मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लावण्यवती ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ लावण्यवती ☆ सौ.मंजिरी येडूरकर

(गीत प्रकार – लावणी- सवाल – जवाब)

माय मराठी गौरव विशेष स्पर्धेतील उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त  कविता.

प्रश्न – ऐका,

मराठी मायेचं कवतिक करशी, कूळ, मूळ मग सांग तिचं,

कुण्या देशीची, कुण्या वेशीची, काय ठावं या बोलीचं? ग ग ग ग

 

उत्तर –

संस्कृत आहे मूळ तिचं पण, कुळे असती अनेक गं,

म्हाईभटाचं,ज्ञानेशाचं, विनायकाचं अन् कितीक गं, ग ग ग ग

 

कधी वऱ्हाडी, मालवणी कधी,आगरी अन् अहिराणी गं,

तंजावर अन्  झाडी बोली, कधी रांगडी कधी लोणी गं, ग ग ग ग

 

प्रश्न –

कितीक भाषा भारतीयांच्या, श्रेष्ठ ठरे मग कशी ग ती?

सांग पटदिशी ठरो न अथवा, समद्यामंदी कनिष्ठ ती, ग ग ग ग

 

उत्तर –

अभंग, ओव्या, भारुड, लावणी,

कधी फटका, कधी पवाडं गं,

कधी विडंबन,भावगीत कधी, शायरीचं ना वावडं गं, ग ग ग ग

 

कथांचे तर प्रकार किती ते, नीतिकथा, विज्ञान कथा,

वैचारिक अन् अध्यात्मिकही, ललित, विनोदी आणि व्यथा, ग ग ग ग

 

अलंकार किती या भाषेचे, जरा मोजूनी पहा तरी,

एक जन्म ना पुरेल तुजला, फिरुनि येशील भूमीवरी, ग ग ग ग

 

काळासोबत बदलत असते, जरा कधी ना हिला शिवे,

सोळा स्वर मूळ चाळीस व्यंजन, दोन स्वरादी, स्वर दोन नवे, ग ग ग ग

 

एक शब्द घे नमुन्यादाखल, अनेक असती अर्थ इथे,

शब्द किती अन् अर्थ  एकचि, वळेल बोबडी तुझी तिथे, ग ग ग ग

 

नको विचारू पुन्हा प्रश्न हे, मापे सौंदर्या नसती,

कितीक सांगू सारस्वत ते, मुकुटी तियेच्या विराजती, ग ग ग ग

 

माय मराठी अमर असे गं, गुण गौरव ते वाढवती,

नव्या दमाचे, नव्या स्फूर्तीचे, नवे हिरे बघ लखलखती, ग ग ग ग

 

प्रश्नकर्ती-

हरले बाई तुझ्यापुढं मी, बोलती माझी अडली गं,

माय मराठी माझी देखिल, आतापासूनि लाडली गं, ग ग ग ग

 

चला सख्यांनो, करू आरती, माय मराठी भाषेची,

वाजव पेंद्या झांजा तू अन्, जय बोला मराठीची! जी जी र जी, जी  जी र जी,जी जी जी….

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 213 ☆ क्रांतीज्योतीची गौरवगाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 213 – विजय साहित्य ?

क्रांतीज्योतीची गौरवगाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

समाज नारी साक्षर करण्या

झटली माता साऊ रे .

क्रांतीज्योतीची गौरवगाथा

खुल्या दिलाने गाऊ रे . . . !

*

सक्षम व्हावी, अबला नारी

म्हणून झिजली साऊ रे

ज्योतिबाची समता यात्रा

पैलतीराला नेऊ रे . . . . !

*

कर्मठतेचे बंधन तोडून

शिकली माता साऊ रे

शिक्षण, समता, आणि बंधुता

मोल तयाचे जाणू रे. . . . !

*

कधी आंदोलन, कधी प्रबोधन

काव्यफुलांची गाथा रे

गृहिणी मधली तिची लेखणी

वसा क्रांतीचा घेऊ रे. . . . !

*

दीन दलितांसाठी जगली

यशवंतांची आऊ रे

दुष्काळात धावून गेली

हाती घेऊन खाऊ रे . . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(गागागागा गागागागा गागागागा)

रोजच घेते आव्हाने ती बाई असते

कारुण्याचा जी पान्हा ती आई असते

*

जाता रोजी रोटी साठी कामा कोणी

पोरांना जी वाढवते ती दाई असते

*

बघता हर नर वाटे तिजला दादा भाई

वाटो अपुली ताई वा ती माई असते

*

करते कामे सारी श्रद्धा नी सबुरीने

संघर्षाला फळ मिळते ती साई असते

*

दिनचर्या मग होते व्याघ्रा मागे घेउन

तारेवरची कसरत नी ती घाई असते

*

असती नाना ढंगी नाना रंगी रूपे

वज्रासम तर केव्हा मउ ती जाई असते

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “अलिप्त…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “अलिप्त…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जगाच्याही पलीकडे जावून पहावं

अलिप्त इतकं कधीतरी रहावं

आपलं आपलं म्हणून जवळ केलेलं सारं

काही काळ दूर लोटून जगावं ….

 

फक्त ” मी” च असतो खरा

तरीही मीपणा नाही बरा

त्या “मी” लाच वेळ द्या जरा

आवरून घ्या माझेपणाचा पसारा ….

 

जग…. खरे ?खोटे?

राहू दे सारे आपल्यापुरते

जगापुढे सिद्ध करण्याची गरज ना उरते

जेव्हा आपली आपल्याला किंमत कळते….

 

जगाचा चष्मा खूप खूप मोठा

त्यातून दिसतो आपण कण छोटा

चष्म्यातून त्या पाहता पाहता

जीव थकून जातो इवला इवला….

 

आपल्याच चष्म्यातून जग पाहू थोडे

काय आणि कसे घडते इकडे

इवल्याशा नजरेतून पाहू जग विशाल

स्वतः सोबत जगता येईल मग आनंदी खुशाल….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नारी-दिन शुभेच्छा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नारी-दिन शुभेच्छा?  सुश्री वर्षा बालगोपाल 

वर शक्तीचा तुला लाभलेला

संयम जन्मजात  जडलेला

वर घरकाम संस्कार सांगे

उंबरठ्यात पाय अडलेला ॥

*

कर जणू सासरचा देतसे

सकलांसाठी अशी झटतसे

कर कामे तुझी श्रद्धा निष्ठेने

बदल्यात काही ना मागतसे॥

*

दर दिवशी रहाटगाडगे

युगानुयुगे गती घेत आहे

दर कसा बघ आता जगती

तुझा आपसूक वधारताहे॥

*

सर कामाची पुरुषांसोबत

आता सर्वत्र बरसत आहे

सर कर्तृत्वाचा तुझ्याच कंठी

अनमोल रत्नांनी रुळताहे॥

*

कळ कोणतीही नको सहाया

असे जगताची आज ही ईच्छा

कळ तुझ्या हाती पूर्ण जगाची

देती तुला नारी दिन शुभेच्छा॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 221 ☆ फुलवात ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 221 ?

फुलवात ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

जेव्हा केव्हा आठवते मी

माझ्या कवितेचा उगम

तेव्हा मला आठवतो,

काॅलेज मधला प्रवेश –

कुणीतरी दिलेली

गावठी गुलाबाची फुलं,

सुगंधी असूनही

मी फेकून दिलेली!

रोझ डे वगैरे

तेव्हा नव्हता साजरा होत !

पण नव्हतं आवडलं,

कुणीही असं व्यक्त होणं!

मग त्यानं एक दिवस,

ग्रंथालयात गाठलं,

कुसुमानिल नावाचं

पुस्तक हाती दिलं!

“हे वाचलं की कळेल,

प्लॅटोनिक लव,

घेता येईल पत्रांमधून वाङमयाची चव!”

 असं काहीसं म्हणाला.

फुलासारखं पुस्तक तेव्हा

नाकारता नाही आलं,

कवितेशी तेव्हाच तिथं

मग नातं जुळलं!

‘अनिल’ वाचले ,वाचले ‘बी’

वाचले भा.रा.तांबे

बालकवी,बोरकर आणि पद्या गोळे!

चाफ्याच्या झाडाशीही

तेव्हाच झाली मैत्री,

कवितेनंच जागवल्या मग

कितीतरी रात्री!

दरवळू लागल्या,

माझ्याही मनात काही ओळी,

चारदोन बाळबोध कविता

लिहिल्या त्या काळी!

ज्यानं देऊ केली फुलं,

अथवा भेटवली कविता,

तो नव्हता माझा मित्र

किंवा नव्हता शत्रू !

कवितेच्या प्रवासातला

तो एक वाटसरू !

हळव्या हायकू सारखे होते

काॅलेजचे दिवस,

त्याच हळव्या दिवसातला

हा कवितेचा ध्यास!

जेव्हा केव्हा आठवते मला

माझ्या कवितेची सुरुवात ,

मंदपणे जळत असते

मनात एक फुलवात!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

घेतलास तू निरोप आमचा,

अकालीच जाणे तुझे वाटे !

ठाव मनाचा घेता घेता ,

आठवणींचे मोहोळ मनी उठे!..१

 

बालरूप ते तुझे आगळे,

सुंदर ,कोमल रूप होते !

तारुण्य तुझे उठून दिसले,

शांत, सद्गुणी तेज होते !…२

 

आयुष्याच्या त्या वाटेवर,

होती साधी सरळ चाल ती!

वाट अवघड वळणावळणाची,

कधी सुरू झाली कळली नव्हती !.३

 

जाणीव झाली क्षणभंगुरतेची,

जेव्हा कळली आजाराची व्याप्ती!

निरोपास त्या सामोरे जाण्या ,

ईश्वराकडे मागितली शक्ती !..४

 

संचित अपुले, भोग ही अपुले,

आपले जगणे ,आपले मरणे!

निरोप घेता मनात येते,

असे कसे हे जगणे मरणे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निःस्वार्थी मरण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

निःस्वार्थी मरण ☆ श्रीशैल चौगुले ☆

मी संपताना नव्हते जवळ कुणी

जे होते कुणी पाहिले प्राण जाणूनी.

*

हेवा कधीच नव्हता केला कुणाचा

सेवा केली जितुकी आपुले मानूनी.

*

कौतुके फुलांची श्रध्दांजली तयांची

स्वीकार आत्मऋणे आशेत सगुणी.

*

मी संपताना जिव्हाळे बाकी जपले

आक्रोश खरा कि खोटा दुःख आणूनी.

*

डोळ्यात पाणी कुणाच्या, कुणा कोरडे

जन्मास या अर्पीले कर्म मृत्यू मानूनी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #228 ☆ भूमिका* अनलज्वाला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 228 ?

भूमिका* अनलज्वाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सर्व निजानिज झाल्यानंतर निजते बाई

सूर्य उगवण्या आधी रोजच उठते बाई

*

चारित्र्याला स्वच्छ ठेवण्या झटते कायम

कपड्यांसोबत आयुष्याला पिळते बाई

*

चूल तव्यासह भातुकलीचा खेळ मांडते

भाकर नंतर त्याच्या आधी जळते बाई

*

ज्या कामाला किंमत नाही का ते करते ?

जो तो म्हणतो रिकामीच तर असते बाई

*

सासू झाली टोक सुईचे नवरा सरपण

रक्त, जाळ अन् छळवादाने पिचते बाई

*

तिलाच कळते कसे करावे गोड कारले

कारल्यातला कडूपणाही गिळते बाई

*

पत्नी, मुलगी, बहीण, माता, सून, भावजय

एकावेळी किती भूमिका करते बाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अध्यात्माचे शाश्वत धन ! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– अध्यात्माचे शाश्वत धन ! – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

शेगाव ग्रामे , 

प्रकट झाले श्री गजानन !

अवलिया असा,

अध्यात्माचे शाश्वत धन ! 

*

उष्ट्या पत्रावळी ,

आनंदे अन्न सेवन !

योगियाचे झाले , 

जगा प्रथम दर्शन !

*

गजानन महाराजांनी ,

केल्या लीला अगाध  !

धावून भक्तांच्या हाकेला, 

कृपेचा दिला प्रसाद  !

*

झुणका भाकरी नैवैद्य, 

महाराजांना तो प्रिय !

चिलीम घेतली हाती,

भाव भक्ताचा वंदनीय!

*

गण गण गणात बोते,

ध्यान मंत्र मुखी सदा!

सरतील संसारी दु:खे,

टळतील सर्व आपदा!

*

शेगावी दर्शना जावे,

करावे तेथे पारायण!

एक चित्ती ध्यान करावे,

प्रसन्न होईल नारायण!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print