मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नुपूर कुठे…कुठे बेडी… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  नुपूर कुठे…कुठे बेडी… ?  श्री प्रमोद जोशी ☆

(जे जे स्कूल ऑफ आर्टचा स्कल्प्चर गोल्डमेडॅलिस्ट श्री.सुहास जोशी, देवगड याने पाठवलेलं चित्र.)

वरवर मुद्रा कथ्थकची पण,

नुपूर कोठे,कोठे बेडी !

गुंतू पाहे कुणी आणखी,

कुणा मुक्तीची आशा वेडी !

मेंदी रंगली एका पायी,

दुसऱ्या पायी ठिबके रक्त !

एक शारदा भक्त असावा,

दुसरा स्वातंत्र्याचा भक्त !

छुमछुम कोठे,कोठे खणखण,

सुख कुठे तर कोठे वणवण !

अलौकिक दोघांची श्रद्धा 

समर्पणास्तव उत्सुक कणकण !

कुणी तुरुंगी,कुणि मंचावर,

प्रत्येकाचे विभिन्न हेतू !

दोघांच्याही स्पष्ट जाणिवा,

मनात नाही किंतु-परंतू !

नृत्यासाठी अशी कल्पना,

सुचली तो तर केवळ ईश्वर !

चिरंजीविता लाभे त्याला,

कधिही होणे नाही नश्वर !

ता थै थैय्या सूर अचानक,

वेदीवरती जाई मुक्तीच्या !

लिहिल्या जातील कथा चिरंजीव,

रसीक आणि देशभक्तीच्या !

कृष्णधवल कुणी,कोणी रंगीत,

ज्याचे त्याचे कर्म वेगळे !

काय करावे,काय स्फुरावे,

ज्याचे त्याचे मर्म वेगळे !

एका जागी भिन्न येऊनी,

सादर होईल अपूर्व चिंतन !

इतिहासावर लिहिले जाईल,

दोघांचेही नाव चिरंतन ! 

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी कौतुकै…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी कौतुकै… ☆ श्रीशैल चौगुले ☆

आवडते मज आवडते

मराठीचे हे गौरव गाणे

चिमण्या टिपती दाणे-दाणे

तसे शब्द जणू शुध्दत्वाने

आवडते मज आवडते.

 

पंख वाणीला सरस्वतीचे

माया-ममता या भाषीयेचे

अवीट गोडीत ज्ञानेशाचे

आवडते मज आवडते.

 

लुकलुक चांदणे गगनी

चंद्र शीतल मराठी मनी

तेज तिमीरा भेद अज्ञानी

आवडते मज आवडते.

 

आरती मंदिरी आत्मभक्ती

मराठीचीये तेवती ज्योती

संतांशी ग्रंथ  जोडिती नाती

आवडते मज आवडते.

 

भारतभुमी भिन्न भाषीका

तया मराठी श्रेष्ठ रसिका

मधुर बोल रचे कवणिका

आवडते मज आवडते.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 151 – देहरक्षा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 151 – देहरक्षा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

देहरक्षेचे महत्त्व वेश्येला नसते ।

शब्दांनी मन क्रूरतेने चिरते।

वेश्याही माणूस असते।

तिलाही मन आसते।

पोट हीच अडचण नसते।

परतीची वाट बंदच असते।

आयुचे गणित विचित्र असते।

इथे रिटेक तरी कुठे असते।

एक पायारी चुकली की

उत्तर चुकलेलेच असते।

दोष कुणाचाही असो

नेहमी तिच चुकीची असते।

कोवळ्या कळ्या क्रूरपणे

कुस्करतात ते शरीफ ।

कधी प्रेमाच्या जाळ्यात

पकडतात तेही शरीफ।

लग्नाचा बाजार

मांडतात तेही शरीफ ।

बदनाम फक्त तिच असते

मुली पळवणारे सज्जन ।

त्याची दलालही सज्जन

तिथे जाणारेही सज्जन

पूनर्वसनाला काळीमा

फासणारेही सज्जन

बळी पडणारीच !!! दुर्जन

नुसतीच का ठोकायची।

वेश्यांच्या देहरक्षणाची

आहेका हिंमत स्विकारण्याची

ना काम तरी देण्याची

ना नजरा बदलण्याची ।

ढोंगी जगात जगणे नसते।

प्रेम बंधन कुठेच नसते।

जीवन संपवायची हिंमत सार्‍यांना कुठे असते ।

रोजचीच ती मरत असते बदनामी जगत असते ।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मायमराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ मायमराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सखे शेजारीण बाई

काय सांगू महती तिची

अम्रुताचे घट भरले गं

माझ्या मराठी भाषेत

 

जात्यावरच्या ओव्या गाई

दळण दळता दळता

एक एक शब्द गुंफियेला

घाली नात्यांची सांगड त्याला

 

ज्ञानेश्वर, तुकोबांनी रचल्या

अभंग आणि पोथ्या

किती संतांनीही त्यात

लिहील्या आरत्या आणि ओव्या

 

गणगौळण,पोवाडा,भारुड आणि फटका

कवीलोकांनी रचल्या किती

लोकसाहित्यातून जपला त्यांनी

मायमराठीचा बाणा

 

मिरविते गळा साज

काना, मात्रा, वेलांटीचे

तिच्या लल्लाटी शोभती

जसे सुरेख दागिने

 

कुसूमाग्रजांची, विंदांची

खांडेकर,गडकरींची

नाट्यप्रयोगात रंगली

माझी माय मराठी ही

 

अशी सुसंस्कृत आणि शालीन

राज्यभाषा गं मराठी

जयघोष तिचा चाले साऱ्या आसमंती गाजे

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #173 ☆ संत तुकडोजी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 173 – विजय साहित्य ?

☆ संत तुकडोजी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

इंगळे कुलात | संत तुकडोजी |

माणिक बंडोजी | महाराज ||. १

 

माऊली मंजुळा | वडील बंडोजी |

गुरू आडकोजी | यावलीत || २

 

ग्राम विकासाचा| घेऊनीया ध्यास |

विवेकाची कास | पदोपदी || ३

 

स्वयंपूर्ण खेडे | सुशिक्षित ग्राम |

ग्रामोद्योग धाम | आरंभीलें || ४

 

सार्थ समन्वय | ऐहिक तत्त्वांचा |

पारलौकीकाचा | उपदेश || ५

 

खंजिरी भजन | राष्ट्रसंत मान |

संस्कारांचे वाण | तुकडोजी || ६

 

व्यसना धीनता | काढलीं मोडून |

घेतली जोडून | तरुणाई || ७

 

शाखोपशाखांचे | गुरू कुंज धाम |

सुशिक्षित ग्राम | सेवाव्रत || ८

 

नको रे दास्यात | नको अज्ञानात |

नारी प्रपंचात | पायाभूत || ९

 

कुटुंब व्यवस्था | समाज व्यवस्था  |

राष्ट्रीय व्यवस्था | शब्दांकित || १०

 

नको अंधश्रद्धा | सर्व धर्म एक |

विचार हा नेक | रूजविला || ११

 

कालबाह्य प्रथा | केलासे प्रहार |

विवेकी विचार | अभंगात || १२

 

एकात्मता ध्यास | केले प्रबोधन |

दिलें तन मन | अनुभवी || १३

 

लेखन विपुल | कार्य केले थोर |

राष्ट्र भक्ती दोर | तुकडोजी || १४

 

कार्य अध्यात्मिक | आणि सामाजिक |

साहित्य वैश्विक | ग्रामगीता || १५

 

कविराज लीन | टेकविला माथा |

तुकडोजी गाथा | वर्णियेली || १६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी भाषा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी भाषा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

नाही कुणी म्हटलंय

खुशाल इंग्रजी शिका

पण असं कुणी सांगितलंय

मराठी बाहेर फेका ?

 

मराठी मायबोली

तिला मायेचा ओलावा

तिच्या भव्य मंदिराला

नको इंग्रजी गिलावा.

 

बाळ आई बाबा

हा नात्यामधला गाभा

त्याला डॅडी मम्मी पप्पा

काय आणतील का  शोभा?

 

शिरा गेला पोहे गेले

तिथे आला पिझ्झा

नूडल्स आणि चायनीज फूड

यातच वाटते मज्जा

 

शुद्ध स्वच्छ बोला

आणि मराठीच बोला

साऱ्या विश्वामध्ये तिचा

होऊ द्या बोलबाला

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #159 ☆ संत मीराबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 159 ☆ संत मीराबाई☆ श्री सुजित कदम ☆

कृष्णभक्त मीराबाई

 थोर भक्ती परंपरा

बारा तेराशे भजने

भक्तरस वाहे झरा…! १

 

जन्मा आली संत मीरा

रजपूत कुटुंबात

मातृवियोगात गेले

बालपण   आजोळात…! २

 

सगुणाची उपासक

कृष्ण मुर्ती  पंचप्राण

हरी ध्यानी एकरूप

वैराग्याचे  घेई वाण….! ३

 

एका एका अभंगात

वर्णियले कृष्णरूप

प्रेम जीवनाचे सार

ईश्वरीय हरीरुप….! ४

 

कृष्ण मुर्ती घेऊनी या

मीराबाई वावरली

भोजराज पती तिचा

नाही संसारी रमली..! ५

 

कुल दैवताची पूजा

कृष्णा साठी नाकारली 

कृष्ण भक्ती करताना

नाना संकटे गांजली…! ६

 

अकबर तानसेन

मंत्र मुग्ध अभंगात

दिला रत्नहार भेट

मीरा भक्ती गौरवात…! ७

 

आप्तेष्टांचा छळवाद

पदोपदी  नाना भोग

कृष्णानेच तारीयले

साकारला भक्तीयोग…! ८

 

राजकन्या मीरा बाई

गिरीधर भगवान

भव दु:ख विस्मरण

नामजप वरदान…! ९

 

नाना वाद प्रमादात

छळ झाला अतोनात

वैरी झाले सासरचे

मीरा गांजली त्रासात…! १०

 

खिळे लोखंडी लाविले

दृष्टतेने बिछान्यात

गुलाबाच्या पाकळ्यांनी

दूर केले संकटास…! ११

 

दिलें प्रसादात विष

त्याचे अमृत जाहले

भक्त महिमा अपार

कृष्णानेच तारियले…! १२

 

 लपविला फुलांमध्ये

जहरीला नागराज

त्याची झालीं फुलमाळा

सुमनांचा शोभे साज….! १३

 

गीत गोविंद की टिका

मीरा बाईका मलार

शब्दावली पदावली 

कृष्ण भक्तीचा दुलार..! १४

 

प्रेम साधना मीरेची

स्मृती ग्रंथ सुधा सिंधू

भव सागरी तरला

फुटकर पद बिंदू….! १५

 

भावोत्कट गेयपदे

दोहा सारणी शोभन

छंद अलंकारी भाषा

उपमान चांद्रायण….! १६

 

विसरून देहभान

मीरा लीन भजनात

भक्ती रूप  झाली मीरा

कृष्ण सखा चिंतनात….! १७

 

कृष्ण लिला नी प्रार्थना

कृष्ण विरहाची पदे

भाव मोहिनी शब्दांची

संतश्रेष्ठ मीरा वदे…! १८

 

गिरीधर नागरही

नाममुद्रा अभंगात

स्तुती प्रेम समर्पण

दंग मीरा भजनात…! १९

 

द्वारकेला कृष्णमूर्ती

मीराबाई एकरूप

समाधीस्थ झाली मीरा

अभंगात निजरूप….! २०

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बकुळी… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? बकुळी… अज्ञात ? ☆ सौ. गौरी गाडेकर 

रुसून बसली एकदा

कृष्णवाटिकेत बकुळी

सगळी पुष्प लेवती मोहक रंग

मीच एकटी का सावळी — 

वाटिकेतील फुले पाने लता

कुजबुजती एकमेकांच्या कानात

नाजुक साजुक आपली कन्या

का बरे मुसमुसे एका कोपर्‍यात — 

गेल्या तिला समजवायला

मोगरा सोनटक्का सदाफुली

बकुळी म्हणे उदास होऊन

शुभ्रतेपुढे तुमच्या दिसे मी कोमेजलेली —

गुलाबराजा आला लवाजमा घेऊन

म्हणे कसले हे वेड घेतले मनी

बकुळी प्रश्न विचारी मुसमुसून

का मोहक पाकळ्या लेवू शकत नाही तनी —

सरतेशेवटी आला पारिजातक

सडा पाडत बकुळीच्या गालावर

थांब तुला सांगतो गुपित

मग हास्य फुलेल भोळ्या चेहर्‍यावर —

कृष्णाने माझी भेट दिली सत्यभामेला

सडा मात्र पडे रुक्मिणीच्या अंगणात

भोळ्या राधेला काय बरं देऊ

हा विचार अविरत चाले भगवंताच्या मनात —

तितक्यात आलीस तु सामोरी

गंधाने दरवळली अवघी नगरी

शुभ्र नाजुक तुझी फुले पाहुन

भगवंत म्हणती हीच राधेला भेट खरी —

अलगद तुला घेता हाती

स्पर्शाने तु मोहरलीस

भरभरून सुगंध देऊन हरीला

सावळ्या रंगात मात्र भिजून गेलीस — 

ऐकुन हे बोल प्राजक्ताचे

बकुळी देहभान विसरुन गेली 

अलौकिक आनंदाने होऊन तृप्त

राधाकृष्णाच्या प्रेमरंगात रंगली —— 

कवी : अज्ञात

प्रस्तुति : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || आरती महाराष्ट्राची || ☆ सौ.विद्या वसंत पराडकर ☆

सौ.विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ || आरती महाराष्ट्राची || ☆ सौ.विद्या वसंत पराडकर ☆ 

जय देव जय देव,जय महाराष्ट्रा जय महाराष्ट्रा

वीरांच्या देशा,कणखर देशा,जय महाराष्ट्रा

जय देव जय देव.      ☘️

 

शिवबाच्या पराक्रमाने पारतंत्र्याची

संपवली निशा

मावळ्यांच्या साह्याने उदयास आणली स्वातंत्र्याची उषा

जय देव जय देव   ☘️

 

सह्याद्रीचा राजमुकूट हा कसा शिरावर विराजे

पद प्रक्षालन करण्या अरबीच्या

उत्तुंग लाटा साजे

जय देव जय देव.    ☘️

 

सह्यगिरीच्या वक्षातुन सरिता झुळझुळती,गुणगुणती

सह्याद्रिच्या दर्या खोर्यांना साद त्या देती

जय देव जय देव.    ☘️

 

हिमालयावरी संकट येता, सह्याद्री

छातीचा कोट करी

अनुज लक्ष्मण बनुनी साह्य करी

जय देव जय देव. ‌‌.    ☘️

 

मुंबापुरी हे भूषण तुझे राजधानी ही

वसे

सुंदर,मोहक या तरुणीला

कित्येक मागण्या असे

जय देव जय देव. ‌‌ ‌ ‌☘️

 

शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना काय येथल्या लेण्या असे

मूर्तिकाराची मूर्ती  भासे,

ती सजीवतेची प्रतिमा दिसे

जय देव जय देव.       ☘️

 

देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर

जयाचे दिव्य‌अंलकार

अभंग,ओवी, श्र्लोक यांचा

कंठी घातला हार

जय देव ‌जय देव.   ‌.  ‌. ☘️

 

आधुनिक ज्ञान, विज्ञानाने

उन्नत ‌आहे हा देश

अध्यात्मिक ज्ञानाचे‌ माहेरघरच

हा माझा देश

जय देव जय देव.     ☘️

 

कित्येक देश असती,

सुंदर, संपन्न की महान

प्रिय हा देश आमुचा,

महाराष्ट्र महान 

जय देव जय देव जय महाराष्ट्रा ‌.  ‌‌☘️ 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !! मायबोली !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ !! मायबोली !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

माय मराठीची | ओढ  अंतरीची |

शान शारदेची  | भाषा माझी ||

मायबोली गावी | जीवा वेड लावी |

अंगाईची ओवी | जननीची ||

मनाची गुपिते | जात्यावरी गाते |

आपसूक येते | ओठी माझ्या ||

पुराणे कथांची | ओवी ज्ञानेशाची |

ठेव अमृताची | अलौकिक ||

मनाच्या श्लोकात | गीतेच्या ज्ञानात |

संत साहित्यात | बोध आहे ||

कथा कवितांचा | ठेवा साहित्याचा |

लौकिक मानाचा | विश्वामाजी ||

सार्थ रसवंती | भाषा ओघवती |

देवी सरस्वती | स्वये बोले ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares