संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो. डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती… त्यात काही पाय गमावलेले, हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले, तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते. मग त्यात काही नर्तक होते, चित्रकार होते, मॅरेथॉन धावणारे होते, ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला … आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली. ते शब्द होते ….
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर …
त्या साऱ्या मंडळींची जिद्द, त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते. ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती.
नेमका दोन चार दिवसांनी मला ‘ इंद्रधनू पुरस्कार ‘ जाहीर झाला. ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला. त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली. लोकांची छान दाद मिळली. कार्यक्रम संपताच शं. ना. नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले, ‘ एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?’ मी म्हटलं, ‘ बोला काय आज्ञा आहे ?’ तर म्हणाले, ‘ आत्ता जी कविता ऐकवलीत, तीच हवी आहे. काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं.’ माझ्याकरता ही मोठी दाद होती. मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं, ‘ आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता …’ ते म्हणाले, ‘ का ? अहो, ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे. हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तेव्हा ही सादर करत चला यापुढे..’
माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ‘ कसे गीत झाले ‘ या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात.
परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला. कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो. ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ‘ कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता. माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते. त्यांच्या भावना दुखावल्या तर ?
मी भलतीच कविता म्हटली. योगिताचा गोंधळ उडाला होता. मी ती कविता विसरतोय, असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती. अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो. अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला. तिलाही तो पटला. हुशारीने सावरून घेत ती म्हणाली, ‘ आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !’ इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली, ‘ गुरू ठाकुरांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये ‘ ही आयुष्यावरची कविता सादर करावी. मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत. खूप प्रोत्साहन देतात. मला पूर्ण कविता ऐकायची आहे.’ माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणाचाही अवलंब न करता मी सुरुवात केली …
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ………!!
असे जगावे
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
– श्री गुरू ठाकूर
संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ; “मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”
२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ? जी मोजता येत नाही ती खरी उंची.”
३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं,” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ? एक हिरा लुकलुकला. म्हणाला, “वेडा रे वेडा !!”
५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘करून बघायचं कि बघून करायचं, ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’
संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कुसुमाग्रजांची एक कविता आहे,
‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरली जणु तारकादळे नगरात,
परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हां,
त्या माजघरातील मंद दिव्याची वात.’
आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणार्या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरात रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणार्या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो, “मन एव मनुष्यः”, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.
(पुलंनी अमेरिकेत केलेल्या एका भाषणातून)
संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈