(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# शहंशाह#”)
☆ महत्वाकांक्षा….. भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
सीमा लगबगीनं बसस्टॉपवर आली. आज नेहमीची फुलेवाडीची बस सोडून ती शिवाजी विद्यापीठाच्या बसमध्ये चढली. सीमाला आज रमाकाकूंना भेटायला जायचं होतं. गेले काही दिवस त्या फोन करून तिला ‘येऊन जा ग’, म्हणून बोलवत होत्या. आज शनिवार असल्यानं तिला हाफ डे होता. सकाळी घरातून निघतानाच तिनं सुधीरला आणि माईंना तसं सांगितलं होतं. घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालणार होता आज. चिनू , तिची मुलगी, माईंना दत्ताच्या देवळात सोडेल संध्याकाळी आणि ती जीमला जाईल. सुधीर ऑफीस झाल्यावर घरी जाता जाता त्यांना पिकअप करेल, असं सगळं ठरवूनच सीमा सकाळी घरातून बाहेर पडली होती. अर्थातच ती रमाकाकूंना निवांत वेळ देऊ शकणार होती. आजची संध्याकाळ रमाकाकूंसाठी !!
रमाकाकूंच्या सोबत राहण्याची सीमाची ही काही पहिलीच वेळ नव्हती. रमाकाकूंचं काय काम असावं बरं? खिडकीतून बाहेर बघत ती विचार करत होती. रमाकाकूंची सुषमा तिची शाळेपासूनची मैत्रीण. रमाकाकू आणि सीमाची आई दोघीही पद्माराजे हायस्कूलला शिक्षिका. सुषमा आणि ती त्याच शाळेत, एकाच वर्गात, एकाच बाकावर बसत. त्यांच्या मैत्रीचं सगळ्यांना खूप नवल वाटे. अभ्यासाची आवड सोडली तर बाकी काहीच साम्य नव्हतं दोघीत. सीमा उंच, काळी सावळी, सुषमा गिड्डी, गोरीगोबरी. सुषमाचा बॉयकट,सीमा जाडजूड केसांच्या दोन लांब शेपट्या घाले. सुषमा वक्तृत्व, निबंध स्पर्धेत माहीर, तर सीमा चित्रकला, पेंटिंग, क्राफ्ट यात रमणारी. पण मैत्रीला कुठले नियम नसतात. त्या दोघींचे मेतकूट चांगलेच जमत असे. अगदी सुट्टीच्या दिवशीही त्या एकत्र असत. दहावी नंतर दोघींनी सायन्स साईड घेतली. न्यू कॉलेजचे ते अभ्यासाचे दिवस सीमाच्या डोळ्यासमोर आले. खूप अभ्यास करूनही मेडिकलला ऍडमिशन मिळण्यासारखे मार्क दोघींनाही मिळाले नव्हते.
सीमानं आपली सीमा ओळखून न्यू कॉलेज मध्येच एफ्.वाय.बी.एस्सीला ऍडमिशन घेतली. सुषमा शेवटपर्यंत कोणत्यातरी मेडिकल कॉलेजमध्ये मिळेल प्रवेश, निदान बी. ए. एम्. एस.तरी, अशा आशेत वाट बघत राहिली. तेव्हाही रमाकाकू सीमाला सुषमाची समजूत काढायला सांगत. ती मात्र ऐकत नसे कोणाचंच. नाईलाजानं सुषमानं ऑगस्ट एन्ड ला एफ्. वाय. जॉईन केलं. जून ते ऑगस्ट, तीन महिन्यांत झालेला सगळा अभ्यास सीमानं आनंदानं समजावून सांगितला. गेले तीन महिने सुषमाशिवाय वर्गात बसणं तिला फारच कंटाळवाणं वाटत होतं. आता पुन्हा एकदा मैत्रीचं फुलपाखरू हसू लागलं होतं. अभ्यास, स्पर्धा, प्रॅक्टिकल्स, स्टडीटूर्स यात पाच वर्षे हातात हात घालून पळाली. एम्. एस्सीच्या कॉन्व्होकेशन नंतर दोघींच्या घरच्यांनी त्यांची डिग्री आणि मैत्री दोन्ही सेलिब्रेट केलं. किती आनंदात होती सीमा ! पण हा आनंद काही काळच टिकला.
सीमाला गावातील एका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नोकरी मिळाली. तशी ती बॅंकेच्या परीक्षा देत होती. रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षाही द्यायच्या होत्या. तोपर्यंत रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून ही नोकरी धरली तिनं. मनातील ही दोलायमान स्थिती सुषमाला सांगायची होती. कॉलेज नसल्याने दोघींची भेट होत नव्हती. सुषमा मोबाईल ही उचलत नव्हती. बरेच दिवस तिचा पत्ताच नव्हता. तो मैत्री संपवणारा दिवस सीमा कधीच विसरू शकत नाही. आजच्या सारखीच शनिवारची संध्याकाळ होती. सीमा तिच्या आईबरोबर गप्पा मारत बसली होती. अचानक सुषमा आली. सीमाची कळी खुलली.
“सीमा, चल ना गं, रंकाळ्यावर जाऊ. किती दिवस झाले भेळ खाल्ली नाही आपण.”
सीमानं आईकडं पाहिलं. ” या गं जाऊन. मनसोक्त भेळ खा. गप्पाही मारा पोटभर.” आई म्हणाली.
सीमा पटकन आवरायला पळाली. घरी परत यायला थोडा उशीर झाला. पण आज छान वाटत होतं. सुषमा भेटली एवढ्यावरच ती खूष होती.
रात्री झोपताना आईनं तिला विचारलं,” काय गं? सुषमाचा नवरा काय करतो? तारीख ठरली का लग्नाची?”
“लग्न? आणि सुषमाचं? नाही. मला काही बोलली नाही ती? तुला फोन आला होता का तिच्या आईचा?”
“नाही गं. फोन कुठं? सुषमाच म्हणाली तू आवरायला गेली होतीस तेव्हा.”
आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला.
(पूर्वसूत्र- मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडेही भुईसपाट झाली. आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्या सारखी उदास होऊन गेलेली लेकुरवाळी केळ..! तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!)
हे जे काही घडलं त्यात बेकायदेशीर काहीच नव्हतं.तरीही स्वतःचं हक्काचं काहीतरी कुणी हिसकावून घ्यावं तसं माझं मन उदास,अधू होऊन गेलं. त्या अधू मनाचा ‘कार्पेट एरिया’ या उदास मनस्थितीत थोडा आक्रसत चाललाय हे जाणवत होतं!
अर्थात याला इलाज नव्हता.काळ हेच याच्यावरचं औषध होतं..!
त्या औषधानेच आक्रसून गेलेलं मन पुन्हा प्रसरण पावलं. आपली स्वतःची सदनिकासुद्धा अशाच भुईसपाट केलेल्या फळा- फुलांच्या झाडांवरच उभी आहे याची जाणीव होताच ते प्रसरण पावलेलं मन उदासवाणं का होईना थोडसं हसलंसुद्धा..!
त्या परसदारी मग सिमेंटची झाडं रोवली गेली. कामं आपापल्या वेगाने सुरू झाली आणि आपला वेग वाढवत राहिली. निसर्गाशी नातं तोडणाऱ्या भिंती उंची वाढवत उभ्या राहू लागल्या.अगदी डेरेदार वृक्षांपेक्षाही उंच वाढू लागल्या.
एक दिवस देवाची पूजा झाल्यानंतर जाणवलं की एरवी पूर्वेकडच्या खिडकीतून आत येऊन थेट माझ्या देवघरातल्या देवांचे पाय धुणारा कोवळा सूर्यकिरण आज आलाच नव्हता.पलिकडे उभ्या राहिलेल्या भिंतीवर धडकून तो जायबंदी होऊन तिथेच पडलेला होता !
त्यादिवशी साग्रसंगीत पूजा होऊनही मनातले देव मात्र असे पारोसेच राहिले होते. अस्वस्थ मनातली ही मरगळ मग स्वतःच कंटाळून कधीतरी खालमानेने निघून गेली..!
माझ्या सदनिकेतला अवकाश अंधारला तरी मन कुठेतरी उजेड,हुरुप,उत्साह शोधत राहिलं.जमेल तसं हळूहळू फुलत राहिलं. मागचं सगळं विसरून गेलं.
पण ते हिरमुसणं जसं तात्कालिक होतं तसं ते विसरूणंही क्षणभंगुरच ठरलं. गंमत म्हणजे ते विसरणं क्षणभंगुर ठरवायला निमित्त झालं एका माकडाचंच..!
त्या सकाळी आमच्या पूर्वेकडच्या कंपाऊंडच्या रुंद भिंतीवर ते माकड बसलेलं होतं. सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात होतं.वाट चुकल्यासारखं केविलवाणं दिसत होतं. त्याच्या अस्वस्थ येरझारा माझ्यावर गारूड करीत होत्या. ट्रॅक्टरखाली पिल्लू चिरडून मेल्याने वेडीपिशी झालेली माकडीण आणि नुकताच सर्वांचे चावे घेऊन हैदोस घालत अखेर जेरबंद झालेलं ते माकड या सर्वांच्यातलाच एक समान धागा माझ्या नजरेसमोर अधिक ठळक केला तो लहानपणी बिरबलाच्या गोष्टीत भेटलेल्या, आपल्या पिलाला पाण्याने भरलेल्या पिंपात पायाखाली घेऊन ठार मारून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या माकडीणीने ! तिच्या त्या कृतीतून हुशार बिरबलाने भला स्वतःच्या सोयीचा अर्थ काढून त्यातच धन्यता मानली असेल, पण क्रूर आप्पलपोट्या माणसांच्या जंगलात एकट्या पिल्लाला मागे ठेवण्यापेक्षा काळजावर दगड ठेवून त्याचाच बळी घेणार्या त्या माकडीणीचं अपत्यप्रेम निश्चितच निर्विवाद होतं हे या माकडाच्या अस्वस्थ येरझारा मला आग्रहाने सांगत होत्या.
मला त्या माकडाची मनापासून कींव वाटली. पण त्याच्यात गुंतून पडायला मला वेळ नव्हता. ब्रश करून मी आत आलो. तोंड धुवून चहा घेतला. पेपर वाचला. आंघोळीला जाण्यापूर्वी पूजेला कुंड्यातल्या झाडांची फुलं आणायला मी टेरेसवर गेलो. फुलं काढली.परत फिरताना सहज माझी नजर खाली गेली. वाट चुकलेलं ते माकड अद्यापही खाली तिथेच होतं. रस्त्यापलीकडे एकटक रोखून पहात केविलवाण्या नजरेने ते काहीतरी सांगू पहात होतं. रस्त्यालगतच्या घराच्या उंच छपरावर माकडांचा एक कळप बसलेला होता. कळपातल्या सर्व माकडांच्या आशाळभूत नजरा या माकडावरच खिळलेल्या होत्या!
कित्येक दिवसांपूर्वी मनात ठाण मांडून धुमाकूळ घालणाऱ्या माकडामुळे आधीच हळवं झालेलं माझं मन अंतर्बाह्य शहारलं..!
माकडांच्या नि:शब्द अशा त्या हालचालींमध्ये एक आर्त दडून बसलेलं माझ्या लक्षात आलं..!
आंब्याचा मोहोर यायच्या या दिवसात माकडांचा एक कळप दरवर्षी परसातल्या त्या आम्रवृक्षावर मुक्कामाला यायचा. आंब्याचा मोहोर खुडून मेजवानी झोडायचा. तृप्त होऊन त्या आम्रवृक्षाचा कृतज्ञतेने निरोप घेऊन जायचा.
आज.. तोच कळप नेहमीच्याच वाटेने इथवर आला होता. त्याच कळपातलं ते माकड वाट शोधत नेमकं इथं आलं होतं. म्हणजे त्यांची वाट चुकलेलीच नव्हती. सुगंधी मोहराने फुललेलं ते शोधत होते ते आंब्याचं झाड मात्र माझ्या सोनचाफ्याच्या झाडासारखंच हरवलेलं होतं !
ही माकडं वाट चुकलेली नव्हती तर स्वतःच्या तथाकथित सुखासाठी सगळ्यांच्याच सुखाचा आंबेमोहोर आतयायीपणाने ओरबाडून घेणारा आणि निसर्गाने मोठ्या विश्वासाने दिलेलं तेजोमय बुद्धिमत्तेचं कोलीत हातात येताच उन्मत्तपणाने थैमान घालंत सारा निसर्गच जाळत सुटलेला माणूसच खरंतर वाट चुकला होता..!
माणसाच्या रूपातलं हे ‘वाट चुकलेलं माकड’ अंशरूपाने कां होईना माझ्यातही अस्तित्वात आहे याची जाणीव मला सैरभैर करतेय. स्वतःच्या उत्कर्षाच्या सगळ्याच वाटांना पारखा होत चाललेला प्रत्येक माणूसही आज त्यामुळेच अस्वस्थ आहे !
माणसाच्या रूपातल्या या वाट चुकलेल्या माकडाला जेरबंद कसं करायचं या विवंचनेत माझ्या मनातला निसर्ग मात्र दिवसेंदिवस सुकत चालला आहे..!!
(पूर्वसूत्र-या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता. कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!)
ते एक स्वप्नच होतं. त्याला तसा नेमका अर्थ कुठून असायला? मनी वसत होतं तेच अशी सलग साखळी बनून स्वप्नी दिसलं होतं एवढंच. पण हे एवढंच होतं तर मग पहाट झाली, पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला नेहमीसारखी जाग आली तेव्हा पक्ष्यांचा तो किलबिलाट मला पूर्ण जाग येण्यापूर्वीच्या क्षणभर स्वप्नातल्या त्या चित्कारासारखा कां वाटला होता ते मला तेव्हा तरी नीट उमगलं नव्हतं. पण काहीही असो पूर्ण जागा झाल्यावर याच किलबिलाटाने मी माणसात आलो. अर्धवट,अस्वस्थ झोपेमुळे आलेला थकवा पक्ष्यांचा तो आवाज ऐकून कुठल्याकुठे विरून गेला. एखाद्या गोड आवाजातल्या आर्जवी भूपाळीच्या शांत सुरांसारखी ती किलबिल माझ्या मनाला हळूवार पणानं कुरवाळत होती.
खूsप बरं वाटलं.
मनातलं माकड (बहुधा) निघून गेलं. दुसऱ्या रात्री त्यामुळेच मला शांत झोप लागली. मग रोज रात्री लागू लागली. ठरल्यासारखी पक्ष्यांची किलबिल ऐकून त्या झोपेतून पहाटेची जागसुद्धा तशीच नेमानं येत राहिली.
पण खूप दिवस उलटले आणि हा नित्यनेम चुकला. पुन्हा एक ओरखडा उठला.
विस्मरणात गेलेलं ते ‘पक्ष्यांचं’ झाड अचानक स्वप्नात जसंच्या तसं पुन्हा जसं लख्ख दिसलं होतं तसंच मनातून निघून गेलंय असं वाटणारं ते वाट चुकलेलं माकड पुन्हा आपलं डोकं वर काढणार याची मात्र तेव्हा मला कल्पना आलेली नव्हती.
आमच्या अपार्टमेंटच्या पूर्वेकडील कंपाऊंडच्या पलीकडे एका जुन्या वाड्याचं प्रशस्त परसदार होतं. त्या परसातल्या हिरव्या सोयऱ्यांबरोबर गुजगोष्टी करणाऱ्या पक्ष्यांची किलबिल आम्हाला रोज पहाटे हळुवार आग्रहानं जागवत होती..! पहाटे उठून स्वयंपाकघरातली पूर्वेकडची खिडकी उघडली की अलगद आत येणार्या वार्याच्या झुळूका त्याच परसातल्या सोनचाफ्याच्या सुगंधाने माखलेल्या असायच्या.ते साधं खिडकी उघडणंही इतकं सुगंधी आणि सुखकारक असायचं की कांही क्षणानंतर तो सुगंध विरून गेला तरीही ताज्या टवटवीत झालेल्या आमच्या मनात तो सोनचाफ्याच्या अत्तराचा फाया दिवसभर खोचलेला असायचा.
श्वासांइतकीच त्या सुखाचीही गरज निर्माण झालेल्या आम्हाला एका सकाळी खूप उशिरा जाग आली. अगदी उन्हं वर आल्यानंतर.पक्ष्यांची किलबिल ऐकूच न येण्याइतकी गाढ झोप लागलीच कशी याचं आश्चर्य करीत अंथरूण सोडलं. सवयीप्रमाणे स्वयंपाकघराची खिडकी उघडली आणि कांहीतरी चुकल्यासारखं मन सैरभैर झालं. काय चुकलं ते समजलंच नाही क्षणभर. मग लक्षात आलं, खिडकीतून आत येणारी गार वाऱ्याची झुळुक आज रोजच्यासारखी नाचत बागडत आलेली नव्हती. सोनचाफ्याचा सुगंध नसल्याने ती हिरमुसली होती !
झरकन् वळून दार उघडून पाहिलं तर परस ओकंबोकं दिसत होतं. परसातली सदाफुली, मोगरा, शेवंती, अबोली, कोरांटी, पारिजातक, लिंब सगळेच सगळेच निघून गेलेले. दुर्वांचा तजेलदार हिरवाकंच कोपराही हरवला होता.जाईजुईचे वेल निराधार अवस्थेत अदृश्य झाले होते. तिथं ही अशी बारीकसारीक झाडंझुडपं तर नव्हतीच पण आमचा सहृदय होऊन राहिलेला सोनचाफाही कुठे दिसत नव्हता.
नाही म्हणायला तोडायला अवघड असलेली दोन ताडमाड वाढलेली नारळाची झाडं, आंब्याचा एक डेरेदार वृक्ष आणि घरच्या कुणी म्हाताऱ्या बाईने हट्टच केल्यामुळे अद्याप जमीन घट्ट धरून थरथरणारी नुकतीच व्यालेली लेकुरवाळी केळ एवढं मात्र अजून सुरक्षित होतं.
मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडंही भुईसपाट झाली.
आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्यासारखी उदास होऊन गेलेली ती लेकुरवाळी केळ. तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!
गेल्या कांही दिवसांपासून अनेकांचे चावे घेऊन शहरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ माकडाला जेरबंद करण्यात आज प्रशासनाला अखेर यश आलं. आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वाट चुकलेल्या या माकडाने गेले आठ दिवस अक्षरशः हैदोस घातलेला होता. झाडांशी फटकून वागत ते माणसांत घुसलं होतं.
प्रथम मुलींच्या शाळेच्या एका खिडकीत बसून ते बिचारं कुतूहलाने आत बघत होतं. आतल्या पोरीबाळीना वाटलं ते आपलेच चेहरे टुकूटुकू निरखतंय. मुली किंचाळू लागल्या तसं ते बिथरलं. काय करावं ते न सुचून त्याने खिडकीतून वर्गाच्या आत उडी मारली. धावपळ पळापळ सुरु झाली आणि एकच गोंधळ उडाला.इथे तिथे पळत शेवटी शाळेच्या गेटवरून त्याने बाहेर उडी मारली, ती नेमकी पाच-सहा पोरांच्या एका घोळक्यावर पडली. मुलींची शाळा सुटायची वाट पहात कोपर्यावर उभ्या असलेल्या, टिंगल-टवाळी करणाऱ्या टोळभैरवांचा तो घोळका होता.त्या पोरांइतकंच ते माकडही भांबावलं. त्यातल्या दोघा-तिघांचे चावे घेऊन ते जीव वाचवायला समोरच्या धान्य-आळीत घुसलं. तिथे अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या एका गलेलठ्ठ व्यापाऱ्याला चावलं. मग वाट फुटेल तिकडं बिचारं धावत सुटलं. समोरच्या रस्त्यावरचं पोलीस मुख्यालय, मध्यवर्ती चौकातल्या सरकारी कचेऱ्या सारं पालथं घालून, प्रत्येक ठिकाणी वाटेत येईल त्याचे जावे घेत अखेर त्याने आपला मोर्चा जवळच असलेल्या महापालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे वळवला तेव्हा मात्र ‘प्रशासन’ खडबडून जागं झालं.
त्या माकडाने जर युद्ध पातळीवरचे प्रशासनाचे प्रयत्न हाणून पाडले असते तर मात्र त्याची खैर नव्हती.
ते मेलेच असते.
गेल्याच वर्षी एका माकडीणीने असाच सर्वांचा थरकाप उडवलेला होता.ती रस्त्याकडेच्या झाडावर एरवी शांत बसून असायची. पण ट्रक-ट्रॅक्टर सारखी अवजड वाहनं त्या रस्त्यावरून निघाली की झाडावरून ती झेप घ्यायची ते थेट त्या वाहनाच्या चालकावरच. त्याचं नरडं आवळत ती त्याचे चावे घेत सुटायची. वाहनावरचा आपला ताबा सावरत स्वतःची कशीबशी सुटका करून घेईपर्यंत असे कित्येक वाहनचालक घायाळ झालेले होते.या सगळ्या घटनाक्रमाची मालिका ज्यात ओवली गेलेली होती तो धागा अतिशय नाजूक,हळवा होता..! त्या माकडीणीचं पिल्लू रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरखाली चिरडून मेलेलं होतं. अवजड वाहन खडखडाट करीत झाडाखालून निघालं की आपल्या पिल्लाचा चित्कार आणि छिन्नविछिन्न देह आठवून ती माकडीण पिसाळत होती..!
तिच्यासाठी पिंजरा लावून त्यात मुकाट्याने जाऊन बसण्याचं माणसाचं प्रेमळ आवाहन तिने बाणेदारपणाने साफ नाकारलं तेव्हा तिला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं.
या माकडानेही जर जेरबंद व्हायचं नाकारलं असतं तर मात्र त्या माकडीणीसारखं हे सुद्धा हकनाक मेलंच असतं.’त्या’ माकडीणीचे न् यांचे कांही लागेबांधे असतील कदाचित. निदान ओळख तरी. त्यामुळेच वेळीच समजला असेल त्याला मानवशरण न होण्यातला धोका किंवा समजली असेल बाणेदार अट्टाहासाची परिणती..!
हे सार समजण्याइतकं ते नक्कीच शहाणं होतं.किंबहुना आपला हा शहाणपण त्याने आपल्या कृतीने सिद्धच केलेला होतं.म्हणूनच मी न पाहिलेलं ते
वाट चुकलेलं माकड माझ्या मनात ठाण मांडूनच बसलं होतं. त्याची कृती नक्कीच माणसाच्या बुद्धिमत्तेचीही कींव करावी एवढी शहाणपणाची होती नक्कीच. कारण सहज जाता जाता वाटेत येणाऱ्या असंख्य माणसांपैकी जावे कुणाचे घ्यायचे हे आधी न ठरवताही त्याने ती निवड किती अचूक केलेली होती..!
मुलींच्या शाळेबाहेर घिरट्या गाळणारे रिकामटेकडे टोळभैरव, धान्य-बाजारातला भेसळसम्राट व्यापारी, एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन कॉन्स्टेबल्स, एक नगरसेवक आणि काही सरकारी कर्मचारी इत्यादी..!
त्यामुळेच पिंजऱ्यात जेरबंद झालेलं ते माकड त्याच्या पिंजऱ्यासकट माझ्या मनात ठाण मांडून बसलेलं होतं. त्या रात्री पिंजरा सोडून ते थेट माझ्या स्वप्नात आलं. चीं चीं करीत कांहीबाही सांगू लागलं. मला नीटसं काही समजेना तसं दात विचकून वेडावत राहिलं.
पूर्वी कधीतरी रात्रीच्या एका प्रवासात मी पाहिलेलं, कालांतराने विस्मरणात गेलेलं एक पक्षांचं झाडही त्या स्वप्नात मला पुन्हा दिसलं..! त्या रात्री पाहिलं होतं तेव्हा स्वच्छ चांदण्यारात्रीच्या नीरव शांततेत ते झाड अगदी शांतपणे निश्चल उभं होतं. त्याच्या पारंब्या पाहिल्या तेव्हा ते वडाचे झाड म्हणून ओळखता तरी आलं.कारण पानं पाहून ओळखायला ती रात्र असल्यामुळे त्यांची पानं स्पष्ट दिसतच नव्हती.त्या प्रत्येक पानाला एक एक पक्षी चिकटून बसलेला होता. झाडाचे पान न् पान असं पक्षांनी लगडलंय असं वाटत होतं..! अतिशय सुंदर दृश्य होतं ते..! वाऱ्याचा मागमूसही नव्हता.पानं हलली तर त्या पक्षांची झोप मोडेल म्हणून वारासुद्धा श्वास रोखून गप्प होता..!
स्वप्नात ते माकड आलं.चीं चीं करून आकांत करीत कांहीबाही सांगू लागलं. ते सांगणं माझ्यापर्यंत पोचेना तसं चिडलं. संतापलं.दात विचकून निघून गेलं. गेलं ते नेमकं त्याच झाडावर.
पानांवर विसावलेले,शांत झोपी गेलेले ते पक्षी झापड बसावी तसे धडपडत जागे झाले. डोळे चोळल्यासारखे पंख फडफडवू लागले… पंखांच्या फडफडीत त्यांचा कलकलाट मि.सळून गेला.. झाडालाही तो साहवेना..फांद्या
हलवून ते त्यांना समजावू लागलं.. या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता..!! कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!!
☆ संकट (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
कुसुमताई आता म्हातार्या- होत चालल्या होत्या. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. आता त्यांना आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी मुलाकडे राहणे गरजेचे होते, पण त्यांना ठेवून घ्यायला कुणीच तयार नव्हते. प्रत्येकाची स्वत:ची काही कारणे-बहाणे होते. आपल्याला स्वत:च्या घरी ठेवून घ्यावं, म्हणून ती मुलांपुढे सतत गयावया करायची. पण कुणाच्याच मनाला पाझर फुटत नव्हता. शेवटी आपल्या जावयाने तरी मुलांची समजूत घालावी, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला आणि जावायला बोलावून घेतले. मुलगी आली, ती रडत रडतच. जावई या सगळ्याचे मूक दर्शक होते. ते गप्प बसलेले पाहून कुसुमताई म्हणाल्या, ‘जावईबापू तुम्ही तरी यांना समजावा ना! आता या वयात मी कुठे जाऊ?’
यावर जावईबापू म्हणाले, ‘आई, आपल्याला कुठेही जायची जरूर नाही. आपण माझ्याबरोबर चला. तीन वर्षापूर्वी माझे वडील गेले पण माझी आई तर मी जन्मल्यावर लगेच गेली. मी तिचा चेहराही पाहिलेला नाही. तुमच्या मुलीशी लग्न झाल्यापासून मी तुमच्या चेहर्यावतच माझ्या आईचा चेहरा पहातोय. चला माझ्या घरी. मी समजेन, माझी आईच पुन्हा मला मिळाली.’
कुसुमताईंना कळेना, या प्रस्तावावर काय बोलावं? हे ऐकल्याबरोबर मुलीचं रडणं थांबलं होतं आणि मुले गदगद झाली होती, जशी काही कुठल्या तरी प्रचंड संकटातून त्यांची सुटका झालीय.
मूळ हिंदी कथा – संकट मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ अचानक एक दिवस…भाग –2 … श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अचानक एक दिवस (अनुवादित कथा)
(आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?” ) इथून पुढे —–
त्या धुक्याच्या आणखी थोडं पलीकडे सुमी हसत उभी आहे. तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकू येते आहे. “ ये–ये की – पकड मला “ फुलपाखराच्या मागे धावता धावता पुलक खिदळून हसतोय.— पण हे धुकं वितळत का नाहीये ? —
“ सुमी , मला असं सोडून जाऊ नकोस गं — माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर–”
—-मधेच नकळत त्याला डुलकी लागली आहे.—– वडील हातात डिक्शनरी देऊन त्याला इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग पाठ करायला लावताहेत— B A T bat ! bat म्हणजे वटवाघूळ–हा सस्तन प्राणी आहे. N I G H T M A R E- म्हणजे नको वाटणारी वाईट स्वप्नं —
आजोबा, आजी, आई, बाबा—- त्याला आवडणारी सगळी माणसं त्याला सोडून गेली आहेत–खूप खूप लांब. तो रडायला लागला आहे. पण डोळ्यात दाटलेला अश्रूंचा सागर कधीचाच पार सुकून गेलाय. एक रितेपण, एक पोकळी आतल्या आत धुमसते आहे—–
—–सगळा दोष त्याचाच आहे असं आता त्याला जाणवतं आहे. सुमीला तो कधीच पुरेसा वेळ देऊ शकलेला नव्हता. अगदी लहानसहान गोष्टींवरूनही खूप नावं ठेवायचा तो तिला, जिव्हारी लागेल असं बोलायचा. त्याच्या संतापाच्या लाव्हारसाने जणू तिला गिळून टाकलं होतं—-
“ सुमी–परत ये सुमी. आजपासून, आत्तापासून मी तुला सन्मानाने वागवेन –खूप जपेन तुला. पुलक–ये ना बाळा. तुम्हा दोघांशिवाय मी अधुरा आहे रे.”– पश्चातापाने होरपळल्यासारखा झाला आहे आता तो. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय . आठवणींचे मोठमोठे शिलाखंड आता काळाच्या पोटात हळूहळू गडप व्हायला लागले आहेत—
त्याच्या अंगात खूप ताप भरलाय. सुमी त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवते आहे. अर्धवट झोपेत असल्यासारखा तो काहीतरी पुटपुटतो आहे. पुलक घाबरून जाऊन रडायला लागला आहे. कुणीतरी त्या दोघांना ओढत ओढत त्याच्यापासून लांब घेऊन चाललंय. तो त्या माणसाला अडवायचा प्रयत्न करतोय. पण त्याचे हात लुळे पडले आहेत. मोठ्याने ओरडून त्यांना हाका माराव्याशा वाटताहेत त्याला– पण त्याचा आवाज पूर्ण बंद झालाय. आता अंगातला ताप खूपच वाढलाय. तो थंडीने कुडकुडायला लागलाय. सुमी त्याच्या अंगावर जाड ब्लॅंकेट टाकते आहे. डोक्यात इतक्या प्रचंड वेदना होताहेत की डोकं फुटेल असं वाटतंय. सुमी त्याचं डोकं दाबत बसली आहे. “ पप्पा, उठा ना आता, “ त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवत पुलक त्याला म्हणतोय.
अजून सूर्य अस्ताला गेला नाहीये. पण त्याआधीच रात्र झाली आहे. अंधारातच त्या भकास, भीतीदायक रस्त्यांवरून तो एकटाच चालला आहे. त्याच्या घरापर्यंत कोणतीच बस जात नाही. थोडं पुढे एक निःशब्द, भयाण जंगल आहे. स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून त्याला भीती वाटते आहे, आणि आता त्याने धावायला सुरुवात केली आहे, आणि आता धापाही टाकायला लागला आहे. कुजलेल्या पालापाचोळ्याची दुर्गंधी हवेत भरून राहिली आहे. थोड्या अंतरावर विखरून पडलेल्या कशाच्या तरी अवशेषांच्या फटींमधून पिवळट प्रकाश डोकावताना दिसतोय. खूप पूर्वीच विस्मरणात गेलेलं एक गाणं कुणीतरी स्त्री गाते आहे, आणि तो आवाज त्याला ओळखीचा वाटतो आहे— सुमी–? सुमीsss.– आणि ही गूढ आकृती कुणाची आहे ? तो त्या दिशेने जायला लागलाय – आणि–आणि त्याच क्षणी तो प्रकाश एकदम अदृश्य झालाय. गाणं थांबलंय. एखादा पोहणारा माणूस थकून गेल्याने पाण्यात बुडायला लागावा, तसा तो त्या गडद अंधाराच्या समुद्रात जणू खोल खोल बुडत चाललाय. ‘ सुमी ssss– सुमी sssss— ‘ अतिशय भरून आलेल्या आवाजातल्या त्याच्या हाका त्या मिट्ट काळोखात घुमत राहिल्यात.
——- दारावरची बेल न थांबता कितीतरी वेळ वाजत राहिली आहे. तो खडबडून उठतो, आणि हेलपाटतच दाराजवळ जाऊन थरथरत्या हातांनी दार उघडतो. मोहोरलेल्या झाडांचा आल्हाददायक सुगंध सोबत घेऊन आलेली प्रसन्न हवा त्या दारातून आत येते. —
“ सुमी– तू !!! “ त्याचे शब्द घशातच अडकतात. तिचा हात धरून पुलक तिच्या शेजारी उभा आहे. सुमीच्या दुसऱ्या हातात सामानाची पिशवी आहे.
नाही नाही— म्हणजे अजून रात्र झाली नाहीये. बाहेर अजूनही लख्ख सूर्यप्रकाश आहे.
सुमीने घरात पाऊल टाकल्या टाकल्या तो तिला गच्च मिठी मारतो— “ कुठे गेली होतीस तू ?”
“ अरे राजा, आज एक एप्रिल आहे ना–” सुमीला हसू आवरत नाहीये. पण आत्ता, या क्षणी त्याला काहीही ऐकू येत नाहीये. त्या दोघांना घट्ट मिठी मारून, न थांबता अतिशय आवेशाने त्यांचे मुके घेत रहाणं, एवढंच फक्त करू शकतोय तो.
— बाहेरच्या झाडावर बसलेला बुलबुल गातोय–जणू त्याला सांगतोय– ‘ यावेळी वाचला आहेस तू. पण लक्षात ठेव– प्रत्येक दिवस काही ‘ एप्रिल फूल ‘ करण्याचा दिवस नसतो. जर तू कोणावर खरंच प्रेम करत असशील, तर त्याची– त्याच्या मनाचीही काळजी घेतलीस तरच बरं ‘ — त्याच्याही नकळत तो मान डोलावतो.
समाप्त
मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’
लेखक : श्री. सुशांत सुप्रिय
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ अचानक एक दिवस…भाग –1… श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अचानक एक दिवस (अनुवादित कथा)
संध्याकाळी नेहेमीसारखाच तो अतिशय दमूनभागून कामावरून घरी आलाय. घराला लावलेलं मोठं कुलूप एखाद्या पाहुण्याकडे बघावं तसं त्याच्याकडे बघत राहिलंय. “ सुमी कुठे गेली ? आणि अशी मला न सांगता ? आणि माझा छोटासा लाडका पुलक ? “ तो जणू स्वतःशीच बोलतोय — स्वतःलाच प्रश्न विचारतो आहे —
तो खिशातून त्याच्याकडे असलेला किल्ल्यांचा जुडगा काढतो —’ किल्ल्या आहेत, की दगड ?’— चडफडतच दार उघडून तो आत जातो. घर तर तेच आहे. त्याला वाटतं —— आता किचनमधल्या सिंकच्या नळाची टपटप ऐकू येईल. भांड्यांचे आवाज ऐकू येतील. सुमी हात पुसत आतून येईल आणि म्हणेल–” आज खूप दमलेला दिसतो आहेस. “ आणि तो लगेच सांगेल की “ हो, आज खूप मीटिंग्स होत्या. “ मग ती म्हणेल, “ तू जाऊन फ्रेश होऊन ये. मी गरमागरम चहा करून आणते. “ पुलक बेडरूममध्ये कागदावर रेघोट्या मारत बसलेला असेल. तो पटकन त्याला उचलून घेऊन त्याचे मुके घेईल– आणि तोही “ पप्पा–” म्हणत त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारेल.——
पण आज सगळं घरच जणू गाढ झोपलंय–खूप रात्र झाल्यासारखं. कुठूनही कसलाही आवाज येत नाहीये. नळाचा आवाज बंद आहे. भांडी अगदी गपगार पडलेली आहेत. बेडरुमही एकाकी पडल्यासारखी वाटते आहे—–
तो फ्रिजमधली गार पाण्याची बाटली काढून पाणी पितो. उगीचच हातपाय ताणून शीण घालवायचा प्रयत्न करत असतांनाच, त्याला डायनिंग टेबलवर ठेवलेला एक कागद दिसतो. झडप घालतच तो कागद उचलून बघतो– “ सुमीचं अक्षर ? पण मला आज ते नीट वाचता का येत नाहीये ? शब्द असे पुसट का दिसताहेत ?” —-त्याच्या डोळयातून पाणी व्हायला लागतं- त्याला चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं—
“ मी पुलकला घेऊन घर सोडून चालले आहे —आणि तुझ्या आयुष्यातूनही खूप लांब निघून जाते आहे — कायमची “—
त्याचे पाय लटपटायला लागतात, आणि तो जवळच्या खुर्चीवर अक्षरशः कोसळतो. घड्याळाची बारीकशी टिकटिकही डोक्यात घणाचे घाव घालत असल्यासारखी वाटायला लागते त्याला.
‘ का? का पण ? कशासाठी ? ’–त्याचं मन व्याकूळ होऊन आक्रोश करायला लागतं —-दूरवर असलेल्या टॉवरवरचं घड्याळ आपल्या डोक्यात टिकटिक करतंय असं त्याला वाटायला लागतं.
‘ अचानक एवढी रात्र कशी झालीये ? आणि चंद्र का दिसत नाहीये ? एकही चांदणी पण नाही ?–
नाही नाही– अजून रात्र झालेली नाहीये– हा अंधार तर माझ्या डोळ्यापुढे पसरलाय ‘— तो कसातरी धडपडत त्याच्या टेबलापाशी जातो आणि ड्रॉवरमधून बी.पी.च्या गोळ्या काढतो. त्याचे हात खूप थरथरत असतात– हातातली गोळी जमिनीवर पडते. पण काही केल्या त्याला ती सापडत नाही. तो दुसरी गोळी काढतो आणि पाण्याशिवायच गिळून टाकतो. त्याला काहीच सुचत नसतं. मग डोकं हाताने गच्च दाबून धरत तो बेडवर वेडावाकडा कोसळतो—–
रात्र खूपच धूसर वाटायला लागते त्याला — खूप धुकं पडल्यावर वाटते तशी– झोपेतच तो चालायला लागलेला असतो.— दूरवरून त्याला आगगाडीची शिट्टी ऐकू आल्यासारखं वाटतं, आणि अचानक खाडदिशी त्याचे डोळे उघडतात— तो बेडवर नसतोच —’ कुठे गेली असेल सुमी ? आणि पुलक ? तो कुठे आहे ?’ — तो फोन उचलतो तर तो डेड झालेला असतो.—- ‘ का केलंस सुमी तू असं ? लहानमोठी भांडणं तर प्रत्येक घरातच होत असतात ना ? मग आत्ताच असं काय झालंय ? ‘ –त्याला खूप टेन्शन आलंय आता–आणि त्या टेन्शनचा हात पकडून आलेल्या असंख्य आठवणी त्याच्या मनात गर्दी करायला लागलेल्या आहेत. ‘आता काय करायचं ?’—
शेपटी तुटलेली एक पाल भिंतीवरून सरपटतांना त्याच्याचकडे टक लावून बघतेय, असं वाटतंय त्याला– ‘ आता काय करू मी ?’ — त्याला काहीच सुचत नाहीये.
तो खिडकीतून नुसताच लांबवर बघत राहिलाय —– आणि—- आणि अचानक त्या धुक्याच्याही पलीकडे त्याला त्याचं खेडेगाव दिसतय — त्या गावातलं त्याचं कौलारू घर दिसतंय– पुढच्या दाराच्या डावी-उजवीकडे असलेली केळीची झाडं घराची शोभा आणखीच वाढवत उभी आहेत. शेजारीच वाळलेल्या गवताच्या पेंढ्यांचा मोठा ढीग आहे., आणि त्यावर एक लहान मुलगा खेळत बसला आहे. —–
“ आजोबा, उठा ना–काय झालंय तुम्हाला “
आजोबांना अंगणात झोपवलं आहे. घरातल्या सगळ्या बायका खूप रडताहेत.
“ आजोबा, उठा ना हो पट्कन –” तोही आता खूप रडवेला झालाय.
त्यांना ज्यावर झोपवलं आहे, ती तिरडी आता अंत्यसंस्कार करण्यासाठी नेली जाते आहे —
“ आजोबा मला असं एकट्याला सोडून नका ना जाऊ– मग मला पाढे कोण शिकवणार ? मला रोज तुम्ही हिंदी आणि इंग्लिशचं एक एक पान शुद्धलेखन करायला लावायचात ना– मग आता कोण करून घेईल तसं माझ्याकडून ? आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?”—
क्रमशः ….
मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’
लेखक : श्री. सुशांत सुप्रिय
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खूप बेचैनीत रात्र संपली. मुश्किलीने सकाळी एक चपाती खाऊन, घरुन आपल्या शोरूमला निघालो. आज कुणाच्या तरी पोटावर पहिल्यांदाच लाथ मारायला निघालोय, हा विचार आतल्या आत टोचत होता.
जीवनात माझी वर्तणूक राहिली आहे, की आपल्या आसपास कुणाला भाकरीसाठी तरसावे लागू नये. पण या वाईट काळात आपल्याच पोटावर मार पडत आहे.
दोन वर्षांपूर्वीच आपली सर्व जमा बचत गुंतवून मी कपड्यांचं शोरुम उघडलं होतं, पण सध्या दुकानातील सामानाची विक्री निम्म्यावर आली आहे. मी आपल्या कपड्यांच्या शोरूममध्ये दोन मुलं आणि दोन मुली कामाला ठेवल्या आहेत, ग्राहकांना कपडे दाखविण्यासाठी.
लेडीज डिपार्टमेंटच्या दोन्ही मुलींना तर काढू नाही शकत. एकतर कपड्यांची विक्री त्यांच्यामुळेच जास्त होते आहे, दुसरं म्हणजे त्या दोघींचीही परिस्थिती खूपच गरीब आहे.
दोन्ही मुलांपैकी एक जुना आहे, आणि तो घरात एकुलता एक कमावता आहे.
जो नवा मुलगा दीपक आहे, मी त्याचाच विचार केला आहे. बहुतेक त्याचा एक भाऊही आहे, जो चांगल्या ठिकाणी नौकरी करत आहे. आणि तो स्वतः हुशार, मनमिळाऊ आणि हसतमुखही आहे. त्याला अजून दुसरीकडे कुठेही काम मिळू शकेल.
या पाच महिन्यात, मी बिलकुल उध्वस्त झालोय. परिस्थिति बघता एक कामगार कमी करण ही माझी मजबूरी आहे, हाच सगळा विचार करत मी दुकानात पोहोचलो.
चारही जण येऊन पोहोचले होते. मी चौघांना बोलावलं व खूप दुःखी होत म्हणालो….
“बघा, दुकानाची आताची परिस्थिति तुम्हा सर्वांना माहीतच आहे, मी तुम्हा सर्वांना कामावर ठेऊ नाही शकत.”
त्या चौघांच्या कपाळावर चिंता स्पष्ट झळकू लागली. मी बाटलीतील पाण्याचा घोट घेत घसा ओला केला. “कुण्या एकाचा… आज हिशोब.. करुन देतो. दीपक, तुला कुठे दूसरीकडे काम शोधावे लागेल.”
“हो काका”. त्याला पहिल्यांदाच इतकं उदास झालेलं बघितलं. बाकीच्यांच्या चेहेऱ्यावरही काही खास प्रसन्नता दिसत नव्हती. एक मुलगी, जी बहुतेक दीपकच्याच घराजवळ रहाते, काही बोलता बोलता थांबली.
“काय आहे, बाळ ? तुला काही म्हणायचं आहे का ?”
“काका, याच्या भावाचं पण काम काही महिन्यांपूर्वीच सुटलं आहे, याची आईही आजारी असते.”
माझी नजर दीपकच्या चेहऱ्यावर गेली. त्याच्या डोळ्यात जबाबदारीचे आँसू होते, जे तो आपल्या हसतमुख चेहऱ्याने लपवत होता.
मी काही बोलणार इतक्यात दुसरी मुलगी बोलली, “काका ! वाईट वाटणार नसेल तर एक बोलू ?”
“हो… हो, बोल ना !”
“कुणाला काढण्यापेक्षा, आमचा पगार कमी करून द्या… बारा हजारांच्या जागी नऊ हजार करून द्या.”
मी बाकीच्यांकडे बघितलं,
“हो साहेब ! आम्ही एवढ्या पगारावरच काम चालवून घेऊ.” मुलांनी माझी अडचण, आपसात वाटून घेण्याच्या विचाराने, माझ्या मनावरील दडपण जरूर कमी केले.
“पण तुम्हा लोकांना हे कमी तर नाही ना पड़णार ?”
“नाही काका ! कोणी साथीदार भूका रहावा… यापेक्षा हे कधीही चांगले की, आम्ही सर्व दोन घास कमी खाऊ.”
माझे डोळे ओले करून, ही मुलं आपापल्या कामास लागली— माझ्या नजरेत, माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होऊन…!
संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
माझी पत्नी आतून ओरडली, ” आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात…? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा…! “
मामला गंभीर वळण घेणार असं दिसलं..!
मी पेपर बाजूला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो…
सिंधू, माझी एकुलती एक लाडाची लेक रडवेली झालेली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. –तिच्या पुढे एक दही -भाताने पूर्ण भरलेला बाऊल होता. सिंधू, तिच्या वयाच्या मानाने शांत व समजुतदार, गोड आणि हुशार मुलगी होती.
मी बाऊल उचलला आणि म्हणालो, ” बाळ, तू चार घास खाशील का..? तुझ्या बाबासाठी…? ” सिंधू, माझी बाळी; थोड़ी नरमली; पालथ्या मुठीने डोळे पुसले आणि म्हणाली, ” चार घासच नाही, मी सगळ संपवीन—” थोडी घुटमळली आणि म्हणाली,
” बाबा, मी हे सगळं संपवलं तर… तुम्ही मला मी मागीन ते द्याल..? “
” नक्की…!”
तिने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले.
पण आता मी थोडा गंभीर झालो. ” बाळ, पण तू कंप्यूटर किंवा दुसरं एखादं महागडं खेळणं मागशील, तर आत्ता बाबाकडे तेवढे पैसे नाहीयेत बेटा…! “
” नाही बाबा..! मला तसं काही नको आहे…! ” तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला…
मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढं खायला देतात…? ते पण तिला न आवडणारं…. पण मी गप्प बसलो. सगळं मोठ्या कष्टाने खाऊन संपविल्यावर हात धुऊन सिंधू माझ्यापाशी आली…डोळे अपेक्षेने मोठे करून–
आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. ” बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार…! ” तिची ही मागणी होती…
” हा काय मूर्खपणा चाललाय…? काय वेड बीड लागलंय काय…? मुलीचे मुंडण…? अशक्य…! “
सौ. चा आवाज वाढत चालला होता…!
” आपल्या सगळ्या खानदानात असलं काही कुणी केलं नाही…! ” आईने खडसावले.
“ती सारखी टिव्ही पहात असते… ! त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत…! “
” बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस…? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दु:खी होऊ…! आम्हाला तुझ्याकडे तसं बघवेल का सांग…? सिंधू, बेटा आमचाही विचार कर…! ” मी विनवणीच्या स्वरात म्हटले…
” बाबा, तुम्ही पाहिलंत ना, मला तो दहीभात संपवणं किती जड जात होतं ते…! ” आता ती रडायच्या बेतात होती– ” आणि तुम्ही मला त्या बदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल केलं होतं… आता तुम्ही मागे हटता आहात… मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणा-या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना…आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत…! “
मला आता ठामपणा दाखवणे भाग होते…
” काय डोके- बिके फिरलेय काय..? ” आई आणि सौ. एकसुरात…
आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही, तर सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही—-
मी ठरविले, तिची मागणी पूरी केली जाईल…
—गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते…
सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडण केलेली सिंधू शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृष्य होते . ती मागे वळली आणि टाटा केला. मीही हसून टाटा केला…
तितक्यात एक मुलगा कारमधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली, ” सिंधू माझ्यासाठी थांब.” गंमत म्हणजे त्याचेही टक्कल केलेले होते.
‘ अच्छा, हे असं आहे तर ‘, मी मनात म्हणालो…
त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या..! ” तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे. तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा, हरीष. त्याला ल्यूकेमिया (Blood cancer) झालाय. येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, ” गेला पूर्ण महिना तो शाळेत आला नाही. केमोथेरपि चालू होती. त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता. कारण मुद्दाम नाही, तरी सहाजिकच मुले चिडवणार… सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणा-यांचे मी पाहून घेइन. पण तू शाळा नको बुडवूस —-मी कल्पनाही केली नव्हती की, ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल…तुम्ही तिचे आईवडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे…”
ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी मनाशी म्हणत होतो…’ माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे– खरं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते…’
—–या पृथ्वीवर ते सुखी नव्हेत, जे स्वत:ची मनमानी करतात. सुखी तेच की जे दुस-यावर जिवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला बदलायलाही तयार होतात. ….
आपल्यालाही आपलं आयुष्य सिंधूसारखं बदलता यायला पाहिजे. …….जमेल का ?
लेखक: अज्ञात…
संग्राहक :- मीनल केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈