☆ ORS चे जनक डॉ. दिलीप महालानोबिस सुश्री योगीन गुर्जर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
आज आपल्याला अचानक अशक्तपणा आला , जुलाब वगैरे आजारामुळे शरिरातील पाणी कमी झाले तर डॉक्टर आपल्याला ORS– oral rehydration therapy– घ्यायला सांगतात. बाजारात सहज उपलब्ध असलेले पाच रुपया पासून लहान लहान पाकिट sachet आपण पाण्यात घोळुन पितो व दोन पाच मिनिटांत तरतरी वाटते .
आज जगभरात ORS वापरले जाते. या ORS चे जनक एक भारतीय डॉक्टर होते हे वाचून तुम्हाला धक्का बसेल.
ते आहेत प.बंगाल मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ दिलीप महालानोबिस.
डॉ दिलीप महालानोबिस हे एक भारतीय बालरोगतज्ञ होते, जे अतिसाराच्या आजारांवर उपचार करण्यासाठी “ओरल रिहाइड्रेशन थेरपी “ च्या वापरासाठी प्रख्यात होते. १९६० च्या मध्यात त्यांनी भारतातील कलकत्ता येथील जॉन्स हॉपकिन्स इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग येथे कॉलरा आणि इतर अतिसाराच्या आजारांवर संशोधन केले.
अशा जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे १६ ऑक्टोबर २०२२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कोलकता येथील एका इस्पितळात निधन झाले.
( जन्म १२ नोव्हेंबर १९३२ )
त्यांचे कार्य नोबेल पारितोषिक मिळण्याइतके मोठे होते.
पण भारत सरकारने सुद्धा पद्म पुरस्कार दिला नाही.
तळ टिप:- यांच्या निधनाची मराठी माध्यमांनी दखल घेतली नाही म्हणून हा छोटासा लेख.
लेखिका : सुश्री योगीन गुर्जर
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची ‘ बैल ’, कवी शंकर बोराडे यांची ‘ गांधी ’, लक्ष्मण महाडिक यांची ‘ माती ’,लता पवार यांची ‘आपली मैत्रीण ’, प्रा.व.ना.आंधळे यांची ‘ आई,मला जन्म घेऊ दे ’, असे कवी आणि त्यांच्या कवितांमध्ये हरवून जायचं असेल तर तुम्हाला नाशिक-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावरील ‘ रिलॅक्स कॉर्नर ’ हे उपहारगृह गाठावं लागेल. भीमाबाई जोंधळे या सत्तर वर्षाच्या तरुण आजी हे उपहारगृह चालवत असून त्यांचं अनोखं पुस्तकप्रेम बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. त्यांच्या या उपहारगृहामध्ये पोटाच्या भुकेबरोबर वाचनाची भूक भागविण्यासाठी हजारो मराठी पुस्तके आहेत.
पुस्तकं चाळता चाळता न्याहारी घेण्याची अनोखी शक्कल भीमाबाईंनी चालवली आहे. वय झालं म्हणून भीमाबाई हात बांधून बसल्या नाहीत. त्यांच्या हाताने बनलेली मिसळ आणि झुणका भाकर खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. केवळ चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या या आजी सकाळी चार वाजता उठतात. गेल्या बावीस वर्षांपासून त्या पेपर एजन्सी चालवत असून मोहाडी, जानोरी, सय्यद पिंप्री आदी ठिकाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. सकाळी गठ्ठे बांधून त्या विक्रेत्यांना देत असतात. हे काम करता करताच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्याचे त्या सांगतात. त्यांचं शिक्षण खतवड शाळेत झालं. मोहाडीच्या देशमुख आणि धनगर गुरुजींचे संस्कार त्यांना मिळाले. शाळेत अण्णासाहेब कवडे यांच्या हाताने मिळालेल्या पाच रुपयांच्या आरश्याचे बक्षीस जीवनाला वेगळीच दिशा देऊन गेल्याचे त्या सांगतात.
लग्न झाल्यावर अवघ्या दोन एकर जमिनीत त्या स्वतः पिके घेत असत. सहा रुपये रोजाने देखील त्या काम करीत असत. महामार्गावर बारा वर्षापूर्वी एक छोटी टपरी टाकून त्यांनी हॉटेल सुरु केलं. तेव्हाच वृत्तपत्र टाकण्याचे काम देखील सुरु झालं. मराठी वाचन माणसाला सुसंस्कृत बनवत असते याचा अनुभव आल्याचे सांगत, दोन तीन कविता देखील त्या म्हणून दाखवतात. कवी दत्ता पाटील यांनी देखील त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं. विशेष म्हणजे टपरीतून एका छोट्या हॉटेलपर्यंत त्यांचा प्रवास बघावयास झाला आहे. भीमाताईंनी नोटाबंदीच्या काळात अनेक भुकेलेल्यांना मोफत जेवण दिलं होतं. भीक मागणाऱ्यांना पैसे न देता खाऊ घालण्याची संस्कृती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. त्यांच्या उपहारगृहामध्ये प्रत्येक टेबलावर दोन पुस्तके ठेवलेली असतात. बाळा नांदगावकर,भाई जगताप,अरुण म्हात्रे, अतुल बावडे,बाबासाहेब सौदागर अश्या ज्येष्ठ, नामांकित साहित्यिक, कवींनी या हॉटेलला भेट देऊन आजींच्या कार्याचा गौरव केला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा वाढदिवस असेल तर त्याला एक पुस्तक आजी भेट देतात. मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे आणि पुस्तकाच्या दुनियेत हरवून जावे या उद्देशाने त्या पुस्तक वाचन चळवळ चालवत आहे. आता मुलगा प्रवीण हा आईच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. त्याने आज पर्यंत तब्बल ७२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सून प्रीती यादेखील त्यांना या कामात मदत करीत असतात.
पुस्तकांसोबत या हॉटेलमध्ये पारंपरिक वस्तू देखील बघायला मिळतात. पाटा, वरवंटा आदी वस्तू मुलांना दाखवून त्या कशा वापरायच्या याचं प्रात्यक्षिकही त्या देत असतात. मराठी पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रिलॅक्स कॉर्नरला भेट द्यायला हवी.
भीमाबाई सांगतात, “ मी गेली बावीस वर्ष वृत्तपत्र वाटपाचा व्यवसाय करते आहे. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरु केला. सध्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालल्याचं दिसतं. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. आज आमच्याकडे शेकडो पुस्तके आहेत. त्याचे वाचन करण्यासाठी नाशिकमधून नागरिक येतात याचं समाधान वाटतं. ही पुस्तक चळवळ व्यापक व्हावी हीच अपेक्षा आहे.
– प्राची उन्मेष, नाशिक
संग्राहक : सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
या सूक्ताचा शशांक दिवेकर यांनी गायलेला आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी चित्रांकन केलेला व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहे. त्यासाठी लिंक देत आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
आरती म्हणजे औक्षण. ‘ शब्द कल्पद्रुम ‘ नावाचा ग्रंथ आहे, त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे. मूर्तीच्या पायाशी चार वेळा, नाभी भोवती दोन वेळा, मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा.-बस संपली आरती. आरती म्हणण्याची प्रथा कधी सुरु झाली हा थोडा संशोधनाचा विषय. महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या काही आरतीसदृश रचना आहेत असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वरांनी काही अशा रचना केल्या होत्या, पण त्या भगवतगीतेचं कौतुक करणाऱ्या. माझ्या मते हा प्रकार श्री रामदासस्वामी या लोकोत्तर संताने चालू केला असावा. जशी त्यांनी मारुतींची स्थापना केली, व्यायामशाळा चालू केल्या, त्याच पद्धतीने समाज एकत्र यावा, मोंगलांची त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी, म्हणून हा प्रपंच मांडला होता का ? राम जाणे. एवढी छान पूजा केली आहे तेव्हा देवाला ‘ येई हो विठ्ठले ‘ म्हणून संगीत आवतण आर्ततेने द्यायचं. यात खूप आरत्या त्या देवाच रूप, काम सांगणाऱ्या आहेत, आणि शेवटी ‘ देवा तू ये ‘ अशी आळवणी. आणि या आळवणीला देव प्रतिसाद देतो तो प्रसाद अशी समजूत .
अथर्ववेदाचे एक परिशिष्ट वाचायला मिळाले, त्यात एक गोष्ट वाचली. राक्षसांच्या पुरोहिताने काहीतरी मंत्रप्रयोग करून, इंद्राची झोप उडेल म्हणजे निद्रानाश होईल असे काहीतरी केले. इंद्र त्रस्त झाला व त्याने बृहस्पतीना यासाठी उपाय विचारला. तेव्हा बृहस्पती म्हणाले की “ मी तुला एक उपाय सांगतो त्याला अरार्त्रिक म्हणतात. एक तबक घेऊन त्यात वेगवेगळी फुले ठेव व एक त्यात दीप लावून सुवासिनीकडून औक्षण करून घे. व हे करताना एक मंत्र म्हण. यामुळे तुला या त्रासातून मुक्ती मिळेल.” या अरात्रिकामधून आरती या विषयाचा जन्म झाला. देवाला झोपविण्यासाठी पहिली आली ती शेजारती. मग त्याला परत उठविण्यासाठी आली ती काकडआरती. पूजेनंतर ५ वाती किवा दिव्याने ओवाळून करायची ती पंचारती. एकच दिवा असेल तर एकारती, धूप जाळला असेल तर धुपारती, कापूर असेल तर कापूरारती .
समर्थांनी जवळ जवळ ८० ते ८२ आरत्या लिहिलेल्या आहेत. सर्व अत्यंत प्रासादिक. गेली ४०० वर्ष याची मोहिनी जनमानसावरून उतरलेली नाही. एखाद्या महान व्यक्तीच्या काव्याला, शब्दांना मंत्राचं पावित्र्य येत ते असं. याला म्हणतात चिरंजीविता .यात एक गम्मत अशी की रामदास हे काही आजच्यासारखे संधीसाधू ,दलबदलू नाहीत. गणपती बाप्पा असो की मारुतीराया असो, की कुठलीही देवी असो, आरतीमध्ये तिचे गुणगान करतील, पण प्रत्येक आरतीमध्ये शेवटी त्या देवाला ‘ साहेब तुमचं मी कौतुक केलं असलं, तरी मी दास रामाचा ,’ ही आठवण ते करून देतातच. रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. सर्व सुंदर आहेत. त्यातील देवतांची वर्णनंही खूप सुंदर.
पण या आरतीपेक्षा संत एकनाथांनी लिहिलेली दत्ताची आरती एक वेगळी आणि सुंदर आहे. या आरतीचे स्वरूप इतर आरत्यांच्यापेक्षा वेगळे अशाकरिता की कुठल्याही आरतीत त्या देवाचे रूपवर्णन, त्याचे पराक्रम आणि नंतरच्या कडव्यामधून साधारण फलश्रुती असा प्रकार असतो. पण दत्ताच्या आरतीत ‘ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ‘, ‘अभाग्यासी कैची कळेल हि मात ‘ अशा ओळी आहेत. म्हणजे थोडक्यात, मला तो कळलाच नाही असा पहिल्या दोन कडव्यात स्वानुभव आहे व उरलेली दोन कडवी फलश्रुती आहे. याचे कारण असे की एकनाथ महाराज त्यांच्या गुरूच्या म्हणजे जनार्दनस्वामी यांचेकडे हट्ट धरून बसले की मला दत्त महाराजांचे दर्शन घडवा. जनार्दनस्वामींनी त्यांना दौलताबाद येथे किल्ल्यावर बोलावले. एक दिवस एक योगी एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. एकनाथांनी त्यांना आपण कोण असे विचारले, तेव्हा तो योगी त्यांना आशीर्वाद देऊन न बोलता निघून गेला आणि नंतर जेव्हा जनार्दनस्वामी हसले तेव्हा एकनाथ महाराजांना समजले की दत्तमहाराज दर्शन देऊन गेले. तेव्हा ही आरती एकनाथ महाराजांनी तेथे लिहिली आणि ते लिहून गेले– ” सबाह्याभ्यंतरीं तू एक दत्त ,अभाग्यासी कैची कळेल ही मात “–फारच सुंदर चुटपूट .
मंडळी मी या विषयातील तज्ञ नाही. मी जे वाचतो, ऐकतो ते मित्रमंडळींना सांगावे, एवढीच इच्छा असते .
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
प्रस्तावना आणि सूक्त ( १ : १ )
सनातन धर्माचे तत्वज्ञान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये सांगितलेले आहे. विद् या धातूपासून वेद या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. विद् या धातूचे जाणणे, असणे, लाभ होणे आणि विचार करणे, ज्ञान देणे असे विविध अर्थ आहेत.
वेद हे अपौरुषेय ज्ञान आहे. संपूर्ण ब्रह्मांडात जे काही आहे, त्या सर्वांचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व असप्रज्ञात आत्मसाक्षात्काराने जाणून घेतल्याने वेदांची निर्मिती झाली. हे सर्व ज्ञान मूलतः ज्ञानी ऋषींच्या अनुभूतिजन्य प्रज्ञेत साठविलेले होते आणि ते केवळ मौखिकरित्या त्यांच्या शिष्याला दिले जात असे. पुढे श्रीगणेशाने देवनागरी लिपी निर्माण केल्यानंतर केव्हा तरी ते ग्रंथ स्वरुपात उपलब्ध झाले असावेत. वेद जुन्या संस्कृत भाषेत किंवा गीर्वाण भाषेत आहेत.
यातील ऋग्वेद मराठी गीतरुपात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ऋग्वेदातील अनेक खंडांना मंडळ अशी संज्ञा असून त्यातील प्रत्येक अध्यायाला सूक्त म्हणतात. काही श्लोकांनी म्हणजेच ऋचांनी प्रत्येक सूक्त बनते. वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांत या ऋचा रचलेल्या आहेत. मूळ ऋचा दीड ते दोन चरणांच्या आहेत. सुलभ आकलनासाठी आणि गेयता प्राप्त होण्यासाठी मी त्यांचा मराठीत भावानुवाद केलेला आहे. गीतऋग्वेदाचा भावानुवाद येथे मी क्रमशः प्रसिद्ध करणार आहे.
ही गीते सुश्राव्य गीतात गायली गेलेली असून त्यांचे व्हीडीओ युट्यूबवर प्रसारित झालेली आहेत. या व्हिडीओत गीतांबरोबरच त्या त्या सुक्तात आवाहन केल्या गेलेल्या देवतांची रेखाचित्रे देखील उपलब्ध आहेत. प्रत्येक गीताच्या तळाशी मी आपल्या सोयीसाठी मुद्दाम त्या गीताच्या व्हिडिओची लिंक प्रसारित करीत आहे. सर्वांनी मुद्दाम त्या स्थळी भेट देऊन या व्हिडिओचा आस्वाद लुटावा.
डॉ. निशिकांत श्रोत्री, एम. डी., डी. जी. ओ.
——————————————————————————————————————————-
ऋग्वेद अग्निसुक्त १.१
देवता : अग्नि
ऋषी : मधुछन्दस वैश्वामित्र
मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
☆
अग्निदेवा तूचि ऋत्विज यज्ञपुरोहिता
होऊनिया आचार्य अर्पिशी हविर्भाग देवता
अनुपम रत्नांचा स्वामी तू निधीसंचय करितो
स्तवन तुला हे अग्निदेवते भक्तीने भजतो ||१||
☆
अ॒ग्निः पूर्वे॑भि॒र्ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥
☆
धन्य जाहले प्राचीन ऋषींना अग्निस्तुती करण्या
अर्वाचीन ऋषी उचित मानिती अग्नीला स्तवण्या
याग मांडिला विनम्र होऊनी अग्नीला पुजिण्या
सिद्ध जाहला अग्नीदेव देवतांसि आणण्या ||३||
☆
अ॒ग्निना॑ र॒यिम॑श्नव॒त्पोष॑मे॒व दि॒वेदि॑वे । य॒शसं॑ वी॒रव॑त्तमम् ॥ ३ ॥
☆
भक्तांसाठी प्रसन्न होता तू वैभवदाता
वृद्धिंगत हो शुक्लेंदूवत हरण करी चिंता
यशोवंत हो पुत्रप्राप्ती तुझ्या कृपे वीरता
कृपादान हो सर्व सुखांचे अग्निदेव भक्ता ||३||
☆
अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्व॒रं वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ । स इद्दे॒वेषु॑ गच्छति ॥ ४ ॥
☆
कृपादृष्टी तव चहूबाजूंनी ज्या यज्ञावरती
तया होतसे वरदाने तव पवित्रता प्राप्ती
प्रसन्न होती देवदेवता पावन यज्ञाने
स्वीकारुनिया त्या यागाला तुष्ट तयांची मने ||४||
☆
अ॒ग्निर्होता॑ क॒विक्र॑तुः स॒त्यश्चि॒त्रश्र॑वस्तमः । दे॒वो दे॒वेभि॒राऽग॑मत् ॥ ५ ॥
☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
तनोट राय देवी – खरं तर हे नावसुध्दा मी आधी ऐकले नव्हते. पण आम्ही राजस्थान टूरला गेलो असताना जैसरमेलला टेन्टमधे राहून तेथील थरचे वाळवंट व त्या अनुषंगाने वालुकामय सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आमच्या गाईडने सांगितले की येथून साधारण २०० किलोमीटरवर प्रसिध्द श्री तनोट राय देवीचे जागृत मंदिर आहे. तेथे जायला ४ तास लागले. मंदिरात प्रवेश करतानाच मला नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटले. चौकशीअंती कळले की हे मंदिर BSF – Border Security Force च्या अखत्यारीत आहे व या मंदिराची पूर्ण देखभाल अगदी पूजेसहीत BSF करते. त्यामुळे सर्वत्र एकप्रकारची शिस्त जाणवते. कसलेही अवडंबर नाही. सकाळची पूजा झाल्यावरचे प्रसन्न वातावरण, देखणी फुलांची आरास केली होती. स्थानिक लोक भक्तीभावाने दर्शनास येत होते. दर्शन लांबूनच होते. शेजारी बरेच गोटानारळ ठेवलेले होते, ते प्रत्येकजण घेऊन वाढवत होते. अर्धा देवीपुढे व अर्धा प्रसाद –हे सर्व विनाशुल्क. मंदिरात कोणीही पुजारी वा गुरूजी नव्हते. पण सारे काही शांतपणे चालले होते.
मंदिर परिसरात फिरत असताना तेथे शोकेसमधे खूप सारे जवानांचे व बॉम्बचे फोटो दिसले. अशी माहिती मिळाली की BSF चे हे आराध्य दैवत आहे. १९६५च्या युध्दात पाकिस्तानी सैन्याने या मंदिराच्या परिसरात ३०००+ बाँम्ब फेकले होते, पण तरीही मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही व सर्व बाँम्ब न फुटता वाया गेले. तेथे आजही बरेच बाँम्ब पहायला ठेवले आहेत. एवढे बॉम्ब टाकल्यावर कसलेही नुकसान न होणे हा आपल्या व पाकिस्तानी सैन्यासाठी एक चमत्कारच होता. म्हणून या देवीला ‘ बमवाली देवी ‘ असे पण म्हणतात. हा चमत्कार पाहून पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडीयर शाहनवाज यांनी देवीदर्शनाची परवानगी मागितली. आपल्या सरकारने अडीच वर्षाने ती दिल्यावर त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिराला चांदीची छत्री अर्पण केली, जी आपल्याला आजही पहायला मिळते .
मंदिराबाहेर १९६५च्या भारत पाकिस्तान युध्दाची आठवण म्हणून एक विजयस्तंभ उभारला आहे. हा स्तंभ आपल्या मनात आपल्या जवानांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण जागवतो. मंदिराएवढेच या विजयस्तंभासमोर नतमस्तक होत असताना मी परत एकदा माझ्या हजारो जवानांचे प्राण वाचवणाऱ्या देवीपुढे विनम्रपणे झुकले व प्रार्थना केली की ‘ देवीमा अशीच माझ्या जवानांवर तुझी कृपा ठेव व अखंड पाठीशी रहा.’
येथून भारत पाकिस्तान सीमा २० किमी आहे. तेथे जाण्यासाठी या मंदिर परिसरातच BSF ने काही औपचारिकता पूर्ण केल्यावर पास देण्याची व्यवस्था केली आहे. ती पूर्ण करून आपल्याला बॉर्डरपर्यंत जाता येते. तेथे मोठा वॅाचटॅावर आहे. येथून सर्व परिसर छान दिसतो. यावेळी प्रथमच Front line – Border वर कार्यरत असलेली महिला ऑफिसर ड्युटीवर दिसली . तिच्याशी संवाद साधत आम्ही तिच्याप्रती वाटणारा आदर व अभिमान व्यक्त केला. त्यांचे नाव श्रीमति सुमती, व त्या श्री गंगानगरच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बॅार्डरपोस्टचा नंबर ६०९ आहे व शेवटचे गाव आहे बावलीया. प्रत्यक्ष बॅार्डरवर, जेथून पाकिस्तान फक्त १५० मीटरवर आहे, तेथे जाण्याचा एक संस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही समला परतलो.
लेखिका : सुश्री विभा पटवर्धन
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्त्रीची निर्मिती ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
देवाधिपती ज्यावेळी स्त्रीची निर्मिती करत होते त्यावेळी त्यांना खूप वेळ लागला…
सहावा दिवस होता,.. आणि स्त्रीची निर्मिती अद्याप बाकी होती, म्हणून देवदूताने विचारले…
“ देवा….. आपणांस इतका वेळ का लागत आहे ?? “
देवाने उत्तर दिले…
“ ह्या निर्मितीत इतके सारे गुणधर्म आहेत की जे अनंत काळासाठी जरूरी आहेत…..
— ही प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला सामोरी जाते….!!
—-ही आपल्या सर्व मुलांना सारखेच वाढवते, आणि आनंदी ठेवते….!!
—आपल्याच प्रेमाने, पायाला झालेल्या जखमेपासून विव्हळणा-या हृदयापर्यंत सगळे घाव भरून टाकते…..!!
—तिच्यामध्ये सर्वात मोठा गुणधर्म असा आहे की, ती आजारी पडली तरी स्वतःची काळजी स्वतःच घेते,
आणि तरीही अखंड कार्यरत राहू शकते…!! “
देवदूत चकित झाला, आणि आश्चर्याने त्याने विचारले….. “ देवा,…हे सर्व दोन हातांनी करणे शक्य आहे ???”
देवाधिपती बोलले… “ म्हणूनच ही एक खास निर्मिती आहे….!!”
देवदूत जवळ जातो….स्त्रीला हात लावून म्हणतो…. “ देवा….ही खूप नाजूक आहे…!! “
देवाधिपती ~ “ हो… ही खूप नाजूक आहे..,पण हिला खूप शक्तिशाली बनविले आहे….!! तिच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीत सामोरे जाण्याची ताकद आहे….!!
देवदूताने विचारले ~” ही विचार सुद्धा करू शकते का…??”
देवाने उत्तर दिले. ~ “ ती विचार करू शकते, आणि मजबूत होऊन धैर्याने ‘लढा’ ही करू शकते..!! “
देवदूताने जवळ जाऊन स्त्रीच्या गालाला हात लावला, आणि म्हणाला …” देवा गाल तर ओले आहेत….!!
कदाचित ह्यामध्ये चुक झाली असेल…..!!”
देवाधिपती बोलले….. “ ह्यात काहीही चुक नाही….!! हे तिचे अश्रू आहेत….!! “
देवदूत ~ “ अश्रू कशासाठी ??”
देव बोलले ~ “ ही सुद्धा तिची ताकद आहे…!!…. अश्रू…..तिला तक्रार करायची आहे, प्रेम दाखवायचे आहे, आपले एकटेपण दूर करायचा हा एक मार्ग आहे….!!
देवदूत ~ “ देवा, ही आपली निर्मिती अद्भुत आहे….! आपण सर्व विचार करून ही निर्मिती केली आहे. आपण महान आहात….!!”
देवाधिपती बोलले ~ “ ही स्त्रीरूपी अद्भुत निर्मिती प्रत्येक पुरुषाची ताकद आहे, जी त्याला प्रोत्साहित करते, सर्वांना आनंदित पाहून ही सुद्धा आनंदी राहते…!! सगळ्याच परिस्थितीत कायम हसत राहते…..!! तिला जे पाहिजे ते ती लढून सुद्धा घेऊ शकते…!! तिच्या प्रेमात काही अटी नसतात…!! तिचे हृदय तेव्हाच विव्हळते जेव्हा आपलेच तिला धोका देतात…!! परंतु प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची तिची तयारी असते….!! “
देवदूत ~ “ देवाधिपती आपली निर्मिती अद्वितीय आहे, संपूर्ण आहे..!!”
देवाधिपती बोलले ~ “ अद्वितीय नाही……तिच्यातही एक त्रुटी आहे……… ती आपली महत्ता विसरून जाते…..” .
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सस्पेन्शन” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
नॉर्वे हा युरोपमधील एक देश आहे. तिथे कुठेही जाता हे दृश्य सहसा सापडेल…
एक रेस्टॉरंट, एक महिला त्याच्या कॅश काउंटरवर येते आणि म्हणते —
” ५ कॉफी, १ सस्पेंशन “…
मग ती पाच कॉफीचे पैसे देते आणि चार कप कॉफी घेऊन जाते. थोड्या वेळाने दुसरा माणूस येतो, म्हणतो —
” ४ लंच, 2 सस्पेंशन “!!!
तो चार लंचसाठी पैसे देतो आणि दोन लंच पॅकेट घेऊन जातो. मग तिसरा येतो आणि ऑर्डर देतो —
” १० कॉफी, ६ सस्पेंशन” !!!
तो दहासाठी पैसे देतो, चार कॉफी घेतो.
थोड्या वेळाने जर्जर कपडे घातलेला एक म्हातारा काउंटरवर येऊन विचारतो —
” एनी सस्पेंडेड कॉफी ??”
उपस्थित काउंटर-गर्ल म्हणते -” येस !!”–आणि त्याला एक कप गरम कॉफी देते.
काही वेळाने दुसरा दाढीवाला माणूस आत येतो आणि विचारतो – ” एनी सस्पेंडेड लंच ??”
–काउंटरवरील व्यक्ती गरम अन्नाचे पार्सल देते आणि त्याला पाण्याची बाटली देते.
आणि हा क्रम सुरू… एका गटाने जास्त पैसे मोजावेत, आणि दुसऱ्या गटाने पैसे न देता खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यावेत,असा दिवस जातो. म्हणजेच, अज्ञात गरीब, गरजू लोकांना स्वतःची “ओळख” न देता मदत करणे ही नॉर्वेजियन नागरिकांची परंपरा आहे. ही “संस्कृती” आता युरोपातील इतर अनेक देशांमध्ये पसरत असल्याचे समजते.
आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना केळी किंवा संत्री वाटली, तर ते सर्व मिळून त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या संघटनेचा ग्रुप फोटो काढून वर्तमानपत्रात छापतो, हो की नाही ???
अशीच “सस्पेंशन” सारखी खाण्या-पिण्याची प्रथा भारतात सुरू करता येईल का किंवा दुसरं काही तरी ???
….. न गवगवा करता
प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈