मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ६ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदेवतेचे मंदिर स्थापनेपासून व त्यानंतरचे पेशवेकालीन वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये गुंफलं आहे.

रुणुझुणुत्या पाखरा

या चालीवर म्हणून पहाव्यात खूप छान वाटतात.

– साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -६ ?

!!श्रीराम समर्थ!!

 

जोगेश्वरी तांबडी ती

ग्रामदेवता पुण्याची

ग्राम संरक्षक देवी

वर्षे तीनशें पूर्वीची !!

 

आहे उल्लेख पुराणीं

नाम तिचे योगेश्वरी

रुप प्राकृत तियेचे

शोभे नाम जोगेश्वरी !!

 

वध ताम्रासुराचा तो

पराक्रम करणारी

चतुर्भुजा स्वयंभू ती

नवसाला पावणारी !!

 

हाती डमरु त्रिशूळ

पानपात्र नि मुंडके

ताम्रासुरास वधून

रुप आगळे झळके !!

 

मूर्ती रहस्य आख्यान

जीव शिव एकरुप

पुण्यामध्ये स्थिरावले

जोगेश्वरी निजरुप !!

 

दिले खाजगीवाल्यांनी

बांधुनिया देवालय

जिवाजीने दिली जागा

उभे राहिले आलंय !!

 

झाले प्रसिद्ध मंदिर

येता पेशवे पुण्याला

भट श्रीवर्धनकर

आले पुण्य उदयाला !!

 

होते दुर्मिळ दर्शन

दूर होती योगेश्वरी

पुण्यामध्ये विसावली

जगन्माता जोगेश्वरी !!

 

लग्न मुंजीच्या अक्षता

येती वाजत गाजत

जोगेश्वरी आशीर्वाद

करी लक्षुमी स्वागत !!

 

रमा सगुणा पार्वती

पेशव्यांचा राणीवसा

राधा आनंदी जानकी

जोगेश्वरी वाणवसा !!

 

दिली अक्षत देवीस

लग्न द्विबाजीरावांचे

अमृत नी विनायक

व्रतबंध पेशव्यांचे !!

 

माधवराव पेशवे ते

जातायेता मोहीमेस

जोगेश्वरी देवालयी

येत होते दर्शनास !!

 

जोगेश्वरी पालखीत

सणावारी मिरविते

पेठेपेठेतुनी माता

मुख दर्शन दाविते !!

 

नवरात्री जोगेश्वरी

जाई तुळजापुरास

पेशव्यांचा लवाजमा

भवानीच्या दर्शनास !!

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घालमेल ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ कवितेचा उत्सव ☆ घालमेल ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

करोनाचा विळखा

घट्ट होत चाललाय

माणूस परिस्थितीचा

गुलाम होऊ घातलाय

 

करोनाने माणसाला

अगदी पेचात टाकलंय

जणू आभाळाने क्षितिजाला

घेरून टाकलय

 

शाश्वत असा सूर्य

उद्या क्षितिजावर उगवेल

पण आशेचा किरण कोणता

हे माणसाला कसे उमगेल?

 

दुसऱ्याच्या दुःखाने

खरंच काळजात चर्र होते

पण इतके वरवरचे की

लगेचच विसरते

 

आपण आपले बरे

दुसरे गेले उडत

बेदरकार विचारांची

मन का ठेवते पत?

 

परदुःख शीतल

परिणीती झाली आज

लाज वाटली स्वतःची

मन झाले नाराज

 

बातमी एखादी जीवघेणी

काळीज पार वितळवते

वयच होते कारणीभूत

म्हणून मृत्यूला स्वीकारते

 

भडका आगीचा उठत नाही

घरात जोवर ठिणगी पडत नाही

आज सुपात तर उद्या जात्यात

याची जाणीव कशी होत नाही?

 

पोट भरून ढेकर दिलेले

पैशाचा ऊहापोह करतात

गरीब बिचारे मृत्यूला

गृहीत धरून चालतात

 

गरीब-श्रीमंत लहान-थोर

भेदभाव न करोनाच्या ठाई

जो तो आपल्या प्राक्तनाच्या

वेटोळ्यामध्ये अडकला जाई

 

माणसाला माणसापासून

दूर लोटलंस देवा

मनात असून देखील

घडत नाही की रे सेवा!

 

तेहतीस कोटी देवांना

आर्जव आहे दीनवाणी

नात्यांची पकड सैल नका करू

हीच तुम्हा चरणी विनवणी

 

नको विवंचना नको भ्रांत

चुकले माकले कर माफ

लेकराला घे पदरात

अन् कर मन साफ

 

दुःख झाले अतोनात

मन झाले जड

तुझ्याशिवाय कुणाला सांगू

अन् विषयाला लावू कड?

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे अंबे ! जगदंबे ! ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ हे अंबे ! जगदंबे ! ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

 

 

हे अंबे!जगदंबे!धाव घेई झडकरी

षड्रिपुचे महिष तूच, टाक गे विदारुनी

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर दाटले

छेद पटल दूर सार, रिपु भारी पातले

विश्वजननी आस तुझी, दाटली उरातुनी

अधीर मना धीर द, धाव पंचतत्वातुनी

तेज तूच, तूच आप, तूच वायु, तू धरा

व्यापिलेस व्योम सर्व, मम मनाच्या प्रांगणी

मी कन्या तव माते, अज्ञ आहे जाणुनी

तव क्रुपे बरसु दे, काव्यगंगा रोमातुनी

शक्तिदात्री, स्फूर्तीदात्री, करवीर निवासिनी

छत्र तुझे मज लाभो, प्रार्थिते मनोमनी.

 

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 69 – तेजशलाका ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 69 ☆

☆ तेजशलाका ☆

 

तू श्रीहरीची मधूर बासरी

सरस्वतीची वीणा मंजूळ

वसुंधरेची नव चैत्रपालवी

मृगनयनी तव रूप लाघवी

 

तू साक्षात्कारी एक कल्पना

कवितेमधली मृदूल भावना

प्राजक्ताचा प्रसन्न दरवळ

तरूणाईचा तरंग अवखळ

 

तू पूर्वेची पहाटलाली

 नवकिरणांची तेजशलाका

साकारलेले स्वप्न मनोहर

नवयुवती तुज प्राप्त युगंधर

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 5 ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

या भागात देवीच्या विविध रुपांचे वर्णन व तिच्या भक्तीचे स्वरुप .

– साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -5 ?

!!श्रीराम समर्थ!!

 

माता माहूर गडाची

तांबुलाचा होई लाभ

शालू हिरवा नेसली

अलंकारे राखी आब !!

 

भरजरी पैठणीत

खुलुनिया दिसे रुप

भक्ती शक्ती देवतेचे

अंतरंगी निजरुप !!

 

कुमारिका पूजनाने

ऐश्र्वर्याची प्राप्ती होते

सुखशांती समाधान

जगन्माता सौख्य देते !!

 

रामानेही केली पूजा

पूजियेली भगवती

केला वध रावणाचा

दिले सौख्य सेवाव्रती !!

 

सप्तशती श्रीसूक्तही

यथाशक्ती करु पाठ

भक्तीभाव वृद्धिंगत

मांगल्याचे गेही ताट !!

 

दुर्गास्तोत्र रामरक्षा

करु पाठ भक्तीभावे

पावतसे जगदंबा

परिपूर्ण मनोभावे !!

 

मंत्रातील एक एक

शक्तीवंत हे अक्षर

नामजप उच्चारण

देवी नामाचा जागर !!

 

मन होई शुचिश्मंत

देवी आराधना करु

नवरात्रात सुंदर

पूजा संकीर्तन करु !!

 

शिवनेरी किल्ल्यावरी

शोभे दैवत शिवाई

कुलदेवी माहेरची

पूजीताती जिजाबाई !!

 

आई अंबेचा गोंधळ

माता रेणुका गोंधळ

बोला सप्तशृंगी उदो

महालक्ष्मी उदो उदो !!

 

उदो उदो उदो उदो उदो उदो उदो..ऽऽ..ऽऽ..

               क्रमश:   …..

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राहिले रे दूर घर माझे ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ राहिले रे दूर घर माझे ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

तिचं मन अतिशय हळवं,

फक्त तिचंच?..

त्यांचं ही तितकंच हळवं,

किंबहुना जरा जास्तच..

 

नोकरीसाठी घर सोडून जाताना

त्यांचं ही मन रडतं

घरापासून त्यालाही दूर

रहावं लागतं .

 

घरच्या आठवणींनी मन त्याचंही

कासावीस होतं,

जाऊ घरी लवकरंच….आपलीच

आपण समजूत काढतं.

 

घरचे सणवार,पारंपरिक जेवण

त्यालाही चुकतं,

मन मोकळं करण्या पूर्वीच

दोन टिपं गाळतं….

 

मी मस्त मजेत आहे घरी फोनवर

तो सांगतो,

घरच्या सगळ्यांना आनंदात ठेव

म्हणून देवाकडे मागतो.

 

कधी कधी आठवणींनी काळीज

त्यांचं पिळवटतं,

आणि उशीमध्ये तोंड खुपसून

ढसढसा रडतं…

 

पुरूषमाणूस बाबा तू रडणं

तुला शोभत नाही,

शब्द घुमतात कानात,

पण मन मात्र ऐकत नाही…

 

जड मनाचं ओझं आज काही केल्या पेलवत नाही,

आसवं सुद्धा आज ऐकायला तयार नाहीत..

 

हुंदक्यांची लाट उशी भिजवून

टाकते,

घरच्या आठवणींनी मन आणखीच जड होते.

 

अनावर मन तुला आर्त साद

घालते,

” आई, ए आई, तुझी खूप

आठवण येते

तुझी खूप आठवण येते. ”

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 4 ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

आई तुळजाभवानी मातेच्या विविध रुपात बांधण्यात येणाऱ्या पूजेच्या वर्णनात  आजच्या चारोळ्या गुंफल्या आहेत

साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -4???

वध दैत्यांचा करुनी

माता तुळजाभवानी

देवतांची करे मुक्ती

कृष्णकांती ही कल्याणी!!

 

केली मुरली अर्पण

भयभीत सर्व देव

भवानीच्या मुरलीने

स्वर्गप्राप्ती अनुभव!!

 

मुरलीची महापूजा

आवर्जून बांधतात

अलंकार महापूजा

नवरात्री उत्सवात !!

 

छत्रपती शिवाजींना

तलवार भेट दिली

धर्म रक्षणाच्या साठी

माय भवानी धावली!!

 

विष्णूदेव विसावले

शेषशैय्येच्या वरती

घेत होती अंबामाता

नेत्र कमळी विश्रांती!!

 

विष्णूदेवांची ती शैय्या

अंबा मातेला अर्पण

शेषशायी अलंकारे

तिचे होतसे पूजन !!

 

अष्टादश भुजा देवी

दैत्य महिष मारीला

सर्व देवतांचे तेज

पराक्रम घडविला !!

 

महालक्ष्मी शोभे रुप

वध महिषा सुराचा

घेतलासे अवतार

आदिशक्ती या रुपाचा !!

 

छत्रपती शिवरायाला

आशीर्वाद द्यावयाला

आली तुळजाभवानी

किल्ले प्रतापगडाला !!

               क्रमश:   …..

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 68 ☆ माझ्या सोबत ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 68 ☆

☆ माझ्या सोबत ☆

 

स्वतःशीच मी बोलत असता, तीही असते माझ्या सोबत

तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत

 

तिच्या स्मृतीला चौकट नाही, भिंती नाही, नाही खोली

सुक्ष्म मनाच्या गाभाऱ्यातुन, येउन माझी भूमि व्यापली

मनी उतरते व्यापुन घेते, उगाच नाही खोटे बोलत

तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत…

 

सारीपाट हा तिच्या स्मृतिचा, कसा आवरू खेळ प्रीतिचा

बंदिवान या चौकटीत मी, खेळ चालला अटीतटीचा

खेळामधली कवडी झालो, नाही दुसरा रस्ता शोधत

तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत…

 

क्षणा क्षणाला तिचीच सोबत, सुख शांतीही असते कायम

मंत्राची या जादू मोठी, ठायी ठायी दिसतो सोहम संसाराची अवीट गोडी, जीवन लाभो असेच अविरत

तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समाधान ☆ श्री अविनाश सगरे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ समाधान ☆ श्री अविनाश सगरे ☆ 

 

सोड पिच्छा भौतिक सुखाचा

करतोय राज्य तो आसक्तीचा

 

नमले रे भलेंबुरेंही नियतीपुढे

काय होईल तुझ्याने वाकडे?

 

अमर असल्याचा भास तुला

ना कळेरे कधी जीव उडाला

 

पुरव कितीही भोग देहमनाचे

नाही समाधान या वाळवंटाचे

 

साठा खोट्याचा विपुल केला

झरां खर्याचा आटतच गेला

 

नाही संवाद कधी अंतःकरणा

पूजा करत राहिला बाह्यमना

 

नाही गात कोण सत्यपोवाडे

कुणांरे वेळ बघण्या तुझे मढे

 

© श्री अविनाश सगरे.

मु.पो.जयसिंगपूर.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 3 ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

नवदुर्गांच्या औषधी रुपांचे वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये आहे.

या चारोळ्या अष्टाक्षरी छंदात गुंफलेल्या असून ” रुणुझुणुत्या पाखरा ” या सिनेगीताच्या चालीवर म्हणायला खूप छान वाटतं.

– साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -3???

 

दुर्गा देवीच्या नऊ रुपांपैकी आज रुप सात ते नऊ .

उर्वरित आई तुळजाभवानीची विविध रुप वर्णनाच्या चारोळ्या.

 

रुप दुर्गेचे सातवे

विजयदा कालरात्री

नागदवण औषधी

प्राप्त विजय सर्वत्री !!

 

मन मस्तिष्क विकार

औषध विष नाशिनी

कष्ट दूर करणारी

सुंदर सुख दायिनी !!

 

रुप दुर्गेचे आठवे

नाम तिचे महागौरी

असे औषधी तुळस

पूजिताती घरोघरी!!

 

रक्तशोधक तुळशी

काळी दवना पांढरी

कुढेरक षटपत्र

हृदरोग नाश करी !!

 

रुप दुर्गेचे नववे

बलबुद्धी विवर्धिनी

हिला शतावरी किंवा

म्हणती हो नारायणी

 

बलवर्धिनी हृदय

रक्त वात पित्त शोध

महौषधी वीर्यासाठी

औषधाचा गुणबोध !!

 

दुर्गादेवी नऊ रुपे

अंतरंग भक्तीमय

करु औषधी सेवन

होऊ सारे निरामय !!

 

येगं येगं अंबाबाई

आई तुळजाभवानी

तुझे वर्णन करण्या

आहे अपुरीच वाणी!!

 

देवी ललिता सुंदर

नाकी नथ मोतियाची

भास्कराने दिला रथ

दिव्य रत्ने सव्यसाची !!

 

माते तुझ्या मंदिराला

शोभे कळस सोन्याचा

तुझ्या डोईवरती गं

‌शोभे मुकुट सोन्याचा !!

 

तुझ्या मुकुटात हिरे

पायी सोन्याचे पैंजण

झळकते प्रभावळ

पैंजणांची रुणझुण !!

 

अष्टभुजा देवी माता

मूर्ती उंच दोन फूट

मूर्ती मागे प्रभावळ

डोईवरती मुकूट !

 

हाती ढाल तलवार

बाण धनुष्य कमळ

अशी आयुधे हातात

मूर्ती सुरेख तेजाळ !!

 

शेंडी महिषासुराची

डाव्याहाती पकडली

हाती उजव्या त्रिशूळ

देवी वेगाने धावली !!

 

!!श्रीजगदंबार्पणमस्तु!

 

                क्रमश: …..

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print