ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २६ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

नोबेल पुरस्कार : आल्फ्रेड बनार्ड नोबेल हे स्वीडिश  रसायन शास्रज्ञ होते. डायनामाईट या जगप्रसिद्ध विस्फोटकाचा शोध त्यांनी लावला. या शोधामुळे त्यांना अमाप संपत्ती मिळाली, परंतु आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या मृत्यूला आपण करणीभूत झालो, ही गोष्ट त्यांना सलत होती. म्हणून त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये, स्वत: मिळवलेल्या या अमाप संपत्तीमधील मोठा वाटा  नोबेल पुरस्कार देण्यासाठी म्हणून वापरला जावा, अशी तरतूद केली. त्यांच्या या इच्छेनुसार आल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनापासून म्हणजेच १०डिसेंबर १९०१ पासून रसायनशास्त्र,  साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र, किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये, संपूर्ण विश्वात अतुलनीय कामगिरी करणार्‍या संशोधक व शांतीदूताला पारितोषिक म्हणून हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

रवींद्रनाथ टागोर – ( ७ मे १८६१- ७ ऑगस्ट १९४१)   भारतामध्ये हा पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीला सन १९१३ साली मिळाला. ते कवी, कथाकार, नाटककार, संगीतकार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञ   होते. रवींद्र संगीत म्हणून संगीताची नवी धारा त्यांनी प्रवाहीत केली. त्यांचे वैचारिक आणि ललित लेखनही आहे. घर और बाहर, कबुलीवला, द गार्डनर, स्ट्रे बर्ड्स, द गोल्डन बोट, द पोस्ट ऑफिस इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. कबुलीवला, पोस्ट ऑफिस इ. त्यांच्या पुस्तकांवर चित्रपटही निघाले.

त्यांना १९१५ मध्ये किंग जॉर्ज पंचम यांनी नाईटहूड ही पदवी दिली होती. ती त्यांनी ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. 

सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल –(१७ऑगस्ट – २०१८) व्ही. एस. नायपॉल म्हणून त्यांची विश्वात ओळख आहे. नोबेल परितोषिक मिळवणारे हे भारतीय वंशाचे पण लंडनमध्ये वास्तव्य करणारे साहित्यिक। त्यांना साहित्यासाठी २००१ मधे नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. त्यापैकी ‘ए हाऊस ऑफ मि.विश्वास’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय त्यांनी, ए बेंड इन द रिव्हर, इन ए फ्री स्ट्रीट, अ वे इन द वर्ल्ड, मॅजिक सीडस इ. कादंबर्‍या लिहिल्या. या व्यतिरिक्त अन्य अनेक विषयांवरची त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी भारताचा इतिहास, सस्कृती, सभ्यता यावर ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ आणि ‘अ वुंडेड सिव्हीलयझेशन’ ही पुस्तके लिहिली.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २५ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

अरुण म्हात्रे ( २५ ऑक्टोबर १९५४ )

 हे उत्तम कवी, गीतकार आणि निवेदक आहेत. ते प्रामुख्याने गेय कविता लिहितात. प्रेमातील आर्तता, विव्हलता, अगतिकता अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपल्या कवितातून मांडली आहे. ‘उंच माझा झोका’ या दूरचित्रवाणीवरील शीर्षक गीत त्यांचे आहे.

 ‘मानतो कागदाला, मानतो लेखणीला

कळे शब्दात अंतीम असे, नसतेच काही ‘

असे म्हणणारी त्यांची कविता उपजतच छान लय घेऊन येते. कविता लोकांपर्यंत पोचावी. त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, या हेतूने म्हात्रे यांनी आपल्या सहा कविमित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण केले आणि श्रोत्यांना रसिक बनवण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या अशा मैफली अतिशय लोकप्रिय झाल्या.

अरुण म्हात्रे यांनी नाटके दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. उत्तम कवी होण्यासाठी नुसती पुस्तके वाचून चालत नाही. माणसं वाचावी लागतात, असं ते म्हणतात.

त्यांची १. ऋतु शहरातला, २. कोसो मैल दूर आहे चांदणी ३. ते दिवस आता कुठे इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना, बहिणाबाई, वसंती गाडगीळ, स्नेह चषक इ. पुरस्कार मिळाले.. वाचक त्यांच्या नवनवीन कवितांच्या प्रतीक्षेत आहेत, या अपेक्षेसह त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

केशव रंगनाथ शिरवाडकर (१९२६ – २०१८)

हे कुसुमाग्रजांचे चुलत भाऊ. ‘तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज जीवन आणि साहित्य), मर्ढेकरांची कविता (समीक्षा), रंगविश्वातील रसायात्रा , सार गीतरहस्याचे, विचारधारा इ. पुस्तके त्यांनी लिहिली.’आपले विचारविश्व’ हे पुस्तक त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी लिहिले. भारतीय तत्वज्ञानाच्या विचारांच्या संदर्भात जगातील महत्वाच्या तत्वज्ञानाचे यात त्यांनी परिशीलन केले आहे.

रूस्तुम अचलखांब (१९२६ – २०१८)

हे आंबेडकर मराठा विद्यालयात नाट्यशास्त्राचे विभाग प्रमुख होते. लोकनाट्य, तमाशा आणि लोककला यात त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. त्यांनी शाहीरी परंपरा अभ्यासून विस्मृतीत गेलेल्या, साहित्याला मोलाचे योगदान देणार्‍या, व्यक्तींविषयी सशोधन केले.  दुर्लक्षित कलाकार शोधून, ते म्हणत असलेले काव्य, त्यांच्या चाली यांच्या नोंदी केल्या. अनेक संगीत नाटके त्यांनी बसवली. ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ मधे गोंधळ, भारुड, इ. लोककलांच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगितला. अभिनयशास्त्र, तनाशा लोकरंगभूमी, गावकी ( आत्मकथन) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.

पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भारतीय दलित नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २४ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

प्रसिद्ध मराठी कथालेखक श्री.अरविंद विष्णू गोखले यांचा 24 ऑक्टोबर हा स्मृतीदिन(1992). त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. शिक्षण पुणे, मुंबई येथे झाले. एम्. एस्सी.बाॅटनी, तसेच अमेरिकेतील व्हिस्काॅन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्र विद्या अभ्यास पूर्ण करून एम.एस् ही पदवी मिळवली. पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. नंतर त्यानी मुंबईत धरमसी कंपनीत नोकरी केली.

पण हे सर्व करत असताना त्यांचे लेखन व प्रामुख्याने कथा लेखन ही चालू होते. त्यांची पहिली कथा ‘हेअर कटिंग सलून’ वयाच्या सोळाव्या वर्षी प्रसिद्ध झाली. पुढील आयुष्यात त्यांनी 350 हून अधिक कथा लिहील्या. कातरवेळ, मंजुळा, रिक्ता, कॅक्टस, विघ्नहर्ती या त्यांच्या काही गाजलेल्या कथा. त्यांच्या अनेक कथांचे भारतीय व युरोपीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांनीही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद केले आहेत.

त्यांचे काही कथासंग्रह: अक्षता, कथाई,  कथाष्टके, गंधवार्ता, चाहूल, देशांतर, माणूस आणि कळस, अनामिका, मिथिला इ.

कादंबरी: आय.सी. 814, शपथ

आत्मकथन: शुभा

अनुभवकथन: आले पाक

प्रवासवर्णन: अमेरिकेस जाऊन पहावे, असाही पाकिस्तान.

याशिवाय माहितीपर, संपादित कथा, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच काही कथांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अशा या चतुरस्त्र लेखकास स्मृतीदिनानामित्त अभिवादन.

 

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- विकिपीडिआ साभार.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २३ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

आज २३ ऑक्टोबर :

मराठीतील प्रसिद्ध कवयित्री आणि कथालेखिका नीरजा यांचा जन्मदिन. प्रसिद्ध समीक्षक श्री. म. सु. पाटील यांची ही कन्या. पण त्यांनी कवितेची सर्जनशील वाट निवडली, ज्यावरचा त्यांचा प्रवास अतिशय दमदारपणे सुरु आहे. ‘ ग्रंथाली ‘ आणि ‘ सानेगुरुजी ट्रस्ट’ च्या अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या पदाधिकारी आहेत. महाविद्यालयात असतांनाच त्यांनी कविता करायला सुरुवात केली होती. मुंबईत झालेल्या ६० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीरजा यांनी नवोदित कवयित्री म्हणून त्यांची ‘ सावित्री ‘ ही कविता वाचून खूप दाद मिळवली, आणि पुढच्याच वर्षी कविसंमेलनात त्यांना ‘ निमंत्रित ‘ म्हणून बोलावले गेले. पुढे २०१३ साली पुण्यात भरलेल्या ‘ सम्यक साहित्य संमेलनाचे ‘ अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ‘ सकाळ सप्तरंग’ पुरवणीतले त्यांचे ‘ मी कात टाकली ‘ हे सादर खूप लोकप्रिय ठरले. कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेख संग्रह असे त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झालेले आहे. ‘ वेणा ‘ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. नंतर त्यांचे-स्त्रीगणेश, नीरन्वय, निरर्थकाचे पक्षी, असे काव्यसंग्रह, ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसं , असे कथासंग्रह, चिंतनशलाका, बदलत्या चौकटी असे ललितलेख संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एकूणच सगळ्या लेखनातून आधुनिक जीवनाविषयीच्या जाणीवा ठळकपणे व्यक्त होतांना दिसतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांच्यातर्फे ‘ कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्री-प्रतिमा ‘ याविषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते, हे विशेषत्वाने सांगायला हवे. त्यांना अनेक साहित्य-पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. उदा. केशवराव कोठावळे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी ह. स. गोखले पुरस्कार, इंदिरा संत, कवी केशवसुत, पु. भा. भावे यांच्या नावाने दिले जाणारे राज्य पुरस्कार, म . रा. साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार इ. — त्यांची साहित्य संपदा अशीच वृद्धिंगत होत राहो, आणि पुरस्कारांची यादी सतत वाढती राहो या सदिच्छांसह कवयित्री नीरजा यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

आज सुप्रसिद्ध पाक-कला तज्ज्ञ श्रीमती मंगला बर्वे यांचा स्मृतिदिन. मराठीत पाककृतीवरील अनेक पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका म्हणून विशेषतः महिला वर्गात त्या अतिशय सुपरिचित आहेत. . पदार्थांच्या वैचित्र्यपूर्ण पण अतिशय चपखल अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समधून त्यांनी अनेक नवनवीन पाककृती पुस्तकांच्या माध्यमातून गृहिणींपर्यंत पोहोचवल्या. त्यापैकी ‘ अन्नपूर्णा ‘ या पुस्तकाची आता ७७ वी आवृत्ती निघालेली आहे. हे पुस्तक म्हणजे सासरी निघालेल्या मुलींसाठी जणू पाचवा वेदच, असे या पुस्तकाबद्दल गौरवाने म्हटले जाते. त्यांनी अशा विविध पाककृतींची अगदी सविस्तर माहिती देणारी एकूण २६ पुस्तके लिहिली आहेत. यातील काही पुस्तके इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. नेहेमीच्या पदार्थांबरोबरच, ओव्हनमध्ये करता येतील असे पदार्थ, चायनीज पदार्थ, लग्नात केले जाणारे रुखवत, मांसाहारी पदार्थ, साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या याची साद्यन्त माहिती देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. पाककृतींचा नेमकेपणा, त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचे नेमके प्रमाण  हे त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच पदार्थांचे वैशिष्ट्य आहे.

‘लोकरीने विणून केलेली खेळणी ‘ हे एक वेगळ्या विषयावरचे त्यांचे पुस्तकही  प्रसिद्ध आहे.   

पती साहित्यिक अच्युत बर्वे यांच्या कामानिमित्ताने त्या बरेचदा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जात असत. तिथल्या वैविध्यपूर्ण पाककृती पाहून त्यांची जिज्ञासा वाढली. मग तिथल्या आचाऱ्यांकडून त्यांनी वेगवेगळ्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या रेसिपी जाणून घेतल्या, स्वतः करून पाहिल्या, आणि मग मासिकांमधून त्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली, ज्याची पुढे पुस्तके झाली. पाककृतींवरच्या पुस्तकांमध्ये सर्वाधिक खपाचा विक्रम त्यांच्या ‘ अन्नपूर्णा ‘ या पुस्तकाने नोंदलेला आहे. आणि विशेष म्हणजे या एका पुस्तकाच्या रॉयल्टीपोटी मंगलाताईंना तीस लाखांपेक्षाही जास्त पैसे मिळाले , हा साहित्य क्षेत्रातही एक विक्रमच ठरला आहे. 

‘ मंगला बर्वे म्हणजेच अन्नपूर्णा ‘ असे समीकरणच आता झाले आहे. अशा, असंख्य गृहिणींसाठी मार्गदर्शक ठरलेल्या मंगला बर्वे यांना आदराने वंदन. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २२ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

ना. सि. फडके (१८९४ ते १९७८ )

ना. सि. फडके हे दुसर्‍या पिढीतील सुप्रसिद्ध लेखक. ह. ना. आपटे यांच्यापासून आधुनिक मराठी कथेला आणि कादंबरीलाही सुरुवात झाली. त्या दृष्टीने ना. सि. फडके हे दुसर्‍या पिढतील लेखक मानावे लागतील. त्यांच्या कथा- कादंबर्‍या रेखीव आणि तंतत्रशुद्ध आहेत. भाषा ललित मधुर आहे. आकर्षक सुरुवात, कथेच्या मध्ये गुंताऊंट आणि शेवटी उकल आसा त्यांच्या कादंबरीचा साचा ठरलेला आसे. सुरेख शब्दचित्रण, रेखीव व्यक्तिचित्रण , रचनेतील सफाई, कथेमद्धे एखादे नाजुक रहस्य, विसमयाची हुलकावणी, अशी वाशिष्ट्ये त्यांच्या लेखनाची जाणवतात. ते वी.स.खांडेकर यांचे समकालीन. ते कलावादी होते. तर खांडेकर जीवनवादी. कळसाठी कला असे त्यंचे मत होते, तर जीवनासाठी कला असे खांडेकर म्हणात. दोघांचा वाद अनेक दिवस नियतकालिकातून रंगला होता. होता. दोघेही शेवटपर्यंत आपापल्या  भूमिकेवर ठाम होते.

ना. सि. फडके यांच्या अटकेपार, उजाडलं पण सूर्य कुठे? कुलब्याची दांडी, कलंकशोभा इ. ७० कादंबर्‍याआहेत. कलंकशोभा या कादंबरीवर चित्रपटही निघाला होता. धूम्रवलये, गुजागोष्टी, ही त्यांच्या लघुनिबंधाची पुस्तके. प्रतिभासाधन हे त्यांचे वैचारिक पुस्तकही खूप गाजले. त्यांच्या काही कादंबर्‍यांचे इंग्रजी व अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले.    

 रत्नागिरी येथे १९४० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६२मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. दरवर्षी मराठीतील एका साहित्य कृतीला त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येतो.

☆☆☆☆☆

रमा हर्डीकर : रमा हर्डीकर यांचा आज जन्मदिन. या प्रामुख्याने अनुवादासाठी प्रसिद्ध आहेत. आत्मरंगी  या रस्कीन बॉंड आत्मचरित्राचा त्यांनी अनुवाद केलाय. ‘काळी मांजर’ हा एडगार अ‍ॅलन पो यांच्या  गूढकथांचा अनुवाद आहे. खिडकी या लघुत्तम कथांचे ई- बुक निघाले आहे. सुंदर पिची, गुगलचे भविष्य, हे जगमोहन भानवर यांच्या उस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांनी प्रामुख्याने रस्कीन बॉंड आणि जगमोहन भानवर यांच्या पुस्तकांचे अनुवाद केलेले दिसतात. माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केले आहेत. 

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? २० ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ?

आज २० ऑक्टोबर – ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख यांचा जन्मदिन. ( २०/१०/१९१६ — २९/८/१९६९)

यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल असे होते. गिरणी कामगार म्हणून काम करत असतांना त्यांच्या मिलसमोर होणारी आंदोलने, गेट-सभा, वेगवेगळे लढे, यामुळे प्रभावित होऊन, तेव्हा कामगारांना संगठीत करण्याचे काम ते करायला लागले. अखिल भारतीय किसान सभेच्या कामातही त्यांचा सहभाग असायचा. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. आपल्या काव्यरचनेच्या माध्यमातून त्यांनी या चळवळींचा यशस्वी प्रचार केला. लोककलेच्या माध्यमातून  विचारांचा प्रसार करत समाजाला जागृत करण्याचे व्रतच त्यांनी स्वीकारले होते. त्यासाठी त्यांनी अनेक पोवाडे, लोकगीते, लोकनाट्ये लिहिली. एक मनस्वी कवी आणि लोकशाहीर म्हणून जनमानसात ते आदरणीय ठरले होते. त्यांची तडफदार लेखणी आणि विलक्षण पल्लेदार पहाडी आवाज या दोन्हीचा त्यांनी जनजागृतीसाठी पूर्णपणे उपयोग केला. स्वतः एक श्रमिक या भूमिकेतून त्यांनी सतत जन -उद्धाराचे स्वप्न पाहिले. त्यांच्याबद्दल आणखी विशेषत्वाने सांगायलाच हवी अशी गोष्ट म्हणजे भारतावर झालेल्या  चिनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी, अनेक ठिकाणी आपली शाहिरी लोकांपुढे प्रभावीपणे सादर करून, त्यांनी देशासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा करून दिला होता. काव्याला असणारी उपजत लय आणि यमकप्रचुर रचना ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये होती.  ती काव्ये विचार आणि भावनांचे चैतन्य यांनी बहरलेली असायची.

त्यांच्या काही कवनांमध्ये रौद्र रसाचाही अनुभव येतो. श्री. प्र .के .अत्रे त्यांना गौरवाने  “ महाराष्ट्राचा मायकोव्हस्की “ म्हणत असत. पण त्यांना स्वतःला “ लोकशाहीर “ ही उपाधी सर्वात जास्त आवडायची, कारण त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जनताजनार्दनाच्या चरणी वाहिले होते. 

कलश, धरतीमाता हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत हा गीतसंग्रह , पहिला बळी हे नाटक आणि कितीतरी पोवाडे , असे त्यांचे सगळेच साहित्य रसिकांच्या पसंतीस उतरले होते. लोककलांचे जतन, संवर्धन आणि संशोधन व्हावे, आणि तो वारसा समृद्ध व्हावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने  

“ शाहीर अमर शेख अध्यासन “ सुरु करून त्यांचा सन्मान केला आहे.

सामान्यातल्या सामान्य माणसाचे उत्थान करणे हे स्वतःचे ध्येय साध्य  करण्यासाठी स्वतःची वेगळीच वाट शोधणारे शाहीर अमर शेख यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी मनःपूर्वक आदरांजली.  

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १९ ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ?

आज १९ ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी गीतकार आणि कवी श्री. शांताराम नांदगावकर यांचा जन्मदिन. ( १९/१०/१९३६ –११/७/२००९ )

 श्री. नांदगावकर यांनी अनेक भावगीते, आणि मराठी चित्रगीते लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमतजंमत, पैजेचा विडा , नवरी मिळे नवऱ्याला, यासारख्या कितीतरी गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते, त्या चित्रपटांइतकीच लोकप्रिय झालेली आहेत. हरीनाम मुखी रंगते, सूर सनईत नादावला, ससा तो ससा की कापूस जसा, सजल नयन नित धार बरसती, विसर प्रीत विसर गीत, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, प्रीतीच्या चांदराती, अशी त्यांची कितीतरी भावगीते रसिक कधीच विसरणार नाहीत. ‘ हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला ‘ हे जगप्रसिद्ध क्रिकेटवीर सुनील गावसकर यांनी गायलेले गाणे श्री. नांदगावकर यांच्या लेखणीतूनच उतरलेले आहे. याव्यतिरिक्त, १९८७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काढलेल्या “ दलितांचा 

राजा “ या अल्बमसाठी त्यांनी अतिशय सुरेख गीते लिहिलेली आहेत. 

आणखी एक विशेष म्हणजे, १९८५ साली श्री. नांदगावकर शिवसेनेतर्फे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर निवडून गेले होते. आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांना मनःपूर्वक आदरांजली . 

☆☆☆☆☆

आज प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचाही जन्मदिन. ( १९/१०/१९५४ — १९/०९/२००२ )

गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, यासारखे चित्रपट, कमला, सखाराम बाईंडर, कन्यादान अशासारखी नाटके, यात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. “ रजनी “ या टी. व्ही. वरील मालिकेतून त्या अक्षरशः घराघरात पोहोचल्या. त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्ये तसेच सीरियल्समध्येही भूमिका केल्या होत्या. सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची ही मुलगी स्वतःही एक चांगली लेखिका म्हणून सर्वांना परिचित होती. सामाजिक समस्या हा त्यांच्या लेखनाचा अनेकदा विषय असे. त्यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या होत्या. आणि त्यापैकी काही पुरस्कारप्राप्तही ठरल्या होत्या. ‘पंचतारांकित’ हे त्यांचे अनुभवप्रधान लेखन, तसेच, ज्याचा त्याचा प्रश्न, असंही , अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. लेखिका आणि अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवलेल्या प्रिया तेंडुलकर यांना भावांजली . 

 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १८ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ?

सरस्वती सन्मान –

भारतातील प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांमध्ये सरस्वती सन्मान या पुरस्काराचा  समावश होतो. विद्यादेवी सरस्वतीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. भारतीय संविधांनातील आठव्या सूची मध्ये निर्देशित केलेल्या २२ भाषांसाठी हा पुरस्कार, भारतातील प्रख्यात के. के. बिर्ला फाउंडेशन द्वारा प्रदान केला जातो. इ. स. १९९१पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा पुरस्कार देण्यासाठी साहित्य क्षेत्रातील विद्वान आणि सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांची एक समिती, सन्माननीय साहित्यिकाची निवड करते. पुरस्कार देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या साहित्यिकाच्या मागील दहा वर्षांच्या लेखनातील प्रकाशित साहित्यकृतीला  दिला जातो. प्रथम वर्षी हा सन्मान श्री हरिवंश राय बच्चन यांच्या चार खंडामध्ये प्रसिद्ध झालेल्या हिन्दी भाषेतील आत्मचरित्रासाठी दिला गेला.

*मराठी मध्ये हा सन्मान विजय तेंडुलकर यांना १९९३ साली मिळाला. त्यांची सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडे, कन्यादान ही नाटके द. लास्ट डेस ऑफ सरदार पटेल (चित्रपट कथा ) प्रसिद्ध आहेत.

*महेश एलकुंचवार यांना हा सन्मान २००२ साली मिळाला.

त्यांची विनाशवेळा, ( हेनरी मिलरच्या पुस्तकाचा अनुवाद),  यातनाघर, (नाटक)  पश्चिम प्रभा, सप्तक (वैचारिक, आत्मपर) , त्रिबंध, (ललितबंध) वाडा चिरेबंदी (नाटक) , सप्तक ( वैचारिक)  इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.  

श्रीमती उज्ज्वला केळकर

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १७ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्री सुहास रघुनाथ पंडित ?

आज 17 ऑक्टोबर. मराठी साहित्यातील वेगवेगळ्या वाटेने जाणा-या तीन सारस्वतांचा आज स्मृतीदिन!

पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरणकार. पण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज स्मृतीदिन. ते व्याकरणकार तर होतेच.पण त्याशिवाय त्यानी विपुल लेखन केले आहे. मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज या संस्थांचे ते संस्थापक सदस्य होते. मराठी बरोबरच त्याना फार्शी व संस्कृत भाषेचे ज्ञानही होते. इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली  होती.

महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे व्याकरणाचे पहिले पुस्तक त्यांनी 1836 मध्ये प्रकाशित केले. त्याची सुधारित दुसरी आवृत्ती 1850 ला निघाली. 1865मध्ये मराठी लघुव्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या शिवाय त्यांनी आत्मचरित्र, वैचारिक, शैक्षणिक, नकाशा संग्रह असे विपुल लेखन केले आहे.

कोकणातील उफळे या गावी जन्मलेले श्री रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गेले. पुढे ते अर्थशास्त्राचे पदवीधर झाले.मराठी साहित्यात ललित गद्य लेखनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कथा, कादंबरी, प्रवासवर्णन,आत्मपरलेखन, ललित असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. सुमारे 32 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यात प्रामुख्याने ललित लेख संग्रह आहेत.निवडक पिंगे या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या तीनशे पैकी 26 नामवंत व्यक्तींच्या व्यक्तिरेखा आहेत. पाश्चात्य साहित्याचा परिचय करून देणारी पश्चिमेचे पुत्र, हिरवी पाने या सारखी पुस्तकेही त्यानी लिहीली आहेत. हलकी फुलकी लेखनशैली, काव्यात्मक लेखन, मराठी आणि इंग्रजी साहित्याच्या व्यासंगाचे दर्शन, प्रचंड प्रवासातील सूक्ष्म निरीक्षणे ही त्यांच्या लेखना ची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.

अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री.के.ज.पुरोहित उर्फ शांताराम यांचा आज स्मृतीदिन. अंधारवाट, चंद्र माझा सखा, मनमोर,  संध्याराग शांतारामकथा इ.पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. याशिवाय प्रातिनिधिक लघुनिबंधसंग्रह, मराठी कथा विसावे शतक, मराठी विश्वकोश यासारख्या ग्रंथांचे त्यांनी संपादन व सहसंपादन केले आहे. शांताराम या नावाने त्यांनी विपुल कथालेखन केले आहे.

मराठी साहित्यातील या तीन साहित्यिकांना सादर प्रणाम.

 श्री सुहास रघुनाथ पंडित

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ: विकिपीडिआ, इंटरनेट.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १६ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ?

*सोपानदेव चौधरी – (१९०७-१९८२)

‘आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगची धून’ हे गाणे ऐकले की आठवतात सोपानदेव चौधरी. अलौकिक प्रतिभेच्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे, सोपानदेव सुपुत्र. ते रवीकिरण मंडळाचे सभासद होते. यातील सारे सभासद कवी आपल्या कविता गाऊन सादर करत. सोपानदेव चौधरीही आपल्या कविता गाऊनच सादर करायचे. काव्यकेतकी, अनुपमा, छंद , लीलावती इ. त्यांचे कवितासंग्रह आहेत. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून ते गद्य लेखनाकडेही वळले.

एकदा नागपूर येथे कविसंमेलनासाठी त्यांना निमंत्रण होते. त्या प्रमाणे ते गेले. त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्या. श्रोत्यांनाही त्या खूप आवडल्या. पण रिपोर्टमध्ये त्यांचे नाव नव्हते. ते उदास झाले. घरी गेल्यावर बहिणाबाईंनी त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी संगितले. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, ‘कुणी प्राणी मारत होता. ते पाहून तिथून जाणार्‍या एका माणसाने त्याचा जीव वाचवला. ‘छापून येणार नाही, म्हणून त्याने तसे केले नसते तर ?’ पुढे त्यांचे उत्स्फूर्त उद्गार आहेत,

‘अरे, छापीसनी आलं ते मानसाले समजलं

छापीसनी राहिलं ते देवाला उमजलं’ किती हृद्य आहे त्यांचं हे समजावणं॰ त्या म्हणाल्या, ‘अरे, तुझी सेवा रुजू झाली ना? मग झालं तर!’

शब्दांवर कोटी करण्याचा त्यांचा छंद होता. ‘मी कोट्याधीश’ आहे असे ते म्हणायचे.पुढे पुढे यांना कॅन्सर झाला. त्या काळात हॉस्पिटलमध्ये पडून पडूनही त्यांनी १०-१५ कविता लिहिल्या. एकदा शंकर वैद्य त्यांना भेटायला गेले आणि त्यांच्या अस्थिपंजर देहाकडे पाहून म्हणाले, हे काय हे आप्पा!’ त्यावर ते म्हणाले, ‘आता मी हाडाचा कवी झालो.’अशा त्यांच्या काही आठवणी डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या लेखात  सांगितल्या आहेत.

*ना. सं इनामदार (१९२३ ते २००२) नागनाथ संताराम ईनामदार हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. इतिहासातील उपेक्षित  पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची ओळख आहे. संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, प्रसंगातील नाट्यमयता, चित्रदर्शी शैली त्यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या सगळ्या कादंबर्‍यांमध्ये राऊ, झेप, शाहेंशाह, मंत्रावेगळा इ. कादंबर्‍या लोकप्रीय ठरल्या भारतीय ज्ञानपीठाने त्यांच्या राऊ कादंबरीचा राऊ स्वामी या नावाने हिंदीतील अनुवाद प्रकाशित केलाय.

*गो. पु. देशपांडे (१९३८ – २०१३) गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी मराठीत नाटके, कविता आणि निबंधही लिहिले. दिल्लीच्या जवाहर विद्यापीठातून चीन हा विषय घेऊन त्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली व याच विषयावर हॉँगकॉँगयेथून पदविका मिळवली. पुढे दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.

त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून लेखन केले. त्यांनी वैचारिक, राजकीय, रंगभूमीविषयक, साहित्यविषयक, लेखन केले. प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात विचारनाट्याची धारा त्यांनी पहिल्यांदा निर्माण केली. राजकीय जाणीवा ही त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. अंधारयात्रा, उध्वस्त धर्मशाळा, चाणक्य विष्णुगुप्त, रस्ते, शेवटचा दिवस. सत्यशोधक इ. नाटके त्यांनी लिहिली. सत्यशोधक नाटकाचे हिंदीत रूपांतर झाले. याशिवात इत्यादी इत्यादी (कवितासंग्रह) ‘ चर्चक हे निबंधाचे पुस्तक २ भागात, राहिमतपूरकरांची निबंधमाला २ भागात, नाटकी निबंध हा लेखसंग्रह इ. लेखन त्यांनी केलेले आहे.

त्यांच्या साहित्याचे, इंग्रजी, कानडी, हिन्दी, तमीळ, अशाविविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्यावर बहुआयामी गो.पु.’या लघुपटाची निर्मिती झालेली आहे. त्यांनी, शिवाजी, महात्मा फुले, चाणाक्य इ. दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी लेखन केले आहे. चित्रपटांसाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे.

गो. पु. देशपांडे यांना जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कार, संगीत नाटक अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार व मरणोत्तर रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर पुरस्कार लाभले आहेत. (हा पुरस्कार श्रीराम लागूंनी आपल्या मुलाच्या तन्वीरच्या स्मरणार्थ ठेवला आहे.)       

श्रीमती उज्ज्वला केळकर

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षणमंडळ, “ साहित्य- साधना दैनंदिनी “ . २) गूगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print