??

☆ मुलगी… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरामुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते.

एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरिता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलाकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरीता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते. परंतू पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणा-या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला.चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले…! चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण– ते सुद्धा घरच्यासारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. उठल्यावर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं .

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढतांना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले, ” मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे, आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ??” यावर मुलीच्या होणा-या सासूबाई म्हणाल्या, ” काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती.” हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते. 

वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा समोरच घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, ” हे आपण काय करता आहात ?? “

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, ” माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही… ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.”

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते…. एक दिवस ती सोडून जाईलचं. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की, मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते. तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘ मुलीचा बाप ‘ आहे..!!”

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments