डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रस्तावना आणि सूक्त ( १ : १ )

सनातन धर्माचे तत्वज्ञान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये सांगितलेले आहे. विद् या धातूपासून वेद या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. विद् या धातूचे जाणणे, असणे, लाभ होणे आणि विचार करणे, ज्ञान देणे असे विविध अर्थ आहेत. 

वेद हे अपौरुषेय ज्ञान आहे. संपूर्ण ब्रह्मांडात जे काही आहे, त्या सर्वांचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व असप्रज्ञात आत्मसाक्षात्काराने जाणून घेतल्याने वेदांची निर्मिती झाली. हे सर्व ज्ञान मूलतः ज्ञानी ऋषींच्या अनुभूतिजन्य प्रज्ञेत साठविलेले होते आणि ते केवळ मौखिकरित्या त्यांच्या शिष्याला दिले जात असे. पुढे श्रीगणेशाने  देवनागरी लिपी निर्माण केल्यानंतर केव्हा तरी ते ग्रंथ स्वरुपात उपलब्ध झाले असावेत. वेद जुन्या संस्कृत भाषेत किंवा गीर्वाण भाषेत आहेत. 

यातील ऋग्वेद मराठी गीतरुपात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ऋग्वेदातील अनेक खंडांना मंडळ अशी संज्ञा असून त्यातील प्रत्येक अध्यायाला सूक्त म्हणतात. काही श्लोकांनी म्हणजेच ऋचांनी  प्रत्येक सूक्त बनते. वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांत या ऋचा रचलेल्या आहेत. मूळ ऋचा दीड ते दोन चरणांच्या आहेत. सुलभ आकलनासाठी आणि गेयता प्राप्त होण्यासाठी मी त्यांचा मराठीत भावानुवाद केलेला आहे. गीतऋग्वेदाचा भावानुवाद येथे मी क्रमशः प्रसिद्ध करणार आहे. 

ही गीते सुश्राव्य गीतात गायली गेलेली असून त्यांचे व्हीडीओ युट्यूबवर प्रसारित झालेली आहेत. या व्हिडीओत गीतांबरोबरच त्या त्या सुक्तात आवाहन केल्या गेलेल्या देवतांची रेखाचित्रे देखील  उपलब्ध आहेत. प्रत्येक गीताच्या तळाशी मी आपल्या सोयीसाठी मुद्दाम त्या गीताच्या व्हिडिओची लिंक प्रसारित करीत आहे. सर्वांनी मुद्दाम त्या स्थळी भेट देऊन या व्हिडिओचा आस्वाद लुटावा. 

डॉ. निशिकांत श्रोत्री, एम. डी., डी. जी. ओ. 

——————————————————————————————————————————-

ऋग्वेद अग्निसुक्त १.१

देवता : अग्नि 

ऋषी : मधुछन्दस वैश्वामित्र

मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री

 

अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्‍न॒धात॑मम् ॥ १ ॥

अग्निदेवा तूचि ऋत्विज यज्ञपुरोहिता

होऊनिया आचार्य अर्पिशी हविर्भाग देवता

अनुपम रत्नांचा स्वामी तू निधीसंचय करितो

स्तवन तुला हे अग्निदेवते भक्तीने भजतो ||१||

अ॒ग्निः पूर्वे॑भि॒र्ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥

धन्य जाहले प्राचीन ऋषींना अग्निस्तुती करण्या

अर्वाचीन ऋषी उचित मानिती अग्नीला स्तवण्या

याग मांडिला विनम्र होऊनी अग्नीला पुजिण्या

सिद्ध जाहला अग्नीदेव देवतांसि आणण्या ||३||

अ॒ग्निना॑ र॒यिम॑श्नव॒त्पोष॑मे॒व दि॒वेदि॑वे । य॒शसं॑ वी॒रव॑त्तमम् ॥ ३ ॥

भक्तांसाठी प्रसन्न होता तू वैभवदाता

वृद्धिंगत हो शुक्लेंदूवत हरण करी चिंता

यशोवंत हो पुत्रप्राप्ती तुझ्या कृपे वीरता

कृपादान हो सर्व सुखांचे अग्निदेव भक्ता ||३||

अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्व॒रं वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ । स इद्दे॒वेषु॑ गच्छति ॥ ४ ॥

कृपादृष्टी तव चहूबाजूंनी ज्या यज्ञावरती

तया होतसे वरदाने तव पवित्रता प्राप्ती

प्रसन्न होती देवदेवता पावन यज्ञाने

स्वीकारुनिया त्या यागाला तुष्ट तयांची मने ||४|| 

अ॒ग्निर्होता॑ क॒विक्र॑तुः स॒त्यश्चि॒त्रश्र॑वस्तमः । दे॒वो दे॒वेभि॒राऽग॑मत् ॥ ५ ॥

अग्नीद्वारे समस्त देवा हविर्भाग प्राप्त

पंडित होती बुद्धीशाली मिळे ज्ञानसामर्थ्य

आळविलेल्या सर्व प्रार्थना अग्निप्रति जात

देवांसह साक्षात होऊनी यज्ञ करीत सिद्ध ||५|| 

यद॒ङ्‍ग दा॒शुषे॒ त्वम् अग्ने॑ भ॒द्रं क॑रि॒ष्यसि॑ । तवेत्तत्स॒त्यम॑ङ्‍गिरः ॥ ६ ॥

अंगिरसा हे अग्निदेवते आशीर्वच देशी

मंगल तुझिया वरदानाने तृप्तीप्रद नेशी

कृपा तुमची हे शाश्वत सत्य भक्ता निःशंक

शीरावर वर्षाव करावा तुम्हा हीच भाक ||६||

उप॑ त्वाग्ने दि॒वेदि॑वे॒ दोषा॑वस्तर्धि॒या व॒यम् । नमो॒ भर॑न्त॒ एम॑सि ॥ ७ ॥

अहोरात्र हे अग्निदेवते वंदन तुज करितो

प्रातःकाळी सायंकाळी आम्ही तुला भजतो

तुझी अर्चना मनापासुनी प्रज्ञेने करितो

लीन होउनी तव चरणांवर आश्रयासि येतो ||७||

राज॑न्तमध्व॒राणां॑ गो॒पामृ॒तस्य॒ दीदि॑विम् । वर्ध॑मानं॒ स्वे दमे॑ ॥ ८ ॥

पुण्ययज्ञि तू विराज होउन विधिरक्षण करिशी

यज्ञाधिपती यज्ञविघ्न नाश पूर्ण करिशी 

हीच प्रार्थना अग्नीदेवा तुझिया पायाशी 

तेज तुझे दैदिप्यमान किती आमोदा वर्धिशी ||८||

स नः॑ पि॒तेव॑ सू॒नवेऽ॑ग्ने सूपाय॒नो भ॑व । सच॑स्वा नः स्व॒स्तये॑ ॥ ९ ॥

आम्ही लेकरे अग्निदेवा मायाळू तू पिता

लाड पुरवुनी तूच आमुचे हरुनी घे चिंता

नकोस देऊ आम्हा अंतर लोटू नको दूर

क्षेम विराजे तुझिया हाती नसे काही घोर ||९||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments