शहरापासून दोन किलो मीटर दूरवर पानाचे दुकान आहे. तिथे दिवस रात्र गर्दी असते. तसा पान सगळ्या शहरात कुठे मिळत नाही. पान बनवणार्याच्या हातात न जाणे कोणते कसाब आहे, की दूर दूरवरून लोक तिथे फक्त पान खाण्यासाठी येतात. अनेक पानप्रेमी रात्रीचे नऊ – दहा वाजले तरी लोक तिथे पोचतात.
चोपडा कुठला तरी समारंभ संपवून आपल्या पत्नीबरोबर परतत होते. अचानक त्यांना पण खाण्याची प्रबळ इच्छा झाली. त्यांनी पानाच्या दिशेने गाडी वळवली. पत्नीने हैराण होऊन विचारले, इकडे कुठे निघालोय?
पान खायला. ‘आज तुला असं पान खिलावतो, तसं पान तू आत्तापर्यंत आयुष्यात कधी खाल्लं नसशील.’ पत्नी गप्प बसली.
पानाच्या दुकानासमोर चोपडांनी गाडी थांबवली. ते पण ज्ञायला गेले. पत्नी गाडीतच बसून राहिली. एवढ्यात दोन छोटी मुले हातात मोगर्याच्या फुलांचे गजरे घेऊन आली. ‘ काकी, घ्या ना ! अवघ्या दहा रुपयात दोन गजरे…’ त्यांच्या डोळ्यातील याचना आणि चेहर्यावरचे करूण भाव पाहून पटीने दोन गजरे घेतले आणि तिथेच सीटवर ठेवले.
चोपडांनी पत्नीच्या हातात पान घेतलेला कागद ठेवला आणि ते सीटवर बसले, तशी त्यांचे नजर सीटवर ठेवलेल्या गजर्यांवर गेली. हे काय आहे? केवढ्याचे आहेत? का घेतलेस?’ तशी ती म्हणाली, गरीब मुले होती. पुन्हा पुन्हा आग्रह करत होती. त्यावर ते म्हणाले, ‘तू काय दान करण्याचा ठेका घेतला आहेस का? पैसे कामवायला किती परिश्रम करावे लागतात, तुला कल्पना आहे का? असल्या रद्दी फुलांवर दहा रुपये खर्च केलेस!’
पत्नी गप्प बसली. दहा रुपयाचं एक एक पण, दोन-तीन किलो मीटरची उलटी चक्कर घेऊन पानाच्या दुकानाशी येणं, रस्त्यात दोन दोन संध्याकाळची वृत्तपत्रे घेणं, गुटखा, सिगरेट… या सगळ्याच्या तूलनेत दोन गजरे विकत घेणं काय जादा खर्च आहे? पान खाण्याचा तिचा सगळा उत्साह संपून गेला.
मूळ हिन्दी कथा – पान
मूळ लेखिका – सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
वादळात अडकलेल्या एका पांथस्थाने एका भग्न मंदिराचा आसरा घेतला.काळ्याकुट्ट ढगांनी सर्व परिसर झाकोळून गेलेला होता, कोणत्याही क्षणी आभाळ भुईवर उतरणार होतं अन कडाडणाऱ्या विजा प्रकाशाची वाट दाखवत त्याला सोबत करणार होत्या. कुट्ट त्या अंधारल्या मंदिरात पांथस्थास काहीच दिसेना.अडखळत चाचपडत तो कसाबसा गाभाऱ्याशी पोहचला. खिशातली काडीपेटी काढून काडी तो ओढायचा प्रयत्न करू लागला पण सर्द पडलेला तो गुल पेटण्याचं नावच घेत नव्हता.अथक प्रयत्नाने एका काडीने शेवटी पेट घेतला. पांथस्थाला हायसे वाटले, त्याने इकडे तिकडे शोध घेतला. एका कोनाड्यात त्याला तेलाने भरलेला दिवा दिसला. हातातील आगीने त्याने दिवा पेटवला अन मूर्तीच्या पायाशी ठेवला. काळ्याकुट्ट पाषाणातील ती मूर्ती दिव्याच्या प्रकाशात उगीचच हसल्याचा त्याला भास झाला. त्याची नजर आता उदबत्तीस शोधू लागली “दिवा आहे तर उदबत्तीही असणारच!” तो स्वतःशी पुटपुटला इतक्यात मूर्तीच्या मागे त्याला उदबत्ती सापडली. दिव्यावर उदबत्ती पेटवून त्याने शेजारीच असलेल्या कपारीत खोचून दिली. देवाला हात जोडून तो गाभाऱ्याबाहेर आला.
गाभारा प्रकाश अन सुगंधाने भरुन गेला.त्या भयाण रात्रीत त्याला देवाचा सहारा मिळाला.थकलेला तो निद्राधीन झाला.
सोसाट्याचा वारा, कोसळता पाऊस अन विजांचे कल्लोळ चालूच होते, मध्यरात्र उलटली दिव्याचे लक्ष सहजच स्वतःकडे गेले.रत्नजडित खड्यांनी मढलेले त्याचे रूप खासच सुंदर होते त्याहून खूप सुंदर नाजूक नक्षी, उठावदार रंग, सुबक आकार त्याला खूपच आवडला, स्वतःच्या रूपाचा त्याला आनंद झाला आणि सौंदर्याचा अभिमानही!
शेजारी उदबत्ती जळत होती तिचं अस्तित्व काही क्षणांचे होतं, दिव्याला उदबदत्तीची कीव आली “काय ही उदबत्ती! ना प्रकाश ना रूप! काळा देह हिला मुळी देखणेपण नाहीच! “त्याने उदबत्तीला न राहून विचारलेच, काय गं उदबत्ती तुला माझ्या देखणेपणाचा जरासुद्धा मोह होत नाही का?” तिने हसून उत्तर दिले,” बिलकुल नाही, ईश्वराने जे काही मला दिलेय त्यात मी समाधानी आहे, प्रत्येकाला इथं नेमून दिलेले काम आहे अन आपण ते करायचे आहे, एवढेच मला माहित आहे, त्या पलीकडे मी जास्त विचार नाही करत.” दिव्याला तिचं म्हणणे तितकेसे पटले नाही तो काही न काही म्हणत राहिला अन उदबत्ती मौन बाळगून ऐकत होती इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आता मात्र दिव्याला आपला तोल सांभाळता येईना,उदबत्ती स्थिरपणे मंद मंद सुगंध दरवळत होती ; अन…वाऱ्याचा प्रचंड झोत गाभाऱ्यात शिरला! फडफडणारा दिवा क्षणात विझला.उदबत्ती शेवट पर्यंत जळत राहिली.
उत्तररात्री वादळ शांत झाले, पहाट होताच पक्षांनी पंख झटकले, आभाळ निवळून निरभ्र शांत झाले,पांथस्थ उठला त्याला आता पुढं जायचं होतं. रात्रभर जीविताच संरक्षण केल्याचे उपकार मानायला तो गाभाऱ्यात गेला दोन्ही हात जोडून नतमस्तक होत उदबत्तीची राख त्याने भाळावर लेपली, बाजूच्या दिव्यावर काजळी साचली होती, त्याने दिवा उचलला पुन्हा कोनाड्यात ठेऊन दिला.
रात्रभर प्रभू चरणाची सेवा करून कुणा सज्जनाच्या भाळावर मिरवत उदबत्ती दिमाखात पाऊले चालत राहिली अन दिवा अंधारल्या कोनाड्यात कुणा अवचित पांथ स्ताची अभावीत पणे वाट पहात एकटाच…त्या अंधाऱ्या कोनाड्यात…
आय. सी. यू. विभागाचे प्रमुख डॉ. गुप्ता, त्यांच्या केबिनमध्ये खुर्चीत मान मागे टेकवून बसले होते. खूप अस्वस्थ दिसत होते. कसला तरी गंभीर विचार करत असावेत, हे सहजपणे कळत होतं. पंधरा मिनिटांनी त्यांना सकाळच्या राऊंडसाठी जायचं होतं. त्यांना नक्की माहिती होतं की, तिथल्या तेरा नंबरच्या बेडवर, गेल्या पंचवीस दिवसांपासून पडून असलेल्या पेशंटचे – गीताचे वडील, पापणीही न हलवता त्यांच्या येण्याची वाट पहात बसलेले असणार होते. ते तिथे पोहोचताच , नेहेमीच अगदी कमीत कमी प्रश्न विचारणाऱ्या त्या गरीब पित्याच्या डोळ्यात मात्र रोज त्यांना हजारो प्रश्न दिसायचे. टेबलावरच्या ग्लासमधले पाणी घटाघटा पिऊन डॉ. गुप्ता राऊंडसाठी निघाले.
रोजच्यासारखेच आजही गीताचे वडील लिफ्टसमोर उभे होते — अगदी केविलवाणेपणाने.
” डॉक्टरसाहेब — माझी मुलगी –” कसंतरी इतकंच बोलू शकले ते.
” हे पहा , आज त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा आहे. काल बाहेरचे स्पेशालिस्ट डॉक्टरही येऊन पाहून गेलेत तिला. हवा भरलेल्या गादीसाठीही मी सांगितलं आहे. कदाचित पुन्हा एम. आर. आय. टेस्ट करावी लागेल. आणि मेंदूत जर पाणी साठलेलं असेल तर ताबडतोब एक ऑपरेशनही करावं लागेल.”
” डॉक्टर आत्तापर्यंत पाच लाख रुपये खर्च झालेत. कालच मी चाळीस हजार जमा केले होते. आज त्यांनी आणखी साठ हजार भरायला सांगितलेत. इतके पैसे मी —-” त्यांचे पुढचे शब्द गळ्यातच अडकले होते.
” हे पहा, तुम्हाला पैशांची व्यवस्था तर करावीच लागेल—” असं म्हणत डॉक्टर वॉर्डमध्ये निघून गेले.
अस्वस्थ मनानेच पेशंटना तपासता तपासता त्यांनी नर्सला विचारलं–
” तेरा नंबर पेशंटला इंजेक्शन दिलं का ? ”
” हो दिलंय. आता एकदम संध्याकाळीच त्या शुद्धीवर येतील. ”
डॉ. गुप्ता हातून काहीतरी अपराध झाल्यासारखे तिथून बाहेर पडले, आणि लिफ्टकडे जाण्याऐवजी जिना उतरून त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसले. खूप अस्वस्थ झाले होते ते. हॉस्पिटलच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी त्यांना अगदी बजावल्यासारखी सांगितलेली गोष्ट त्यांना आठवली— त्यातला एकेक शब्द मनात जणू घुमू लागला —-” हे बघा डॉ. गुप्ता , वैद्यकीय क्षेत्रात तुमचं विशेष नाव आहे हे मान्य. पण या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतो. कितीतरी रुग्ण फक्त तुमचं नाव ऐकून इथे येताहेत. इथे तुम्हाला पगाराचे जे पॅकेज मिळते, ते तुमच्या आधीच्या पॅकेजच्या दुपटीपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे अर्थातच काही गोष्टी तुम्हीही लक्षात घ्यायला हव्यात. डॉ. मणी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतील….. इथे भरती करून घेणं , वेगवेगळ्या टेस्टस, ऑपरेशन, स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या व्हिझीट्स, आय. सी. यू.त ठेवणं, व्हेंटिलेटर, काही विशेष उपकरणांची सोय , आणि अशाच इतर गोष्टी — मग रुग्णाला या गोष्टींची गरज असो किंवा नसो — लक्षात येतंय ना तुमच्या ? पुढच्या सहाच महिन्यात तुमच्यामुळे हॉस्पिटलचा लौकिक आणि उत्पन्न, दोन्हीही चांगलंच वाढायला पाहिजे — आणि त्यामुळे तुम्हीही कुठून कुठे जाल — नाहीतर — नाहीतर दुसरीकडे कुठे जाण्याबद्दल तुम्हालाच गंभीरपणे विचार करावा लागेल —“.
नकळत डॉ. गुप्ता यांच्या डोळ्यातून उष्ण अश्रू टपकले—- ते संतापाचे होते, तिरस्काराने भरलेले होते की खेदाने — कोण जाणे. त्यांनी लॅपटॉप उघडला, आणि घाईघाईने काहीतरी टाईप करायला लागले — शेवटची ओळ टाईप करून झाली तेव्हाच त्यांची बोटं थांबली —–
“म्हणून मी माझ्या नोकरीचा राजीनामा देत आहे ” ——–
आता प्रिंटरमध्ये कागद घालतांना त्यांचा चेहरा अगदी शांत दिसत होता.
मूळ हिंदी कथा : श्री. सदानंद कवीश्वर
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(पूर्वसूत्र – विचार करून रोहनचं डोकं सुन्न व्हायचं. उलट-सुलट विचार त्याच्या मनात भिरभिरत रहायचे. ‘आता दादा झालायस ना तू? थोडं दादासारखा वाग’ हे वाक्य सर्वांच्या तोंडून येता-जाता ऐकून तो खरच ‘दादा’ झाला दादागिरी करायला लागला.)
…………….
त्याचे वाढते हट्ट, चिडचिड, संतापणं हा एक व्यापच होऊन बसला. आईला बाळाकडे दुर्लक्ष करता येईना आणि रोहनची काळजी तिची पाठ सोडेना. त्यात त्याची वार्षिक परीक्षा जवळ आलेली. आई बिचारी तिच्यापरीने त्याचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न करायची. चार दिवस बरे जायचे की पुन्हा काहीतरी खुट्ट झाल्याचं निमित्त व्हायचं न् रोहन बिथरायचा.
अशातच त्याची परीक्षा संपली. निकाल लागला. रोहनच्या मार्कातली अधोगती पाहून सगळेच धास्तावले. हा मुलगा आता खरोखरच हाताबाहेर गेलाय यावर शिक्कामोर्तब झालं. यावर उघडपणे कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता आई डोळे टिपत राहिली आणि तिने दिवसभर रोहनशी अबोला धरला. रात्री उशिरा आतून कुठेतरी हललेला रोहन हळूच तिच्याजवळ सरकला आणि तिच्या कुशीत शिरला तेव्हा तिने नि:शब्दपणे त्याचा हात अलगद बाजूला करीत त्याला दूर सारलं.
सर्वांच्या आपापसातल्या ओझरत्या कानावर आलेल्या बोलण्यातून आपल्याला आजोळी शिकायला पाठवायचा घाट घातला जातोय या समजुतीने तर रोहन अधिकच उध्वस्त झाला. या सगळ्या चर्चा कुठलाच निर्णय न होता केव्हाच संपल्या कारण आई-बाबा दोघांनाही रोहनला दूर ठेवणे नको होते, पण हे सगळं रोहनपर्यंत कधी पोचलंच नाही.
सुट्टीत थोडा बदल म्हणून आई बाळाला न् रोहनला घेऊन माहेरी जायची तयारी करु लागली आणि रोहनने रडून रडून आकाश-पाताळ एक केलं. आईने त्याला परोपरीनं समजावलं पण त्याची समजूतच पटेना. रात्री बाबा घरी आले तेव्हा रोहन मोठ्या आशेने त्यांच्याकडे धावला. त्यांच्या पायांना त्याने घट्ट मिठी मारली. “रोहन, तुला थोडेच दिवस सुट्टीपुरतंच तिकडं जायचंय. आईबरोबर तू परत इकडेच यायचंयस” असं त्यांनी त्याला समजावलं खरं पण ते समजावणं रोहनला वरवरचंच वाटत राहिलं…, रडून-रडून रोहन मलूल होऊन गेला…!
या पार्श्वभूमीवरचं त्याचं आई आणि लहान बाळाबरोबर आजोळी येणं, साध्या तापाचं निमित्त होऊन त्याला आजोबांनी डॉक्टरांकडे आणणं आणि तिथे त्यांनी केलेली आदळआपट, त्रागा, आक्रस्ताळेपणा.. आणि अखेर नर्सच्या सूचनेनुसार ‘ तो घरी आईकडूनच औषध घेईल ‘ या विचाराने आजोबानी त्याला रिक्षातून घराकडे नेणं.
रिक्षातही आजोबा खरंतर मनातून थोडे अस्वस्थच होते. रिक्षा घराजवळ येऊन थांबताच आजोबांनी रिक्षावाल्याचे पैसे देऊन रोहनला उचलून कडेवर घ्यावं म्हणून त्याला हात लावला न् त्यांच्या हाताला एकदम चटकाच बसला. त्याला उचलून घेऊन कसेबसे आपल्या मुलीला आवाज देत आजोबा घराकडे धावले… .एव्हाना छोटं तान्हुलं बाळ शांत झोपलं होतं, म्हणून रोहनची आईच पुढे आली आणि तिने दार उघडलं. रोहनची न् तिची नजरानजर झाली. त्याचा तापानं फुललेला लालसर चेहरा पाहून ती गलबलली. तिचे डोळे भरूनच आले एकदम. रोहनला जवळ घ्यायला तिने आपले दोन्ही हात पुढे केले आणि त्या ओल्या नजरेनेच ती त्याला.. ‘ये बाळा’ .. म्हणाली.रोहन आपली मलूल नजर तिच्यावर रोखून तिला आजमावत राहिला. होय.. ही.. ही हरवलेली आईच आहे आपली… मनोमन खात्री पटताच त्याने क्षणार्धात ‘आईss ‘अशी केविलवाणी आर्त हाक मारली आणि तो तिच्याकडे झेपावला. तिच्या कमरेला त्याने घट्ट मिठी मारली. आजोबा लगबगीने आत निघाले. ‘ चल, रोहनला घेऊन आत ये बरं आणि हे औषध दे त्याला ..’ असं म्हणून आजोबा पाणी आणायला गेले. आईने रोहनला हलक्या हाताने थोपटलं आणि ती त्याची मिठी सोडवू लागली पण….? ..त्याने तिला मारलेली ‘आईss’ ही आर्त हांक हेच त्याचे अखेरचे शब्द होते आणि अखेरचा श्वासही…!!
घडले ते असे सगळे अनपेक्षित आणि धक्कादायकच होते पण म्हणूनच ते एवढ्यावरच संपणारही नव्हते…!
दुःख रोहन अचानक गेल्याचं तर होतंच पण तो गेल्याच्या दुःखाइतकाच त्या धक्क्यातून आता त्याच्या आईला कसं सावरायचं हाही प्रश्न ऐरणीवर येऊन बसलाय. कारण त्या क्षणापासून ती दगड होऊन गेलीय. निश्चल बसून राहिलीय. रडणार्या आपल्या तान्ह्याकडे दिवसभरात तिने ढुंकूनही पाहिलेले नाहीय. सतत हाकेच्या अंतरावर वावरत असणाऱ्या रोहनच्या भावना घरी कोणाच्याही मनापर्यंत पोहोचण्याइतकं त्यांच्यातलं अंतर कोसो दूर झाल्याची ही परिणती..!
यात नेमकं चुकलं कोण या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही नेमकेपणानं सापडलेलं नाहीय. पण परस्परांमधील एका हाकेचे अंतर जाणीवपूर्वक जपण्याची निकड मात्र मला नव्याने जाणवू लागलीय एवढं खरं..!!
(पूर्वसूत्र – नर्स औषध द्यायला पुढे येताच रोहनने पुन्हा आकांडतांडव सुरु केलं. नर्सने हातात घेतलेलं बाटलीच्या टोपणातलं औषध रोहनने रागाने भिरकावून दिलं.
” हे औषध लगोलग त्याच्या पोटात जायला हवं. तुम्ही याला रिक्षातून घरी घेऊन जाल का? तो आईकडूनच हे बिनबोभाट घेईल” नर्स म्हणाली. आजोबा नाईलाजाने ‘बरं’ म्हणाले.)
– – – – –
रोहनचा आक्रस्ताळेपणा आणि चिडचिड हा काही त्याचा मूळ स्वभाव नव्हता. तो खूप शांत, समंजस, अतिशय नम्र आणि आज्ञाधारक होता. त्यामुळे घरीदारी त्याचं कौतुकच व्हायचं. गोरापान रंग, बोलके काळेभोर टपोरे डोळे, दाट कुरळे केस आणि हसरा चेहरा, यामुळे तर तो सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. दोन्हीकडचे आजी-आजोबा आपापल्या गावी. इथे पुण्यात रोहन आणि त्याचे आई-बाबा. रोहन शाळेत जायला लागेपर्यंत हौसेने करत असलेली नोकरी सोडून रोहनच्या आईने पूर्ण वेळ करिअर म्हणून गृहिणीपद स्वीकारले होतेन. रोहनची तल्लख बुद्धी आणि अभ्यासातली गती आणि प्रगती इतकी लक्षवेधक होती की त्याच्यावरच लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता गृहीत धरून आई-बाबांनी हा निर्णय घेतलेला होता. आई-बाबा दोघांच्याही आनंदाचा केंद्रबिंदू जसा काही हा गोड लाघवी असा रोहनबाळच होता. त्याच्या संगोपनात कधी त्याचे अवास्तव लाड कुणी केले नाहीत, तसा नको इतका धाकही कुणी दाखवला नाही. सगळं अगदी छान सुरळीत चाललं होतं.. आणि.. एक दिवस अनपेक्षितपणे घरात दुसर्या बाळाची चाहूल लागली. दोन्हीकडचे आजी- आजोबा ‘ एकाला एक भावंडं हवंच’ म्हणून आनंदलेले. रोहनचे बाबा नवीन जबाबदारीच्या कल्पनेने थोडे विचारात पडलेले तर रोहनची आई ‘ पुन्हा तेच ते ‘ या विचाराने धास्तावलेली. अर्थात या सगळ्याच क्षणिक प्रतिक्रिया होत्या. अखेर नव्या पाहुण्याचे स्वागत आनंदाने करायचे असेच ठरले. यावेळी डोहाळे खूप कडक होते. त्यात पुन्हा वाढलेल्या वयाचं मनावरील दडपण वेगळेच. या सगळ्या घाईगर्दीत नव्या बाळाचं आनंदाने स्वागत करण्यासाठी रोहनचीही मानसिक तयारी आपण आतापासूनच करणंही आवश्यक आहे हे आई आणि बाबा दोघांचंही व्यवधान कुठेतरी निसटून गेलं होतं एवढं खरं. दिवस उलटत गेले तसतशी आजवर प्रत्येक गोष्ट आपल्याला हातात आणून देणारी, जवळ बसून आपला अभ्यास घेणारी, आपल्याला शाळेत रोज पोचवायला न्यायला येणारी, शाळेतल्या गमती जमती ऐकताना आपल्यासारखीच लहान बाळ होऊन जाणारी आपली नेहमीची आई रोहनला अनेकदा दिसेनाशी होऊ लागली. हाकेच्या अंतरावरच वावरत असणाऱ्या आई-बाबांना मात्र रोहनच्या मनात हळूहळू सुरु झालेल्या या घुसमटीचा मागमूसही नव्हता. सगळं व्यवस्थित पार पडेल ना या एकाच विवंचनेत ते असायचे. सतत बडबड करणारा रोहन आता हळूहळू एकलकोंडा होत चालला. दोन्हीकडचे आजी- आजोबा आलटून पालटून एकमेकांच्या सोयीने येऊन जमेल तेवढे राहून जायचे. पण तेव्हा भरलेले घरही रोहनला रिकामेच वाटत रहायचे. त्याच्या मनात अनेकविध प्रश्न थैमान घालत असायचे पण ते अव्यक्तच रहायचे. तसे व्यक्त व्हायचे पण शब्दातून नव्हे तर कृतीतून. भांड्यांची आदळआपट, चिडचिड, त्रागा आणि मग शेवटी भोकाड पसरणे ही आजवर त्याला अनोखी असणारी सारी, आता मात्र त्याची(अव)गुण वैशिष्ट्ये होऊन बसली. या गदारोळात त्याने अनेकदा आईच्या डोळ्यातून पाणी काढलं, बाबांकडून रागावून घेतलं, आजी-आजोबांनी पाजलेले उपदेशांचे डोस वेळोवेळी रिचवले पण परिस्थिती बदलली नाहीच.
आई माहेरी बाळंतपणासाठी आली. बाळ झालं. सुखरूप झालं. ‘ मुलगी हवी होती पण यावेळी मुलगाच झाला. असू दे’ ही सगळ्यांची हसरी प्रतिक्रिया. अर्थातच यात तक्रारीचा सूर नव्हताच. कौतुकच अधिक होतं. बाळ बाळंतीण घरी आले आणि घरचं रुटीनच बदललं. इतकं बदललं की रोहनला घराचं हे बदललेलं रूप विद्रूपच वाटायला लागलं. काही बोललं, कांहीही मागितलं तरी कुणाकडूनही चटकन् प्रतिसाद मिळेनासा झालाय असंच त्याच्या मनानं घेतलं. बाबा नेहमीसारखे त्यांच्या गडबडीत. आजी सतत कामं सांगणारी, स्वतः मात्र सगळं हळूहळू करणारी, आणि आई.. ? ती नव्या बाळात गुंतून पडलेली. काहीही सांगायला गेलं, तरी ‘हो रे माझ्या राजा,शहाणा मुलगा ना तू ? ऐकावं बाळा जरा.. ‘ म्हणायची. जवळ घ्यायची, थोपटायची पण लक्ष मात्र अजून नीट हातपायही न हलवणाऱ्या बाळाकडंच. विचार करकरून रोहनचं डोकं सून्न व्हायचं. आणि हेच उलट-सुलट विचार मनात सतत भिरभिरत रहायचे. ‘आता दादा झालास ना तू, दादा सारखा वाग जरा ‘ हे वाक्य तर येता-जाता अनेकांच्या तोंडून इतक्या वेळा ऐकलंन् की तो खरंच दादा झाला आणि दादागिरी करायला लागला…
रोहन. आठ वर्षांचं कोवळं वय. आई आणि तान्हया लहान भावाबरोबर रोहनबाळ आजोळी आलेला. आणि साधं तापाचं निमित्त झालं. दोन दिवस झाले तरी घरगुती औषधाने ताप उतरेना म्हणून त्याच्या आजोबांनी त्याला आज परिचित आणि ख्यातनाम अशा बालरोगतज्ञाकडे तत्परतेनं आणलंय.
पूर्वी नाडीपरीक्षा अचूक असायची. म्हणूनच निदानही बिनचूक. आता अनेक शोध लागले. अचूक विश्लेषण करणाऱ्या चाचण्या अस्तित्वात आल्या. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या हालचालींचा नजरवेध घेणारी यंत्रणा दिमतीला आली. पण या गदारोळात बिनचूक निदान मात्र कुठे तरी हरवून गेलंय एवढं खरं. या घटनेमधले बालरोगतज्ञ हे किमान नीतिमत्ता पाळणारे , रोहनच्या आजोबांच्या खास परिचयातले , अनेक वर्षांच्या वैद्यकीय सेवेतून नावलौकिक कमावलेले आहेत हे खरेच. पण शरीराद्वारे व्यक्त होणाऱ्या तक्रारीचे मूळ मनातही कुठेतरी असू शकते याचा विचार आजच्या इन्स्टंट उपचार पद्धतीत सहसा होत नाहीच. इथेही त्यांनी रोहनला तपासलं. तापाचा हा दुसरा दिवस. तापाने एकचा पारा ओलांडलेला. आधी त्याचा बंदोबस्त करायचा असे ठरवून त्यांनी एक औषध लिहून दिलं. त्याचा पहिला डोस दवाखान्यातच नर्स देईल असं सांगून त्यांनी पुढचा पेशंट बोलावला. औषध पोटात गेलं की तापाचा पारा खाली येणार याची त्यांना खात्रीच होती. उन्हाळा सुरू झाल्यापासून व्हायरल इन्फेक्शनचे अनेक बालरुग्ण गेल्या दोन महिन्यात त्यांनी हाताळले होतेही.
तापाच्या ग्लानीतही ‘आई.. आई.. ‘ म्हणत रडणाऱ्या रोहनला नर्सकडे देऊन आजोबा प्रिस्क्रिप्शन घेऊन लगबगीने समोरच्या मेडिकल स्टोअरकडे धावले. औषध घेऊन ते परत येईपर्यंत पाच एक मिनिटे गेली असतील , पण तोवर रोहनला सावरणं,सांभाळणं थोपवून धरणं नर्सला अशक्यच होऊन बसलेलं होतं. आजोबा येऊन त्याचा ताबा घेताच नर्सने सुटकेचा निश्वास टाकला. नर्स औषध द्यायला पुढे येताच त्याने पुन्हा रुद्रावतार धारण केला. हात पाय झाडत ओरडायला सुरुवात केली. नर्सने बाटलीच्या टोपणात औषध भरून ते त्याच्या तोंडाजवळ नेले मात्र.. आपल्या थरथरत्या हाताच्या एका फटक्याने रोहनने ते टोपण औषधासकट भिरकावून दिले. नर्स आणि आजोबा दोघेही हतबुद्ध.
” तुम्ही आलायत कसे?” नर्सने आजोबांना विचारले.
” रिक्षाने. “
” याची आई कां नाही आली बरोबर?”
“अहो, तिच्याजवळ अंगावर पिणारं लहान बाळ आहे. त्याला घेऊन ती कशी येणार ? हा तसा जाणत्या वयाचा आहे. माझ्या सवयीचा आहे म्हणून मग मीच घेऊन आलो “
“हो.. पण हे औषध लगोलग त्याच्या पोटात जायला हवं त्याचं काय करायचं ? तुम्ही त्याला घेऊन घरी जा न् हे औषध लगोलग त्याला द्या. त्याच्या आईकडूनच तो घेईल. ” नाईलाजाने आजोबाही ‘ बरं ‘ म्हणाले.
रेडिओच्या जाहिरातीतील ताई सारखी विचारतेय, आई कधी येणार गं नळाला पाणी?
छोटूला कळतच नाही आहे ही ताई रोज रोज अशी का विचारतेय? नळाला पाणी तर आहेच ना? मग?
त्यानं आजीच्या मागं एकसारखा तगादा लावला आहे.
छोटू: “आजी ही वेडी आहे का ग? की या ताईच्या घरात खरंच पाणी येत नाही नळाला?”
आजी: “नाही रे वेडी कशी? त्यांच्याकडं नळच नाही. ऐकलं नाहीस का तिची आई तिला विहीर दाखवतेय ते?”
छोटू : “विहीर?”
आजोबा : “हो, अरे तुझ्या त्या पुस्तकात आहे बघ चित्र; वेल चं?”
छोटू : “Well? बापरे. . आजोबा त्यांना रोज वेल मधून पाणी काढावं लागतं? नळ नाही त्यांच्या कडं?”
“आजी , आपण जाऊया त्यांच्याकडं? मला बघायची आहे वेल”..
महानगरातल्या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या छोटूला घरात नळ नसतात, पाणी नळाला येत नाही ही कल्पनाच करता येत नाही. मागं एकदा त्याच्या यूकेजी च्या’ मिस नं दूध कोण देतं? ‘ असा प्रश्न विचारला होता. छोटू म्हणाला, ‘पिशवी. ‘मिसनं बरंच समजावून सांगितलं. पण हा ऐकेचना. शेवटी त्याच्या आई बाबांना शाळेत बोलाविण्यात आलं. मग एकदा त्याला गावी जाऊन गोठा दाखवावा लागला. तेंव्हा कुठं बाळराजांना गाय आणि म्हैस दूध देतात हे पटलं.
आजी : “हो, जाऊया हं. तुझ्या आई बाबांना रजा काढायला सांगू आणि जाऊ विहीर बघायला.”
छोटू एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं संध्याकाळी आई बाबा आल्यावर त्यांच्या मागं लकडा लावून गावी जायचं ठरवूनही टाकलं.
आजी मात्र विचारात हरवल्या. त्यांच बालपण जरी शहरात गेलं असलं तरी त्यांचे काका- काकू गावीच रहात होते. प्रत्येक दिवाळी, मे महिना या दोन्ही सुट्ट्यांत आजी म्हणजे यमू गावी जायची.
आजींच्या डोळ्यासमोर आठ-नऊ वर्षांची फ्राॅक घातलेली यमू आली. त्यांचं मन भूतकाळात गेलं. छोटू बरोबर बोलता बोलता त्या यमू बरोबर किटलीतून पाणी आणू लागल्या.
“आई, काकू मी येणार आहे पाणी आणायला.”
” खूप लांबून आणायचंय हं पाणी ठमाबाई. तुला नाही जमणार.” . . . काका
अशा कोणत्याही वाक्यांना न जुमानता यमू शांताक्कांच्या मागं लागून फळीवर ठेवलेली लहानशी किटली काढून घेईच. आई आणि काकूच्या मागं मागं ती छोटी छोटी पावलं टाकत चालायला लागे देखील.
शेतातल्या विहिरीवर पोचेपर्यंत तिच्या हातातली किटली शांताक्काकडं पोहोचे. तिच्या हातात, फ्राॅक च्या खिशात फुलं, पानं यांचं संमेलन भरले. प्रत्येक वेगळा रंग तिला खुणावत असे. पानांचा, फुलांचा वेगळा आकार तिला मोहात पाडत असे.
गावापासून जवळच असलेली विहीर. . . सगळ्या बायका इथं जमत आणि मग सुखदुःखाची देवाणघेवाण करत कपडे धुतले जात. दगडावर घासून , धोपटून जसा कपड्यातला मळ बाहेर पडे तसाच मनातला सुध्दा. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचे पिळे, आणि पिळ सुटलेली स्वच्छ मनं तसंच भरलेल्या कळशा घागरी घेऊन सगळ्या घरी परतत.
एवढा वेळ यमू कधी पाण्यात खेळे, कधी आपला फ्राॅक धुवून टाके तर कधी जवळच्या फुलझाडांत रमे. मे महिन्यात मात्र ही फुलझाडं वाळलेली असत. पिवळी पडलेली पानंही तिच्या वही पुस्तकात गोळा होत. शाळेतल्या मैत्रिणींना तिचा हा गावरान अल्बम वेड लावत असे. फिरकीच्या टोपणाची किटली भरुन घेऊन ती घरी परते.
हाताला काही तरी गार लागलं. आजी भानावर आल्या. आजोबा सरबताचा ग्लास हातात घेऊन ऊभे होते.
“काय, आठवणीतून आलात का बाहेर?”
आजीनं हसून ग्लास हातात घेतला.एक घोट घेऊन त्या म्हणाल्या,” परिस्थिती फारशी बदललेली नाही हो. आठवणीतील गाव काय आणि आपलं शहर तरी काय. आजची बातमी वाचलीत पेपर मधली?”
आजोबा: “हं, इतकी वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, अजून दैनंदिन गरजा भागवता येत नाहीत.”
आजी: “परदेशात बेसीनच पाणी देखील पिण्यायोग्य असतं.”
आजोबा: “गल्फ कंट्रीज मध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार होत. पाणी महाग आहे पण दुर्लभ नाही.”
आजी: “आणि जीवनदायी पाण्याचं महत्त्व पटवून द्यायला कमी पडलो आपण”.
आजोबा: “या भारतदेशाला पुन्हा एकदा भगीरथ प्रयत्न करावे लागणार बहुतेक.”
“आजी, आजोबा, आजोबा.” . छोटू जोर जोरात हाका मारत होता.
“अगं ही भीमाक्का बघ नळ सुरू ठेऊन कुठं गेलीय. बादली भरून वाहतेय ना.”
मध्येच मी डोळे उघडले. गप्पा थोड्या थांबल्यागत वाटल्या. म्हणून पाहिलं तर अंकलने त्यांचा मोठा ट्रक वजा बॉक्स,-जसा सामान्यपणे सर्व सैनिकांकडे असतो तसा-उघडला होता व एक फोटो अल्बम त्यातून बाहेर काढला होता. मी पुन्हा दुर्लक्ष करून डोळे मिटले. वेगवेगळ्या फोटोबद्दल ते माहिती सांगत होते.
“ये हमारा खेत, ये अम्मा-बाऊजी, अच्छा… ये ना, ये बडे बडे भाई साब ।
“और अंकल ये कौन है?”
“ये मेरा बेटा सचिन और ये उसकी मम्मी।”
“ओह, हाऊ फनी! जवान अंकल, सचिन की मम्मी ने मतलब इस आंटी ने मुँह क्यों ढक रखा है ?…ओ होs हो! आगे की सारी फोटो में भी ऐसा ही है। ….अंकल आपने ऑंटी की मुँहवाली फोटो क्यों नही खिंची ?”….हीsहीsही हसणं आणि मनसोक्त खिदळणं.
हे जरा अतीच होतं.
“सानवी” मी जरा जोरात हाक मारली. तिला खूणेनं आपल्या जवळ बोलावून घेऊन तिला दटावत म्हटलं, “अंकलना त्रास देऊ नको ग.”
“जी नही मॅडम, वह क्या मुझे परेशान करेगी? बल्कि बहूत अच्छा लग रहा है उससे बाते करके” जवान अंकल म्हणाले.
“बाते करके या बकबक सुनके?” माझा प्रतिप्रश्न होता.
डब्यातले बरेच लोक त्यांचे बोलणे इंटरेस्ट घेऊन ऐकत होते सगळे गंमतीनं हसू लागले. हळूहळू सगळ्यांनाच ही गोष्ट माहित झाली की हा आर्मीतला हट्टाकट्टा नौजवान कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी चालला आहे. तीन महिन्यांच्या सुट्टीसाठी तो घरी गेला होता. पण अचानक सुट्टी कॅन्सल होऊन त्याला त्याच्या हेड-क्वार्टरला पुण्याला पोहोचावे लागले.. आणि आता ऑर्डरप्रमाणे दिल्लीपर्यंत ट्रेनचा प्रवास करून तो गंतव्य स्थानाकडे प्रस्थान करणार होता. ते पण त्याला दिल्लीला कळणार होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल कुतूहल आणि आदराचा भाव दिसत होता.
रात्र झाली. दोघी मुली झोपल्या. मी पण वॉकमनवर गाणी ऐकत थोडा टाईमपास केला. उद्या निनाद आम्हाला रिसिव्ह करायला स्टेशनवर येईल. तो आता परत जाणार नाहीय. हा विचारच मला रोमांचित करत होता.
सकाळ झाली. दिल्ली तो बहुत दूर थी। मी जरा फ्रेश होऊन आले. पाहिलं, तर जवान अंकल आणि सानवी गप्पात रंगले होते. पुन्हा ती मोठी ट्रंक उघडल्याचा आवाज आला. सानवी चक्क खाली बसून वाकून काहीतरी पाहत होती. मी फारशी उत्सुकता दाखवली नाही. पण काही वेळानं तिचा मोर्चा माझ्याकडे वळला.
“मम्मा, जवान अंकल कडे ना गन आहे हे. मी आत्ताच पाहिली. जवान अंकल खूप सगळ्या दुश्मनांना मारणार आहेत. पण मी त्यांना सांगितलय की “हम दिल्ली से और गोलिया भेज देंगे, आप जीत के ही आ जाना। मम्मा आपण पाठवू शकतो ना गोळ्या?” सानवी सगळं प्लॅनिंग केल्यागत बोलली.
“हो ग बाई, पाठवू या. पण आता जरा गप्प बस. सोनाली आणि तू पत्ते खेळत बसा. मी तिला दटावले.”
ती गप्प झाली खरी. पण त्या पाच वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यात काय काय खदखदत होतं तिचं तिच जाणे !
“मम्मा मी ना आता या राखी पौर्णिमेला जवान अंकलच्या सचिनला राखी पाठवणार आहे. मम्मा मी त्याची बहीण होऊ शकते ना?” तिने विचारले .
तिला गप्प बसण्यासाठी मी होकारार्थी मान हलवली.
दुपार झाली. दोघी झोपी गेल्या होत्या. डब्यात बरीच शांतता होती. जवान अंकल पण जरा खिन्न होऊन बसलेले दिसले. मधेच ते दुसऱ्या बोगीत गेले असावेत. कारण त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखेच तीन चार जवान गप्पा मारत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आलेले दिसले. बोलता-बोलता सानवी कडं इशारा करत’ नन्हा फरिश्ता’ असं अंकल म्हणालेलं मी ऐकलंआणि मला खूपच समाधान वाटलं.
संध्याकाळ झाली. आमच्या हीरोइन कन्या का जाग्या होऊन जवान अंकल बरोबर हितगुज करत होत्या. तिने कागदावर अंकलचा पत्ता लिहून घेतला असावा. कारण ती सगळं काही विसरून आमचा पत्ता वगैरे त्यांना सांगत होती. माझे लक्ष गेलेले पाहिल्यावर माझ्या जवळ येऊन माझ्या कानात तिने हळूच सांगितले,
“जवान अंकल परके नाहीयेत आपलेच आहेत म्हणून त्यांना पत्ता दिला.”
मी शरणागतीच पत्करली कारण त्या वेडीला रागवण्यात आता काहीच अर्थ नव्हता.
फरीदाबाद आलं तशी आमची उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. मी, सोनाली फ्रेश झालो. सानवीला पण बेसिन पर्यंत घेऊन येण्यास निघाले. तेवढ्यात तिचाच जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. ‘आता काय रामायण- महाभारत घडलं?’ विचार करत मी कंपार्टमेंट मध्ये गेले, पाहिलं तर खूप लोकांचा घोळका समोरचा सीन पाहत होता .
“अंकलss आप कारगिल मत् जाना….” सानवी रडत रडत म्हणत होती. आप दिल्ली स्टेशन पर उतर के सिधे अपने गाव चले जाना …. अंकल प्लीज्… अगर गलती से दुश्मन आपको मारेगा तो …..नही, नही पापा के बगैर सचिन कैसे जियेगा? भगवान जी सचिन को पापा और मुझे जवान अंकल हमेशा के लिए चाहिये। ….. जवान अंकल प्लीज “तिचे रडणे आणि हुंदके थांबतच नव्हते.
“अभी भी मुझे बहुत कुछ याद है,मम्मा” हे सांगताना तिचे डोळे लकाकत होते. “आपल्या वाटेतच ते गाव आहे. तर त्यांच्या घरावर आपण अचानक जाऊन हल्ला करायचाय. कशी आहे माझी आयडिया?” विचारताना तिच्या शरीरातलं ते अजब रसायन जणू ऍक्टिव्हेट झालंयअसं मला वाटलं.
“मला नाही बाईआवडली ही आयडिया.अगं, खूप वर्षांपूर्वी…. जवळजवळ वीसेक वर्षांपूर्वी… ट्रेनमध्ये झालेली थोडीशी ओळख ती काय ..आणि त्याच्या आधारावर त्यांच्याकडे अचानक जायचं म्हणजे काय?या मधल्या कालखंडात काय काय घडलं असेल,… ते तिथेच रहाताहेत का?… ते आपल्याला ओळखतील तरी का?
“माझं बोलणं मध्येच तोडून ती म्हणाली,”मम्मा यार ,नको बोअर करू! नाही भेटले तर कोई बात नहीं.पण जर भेटले तर… इमॅजिन कर, कित्ती कित्ती थ्रीलिंग गोष्ट असेल.”
एडवेंचर एक्साइटमेंट ,थ्रील या दुनियेत गर्क झालेल्या तिला इतर काही समजूनच घ्यायचे नव्हते.
लगबगीनं आवरून आम्ही जोधपूरला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो. गाडीनं वेग पकडला अन् माझ्या मनानं पण भूतकाळातल्या आठवणीत वेगानं प्रवेश केला.
…..
साधारण मे 1999 मधली ती घटना.उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही तिघी मायलेकी पुण्याला आलो होतो. निनाद गेली तीन वर्ष साऊथ आफ्रिकेत होता. पण अचानक मुदतीपूर्वीच काम संपल्यामुळे तो परत दिल्लीत आला होता. त्यामुळे मीही घाईगडबडीने मुलींसह दिल्लीत परत जायला निघाले होते .पुणे स्टेशन वर आम्हाला सी ऑफ करायला माहेर आणि सासरचा बराच मोठा गोतावळा जमला होता. गाडीत बसण्या पूर्वीच नेहमीप्रमाणं सानवीचं रडणं सुरू झालं.
“मै यही रहूंँगी… दिल्ली नहीं जाऊँगी” तिचा हट्ट चालू झाला होता. सोनाली आपली सर्वांना बाय् करून सगळ्यांनी गिफ्ट दिलेली कॉमिक्स चाळत होती.
गाडीने स्पीड पकडला.मीही आपले सामान व्यवस्थित लावून सहप्रवाश्यांवर एक नजर टाकून आपल्या सीटवर विराजमान झाले. सोनाली कॉमिक्स मध्ये बुडून गेली होती. तर सानवी खिडकी जवळच्या सीट वर कब्जा करण्याच्या खटाटोपात होती.
मला प्लॅटफॉर्मवर असतानाच प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे बरेच फौजी इकडे तिकडे वावरत होते… आणि ते बरोबरच होते म्हणा, कारण ते कारगिल युद्धाचे दिवस होते. सं पूर्ण देशात समाजाच्या प्रत्येक थरात तेव्हा वेगळ्या तर्हेचे वातावरण निर्माण झाले होते. वीररसाची ,देशप्रेमाची भावना आबालवृद्धांत जागृत झालेली होती.काहीतरी आगळेवेगळे, भव्यदिव्य घडावे असे सगळ्यांनाच वाटत होते. आमच्य बोगीत चढणाऱ्या काही फौजींना पाहून माझ्या मनात खूप अभिमान व आदरयुक्त अशी भावना जागृत झाली होती.
मनात अजून सैनिकांचेच विचार चालू होते. तेवढ्यात सानवीनं मला जरा हलवलं. हळू आवाजात ती सांगू लागली,
“मम्मा ते मुच्छड अंकल आहेत नां त्यांनी मला त्यांची सीट द्यायचं प्रॉमिस केलंय. प्लीssज मी तिथं जाऊन बसू? तू सांगितलेले सगळं मला याद आहे. ओकेsss….!” आणि माझ्या होकारा-नकाराची वाटही न पाहता ती खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसली सुद्धा.
मी मुलींना त्या शाळेत जाऊ लागल्या, तेव्हापासून असं बजावून ठेवलं होतं की आपण खूपदा तिघीच इथे राहतो. डॅडी कधी परदेशात असतो तर कधी इथे. पण हे सगळे कोणालाही सांगायचे नाही. आपल्या घराचा पत्ता.एरीया, फोन नंबर, पण कोणा परक्या व्यक्तीला सांगायचा नाही. कोणी खायला दिले तर घ्यायचे नाही.कोणी कुठे ‘टच’ केला तर ओरडायचे… अनोळखी व्यक्ती बरोबर जायचे नाही. ओळखीच्या व्यक्तींबरोबर ही माझी परवानगी घेतल्याशिवाय ,मला सूचना दिल्या शिवाय जायचे नाही. कशी खबरदारी घ्यायची हे समजावून सांगताना… किडनॅपिंग, रेप ,या सारख्या विक्रृत गोष्टी त्या निष्पाप जीवांना त्यांना कळेल अशा भाषेत सांगताना मला खूप प्रयास पडले होते.
………
माझं लक्ष गेलं तेव्हा सानवी खिडकीबाहेर चे सीन बघण्यात गर्क होती. पण हळूहळू ती अंकल बरोबर गप्पा मारतेय हे मला कळलं होतं. मी डोळे मिटून पेंगुळलेल्या अवस्थेत बसले होते.गप्पांचे काही शब्द,काही वाक्ये,काही संदर्भ माझ्या कानावर पडत होते.
“अच्छा, तो अंकल आप सेना में है ?आप जवान है ?तो जैसे हमारी किताब में ‘जय जवान जय किसान’ लेसन है वैसे ?
“हॉ गुडिया”
“फिर आप बुड्ढे हो जाओगे तब भी जवान कहलाओगे? मैं आपको जवान अंकल ही बुला सकूंगी , है ना ?” सानवीआणि अंकल ची प्रश्नोत्तरे चालू होती. अंकल चे हसणे कानावर पडले, “नही गुडिया अगर प्रमोशन नहीं मिला तो 17 साल की सर्विस के बाद हमें रिटायर होना पडता हैं। हमारी जगह नये जवान आते हैं. अपनी आर्मी हमेशा जवान रहनी चाहिये ना इसलिये!” अंकल तिला अगदी मनापासून समजावून सांगत होते.
सकाळी- सकाळीच सानवी ने, आमच्या धाकट्या कन्येने दोन हॅन्ड बॅग्ज आणि एक सॅक माझ्यासमोर टाकला.
मम्मा आपण दोघी राजस्थानमधल्या दोन तीन खेड्यात जातोय.त्या दृष्टीने आपले साधारण तीनेक दिवसांचे कपडे पॅक कर.” तिने फर्मानच ऐकवले.’आता हे काय नवीनच खूळ?’ मी विचार करत राहिले.
ह्या मुलीत रक्ताबरोबरीनं एक अजब रसायन वाहतं असं मला नेहमीच वाटत आलंय.अल्लड, बडबडी, भांडखोर, थोडीशी हटवादी अशी ही.तर मोठी सोनाली समजूतदार, अबोल,शांत स्वभावाची. पण तरीही सानवी च्या वागण्यात,तिच्या हट्टात मला एक तर्हेचा गोडवा जाणवतो.लोकांना आपलंसं करण्याची जादू तिच्या स्वभावातच आहे.
आई तर नेहमीच म्हणतात, “मोठी गुड गर्ल तर धाकटी गोड मुलगी.”
आमच्या गुड गर्ल चं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. जावई पण तिच्या सारखाच डॉक्टर. सगळी फॅमिलीच यु. एस्.ची सिटीझन. त्यामुळे ही पण तिथे छान सेट झाली. आठ महिन्याच्या तेजस ला घेऊन ती नुकतीच इंडियात येऊन गेली. इथे दिल्लीतच, तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं. मग काय बाळालाआमच्याकडे सोपवून लग्नात धमाल करायला ती मोकळी झाली ! शॉपिंग,हिंडणं-फिरणं मनसोक्त करून मागच्या आठवड्यात ती परत गेली अन् घर सुनं सुनं वाटायला लागलं.कंपनीच्या कामामुळे निनादचा नेहमीच एक पाय घरात तर एक परदेशात अशी स्थिती. परवाच तो यु. के.ला गेला, तेही चांगलं दोन महिन्यांसाठी. घरात मी एकटी.कारण कामामुळे आमची गोड मुलगी दिवसभर घराबाहेरच असायची.
एम् एस् सी झाल्याझाल्या इथं दिल्लीतच तिनं एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब स्वीकारला.’ गैरपारंपारिक ऊर्जा स्रोत’ हा तिचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आणि ती कंपनी पण सोलर एनर्जी प्रॉडक्टवर काम करणारी. त्यामुळे नोकरीत ती छान रमली. बरेचदा तिला कामाच्या निमित्ताने गुजरात, राजस्थान, हरियाणा यांच्या पश्चिमी जिल्ह्यांत जावं लागायचं. त्यांचा सहकार्यांचा ग्रुप काम आणि भटकंतीत छान रमायचा.
‘पण आज हे मला”तू पण राजस्थानात चल म्हणणं,” म्हणजे काय प्रकार आहे ?’मी अंदाज बांधत राहिले.
नऊ च्या सुमाराला ती पुन्हा घरात दाखल झाली.
“हे काय मम्मा,तू अजून तयार नाही झालीस ?मी माझी बाहेरची कामे पण उरकली.“मला पारोश्या अवतारात बघून ती उदगारली.
“मला तुझा प्लॅन कळल्याशिवाय मी एक पाऊल पण पुढे टाकणार नाही.”मी ठामपणे सांगितले.
“त्याचे असे आहे की पुढचे चार दिवस आम्हाला सुट्टी आहे.पण मी आमच्या गॅंग बरोबर नाही जाणारेय.”ती म्हणाली.
“का?”न राहवून मी विचारले.
“त्याचं काय आहे ना,” एखाद्या तत्वज्ञान्याच्या अविर्भावात ती बोलू लागली, “आपल्या घरात एक छोटीशी मुळूमुळू रडणारी मुलगी आहे. डॅडी घरात नाही…ते सोनालीचं गुब्बू- गूब्बू बाळ सुद्धा लळा लावून त्याच्या देशात निघून गेलं…. आता मी पण
गावाला गेले ना,तर ती मुलगी जेवण-खाण,काम धंदा सोडून नुसती रडतच बसेल आणि गंगा-यमुनेच्या पुराने घर वाहून जाईल…… दॅट्स व्हाय…!”
ती पुढे काय- बाय सांगत होती.पण ती माझ्याबद्दल एवढा विचार करते.माझी तिला काळजी वाटते. हा विचारच मला सुखावून टाकणारा होता. गुगल मॅप वरून तिने सगळा प्लॅन मला समजावला. “जोधपूरहून पुढे ही चार खेडी मी कव्हर करणार आहे. हस्तकला, हस्तशिल्प,कॉटेज इंडस्ट्री साठी हा एरिया प्रसिद्ध आहे.उच्च प्रतीच्या लाखेपासून केलेल्या वस्तू आणि बांधणी वर्क त्याला लागणारे नैसर्गिक रंग असं खूप काही मला शिकायचंय.” ती सांगत गेली. तर ठरल्याप्रमाणे तू माझ्याबरोबर येणार आहेस. आपली राहण्याची सोय पण केलीयआणि जोधपुरपासून पुढे हिंडण्या- फिरण्यासाठी मी कॅब पण बुक केलीय. तेव्हा नो चिंता,नो फिकिर.” तिने मला अधिकारवाणीने सांगितले.
“आणखी एक गंमत आहे.” ती म्हणाली. ‘गंमत?व्वा! आता कुठं सगळ्या प्लॅनला सानवी टच् येतोय’ मी मनात म्हणाले.
आपल्या खोलीतून एक जाडजूड डायरी -खूप जुनी अशी- आणून तिनं माझ्या हातात ठेवली. वीस-एक वर्षांपूर्वीची ती डायरी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करून गेली. निनाद त्यावेळी तीन वर्षाचं साऊथ आफ्रिकेतील काम संपवून इकडं परत आला होता. इतर खूप वस्तूंबरोबर आणलेल्या दोन डायर्यांपैकी त्या आणि त्याच डायरी साठी दोघी बहिणींनी केलेलं झिंज्या पकडू भांडण मला आठवलं.
मी हसत-हसत डायरीची पानं चाळू लागले. “जास्त बघू नको मम्मा, फक्त फर्स्ट पेज बघ. ती म्हणाली… आणि…मम्मा जी गंमत फर्स्ट पेज वरच आहे. म्हणूनच माझ्या लक्षात राहिलीय.”ती उदगारली.
मी पाहू लागले इंग्लिश मध्ये ओम, जय माता दी, त्याखाली स्वतःचं नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी वगैरे आणि त्याखाली कागदाचा वेडावाकडा फाडलेला तुकडा चिकटवला होता. त्यावर बलदेव सिंग... सिंधोरा कलाँ… नियर हनुमान गढी… जोधपुर.…असं लिहिलेलं होतं.तर बाजूला बाण काढून जवान अंकल,सन सचिन असं लिहिलेलं होतं…. वाचलं अन् माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.