतकी धीट !
पण स्त्रीवादी विचारसरणीचा
पगडा मनावर मूलतःच !
माझी आई नेहमीच
धार्मिक कर्मकांड आणि
व्रतवैकल्यात रमलेली !
पण तिची आई–माझी आजी,
सामाजिक कार्याचं व्रत घेतलेली,
उपास तापास न करणारी !
माणूसपण जपणारी-कर्मयोगिनी !
आयुष्यात भेटलेली पहिली आदर्श स्त्री !
त्यानंतर पुस्तकातून भेटल्या,
“टीन एज” मधे इरावती कर्वे,
छाया दातार, आणि हो…देवयानी चौबळही!
नंतरच्या काळात विद्याताई,
गौरी देशपांडे,अंबिका सरकार,सानिया
आणि मेधा पेठेही!
जगणं स्पष्ट असावं संदिग्ध नको,
हे मनोमन पटलं !
आणि तळ्यात मळ्यात करत,
जगूनही घेतलं मनःपूत!
वटपौर्णिमेलाच कशाला,
नेहमीच म्हणते नव-याला,
“तुमको हमारी उमर लग जाए”
आणि या वानप्रस्थाश्रमात
जाण्याच्या वयात,
व्रत वसा फक्त पर्यावरणवाद्यांचा !
वसुंधरा बचाओ म्हणणा-यांचा,
हवा- पाणी -माती
प्रदुषण मुक्त करण्याचा !
झाडे लावण्याचा !
© प्रभा सोनवणे
१४ जून २०२२
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈