‘मी होळीत काय आणि का जाळलं? ‘ याविषयी तुकोबाराय सांगतात,
दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥
लोकं होळीत शेणाच्या गवऱ्या, लाकडं जळतात. पण तुकोबा म्हणतात..
” मी होळीत माझ्यातले ‘दोष’ जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही. ”
दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही…
सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी । कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥
.. “दु:ख तर जवळ येतंच नाही, उलट सुखं माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. ”
…. सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे…
आमुची आवडी संतसमागम | आणीक तें नाम विठोबाचें ॥
.. मला सुखाची अपेक्षा का नाही? तर, “संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे. ”
आमचें मागणें मागों त्याची सेवा | मोक्षाची निर्देवा कुणा चाड? ॥
“मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त ‘संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव’ एवढंच मागेन. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील? ”
तुका म्हणे पोटीं सांठविला देव | न्यून तो भाव कोण आम्हां? ॥
“मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता? ”
…. सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.
धन्य ते तुकाराम महाराज आणि धन्य ती संतांची मांदियाळी
आपल्यातीलही सर्व दोष जळावेत म्हणून मनापासून शुभेच्छा
☆
प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
११ मार्च २०२५… ३३६ वर्षे उलटून गेली छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाला. ११ मार्च १६८९ ते ११ मार्च २०२५ … या काळात स्वधर्मासाठी एवढा प्रचंड त्याग आणि वेदनांशी लढा इतर कोणाच्याही इतिहासात आढळून येत नाही!
शारीरिक छळाची वर्णने शब्दांत वाचून सहृदय माणसाच्या मनावर जेवढा परिणाम होतो, त्यापेक्षा ती अभिनित दृश्ये पाहताना होतो तो परिणाम अपरिमेय असतो. छावा चित्रपटातील शेवटची दृश्ये पडद्यावर पाहून जवळपास सर्वच प्रेक्षक नि:शब्द होतात, हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.
क्रूरकर्मा औरंगजेब खरे तर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण एका वारामध्ये घेऊ शकला असता. पण त्याने त्यांच्या मृत्यूचा उपयोग उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर त्याच्या वाटेत येऊ पाहणा-या प्रत्येकाच्या मनात कायमची धडकी भरवण्यासाठी केला… हे सर्वश्रुत आहे! पण त्याचे हे मनसुबे पूर्ण झाले नाहीत… हा इतिहास आहे! अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा… हा या मराठी मातीचा बाणा आहे!
आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या व्यक्तींना सन्मान देण्याची मानवी सहजवृत्ती आहे. किंबहुना अवघ्या प्राणिसृष्टीमध्ये ही वृत्ती आढळून येते. मानवाने त्याच्यापेक्षा सामर्थ्यवानांस देव ही पदवी देण्याची रीत दिसून येते. राजाला भूदेव अर्थात पृथ्वीवरचा देवाचा अवतार किंवा देवच मानले जाते, हे आपण पाहू शकतो.
अखंड स्मरणीय थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब आणि धाकलं धनी अखंड स्मरणीय श्री संभाजी महाराज साहेब यांना रयतेने आपल्या मनातल्या गाभा-यात देवाचे स्थान दिले आहे, हे कोण नाकारू शकतो?
महापुरुषांना देवत्व देऊन त्यांना गाभा-यात बसवणे, त्यांची पूजा करणे, आरती करणे याला विचारवंत माणसांचा आक्षेप आहे. या महापुरुषांच्या विचारांचा, मार्गदर्शनाचा विसर पाडून घेऊन त्याच्या विरुद्ध कृती करणे इथपर्यंत हा आक्षेप योग्यच आहे. पण, या ‘देवांच्या’ विचारांवर चालणारी माणसं जर यांना देवत्व बहाल करत असतील, तर त्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणाला कसा प्राप्त होतो, हा प्रश्न आहे.
प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण यांचे देवत्व मान्य करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे समाजाचे कल्याणच झाले आहे. अर्थात, देवत्वाचे स्तोम माजवून त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक प्राप्ती करून घेऊन आपले ऐहिक जीवन सुखमय करणारे लोकसुद्धा आहेत, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल… पण त्याला काही इलाज नाही. आपण केवळ आक्षेप नोंदवू शकतो… तोही तशी सोय असेल तर!
आधी सामान्य माणसे म्हणून दृष्टीस पडलेले महात्मे पुढे मठात, मंदिरांतल्या गाभा-यांत विराजमान झालेच की. त्यांच्या आरत्या, स्तोत्रे, ग्रंथ निर्माण झालेच की. त्यांच्यामागे खूप मोठा समुदाय असून ते अनेक लोकोपयोगी कामे सिद्ध करतात, हे ही खरेच आहे. आणि याला आक्षेप असण्याचे कारण नाही.
गेली कित्येक वर्षे श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळणारी, उपवास करणारी, विशिष्ट अन्न त्यागणारी, पादत्राणे न घालणारी हजारो माणसे आहेत. काही ठिकाणी मंदिरे सुद्धा निर्माण झाली आहेत. ‘जय देव जय देव जय श्री शिवराया’ ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली आरती आहेच. यातून सामान्य लोकांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होत असेल तर याचे स्वागतच करायला पाहिजे. मराठी सैनिक जेंव्हा युद्धात ‘ बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशी गर्जना करत देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करतात त्यामागे ही देवत्वाचीच भूमिका असते.
केवळ देव मानून थांबू नका…. त्यांच्या देवत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा… हे सांगणे वेगळे आणि देवत्व देऊ नका! हे सांगणे वेगळे.
शेवटी, समाजात सामान्य लोक बहुसंख्येने आहेत हे मान्य करून त्यांच्या भावनांना यथायोग्य मान देत देत काही सुधारणा सुचवता आल्या तर जरूर तसे करावे.. पण सरसकट ‘नको’ हा विचार टिकणारा नसल्याने त्याज्य आहे!
मी चार वर्षांपूर्वी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत एक आरती लिहिण्याचा असफल प्रयत्न केला होता. जमेल तसा युट्यूब विडीओ तयार करून प्रसिद्ध केला होता. यात श्री आशुतोष मुंगळे या गायकाने आवाज दिला आहे. ते शब्द संदर्भासाठी इथे देत आहे. यातूनही कुणी योग्य ती प्रेरणा घेऊ शकते!
☆ श्री छत्रपती संभाजी महाराज यांना शब्दवंदना ….आरती! ☆
☆ “राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥”☆ श्री संभाजी बबन गायके☆
जीवनात राम असेतो जीवनात राम असतो, असे संत सांगून गेलेत. एकदा का राम असे नाम असलेला रस रसनेने चाखला की अखिल विश्वातला कोणताही रस रसनेला नको असतो असे जगदगुरू श्री संत तुकोबाराय सांगून गेले!
परमार्थात सगुण भक्ती अतिसुंदर मानली जाते. पाषाणाची मूर्ती भक्तांच्या भावनेमुळे आणि प्रेमाच्या वर्षावाने सजीव साकार होते. आणि या संजीवन अस्तित्वाची अहर्निश सेवा ज्यांना लाभते ते अखंडित भाग्याचे स्वामी म्हणवले जातात.
रामराज्यानंतर भरतभूमी अनेक आक्रमणांची साक्षीदार बनली…आणि भक्ष्यसुद्धा!
उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर मधील जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले एक युवक २० मे १९५५ रोजी दहा वर्षांचे झाले आणि त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवले आणि त्यांना अयोध्येने आकर्षून घेतले. त्याआधी बाल्यावस्थेत हे युवक कित्येकदा अयोध्येत येत असत आणि त्यांना हे स्थान परिचयाचे वाटत असे! अगणित वर्षांपूर्वी याच अयोध्येत महाराज दशरथ यांच्या राजप्रासादात पौरोहित्याची धुरा वाहिलेले ऋषीच पुन्हा अयोध्येत आले असावेत बहुदा. हे युवक हनुमान गढी मंदिराच्या सिद्ध पीठाचे महंत आणि आपल्या वडिलांचे गुरु बाबा अभिराम दास यांचे शिष्य बनले. आणि या कोवळ्या वयात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि त्यांचे मन राम रंगी रंगले. वयाच्या विसाव्या वर्षी हे युवक सत्येंद्र हे नाम धारण करून पुजारी बनले होते. संस्कृत व्याकरण विषयात पारंगत होऊन ते आचार्यपदी विराजमान झाले होते. पुढे त्यांना सत्य धाम गोपाल मंदिराची जबाबदारी सोपवली गेली.
१९७५ मध्ये त्यांना रामकोट येथील त्रिदंडदेव संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. रामजन्मभूमी मुक्ती विषय ऐन भरात असताना सत्येंद्र दास यांनी प्रभू रामचंद्र यांची पूजा सेवा करण्यास आरंभ केला होता.
१९९२च्या आधी काही महिने सत्येंद्रनाथ यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानातील श्रीराम यांचे अधिकृत पुजारी म्हणून सेवा प्राप्त झाली. संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना मानधन घ्यावे लागेल असे सांगितले. महंत सत्येंद्र यांनी प्रभूंचा प्रसाद म्हणून केवळ रुपये शंभर द्यावेत,अशी विनंती केली. २५ मार्च २०२० रोजी प्रभू त्यांच्या मूळ स्थानापासून तात्पुरते दूर गेले…सत्येंद्रदास त्यांच्या सोबत गेले…आणि प्रभूंना घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा मूळस्थानी आले….जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे तू जेथे जातो तेथी मी तुझा सांगाती असे झाले होते…सत्येंद्र यांनी आपल्या ‘दास’पणात खंड पडू दिला नाही…..हा कालावधी जगाच्या भाषेत ३२ वर्षे,११ महिने आणि १ दिवसाचा भरला! आणि एकूण ७९ वर्षे ८ महिने आणि २३ दिवसांच्या जीवनाकालातील उणीपुरी ६० वर्षे ईश्वरसेवेत रमलेल्या या देहात रामचिन्हे प्रकट होतील,यात नवल ते काय? अयोध्येतील सर्वांना च ते प्रिय ठरले होते…हा रामनामाचा आणि रामसेवेचा महिमा.
काल दिनांक १२ फेब्रुवारी,२०२५ रोजी माघ पौर्णिमेचा मोठा उत्सव होता अयोध्येत…याच दिवशी महंत सत्येंद्र दास यांनी जीवनाची सांगता केली. आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरयूच्या जलात समाधिस्त झाले!
अशी रामसेवा घडलेले हे आयुष्य सर्वथा वंदनीय होते. प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या चरणाशी कायम स्थान देतील,यात शंका नाही…कारण प्रभूंच्या चरणी त्यांनी आपले अवघे जीवित व्यतीत केले होते….एवढे पुण्यफल तर प्राप्त होणारच!
भावपूर्ण श्रद्धांजली…आचार्य महंत सत्येंद्र दासजी महाराज! जय श्री राम!
☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.
या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…
‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो, ’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.
‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे, ’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.
मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.
आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.
गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहायमरने खेद व्यक्त केला होता.
आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!
इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.
‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.
याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.
आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.
‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.
‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?
परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.
‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४. ०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५. ०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.
प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.
यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.
‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५. ०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.
एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.
‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.
या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.
या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.
डॉ. राहुल मराठे हे कीटकतज्ज्ञ असून मित्रकिडा बायोसोलुशन्स आणि मित्रकिडा फौंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. गेली ३० वर्षे ते कीटकांचा अभ्यास करत आहेत. निसर्गामध्ये असणाऱ्या कीटकांमधील सुप्त गुणांचा वापर करून आपल्यापुढील अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. ते कीटकांविषयी शास्त्रीय सल्ले देतात, तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक व्याखाने, कीटक माहिती शिबिरे घेतली आहेत आणि या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत. आपल्या निसर्गामध्ये अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या कीटकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कीटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याची माहिती त्यांच्याच शब्दांत इथे देत आहे.
—–
स्फोटके शोधणारी झुरळे –
माझ्या संशोधनात मी झुरळांचा वापर या कामासाठी केला. झुरळांच्या जनुकांमध्ये पुनरावृत्ती करणारे घटक असतात. ती खूप लवकर नवीन गोष्टी शिकतात. त्यांच्याकडे घ्राणेंद्रिये आहेत, जी इतर कीटकांपेक्षा दुप्पट आहेत. त्यांच्याकडे गंधकण शोधणाऱ्या ग्रंथी आहेत, ज्या कडू पदार्थही शोधू शकतात. यावरून स्पष्ट होते की झुरळे अतिशय बुद्धिमान आहेत. या प्रयोगासाठी तीन ते चार झुरळांचे गट तयार केले. प्रत्येक गटाला त्या-त्या स्फोटकाचे प्रशिक्षण देण्यात आले. काही दिवसांतच ही झुरळे त्यांना शिकवलेली स्फोटके शोधू लागली. या झुरळांसाठी एक विशेष उपकरण तयार करण्यात आले. त्यामुळे झुरळांना कुठेही मोकळे सोडण्याची गरज नाही. ती एका जागी बसून आपले काम अचूकपणे पार पाडू शकतात.
दारुगोळ्याचे विघटन –
माझ्या प्रयोगशाळेत मी वॅक्स मॉथ (wax moth) नावाच्या पतंगवर्गीय कीटकांच्या अळ्यांचा वापर केला. त्यांनी अतिशय सहजपणे त्या टणक इंधनातून विशिष्ट घटक खाऊन टाकले आणि ते इंधन निरुपयोगी केले. या अळ्यांपासून प्रेरणा घेऊन मी एक यंत्र विकसित केले. या यंत्राद्वारे टणक प्रोपेलंटचे विघटन केले जाते. आजपर्यंत या यंत्राद्वारे मी सुमारे हजारो किलो प्रोपेलंटचे विघटन केले आहे, ज्यात तीन ब्रह्मोस रॉकेटचाही समावेश आहे. कीटकांच्या वापरामुळे अनेक फायदे होतात – प्रोपेलंट हाताळताना होणारे अपघात टाळता येतात, नैसर्गिक पद्धतीने विघटन होत असल्याने पर्यावरणीय धोका कमी होतो, आणि विघटन जलद होत असल्याने वेळेची व त्यानुसार पैशांचीही बचत होते.
विमान वाचवणारे मित्रकीटक –
विमानांना पक्ष्यांमुळे होणारे अपघात ही एक गंभीर समस्या आहे. पक्षी विमानतळावरील गवतात आढळणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी येतात. पक्षी अनपेक्षितपणे विमानासमोर आल्यास होणारे परिणाम भीषण असू शकतात. पक्षी विमानांना धडकू नयेत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. या उपायांवर लाखो रुपये खर्च होतात. तरीही पक्षी धडकण्याचे प्रमाण कमी होत नाही. हे सर्व यांत्रिक उपाय असल्याने पक्ष्यांना त्याची कालांतराने सवय होते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मी ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाचा वापर केला. एक मिलिमीटरपेक्षा लहान असलेल्या या माशीची मादी इतर कीटकांच्या अंड्यांमध्ये स्वतःची अंडी घालते. यामुळे अळीवर्गीय कीटकांची संख्या कमी होते आणि खाद्याअभावी पक्ष्यांचे येणेही कमी होते. मी ही पद्धत अशा प्रकारे विकसित केली की स्थानिक परिसंस्था अजिबात विस्कळीत होत नाही आणि विमानेही सुरक्षित राहतात. हा यशस्वी प्रयोग आता अनेक विमानतळांवर नियमितपणे वापरला जातो. मी हे मित्रकीटक भारतीय वायुदल, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि नागरी विमानतळांवर नियमितपणे पाठवतो आणि पक्षी नियंत्रणात आणतो.
प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या –
जगभरात प्लास्टिकचे व्यवस्थापन आणि विघटन या समस्येवर संशोधन सुरू आहे. एक साधी कॅरी बॅग नैसर्गिकरित्या विघटित होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, ही चिंताजनक बाब आहे. प्लास्टिकचे विविध प्रकार असतात, त्यापैकी सर्वांत मोठी समस्या म्हणजे २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक – उदाहरणार्थ आपण दैनंदिन वापरात आणणाऱ्या कॅरी बॅग्ज. मी विविध प्रजातींच्या अळ्यांचा अभ्यास केला आणि शोधून काढले की वॅक्स मॉथ या पतंगाच्या अळ्या प्लास्टिक खाऊन पचवू शकतात. या अळ्या विशेषतः कमी जाडीच्या प्लास्टिकचे विघटन करू शकतात आणि त्या इतर पदार्थही खाऊ शकतात. प्लास्टिकव्यतिरिक्त थर्माकोल, लॉकडाउन काळातील पीपीई किट्स, फोम शीट अशा अनेक पदार्थांचे विघटन या कीटकांकडून होऊ शकते.
अन्नाचे जलद विघटन करणारे कीटक –
पुण्यातील बॉम्बे सॅपर्स या सैन्य तुकडीमध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ब्लॅक सोल्जर फ्लाय (मराठीत ‘काळा शिपाई’) या माशीच्या अळ्यांच्या मदतीने दररोज २०० किलो ओल्या कचऱ्याचे विघटन केले जाते. कचरा विघटन झाल्यानंतर या अळ्यांचा वापर मासे आणि कुक्कुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून केला जातो. अशा प्रकारे एक चक्रीय अर्थव्यवस्था (circular economy) तिथे विकसित झाली आहे. याच ब्लॅक सोल्जर फ्लायचा वापर करून मी भारतीय सैन्यासाठी सियाचीनसारख्या दुर्गम प्रदेशांमध्येही प्रयोग करत आहे. तिथे या माशीच्या साहाय्याने अन्नाचे विघटन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. आता विविध ठिकाणी हे युनिट स्थापित करण्याचे काम सुरू आहे.
सियाचीनमधले किडोशौचालय–
सियाचीनसारख्या अतिशय थंड प्रदेशात, जिथे आपले सैन्य तैनात आहे, तेथे मलविघटन ही एक मोठी समस्या आहे. अत्यंत कमी तापमानात हे विघटन कसे शक्य होईल याचा विचार करून मी बर्फात जगणाऱ्या कीटकांचा अभ्यास केला आणि त्यातून एक नवीन किडोशौचालय विकसित केले.
कीटकांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले हे शौचालय उणे ४० अंश सेल्सिअस तापमानातही कार्यक्षम राहू शकते. कोणतीही महागडी साधने न वापरता, कमी वेळात उभारल्या जाणा-या या शौचालयांना विजेची आवश्यकता नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बर्फ जमत नाही. मला सांगताना अतिशय आनंद होतो की सध्या सियाचीन बेस कॅम्पमध्ये आपले सैनिक हे शौचालय वापरत आहेत आणि अल्प कालावधीत मलविघटन होत आहे. आता आणखी एक किडोशौचालय आपल्या सैन्याच्या अशा एका चौकीवर बसवले जाणार आहे, जिथे तापमान नेहमीच शून्याखाली असते. पहिल्यांदाच असा अभिनव प्रयोग सैन्यदलात होत आहे.
—–
काळाप्रमाणे गरजा बदलत जातात. या बदलत्या गरजा ओळखून नव्या प्रकारच्या क्षेत्रात संशोधन करुन समाजपयोगी कार्य करणाऱ्या या ‘ चौकटीबाहेरच्या माणसा ‘ चं मनापासून कौतुक!
लेखक : श्री भूषण कटककर
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘सुखांत…‘ ☆ माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले☆
(अंत्यसंस्कार केंद्र)
☆
जरा विचार करा, कुठे चालला आहे आपला समाज?
भारतातील मानवी मूल्यांना लाजवेल असे एक विशेष प्रदर्शन…
ही कंपनी अंतिम संस्कार करणार आहे. कंपनीचे सदस्यत्व शुल्क रु. 37500/- आहे. ज्यात सावकार, पुजारी, न्हावी, खांदा देणारा, तुमच्या सोबत चालणारा, रामाचे नाव घेऊन सत्य बोलणारा, हे सर्व संगतीचेच असतील. शिवाय, कंपनी स्वतःच अस्थिकलश विसर्जन करेल.
हा देशाचा एक नवीन स्टार्ट अप म्हणून देखील गणला जाऊ शकतो, ज्याने आधीच 50 लाख रुपये नफा कमावला आहे. परंतु भविष्यात त्याची उलाढाल 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण कंपनीला माहीत आहे की…
… भारतात संबंध टिकवायला आता कोणालाच वेळ नाही… ना त्याच्या मुलाशी, ना त्याच्या भावासोबत, ना इतर नातेवाईकांशी…
☆
माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ MMM… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆
कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढच माहीत होतं!
पुढे आयुष्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिसस्पर्श झाला..
आणि MMM म्हणजे “मदन मोहन मालवीय” हे मला तेव्हा कळले…
गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…
बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधी पर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर, मनी मेकिंग मशीनचा अर्थ कळतो!
सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी, बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटीचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…
याच देणगीसाठी हैदराबादच्या निजामाला भेटले…
विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता…
पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते.
समोर बसलेल्या पंडितजींकडे आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता…
नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजीना वहाण दाखवत होता.
पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली…
नबाबाने दुसरा पाय पुढे केला.. पंडितजीनी ती ही मोजडी काढून घेतली आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो म्हणून बाहेर पडले…
आपण पंडितजीना जोडे दिले या आनंदात, नवाब खुशीत गाजरं खात होता…
आणि तो पर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली.
पंडित जी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत…
नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…
आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी… नवाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले…
लिलावाची बोली सुरू झाली…
नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्या वर आपली बोली लावू लागला…
पंडितजीचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोली च्या वर प्रत्येक वेळी बोली लावत होते…
अर्थात तशी योजना खुद्द पंडितजीनीच केली होती…
पंडितजीची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली…
बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी…
पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला..
बोली थांबली…
लिलाव संपला…
आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नवाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये…
जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होता.
“हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा…
☆ “है प्रीत जहाँकी रीत सदा !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
त्याला फक्त एकच भाषा येत होती. आणि कामसुद्धा एकच माहीत होते…. जो पेशा स्वीकारला आहे त्या पेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा जशाच्या तशा पाळणे. त्याने त्याच्या देशासाठी सीमा भागात रस्ते बांधणीसाठी आवश्यक सर्वेक्षण करण्याचे काम इमानेइतबारे केले. त्याच्या देशाचे आणि शेजारच्या देशाचे युद्ध झाले आणि संपले सुद्धा. तो काही बंदूक चालवणारा सैनिक नव्हता. त्याचे सर्वेक्षणाचे काम मात्र सुरूच राहिले.
आपल्या तंबूच्या बाहेर असाच फेरफटका मारायला तो बाहेर पडला आणि रस्ता चुकला आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत पोहोचला. अन्नपाण्यावाचून बर्फाळ डोंगरात वाट शोधून थकलेला तो रेडक्रॉसच्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या लोकांना आसाम मध्ये दिसला आणि त्यांनी त्याला शेजारच्या देशाच्या सैन्याच्या हवाली केले… अर्थात हा देश म्हणजे आपला भारत ! ‘जीते हैं किसीने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है… ‘ अशी धारणा असलेला देश.
देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून भारतीय यंत्रणेने या चिनी सैनिकावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्याच्यावर रीतसर खटला चालला आणि त्याची रवानगी सात वर्षांच्या तुरुंगवासासाठी करण्यात आली! यानिमित्त तो देशातील काही तुरुंग फिरला. शिक्षा संपल्यानंतर मात्र याला कुठे पाठवायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला. का कुणास ठाऊक मात्र याला चीनला पाठवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. चीनकडूनही तशी काही चौकशी करण्यात आली नसावी, बहुदा.
भारतीय पोलिसांनी याला मध्यप्रदेशातील तिरोडी या दुर्गम गावात सोडून दिले. भाषेचा अडसर अजूनही होताच. तो फक्त आपले नाव सांगू शके.. वांग की! त्याच्या नावाचा एक अर्थ होता… वांग म्हणजे राजा आणि की म्हणजे एकमेवाद्वितीय! आणि योगायोगाचा भाग म्हणजे तिरोडीच्या गावकऱ्यांनी त्याचे नामकरण केले राज बहादूर. ते त्याला नेपाळी किंवा पूर्वोत्तर राज्यातील माणूस समजले असावेत!
या चिनी राजाने मग तिरोडी जवळच्याच पीठ गिरणीत दळणाचे काम केले. काही पैसे जमा झाल्यावर गावातच दूध विक्रीचे एक छोटे दुकान सुरू केले. एकूणच दिसणे, स्वभाव आणि बोलणे वेगळे असल्याने गावकरी त्याच्याशी तसे प्रेमाने वागत असत.
हळूहळू हा आपला (नसलेला) भाई हिंदीचा भाई झाला… त्याला मोडके तोडके हिंदी समजू लागले. त्याला चीनमधील त्याच्या घराचा पत्ता माहित होता.. त्याने कित्येक पत्रे पाठवलीसुद्धा. पण त्याच्या पत्राचे पहिले उत्तर मिळायला तीस वर्षे लागली.
मध्ये बराच कालावधी गेल्यामुळे आणि वांगकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने न घर का न घाट का अशी त्याची अवस्था झाली होती. त्याला आपले भाऊ आणि आईची खूप आठवण येत असे… पण त्याच्यापुढे पश्चातापाशिवाय काहीही नव्हते. वांगच्या आधी दोन चिनी सैनिक भारतातल्या मनोरुग्णालयात सुमारे पस्तीस वर्षे होते. त्यांना कालांतराने म्हणजे २००३ मध्ये चीनच्या हवाली करण्यात आले!
सर्वांशी अदबीने, प्रामाणिकपणे वागत असल्याने वांगबद्दल कुणाची काही तक्रार नव्हती. त्याचे वागणेही संशयास्पद नव्हते. त्याचा गावातले लोक सोडून इतर कुणाशी संबंध नव्हता. स्थानिक पोलिस त्याची अधून मधून खबर घेत असत आणि त्याला माराहाण सुद्धा होई.
कालांतराने वांग याने त्या गावातल्याच सुशीला नावाच्या अतिशय गरीब मजूर मुलीशी विवाह केला.. कित्येक वर्षे तो अत्यंत गरीबीत राहिला. त्यात त्याने दोन मुली आणि एका मुलाला जन्म दिला.
वांगची कथा तशी कित्येकवेळा समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली होती पण त्याकडे त्यावेळी फारसे कुणी लक्ष दिले नाही. पण बीबीसी वर त्याची खबर आली आणि ती चीन पर्यंत पोहोचली. चीन सरकार आणि भारत सरकारमध्ये वांगबाबत बोलणे झाले आणि चीनने २०१३ मध्ये वांग, त्याचा मुलगा विष्णू, आणि सूनबाई नेहा आणि खनक नावाची नात यांना चीनचा पासपोर्ट दिला… पण वांग २०१७ मध्ये चीनमध्ये जाऊ शकला. अर्थातच त्याचे तेथे मोठे स्वागत झाले. याला कारणीभूत झाला तो सोशल मिडीया. त्याची पत्नी मात्र त्याच्या सोबत गेली नाही. मुलगा, सून आणि नात यांच्यासाठी चीनने प्रवासी विजा दिला होता. भारत सरकारने मात्र वांग याची इच्छा असल्यास त्याला भारतात परतण्याची परवानगी देऊ केली! पण तीनच महिन्यांत वांग त्याच्या आजारी पत्नीला भेटायला भारतात परतला. ऑक्टोबर २०१७ मध्ये सुशीला मृत्यू पावल्या. मग वांग पुन्हा चीनला परतला. आता त्याच्यापुढे दोन कुटुंबे होती.. चीनमध्ये त्याचे भाऊबंद आणि भारतात त्याचा मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे !
वांगने चिनी सैन्याकडे त्याच्या पेन्शनची मागणी केली. पण त्यांच्या कागदपत्रात वांग की ‘मयत’ दिसतो. आणि त्याच्याकडे आणखी कोणतीही कागदपत्रे नाहीत. मार्च २०२४ मध्ये वांग भारतात तीन महिन्याच्या प्रवासी वीजावर आला होता. त्यानंतर त्याची खबर किमान मिडीयात तरी आलेली नाही… बहुदा तो चीनला परतला असावा!
चिनी अर्थात चायनीज वस्तू त्यांच्या दर्जाबाबत भारतात तशा बदनाम आहेत! ‘चलेगा तो चांद तक नहीं तो शाम तक’ असेही गंमतीने म्हटले जाते. परंतू त्यात तथ्य असण्याची शक्यता खूप जास्त दिसते! असो. पण वांग हा चायनीज मात्र भारतात चक्क पन्नास वर्षे टिकला! इथल्या प्रेमळ माणसांनी या शत्रूला सांभाळून घेतले… हीच तर भारताची खासियत आहे. चीन आणि पाकिस्तानी लोकांबाबत मात्र असे म्हणता येत नही… आपले कितीतरी सैनिक त्यांच्या कैदेत खितपत पडले होते… आता तर ते या जगात असण्याची शक्यता अगदीच धूसर आहे… कारण भारत-चीन युद्धाला साठपेक्षा अधिक वर्षे उलटून गेलेली आहेत.
युद्धामुळे खूप नुकसान होते असे वयाची ऐंशीपेक्षा जास्त वर्षे उलटलेले वांग की म्हणत असतात.. त्यांनी कुटुंबाचा विरह खूप जास्त वर्षे सहन केला, त्यांची आणि आईची भेट शेवटपर्यंत झाली नाही !
पण चिनी कम आणि भारतीय जास्त असलेले वांग की उर्फ राज बहादूर वांग भारताबद्दल कृतज्ञ आहेत ! ‘ जीते हो किसीने देश तो क्या.. हमने तो दिलों को जीता है! ‘ असे आपण अभिमानाने म्हणू शकतो
☆ ‘सेवेची गोष्ट’ – लेखक : अज्ञात – माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन☆
आमचे वडिलोपार्जित घर भोपाळमध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडिलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.
समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा टि. सी. काही बोलणार नाही.
डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, “मला बसायला जागा द्या” म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, “काही हरकत नाही आपण येथे बसू शकता. ”
मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला, “माझ नाव आलोक आणि मी इस्रो (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए. सी. डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”
ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”
एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”
माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.
खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, ‘जगमोहन राव ‘ हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.
काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.
रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 – 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे. ”
पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”
मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले.
काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.
नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”
त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”
ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो. कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”
त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.
त्यावर छापले होते – डाॅ. जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.
आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ – मी ए. सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!
एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि. सी. च्या मदतीने खाली उतरले.
रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए. सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”
ते हसून म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?”
नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.
आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.
म्हणूनच तर, “जसे आम्ही बदलू, तसे जगही आपोआपच बदलेल.
लेखक : अज्ञात
माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈