मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शिक्षण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “शिक्षण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

शिक्षण किती झालंय तुमचं?

‘ मी डॉक्टर, मी इंजिनीयर, मी वकील,मी शिक्षक, मी एम.बी.ए.,मी शेतकरी, मी ऑफीसर,मी दुकानदार, मी एम. ए. पीएच डी डॉक्टरेट  मिळवली – – ‘ 

‘वा वा अभिनंदन अभिनंदन..  अरे वा  म्हणजे बरचं शिक्षण झालय तुमचं. व्यवसाय चांगला करताय आता इतकं शिकलात तर तुम्ही हुशारच असणार म्हणा .. मग एक विचारू का?

— मी एक छोटी परीक्षा घेते .. काही  वाक्य विचारते ..  ती म्हणायला शिकलात का? पण खरी उत्तरं सांगा हं ….. 

बायकोला कधी हे म्हणालात का?– 

” तू संसार चांगला केलास, घर नीट ठेवतेस, तुझी रांगोळी रेखीव असते, स्वयंपाकात  सुगरण आहेस, सगळ्यांची सेवा करतेस, घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत केलीस, नाती जपलीस “

….. तशी ही यादी मोठी आहे.  तूर्तास या साध्या सोप्या प्रश्नांची  तर उत्तरं द्या ‘ 

 

‘ अरेच्चा एकदम गप्प का झालात ? आत्ता आठवत नाहीये का..? वाटलं तर विचार करून थोडा वेळ घेऊन उत्तरं द्या …. 

काय म्हणताय ….. ‘ हे तेवढं राहिलं….’…… असं कसं बरं झालं…? हेच नेमकं  शिकायच राहिलं ?

का हा विषयच ऑप्शनला टाकला होता का.. याचा अभ्यास केला नाही….. बरं .बरं..असू दे असू दे. 

होत अस बऱ्याच जणांचं … ‘ 

 

मग आता करा की हा कोर्स …. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरही हे शिकता येतं … वयाची तर काहीच अट नाही

ऑनलाइन.. करस्पॉन्डन्स.. सिलॅबस…. ते तुमचं तुम्ही ठरवायचं किती दिवसांचा आहे … कधी पूर्ण होईल … परीक्षा कधी आहे ??? 

…. सांगते सांगते… सगळं नीट सांगते

… तुम्ही कसा अभ्यास कराल त्याच्यावर हे अवलंबून आहे … परीक्षेची वेळ तुमची तुमची … 

 रिझल्ट ताबडतोब समोर प्रत्यक्ष दिसेल …  

आणि फी….सांगते ना…..

एकदम किती प्रश्न विचारता?

 

आणि हो … हा प्राथमिक कोर्स झाला …. असे बरेच आहेत …

हळूहळू त्याची पण माहिती देईन ..  सध्या तरी इतकं पुरे

 

विचार कसला करताय…. हुशार आहात जमेल तुम्हाला … घ्या की अॅडमिशन

आधीच उशीर झालाय राव … करा अभ्यासाला सुरुवात … 

…. अरे एक सांगायच राहिलं .. याची गाईड बाजारात नाहीत .. हा विषय स्वयंशिक्षणाचा आहे

हवी असेल तर मी मदत करीन. मला फी पण नको .. मग लागा तयारीला .. प्रॅक्टीस केली की जमेल

 

आणि हो … रिझल्ट लागला की या पेढे घेऊन ..वाट बघते……ऑल द बेस्ट !! ‘ 

…….

साने  काका घरी आले होते .. काकांनी हे वाचलं आणि हळुवार आवाजात म्हणाले

‘ मी त्या कोर्सला अॅडमिशन घ्यायच्या आधीच नापास झालो आहे ..

ही वर गेली .. आता हे सांगायच  राहून गेलं. मला कधी सुचलंच नाही बघ .. नेहमी गृहीत धरलं तिला सगळ्या बायका हेच तर करतात त्यात काय विशेष .. त्याचं काय कौतुक करायचं असं मला वाटायचं ती असेपर्यंत कधी त्याची किंमत कळली नाही तुला एक सांगू .. तू त्या कोर्समध्ये अजून एक विषय ॲड कर …

… आयुष्यात कधीतरी  ” माझं तुझ्यावर प्रेम आहे ” .. हे बायकोला एकदा तरी सांगा असं लिही ….

ती गेली आणि मग मला समजलं माझं तिच्यावर प्रेम होतं…”

 

हे बोलता बोलता त्यांचा आवाज विलक्षण कापरा झाला होता..

” काका खरं तर आम्हा बायकांना ते न सांगताच माहीत असतं   जाणवतही असतं….

आतल्या आत…”

“असेल …कदाचित  तसही असेल…”

“तरीपण बोलुन दाखवल तर आनंद होईल की नाही ?..”

“हो हे तुझं अगदी पटलं मला ” 

“आजारपणात तुम्ही काकूंची काळजी घेत होता … तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या …’ यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कसं होईल ग यांच  माझ्या नंतर…’. 

” हो खरंच असं म्हणाली होती ती?…”

”  हो काका…..”

……. काकांचे डोळे भरून वहात होते……

 

पंच्याऐशींच्या सानेकाकांना समाधान व्हावे यासाठी खोटं बोललं तरी देव मला माफ करणार आहे……

हे मला पक्कं माहित आहे… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “Minimalism…” — ☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

??

☆ “Minimalism…” — सौ. प्रतिभा कुळकर्णी 

आज सकाळीच महिन्याचे वाणसामान आले होते. त्यातील बरेचसे खराब होईल म्हणून फ्रीज मध्ये ठेवण्यासारखे होते. त्यासाठी मी चक्क बैठक मारून फ्रीज च्या पुढेच बसून विचार करत होते. इतक्यात माझ्या एका जवळच्या मैत्रीणीची मुलगी नीता खास आम्हाला भेटायला आली. ही स्वतः इंजिनिअर आणि उच्चपदस्थ असून ही अतिशय टापटीपीने संसार करणारी आणि सासू सासऱ्यांची लाडकी सून.

 

माझा एकंदरीत अवतार बघून म्हणाली, ” मावशी काय ग हा पसारा मांडून बसली आहेस? “

मी तिला माझी व्यथा ( हो व्यथा च तर काय…) सांगितल्यावर म्हणाली, 

” रागावू नकोस मावशी, पण म्हणूनच आम्ही हल्ली minimalism lifestyle अंगिकारली आहे. म्हणजे काय तर, कंजूष पणा नाही . पण शक्यतो जेवढे लागेल तेव्हढेच आणायचे. आधी प्लॅनिंग केले की छान जमते. अवास्तव पसारा वाढवायचाच नाही. तू पण पुढल्या महिन्यापासून काकांना तशी लिस्टच काढून दे.” मला ही हे पटले. काका तर काय (मिशीतल्या मिशीत) हसतच होते. 

गप्पा मारता मारता तिने येताना आमच्यासाठी आणलेला इडली सांबारचा नाश्ता केला. दुपारच्या जेवणासाठी ही मस्त रस्सा भाजी घेऊन आली होती. त्यामुळे मस्त मनसोक्त गप्पा मारल्या आणि आमची बॅटरी चार्ज करून गेली सुद्धा……

जाताना मला मात्र food for thought देऊन गेली.

 

ती गेल्यावर मी माझ्याच दोघांनी सुरु केलेल्या आणि आता पुन्हा दोघांवरच येऊन ठेपलेल्या संसाराकडे त्रयस्थपणे नजर टाकली. एक सर्कल पूर्ण झाले होते….

अक्षरशः दोन बॅग्ससह सुरु केलेल्या संसाराचा केवढा हा पसारा….आता खरच आवरायला हवा. 

Minimalism स्वीकारायलाच हवे….

 

आणि मग डोळ्यासमोर आली एक एक घरातील वस्तू….

कपड्यांनी खचाखच भरलेली कपाटं, पुस्तकांनी भरलेले शेल्फ, हौस हौस म्हणून घेतलेले तर्‍हेतर्‍हेचे क्राॅकरी  सेट्स, भांडीकुंडी हे सारेच आता कमी करायलाच हवे….

अनावश्यक वस्तूंचे Minimalism….

 

मग मनाशी विचार आला, वस्तूच काय….आपण स्वतःकडून आणि इतरांकडूनही किती अपेक्षा ठेवतो. 

मी ह्यावेळेस असे वागलेच पाहिजे, हे केलेच पाहिजे……

मुलांनी, नातेवाईकांनी माझ्याशी असे वागावे, असे वागू नये….

नुसत्या अपेक्षाच नव्हे तर तसे घडले नाही तर मनस्ताप ही होतो. मग डिप्रेशन, बिपी ,शुगर मध्ये वाढ…

कशासाठी हे सारे???

त्यांच्याही काही अडचणी  असतीलच की ….म्हणूनच आताची मुलं म्हणतात तशी प्रत्येकालाच त्याची space देऊया.

आपली मुलं, आपल्या मित्र मैत्रीणी ,जीवाभावाचे नातेवाईक ह्यांच्यावर आता निरपेक्ष प्रेम करण्याची वेळ आली आहे. 

हेच तर अवास्तव अपेक्षांचे Minimalism….

 

हे दुष्टचक्र एवढ्यावरच थांबत नाही. मग सुरू होतात राग/ रुसवे…….

मीच का साॅरी म्हणू ? गरज तिला/त्याला ही आहे…अशा नको त्या मानापमानाच्या कसरती!

ह्यातून निष्पन्न होतो तो फक्त नात्यात दुरावा…

ह्या सगळ्यावर उपाय एकच राग / रुसव्या चे Minimalism!

आपल्या ह्या संसारातून परमेश्वरही सुटला नाही आहे बरं का….

कोणतेही व्रत, नामस्मरण करताना आपण ते निरपेक्षपणे किती करतो हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा. काहीही मागितले नाही तरी फक्त, ” आम्हा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे” एवढे तरी मागणे असतेच.( खरंतर लांबलचक लिस्टच असते…)

आता येणाऱ्या नवीन वर्षात मात्र शांतपणे परमेश्वराचे मनापासून नामस्मरण करुया आणि खरच minimalism lifestyle जगण्याचा प्रयत्न करुया. 

अवघड आहे (कारण अनेक गोष्टीत आपली भावनिक गुंतवणूक असते…) पण अशक्य नक्कीच नाही.

© सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमचा सांताक्लॉज…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमचा सांताक्लॉज…” 🎅🏼☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिक्षेकरी याचक मंडळींनी भीक मागणे सोडून काम करावे यासाठी मी प्रयत्नरत असतो.

दिसेल त्या संधीतून यांच्यासाठी काय व्यवसाय निर्माण करता येईल याचा सतत विचार करत असतो.

कॅलेंडर दिसले, दे नवीन वर्षात विकायला…

झेंडूची फुले दिसली, दे दसऱ्याला विकायला..

पणत्या दिसल्या, दे दिवाळीत विकायला…

टाळ दिसले दे, वारीत विकायला…

चार वर्षांपूर्वी असाच कचरा दिसला होता… भिक्षेकरी मंडळींना तो कचरा साफ करायला लावून पगार दिला होता. या उपक्रमात काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली… या टीमला आम्ही मग युनिफॉर्म दिले आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करायला शिकवलं.

….. या टीमचं नाव आहे “खराटा पलटण” ! 

गेल्या चार वर्षापासून; सातत्याने दर आठवड्याला सार्वजनिक जागांची स्वच्छता आमच्या या टीम कडून करवून घेत आहोत. बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत.

सांगायला अभिमान वाटतो की आमची ही खराटा पलटण पुण्याच्या “स्वच्छता अभियान” ची ब्रँड अँबेसिडर आहे.

एक भाकरी दिली तर एक वेळ पुरते….

धान्य दिले तर पंधरा-वीस दिवस पुरते…

पण स्वाभिमानाने भाकरी कमवायची अक्कल शिकवली तर ती आयुष्यभर पुरते… !

चिखलात कमळ उगवते असे म्हणतात…

रस्त्यात पडलेल्या कचऱ्यातून आमची भाकरी स्वाभिमानाने उगवत आहे… ! 

तर येत्या नाताळला सुद्धा खराटा पलटण कडून स्वच्छता करून घ्यावी, सहकाऱ्याला सांताक्लॉज बनवावे, सर्व काम झाल्यानंतर अचानक तो येऊन सर्वांना आश्चर्यचकित करेल… याशिवाय भेटवस्तू आणि पंधरा-वीस दिवस पुरेल इतके गहू तांदूळ आणि इतर किराणा देईल असा प्लॅन होता.

पण महिनाअखेर असल्यामुळे संस्थेतील पैशाला अगोदरच वाटा फुटल्या होत्या. जे पैसे शिल्लक होते ते 31 तारखेला इतर कारणांसाठी खर्च होणारच होते. किराणा घेण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते.

जाऊ दे, बघू जानेवारी महिन्यात… असं म्हणून नाराजीने नाताळाचा प्लॅन मी कॅन्सल केला… ! 

नाताळचा दिवस सुरू झाला आणि पितृतुल्य श्री अशोक नडे सर यांचा मला दुपारी फोन आला.

“ अरे अभिजीत, आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस ! या निमित्ताने माझ्या मुला – मुलीनी एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे. आमची धान्यतुला करणार आहेत. आमच्या वजनाइतके धान्य तसेच वर आणखी काही भर घालून 250 किलो पर्यंतचे धान्य तुझ्या लोकांना द्यायचे आम्ही ठरवले आहे आज संध्याकाळी कार्यक्रमाला ये आणि जाताना सर्व धान्य घेऊन जा… “

मला शब्दच फुटेनात… हा योगायोग म्हणावा ? की आणखी काही ? 

…. एखादी गोष्ट ठरवावी… ती रद्द व्हावी आणि पुन्हा कोणीतरी येऊन… ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत करून द्यावं… ! 

प्रत्येक वेळी आपल्यापैकीच हे ‘कोणीतरी’ बनुन दरवेळी माझ्या आयुष्यात येतं…

दररोज तुम्ही माझ्या आयुष्यात सांताक्लॉज बनून येता… आणि माझा रोजचा दिवस नाताळ करून जाता… ! 

मी नतमस्तक आहे आपणा सर्वांसमोर !!! 

मातृ-पितृतुल्य नडे पती पत्नी ; यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या…

त्यांच्यासमोर सुद्धा नतमस्तक झालो… ! 

25 तारखेला नाताळच्या संध्याकाळी सर्व धान्य आणले 

26 डिसेंबरला इतर तयारी केली आणि आमच्या आयुष्यात 25 तारखेच्या ऐवजी 27 तारीख नाताळ म्हणून उजाडला !!! 

आमच्या वृद्ध आज्यांची खराटा पलटणची टीम बोलावली, सार्वजनिक भाग आम्ही सर्वांनी झाडून पुसून स्वच्छ केला.

गंमत करावी म्हणून मी त्यांना काम झाल्यावर तोंड पाडून म्हणालो, ‘आज तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही’ 

त्यातल्या आज्या मनाल्या, “ आसुंदे दरवेळी तू लय काय काय देतूस, एकांद्या बारीला नसलं म्हनुन काय झालं?“ 

“ तू तर एकटा कुटं कुटं आनि किती जणांचं बगशील लेकरा ? “ त्यांचे खरबरीत हात माझ्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर फिरवत त्या काळजीने म्हणाल्या.

माझ्या डोळ्यातून अश्रू आले… ! 

याच वेळी तुम्हा सर्वांची आठवण झाली… आणि मी “एकटा” नाही याची जाणीव झाली.

… आईच्या पदराला खिसा नसतो परंतु तरीही लेकराला ती काहीतरी देतच असते….

… बापाच्या सदर्‍याला पदर नसतो परंतु दरवेळी तो लेकराला सावली देतच असतो… ! 

माझ्या आयुष्यात भेटलेले हे याचक लोक सुद्धा कधी माझी आई होतात, काहीतरी देत राहतात….

कधी बाप होतात आणि मलाच सावली देत राहतात…

कसे ऋण फेडावे यांचे… ???

डोळ्यातलं पाणी झटकत मी मग सहकाऱ्याला खूण केली… तो नाचत उड्या मारत हातात काही भेट वस्तू घेऊन आला. आमचे लोक आश्चर्यचकित झाले…

भानावर आल्यानंतर ते मूळ पदावर आले…. “ मुडद्या फशीवतुस व्हय आमाला “ असं म्हणत चप्पल घेऊन त्या माझ्या मागे धावल्या…. आणि सगळे हसायला लागले… ! 

यानंतर नडे साहेबांनी दिलेलं धान्य आमच्या सांताक्लॉजने त्यांना वाटून टाकलं… ! 

आमच्याकडे रोषणाई नव्हती… पण माझ्या म्हाताऱ्या माणसांचे डोळे आनंदाने चमकत होते….

आमच्याकडे ख्रिसमस ट्री नव्हता… पण स्वयंपूर्ण होण्याचं रोपटं आपण सर्वांनी मिळून लावलं होतं…

आमचा नाताळ आज खऱ्या अर्थाने साजरा झाला…. !

आज सांताक्लॉज त्यांना भेटला 

आणि मलाही भेटला…. तुम्हा सर्वांच्या रूपात…!!! 

नतमस्तक आहे…!!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे

खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट. एका छोट्याशा गावात आकाशवाणी होते, “ज्यांना स्वर्गप्राप्ती हवी असेल त्यांनी संध्याकाळी गावाच्या वेशीवर जमावे. ” संध्याकाळी जवळजवळ सारा गाव वेशीवर जमा होते. काळोख पडण्याच्या सुमारास पुन्हा आकाशवाणी होते, “आता सर्वांनी आपापल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधाव्यात आणि जंगलाच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी. ” 

त्याप्रमाणे डोळ्यांवर पट्ट्या बांधून गावकरी चालू लागतात. पडत, ठेचकाळत, तोंडाने शिव्याशाप उच्चारत काही तास वाटचाल केल्यावर पुन्हा आकाशवाणी होते, “तुमच्यापैकी तिघांनी माझी आज्ञा पाळली नाही. त्यांनी डोळ्यांवर पट्टी का बांधली नाही ह्याची कारणे सांगावीत!”

“मी व्यवसायाने वैद्य आहे”, पहिला इसम बोलला, “ह्या जंगलात बर्‍याच औषधी वेलीवनस्पती आहेत. मी त्यांचे वर्णन आणि उपयोग लिहून ठेवत आहे. तो कागद इथेच सोडणार. पुढेमागे ह्या वाटेनं जाणाऱ्या कुणाला तरी तो सापडेल आणि समाजासाठी उपयोग करेल!”

“मी चालू लागल्यावर लगेचच ठेचकाळून पडलो. ” दुसरा इसम बोलला, “मनात विचार आला की, असे बरेचजण पडत असतील म्हणून मी पट्टी काढून टाकली आणि पडणार्‍यांना आधार देऊ लागलो!”

“मी पट्टी बांधलीच नाही, ” तिसरा इसम म्हणाला, “कुणीतरी सांगतो म्हणून तसं वागायचं माझ्या स्वभावात नाही. माझा मार्ग मी निवडतो. मग खड्ड्यात पडलो तर मी मलाच दोष देईन. मजल गाठली तर ते यश माझेच असेल!”

“तुम्हा तिघांनाही आपापला स्वर्ग सापडला आहे”, पुन्हा आकाशवाणी झाली, “तुम्ही इथून परत फिरलात किंवा असेच पुढे चालत राहिलात तरी चालेल. इतरांनी मात्र आपली वाटचाल चालू ठेवावी!”

थोडक्यात काय तर, प्रत्येक माणसाचा स्वर्ग हा पृथ्वीवरच आहे आणि ह्या पृथ्वीचा स्वर्ग करायचा की नरक हे त्या माणसाच्या हातातच आहे.

उदाहरणार्थ, नदीला देवी म्हणून पुजत असतानाच नदीचे गटार करण्याचा नीचपणा आपल्याला सोडावा लागेल. स्त्रीची देवी म्हणून आरती करताना स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, असे समजणे सोडून द्यावे लागेल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आलेलीच श्रेष्ठ-कनिष्ठतेची वृत्ती सोडून द्यावी लागेल. प्रत्येक माणसाशी माणसासारखा माणुसकीने व्यवहार करावा लागेल. स्वतःच्या जबाबदारीवर जगायला शिकावे लागेल. मगच दृष्टिकोन बदलला तर विचार बदलेल आणि विचार बदलले तर पृथ्वीचा स्वर्ग होईल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला..  “हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही.  आपलं वर्ष गुडीपाडव्याचं..  “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो..  “ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

“ मला रोजची तारीख माहिती..  माझं सगळं नियोजन तारखेवर… म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

“ मग पाडवा? “

“ तो ही माझा आहेच.  मी आनंदाचा प्रवासी, जिथे आनंद तिथं मी.  ‘शादी किसीकी हो, अपना दिल गाता है. ’

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड…  खरं तर प्रत्येक सकाळ ही एका नववर्षाची सुरुवात असते.  ‘ सवेरेका सूरज हमारे लिये है ‘ असं म्हणणारा कलंदर मी…..  

….  ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो.  

हर एक पलको खुशी से गले लगाते जियो 

..  हीच वृत्ती असावी.  खरं म्हणजे प्रत्येक क्षणच नवा असतो, नवा जगायचा असतो.  कोणता क्षण अंतिम असेल हे काय ठाऊक? म्हणूनच प्रत्येक क्षण साजरा करावा.  प्रत्येक दिवस साजरा करावा.  पण रोज साजरा करायला जमतंय कुठं? जमलं तर तेही करावं.  कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.  म्हणूनच – – 

..  ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग…’ असं म्हणत मित्रांनो साजरा करूया “ निखळ आनंद “….  

..  मग तो कुणाचा का असेना..  आणि कधीही का असेना !!!

….  तर चीssssssssअsssssर्सssss !! 

…  , हॅप्पी.. , न्यू.. , इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर

सरत्या वर्षाला निरोप – – –

बोलता बोलता 2024 सरल निरोप देतांना आपण या वर्षात काय मिळवलं, काय सोडलं, काय चुकलं आणि काय राहून गेलं हे मनातील विचार मंथन चालू झालं….

” माणुसकी हरवली का, ती जपली का?.  हेच प्रश्न मनाला विचारले…   

स्वतः साठी किती जगलो, समाजासाठी किती पळालो, दुसऱ्यांना किती उपयोगी आलो…

” मनातील वाईट विचार काढून चांगले विचार आत्मसात केले हे महत्वाचे…

” सकारात्मक विचाराने तर प्रगल्भ विचारांची देवाण घेवाण होते व समाज प्रबोधन होते एक सुंदर संदेश समाजास मिळतो…

” नकारात्मक विचार आनंद मिळू देत नाही, गैरसमज निर्माण करून नाती टिकू देत नाही हे लक्षात घ्यायला हवं…

आपण, समाजाचे काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेऊन कार्य केल तर निस्वार्थी समाज सेवा घडली जाते यात शंकाच नाही…

सात्विक विचार दुसऱ्याप्रति आपुलकीची भावना कळकळ हे आदर्श माणुसकीचा ठेवा आहे तो सर्वांना मिळावा थोडं तरी दुःख हलकं होईल…

” एक अशीच पोळीभाजीच कामं करणारी महिला होती, खूप गरीब आणि प्रामाणिक होती…

” बिचारीला पतीदेवांचे सुख अजिबात नव्हते सतत भांडणं तिला मारणे चालू होते…

एक दिवस तिला खूप मारलं रक्त आलं तोंडातून हिरवं निळं अंग झालं…

त्याही परिस्थितीमध्ये ती माझ्याकडे आली बॅग घेऊन म्हणाली “.  मी आता इथे राहत नाही मी माहेरी जाते… मी तिला म्हणाले तू आज इथे रहा आपण उद्या बोलू.

” तिला चार दिवस ठेऊन घेतलं, समजून सांगितलं थोडा राग शांत झाला तब्बेत सुधारली… ” तिला म्हणाले तू वेगळी रहा, इथेच कामं करतेस ते कर..  जून वाढव … पण माहेरी जाऊ नको…  

जो मान तुला इथे राहून मिळेल तो माहेरी काम करूनही मिळणार नाही ” तिला ते पटलं आणि ती रूम घेऊन राहायला लागली… 

” बऱ्याच वर्षांनी मी तिच्याकडे गेले तर चाळीतील घर जाऊन दोन माजली माडी झाली होती.  तो एक योग्य सल्ला योग्य निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आणि तीच आयुष्य सुधारलं….  

, ” माणुसकी, सकारात्मक विचार योग्य दिशा दाखवतात…

” नवीन वर्ष सुरु झाल्यावर मनाशी संकल्प करावा आणि तो वर्षात पूर्ण करावा…  

” मी, स्वतःसाठी जगेनच पण इतरांना वेळेनुसार मदत करेल… 

गरिबांना मदत करेल परिस्थिती नुसार गरीब मुलांना शिक्षण देईल…  

 ” निराधारांना आधार अनाथ मुलांना आश्रय देईल, माझ्या कुवतीनुसार मी नक्कीच प्रयत्न करेन….

” आज पैसा, यश, समृद्धी सगळीकडे आहे नाही फक्त ” वेळ “..  तो देता आला पाहिजे…  

” आई वडील वयस्कर झाले मुलं परदेशीआहेत, त्यांना सांभाळायला 50 हजार पगार देऊन केअरटेकर ठेवले सर्व सुविधा दिल्या…. तरीही आई वडील नाराज राहू लागले त्यांचं मन उदास असल्याने तब्येत बिघडू लागली…

” त्यांना हे काही नको होत, फक्त मुलांचं प्रेम आणि नातवंडाचं सुख हवं होत…  

“मुलांनी आई वडिलांच्या प्रेमाच्या मायेच्या बदल्यात काय दिल तर पैसे फेकून केअरटेकर… हे प्रेम आहे कि उपकाराची परतफेड… तसं असेलतर आई वडिलांचे उपकार कुणीच फेडू शकत नाही.

विचार आला मनात ” आपण माणुसकी जपली ना, काहीतरी कार्य केल ना… तेंव्हा मन म्हणतं हे वर्ष सुंदर गेलं, नवीन वर्षात अजून कामं करेन… 

“खूप प्रश्न भेडसावत आहेत समाजात खूप प्रश्न सोडवायचे बाकी आहेत.

“वाढते वृद्धाश्रम, बेकारी, मुलांचे लग्न हा तर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे…

“समाजात परिवर्तन घडवणं आपलं काम आहे, अपेक्षा करण्यापेक्षा आव्हानाला सामोरं जाऊन स्व कष्टाने मिळवलेलं कधीही चांगलं…  

“ज्या आईवडिलांनी घडवलं पायावर उभं केलं याची जाणीव ठेवून दोन शब्द प्रेमाने बोलून त्यांना सांभाळणं हे लक्षात ठेवले तर वृद्धाश्रमाची गरज कशाला लागेल.

“सरते शेवटी काय झालं, काय केलं, हा आनंद मनात ठेवून काय राहिलं, याचा संकल्प करून 2024 ला निरोप देऊन 2025 च स्वागत करूया…

© सौ.  वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या), नऱ्हे, पुणे

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

(सरत्या वर्षाला निरोप )

मित्रा तुला अलविदा म्हणतांना खूप गहिवरून आलंय रे

तू नव्याने आलास तेव्हा तुझं जंगी स्वागत झालं

एक आनंदतरंग घेऊन आलास तू माझ्या जीवनात

माझ्या सुखदुःखाच्या क्षणांशी एकरूप झालास

संकटसमयी माझं बळ शक्ती ठरलास

माझ्या आनंदात दिलखुलासपणे सहभागी झालास

तुझ्या कुशीत मी कधी अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली

तू आंजारलं गोंजारलंस प्रेमानं सांत्वन केलंस

… आणि आता क्षण येऊन ठेपलाय …. तुला निरोप देण्याचा

 

तुझ्याशी खूप बोलायचयं… काही सांगायचयं … पण तू तर निघालास

काय म्हणालास मित्रा ?.. काळ कोणासाठी थांबलाय ?

बरोबर आहे मित्रा तुझं ….

माझीचं सगळी गात्रं थकलीत, मीच नाही धावू शकले तुझ्या वेगाने

 

 

तू निघालास मित्रा पुन्हा कधीही परत न येण्यासाठी

पण तुझ्या आठवणी मी जपून ठेवल्यात ह्रदयकुपीत

अलविदा मित्रा…… अलविदा.. अलविदा.. अलविदा….

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

(साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू? ) – इथून पुढे 

त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!

सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..

मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. ‘हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे. ‘ एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर.. ! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता.. !

तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!

कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो..

“तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका.. !”

त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..

सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!

“प्रारंभी विनती करू गणपती.. “

दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!

‘प्रणम्य शिरसा देवं’, ‘शांताकारं भुजगशयनं. ‘, गणपती अथर्वशीर्ष… ‘ च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या –

महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि

स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:

अथावाच्य..

आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!

ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो… सहीसही ती भूमिका वठवत होतो.. ‘काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!’ असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!

‘गंधाक्षतपुष्पं समर्पयमि.. ‘ असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..

“अबे … उस्मान … वो फुल उधर नजदिक रख ना.. !”

फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं.. !

गणेशपुजन सुरू असतांनाच, “अबे … उस्मान …”?

पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात.. !

“धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.. ” दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती.. की होता?!

सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..

‘अब मुझे जाना होगा.. देर हो गई है.. ‘ असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..

अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? ‘यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे’ – हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता.. !

निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं.. वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा… !

तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?

‘आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे.. ‘ अल्लाजानने माहिती पुरवली..

मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ.. आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..

‘अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?’ मी अलाजानला विचारलं..

“डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!”

अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी… सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !

मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत.. !

– समाप्त – 

लेखक : श्री तात्या अभ्यंकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये.. कॅशियर कम मॅनेजर होतो मी.. आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक.. अस्वस्थ करणारे.. आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक.. पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..

बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच.. त्याशिवाय रोज एखादी ‘काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?” असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा.. कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. “क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है.. साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना. ” असं म्हणून मला दमात घ्यायचे..

कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. ‘ए तात्या… म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू.. ‘ अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत.. मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून ‘सौ किलो.. !’ असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!

गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्‍यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही.. ) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्‍याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्‍यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्‍यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..

झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्‍या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. ‘तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. ‘दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका.. ‘ असं आग्रहाचं बोलावणं असायचं.. ! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..

संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो.. पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. “गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?”

मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्‍याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला ‘अय्यप्पा-गणेश’ स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्‍या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने.. !

हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?

मला सांगा – एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्‍यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?

लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे.. ! 

तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..

“मालिक, थोडा नाष्टा करो.. “

“बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका.. !”

बापरे.. ! ‘मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?’ मला काही खुलासा होईना.. ‘बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं.. ‘ अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!

समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. ‘आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं’ असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!

“आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका.. !”

न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!

ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! ‘सगळं झुगारून निघून जावं का इथून?’ हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..

‘देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे.. ‘ या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे.. !

साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री तात्या अभ्यंकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ येतो… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ येतो…  ☆ श्री मंगेश मधुकर

आपल्याकडं “जातो” असं म्हणत नाही …. म्हणूनच “येतो” म्हटलं.

नमस्कार !! 

मी २०२४ …. निरोप घ्यायला आलोय, पुन्हा भेट नाही. आता ‘मी’ फक्त आठवणीत,

अवघ्या वर्षभराची आपली सोबत. तरीही ऋणानुबंध बनले. वर्षभरातल्या सुख-दु:ख, चांगल्या-वाईट

घटनांचा ‘मी’ साक्षीदार… 

कोणासाठी खूप आनंद, कोणासाठी अतीव दु:ख, कोणासाठी लकी तर कोणासाठी दरिद्री.

.. कोणासाठी दोन्हीही….. या निरोपाच्या वेळी हितगुज करावसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच.

 

नवीन वर्ष सुरू होत असलं तरी आपलं आयुष्य मात्र तेच ते आहे.

नेटवर्क, टेंशन्स आणि ट्राफिक हे आता अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकेच जगण्याचा भाग आहेत.

तुम्ही म्हणाल की, , जातोयेस तर गप जा. उगीच उपदेश कशाला?’

– – बरोबर आहे. आजकाल कोणाला शिकवलेलं आवडत नाही. पुढच्यास ठेच अन मागचा शहाणा या म्हणीला आता काही अर्थ उरलेला नाहीये….. सगळं कळत असूनही लोकं ठेचा खातात. त्याच त्याच चुका करतात. काही वेळीच शहाणे होतात. अनेकजण दुर्लक्ष करतात… पुन्हा पुन्हा ठेचकळत राहतात.

असो..

 

अनुभवावरुन सांगतो, आज जगण्यातल्या वाटा निसरड्या आहेत. आयुष्य असुरक्षित झालयं.

कधी, कुठं, काय होईल याचा नेम नाही. व्यवहाराला अतोनात महत्व आल्यानं, प्रेम, आपुलकी यावर ‘तात्पुरतेपणाचा’ गंज चढलाय. सर्व काही असूनही अस्वस्थता आहे. माणसं एकटी आहेत….

जो तो आपापल्या कोषात राहतोय. नात्यातलं अंतर वाढतयं. गॅझेटस कितीही अडव्हान्स झाली तरी भावनिक आधार देत नाही. मायेचा, विश्वासाचा, प्रेमाच्या स्पर्शासाठी माणसाचीच गरज पडते.

– – नेमकं हेच विसरलं गेलंय.

 

 

एक विनंती,

माझ्याकडं नको असलेल्या, बिनकामाच्या वस्तूंचे भलं मोठं गाठोडं आहे…..

तुम्ही वर्षानुवर्षे सांभाळलेले, अपमान, राग, द्वेष, मत्सर, असूया, अहंकार, ईगो, मीपणा.. त्या गाठोड्यात टाका. मी सगळं घेऊन जातो. मनावरचा ताण हलका होईल. प्रसन्न वाटेल.

 

 

अजून एक,

नवीन वर्षात संकल्प वैगरेच्या भागडीत पडू नका.

जे येईल त्याला सामोरे जा. तुमच्यामुळे जर कोणी आनंदी होत असेल तर तुमच्याइतका श्रीमंत दुसरा नाही.

ही संधी सोडू नका कारण आनंद वाटला की वाढतो……

2025 मध्ये तुमचा आनंद सदैव वाढता राहो हीच शुभेच्छा !!

“येतो…”

तुमचाच,

२०२४ 

(ता. क. ते गाठोडयाचं लक्षात ठेवा.) 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares