मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिरंगा आमुचा प्राण… ☆ सौ. विद्या पराडकर

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तिरंगा आमुचा प्राण… 🇮🇳  ☆ सौ. विद्या पराडकर ☆

(भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो 💐 स्वातंत्र्याच्या निर्मात्यांना लाख प्रणाम)

दिडशे वर्षांच्या पारतंत्र्याची

जाऊनी रजनी गुलामीची

पुजन करू या प्राचीचे

स्वातंत्र्याच्या उष:कालाचे

 

उंच अंबरी, फडकत राही

तिरंगा आमुचा प्राण

या प्राणाला जपून ठेवू

स्वातंत्र्याची शान

 

तीन रंगाचा सुरेख संगम

अशोकचक्र शोभे अनुपम

सांगे उज्वल इतिहास भारताचा

भाग्यशाली भारत मातेचा

 

मूल्यवान हा तेजस्वी

मूल्य अमोल असे

देशभक्तांच्या असीम भक्तीचे

तेजस्वी द्योतक कसे

 

हे भारत मातेच्या शिरोमणी

स्वातंत्र्याचा कंठ मणी

राहो चिरंतन ही

आस असे मनोमनी

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घर कसं असावं? ☆ रमण रणदिवे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ घर कसं असावं? ☆ रमण रणदिवे ☆

केवळ अपुल्या स्वार्थासाठी

कलह नसावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

येणार्‍याला पाणी द्यावे

स्वागतातही गोडि हवी

जाणार्‍याच्या मनांत फिरुनी

येण्यासाठी ओढ हवी

ऐसा प्रेमळ माणुसकीचा

झरा वहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

भांड्याला लागतेच भांडे

विसरुन जावे क्षणामधे

परस्परांना समजुन घ्यावे

अढी नसावी मनांमधे

रुसवे फुगवे नको फुकाचे

मोद रहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

नित्य काळजी घरात घ्यावी

वय झालेल्या पानांची

ज्याची त्याला द्यावी जागा

वयाप्रमाणे मानाची

एकमताने निर्णय घ्यावे

नको दुरावा मनामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ परसदारची सकाळ ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? परसदारची सकाळ ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

अशी सकाळ गावाकडची

आहे का कधी पाहिली ?

याच जागी सकाळपासून 

राबत असे घरची माऊली !

पडे हिरव्या पाना वेली मधुनी

सडा सूर्य किरणांचा सोनेरी,

मातीच्या धगधगत्या चुलीवर

रटरटते गुरगुट्याची न्याहरी !

छायाचित्र  – प्रकाश चितळे, ठाणे.

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गौरवकाव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गौरवकाव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

हे गीत जीवनाचे

देशभक्ती ऋणांचे

हा जन्म भूमीतला

नाते सद्गुणांचे.

 

शहिद जीव होतो

बहाल देशासाठी

स्वातंत्र्य मानवी

मानवता ललाटी.

 

गगनात लहरे

तिरंगा अभिमानी

समुद्र-पर्वत हे

गातील राष्ट्रगाणी.

 

समता विश्वतारा

जणू सूर्य प्रभात

ख्याती ती संस्काराची

गीता-रामायणात.

 

भारतमाता वदे

अमर पुत्र वाणी

युध्द भेदूनी सत्य

गौरव सन्मानांनी.

 

शब्दमालांचा हार

चरणी या अर्पण

संस्कृती युगेयुगे

लोकशाही दर्पण.

 

शपथ या पिढीला

ईतिहास महान

वीरांची त्या आहुती

ज्ञानसमृध्दी प्राण.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 115 – विद्याधन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 115 – विद्याधन ☆

जगी तरण्या साधन

असे एक विद्याधन।

कण कण जमवू या

अहंकार समर्पण।

 

सारे सोडून विकार

करू गुरूचा आदर।

सान थोर चराचर

रूपं गुरूचे सादर ।

 

चिकाटीने धावे गाडी

आळसाची  कुरघोडी।

बरी नसे मनी अढी

ठेवू जिभेवर गोडी।

 

धरू ज्ञानीयांचा संग

सारे होऊन निःसंग।

दंग चिंतन मननी

भरू जीवनात रंग।

 

ग्रंथ भांडार आपार

लुटू ज्ञानाचे कोठार।

चर्चा संवाद घडता

मिळे संस्कार भांडार।

 

वृद्धी होईल वाटता

अशी ज्ञानाची शिदोरी।

नका लपवू हो विद्या

वृत्ती असे ही अघोरी।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #137 ☆ श्रावण साकव…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 137 – विजय साहित्य ?

☆ श्रावण साकव…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

झुले पंचमीचा झुला

श्रावणाची घाली साद

लेक  आली माहेराला

सृजनाचे पडसाद …१

 

सणवार नेम धर्म

सातवार सणवार

सडा रांगोळीचा थाट

कुळधर्म कुलाचार …२

 

श्रावणाचे सारामृत

नाग पंचमीचा सण

हळवेल्या आठवात

हिंदोळ्यात झुले क्षण…३

 

वसुंधरा धरी फेर

झिम्मा फुगडीचा खेळ

आली गौराई  अंगणी

जीव शीव ताळमेळ….४

 

ब्रम्ह, कृष्ण कमळाचा

श्रावणात दरवळ

रंग गंधात नाहला

अंतरीचा परीमळ….५

 

न्यारा श्रावण श्रृंगार

नथ, पैठणीचा साज

सालंकृत अलंकार

भवसागराची गाज…६

 

सातवार सातसण

आली नारळी पुनव

रक्षा बंधनी गुंतला

न्यारा श्रावण साकव   …७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती इरावती कर्वे यांचा आज स्मृतिदिन.  (१५/१२/१९०५ — ११/८/१९७०) 

मानववंशशास्त्र , समाजशास्त्र , आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वे, या उच्चशिक्षित होत्या. त्यांनी “ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण “ हा विषय घेऊन एम.ए. केलं होतं , तर  “ मनुष्याच्या कवटीची नेहेमीची असमप्रमाणता “ या एका वेगळ्याच विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची पी.एच.डी. मिळवली होती. मराठीबरोबरच संस्कृत आणि इंग्लिश भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात कुलसचिव म्हणून कार्यरत होत्या. लंडन विद्यापीठातही त्यांनी ‘ व्याख्याती ‘ म्हणून एक वर्ष काम केले होते. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये मानववंशशास्त्राच्या प्रपाठक म्हणून त्या रुजू झाल्या. तिथेच त्यांनी पुरातत्वविद्येतील आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला. श्री. सांकलिया यांच्यासह त्यांनी गुजरातमधील लांघजण या मध्यअश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले असता तिथे मानवी अवशेष सापडल्याने त्यांचे हे संशोधन कार्य मोलाचे ठरले.  

निरीश्वरवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी असणाऱ्या या लेखिकेचा, भारतीय संस्कृती, आणि त्यातही मराठी संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयावर मराठीबरोबरच त्यांनी इंग्लिश भाषेतूनही लेखन केले. त्यांनी वैचारिक ग्रंथ तर लिहिलेच, पण ललित लेखनही केले.

इरावती कर्वे यांचे प्रकाशित साहित्य :   

१) “ युगान्त “ हा महाभारतावरील समीक्षा ग्रंथ. या ग्रंथाला १९७२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार, आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता. 

२) समाजशास्त्रीय ग्रंथ —आमची संस्कृती / धर्म-पुस्तक / मराठी लोकांची संस्कृती / महाराष्ट्र: एक अभ्यास  /  संस्कृती ( पुस्तक ) / हिंदू समाज – एक अन्वयार्थ / हिंदूंची समाजरचना. 

३)  इंग्लिशमध्ये लिहिलेले १२ वैचारिक ग्रंथ. 

४) ललित लेखसंग्रह —- गंगाजल / परिपूर्ती / भोवरा .—- यापैकी ‘ गंगाजल ‘ च्या ५ आवृत्त्या, आणि ‘ भोवरा ‘ च्या ६ आवृत्त्या निघाल्या होत्या. यावरून त्यांच्या ललित लेखनाचे वेगळेपण दिसून येते.  

“जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे, आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे, असे दुहेरी यश त्यांना लाभले होते ,” असे गौरवोद्गार त्यांच्याविषयी श्री. आनंद यादव यांनी काढले आहेत. तर प्रा. नरहर कुरुंदकर यांनी त्यांना  “ नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत “ असे गौरविले आहे. 

त्यांच्या स्वतःच्या इतक्या मोठ्या कार्यकर्तृत्वामुळे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सूनबाई, आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्या सुविद्य पत्नी, अशी त्यांची महत्वाची ओळख सर्वात आधी सांगावी हे लक्षातच येत नाही. 

श्रीमती इरावती कर्वे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रक्षाबंधन…☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ रक्षाबंधन… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆ 

*

प्रेमळ, सद्गुणी माझे गं भाऊ

नेत्रनिरांजने त्यांचं औक्षण करू

*

जगन्मित्र, उद्योगी, अन्  कार्यतत्पर  

उभे  सदा राहती पाठिशी  खंबीर

*

आपापल्या क्षेत्रात भारी निपुण

छंदात लाभो त्यांना नवं संजीवन

*

निरामय आरोग्य दीर्घायुष्य लाभावे.

बहिणींना भावांचे प्रेम उदंड मिळावे …

*

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #121 – पाऊस… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 121 – पाऊस… ☆

तुझ्या माझ्यातला पाऊस

आता पहिल्यासारखा

राहिला नाही..

तुझ्या सोबत जसा

पावसात भिजायचो ना

तसं पावसात भिजण होत नाही

आता फक्त मी पाऊस

नजरेत साठवतो…

आणि तो ही

तुझी आठवण आली की

आपसुकच गालावर ओघळतो..

तुझं ही काहीसं

असंच होत असेल

खात्री आहे मला

तुझ्याही गालावर नकळत

का होईना

पाऊस ओघळत असेल…!

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गान मैफिल..सप्तक ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ गान मैफिल..सप्तक ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

असे सूर जुळले

दरबारी सात

तृप्तता येई

अंतरात

ऐकता

शब्द

जे.

 

असे सूर जुळले

रुजले मनात

अजरामर

रचनेत

भावार्थ

थोर

तो.

 

असे सूर जुळले

रसिक रंगले

आळवण्यात

हरपले

भाग्याचे,

क्षण

ते.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares