श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ कविते !… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(वृत्त :आनंदकंद – (गागाल गालगागा गागाल गालगागा))

कविते ! तुझीच बाधा, आजन्म भोवणार

वणव्यात चांदण्याची, मी गोष्ट सांगणार —

 

ना बाण कागदी हे, रक्ताक्षरे उरीची

गंगौघ आसवांचा, गंगेत नाहणार —

 

आयुष्य श्रावणी हे, उन पावसात चिंब

सतरंग जीवनाचे, रसिकांस दावणार —

 

कबरीत काळजाच्या, दफने किती करावी

दूभंग या  धरेला, आकाश सांधणार —

 

गंधाळतील दुःखे, झंकारतील सूर

टाहोत मैफिलीच्या, संगीत छेडणार —

 

नगरी अमानुषांची, होणार छिन्नभिन्न

योद्धेच शब्द आता, रणशिंग फुंकणार —

 

कोणी नसेल संगे, माझ्यात मी असेन

तूझ्याच विश्वरूपा, माझ्यात पाहणार —

 

माझाच ध्रूव जेव्हा, अढळातुनी ढळेल

खेचून मी स्वतःला,चौकात आणणार !!!!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments