श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ एका हाकेचे अंतर….भाग 1. ☆ श्री अरविंद लिमये ☆

रोहन. आठ वर्षांचं कोवळं वय. आई आणि तान्हया लहान भावाबरोबर रोहनबाळ आजोळी आलेला. आणि साधं तापाचं निमित्त झालं. दोन दिवस झाले तरी घरगुती औषधाने ताप उतरेना म्हणून त्याच्या आजोबांनी त्याला आज परिचित आणि ख्यातनाम अशा बालरोगतज्ञाकडे तत्परतेनं आणलंय.

पूर्वी नाडीपरीक्षा अचूक असायची. म्हणूनच निदानही बिनचूक. आता अनेक शोध लागले. अचूक विश्लेषण करणाऱ्या चाचण्या अस्तित्वात आल्या. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या हालचालींचा नजरवेध घेणारी यंत्रणा दिमतीला आली. पण या गदारोळात बिनचूक निदान मात्र कुठे तरी हरवून गेलंय एवढं खरं. या घटनेमधले बालरोगतज्ञ हे किमान नीतिमत्ता पाळणारे , रोहनच्या आजोबांच्या खास परिचयातले , अनेक वर्षांच्या वैद्यकीय सेवेतून नावलौकिक कमावलेले आहेत हे खरेच. पण शरीराद्वारे व्यक्त होणाऱ्या तक्रारीचे मूळ मनातही कुठेतरी असू शकते याचा विचार आजच्या इन्स्टंट उपचार पद्धतीत सहसा होत नाहीच. इथेही त्यांनी रोहनला तपासलं. तापाचा हा दुसरा दिवस. तापाने एकचा पारा ओलांडलेला. आधी त्याचा बंदोबस्त करायचा असे ठरवून त्यांनी एक औषध लिहून दिलं. त्याचा पहिला डोस दवाखान्यातच नर्स देईल असं सांगून त्यांनी पुढचा पेशंट बोलावला. औषध पोटात गेलं की तापाचा पारा खाली येणार याची त्यांना खात्रीच होती. उन्हाळा सुरू झाल्यापासून व्हायरल इन्फेक्शनचे अनेक बालरुग्ण गेल्या दोन महिन्यात त्यांनी हाताळले होतेही.

तापाच्या ग्लानीतही ‘आई.. आई.. ‘ म्हणत रडणाऱ्या रोहनला नर्सकडे देऊन आजोबा प्रिस्क्रिप्शन घेऊन लगबगीने समोरच्या मेडिकल स्टोअरकडे धावले. औषध घेऊन ते परत येईपर्यंत पाच एक मिनिटे गेली असतील , पण तोवर रोहनला सावरणं,सांभाळणं थोपवून धरणं नर्सला अशक्यच होऊन बसलेलं होतं. आजोबा येऊन त्याचा ताबा घेताच नर्सने सुटकेचा निश्वास टाकला. नर्स औषध द्यायला पुढे येताच त्याने पुन्हा रुद्रावतार धारण केला. हात पाय झाडत ओरडायला सुरुवात केली. नर्सने बाटलीच्या टोपणात औषध भरून ते त्याच्या तोंडाजवळ नेले मात्र.. आपल्या थरथरत्या हाताच्या एका फटक्याने रोहनने ते टोपण औषधासकट भिरकावून दिले. नर्स आणि आजोबा दोघेही हतबुद्ध.

” तुम्ही आलायत कसे?” नर्सने आजोबांना विचारले.

” रिक्षाने. “

” याची आई कां नाही आली बरोबर?”

“अहो, तिच्याजवळ अंगावर पिणारं लहान बाळ आहे. त्याला घेऊन ती कशी येणार ? हा तसा जाणत्या वयाचा आहे. माझ्या सवयीचा आहे म्हणून मग मीच घेऊन आलो “

“हो.. पण हे औषध लगोलग त्याच्या पोटात जायला हवं त्याचं काय करायचं ? तुम्ही  त्याला घेऊन घरी जा न् हे औषध लगोलग त्याला द्या. त्याच्या आईकडूनच तो घेईल. ” नाईलाजाने आजोबाही ‘ बरं ‘ म्हणाले.

(क्रमशः)

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments