मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

रसास्वाद  : ज्योत्स्ना तानवडे

समाजात गैर रूढी, परंपरा चुकीच्या धारणा खोलवर रुजलेल्या आहेत. त्या विरुद्ध अनेक समाजसेवी कार्यकर्ते अतिशय तळमळीने कार्य करीत असतात. पण त्यांना म्हणावे तसे यश येत नाही. तरीही मोठ्या निर्धाराने ते आपला लढा सुरूच ठेवत असतात. अशाच एका कार्यकर्त्याची तळमळ मांडली आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अजून मी आहे या त्यांच्या एका वेगळ्या विषयावरच्या अतिशय सुंदर कवितेतून. आज आपण त्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

☆ अजून मी आहे ☆

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

 

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्री-भृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती-जमातीतील तेढ मिटविण्याचे

———

———

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

 

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ (व्रात्य) पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

 

कधी संभ्रम पडला सश्यासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत राहणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून.

 

म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे

अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

 

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

मुक्तछंदातील ही कविता प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. कवी समाजाच्या भल्यासाठी झटणारा एक प्रामाणिक, तळमळीचा कार्यकर्ता आहे. तो त्याच्या वाटचालीविषयी आपल्याशी संवाद साधतो आहे.

तो आयुष्याचा मनापासून आनंद घेतो आहे. मानवी जीवनाचा थांग सहजासहजी लागणे शक्य नसते. पण तो जिद्दीने असा थांग शोधतो आहे. समाजाप्रती प्रत्येकाची काही कर्तव्ये असतात. कवी आपली अशी कर्तव्ये करण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाने वैयक्तिक जीवन आनंदात जगताना समाजासाठी असलेले आपले कर्तव्य सुद्धा उत्तम रीतीने पार पाडायला हवे. दोन्हीचा छान समन्वय साधायला हवा.

कवी अशी वाटचाल बऱ्याच काळापासून करतो आहे. हे ‘अजून’ या शब्दातून स्पष्ट होते आहे. निवृत्तीचे वय होत आले, बरीच वाटचाल झाली तरी त्याने आपली सामाजिक भूमिका बदललेली नाही. तो पूर्वीच्या जोमाने अजूनही काम करीत आहे.

कवीने इथे अन्योक्ती अलंकाराचा छान वापर केलेला आहे. स्वतःचे मनोगत सांगत असताना ही कविता समाजातील थोर कार्यकर्त्यांना उद्देशून पण आहे. त्यांच्या प्रती आदर दाखवणारी आहे.

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्रीभृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती- जमातीतील तेढ मिटवण्याचे

———-

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

मन व्यथीत करणाऱ्या असंख्य दुष्प्रवृत्ती समाजात आहेत. त्यातून असंख्य वाईट घटना घडतात. स्त्रीभृणहत्या हा तर मानवतेला लागलेला फार मोठा कलंक आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने स्त्रीवर सतत अन्याय, अत्याचार केलेले आहेत. जाती-जमातीत तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून तोडणारी विघातक कृत्ये केली जातात. कवीने या फक्त या तीन स्वप्नांचा उल्लेख केला आहे आणि त्यानंतर दोन ओळी नुसत्याच मोकळ्या सोडल्या आहेत. त्यांना फार मोठा अर्थ आहे. समाजाच्या  भल्यासाठी काम करण्याच्या अनुल्लेखित अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांची यादी खूप मोठी आहे. हेच त्या दोन ओळी दर्शवितात.

समाजात इतर वाईट कृत्ये, अत्याचार, स्वकेंद्रित व्यवस्था अशा अनेक अपप्रवृत्ती, आपत्ती आहेत. त्यांना संपवण्याची, समाज धारणा बदलण्याची अशी कितीतरी स्वप्ने कवीने पाहिलेली आहेत. मोराच्या पिसाऱ्यात जसे हजारो डोळे असतात तसेच कवीने असंख्य दृष्टीने, विविध अंगाने ही स्वप्ने पाहिली आहेत. त्याची तीव्रता मोराच्या पिसाऱ्यातील डोळे ही उपमा अतिशय सुंदरपणे स्पष्ट करते. या गोष्टींमुळे कवीच्या  मनात खूप आर्तता दाटलेली आहे.

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ ( व्रात्य )पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

कवीने पुन्हा पुन्हा काही स्वप्नं बघीतली. त्यातल्या काहींची चाहूलही लागली. आता ती स्वप्ने खरी होतील अशी आस वाढली आणि ती स्वप्ने एखाद्या नाठाळ पोरासारखी दूर निघून गेली. एखादे नाठाळ ( व्रात्य ) पोर कसे करते, त्याला एखादी गोष्ट कर किंवा करू नकोस असे कितीदाही बजावले तरी ते अजिबात ऐकत नाही. तशीच ही स्वप्नेही फक्त वाकुल्या दाखवतात आणि सत्यात न येता नाहीशी होतात. त्यांना ‘नाठाळ’ ही अगदी छान आणि समर्पक उपमा कवीने योजलेली आहे.

रणरणत्या वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नसतेच. तो फक्त आभास असतो. तसाच काही स्वप्नांचा फक्त आभासच होता. त्यामुळे कवीच्या पदरी निराशाच येते.चक्रवाक जसा पावसासाठी आर्ततेने वाट पाहत असतो तसेच कवीचे मन आर्तपणे आशा निराशेच्या हिंदोळ्यावर नुसतेच झुलत राहते. पण हाती काही गवसत नाही.

कधी संभ्रम पडला सशासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्त्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी ?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्त्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत रहाणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून

ससा जसा बिळातून बाहेर जाताना बावचळतो. बाहेर कोणी नाही ना, कोणत्या दिशेला जावे, नक्की काय करावे अशी त्याची संभ्रमावस्था होते. तशीच इथं स्वप्नं सत्यात येत नसल्याने आता नक्की काय करावे अशी कवीची संभ्रमावस्था होते आहे. माकडीण जशी पिलाला उराशी अगदी कवटाळून धरते तशीच कवीने आपली स्वप्ने निगुतीने जपलेली आहेत. पण ती खरी होत नाहीत हे बघून शेवटी कवीला आपली तत्त्व तर खोटी नाहीत ना अशी शंका वाटू लागते. एखाद्या चकव्यातल्या कोणत्याही वाटेने गेले तरी शेवटी पहिल्याच ठिकाणी परत येणे होते. वाट पुढे जातच नाही. तसंच काहीसं स्वप्नांच्या बाबतीत झाल्याने कवीला संभ्रम पडला आहे. तरीही त्याने जिद्द सोडलेली नाही.

दीपस्तंभ जसा कितीही लाटा आदळल्या तरी ठाम रहातो तसाच कवी सुद्धा कितीही अडथळे आले, समाजाचा विरोध अंगावर आला तरी खचून न जाता आपल्या विचारांवर ठाम आहे. त्याचबरोबर दीपस्तंभ जसा मार्ग दाखवण्याचे काम करतो तसाच कवी सुद्धा समाजाला योग्य विचार, योग्य मार्ग दाखवण्याचे मोठे काम करतो. आपली तत्त्व, आपली स्वप्नं, आपल्या आदर्शांना त्याने अजूनही आपल्या उराशी तसेच घट्ट कवटाळून धरलेलं आहे. दुर्दम्य आशावादाचे प्रतीक म्हणजे कन्याकुमारी. तशीच आशा कवीच्या मनात अजूनही शाबूत आहे. आशा निराशेची बरीच पायपीट झाली. तरीही कवी खचलेला नाही. निराश झाला नाही. ती स्वप्ने खरी करण्यासाठीचा त्याचा लढा अद्यापही तसाच सुरू आहे. हे वास्तव ‘अजूनही’ या शब्दातून सामोरे येते. कितीदाही जाळी तुटली तरी पुन्हा पुन्हा ती विणत रहाणाऱ्या कोळ्याचा आदर्श त्याच्या मनावर पूर्णपणे ठसलेला आहे. त्यामुळे कवी अजूनही आस न सोडता धडपडतोच आहे.

 म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे .

म्हणूनच कवी सांगतो आहे की ,” मी हार मानलेली नाही. अजूनही मोठ्या जिद्दीने मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहे. कितीही अपयश आले तरी त्यातूनही धडा शिकत नव्या जिद्दीने आयुष्याचा आनंद घेतो आहे. या जीवन प्रवाहात कितीही जरी गटांगळ्या खाव्या लागल्या तरी, मी त्यात तग धरून आहे आणि त्याचा थांग अजून शोधतोच आहे. या माझ्या प्रयत्नांना समाजाने नावे ठेवली, मला अपमानित केले तरीही मी माझी कर्तव्यं सोडलेली नाहीत. समाजाच्या सुखासाठी मी धडपडतोच आहे आणि समाजऋण फेडायचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.” म्हणूनच शेवटी कवी मोठ्या  उमेदीने सांगतोय,”  मी हरलेलो नाही. मी अजून आहे.”

समाजातील अन्याय्य प्रथा बंद व्हाव्यात, समाजमनात चांगला बदल व्हावा, समाज पुन्हा एक होऊन जवळ यावा यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारा कवी हा असंख्य लहानथोर समाजसेवकांचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशी माणसे शेवटपर्यंत ध्यास न सोडता या अन्यायाविरुद्ध लढत रहातात. यातूनच अनेक वाईट अन्यायकारक गोष्टी बंद झालेल्या आहेत. म्हणूनच इथे कवीही जिद्द न सोडता ‘मी अजून आहे’ असे सांगतो आहे.

एखाद्या कुटुंबावर काही संकट आले, कुणी काही त्रास देत असेल, अन्याय करत असेल तर घरातील वडीलधारी व्यक्ती घरातल्यांना समजावते,” घाबरू नका. मी अजून आहे.” तशीच भूमिका हे समाजसेवक बजावत असतात. समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. पाठीराखे होतात. हेच वास्तव कवी  इथे सांगतो आहे.

कवितेची सौंदर्य स्थळे :–  समाजाच्या भल्यासाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचे हे मनोगत यथार्थ वर्णन करण्यासाठी कवीने ‘चक्रवाकाची आर्तता’ ही उपमा दिली आहे. परमोच्च आर्तता म्हणजे चक्रवाक. त्यामुळे या शब्दातून कवीचीही आर्तता अचूक लक्षात येते. कवी अनेक प्रश्नांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे, हे सांगण्यासाठी मोराच्या पिसाऱ्यातील डोळ्यांची सुंदर उपमा दिलेली आहे.

समाज बदलण्यासाठी कवी जी स्वप्ने बघतोय त्यांचेही खूप अचूक आणि समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. ही स्वप्न काहीही झाले तरी खरी होत नाहीत हे सांगतोय ‘नाठाळ’ शब्द. त्यातून व्रात्य, नाठाळ मुलासारखी अजिबात न ऐकणारी ही स्वप्नं  कवीला सतत सतावतात हे लक्षात येते. ही स्वप्न आभासीच ठरतात. तरीही ती चोर पावलांनी चाहूल देत असतात. असे असूनही यामुळे खचून न जाता कवी ठाम राहतो कसा तर, दुर्दम्य आशावादी कन्याकुमारी सारखा, दीपस्तंभासारखा ठाम राहतो. या सर्व उपमा कवितेच्या सौंदर्यात भर घालत सखोल अर्थ उलगडून दाखवतात.

या कवितेतील ‘अन्योक्ती’ अलंकारांमध्ये मुळे ही कविता कवी बरोबरच अशा सर्व थोर सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल आदर दाखविणारी झाली आहे.

अशा या अतिशय आशयघन कवितेमध्ये कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी एका अत्यंत तळमळीने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याची आंतरिक तळमळ मांडलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विसावा… – सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ विसावा… – सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

विसावा (रसग्रहण)

विसावा या शब्दाच्या उच्चारातच निवांतपणा जाणवतो. विसावा म्हणजे विश्रांती. अर्थात विश्रांती म्हणजे समाप्ती नव्हे, अंमळ थांबणं. “आता थोडं थांबूया” हा आदेश विसावा शब्द सहजपणे देतो. अधिक विस्तृतपणे सांगायचं तर विसावा म्हणजे एक ब्रेक, एक इंटरव्हल. असाही अर्थ होतो. मात्र विसावा घेण्याची पद्धत व्यक्तीसापेक्ष आहे. कोणी निवांतपणे, डोळे मिटून राहील, कुणी एखादी वामकुक्षी घेईल, कुणी सततची कामे थांबवून एखाद्या कलेत मन रमवेल. पण ही झाली छोटी विश्रांती.  विसावा याचा आणखी पुढे जाऊन अर्थ शोधला तर विसावा म्हणजे रिटायरमेंट. निवृत्ती. आणि आयुष्याच्या उतरणीवर अथवा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर घ्यावासा वाटणारा  विसावा. हाही व्यक्तीसापेक्षच असतो. पण कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची विसावा ही  याच आशयाची सुरेख गझल नुकतीच वाचण्यात आली आणि त्यातले एकेक शेर किती अर्थपूर्ण आणि रसमय आहेत हे जाणवले.

☆ विसावा ☆

मिळतो मला तुझ्या रे नामात या विसावा

घेते जरा तुझ्या रे भजनात या विसावा

*

असते तुझ्या सख्या रे मी संगतीत जेव्हा

शांती मनास लाभे श्वासात या विसावा

*

भेटीत आपुल्या रे आहे अती जिव्हाळा

वृक्षा समान आहे किरणात या विसावा

*

गेले निघून गेले सोन्यापरी दिवस ते

आता तुझ्याच ठायी स्मरणात या विसावा

*

आधार घेत आहे पाहून मी रुपाला

मन शांत होत आहे प्रेमात या विसावा

*

 – अरूणा मुल्हेरकर

ही संपूर्ण गझल वाचल्यानंतर प्रकर्षाने एक जाणवते ते  कवयित्रीचं उतार वय. आयुष्य जगून झालेलं आहे, सुखदुःखाच्या पार पलीकडे मन गेलं आहे आणि आता मनात फक्त एकच आस उरलेली आहे आणि ती व्यक्त करताना मतल्या मध्ये त्या म्हणतात

मिळतो मला तुझ्या रे नामात या विसावा

घेते जरा तुझ्या रे भजनात या विसावा

कसं असतं, जीवन जगत असताना जीवनातली अनेक ध्येयं, स्वप्नं, जबाबदाऱ्या पार पाडत असताना भगवंताच्या आठवणींसाठी सुद्धा उसंत नसते. पण जसा काळ उलटतो, वय उलटते तशी आपसूकच माणसाला अध्यात्माची  गोडी वाटू लागते. ईश्वराकडे मन धावतं, म्हणूनच कवयित्री म्हणतात,

आता देवा! मला तुझ्या नामस्मरणातच खरा विसावा वाटतो. तुझ्या भजनातच माझे मन खरोखरच रमते आणि निवांत होते.

असते तुझ्या सख्या रे संगतीत जेव्हा

शांती मनास लाभे श्वासात या विसावा

मनाने,पूजाअर्चा या विधी निमित्ताने जेव्हा जेव्हा मी तुझ्या संगतीत असते तेव्हा माझ्या मनाला शांती लाभते माझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या नामाच्या अस्तित्वाने मला विसावल्यासारखे वाटते

या शेरात सख्या हा शब्द थोडा विचार करायला लावतो. भगवंत  सखाच असतो. त्यामुळे सख्या हे देवासाठी केलेले संबोधन नक्कीच आवडले, परंतु या दोन ओळी वाचताना आणि सख्या या शब्दाची फोड करताना मनात ओझरतं असंही येतं की या उतार वयात न जाणो कवयित्रीला जितका ईश्वराचा सहवास शांत करतो तितकाच जोडीदाराच्या आठवणीत रमण्यातही शांतता लाभते का? सख्या हे  संबोधन त्यांनी जोडीदारासाठी योजलेले आहे का?

भेटीत आपुल्या रे आहे किती जिव्हाळा

वृक्षासमान आहे किरणात या विसावा

भेटी लागे जीवा लागलीसे आस याच भावाने कवयित्री सांगतात जसा वृक्षाच्या सावलीत विसावा मिळतो तसाच तुझ्या जिव्हाळापूर्वक स्मरण भेटीत भासणारी, जाणवणारी अदृश्य किरणे ही मला शांती देतात. या ओळी वाचताना जाणवते ती एक मनस्वी, ध्यानस्थ स्थिती. या स्थितीत संपूर्ण मन कुणा दैवी शक्तीच्या प्रभावाखाली स्थिर आहे.

गेले निघून गेले सोन्या परी दिवस ते

आता तुझ्याच ठायी स्मरणात या विसावा

आयुष्य तर सरलं. गेलेल्या आयुष्याबद्दल मी नक्कीच म्हणेन की अतिशय सुखा समाधानाचं, सुवर्णवत आयुष्य माझ्या वाटेला आले. त्याबद्दल मी तुझी आभारीच आहे पण आता मात्र माझं चित्त्त फक्त तुझ्याच ठायी एकवटू दे. तुझ्या नामस्मरणातला आनंद हाच माझा विसावा आहे.

हाही  शेर वाचताना माझ्या मनात सहज येऊन गेले की कवयित्रीला याही ठिकाणी त्यांच्या जोडीदाराचीच आठवण होत आहे. सहजीवनातले वेचलेले अनंत सोनेरी क्षण त्यांना नक्कीच सुखावतात. निघून गेलेल्या त्या दिवसांसाठी त्यांच्या मनात खरोखरच तृप्तता आहे आणि आता केवळ जोडीदाराच्या सुखद स्मृतींत त्या विसावा शोधत आहेत का?

वास्तविक कवीच्या मनापर्यंत काव्य प्रवाहातून पोहोचणं हे तसं काहीसं अवघडच असतं.  म्हणूनच ही गझल वाचताना भक्ती आणि प्रीती या दोन्ही किनाऱ्यांवर मी माझ्या अर्थ शोधणाऱ्या नावेला घेउन जात आहे.

आधार घेत आहे पाहून मी रुपाला

मन शांत होत आहे प्रेमात या विसावा

देवा! तुझे सुंदर ते ध्यान सुंदर ते रूप! तुझ्या राजस रूपाला पाहून माझे मन आपोआपच शांत होते. तुझ्या.अपार मायेतच मला ऊब जाणवते, स्थैर्य लाभते, मनोधैर्य मिळते.

याही  शेरात कुठेतरी पुन्हा लपलेला प्रेम भाव जाणवतो.

पुष्कळ वेळा काव्य वाचताना काव्यात नसलेले किंवा अदृश्य असलेले शब्दही वाचकाच्या मनाजवळ हळूच येतात. या शेरात लिखित नसलेले शब्द जे मी वाचले ते असे असावेत,

“ तू तर आता या जगात नाहीस, शरीराने आपण अंतरलो आहोत पण सख्या रात्रंदिवस मी तुझी छबी न्याहाळते कधी चर्मचचक्षुंनी तर कधी अंतर्नेत्रांतून आणि तुझे माझ्यावर किती निस्सीम प्रेम होते या भावनेतच मला अगाध शांतता प्राप्त होते.

तसंही गझल हा एक संवादात्मक काव्य प्रकार आहे.आणि गझलेत विषयाचं बंधन नसतं आणि विषय असलाच तरी एकाच  विषयावर वेगवेगळ्या भावरसातली गझलीयत असू शकते.

अशी ही श्लेषार्थी अरुणाताईंची सुंदर गझल. यात भक्तीरस आणि शृंगार रसाचीही उत्पत्ती जाणवते.

गझल म्हटलं म्हणजे ती शृंगारिकच असा समज आहे पण अनेक नवीन गझलकारांनी वेगवेगळ्या रसयुक्त गझलांची निर्मिती केलेलीच आहे. त्यामुळे भक्तीरसातली  गझलही स्वीकृत आहे. नेमका हाच अनुभव अरुणाताईंची ही गझल वाचताना मला आला.

आनंदकंद या वृत्तातील आणि, गागालगा, लगागा गागालगा लगागा अशी लगावली असलेली ही गझल काटेकोरपणे नियमबद्ध अशीच आहे.

यातील नामात भजनात श्वासात किरणात स्मरणात हे काफिया खूप लयबद्ध आहेत. मतला आणि शेर वाचताना गझलेतील खयालत विलक्षण अर्थवेधी आहे. प्रत्येक शेरातला राबता सुस्पष्ट आहे आणि रसपूर्ण आहे.

थोडक्यात विसावा एक छान आणि परिपूर्ण, अर्थपूर्ण गझल असे मी म्हणेन.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आला किनारा… कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? काव्यानंद ?

☆ आला किनारा… कुसुमाग्रज  ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

२७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने

कुसुमाग्रज म्हणजे शब्दांची, कल्पनांची मुक्त उधळण करणारा अवलिया! मराठी वरचं प्रेम, देशावरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम अशा अनेक अंगांनी वाहणारा कवितांचा अखंड झरा! समाजातील विषमता, जाती – जातीतले भेद, अस्पृश्यतेचा कलंक यावर कवितांतून कोरडे ओढणारा समाजवादी! हा तर सरस्वतीच्या मुकुटातला लखलखणारा हिरा!

अशा या शब्दप्रभू च्या स्मृती जागविण्याचा आजचा दिवस! अर्थात कधी एखाद्या दिवसासाठी सुध्दा विस्मरणात जावा, असा हा माणूसच नाही.किमान पक्षी रोज त्यानं पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणावं, असं तरी प्रत्येकाला वाटतंच. मी आज त्यांच्या विस्मरणात चाललेल्या सुंदर कवितेची आठवण करून देणार आहे.विस्मरणात चाललेली असं म्हणायचं एकच कारण, मला ही कविता गुगल गुरू कडे मिळाली नाही, त्यावरचा एकही लेख, आठवण काहीही मिळालं नाही. आठवणीतील गाणी यावर सुध्दा मिळाली नाही. शेवटी ती मला टाईप करावी लागली.

मी कधीच ही कविता विसरू शकणार नाही. आम्ही मैत्रिणी सांगलीतील गायिका स्मिता कारखानीस यांच्याकडे गाण्याच्या क्लासला जात होतो.रिटायरमेंट नंतर सुचलेली कला असल्यामुळे त्या सोपी सोपी गाणी शिकवतील आणि निदान गुणगुणण्या एवढं तरी गाणं यायला लागेल अशी माफक अपेक्षा होती. त्या जरा धाडसी शिक्षिका निघाल्या. त्यांनी आम्हाला ही कुसुमाग्रजांची कविता, आम्ही कुठेही कधीही न ऐकलेली, त्यांनी स्वतः चाल लावलेली, शिकविली.तशी चाल अवघड होती, त्यामुळं गाणं चांगलं म्हणायला जमलं नाही, पण इतकी सुंदर कविता कळली, गुणगुणता आली, त्यामुळे पाठ झाली, याचा प्रचंड आनंद होता. त्यासाठी स्मिताला मनापासून  धन्यवाद!

कुसुमाग्रज हे स्वातंत्र्य संग्रमाचा दाह सोसलेले आणि नंतर स्वातंत्र्याचा आनंद अनुभवलेले होते. त्यांच्या बऱ्याच कविता या विषयावरच्या आहेत. त्यांनी हताश होवून सुवर्ण महोत्सवाच्या वेळी लिहिलेली ‘स्वातंत्र्य देवीची विनवणी ‘ ही कविता आज अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी वर्तमानाला साजेशीच वाटते. कवितेमधून सत्य परखडपणे मांडण्याचं कसब आणि तो सच्चेपणा त्यांच्यात होता.

मी घेतलेली आजची कविता स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित असली तरी आनंद घेऊन आली आहे. ज्या क्षणाची सगळे वाट पहाट होते तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, हे सांगणारी ही कविता आहे.भारतमातेच्या सुपुत्रानी एक खूप मोठ्ठं स्वप्न पाहिलं. त्याच्या पूर्ततेसाठी लाखो लोकांनी अनेक तपे अथक परिश्रम केले. या मार्गात असंख्य अडचणी, अगणित वेदना आहेत हे ठाऊक असूनही, मार्ग सोडला नाही. कारावास भोगला, प्राणांची आहुती दिली, कुटुंबाची होळी केली. जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या सागरात उडी घेऊन आयुष्य पणाला लावलं. आता किनारा जवळ आला आहे, तो स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. आता सगळे श्रम संपणार आहेत. ज्यांच्या समर्पणाने आजच्या या क्षणाला आकार दिला त्यांच्या स्मृतीला गौरवाने वंदन करुया आणि किनाऱ्यावर जयाचे झेंडे उभारुया. या अर्थाची सुंदर कविता तुम्हाला स्मिताच्या You tube channel वर त्यांच्या गोड आवाजात ऐकायला मिळेल.

निनादे नभी नाविकांनो इशारा,

आला किनारा, आला किनारा

*

उद्दाम दर्यामध्ये वादळी,

जहाजे शिडावून ही घातली

जुमानित ना पामरांचा हाकारा

आला किनारा, आला किनारा

*

सरायास संग्राम आला आता

तपांची समोरी उभी सांगता

युगांच्या श्रमांचा दिसे हा निवारा

आला किनारा, आला किनारा

*

प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती

शलाका निळ्या लाल हिंदोळती

तमाला जणू अग्निचा ये फुलोरा

आला किनारा, आला किनारा

*

जयांनी दले येथ हाकारली

क्षणासाठी या जीवने जाळली

सुखेनैव स्विकारुनि शूल – कारा

आला किनारा, आला किनारा

*

तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी

उभे अंतीच्या संगरा राहुनी

किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा

आला किनारा, आला किनारा

*

अशा या शब्दप्रभूला त्रिवार वंदन!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

आजी होणे किंवा आजोबा होणे  या इतके परम सुखाचे क्षण मनुष्य जीवनात कोणते असू शकतील?

नातवंडे म्हणजे आजी आजोबांच्या डोळ्यात चमकणाऱ्या दागिन्यांसारखी असतात.

नातवंडं असणे म्हणजे जणू काही जगाचे मालक होणे.

तो असा एक खजिना आहे की त्याचे मूल्य म्हणजे फक्त हृदयातील प्रेम.

नातवंड म्हणजे मुखवटा घालून आलेला देवदूतच.

तुमच्या हृदयापर्यंत, हसण्याचा, तुमचे जीवन आनंदाने भरण्याचा आणि तुमचे जग प्रेमाने भरुन टाकण्याचा देवाचाच मार्ग.

घरात नातीचा जन्म झाला आहे आणि आजोबांचं मन आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. या आनंद भावनांचं हे आनंद गीत आगमन कवी आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध काव्यसंग्रहातून)

☆ – आगमन…  – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली ।ध्रु।।

*

नाजूक जिवणी हळूच हंसली मुग्ध कलीका दरवळली

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगागातुन मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

*

प्रतिक्षेमध्ये तुझाच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी  हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

*

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्त्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविले

संपुनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

 – डॉ. निशिकांत श्रोत्री

अतिशय हळुवार मनातलं, वात्सल्य जागं करणारं हे भावुक गीत. “आजोबा’ या नव्या पदवीने बहरून गेलेलं कवीचं मन गातंय.

मावळतीच्या क्षितिजावरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली।ध्रु।

खरं म्हणजे जीवनातलं हे संध्यापर्व. मावळतीच्या रंगानं रंगत असणारं. पण जीवनाच्या या टप्प्यावर नव्या आशा पल्लवित  करुन स्नेहा तुझे आगमन झाले आणि या संध्येच्या क्षितिजावर नव्या उदयाचीच जाणीव झाली. जणू काही मागे गेलेली अनेक वर्षे पुन्हा एकदा तुझ्या जन्माने नव्याने बहरली.

नाजूक जिवणी हळूच हसली मुग्ध कलीका दरवळली  

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगांगातून मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

गोड गुलाबी कोवळ्या ओठातलं तुझं हास्य जणू काही मूक कळीतून दरवळणाऱ्या सुगंधासारखंच. तुझ्या इवल्याशा चिमुकल्या हाताने माझ्यात कशी नवस्फूर्ती,नवचैतन्य उसळवलं.  तुझी ती इवल्याशा  डोळ्यातली निष्पाप नजर प्रेमाचा एक वेगळाच रंग घेऊन माझ्या अंगा अंगातून मोहरली. खरोखरच या उतार वयात माझ्या जीवनात पडलेल्या तुझ्या पावलाने माझाही जणू नवजन्मच झाला.

प्रतिक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

किती वाट पाह्यला लावलीस ग बाळे?  तुझ्या प्रतीक्षेत घालवलेली ती वर्षे किती कठीण गेली आणि कशी सहन केली ते तुला कसं कळेल! मुलांची लग्न झाली की आता नातवंड कधी मांडीवर खेळेल याची स्वाभाविक उत्सुकता आईवडीलांना असते.पण बर्‍याच वेळा आपली विवाहित मुले मुल होऊ देण्याचा विचार पुढे ढकलत असतात. त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी ते बालरुप दिसावे याची आर्तता उत्कट होत असते.

पण आज मात्र तुझी पावलं जीवनांगणी उमटली आणि स्वप्न पूर्ण झालं. जणू सारं काही भरून पावलं. आयुष्याचे सार्थक झाले.  आता या क्षणी माझी  ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की’” त्या भास्कराचं तेज तुला मिळो! आणि सर्वांच्या वाटा तू या दिव्य प्रकाशाने उजळवून टाकाव्यात.

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविली

संपूनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

वाटलं होतं आयुष्य आता सरत आलं. पण तुझ्या जन्मानं या देहातली विझत चाललेली प्राण्याजोत जणूं काही पुन्हा नव्याने चेतवली गेली. पुन्हा नव्याने जगण्याची आशा पालवली. पुन्हा जगण्यात रंग भरले गेले. तुझ्या जन्माच्या रूपाने जणू काही अमरत्वाचा स्त्रोत वाहतो आहे असं वाटू लागलं.  अंतर्यामी सुकलेले झरे पुन:श्च आनंदाने बरसू लागले आहेत. मी आता निवृत्तीच्या वाटेवर असताना   माझी कर्मवारसारूपी वीणा तुझ्याच हाती सोपवत आहे. म्हणजे पुन्हा सूर सजतील. संपत आलेली मैफल पुन्हा एकदा नादमय होईल. नवे रस, नवे गंध, नवे रंग या माझ्या मावळतीच्या क्षितिजावर पुन्हा एकदा आनंदाने फेर धरतील.

खरोखरच डॉक्टर श्रोत्री यांचं हे गीत म्हणजे वात्सल्य रसाचा अमृतमय झराच. वाचक हो! श्रोतेहो! प्रत्येकाच्या आनंद अनुभवाला जोड देणारं हे ममत्त्व गीत. भावभावनांचा, प्रेमाचा अमृत स्पर्श देणारा, अंतरंगातून सहजपणे वाहणाऱ्या ममतेच्या स्त्रोताची जाणीव करून देणारा अत्यंत कोमल, हळुवार आणि सहज शब्दांचा या गीतातला साज केवळ आनंददायी आहे आणि त्यासाठी कवीला माझा त्रिवार सलाम!

तसं पाहिलं तर साधी सरळ भाषा. अलंकारांचा डोईजडपणा नाही. काव्यपंक्तींमध्ये कुठलेही अवघड वळण नाही.भावनांचा प्रवाह वाचकांच्या मनाशी थेट मिळणारा असा शब्दवेध. सहज जुळलेली यमके, गीत वाचताना मनात एक माधुर्याचा ठेका धरतात.

या गीतामध्ये एक वत्सल दृश्य आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ,कापसासारखी मुलायम तनु.  नाजूक जिवणी, चिमुकले हात पाय, निर्मळ, निष्पाप नजर आणि या साऱ्या विशेषणांतून जाणवणारं एक दैवी, स्वर्गीय निरागसत्व अंतःकरणात मायेचे तरंग उमटवतं.

प्रतीक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली या ओळीतला पिल्ला हा शब्द तर मनाला इतका बिलगतो. खरंच बाळा, लेकरा, चिमण्या या शब्दांमध्ये पाझरतं ते फक्त आणि फक्त अंतरातलं वात्सल्य, दाट प्रेम!

पीजे हार्वे यांनी म्हटलं आहे कोणते गाणे प्रेमाबद्दल नाही? मग ते प्रेम पुरुषाकडून स्त्रीवर असो, आई वडिलांकडून मुलांपर्यंत असो किंवा पुढे नातवंडांपर्यंत असो.. ते पुढे जातच असते.

या भाष्याचा अर्थ डॉक्टर श्रोत्रींच्या या गीतात जाणवतो.

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालवली  ही ध्रुवपदातील ओळ खूपच बोलकी आहे.  स्नेहा हे विशेष नाम असू शकते अथवा  स्नेहरुपा या अर्थानेही असू शकते.  पण यातून जाणवतो तो नातीच्या जन्माचा कवीला झालेला आनंद.  नातीचं बाळरूप पाहता क्षणीच त्यांच्या अंतरात सुखाचा फुलोरा फुलतो.  आणि सहजपणे ते उद्गारतात ज्योतिर्मयी हो  कवीच्या मनातली ही उत्स्फूर्त संवेदना जाणून माझ्या मनात खरोखरच असंख्य मुग्ध कळ्या सुगंध घेऊन दरवळल्या.

या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते.

संपुनी जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली या ओळीतल्या वीणा हाती सोपवणे या वाक्प्रचाराला एक संदर्भ आहे. प्रवचनकार  निवृत्त होताना आपल्या वारसाला  वीणेच्या रुपात प्रवचनाचा वारसा देतात. या इथे कवीने  आपल्या नातीला आपला वारसा मानून जे काही त्यांचं आहे ते तिला देऊन टाकले आहे.

एकंदरच कवीच्या मनातली स्पंदनं या गीतात इतकी सजीवपणे जाणवतात की त्यासाठी डॉक्टर श्रोत्रींना पुन्हा एकदा सलाम.

विषयांतर असूच शकतं पण जाता जाता सहज सुचलं म्हणून लिहिते, डॉ. श्रोत्री हे स्त्रीरोगतज्ञ. व्यवसायाच्या निमीत्ताने त्यांनी अनेक जन्मलेली मुले हाती घेतली असतीलच. तोही अर्थातच व्यावसायिक असला  तरी भावनिक सोहळाच. पण जेव्हा स्वत:ची नात जन्माला येते तेव्हां फक्त आणि फक्त “आज मी आजोबा झालो!”

हेच सुख. तेव्हा त्यांच्यातल्या वैद्याचा कवी कसा होतो याचा अनुभव आगमन या गीतात होतो. आणि त्याचीही गंमत वाटते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आत्मविश्वास… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ आत्मविश्वासकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

तरुण वयात, उमेदीच्या काळात स्वतःची महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती आणि क्षमता यावर ठाम विश्वास असतो. अशावेळी काही भरीव कामगिरी, समाजोपयोगी काही मोठे कार्य करण्याची उर्मी असते. पण अशावेळी समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा विरोध, अडथळे यांचा सामनाही करावा लागतो. शेवटी स्वप्न अर्धवट सोडायची देखील वेळ येते. अशा काही चांगलं करू पाहणाऱ्यांचा संघर्ष डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ” आत्मविश्वास ” या त्यांच्या कवितेत मांडला आहे. आज आपण या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत

☆ आत्मविश्वास ☆

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

 

झेपावलो —- विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची —

— ब्रह्मांडाला गंवसणी घालायची

 

घेतांना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता

अन् तरीही असहाय्यता

क्षितिजाला गंवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

 

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षासी विस्तीर्ण

व्योमाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची —-

— त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

 

क्षण आला वज्रासारखा

निष्ठुरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन् त्या अभेद्य कवचाकडे

पकडू ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

 

मात्र,

जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन् त्यावर बसून

खंवटपणे वेडावणारे

खत्रूड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

 

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

—– जाणवलं —–

मग मात्र ढेपाळलो

पंखांतील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी?

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. अतिशय कर्तबगार, महत्त्वाकांक्षी तरुणासाठी रंगीबेरंगी पिसांच्या देखण्या पक्षाचे रूपक योजले आहे. त्या पक्षाच्या वर्णनातून त्या महत्वाकांक्षी तरूणाचे यथार्थ वर्णन केलेले आहे. पक्षी मोठ्या अभिमानाने आपली डौलदार मान वळवून आपल्या रंगीत पिसांकडे पहातो. त्यांच्या बळकटपणाचे त्याला फार कौतुक वाटते. आपल्या पिसांचा त्याला फार अभिमान वाटतो.

तसाच कवी तरुण सळसळत्या उत्साहाचा आहे. चांगले शिक्षण घेतले. मनात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास असणारा तो ‘काय करू आणि काय नको ‘ अशी त्याची अवस्था आहे.  त्याच्या वागण्या बोलण्यात आपल्या प्राविण्याने, क्षमतांमुळे एक प्रकारचा रुबाब दौल आहे. त्याच्या कृतीतून ती ऐट, अभिमान डोकावतो हे डौलदार मान वळवणे या शब्दातून व्यक्त होते. असा तो आपल्याशी भरभरून बोलतो आहे.

झेपावलो… विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची….

… ब्रम्हांडाला याची गवसणी घालायची

कवीने विस्तीर्ण आकाशात झेप घेतली. त्याला आपल्या क्षमतांवर, कार्यकर्तृत्वावर अतूट विश्वास होता. त्यांच्या भरवशावरच त्यांनी या ब्रम्हांडाला गवसणी घालण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत जग जिंकण्याच्या जबरदस्त महत्वाकांक्षेने गगनभरारी घेतली. सर्वसमावेशक असे काहीतरी मोठे भव्यदिव्य करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने ही झेप घेतली होती.

घेताना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता 

अन् तरीही असहायता ?

क्षितिजाला गवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

गगनभरारी तर घेतली खरी पण या विस्तीर्ण आकाशाची अथांगता अनुभवल्यावर अवघे क्षितिज आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न केविलवाणे वाटू लागले आणि असहाय्यता जाणवू लागली.

कवीच्या मनाने सर्वांच्या उद्धारासाठी काहीतरी मोठे समाजकार्य करण्याचे ठरवून मनाने भरारी घेतली होती. पण त्याची विस्तीर्ण कार्यकक्षा, त्यासाठी करावे लागणारे प्रचंड कार्य, नियोजन यांचा आवाका बघून कवीला थोडी असहाय्यता जाणवू लागली. त्यासाठी आपले प्रयत्न अपुरे पडतील का असेही वाटू लागले.

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षाही विस्तीर्ण

जीवनाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची…

….. त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

आपल्या दृष्टीच्या आवाक्यापेक्षाही विस्तीर्ण अंतरिक्ष म्हणजेच आपले अफाट कार्यक्षेत्र पाहून कवी थबकलाच. पण क्षणभरच. आपल्याला हे कार्य जमेल की नाही असेही क्षणभर त्याला वाटले. पण तेही क्षणभरच.  कारण त्याचा आपल्या कर्तृत्वावर, क्षमतांवर, निर्णयावर गाढ विश्वास होता. त्यामुळेच हे कार्य आपण निश्चितपणे करू शकू ही ठाम आशा तो मनात बाळगून होता.

क्षण आला वज्रासारखा

निष्ठूरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन त्या अभेद्य कवचाकडे

पकडून ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

कुणीही आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही वेगळे करत असेल तर त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. पण तो जर दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काही उदात्त हेतूने चांगले कार्य करू पहात असेल तर मात्र काही विघ्नसंतोषी माणसे त्याच्या मार्गात आडवी येतात. त्याला यश मिळू नये म्हणून ते छुपी कारस्थाने करून त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. तो स्वतःच मनाने खचून हे कार्य थांबवेल असे त्यांना वाटत असते. त्यासाठी आत्मविश्वास ढळेल अशी परिस्थिती ते निर्माण करतात .पण आपला आत्मविश्वास शाबूत ठेवण्यासाठी तो आपल्या क्षमता, मनोनिग्रह, आपले नियोजन यासर्व गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पहातो आणि आपल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो.

मात्र जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन त्यावर बसून

खवटपणे वेडावणारे

खत्रुड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

जेव्हा त्याने पाहिले, आपल्या विरुद्ध समाजातील नकारात्मक प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. अशा नकारात्मक प्रवृत्तींना खतपाणी घालून त्यांचे उदात्तीकरण करण्याचा कुटील उद्योग काहीजण करत आहेत. अशी माणसे स्वतःचे महत्त्व शाबूत ठेवण्यासाठी आणि समाज एकत्र येऊ नये म्हणून काहीही करून समाजात फूट पाडत आहेत. चांगल्याच्या पायात खोडा घालणे हाच त्यांचा उद्देश बघून तो धास्तावून गेला.

इथे काळे ढग म्हणजे समाजातील या नकारात्मक प्रवृत्ती, त्यांचे झगमगते उदातीकरण म्हणजे भेदक सौदामिनी आणि आपले समाजातले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा बिनधास्त वापर करणारे आपमतलबी लोक म्हणजे डोमकावळे या रूपकांमधून कवीने समाजातील या दुष्प्रवृत्तींचे अचूक वर्णन केलेले आहे.

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

………. जाणवलं……….

 मग मात्र ढेपाळलो

पंखातील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी ?

कवी धास्तावला होता. तरीही त्याचा स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरचा, स्वतःवरील संस्कारांवरचा विश्वास ठाम होता. पण जेव्हा कवीने हे पाहिले की, ‘ जे आपमतलबी लोक असे अडथळे आणत आहेत, लोकआंदोलन  घडवून आणत आहेत त्यांना विरोध करायचं सोडून लोक त्यांनाच पाठिंबा देत आहेत आणि ज्यांच्यासाठी कवी चांगले उदात्त काही करू पाहतोय त्यालाच  त्यांचा पाठिंबा मिळत नाही. त्या विरुद्ध काही केले तरी आपली ताकद कमी पडते आहे,’ तेव्हा मात्र त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढेपाळला.

या सर्व नकारात्मक प्रवाहात आपण वहावत तर जाणार नाही ना कुठे, अनवधानाने प्रलोभनांना बळी तर पडणार नाही ना अशी त्याला आता वेगळीच भीती वाटू लागली. आपली तत्त्वे, आपले संस्कार यांच्या आधाराने आपण घरात तरी सुरक्षित राहू शकू की नाही अशी शंका सतावू लागली.

एखादा वेगळा उद्योग सुरू करून जम बसवलाय,  चांगली संस्था सुरू केलीय अन् ती लोकप्रिय होतेय असे पाहिले की त्याला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी काही विघ्नसंतोषी माणसे कशी खोडा घालतात, त्यांच्याविरुद्ध लोकांना भडकवतात अशी उदाहरणे आपण समाजात नेहमी बघत असतो. आपल्या चांगल्या कामामुळे काही लोक यशस्वी होतात, समाज मान्यता मिळवतात हे अशा काही जणांना खटकते आणि ते त्यांना बदनाम करून त्यांच्या कामात विघ्न आणून स्वतः समाजात मोठे होतात. सतत आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करतात.

या कवितेत रुबाबदार देखणा पक्षी म्हणजे तो ध्येयासक्त, महत्वाकांक्षी तरूण, काळे ढग म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती, त्या प्रवृत्तींचे उदात्तीकरण म्हणजे भेदक सौदामिनी, समाजातले आपले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करणारे आपमतलबी लोक म्हणजे हे डोमकावळे या रूपकांमुळे कवीची भूमिका अचूक आणि  स्पष्टपणे विशद होते.

अभेद्य म्हणजे भेदण्यास कठीण असे कवच, विजिगीषु  गगनभरारी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार या विश्वासाने घेतलेली झेप, ब्रम्हांडाला क्षितिजाला गवसणी म्हणजे अतिशय अशक्य गोष्ट करायला धावाधाव करणे, शब्दज म्हणजे आकाश, अथांगता, व्योम म्हणजे अंतरिक्ष, वज्र म्हणजे कठोर, भेदक सौदामिनी, खत्रूड म्हणजे कृश मरतुकडे डोमकावळे यासारखे आशयघन अनोखे शब्द अचूक वापरल्याने कवितेला एक छान शब्दवैभव प्राप्त झालेले आहे. अशा रीतीने समाजोध्दार किंवा चांगली समाजसेवा करू पहाणारा आणि समाजविघातक प्रवृत्ती यांच्यातल्या संघर्षाची कहाणी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘आत्मविश्वास’ या कवितेत अतिशय परिणामकारकपणे सांगितलेली आहे.

रसास्वाद:

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆

पाशही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे, देणे घेणे, नसतील असले शब्द जिथे

नसेल खुरटे घरटे अपुले बंद ही नसतील कधी दारे

 स्वच्छ मोकळ्या माळावरुनी वाहत येतील शीतल वारे

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊ काऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना

 – श्री सुहास रघुनाथ पंडित

(प्रेम रंगे, ऋतुसंगे या काव्यसंग्रहातून)

पती-पत्नीच्या नात्यात संध्या पर्व हे जीवनाच्या किनाऱ्यावरचे साक्षी पर्वच असते. आयुष्याकडे मागे वळून पाहताना खूप काही मिळवलं आणि खूप काही गमावलं असं वाटू लागतं.  हरवलेल्या अनेक क्षणांना गवसण्याची हूरहुरही लागते.  “पुरे आता, उरलेलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगूया की..” असे काहीसे भाव मनात उमटतात.

याच आशयाची सुप्रसिद्ध कवी श्री सुहास पंडित यांची ही कविता. शीर्षक आहे विश्रांतीचा पार जुना*

ही कविता म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पती-पत्नींचे  एक मनोगत आहे. मनातलं काहीतरी मोकळेपणाने आता तरी परस्परांना सांगावं या भावनेतून आलेले हे विचार आहेत.

पाश ही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे देणे घेणे नसतील असले शब्द जिथे

बंधनात, नियमांच्या चौकटीतल्या आयुष्याला आता वेगळ्या वाटेवर नेऊया. आता कसलेही माया— पाश नकोत, कसलीही गुंतवणूक नको. तुझं माझं दिल्या घेतल्याच्या अपेक्षांचं ओझंही नको, अशा मुक्त ठिकाणी आता दूर जाऊया.

नसेल खुरटे घरटे अपुले बंदही नसतील कधी दारे

स्वच्छ मोकळ्या माळावरती वाहत येतील शीँँतल वारे

आज पर्यंत आपल्या भोवतीचं वातावरण खूप संकुचित होतं. कदाचित जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे, मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे असेल आपल्याला काटकसरीने राहावं लागलं, आपल्याकडे कोण येणार कोण नाही याचे तारतम्यही ठेवावे लागले, आपल्याच मनाची दारे आपणच बंद ठेवली, मनाला खूप मारलं पण आता मात्र आपण आपल्या मनाची कवाडे मुक्तपणे उघडूया, आपल्या जगण्याचे वावर आता मोकळं आणि अधिक रुंद करूया जेणेकरून तेथे फक्त आनंदाचेच स्वच्छ आणि शीतल वारे वाहत राहतील.  मनावरची सारी जळमटं, राग —रुसवे, मतभेद, अढ्या दूर करूया.

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकाचे   

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

एकमेकांविषयी आता कसल्या ही शंका कुशंकांचा गोंधळ नको.  इथून पुढे विश्वासानेच परस्परांच्या नात्याला उजळवूया.  झालं गेलं विसरून एकमेकांची मने पुन्हा जिंकूया,जुळवूया.सगळी भांडणे, मतभेद विसरुन जाऊया.

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची

काळ किती सरला!  आपल्या घरट्यातली आपली चिमणी पाखरं आता मोठी झाली उडून गेली पण त्यांच्या पिल्लांनी आता आपल्या घराचं गोकुळ होईल.. पुन्हा,” एक होती चिमणी एक होता कावळा” या बालकथा आपल्या घरट्यात रंगतील आणि पुन्हा एकदा बालसंगोपनाचा आपण भोगलेला तो गोजिरवाणा काळ आपल्यासाठी मनात उतरेल.  या दोन ओळीत उतार वयातील नातवंडांची ओढ कवीने अतिशय हळुवारपणे उलगडलेली आहे आणि आयुष्य कसं नकळत टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं याची जाणीवही दिलेली आहे.

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

जीवनातले अत्यंत अवघड खाचखळगे पार केले, दगड धोंड्या च्या वाटेवर ठेचकाळलो  पण त्याही धकाधकीत आनंदाचे क्षण होतेच की!   आता या उतार वयात आपण फक्त तेच आनंदाचे, शांतीचे क्षण वेचूया  आणि सुखानंदांनी भरलेले  हे मधुघट पुढच्या पिढीच्या हातात सोपवूया.

कवीने या इतक्या सोप्या, सहज आणि अल्प शब्दांतून केवढा विशाल विचार मांडलाय! दुःख विसरू या आणि आनंद आठवूया.  भूतकाळात कुढत बसण्यापेक्षा सुखाच्या आठवणींनी मन भरुया आणि हाच आनंदाचा, सुसंस्कारांचा वारसा पुढच्या पिढीला देताना हलकेच जीवनातून निवृत्तही होऊया.  पुढच्या पिढीच्या आयुष्यात आपली कशाला हवी लुडबुड? त्यांचं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आपल्या विचारांचं, मतांचं दडपण आपण त्यांना कां बरं द्यावं ?

पुरे जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा फार जुना

किती सुंदर आणि आशय घन आहेत या काव्यपंक्ती! सगळ्यांचं सगळं निस्तरलं, सतत दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्यासाठीच राब राब राबलो, कित्येक वेळा याकरिता आपण आपल्या स्वतःच्या सुखालाही पारखे झालो पण आता पुरे झालं! आता फक्त तू मला आणि मी तुला. नको कसली धावाधाव. जरा थांबूया, निवांतपणे  आपल्याच जीवनवृक्षाच्या  पारावर विश्रांती घेऊया. विश्रांतीचा तो पार आपल्याला बोलावतो आहे.

विश्रांतीचा  पार जुना या शब्दरचनेचा मी असा अर्थ लावते की आता निवांतपणे या पारावर बसून विश्रांती घेऊ आणि भूतकाळातल्या जुन्या, सुखद आठवणींना उजाळा देऊ.

संपूर्ण कवितेतील एक एक ओळ आणि शब्द वाचकाच्या मनावर कशी शीतल फुंकर घालते..  शिवाय वृद्धत्व कसं निभवावं, कसं ते हलकं, सुसह्य आणि आनंदाचा करावं हे अगदी सहजपणे साध्या सरळ शब्दात सांगते.

प्रतिभा, उत्पत्ती, अलंकार या काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहेच. कवी सुहास पंडितांच्या काव्यात या काव्य कारणांची सहजता नेहमीच जाणवते. मनातील संवेदना स्पंदने ते जाता जाता लीलया मांडतात त्यामुळे वाचक, कवी मनाशी सहज जोडला जातो, कुठलाही अवजडपणा,बोजडपणा,क्लीष्टता, काठिण्य त्यांच्या काव्यात नसते.

विश्रांतीचा पार जुना या काव्यातही याचा अनुभव येतो. जिथे —तिथे, दारे —वारे,घेऊ —देऊ यासारखी स्वरयमके या कवितेला लय देतात.

खुरटे— घरटे, कल्लोळ कुशंकांचा, खपणे— जपणे या मधला अनुप्रासही फारच सुंदर रित्या साधलेला आहे.

कुंभ सुखाचे, सोनपाखरे आठवणींची, कण शांतीचे, विश्रांतीचा पार या सुरेख उपमा काव्यार्थाचा धागा पटकन जुळवतात.

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची या ओळीतील चेतनागुणोक्ती  अलंकार खरोखरच बहारदार भासतो.

खुरटे घरटे ही शब्द रचनाही मला फार आवडली. यातला खुरटे हा शब्द अनेकार्थी आणि अतिशय बोलका आहे. चौकटीत जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाची मानसिकताच या खुरटे शब्दात तंतोतंत साठवलेली आहे. आणि याच खुरटेपणातून, खुजेपणातून मुक्त होऊन मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास घेण्याचं हे स्वप्न फक्त काव्यातील त्या दोघांचं न राहता ते सर्वांचं होऊन जातं.

या कवितेतला आणखी एक दडलेला भाव मला अतिशय आवडला. तो भाव कृतज्ञतेचा. पतीने पत्नीविषयी दाखवलेला कृतज्ञ भाव. “आयुष्यभर तू या संसारासाठी खूप खपलीस, खूप त्याग केलास, कामाच्या धबगड्यात मीही तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तुला गृहीत धरले,पण आता एकमेकांची मने जपूया”संसारात ही कबुली म्हणजे एक पावतीच,श्रमांची सार्थकता,धन्यता!

खरोखरच आयुष्याच्या या सांजवेळी काय हवं असतं हो? हवा असतो एक निवांतपणा, शांती, विनापाश जगणं. दडपण नको ,भार नको हवा फक्त एक विश्रांतीचा पार आणि जुन्या सुखद आठवणींचा शीतल वारा. दोघां मधल्या विश्वासाच्या सुंदर नात्यांची जपणूक..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆

हा हाय तुझ्या गोड गातची गाना

छळी विरहवेदना प्राणा॥ध्रु.॥

 

सुमकोमलशा प्रेमिं अनंती तुजशी

हे प्रीति, धरुनि हृदयाशी

हा कांहि असे काळ म्हणुनि या जगतीं

विस्मरुनि हीहि गे वृत्ती

जों दंग अम्ही संगसुखासव पीतां

अनुभवित पलीं शाश्वतता

हा हाय विरह तो आला

प्रेमाच्या आनंत्याला

आरोपुनि त्याच्या काला

जरि अंताला। अम्हि तया पलां

विसरलो तरी अंत अम्हां विसरेना

छळी विरहवेदना प्राणा॥१॥

 

ना लागेना गोड अतां मज कांही

मज कुठेंहि करमत नाहीं

ये विजना त्रासूनि जनीं मी आणी

त्रासूनि जनां मी विजनीं

मी केश पुन्हा विंचरीं, पुन्हा विखुरीं

विस्मरत गोष्ट जी स्मरली

फिरफिरुनि तनु लव बसते

बघबघुनि नेत्र लव मिटते

परि हाय अनुक्षण मन तें

झुरझुरूनिया। झुरतेंचि, तया

पल विरम नसे, करित सखी तुझ्या स्मरणा

छळी विरहवेदना प्राणा॥२॥

 

फुलताचि फुलें सहज खुडी मी मोदें

हा तोचि चुरगळूं खेदें?

कीं खोंवुं फुलां केशकलापीं तव ये

तुज बाहुं कुठें अजि सखये?

तव पूर्वीचे प्रेमदूत दिसतां तें

हसतचि झुरें मी खेदें

या इष्ट जनीं समजवितां ‘लव खाई’

लागली भूकही जाई

स्मरत कीं कसे म्यां रुसुनी

बसतांच तुवां मन धरुनी

तव कवल देत मग वदनीं

मृदु पालविलें । मधु कालविले

मधु अधरीं तें करित अमृत जे अन्ना

छळी विरहवेदना प्राणा॥३॥

 

हा हाय अतां भेट अम्हांसी कुठली

आशाहि अजि मज विटली

तरी काकुळती येत विनविलें होते

आधींच का न म्यां तैं तें

कीं भेटीसी हीच एकली राती

ये झणीं नको दवडूं ती

मी समयांच्या सारसारुनी वाती

पाहिली वाट त्या रातीं

पद पथें जरा वाजतांच दचकावे

दूरता शून्य बैसावें

तो दार अहा किलकिललें

हो तूंचि । मज झणीं स्वकरें

हृदिं हुंदहुंदुनी धरिलें!

विसरुनि राती। लवचि उरे ती। भोगुं संगतीं

ढकलिली तुला दूर, धरुनि अभिमाना

छळी विरहवेदना प्राणा॥४॥

 

विरहाग्नीनें पुष्ट अश्रू हे आणि

विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी

नांदोत असे करित परस्परपूर्ती

हा विरह, आंसवें आणि तीं

मज सुखही दे दुःख, दुःखची तैसे

हो जपी जपी फलद तुम्हां हो तुमची

मज आणि तपस्या माझी

ती शिला नको वा मूर्ति

भावने नसूनी दिसती

आलिंग्य, चुंब्य असती ती

प्रत्यक्ष अशी। तव मूर्ती मशी। समचेतनशी

तींतची दिसो देव माझिया भुवना

छळी विरहवेदना प्राणा॥५॥

  –  कवी – वि दा सावरकर

 

रसग्रहण

८         काव्यानंद  :

            विरहोच्छ्वास 

            कवी…..वि.दा.सावरकर 

            रसास्वाद: शोभना आगाशे

रसग्रहण

असं म्हटलं जातं की सावरकर स्वातंत्र्य चळवळीत गुंतले नसते तर नक्कीच महाकवी झाले असते. पण मला हे समजत नाही की, ‘कमला’ व ‘गोमंतक (पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग)’ ही महाकाव्ये, ‘सप्तर्षी’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘आकांक्षा’, ‘चांदोबा चांदोबा, भागलास कां?’, ‘सायंघंटा’ ही सहा दीर्घकाव्ये, व अनेक (शंभरहून अधिक) प्रकाशित तसेच अप्रकाशित काव्यें रचणाऱ्या कवीला महाकवी का म्हणू नये? याव्यतिरिक्त संकल्पित पण अपूर्ण अशा त्यांच्या अनेक रचना उपलब्ध आहेत. असेच ‘पानपत’ हे संकल्पित पण अपूर्ण महाकाव्य. या काव्याचा ‘विरहोच्छ्वास’ हा एक सर्ग त्यांनी पूर्ण  केला होता. यात चाळीस उच्छ्वास (कविता) आहेत. त्यापैकी पाच ‘सावरकरांच्या कविता’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचा रसास्वाद आज आपण चाखणार आहोत.

मुकुल नावाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठी लढत असतांना शत्रुच्या हाती सापडतो. मृत्यूदंडाची अपेक्षा करीत कोठडीत काळ कंठीत असतांना त्याने जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले, ते यात गोंवलेले आहेत.

सावरकरांच्या प्रासंगिक कविता, पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कविता, स्वातंत्र्यलढा, तुरुंगवास, अस्पृश्यता निर्मूलन,  हिंदुएकता अशा ध्येयाने प्रेरित कविता यांच्या भाऊगर्दीत शृंगाररसयुक्त कविता मागे पडतात. पण अशा कविता वाचल्यानंतर पटतं की सावरकर हे परिपूर्ण कवी होते. या कवितेतले, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कांही बोल्ड किंवा सावरकरांच्या समाजमनातील प्रतिमेशी न जुळणारे शब्द वाचतांना आपल्याला पण अडखळायला होतं. कविता नेहमीप्रमाणेच गेय आहे.त्यांच्यातला शब्दप्रभू/भाषाप्रभू ठिकठिकाणी डोकावतोच. उदा. अनंतापासून निर्मित आनंत्य, आलिंगनापासून आलिंग्य व चुंबनापासून चुंब्य असे अनवट शब्द. थोडंसं या अर्थाने ‘लव’, क्षणोक्षणी साठी ‘अनुक्षण’, बोलावणे साठी ‘बाहणे व त्यापासून बाहू’ (तुज बाहू कुठे अजि सखये), घासासाठी ‘कवल’ असे गोऽड शब्द. ‘संगसुखासव’ यासारखा अपरिचित  शब्द. (संगसुखाला आसव हे सफिक्स किंवा अनुप्रत्यय जोडावा ही कल्पनाच अनोखी आहे.) फिरफिरूनि, बघबघुनि, झुरझुरुनि, सारसारुनि, हुंदहुंदुनि असे त्या कृतीला अधोरेखित करणारे नादमय शब्द.

अनेक ठिकाणी कवीने

शब्दांचे खेळ करून काव्यातील आकर्षकता वाढवलेली

दिसून येते. उदाहरणार्थ वाक्यातील कर्ता, कर्म यांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण वाक्य बनवून, ती दोन वाक्यं पाठोपाठ येतील अशी रचना करणे.

याला क्लृप्ती किंवा इंग्रजीत गिमिक म्हणता येईल. जसे की,

“जरि अंताला अम्हि …. विसरलो, तरी अंत अम्हां विसरेना”, किंवा

“ये विजना त्रासुनि जनी मी आणि त्रासुनि जनां मी विजनी”, तसेच “विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे आणि विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी”.

श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून “मी समयांच्या सारसारुनि वाती” ही ओळ उद्धृत करता येईल. ‘समयांच्या’ या शब्दाचे तीन अर्थ  होऊ शकतात, पहिला समईचं अनेकवचन समया, दुसरा समय म्हणजे काळ व तिसरा समय म्हणजे करार (इथे नायक व सखी यांच्यातला अलिखित  करार) व हे तीनही अर्थ  इथे चपखल बसतात. तसेच ‘जपी’ हा शब्द प्रथम क्रियापद म्हणून व पाठोपाठच नाम म्हणून वापरला आहे. असे लीलया केलेले शब्दांचे खेळ पाहून अचंबित व्हायला होतं.

रसग्रहण लांबत चालल्यामुळे आज आपण कवितेच्या अर्थाविषयी फारशी चर्चा करणार नाही. शिवाय अर्थ सोपा आहे. फक्त शेवटच्या कडव्याच्या संदर्भाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. नायक आपल्या हृदयस्थ सखीला विचारतो की, शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत, त्या त्या प्रतिकांशी मानवी नाती जोडून, मीराबाई, नामदेव, तुकाराम, चैतन्य महाप्रभू या संतांप्रमाणे उत्कट प्रेम केलं तर अंती देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं म्हणतात, मग तुझ्या सजीव मूर्तीवर मी (देवाचे प्रतीक समजून) उत्कट प्रेम करीत असूनही मला तुझी प्रत्यक्ष भेट का होत नाही?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औक्षवंत हो… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – औक्षवंत हो – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

काजळ घेउनिया नयनीचे तीट लावते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।ध्रु।।

 

पहिली बेटी ही धनपेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।१।।

 

सीता तू अन् तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

गार्गी बनुनी विदुषी होई तारी या भारता

सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।२।।

 

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा, निर्घृण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो, सौदामिनी हो,लखलखती  तू ज्वाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।३।।

 

पत्नी जरी तू एका क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करिते सरस्वती ज्ञानाची

गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।।४।।

 

 – डॉ. निशिकांत श्रोत्री.(निशिगंध)

काव्यनन्द

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

   रमन्ते  तत्र देवता:।।

पिढ्यानुपिढ्या जपलेलं हे सुंदर विचारांचं, सुसंस्काराचं सुभाषित.  पण प्रत्यक्ष जगताना, अवतीभवतीची पीडित स्त्री जीवनं  पाहताना मनात नक्कीच येतं की सुभाषितं ही फक्त कागदावर. समाज मनावर ती कोरली आहेत का? खरोखरच नारी जन्माचा सोहळा होतो का? स्त्री आणि पुरुष यांचा  दोन व्यक्ती म्हणून विचार करताना सन्मानाच्या वागणुकींचं  पारडं नक्की कुणाकडे झुकतं? आजही एकतरी मुलगा हवाच ही मानसिकता कमी झालेलली नाही. पण जिच्या उदरातून हा वंशाचा दिवा जन्म घेतो तिचा मात्र सन्मान होतो का?

“ तुम्हाला दोन मुलीच?”

 या प्रश्नांमध्ये दडलेला,” मुलगा नाही?” हा प्रश्न बोचरा नाही का?

 अनेक शंका उत्पन्न करणारे असे प्रश्नही असंख्य आहेत. सुधारलेल्या समाजाची व्याख्या करतानाही हे प्रश्न सतत भेडसावत असतातच आणि याच पार्श्वभूमीवर औक्षवंत हो ही डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची गीतरचना माझ्या वाचनात आली आणि मी खरोखरच हे काव्य वाचून प्रभावित झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे या काव्याचा उगम एका पुरुष मनातून व्हावा याचे मला खूप समाधान आणि तितकेच अप्रूपही वाटले.

हे गीत  वाचल्यावर प्रथमतःच मनासमोर उभी राहते ती प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू आईच. ज्या मातेने नऊ महिने स्वतःच्या उदरात एक गर्भ मोठ्या मायेने  वाढविलेला असतो त्याला जन्म देताना मातृत्वाच्या भावनेने ती ओथंबलेली असते, मग ते मातृत्व मुलाचं की मुलीचं हा प्रश्नच उरत नाही.  कुशीत जन्मलेल्या बाळाची ती आणि तीच फक्त माताच असते.

 काजळ घेऊनिया नयनीचे तीट लाविते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।ध्रु।।

नुकत्याच सोसलेल्या प्रसूती वेदना ती क्षणात विसरलेली आहे आणि जन्मलेल्या आपल्या कन्येला हातात घेताना प्रथम तिच्या मुखातून उद्गार निघतात,” माझ्या डोळ्यातल्या काजळांचं तीट तुला लावते बाळे,  औक्षवंत हो! दीर्घायुषी हो! हाच आशीर्वाद मी तुला देते.”

या ध्रुपदाच्या  दोन ओळींमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. हा एका नुकतंच मातृत्व लाभलेल्या आईने जन्मलेल्या अथवा तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या स्त्रीअंकुराला दिलेला आशीर्वाद तर आहेच.  पण औक्षवंत हो म्हणताना कुठेतरी तिच्या मनात भय आहे की माझ्या या  मुलीच्या जन्माचा सन्मान होईल का? तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की तिला अर्धवटच हे जगणं सोडून द्यावं लागेल कारण सद्य समाजाविषयी ती कुठेतरी मनोमन साशंक आहे.

आणि म्हणूनच कदाचित तिला आपल्या बाळीला कुणाचीही नजर लागू नये,सर्व दुष्ट शक्तीपासून तिचे रक्षण व्हावे याकरिता डोळ्यातले काजळरुपी तीट लावावेसे वाटत आहे.

 पहिली बेटी ही धन पेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।१।

“म्हणताना म्हणतात हो सारे, पहिली बेटी धनाची पेटी असते. पण ओठावर एक आणि मनात एक असणारे हे सारेच ढोंगी आहेत. पण मी मात्र तुझी आई आहे. माझ्या उदरी जणू काही तुझ्या रूपानने आदीमायेनेच जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या जन्माने माझी कूस पावन झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली आणि या माझ्या आनंदाला पारावरच नाही. सुखी दीर्घायुष्याचे सगळे मार्ग तुझ्यासाठी मुक्त असावेत हेच माझे आशीर्वचन आहे.”

आशीर्वादाऐवजी कवीने योजलेला आशीर्वचन हा शब्द मला खूपच भावला.  जन्मापासूनच तिने आपल्या कन्येचा योग्य प्रतिपाळ करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. तिने तसे स्वतःला वचनबद्ध केले आहे असे या शब्दातून व्यक्त होते.

 सीता तू आणि तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

 गार्गी बनुनी विदुषी होईल तरी या भारता

 सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।२।

मुलगी झाली म्हणून त्या मातेला कणभरही कमीपणा वाटत नाही. उलट ती त्या जन्मलेल्या निरागस स्त्री अंशात सीता, द्रौपदी, जिजाऊ माता, विदुषी गार्गी, अगदी अलीकडच्या युगातली अंतराळ वीरांगना सुनीता विल्यमलाच पहात आहे. अशा अनेक गौरवशाली स्त्री व्यक्तिमत्त्वांची तिला आठवण होते आणि आपली ही बालिका ही एक दिवस अशीच दैदिप्यमान कर्तुत्वशाली व्यक्ती असेल असे सुंदर स्वप्न ती पाहते आणि त्या क्षणी पुन्हा पुन्हा ती तिला औक्षवंत हो, कीर्तीवंत हो ,यशवंत हो असे आशिष देत राहते.

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा निर्घुण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो सौदामिनी हो लखलखती हो ज्वाला

 औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।३।

मनातल्या ममतेच्या,वात्सल्येच्या वेगाबरोबरच त्या नुकत्याच, या जगात जन्म घेतलेल्या स्त्री जीवाला दुष्ट, संहारी समाजापासून सावध करण्याचेही भान बाळगते. खरं म्हणजे स्त्री ही सृजनकर्ती, जगाची निर्मिती प्रमुख. तिच्याच उदरातून कुळाचा वंश जन्म घेतो. तिच्याशिवाय ज्याचा जन्मच अशक्य आहे तिचाच मात्र तो वैरी बनतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यास पुढे सरसावतो. ही केवढी विसंगती आहे!  पण तरीही ही धीरोदत्त माता आपल्या हातातल्या त्या निष्पाप, अजाण, कोवळ्या कळीला समर्थ, सक्षम करण्यासाठी म्हणते,”तू नको कसले भय बाळगूस. तू  मूर्तिमंत तेज हो, थरकाप उडवणारी चपला (वीज) हो, गगनाला भिडणारी लखलखती ज्वाला हो.

तेजस्विनी सौदामिनी ज्वाला हे तीनही शब्द तळपणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठीच आहेत. कवीने या तीन शब्दांची औचित्यपूर्ण गुंफण केली आहे. आईच्या मनातले समर्थ, बलवान, धारदार विचार ते सुंदरपणे व्यक्त करतात.

 पत्नी जरी तू एक क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करते सरस्वती ज्ञानाची

 गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।४।

स्त्री जन्माविषयी असेच म्हणतात ना? क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता.  किती सार्थ आहे हे भाष्य! मातृत्व ही अशी भावना आहे किंवा अशी भाववाचक संज्ञा आहे की जिचा काल अनंत आहे. ज्या क्षणापासून तिच्या उदरात गर्भ रुजतो त्या क्षणापासून ते तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ आणि केवळ माताच असते. स्वतःच्या उदरातून जन्माला आलेल्या तिच्याच अंशाच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी ती अविरत झटत असते. या काव्यामधली ही माता म्हणूनच त्या अंशाला तिच्या जन्माचं महत्त्व पटवून देते. तिला संस्काराचे सिंचन करणारी सरस्वती, ज्ञानदा म्हणून संबोधते आणि निस्सिमपणे एक आशा मनी बाळगते की कळी उमलण्यापूर्वीच  खुडली न जावो. केवळ “मुलीचा गर्भ” हे निदान होताच तिची गर्भातच हत्या कधीही न होवो. आणि म्हणूनच या ठिकाणी औक्षवंत हो या आशीर्वाचनाला खूप व्यापक असा अर्थ लाभतो.

*अनंत कालची माता*हा स्त्रीविषयीचा उल्लेखही खूप विस्तारित अर्थाचा आहे. आयुष्याच्या एकेका टप्यावर पती पत्नीचं नातंही नकळत बदलतं. शृंगारमय यौवनाचा भर ओसरतो आणि त्याच पतीची ती उत्तरार्धातच नव्हे तर वेळोवेळी कशी मातेच्या रुपात भासते हेही सत्य नाकारता येत नाही.मातृत्व हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. ती पुत्राचीच नव्हे तर पतीचीही माता होते. असंहे मातृत्व खरोखरच अनंतकाली आहे.

 डॉक्टर श्रोत्रींना मी मनापासून वंदन करते, की या गीत रचनेतून त्यांनी स्त्रीचे महात्म्य अधोरेखित करणारा केवढा मौल्यवान संदेश समाजाला दिला आहे! भृणहत्ये विरुद्ध उभारलेलं हे एक काव्यरूपी शस्त्रच आहे.हे गीत वाचल्यावर निश्चितपणे जाणवते ते हे की हे एका कन्येची माता होणाऱ्या अथवा झालेल्या स्त्रीचे मनोगत आहे. कदाचित जन्मलेल्या कन्येशी किंवा गर्भांकुराशी होत असलेला हा एक प्रेमळ,ममतापूर्ण तरीही काहीसा भयभीत, चिंतामिश्रित संवादही आहे.. आपल्या उदरात वाढणारा गर्भ हा मुलीचा आहे असे समजल्यावर तिने सर्व समाजमान्य कल्पनांना डावलून केलेला एक अत्यंत बलशाली निर्धार आहे. तितक्याच समर्थपणे ती  तिच्या गर्भासाठी एक संरक्षक कवच बनलेली आहे.

सर्वच दृष्टीने हे गीत अर्थपूर्ण आणि संदेशात्मक आहे. मातेची महती सांगणारे आहे.

वात्सल्य रसातले तरीही वीरश्रीयुक्त असे रसाळ, भावनिक गीत आहे,

धनाची पेटी तेजस्विनी सौदामिनी ज्वाला आणि ती लखलखती या स्त्रीला दिलेल्या उपमा खूपच सुंदर वाटतात, आणि यथायोग्य वाटतात.

सारे —न्यारे” माता —भारता’ घाला— झाला— जीवाला ही यमके यातला अनुप्रास हा अतिशय डौलदार आहे.

साधी, सहज भाषा, नेमके शब्द अलंकार, वजनदार तरीही अवघड न वाटणारे सुरेख नादमय शब्द यामुळे औक्षवंत हो हे गीत मनावर एक वेगळीच जादू करते. एका वेगळ्याच भावना प्रवाहात अलगद घेऊन जाते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अडगळीची खोली … कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अडगळीची खोलीकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

अडगळ हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मग तो अडगळीचा कोपरा घराची एक मागची खोली किंवा पडवी असो किंवा मनाचा कोपरा असो; तो असंख्य वस्तू आणि आठवणी, जुन्या विचारांनी व्यापलेला असतो. एखाद्या दिवशी निवांत वेळी ही अडगळ उपसणे हा मनाचाच कधी आनंददायी तर कधी वेदनादायी खेळ असतो. या अडगळी विषयीच लिहिले आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अडगळीची खोली या त्यांच्या कवितेमध्ये. आज आपण या वेगळ्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

 ☆ अडगळीची खोली ☆ 

जपली आहे मी मोठ्या शर्थीने

एक खोली अडगळीची.

काय कोंबलं त्यात

केव्हा केव्हा

कशाचच भान नाही

 

कळत असो वा नकळत

आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा

मैलाचा दगडच काय

बारीक सारीक खडा सुद्धा

दिला भिरकावून त्या अडगळीत

नाही केला विवेक

उपयोगी का निरुपयोगी याचा

जे आले त्या सगळ्यालाच

फक्त माझे माझे म्हटले

दुसऱ्याला द्यायचे तर नावच नाही

 

मन माझे खोली अडगळीची

कोणी कोणी आले

नकळत खोली भरत गेले

आपापल्या स्मृतींनी

आपापल्या मायेनी

आणि खडूस वैराने सुद्धा

त्या सगळ्यांनाच

माझेच म्हटले

परतफेड करायचे कधी

नावही नाही काढले

 

आता मात्र डोकावून पाहतोय मी

मोठ्या आशाळभूतपणे

त्याच अडगळीच्या खोलीत

कुठे सापडतोय का ते पाहायला

परतीचा तर सोडाच

निदान पुढे जायचा तरी मार्ग

जो करेल कमी

या भीरु मनाची अस्वस्थता

गोंधळलेल्या मनाला

करेल कायमचं शांत

आणि देईल करून ओळख

माझ्या खऱ्या शाश्वत अस्तित्वाची

 

पण सापडलीच नाही मला ती वाट

हरवून गेलीय त्या ढिगात

आणि गर्दीत

आयुष्यभर साठवलेल्या

मायेच्या, वासनांच्या, आणि दुस्वासाच्या

षड्रिपूंच्या बंधनात

कसं शोधू मी कसं शोधू

सांगेल का कोणी मला?

लावेल का  कोणीतरी

या खोलीतली अडगळ

नीटनेटकेपणे टापटिपीने

एकदा तरी?

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

जपली आहे मी मोठ्या शर्थीने

एक खोली अडगळीची

काय कोंबलं त्यात

केव्हा केव्हा

कशाचंच भान नाही

ही कविता मुक्तछंदातील आणि प्रथम पुरुषी एक वचनातील आहे. त्यामुळे कवी आपल्याशी त्याच्या आयुष्याबद्दल सरळ संवाद साधत आहे. अडगळ ही प्रत्येकाच्या घराचा, मनाचा मोठा भाग व्यापणारी एक स्वाभाविक गोष्ट असते. रोजच्या जगण्यातल्या पण आता वापरात नसलेल्या असंख्य गोष्टी आपण मोठ्या जिव्हाळ्याने जपून ठेवतो. हळूहळू हा पसारा वाढत जातो आणि शेवटी ‘धड टाकवत नाही आणि ठेवता पण येत नाही’ अशा या गोष्टींचे अडगळीत रूपांतर होते.

कवीने इथे यासाठी ‘कोंबलं’ हा शब्द अचूकपणे वापरला आहे. या अडगळीतल्या गोष्टी आपण ‘हे असू दे, ते असू दे’ करत त्यावेळी काहीही विचार न करता जागा दिसेल तिथे अक्षरशः कोंबतच असतो. ‘आत्ता असू दे, मग बघू’ एवढीच भावना त्यावेळी मनात असते.

तीच गोष्ट आयुष्यात आलेली माणसे, नातलग,  असंख्य घटना, आठवणी यांचीही असते. मनाचा एक भाग या ठासून  कोंबलेल्या विचारांनी व्यापलेला असतो.  कवीच्या आयुष्यातील अशा अडगळी बद्दल कवी आपल्याशी बोलतो आहे.

कळत असो वा नकळत

आयुष्याचा प्रत्येक वळणावरचा

मैलाचा दगडच काय

बारीक सारीक खडा सुद्धा

दिला भिरकावून त्या अडगळीत

नाही केला विवेक

उपयोगी का निरुपयोगी याचा

जे आले त्या सगळ्यालाच

फक्त माझे माझे म्हटले

दुसऱ्याला द्यायचे तर नावच नाही

आयुष्याच्या वाटचालीसाठी कवीने ‘मैलाचा दगड’ हे रूपक वापरलेले आहे  आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे, चांगली वाईट वळणं येतात त्यांनाच कवी मैलाचा दगड म्हणतो. म्हणजे चांगल्या उपलब्धी, मोठी कामगिरी यांच्याबरोबरच आपले शिक्षण, नोकरी व्यवसाय, लग्न,मुलंबाळ, खूप आनंदाचे प्रसंग, मोठे आजारपण, अपघात, संकटं अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्याला प्रसंगी वेगळी दिशा देतात. आयुष्यावर खूप मोठे परिणाम करत आयुष्य पुरते बदलून टाकतात.

अशा मोठ्या घटनांच्या चांगल्या वाईट आठवणी, परिणाम, काही वस्तू, फोटो, कागदपत्रं अशा असंख्य,अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा असतात ज्या आपण घरात आणि मनात अगदी जपून साठवत साठवून ठेवतो. त्यातले बारीक सारीक खडे म्हणजे त्या घटनांमुळे मनावर झालेले आघात, उमटलेले ओरखडे जे सतत बोचत राहून मनस्तापच देतात. त्यांनाही आपण जपतो. अशावेळी या सगळ्या गोष्टी उपयोगी आहेत का निरूपयोगी याचा सारासार विचारही आपण कधी करत नाही. जे जे पदरात पडत गेलं ते ते आपलेपणानं स्वीकारलं. त्यामुळे ते इतर कुणाला देण्याचा कधी प्रश्नच येत नाही. कवीही त्याच्या याच अनुभवाबद्दल बोलतो आहे.

मन माझे खोली अडगळीची

कोणी कोणी आले

नकळत खोली भरत गेले

आपापल्या स्मृतींनी

आणि खडूस वैराने सुद्धा

त्या सगळ्यांनाच

माझेच म्हटले

परतफेड करायचे कधी

नावही नाही काढले

आपले मन हे अदृश्य गोष्टींची अडगळीची खोली असते. आपल्या आयुष्यात असंख्य माणसे येतात त्यांच्या आठवणी, त्यांचे चांगले वाईट वागणे, वैर, भांडणे या सगळ्या गोष्टी मनात साठून राहतात. पण एकदा आपण त्यांना आपलं मानलं की या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याच होतात. मग कशाचीही परतफेड करायचा प्रश्नच येत नाही. या आठवणी आपल्या मनाला अडगळीची खोली बनवून कायम तिथेच राहतात. आपण त्यांना मनातून काढून टाकत नाही, म्हणजे विसरून टाकत नाही तोपर्यंत त्या मनातून आपण होऊन कधीच बाहेर जात नाहीत.

आता मात्र डोकावून पाहतोय मी

मोठ्या आशाळभूतपणे

त्याच अडगळीच्या खोलीत

कुठे सापडतोय का ते पहायला

परतीचा तर सोडाच

निदान पुढे जायचा तरी मार्ग

जो करेल कमी

या भीरु मनाची अस्वस्थता

गोंधळलेल्या मनाला

करेल कायमचं शांत

आणि देईल करून ओळख

माझ्या खऱ्या शाश्वत अस्तित्वाची

ही मनाची अडगळ आता अस्वस्थ करते. मन सतत बेचैन होते. कारण बऱ्याच आठवणी, अनुभव हे विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाहीत.  कवीची आता या अडगळीत घुसमट होते आहे. मन घाबरते आहे. आता यातून परतीचा मार्ग तर उरलाच नाही. पण यातून निदान बाहेर पडायचा तरी काही मार्ग आहे का हे कवी आशाळभूतपणे बघतो आहे. पण बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. असा एखादा मार्ग, एखादी युक्ती मिळावी ज्यामुळे घाबरलेल्या मनाची अस्वस्थता कमी होईल, गोंधळलेले मन शांत होईल अशी कवी अपेक्षा करतो आहे.

आपली प्रत्येकाची अशीच अवस्था होत असते. या नकोशा आठवणी, घटना, अनुभव मनातून बाहेर काढल्याशिवाय मन स्वच्छ, शांत होतच नाही. कारण या अनावश्यक पसाऱ्यात आपली एक वेगळीच प्रतिमा तयार झालेली असते. पण या जुन्या गोष्टीतले अनावश्यक रुसवे फुगवे, गैरसमजुती जर दूर झाल्या आणि सत्याचे आकलन झाले तर आपल्याच खऱ्या अस्तित्वाची नव्याने ओळख होऊ शकते.  त्यासाठी बाहेर पडता येणारा एखादा मार्ग मिळावा यासाठी कवी फार फार उत्सुक आहे.

पण सापडलीच नाही मला ती वाट

हरवून गेलीय त्या ढिगात

आणि गर्दीत

आयुष्यभर साठवलेल्या

मायेच्या, वासनांच्या, आणि दुस्वासाच्या

षड्रिपूंच्या बंधनात

कसं शोधू मी कसं शोधू

सांगेल का कोणी मला ?

लावेल का कोणीतरी

या खोलीतली अडगळ

नीटनेटकेपणे टापटिपीने

एकदा तरी ?

पण कवीला या अडगळीतून बाहेर नेणारी अशी वाट अजूनही सापडलेलीच नाही. कारण ती वाट त्या पसाऱ्याच्या ढिगामध्ये हरवून गेलेली आहे असे वाटते. खरंतर अशी वाट असतच नाही. कारण अशी अडगळ ही आपली मानसिक, भावनिक गरज असते. राग, लोभ, मोह, माया,मद, मत्सर अशा षड्रिपूंच्या पाशात आपण गुरफटलेले असतो.

यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची आपली मानसिक तयारी नसते. कारण या जुन्या घटना, त्यांच्या आठवणी या आपल्यासाठी कधी स्फूर्तीदायक असतात, दिशादर्शक असतात तर कधी कधी त्या वेदनादायी निराशाजनकही असू शकतात. पण त्याचवेळी त्या मार्गदर्शकही असतात. पुढे नक्की कसं वागायचं, काय टाळायचं, स्वतःला कसं बदलायचं याचं अचूक मार्गदर्शन आपलंच मन आपल्याला करत असतं.

पण तरीही या मनाच्या गुंत्यात अडकून पडणे ही गोष्ट जीवनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरत असते. अशावेळी मानसिक आजारांचा सामना ही करावा लागू शकतो. कवीही इथे बेचेन आहे. त्यामुळेच तो यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे. किमान कुणीतरी असा मार्ग दाखवावा अशी त्याची अपेक्षा आहे. निदान कुणीतरी या सर्वांचे योग्य वर्गीकरण करून नकोशा गोष्टी काढून टाकत चांगल्या आनंददायी गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवाव्यात जेणेकरून जगण्याला एक शिस्त लागून जगणे आनंददायी सुलभ होईल या गोष्टीची कवी वाट पाहत आहे.

आपली प्रत्येकाची पण अशीच अवस्था  असते. घरात साठवलेल्या अडगळीतल्या वस्तू आपण निवड करून कमी करू शकतो. नकोश्या गोष्टी टाकून देऊ शकतो. पण मनाच्या अडगळीचे काय करायचे ? त्यातून पूर्ण सुटका कधीच होत नाही. तिथे ‘क्लियर चॅट’चे बटन नसतेच. मनाला योग्य दिशा दाखवत त्याचा पसारा कमी करणे हे शेवटी आपल्याच हातात असते. खरंतर माणसाला स्मृती आणि विस्मृती ही दोन मोठी वरदान लाभलेली आहेत. त्यांचा योग्य समन्वय साधत यातून मार्ग निघू शकतो. याच अडगळीवर डॉ .निशिकांत श्रोत्रींची ही अडगळीची खोली कविता अतिशय सुंदर सखोल असे भाष्य करते.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? काव्यानंद ?

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆

छातीत फुले फुलण्याची

वार्‍यावर मन झुलण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

डोळ्यात ऋतुंचे पाणी

मौनात मिसळले कोणी

वाळूत स्तब्ध राहताना

लाटेने गहिवरण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

तू वळून हसलीस जेव्हा

नक्षत्र निथळले तेव्हा

मन शहारून मिटण्याची

डोळ्यात चंद्र टिपण्याची …

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

ज्या चंद्र कवडशा खाली

कुणी साद घातली ओली

मग चंद्र वळून जाताना

किरणात जळून जाण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

पाऊस परतला जेव्हा

नभ नदीत हसले तेव्हा

कोरड्या मनाने कोणी

गावात परत येण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

थबकून थांबल्या गाई

की जशी शुभ्र पुण्याई

त्या जुन्याच विहिरीपाशी

आईस हाक देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

गावाच्या सीमेवरती

जगण्याच्या हाका येती

त्या कौलारु स्वप्नांना

आयुष्य दान देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

हे गाणे जेव्हा लिहिले

मी खूप मला आठवले

शब्दास हाक देताना

आतून रिते होण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 – श्री अरुण म्हात्रे 

काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना   मला आठवणींचा महिना  वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.

या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.

अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.

आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.

या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.

मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.

घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.

येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.

मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print