दसरा झाला. ह्या वर्षीचा दसरा जरा पाऊस,विजा,कडकडाट आणि गडगडाट ह्यामध्ये पार पडला त्यामुळे नेहमीचा सणाचा उत्साह, लगबग लुप्त होऊन जरा ह्या चैतन्यावर निरुत्साहाचं मळभ आलं होतं.असो.
“ कालाय तस्मै नमः “
नवरात्राची धावपळ, लगबग संपली. आता जरा निवांतपणा आला आला, असं वाटतं नं वाटतं तोच दिवाळी येतेय. नवरात्र उरकलं आणि आता वेध दिवाळीचे.
नवरात्र उरकलं हा विचार मनात आला खरा आणि लगेच मराठी भाषेची मोठी गंमतच वाटली. उरकलं हा शब्द तसा अर्थाने सरळसरळ घेतला तर बरोबरच, पण गर्भितार्थ बघितला तर चूकच.
आपण हे सणवार, कुळाचार हे मनापासून करीत असतो. ह्या पासून आपल्याला आनंद,समाधान लाभतं. आणि ‘उरकलं ‘ हा शब्द जरा निरुत्साही वातावरणात काम झालं की मनात येतो.
खरंच भाषा हा प्रकारच मुळात लवचिक. मोडू तसा मोडणारा, वळवू तसा वळणारा, वाकवू तसा वाकणारा. ही भाषाच आपल्याला एकाच शब्दाचे अनेक अर्थ पुरविते. तर एकीकडे हीच भाषा समानार्थी शब्दासाठी अनेक पर्याय पण सुचविते नाही का ? —–
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवार होता, पारावरच्या मारुतीला एक भक्त शेंदूर लावत होता. कडेने एका हातात तेलाची बुधली आणि एका हातात रुईच्या पानांची माळ घेऊन बरीच मंडळी उभी होती. अचानक त्या मारुतीच्या अंगावरचं शेंदराचं आवरण गळून पडलं आणि….
…… आणि आत दिसली गणपतीची सुबक मूर्ती. लोक आश्चर्यचकित. आता हे तेल ओतायचं कुठं आणि ही माळ घालायची कुणाच्या गळ्यात ?
आपलही असंच होत असतं. परमेश्वर सगळ्यांना पृथ्वीवर पाठवतांना पाठवतो फक्त माणूस म्हणून. स्वच्छ कोरी मनाची पाटी, निखळ हसू आणि अत्यंत भावस्पर्शी नजर घेऊन. आपण दहा बारा दिवसातच त्याचं नाव ठेऊन
पहिला जातीचा शेंदूर फासून मोकळे होतो. मग हळूहळू त्याची पंचेंद्रिये काम करू लागतात. त्याच्या मनाच्या पाटीवर कधी घरातले, कधी बाहेरचे काहीबाही खरडून ठेवतात. घर, कुटुंब, गाव, शाळा, कॉलेज, समाज, यामध्ये वावरत असताना एकावर एक विचारांचे, विकारांचे लेप नुसते थापले जातात. आणि मग जणू हीच आपली ओळख आहे अशा थाटात आपणही वावरायला सुरुवात करतो. वरचेवर थापले जाणारे हे लेप, हे मुखवटे, मग आपल्यालाही आवडायला लागतात. माणसं, समाज काय तेलाच्या बाटल्या, हार घेऊन उभे असतातच. नजरेतला विचार हरपतो. त्याची जागा विखारानं घेतली जाते. आपल्यातल्या मूळ स्वरूपाची जाणीव हळूहळू नष्ट होते.
अचानक एक दिवस काहीतरी घडतं आणि ही शेंदराची पुटं आपोआप गळून पडतात. आतलं मूळ चैतन्य प्रकट होतं. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सहसा हे घडून येत नाही. हा क्षण खूप मोलाचा असतो. खूप प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. नाहीतर गडबडीत आपणच परत आपल्या हाताने आपल्याला शेंदूर फासून घेतो. कारण त्या शेंदऱ्या स्वरूपाची सवय झालेली असते. लोकांच्या तेलाची, माळेची, नमस्काराची भूल पडलेली असते.
आणखी एक क्षण असा मुखवटे उतरवणारा असतो तो म्हणजे शेवटचा क्षण. परमेश्वर सगळे चढलेले मुखवटे, आवरणं, दागिने, एवढंच काय, कपडेसुद्धा काढून ठेवायला लावतो. ज्या मूळ शुद्ध स्वरूपात आणून सोडलं होतं त्या मूळ स्वरूपात घेऊन जातो. बरोबर येतं फक्त आपल्या भल्याबुऱ्या कर्माचं गाठोडं, ज्याचा हिशोब वर होणार असतो. म्हणून या जीवनप्रवासात जर अधेमधे कुठे हे शेंदराचे मुखवटे गळून पडले, तर तो आत्मसाक्षात्काराचा क्षण ओळखा…. त्याला जपा.
☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
रंगात रंग तो गुलाबी रंग
मला बाई आवडतो श्री रंग ॥
छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.
इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत —- ” ता ना पि हि अ नि जा “
असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते, ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.
माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात—-
केशरी रंग त्यागाचा
पांढरा रंग शांतीचा
हिरवा भरभराटीचा
गुलाबी रंग प्रेमाचा
लाल रंग रक्ताचा
काळा म्हणजे निषेध !
—अशा सर्व संमत कल्पना आहेत.
माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात.
केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो , डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा ” –मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज ! विजय पताका !
पांढरा रंग म्हणताच मला आठवतात हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय. – मनात अभिमान उत्पन्न करणारा !
पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो .
बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड लहान असो की मोठे, पाने मात्र हिरवीच !
मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !
लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्ध भूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान
काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे. पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांती संदेश घेऊन येणारे !
आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ?? –अर्थात गुलाबी .
मधुर , औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी–आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी—- हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच पण मुख्य म्हणजे —
मध्यंतरी एका वाचनप्रेमी व्यक्तीने एक विषय दिला. त्यांना ह्या विषयावर एका कार्यक्रमात बोलायचे होते. तेव्हा काही मुद्दे सुचतं असतील तर सांगा असा त्यांचा मेसेज आला. विषय होता, -” नाती जुळण्याआधीच सूर बिघडतांना “…
विषय खूप गहन होता पण आजच्या काळात हा अनुभव सर्रास दिसायला लागणं हे एक सुदृढ कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हानिकारक लक्षण होतं. हा विषय मनात आल्यावर तऱ्हेतऱ्हेचे विचार मनात उमटायला लागले.
लहानपणी आपल्या खूप भन्नाट कल्पना असतात. तेव्हा वाटायचं.. आज बी पेरली वा रोप लावले तर लगेचच त्याचा वृक्ष तयार होतो. तेव्हा आजोबांनी खूप छान समजावलं होतं. बी रुजल्यानंतर कोंब फुटून वाढीला सुरुवात होते. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी काळजी घेऊन, वेळ देऊन मगच कुठे ते रोपटं बाळसं धरायला लागतं आणि त्याचा वृक्ष होईपर्यंत बराच काळ, खूप सा-या संकटांचा सामना करून, टक्केटोणपे खाल्यानंतर कुठे तो वृक्ष तयार होतो.
सगळ्यांचं आता हळूहळू वयं वाढलं तसे अनुभव गाठीशी जमा झालेत, उन्हाळे पावसाळे बघून झालेत व बहुतेक सगळ्यांनाच अनेक दिव्य कसोट्यांना पार करावं लागलं आहे, तेव्हा कुठे ही प्रत्येकाची संसाराची नौका जरा स्थिरस्थावर झालीयं हे प्रत्येकाला जाणवलं. नात्यांचंही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं असं आपण म्हणू शकतो.
दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो, संयम नसतो, त्याग हा शब्द डिक्शनरीमधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नवीन नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं. आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.
नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की… कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं. कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती, दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडलेला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्यासोबतच बाकी इतर नातीसुद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाम मतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली, थोडासा स्वार्थ बाजूला सारला, तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तम प्रकारे संसार करु शकतील. त्यामुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून, एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन, ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की… खरोखरच सहजीवन जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.
एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये. नाहीतर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल. तरीही एक नक्की की, तडजोडीने कदाचित आपल्याला सुख नाही लाभत, पण आपण न केलेल्या तडजोडीमुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं, तरी साध्यासरळ संसारासाठी ” तडजोड ” हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो. आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडीनंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की…. असो हा विषयच न संपणारा विषय आहे. तेव्हा तूर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.
….. हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.
मग गोड की तिखट?… तळलेले की भाजलेले?… कुठली फळं आहेत का?…. बेकरीचे पदार्थ आहेत का?…
अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.
“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.
१) लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?
२) फुटाणे कुणी म्हटलंय का?
३) गुलगुले कुणी म्हटलंय का?
४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?
५) ढोकळा कुणी म्हटलंय का?
किंवा एखादी गाणं म्हणायची….. ” हरलीस काय तू बाळे? गणगाची उसळ ही खुळे.”
मग आम्ही सगळ्या “खुळ्या”आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो. डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायचीच. सगळीकडे खिरापत ” परवडणेबलच ” असायची.
श्री बालाजीची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे…..
श्री = श्रीखंड,
बा = बासुंदी, बालुशाही
ला = लाडू, लापशी, लाह्या
जी = जिलेबी
चि = चिवडा, चिरोटे
सा = साटोरी, सांजा, साळीच्या लाह्या
सू = सुतरफेणी, सुधारस, सुकामेवा … वगैरे
त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे…..
उदा.भाऊ.. भा= भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या),भात, भाकरी…… अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.
ऊ = उंडे, उपासाचे पदार्थ. एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा…….. खिरापत कोणतीही असो. ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे.
मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.
उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय.. घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची, त्यात भाज्या देखील असायच्या.
१६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका, कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली, शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीत पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.
आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका क्लिकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते. लहानपणीची “श्री बालाजीची सासू” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.
नवरात्र — सगळीकडे चैतन्याची,उत्साहाची उधळण. देवीचं अस्तित्व हे मन प्रसन्न करणारं, शक्ती प्रदान करणारं. ह्या नवरात्रीतील नऊ दिवसांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवींचे मुखवटे, त्या मुखवट्यांवरील तेज क्षणात नजरेसमोर झळकतं. निरनिराळी पीठं असणाऱ्या मखरातील देवींची रुपं आणि अगदी रोजच्या आयुष्यात सहवासात येणाऱ्या चालत्या बोलत्या हाडामासाच्या स्त्रीशक्तीची रुपं आठवायला लागतात. ह्या नवरात्रीच्या चैतन्यमय नऊ माळाआपल्याला चैतन्य, उत्साह ह्यांचं वाण देतांनाच खूप काही शिकवतात सुध्दा.
ह्या नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवी- म्हणजेच वेगवेगळ्या शक्तींची आठवण होते. ह्या शक्ती आत्मसात करण्यासाठी मनात नानाविध विचार, योजना आकार घ्यायला लागतात.
सगळ्यात पहिल्यांदा, ह्या शक्ती आपण आत्मसात करुच शकणार नाही असं वाटायला लागतं. पण लगेच “ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ” ह्या म्हणीनुसार ‘आपण करून तर बघू. पूर्ण अंगिकारता नाही आले तरी निदान काही तरी तर निश्चितच हाती लागेल ‘ हा सकारात्मक विचार मनात बाळसं धरु लागला.
पहिल्यांदा, आपण आपल्यात चांगले बदल हे कोणी मखरात बसविण्यासाठी वा आपला उदोउदो करण्यासाठी करावयाचे नसून ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांगीण विकासाकरीता,आपल्यात सकारात्मक जागृतता येण्याकरिता करावयाचे, हे आधी डोक्यात फिट केले. त्यामुळे आपल्यातील चांगले बदल हे कोणाच्या निदर्शनास नाही आले तरी चालतील पण आपलं स्वतःचं मन स्थिर झालं पाहिजे. फळाची अपेक्षा न करता फक्त सत्कर्म करणे ह्याकडे आपला कल झुकला पाहिजे, आणि हा बदल औटघटकेचा न ठरता कायमस्वरूपी झाला पाहिजे यावर कटाक्ष राहिला पाहिजे, हे मनाशी ठरविले.
सगळ्यात पहिल्यांदा अष्टभुजादेवी आठवली. सतत उन्नतीकरिता आठ हात वापरुन कामाचा उरका पाडणारी,अष्टावधानी होऊन बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष पुरविणारी– ही अष्टभूजा तर आपण व्हायचं हे ठरवलं, पण संसार,नोकरी ह्यावरची तारेवरची कसरत सांभाळतांना,आठ आठ हातांनी काम करतांना आपली दमणूक होऊ द्यायची नाही हे पण ठरविलं. ह्या सगळ्या जबाबदा-या हसतहसत आनंदाने पार तर पाडायच्या, पण त्या पार पाडतांना आपणच आपली स्वतःची काळजी घेऊन आपलं मनस्वास्थ्य आणि प्रकृतीस्वास्थ्य पण जपायचं, हा पण मनाशी निश्चय केला.
दुसरी देवी आठवली सरस्वती, म्हणजेच बुध्दीची देवता. ह्या देवीकडून चिकाटीने ज्ञान मिळवायचं. कारण दरवेळी ह्या देवीला नजरेसमोर ठेऊन उघड्या जगाकडे दृष्टी टाकली तर आपण जे शिकलो त्याच्या कित्येक पटीने जास्त शिकायचं अजून शिल्लकच आहे ह्याची जाणीव होते. सरस्वतीदेवीकडे बघून अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे आपल्याला आत्मसात झालेलं ज्ञान, कला, ही निस्वार्थ हेतूने सगळ्यांमध्ये वाटली तरच त्याचा चांगला विनियोग होईल. त्यामुळे ह्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतांना, म्हणजेच देतांना वा घेतांना हात आखडता राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची हे लक्षात आलं.
मग आठवली देवी अन्नपूर्णा. खरचं सगळ्यांना तृप्त करणारी ही अन्नपूर्णा म्हणजे शक्तीचा एक अद्भुत चमत्कार. ही अन्नपूर्णा होतांना एक मात्र ठरविलं- आपल्या ह्या शक्तीचा वापर खरंच गरज असणाऱ्यासाठी आधी करायचा. ओ होईपर्यंत आकंठ खाऊन झालेल्यांवर आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा भुकेल्यावर,गरजूंवर ह्या शक्तीचा वापर करण्याला प्राधान्य द्यायचं. आपली ही शक्ती आपल्या लोकांसाठी, घरच्यांसाठी कामी आणायची, विशेषतः लेकाला घरचंच अन्न गोड लागावं, बाहेरचे अन्न, हॉटेलच्या डिशेस ह्यांनी पैशाचा चुराडा करून प्रकृतीची हेळसांड करुन घेण्यापेक्षा घरच्या अन्नाला मुलांनी प्राधान्य द्यावं ह्याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, तरच ह्या अन्नपूर्णेच्या शक्तीला पूर्णत्व येईल. नाईलाजास्तव बाहेरचं अन्न खावं लागणं आणि घरी असतांना चोचले पुरविण्यासाठी बाहेरचं अन्न मागवून खाणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.
मग दुर्गा, महिषासुरमर्दिनी आठवली– सगळ्या संकटांना हिमतीने तोंड देणारी, संकटकाळी धावून जाणारी, तितक्याच तीव्रतेने आपल्यावर होणारा अन्याय सहन. न करणारी.
आणि मी मनापासून एक बँकर, एक शिक्षक असल्याकारणाने आठवली आर्थिक डोलारा सांभाळणारी लक्ष्मीदेवी. धनाचा संचय तर करणारी, पण त्याचबरोबर त्याचा अपव्यय न होऊ देणारी, काटकसरीत धन्यता मानणारी, पण खरोखरच्या गरजा भागवतांना मागे पुढे न पाहणारी, भवितव्यासाठी पैसा जमवितांना त्याची लालसा मात्र न करणारी.
नवरात्राची पहिली माळ जिच्यासाठी असते ती शैलपुत्री पार्वती. यक्षपुत्री देवी सती आणि महादेव ह्यांच्या अपमानाने क्रोधीत आणि व्यथित झालेली देवी सती देहत्यागासाठी तयार होते. देह नश्वर असल्याने तो विलीन होतो, परंतू आत्मा मात्र हिमालपुत्री म्हणजेच शैलपुत्रीच्या रुपाने परत येतो. “ देह नश्वर आणि आत्मा अमर “ हे ज्ञान, ही शिकवण, दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिलं रुप असणाऱ्या शैलपुत्री पार्वती हिच्याकडून शिकण्यासारखी.. दुर्गेच्या नऊ रूपांपैकी आणखी एक रुप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. भगवान शिव ह्यांचा पतीरुपात सहवास घडावा ह्यासाठी देवी ब्रह्मचारिणी हिने वर्षानुवर्षे बिल्वपत्र वाहून, उपवास करून भगवान शिवाची आराधना केली आणि आपल्या निरंतर तपस्येने शिवाला प्रसन्न केले. म्हणूनच मनःपूर्वक तपस्येचा दाखला म्हणजे हे देवी ब्रह्मचारिणी, दुर्गेचे दुसरे रुप. देवीपुराणानुसार देवी ब्रम्हचारिणी नित्य तपस्येत आणि आराधनेत लीन असल्याने तिचे तेज उत्तरोत्तर वाढत गेले अशी आख्यायिका आहे. त्या तेजामुळे त्यांना गौरवर्ण व तेज प्राप्त झालं असं म्हणतात. ब्रम्हचारिणी हा शब्द संस्कृतच्या दोन शब्दांपासून बनला आहे.ब्रह्म ह्याचा अर्थ ” घोर तपस्या ” आणि “चारिणी”चा अर्थ आचरण करणे,अनुकरण करणे. म्हणूनच देवी ब्रह्मचारिणी हिच्या एका हातात कायम उपासना करणारी ” जपमाळ ” , तर दुसऱ्या हातात कधीही कुठल्याही त्यागासाठी तयारीत असल्याचे प्रतीक म्हणून कमंडलू असतं. योग्य अशा एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावासा वाटला तर तो किती मनापासून घ्यायला हवा, त्यासाठी एखादी तपस्या करावी तसे किती प्रयत्न आणि कष्ट घ्यायची तयारी असायला हवी, आणि त्यासाठी कुठल्याही त्यागासाठी मन कसे तयार असायला हवे हेच शिकवणारी ही देवी ब्रह्मचारिणी.
ह्या सगळ्यांमध्ये स्वतः ला विसरून वा वगळून चालणारच नाही. अशी सगळी देवींची अनेक रुपे डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागली आणि त्यांच्यातील सगळे सद्गुण हळूहळू का होईना अंगिकारायचे ठरविणारे हे माझे आजचे रुप मलाच खूप भावून गेलं, स्वतःवर पण प्रेम करायला शिकवून गेलं.
बालपणीच्या काही आठवणी या कायमच्या मनामध्ये रुतून राहतात. आज पेठ किल्ल्यावरील भगवती मंदिराचा फोटो पाहिला आणि रत्नागिरीच्या आठवणी जाग्या झाल्या. नवरात्र सुरू झाले की हमखास भगवती देवीची यात्रा आठवते. या देवीचे मंदिर ज्या किल्ल्यावर आहे. त्याचे ऐतिहासिक नाव जरी ‘रत्नदुर्ग’ असले तरी आमच्या लेखी तो ‘पेठ किल्ला’ आहे. एरवी शांत निवांत असलेल्या त्या किल्ल्यावर वर्दळ दिसे ती नवरात्रातच! त्या किल्ल्याच्या एका टोकावर दीपग्रह होते.तिथून समुद्राचे दर्शन होई.समुद्रातील दीपग्रह, त्यावरील पडाव, मोठ्या बोटी आणि निळा आसमंत पाहताना खूपच छान वाटत असे. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर भगवती देवीचे मंदिर होते. या ठिकाणी यात्रेनिमित्त लहानपणी जाणे होत असे.
गाभूळलेल्या चिंचेसारख्या आंबट गोड आठवणी ! शाळेत असताना नवरात्रात भगवतीच्या यात्रेला जाणे हा एक कार्यक्रम असे. पूर्वी वाहने कमी होती आणि रस्ता ही साधा होता. किल्ल्यावर चढून जायचे म्हणजे बराच वेळ लागत असे. नवरात्रात सकाळी लवकर उठून घरातील मोठ्या मंडळींबरोबर चालत जाऊन भगवती देवीचे दर्शन आणि तेथील जत्रा अनुभवात होतो. जरा मोठे झाल्यावर मैत्रिणींबरोबर जाण्यात अधिक मजा येई. जाताना वाटेत काकड्या घेणे, कोरडी भेळ घेणे आणि गप्पा मारत हसत खेळत किल्ला चढणे अशी मजा असे.
त्यावेळची एक आठवण म्हणजे बुढ्ढी के बाल ! गुलाबी रंगाचे ‘बुढ्ढी के बाल’ एका मोठ्या काचेच्या पेटीत घेऊन तो बुढ्ढी के बाल वाला फिरत असे, पण घरचे लोक ते चांगले नसते म्हणून घेऊ देत नसत आणि ते देत नसत म्हणून जास्त अप्रूप वाटत असे. किल्ल्यावर एक सिनेमावाला चौकोनी खोके समोर घेऊन उभा असे आणि तो सिनेमातील काही फिल्म दाखवत फिरत असे. अर्थात तिथेही आम्ही कधी गेलो नाही ! आम्ही फक्त मंदिरात दर्शन आणि भेळेची गाडी या दोनच गोष्टी पाहिल्या होत्या.
किल्ला चढताना वाटेत भागेश्वराचे मंदिर होते. त्याचा जिर्णोद्धार भागोजी कीर यांनी केला होता. थांबण्याचा पहिला टप्पा तिथेच असे. ते मंदिर आधुनिक पद्धतीने छान बांधलेले होते. तिथून पुढे मोठा चढ चढून देवीच्या मंदिरापर्यंत जाता येई. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व होते. पण गावापासून लांब असल्याने फक्त नवरात्रातच आवर्जून जाणे होई. पावसाचे चार महिने संपल्यावर सगळीकडे भरभरून हिरवागार निसर्ग दिसत असे. जांभळी पिवळी रान फुले किल्ल्यावर पसरलेली दिसत. सूर्याची किरणे अजून तरी तापायला लागलेली नसत. त्यातच तिथल्या पावसाची एक गंमत असे. नवरात्राच्या पहिल्या एक-दोन दिवसात पाऊस पडला की तो माळेत सापडला असेच म्हणत. त्यामुळे नऊ दिवस आता रोज थोडा तरी पाऊस पडणारच असे म्हटले जाई. अर्थात पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. तो कधी कुठे येईल सांगता येत नाही. आम्हाला अर्थातच त्या रिमझिम पावसात भिजायला आवडत असे. किल्ल्यावर जत्रेमध्ये हौशे,नवसे आणि गवसे असे सगळ्या प्रकारचे लोक भगवतीला येत असत. गावची जत्रा असल्यामुळे खेळण्याचे स्टॉल्स, खाऊची दुकानं, नारळ, उदबत्ती, बत्तासे, साखरफुटाणे, यांची दुकाने अशी अनेक प्रकारची तात्पुरती दुकाने असत.
आम्ही जत्रेत फिरून थोडाफार खाऊ घेत असू. बरोबर आणलेले डबे खाल्ले जात ! बाहेर विकत घेऊन खाण्याचे ते दिवस नव्हते. सातव्या माळेच्या जत्रेचे विशेष महत्त्व असे. त्यादिवशी शाळा लवकर सुटायची, तोच मोठा आनंद असे. पुढे कॉलेजला गेल्यावर आनंदाचे विषय बदलले. किल्ल्यावर जाता येताना पिपाण्या वाजवणे, टिकटिकी घेणे, फुगे घेणे, दंगा करणे, यासारखे तरुणाईचे उद्योग चालू असत ! तेव्हा ती पण एक मोठी मजा होती. आज भगवती मंदिराचा फोटो व्हाट्सअप वर पाहिला आणि पुन्हा एकदा त्या जत्रेतील पाळण्यातून वर- खाली वेगाने माझे मन भूतकाळात फिरून आले.
वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरामुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते.
एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरिता बोलविण्यात आले होते.
वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.
मुलाकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरीता चहा आणण्यात आला.
मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते. परंतू पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणा-या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला.चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले…! चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात.
दुपारचं जेवण– ते सुद्धा घरच्यासारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. उठल्यावर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं .
मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढतांना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले, ” मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे, आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ??” यावर मुलीच्या होणा-या सासूबाई म्हणाल्या, ” काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती.” हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते.
वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा समोरच घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, ” हे आपण काय करता आहात ?? “
यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, ” माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही… ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.”
जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते…. एक दिवस ती सोडून जाईलचं. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की, मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते. तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘ मुलीचा बाप ‘ आहे..!!”
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभाव… श्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
माझे एक मित्र होते, सुनील जोशी. होते म्हणजे दुर्दैवाने आज हयात नाहीत. पण त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगतो.
पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो, त्या रस्त्याच्या सुरूवातीच्याच सोसायटीत ते रहायचे. त्याच सोसायटीच्या तळघरातील एका हाॅलमधे ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजणं संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळाकरता गंगापूर रोडला रहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरानगरला फ्लॅटमधे रहायला गेले होते. त्यामुळे बर्याच वर्षांत भेट नव्हती. ५-६ वर्षांपूर्वी आमच्यामागेच श्री. योगेशजी मांडे रहातात, त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याचे सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे रहातात हे माहिती नसल्याने एक दिवस योगेशजींबरोबरच त्यांच्या घरी गेलो. आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा.
त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं झालं, तसं मीपण विचारलं; तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते असं—-
” मी सकाळी १० च्या सुमारास डिशमधे पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असतांना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे एक बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला. त्याला मी कसेबसे माझ्या त्या मित्राला घेऊन यायला सांगितले, ज्याच्याबरोबर नाष्टा झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्याच डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे तपासणी होईपर्यंत २ वाजले होते. डाॅक्टरांनी ताबडतोब न्युराॅलाॅजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचविलेल्या हाॅस्पिटलमधे आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन अॅडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरु केले. संध्याकाळी डाॅक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे आैषधोपचार सुरू झाले. रात्री ८-८॥ च्या बेताला एक फिजिओथिअरपिस्ट भेट ध्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितले की ‘ मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते, तोपर्यंत यांना झोपू देऊ नका. यांच्याशी सतत बोलत रहा आणि जागं ठेवा.’ ती निघून गेल्यावर मला जे काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि ही, आम्ही दोघेजणं संस्कृतमधून गप्पा मारत होतो. (लक्षात घ्या हं, दोघं नवरा-बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते.) आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रितीने रात्रभर बर्याचवेळेस मी रामरक्षा म्हटली.
सकाळी ती फिजिओथिअरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं, तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं? हिने थोडसं घाबरत सांगितलं की ‘ काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना रात्रभर जागं ठेवलं.’
त्यावर ती म्हणाली की ‘ नाही. तुम्ही नक्कीच काहितरी निराळं केलं असणार. कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, त्यासाठी मी माझ्याजवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या (तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथिअरपिमधला हा एक भाग असतो), पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं?’
…….. तेव्हा हिने सांगितलं की ‘आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि ह्यांनी बर्याच वेळेस “रामरक्षा” म्हटली.’
तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहेर्यावर दिसत होतं. ती लगेच निघून जातांना म्हणाली की मग आता माझं काही कामच नाही. यासाठीच मी आले होते. (म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकडं झालं असेल त्याविरूद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते.)
फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चारांचा शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते.
रामरक्षेच्या प्रभावाचा त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव, जो त्यांनी स्वतः मला सांगितला, तो मनांत ठसला आहे.
लेखक : श्री.संतोष गोविन्द जोशी
माहिती संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈