श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ ऋण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
वाहिले सर्वस्व तू मज,काय तुजला मी दिले
मी दिलेले भोगून सारे, शब्द माझे झेलिले.
राहिली माझ्या सवे होऊन माझी सावली
अन् कधी माझ्याच स्कंधी क्षणभरी विसावली.
राग माझा,लोभ माझा आपला केलास तू
वेदनेच्या पायवाटा सुखभरे मळल्यास तू.
शांतवाया या मनाला घालशी हळू फूंकर
गंध भरल्या आसमंती अदृश्य जैसा कापूर.
त्याग जो केलास तू,ना वाच्यता त्याची कधी
फुलविण्या माझ्या मनाला दुःखासही तव संमती.
आज ढळला सूर्य आणि सावल्याही लांबल्या
आठवांच्या सर्व सरिता वाहताना थांबल्या.
मुक्त हे आयुष्य माझे रिक्त हस्ते मी उभा
झोळीत नाही आज माझ्या द्यावया तुज दोन दमड्या.
चार घे हे शब्द आणि दोन अश्रू नयनातले
स्पर्श विश्वासून घे अन् भाव हे ह्रदयातले.
लाट लाटेला मिळावी , एक व्हावी शेवटी
वेगळा ना मी कधी अन् तू कधी ना एकटी.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈