बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते .अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.
वैशिष्ट्ये
(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत.
(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.
(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४)बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.
(५)सर्व कडवी कृष्णाला उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.
आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया
[१]
घालीन लोटांगण वंदीन चरण |
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
—वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे
अर्थ..
कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन .
[२]
त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
——हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे .हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
अर्थ..
तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस .
[३]
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |
करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
——-हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ…
श्रीकृष्णाला उद्देशून
हे नारायणा ,माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.
[४]
अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||
——-वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ…
मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला .
हरे राम हरे राम |राम राम हरे हरे|
हरे कृष्ण हरे कृष्ण |कृष्ण कृष्ण हरे हरे |
——हा सोळा अक्षरी मंत्र “कलीसंतरणं” या उपनिषदातील आहे.( ख्रिस्तपूर्व काळातील असावा.) कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.
अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे .तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो .
– राम कृष्ण हरी
प्रस्तुती – सुश्री माधवी काळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खूप आहे आपल्याकडे असं आपल्याला वाटत असत पण प्रत्यक्षात खरंच तो नसतोच कोणाकडे अशी एक गोष्ट म्हणजे वेळ. हा शब्द किती आपल्या रोजच्या जगण्यात येतो नाही, कदाचित खूप कमी असतो म्हणून डोकावतो का इतका सहज. आपण किती म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. किंवा त्याहीपेक्षा साधंसं म्हणजे हा/ही कधी वेळेवर येईल तर शपथ. हातासरशी आणि वेळेवर करावीत ग कामं असं ऐकतं ऐकतंच तर मोठे होतो की आपण. हातातली कामं बदलत जातात फक्त पण वेळ आपला तसाच. कायम कमी पडत आलेला. हा वेळ म्हणजे वाढत्या ओढाळ वयाच्या मुलीचा फ्रॉक असावा जणू. सतत तोकडा पडणारा. माझी एक मैत्रीण सांगत होती मला परवा की कसं एक नामांकित बाई तिला सांगत होत्या ह्या वेळेवरून. मैत्रीण साधी आहे माझी सरळ, नेटका आणि तो सुद्धा एकटीनं संसार करणारी. मग तिच्याकडे कुठून असणारं वेळ. ह्या बाई एकट्या वर तारांकित व्यक्तिमत्व. मग त्या त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करून सांगू लागल्या की वेळ नसतोच ग कोणाकडे. तो काढावाच लागतो. बघ. तू पण काढत जा. वेळ काढल्यानेच तो मिळतो. आपल्यासाठी आपण नाही वेळ काढणार तर कोण? चार वाक्यात चार वेळा बोलल्या त्या हा शब्द. आणि ती सांगायला जाणार इतक्यात त्यांच्याकडचा संपला बहुदा. मग त्या सरळ निघून गेल्या तिथून. वेळकाळ पाहून माणसं बरेचदा वागतं नाहीत ते असं. सल्ले देणं काय हो सोपं असतं खूप. तितक्या सहजतेनं आपण दुसऱ्याला देऊ शकतं नाही, तो असतो वेळ.
किती लोकांना सतत घड्याळात बघायची सवय असते. सवय काय पटकन लागते आणि चटकन सुटतं नाही. आणि कित्येकदा ती आपल्या सोयीची आणि समोरच्याच्या गैरसोयीची असते. ही पण तशीच एक सवय. आमचे एक काका आहेत. लहानपणी जेव्हा घरी येतं तेव्हा मी असे तिथेच. मांजरीसारखी लहान मुलं पण सारखी पायात घोटाळतात. तर ते आले की जवळपास पाचव्या मिनिटापासून भिंतीवरच्या घड्याळात बघत असत. तेव्हा ते खरंच व्यस्त असत. पण तरीही ते स्वतःहूनच येतं. तरी आल्यावर त्यांना किती हा आपण येऊन मूर्खपणा केलाय असं वाटू लागे बहुदा आणि मग त्यांच्या मनातली ही अस्वस्थता अशी घड्याळात डोकावून व्यक्त होतं असावी. अस्वस्थता किती पाण्यासारखी असते वाट फुटेल तिथून झिरपत राहते फक्त. यथावकाश काकांची व्यस्तता कमी कमी होतं गेली. पण सवय कसली सुटायला. भिंतीवरून मनगटाकडे आणि तिथून पुढे हातातल्या मोबाईल वर येऊन ती स्थिरावली, इतकंच. वेळेचं आणि त्यांचं कधी जमलं नाही, असंच आता म्हणायचं.
अशाच एक खूप जवळच्या बाई. असं ऐकलं आहे खूप की यांना वेळेचं गणित कधी सुटलं नाही. वडील फार मोठा माणूस. लोकसंग्रह फार. नावाजलेलं आणि गाजलेलं नावं. पण ते सुद्धा त्यांच्या कामी आलंच नाही. वेळ नव्हती त्यांच्यासोबत हेच खरंय का मग. इतकं पिकलं पान होऊन गेल्या. ते सुद्धा ह्या अशा काळात आणि मुख्य म्हणजे ह्या अशावेळी जेव्हा कोणीही कितीही इच्छा असली तरी कोणाकडे सहज उठून जाऊ शकत नाही. त्यांना शेवटचा निरोप दयायला सुद्धा जास्त कोणी येऊ शकलंच नाही. वेळच आली होती अशी, काय करणारं. पण वाईट वाटतं. खूप वाटतं आणि….
किती जणांच्या बाबत म्हटलं जात की हा/ही वेळेआधीचं जन्माला आलायं. भविष्याचा वेध घेणाऱ्या माणसांच्या बाबतीत तर किती वेळा ऐकलंय. आपण त्यांना आज समजून घेऊ नाही शकतं म्हणजे आपली कुवत कमी पडली असं म्हणावं का तेच आलेत वेळेआधी असं म्हणावं ह्याचं संभ्रमात राहतो आपण. वेळेला समानार्थी शब्द म्हणून काळ हा शब्द वापरला जातो, मराठीत. आणि ह्या वेळेच्या संदर्भातच नुकत्याच निर्वतलेल्या श्री. मंगलेश डबराल ह्या जागतिक हिंदी कवीच्या शेवटच्या कवितासंग्रहाचे नाव, ‘स्मृती एक दुसरा समय है’ हे असावं आणि ते मला माहित सुद्धा नसावेत ह्याची इतकी खंत वाटते की अजून काही लिहिलं जाणार नाही. आता ते पुस्तक मी विकत घेईन. वाचेन त्यांना. पण वेळ साधता आलीच नाही ह्याची हळहळ कायमचं राहिलं मनात. आता ती स्मृतींमधून उरेल आणि काळ गेला किती तरी पुरेल. इतकंच ——–
संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“मुंगी “तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.’
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.
ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’ अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे “समतोल” तर टिकून राहतोच, माणसाचं “समाधान आणि आनंद”ही त्यामुळे टिकावू बनतो.
कबीरांच्या या दोह्यात असा मोठा “अर्थ “दडला आहे.
चला तर मग आनंदी जगू या ——–
संग्रहिका : सुश्री प्रभा हर्षे
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
भगवान दत्तात्रेयांनी अनेकांना मलंग रूपात दर्शन दिल्याचे उल्लेख वाचनात येतात व लोक चक्क मलंगचा अर्थ मुसलमान फकीर असाच सारख्या वेशामुळे गृहीत धरतात.
नागपूर विद्यापीठातील थोर संशोधक डॉ.म.रा.जोशी यांनी “मलंग” शब्दावर प्रचंड संशोधन करून सर्व इस्लामी देश व भाषातून हा शब्द व त्याचा अर्थ शोधला पण हा शब्द अथवा ही संकल्पना कोणत्याही इस्लामी देश अथवा भाषेत आढळून आली नाही. अधिक संशोधनात केवळ काश्मिरी भाषेत व त्यांच्या तरल लोकात हा शब्द प्रचलित असून त्याचा अर्थ मुसलमान फकीर नसून हिंदू योगी असा आहे.
या शब्दाची व्युत्पत्ती मल्ल+अंग=मलंग अशी आहे. बर्फाच्छादित प्रदेशात योग साधना करणारे योगी सतत आपले शेजारी धुनी पेटवून त्यातील भस्म(राख)आपल्या अंगावर(मल्ल) लावीत असतात व थंडी पासून शरीराचे रक्षण करीत योग साधना करतात. ही धुनी नीट करण्यासाठी लांब चिमटा व फळे गोळा करण्यासाठी व पाणी पिण्यासाठी कठिण कवचाच्या फळाचाच बनविलेला कटोरा वापरतात व काश्मिरी लोकांसारखा(फकीरसदृष) वेष करतात त्यामुळे लोक मलंग म्हणजे फकीर असाच अर्थ समजतात.
डॉ.म.रा.जोशी यांनी अनेक पुराव्यांनी हे सिद्ध केले आहे.
श्री विलास चारठाणकर, इंदौर.
प्रस्तुति – कालिंदी नवाथे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो.. साखरची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात, डाळपन्हं, आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते. तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.
दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी.. काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता… असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं.. तेंव्हा खुशाल समजावं.. ऋतु गाभुळतोय.
निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होउन जातं, उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं वीज रसपोळीनं सुस्तावलेली दुपार.. धावपळीची होते. झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते.. उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात मोगर्याचे ताटवे विरळ होउ लागतात, मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात.. खुशाल समजावं तेंव्हा.. ऋतु गाभुळतोय.
उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपण ही आतुरतो…. तेंव्हा अगदी खुशाल समजावं…… ऋतु गाभुळतोय……
बायको कशी असावी ? तर बायको असावी वाल्या कोळयाच्या बायकोसारखी…..
रामायण न वाचलेला, किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो.
रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात…!—
‘पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा’!
‘पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !’,
भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !’,
‘पत्नी असावी तर सीतेसारखी !’
‘भक्ति व शक्ति असावी तर ती हनुमंतासारखी’
सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले— बायको कशी असावी?
—-आणि मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला. खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे. खरं तर या सर्व दाखल्यांपूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा—–. तो म्हणजे,
——‘बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !’
कारण तीच खरी रामायणकर्त्याची ‘कर्ती ‘ आहे, हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.
—वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले., तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले—–.
‘अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस’ असे विचारल्यावर, ‘माझ्या बायको-पोरांसाठी’, असं त्याने सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, ‘जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?.
‘तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो’ म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकावून विचारतो. ‘बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही?’
——आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?
——-पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, ‘नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही !’ असे सडेतोडपणे सांगितले.
—–आणि
–तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.
— गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा वाल्मिकीऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो.
—— ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही, की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने, ‘व्हय..आम्ही आहोतच की तुमच्यासंग !’, असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?
नारदाचं काही खरं नव्हतंच— पण, वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते.
पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या ” “सुसंस्कृत भारतीय गृहिणी” नकार देतील तर —-तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!
फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे. असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल व पुन्हा एकदा आपल्या भारत ‘भू’ वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्याकोळ्यांचे वाल्मिकीमुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल…यात शंकाच नाही…!!!
आपणास काय वाटते?——
संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈