मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंचमी ☆ आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ पंचमी ☆  आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव ☆

सख्या सयांनो चला ग

सख्या सयांनो चला ग

 

पंचमीच्या सणाला

झीम्मा फुगडी खेळायला

हातात बिलवर पाटल्या ग

लेकी सुना नटल्या ग

 

कपाळी कुंकू सजल ग

पायात पैंजण वाजलं ग

झन झन टाळ्या वाजल्या ग

सख्या सया जमल्या ग

 

जरतारी शालू नेसुया

ऊंच झोका चढवूया

दण दण फुगडी फिरवुया

घम घम घागर घुमवूया

 

फेर धरून गावुया

गर गर गिरक्या घेऊया

तालात सुरात गावुया

देवाच दर्शन घेऊया

 

सख्या सयांनो चला ग

सख्या सयांनो चला ग

 

आई बापाची माया आठवूया

माहेरची थोरवी गाऊया

बहीण भावाची सय आली ग

जिवाची घालमेल झाली ग

 

माहेरचा सांगावा आला ग

आनंदी आनंद झाला ग

नाकत नथ बाई सोन्याचा

पती देव माझा गुणाचा

 

पतीच गुणगान गावुया

संसारी सुखान नांदुया

गळ्यात गंठण सजवुया

देव्हारा फुलान भरवुया

 

अंगणी रांगोळी रंगवूया

दारी तोरणं लावूया

श्रावण महिना मोठा ग

सनाला नाही तोटा ग

 

सख्या सयांनो चला ग

सख्या सयांनो चला ग

 

© श्री आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव

सांगली ८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 114 – अंधश्रद्धा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 114 – अंधश्रद्धा ☆

भुलू नका चलाखीला

दांभिकांचा फास न्यारा ।

जादू  टोणा नसे खरा

भावनांचा खेळ सारा।

 

होई नवसाने मूल

उठवली कोणी भूल

द्यावे सोडून अज्ञान

घ्यावी विज्ञान चाहूल ।

 

खाणे कोंबडी बकरी

धर्म नसे माणसांचा।

स्वार्थासाठी नका देऊ

बळी असा निष्पापांचा।

 

देऊनिया नरबळी

कसा पावे वनमाळी ।

वैरभाव साधण्यास

सैतानाची येई हाळी।

 

उगवल्या दिवसाला

कर्तृत्वाने सिद्ध करू।

शुभाशुभ नसे काही

मत्रं नवा मनी स्मरू।

 

परंपरा जुन्या सार्‍या

विज्ञानाची जोड देऊ।

चित्ती डोळस श्रद्धेने

भविष्याचा वेध घेऊ। 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखये, तुझ्या जलाने… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ सखये, तुझ्या जलाने… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : अनलज्वाला) – (मात्रा :८+८+८)

सखये तुझ्या जलाने माझी तृषा शमेना

विस्तारल्या रणाला छाया तुझी पुरेना !

 

वाटेत यात्रिकाच्या किति मंदिरे नी देव

भक्तीस एकनिष्ठा जपणे इथे जमेना !..

 

रणरण रणास भिडती हिमगार मोहवारे

प्राणातला निखारा प्राणास सोसवेना !..

 

एक पाश मोकळा नि आलिंगनी दुजाच्या

ती मुक्तीची पहाट उगवे कधी कळेना !….

 

का व्यथा बोलती या भलतीच आज बोली

दिग्घोष हुंदक्यांचा का मौन ते कळेना !….

 

उत्स्फूर्त जाण सखये अज्ञातवास माझा

सिंहासनास आले वैराग्य का कळेना !..

 

पतनास साक्ष माझ्या उत्थान खुद्द माझे

मरणावरी स्वतःच्या कैसे रडू कळेना !..

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #136 ☆ आठवण श्रावणाची…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 136 – विजय साहित्य ?

☆ आठवण श्रावणाची…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आठवण श्रावणाची 

व्रत वैकल्याचा नारा

सामावल्या अंतर्यामी,

हळवेल्या स्मृती धारा…!

 

आठवण श्रावणाची 

आली माहेरवाशीण

जपलेल्या गंधमाळा,

रेशमाची घट्ट वीण…!

 

आठवण श्रावणाची 

मोहरले तनमन.

बरसल्या जलधारा,

वेचताना  क्षण क्षण…!

 

आठवण श्रावणाची

सजे मंगळा गवर

सय नाजूक साजूक

फुल पत्री शब्द सर…!

 

आठवण श्रावणाची

गौर श्रावणाची सजे

जिवतीचे शुक्रवार

औक्षणात मन भिजे…!

 

आठवण श्रावणाची

जणू कवितेचे पान

सणवार   ओली  शाई ,

 देई जीवनाचे  दान…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ 💦 पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 कडाडले मेघ नभी..

 आला काळोख दाटून…

 बिजली ही नृत्य करी..

आसमंत झळाळून…।

 

थेंब थेंब पर्जन्याचा..

हळूच उलगडला…

पावसाच्या लडीतून..

धुवाधार कोसळला…|

 

मेघ आळवी मल्हार..

वारा वाजवी पिपाणी…

पर्जन्य स्वर कानात..

अन् पावसाची गाणी…|

 

 एक चिंब स्वरविश्व ..

उभं केलं पावसानं…

 छान लागलासे सूर..

 हरपले सारे भान…|

 

 मैफिलीला चढे रंग..

डोले भवताल सारा…

 मनमोर अंतरीचा..

 फुलवी सुखे पिसारा…|

💦🌨️.

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #120 – कर्जमाफी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 120 – कर्जमाफी… ☆

बाबा तू जाण्याआधी

एका चिठ्ठीत लिहून

ठेवलं होतंस

मी देवाघरी जातोय म्हणून.. .

पण

आम्हाला असं ..

वा-यावर सोडून

तो देव तरी तुला

त्याच्या घरात घेईल का…?

पण बाबा तू. . .

काळजी करू नकोस

त्या देवाने जरी तुला त्याच्या

घरात नाही घेतलं ना तरी

तू तुझ्या कष्टाने उभ्या केलेल्या

ह्या घरात तू

कधीही येऊ शकतोस

कारण .. . बाबा

आम्हाला कर्ज माफी नकोय

आम्हाला तू हवा हवा आहेस …!

आम्हाला तू हवा हवा आहेस …!

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बालपणाची नाव कागदी… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ बालपणाची नाव कागदी… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

पाऊसधारा ओलावत येती

विस्मरणातील  पायवाट ती 

डोळ्यांपुढती अलगद येती

बालपणाची नाव कागदी

नाव कागदी घडीघडीची

त्यात दडली स्वप्न मनीची

निरागसतेने ती नटलेली

बालपणीची नाव कागदी

घडी घडीतुन स्वप्ने फुलती

आनंदाला नाही गणती

प्रत्येकाच्या मनात वसती

बालपणीची नाव कागदी

मोठे होता विरुन जाती

दूर दूर ती वाहून नेती

भिजून पाण्यामध्ये बुडती

बालपणीची नाव कागदी

पाऊस पडता ओढ लागती

बालपणीची स्वप्ने पडती

पुन्हा नव्याने येते हाती

बालपणीची नाव कागदी

चित्र साभार: सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य सुटत चाललय… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

सौ .कल्पना कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य सुटत चाललय… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

आयुष्य हातातून सुटत चाललय

काहीतरी निसटतय

पण काय ??

तेच समजत नाही..

 

दुरावत चाललेत नाती

अन् पुसट  होतायेत

संस्काराच्या रीतिभाती..

 

टू बी एच के च्या जंगलात

अंगण हरवत चाललय

आजीआजोबा कधीच गेलेत वृद्धाश्रमात

आता मूल ही अकॅडमी ला जुंपलय..

 

आईपण हरवलय किटी पार्टीत

अन् बाबा अडकलेत ऑफिसमध्ये

आईबाबा असूनही पोरक पोर मात्र

शोधतोय जिव्हाळा मोबाईल मध्ये..

 

आयुष्य हातातून सुटत चाललय

खूप काही निसटत चाललय..

 

सांजवेळी  दिव्यापुढची

शुभं करोति विरून गेलीय

दिवाळीच्या अभ्यगस्नानाची

वेळ आता टळून गेलीय..

 

लाखो रुपयांच्या घरात आता

प्राण्यांसाठी स्पेशल रूम आहे

शो पीस ची सुंदर थीम आहे

घरातले असतात दिवसभर बाहेर

घरसुध्दा  आता बैचेन आहे..

 

आयुष्य हातातून सुटत चाललय

काहीतरी निसटत चाललय..

फसव्या फ्रेंडशिप साठी

खरं मैत्र दुरावत चाललय ..

 

हसणे हरवण्याआधी

माणसे दुरावण्याआधी

श्वास थांबण्या आधी

बघा पकडता आली तर

आपूलकीची नाती..

अश्रू पुसण्यासाठी

तुमच्याजवळ असणारे हात..

 

वेळ निघून गेल्यावर

आलाप करण्याला

 काय अर्थ??..

💞 मनकल्प 💞

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 144 ☆ श्रावण- अष्टाक्षरी चारोळ्या भाग -१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 144 ?

☆ श्रावण- अष्टाक्षरी चारोळ्या भाग -१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आई वाही शिवामूठ

आई बिल्वपत्र वाही

 गुंफूनिया गुलबक्षी

वेणी पार्वतीला देई

“बुधं त्वं बुद्धीजनको”

मंत्र जपू श्रावणात

बुद्धी दागिनाच मोठा

इथे तिथे त्रैलोक्यात

श्रावणात प्राजक्ताचा

सडा अंगणात पडे

शुभ्र केशरी रंगाचे

खूळ जीवाला गं जडे

माझ्या मनीचा श्रावण

आता दिसतच नाही

आईआजीच्या काळात

मन रेंगाळत राही

आला हिरवा श्रावण

वसुंधरा सुखावली

रिमझिम पावसात

तरंगिणी खळाळली

   बाळकृष्ण तो जन्माला

श्रावणात अष्टमीला

कृष्णपक्ष,काळी रात्र

सौदामिनी सोबतीला

माझ्या श्रावणसरींनो

येऊ नका रपारपा

हलकेच बरसून

माझ्या जाईजुई जपा

दहीहंडी फोडू आता

करू कृष्णाचा जागर

देवा यशोदेच्या कान्हा

भरो माझीही घागर

माझा श्रावण महिना

मला शाळेमधे नेतो

मेंदी भरल्या हातांनी

नवा धडा शिकवतो

आता श्रावणाचे गीत

कसे गाऊ सये बाई

माझ्या हातामध्ये आता

तुझा मऊ हात नाही

तनामनात श्रावण

असा भिनलेला आहे,

तुझ्या नसण्याचे दुःख

सखे सलतच राहे

      पुन्हा श्रावणात भेटू

असं आहे ठरलेलं

इंद्रधनुच्या रंगात

मन चिंब भिजलेलं

तुझा श्रावण असावा

हिर्वाकंच मोरपंखी

आणि अर्थ जगण्याचे

सोनसळी राजवर्खी

रिमझमतो पाऊस

क्षणी हळदुले उन्ह

लपंडावाच्या खेळात 

किती हर्षले हे मन

आता उद्याचा श्रावण

तुझ्या ओटीत घालते

सखे, सूनबाई माझ्या

जुना वसा तुला देते

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रुसले ऋतू ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ रुसले ऋतू… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

उठ मानवा उठ तुझ्यावर रुसून बसला ऋतू

पहा आठवून अशी कोणती केलीस आगळीक तू

 

कळ्या फुलांची मधुर फळांची केली तुजवर वर्षा

दंडित मंडित केलीस सृष्टी काय तुझी ही तृषा

 

इर्षा होती तुझ्या मनासी

सृष्टीला या करू गुलाम

गगनाला ही लगाम घालू

करतील तारे तुला सलाम

 

का नियतीला दावितोस तू विज्ञानाचा ताठा

तव गर्वाने विराण झाल्या हिरव्या पाऊल वाटा

 

गर्जतील ना मेघ नभातून

नृत्य ना करतील मोर वनातून

शेतमळे ना पिकतील आता

उतरलास तू सृष्टीच्या मनातून

 

झटपट श्रीमंती सुखसोयी म्हणजे नोहे खरा विकास

हव्यासाच्या पाईच तुझिया वसुंधरा जाहली भकास

 

जे देवाने दिले भरभरून त्याचा नीट करी सांभाळ

विनम्र हो तू नियती पुढती सौख्याचा होईल सुकाळ

 

सगळे काही मानवनिर्मित

दे सोडून ही दर्पोक्ती

या गगनातून आनंदाचे मेघ बरसतील तुज वरती

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares