श्री तुकाराम दादा पाटील

कवितेचा उत्सव 
☆ नाते… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
नाते सुरेख होते तोडून काय केले ?
संसार वेगळाले थाटून काय केले ?
धरल्या चुकून वाटा गेला निघून कोठे
उपरी घरे कुणाची जोडून काय केले?
आता गटातटाना आलाय ऊत भारी
वेशीत लक्तराना टांगून काय केले?
नुसतेच बंड झाले झाला विकास नाही
जाती निहाय किल्ले बांधून काय केले ?
सत्तांध लालसांचे थैमान खूप झाले
बागी बनवून तुम्ही भांडून काय केले ?
जनता पिचून गेली जगणे महाग झाले
गावास शांत साध्या जाळून काय केले ?
बदनाम कोण होते कळले कुठे कुणाला
संकेत चौकशीचे पाळून काय केले ?
उरला कुठे जिव्हाळा माया मरून गेली
जनतेस सौख द्याया शोधून काय केले ?
नीती कुठे पळाली संस्कार व्यर्थ झाले
असली परंपरांना तोडून काय केले?
बदलून वेशभूषा गुपचूप भेटताना
भेटून एकमेका झाकून काय केले?
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈