☆ “तंत्राधिष्ठित शिवनीती” – लेखक – श्री पंकज कणसे ☆ श्री जगदीश काबरे ☆
छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहासात उमटलेला सुवर्णठसा ठरतो. या सोनेरी इतिहासाचे विश्लेषण करताना असे लक्षात येईल की तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन हा महाराजांच्या राजकारणाचा कायमच पाया राहिला. भौतिक स्वरूपात प्रकट होणारे किल्ले उभारणी, आरमार निर्मितीसारखे तंत्रज्ञानात्मक आविष्कार हे केवळ हिमनगाच्या दृश्य स्वरूपासारखे आहेत, तर त्यामागील तांत्रिक विचार आणि तात्त्विक चौकट डोळ्याला न दिसणाऱ्या हिमनगासारखी गूढ आणि अदृश्य आहे जिने हा दृश्य डोलारा सांभाळला आहे. अस्तित्वात असणारी धार्मिक-सामाजिक परिस्थिती, भूगोलाचे प्रारूप, प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज आणि उपलब्ध मनुष्यबळाचा कुशलतेने वापर या सगळ्यांचा मेळ घालून उपलब्ध स्राोतांचा कल्पक वापर करण्यासाठी भावनांशी सलगी सोडून तांत्रिक दृष्टिकोनाचा अंगीकार महाराजांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी केला.
छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या युद्धतंत्र, किल्लेबांधणी आणि राज्यविस्तार या सर्वांचे मूळ आपणास भूगोलाच्या वैज्ञानिक विश्लेषणामध्ये दिसून येईल. जेव्हा समाज धार्मिक अंधश्रद्धांमुळे समुद्रगमन निषिद्ध मानत होता तेव्हा मुघल आणि इतर साम्राज्यांनी समकालीन समुद्रमार्गांना दुय्यम मानले होते. मात्र महाराजांनी बारकाईने विचार करून नाविक ताकदीचे महत्त्व ओळखले. भारतीय सत्ताधारी १०० वर्षांनंतरही आपापसांत भांडत असताना युरोपियन लोकांचे भारतात येण्याचे उद्दिष्ट केवळ व्यापार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी स्वत:चे आरमार केवळ उभेच केले नाही तर समुद्री मार्गांवर वचक बसविला. हे करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. देशी कारागिरांकडे जहाजबांधणीचे कौशल्य उपलब्ध नव्हते तेव्हा त्यांनी स्वत:च्या कमतरता ओळखून युरोपिअन लोकांना चाकरीस ठेवले. पोर्तुगीज आणि ब्रिटिश एक होऊन आव्हान देऊ लागले तेव्हा महाराजांनी फ्रेंचांकडून जहाजावरील प्रगत उपकरणे आणि शस्त्रास्त्रे विकत घेऊन आपली तांत्रिक बाजू वरचढ ठेवली.
शिवाजी महाराजांची तांत्रिक दूरदृष्टी त्यांच्या काळातील भू-राजनीतिक परिस्थितीवर मोठा प्रभाव टाकणारी होती, ज्यात तंत्रज्ञानाचा धोरणात्मक उपयोग दिसून येतो. दुर्गांची उभारणी करताना त्यांनी प्रत्येक किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण केली. त्यामध्ये सिंधुदुर्गचा अनियमित आकार, रायगडाची भव्यता, राजगडाची अभेद्याता, प्रतापगडाची दुर्गमता या सर्वांचा समावेश होईल. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची मुबलक सोय करून कमी स्राोतांमध्ये किल्ल्यांची संघर्षशक्ती वाढवली. आलिशान सजावट, कलादालने वगैरे टाळून प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत असलेल्या कमतरतेची कायम जाणीव ठेवली. बिनीचे मार्ग, सागरी टापू, टेहळणीच्या जागा या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी किल्ल्यांची उभारणी अथवा डागडुजी केली. सिंधुदुर्गच्या उभारणीमध्ये समुद्रामध्ये पाण्याखाली अंदाजे १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद भिंत बांधल्याचे दाखले आहेत. त्यामुळे किल्ल्याकडे येणारी शत्रूची गलबते फुटून निकामी होत असत.
गनिमी कावा ही शिवाजी महाराजांनी विकसित केलेली एक युद्धनीती होती, ज्यात स्थानिक भूभागाचे ज्ञान आणि मोजक्या घोडदळाच्या जलद हालचालींचा वापर यातून शत्रूच्या रसद पुरवठ्याचे मार्ग कापून टाकले जायचे. गरजेनुसार कल्पकता अवलंबणे हेदेखील महाराजांचे एक वैशिष्ट्य! वाघनखांचा वापर ही त्याच कुशाग्र बुद्धिमतेची चुणूक. पुढे जाऊन त्यांनी ठिकठिकाणी दारूगोळ्याचे कारखाने काढण्यासाठी पुढाकार घेऊन तोफशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला.
शिवराय राज्यकर्ते म्हणून एकमेवाद्वितीय असले तरी त्यांचे वारसदार म्हणून आपण कुठे आहोत? भावना आणि अस्मितांच्या कोंडाळ्यात अडकून महाराजांचे दैवीकरण करून आपण चिकित्सेची दारे बंद करायला सुरुवात केली. वसंत कानेटकरांच्या शब्दात, महाराजांनी इथल्या सामान्य गवताच्या पात्याचे भाल्यात रूपांतर केले. आपण आपल्याच हातांनी त्या पात्याचे निर्माल्य करून घेण्याचे पातक करीत आहोत. ते भाले होण्याची प्रेरणा महाराजांनी युद्धशास्त्रपारंगता, वैज्ञानिक-तांत्रिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि करारी व्यवहारवाद यांच्या मिलाफातून प्रसवलेली संजीवनी होती. ती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी पुन्हा त्याच विज्ञान-तंत्रज्ञान केंद्रित वाटा धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.
*
लेखक : श्री पंकज कणसे
माहिती संग्राहक व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्टोईसीजम — प्रतिक्रिया नाही प्रतिसाद ! ☆ प्रा. भरत खैरकर☆
जरा विचार करा की आधी किती वेळा आणि कधीकधी तुम्ही तुमचा आत्मविश्वास हरवला होता. आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेले होते. आपण स्वतःच आपल्या कृतीचे कारण असतो. जी काही आपली प्रतिक्रिया वा प्रतिसाद असतो. तो आपल्यातील मूल्य आणि आपली जडणघडण, विचारसरणी यावर अवलंबून असतो. ह्यातूनच ग्रीक तत्वज्ञान ‘स्टोईसीजम’ आले आहे जे आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण देते.
आपल्या मेंदूला, मनाला प्रशिक्षित करण्याची एक कला आहे. यामध्ये फक्त आपण स्वतःला नियंत्रित ठेवणे, रिऍक्ट न होणे, स्वतःला रागात झोकून न देणे, शांत ठेवणे. स्वतःला सतत वर्तमानात ठेवणे.. जमिनीवर ठेवणे. आजूबाजूच्या गोष्टीचा परिणाम न होऊ देणे. जीवनाकडे प्रायोगिक पद्धतीने बघणे हे तत्वज्ञान सांगतं. आपणाशी घडणाऱ्या निगडित असणाऱ्या कितीतरी घटनांबाबत आपलं नियंत्रण नसतं. त्या घटनेला.. प्रसंगाला आपण कसे सामोरे जातो? हे मात्र आपल्या हातात असतं. हा मूळ गाभा ह्या तत्त्वज्ञानाचा आहे.
आपल्या आवाक्यात आणि नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर.. परिस्थितीवर प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे ह्या कलेला ग्रीक आणि रोमन लोकांनी एक जीवन प्रणाली म्हणून अंगीकारली स्वीकारली तीच कालांतराने ‘स्टोईसीजम’ नावाने तत्त्वज्ञान रुपात आली. ह्या तत्त्वज्ञानाचा नेल्सन मंडेला, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस
जेफरसन, इत्यादींनी आपल्या आयुष्यात वापर केल्याचं आपण बघतो. जीवनामध्ये मूल्याची जपणूक करणे.
ह्याच गोष्टीला महत्त्व आहे. चांगले जीवन जगण्यासाठी भौतिकवस्तूंची गरज.. आवश्यकता नाही. असे म्हणणाऱ्यापैकी हा वर्ग आहे! जोवर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपैकी नेमक्या वस्तू स्वीकारत नाही. तोवर बिनकामाच्या बऱ्याचशा वस्तू उपलब्ध आहे म्हणून आपण त्या वापरत असतो. बाळगत असतो हे सत्य आहे.
जन्मापासून सारखं आपण स्वतःला व मुलांना एका ‘शर्यती’त उतरवले आहे. आपला समाजही ह्याच गोष्टीला म्हणजे जगण्याला शर्यत म्हणूनच खतपाणी घालत आहे. त्यामुळे आपण आनंदी असे कधीच नसतो सतत
‘स्पर्धामोड’मध्ये असतो. पैसा, प्रसिद्धी, फीडबॅक, लाईक्स, आदींच्या मागे लागून न संपणारी भूक आपण जागृत केली आहे आणि असमाधानी बनलो आहे. आपण मेंढरं बनलो आहे कळपात चालणारे! कोणीतरी आपल्याला लीड करतो आहे आणि आपण त्याला फॉलो करतोय.. शर्यतीत कितीतरी अंतर कापल्यानंतर मागे वळून बघितल्यावर जाणवतं की, ‘धावलं नसतं तरी चाललं असतं!’ म्हणून आपण जीवनाकडे कसे पाहतो. त्यावरच आनंद अवलंबून आहे.
आपण कुठले मूल्य, भावभावना जपतो हे अधिक महत्त्वाचा आहे. आजूबाजूच सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवल्यावर समस्या राहत नाही. मूल्य जपणे हाच आनंदाचा ठेवा आहे. असं म्हणणारी स्टोईसीजम ही जीवन पद्धती आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी मनुष्याने नैसर्गिक नियमाचे पालन केले पाहिजे. प्रत्येक गोष्टी मागे मुळात निसर्गच आहे. असे ही विचारप्रणाली सांगते.
जगाला आहे तसेच स्विकारा. त्यासाठी कठीणात कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी क्षमता वाढवा. स्वतःमध्ये तार्कीक, माहितीपूर्ण आणि शांतीयुक्त अशा स्वभाव गुणांची वाढ करा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही.. स्वतःची मजबुती वाढवीत राहणे. जरी एखाद्याने चुकीचे केले, तरीही निर्णय घेताना न्याय बुद्धीने समसमान निर्णय घेणे. स्वतःमधील धैर्य वाढविणे. ते केवळ विपरीत परिस्थितीतच न दाखवता जीवनामध्ये रोजच्या रोज बाहेर वाढून ठेवलेल्या.. आलेल्या समस्यांना खुल्या आणि स्वतंत्र विचाराने सामोरे जाणे. स्टोईसीजमचा सेनेका नावाचा तत्वज्ञ सांगतो की, कधी कधी केवळ जिवंत राहणे.. टिकून राहणे सुद्धा धैर्यच असते!
स्टोईसीजम हे स्वतःभोवती किंवा स्वतःलाच महत्त्व देणारे तत्वज्ञान नसून इतरांचाही मानवतेने स्वीकार करायला सांगते. जो व्यक्ती स्वतःमध्ये नियंत्रण आणि मूल्याची जपणूक करणारा असतो तोच इतरांमध्ये पॉझिटिव्ह बद्दल आणू शकतो. मार्कोस इलेरिअस ह्या राजाने १९ वर्षे राज्य केले. खूप लढाया केल्या. त्यामध्ये त्याची मुले मारल्या गेली. सर्वच्या सर्व नाहीसं झालं.. त्यानंतर त्याने लिहिलेलं तत्वज्ञान म्हणजे स्टोईसीजम होय.
हेच तत्त्वज्ञान वापरून नेल्सन मंडेलांनी २७ वर्षे जेलमध्ये आपण कसे टिकून राहिलो आणि वर्णभेदाचा लढा कसा दिला हे सांगितले आहे.. भूतकाळात आपण बदल करू शकत नाही पण भविष्याकडे आपण बघू शकतो. हे सांगून त्यांनी आफ्रिकन जनतेला स्टोईसीजम चा मार्ग अवलंबाचा सल्ला दिला आहे. आपण आपल्या जीवनातील घटनांमधून दुःखी होत नाही तर आपण त्या घटनेला दिलेल्या जजमेंटल प्रतिसादामुळे दुःखी होतो.
कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर थांबा, पहा, आणि काय करायचं ते निवडा! ती निवड प्रतिक्रियात्मक नसावी ती प्रतिसादात्मक असावी. हे स्टोईसीजम शिकवते. त्यासाठी आपलं अंतर्मन, आत्मशांती ढळू देऊ नका. आतून तुम्ही शांत रहा. आपली विचारसरणी, मूल्य, आत्मसन्मान, कशात आहे? याचा विचार करून प्रतिसाद द्या. त्यासाठी कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा पॉज घ्या म्हणजे विचार करा.. क्षणभर खोल श्वास घ्या, क्षणिक मेडिटेशन करा आणि त्यानंतरच रिस्पॉन्स द्या प्रतिसाद द्या.. हे करताना स्वतःला तुमच्यासाठी कुठले मूल्य महत्त्वाचे आहेत. हे विचारा म्हणजे म्हणजे तुमचा प्रतिसाद सकारात्मक असेल. कधी कधी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही समस्याकडे बघायला लागा म्हणजे त्या समस्येला संकटाला समस्या न समजता संधी समजायला लागा. त्यामुळे आपण आपली ऊर्जा व्यवस्थित वापरू शकतो.. स्टोईसीजम त्यासाठी स्वतःचे परीक्षण, रोजचा अभ्यास, मूल्यजपणूक, स्वयंसुधारणा, इत्यादी गोष्टींना महत्त्व देते. चला तर मग आपणही कुठल्याही समस्येला सरळ सरळ प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देऊया.. आणि आयुष्यात मूल्यांची जपणूक करून सुखी, समृद्ध नि शांत जीवन जगूया !
☆ “८ मार्च : स्त्री संघर्षाचा इतिहास !” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भारतात शेतीप्रधान व्यवस्थेमुळे शेकडो वर्षे स्त्रिया शेतात काम करत होत्या. पण ते काम घरचेच काम असल्यामुळे वेठबिगारीसारखे २४ तास चालणारे होते. तसेच अजूनही घरकाम करणाऱ्या गृहिणी असोत की कामकरी स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण होतेच आहे. त्यातही एक सूक्ष्म फरक आहेच. गृहिणीला धर्म आणि सामाजिक व्यवस्थेतून हे काम म्हणजे तिच्यावरती असलेली सांस्कृतिक जबाबदारी आहे, असे तिच्या मनात ठसवण्यात आले आहे आणि कष्टकरी स्त्रियांच्या बाबतीत धार्मिक आणि जातीय उतरंड त्यांचे शोषण करण्यास कारणीभूत ठरत आहे. आणखी एक व्यवहारिक फरक आहे… तो म्हणजे, गृहिणीला तिच्या कामाचा मोबदला मिळत नाही. पण नवऱ्याच्या पंखाखाली २४ तास सुरक्षितता मिळते. तर कष्टकरी, कामकरी महिलेला मात्र तिचे शोषण होत असले तरी तिच्या कामाचा कमी-जास्त मोबदला मिळतो. पण दोन्ही प्रकारच्या स्त्रियांवर बऱ्याच ठिकाणी अजूनही काळ बदलला तरी पुरुषांची अरेरावी चाललेली असते.
१९व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांतीमुळे स्त्रिया कामगार म्हणून मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी घराच्या बाहेर पडू लागल्या होत्या. पण त्या कामाच्या वेळेला धरबंध नव्हता. काम करण्याच्या ठिकाणी प्रचंड गैरसोयी होत्या. कामाचे तास नक्की नव्हते, वेतन अत्यंत कमी होते. त्या विरोधात त्यांनी हळूहळू आवाज उठवायला सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी स्त्रिया एकत्र असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे एकजुटीने संघटित उठाव करणे त्यामुळे शक्य झाले होते.
या उठावाची पहिली ठिणगी पडली ती १८२० मध्ये इंग्लंड-अमेरिकेतील कापड उद्योगात. येथील कामकरी स्त्रियांनी ‘द वुमन्स ट्रेड युनियन’ लीगची स्थापना केली आणि त्या युनियन तर्फे त्यांनी आठ तासाचा कामाचा दिवस, पाळणाघर, कामगारांसाठी घर, प्रजनानावरील स्त्रियांच्या नियंत्रणाचा हक्क, तसेच मतदानाचा हक्क अशा विधायक मागण्या केल्या होत्या. अर्थात सुरुवातीला पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे या सगळ्यांना केराची टोपली दाखवली गेली, हे वेगळे सांगायला नकोच. पण स्त्रियांना आपण एकजुटीने आपल्या मागण्या रेटू शकू याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.
त्यानंतर ८ मार्च १८५७ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कापड कारखान्यातील स्त्री कामगारांनी कामाच्या तासांमध्ये कपात, वेतनवाढ आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी आंदोलन केलं. पण पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकलं. तरी स्त्रियांचा संघर्ष सुरूच होता.
त्यामुळे पुढच्या काळात ८ मार्च हा दिवस स्त्रियांच्या एकजुटीमुळे विशेषत्वाने गाजू लागला. कसा ते आपण पाहूया…
१) ८ मार्च १९०८ ला न्यूयॉर्क येथील रुदगर्स चौकात हजारो कामगार स्त्रिया एकत्र जमल्या आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आंदोलन केले.
२) ८ मार्च १९१० मध्ये जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी महिलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर हा दिवस पाळावा असा प्रस्ताव दिला.
३)८ मार्च १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला महिला दिन साजरा झाला.
४) ८ मार्च १९१७ रोजी रशियात स्त्री कामगारांनी “भाकरी आणि शांतता” या साठी संप पुकारला.
५) ८ मार्च १९३६ या दिवशी हजारो स्पॅनिश स्त्रियांनी फ्रॅंकोच्या हुकूमशाही विरोधात निदर्शने केली.
६) ८ मार्च १९४३ रोजी इटालीतील हजारो स्त्रिया मुसोलिनीच्या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर आल्या. त्याच वेळेस भारतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात पहिला महिला दिन साजरा झाला.
७) ८ मार्च १९७२ रोजी मथुरा नावाच्या आदिवासी मुलीवर पोलीस ठाण्यात झालेल्या बलात्काराविरुद्ध देशभर संतप्त मोर्चे निघाले.
८) ८ मार्च १९७४ ला अमेरिकेने व्हिएतनामवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध व्हिएतनामी स्त्रियांनी बुलंद आवाज उठवला.
९) ८ मार्च १९७५ ला संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.
१०) ८ मार्च १९७७ रोजी स्त्रियांना ‘समानतेचा अधिकार मिळावा’ असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाने पारीत केला.
११) ८ मार्च १९८० मध्ये कॅनडा आणि युरोप मधील स्त्रियांनी सुरक्षित गर्भपातासाठी कायदेशीर हक्क मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला. तर भारतात न्याय यंत्रणेला जाब विचारण्यासाठी देशभर मोर्चाचे आयोजन केले गेले.
१२) ८ मार्च १९८१ ला इराणच्या फॅसिस्ट आणि मुलतत्ववादी राजवटीविरोधात तेहरान शहरात सुमारे पन्नास हजार स्त्रियांनी एकत्र येऊन आवाज उठवला.
१३) ८ मार्च १९८३ पासून ‘स्त्रीमुक्ती आंदोलन समिती’तर्फे दरवर्षी ८ मार्चच्या दिवशी त्या त्या वर्षाच्या मागण्या निश्चित करण्याचा कार्यक्रम ठरवले जावू लागले.
१४) ८ मार्च १९९६ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी त्या दिवसाची विशिष्ट संकल्पना राबवायला सुरुवात केली.
१५) ८ मार्च २०२५ साठी सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी ‘हक्क, समानता आणि सक्षमीकरण’ अशी संकल्पना योजली आहे.
थोडक्यात काय तर ८ मार्च दिवस स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक हक्कांसाठी लढा देण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी समान वेतन, कामाचे चांगले वातावरण, मतदानाचा अधिकार, सन्मानाचे आयुष्य यासाठी स्त्रियांचा हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. म्हणून स्त्रियांसाठी हा दिवस फक्त आनंदाचाच नव्हे, तर अजूनही सुरू असलेल्या लढ्यांची आठवण करून देणारा आहे. कारण अजूनही स्त्रियांना अनेक ठिकाणी पुरुषाच्या तुलनेने कमी वेतन, विषमता, अत्याचार, भेदभाव, शिक्षणाचा अभाव, राजकीय प्रतिनिधित्व कमी असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अर्थात शिक्षणामुळे काही पुरुषांच्या वागणुकीत हळूहळू बदल होतो आहे. त्यामुळे काही घरांमध्ये ‘ही पुरुषी कामे, ही बायकी कामे’, असा भेदभाव नष्ट होतो आहे. तरीही समाजाला स्त्री-पुरुष समानता गाठणे अजून बराच दूरचा पल्ला आहे. तोपर्यंत ८ मार्च म्हणजे स्त्रियांसाठी “लढा, हक्क आणि समानता” या मागण्यांचा पाठपुरावा करणारा दिवस राहील. म्हणून यावर्षी आपण खालील घोषवाक्यांचा उद्घोष करून जागतिक महिला दिन साजरा करूया…
१) स्त्री शक्ती जागी झाली, बदलाची मशाल पेटली!
२) समान हक्कांची लढाई, स्त्रीमध्ये निर्माण होई धीटाई!
३) जग बदलायचंय? तर आधी स्त्रीचा सन्मान करायला शिका.
४) मुलगी शिकली, प्रगतीची वाट झाली मोकळी!
५) मुलगा-मुलगी भेद नसावा, समानतेने संवाद असावा!
६) स्त्री आत्मविश्वासाने उभी राहिली, समाजात क्रांती घडली!
७) न्याय, स्वातंत्र्य आणि समानता, स्त्री जीवनाची हीच खरी इतीकर्तव्यता!
८) स्त्री अंधश्रद्धेतून मुक्त झाली, समाजाची प्रगती झाली.
९) पुरुषी वृत्तीचा करा लोप, स्त्रियांना येईल शांत झोप!
१०) स्त्रीविना पुरुष अधुरा, पुरुषाविना स्त्री; दोघांनी मिळून सुजलाम सुफला करा धरित्री!
(आंतरराष्ट्रीय महिला दिवस- ८ मार्च २०२५ या निमित्ताने)
नमस्कार प्रिय मैत्रांनो!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।”
(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात. ) या ओळी आपण सर्वजण प्राचीन काळापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत. हा श्लोक चिरंतन आहे, अर्थपूर्ण आहे अन म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच महत्वाचा आहे.
८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (या साठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).
मंडळी महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराने मांडलेला ठराव मंजूर झाला. नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून इंग्लंड येथे १९१८ साली आणि अमेरिकेत १९१९ साली या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
या निमित्याने मी एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, हा काळ जवळपास २२ वर्षे जुना) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या रांगा अन लगत समुद्राचे निळेशार पाणी (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज) बसमधून अतिशय रमणीय असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्या तरुणांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.
मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? तिथल्या साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के! (तेव्हां आणि आत्ताही) मी २०२२ साली मेघालयाचा प्रवास केला, त्यातील प्रामुख्याने जी गोष्ट मला जाणवली ती सर्वांगाने दृश्यमान होणारे स्त्री स्वातंत्र्य. तेथे देखील या स्त्री स्वातंत्र्यसूर्याच्या उदयाला कारणीभूत आहे स्त्रियांची संपूर्ण साक्षरता आणि मत्रीसत्ताक पद्धतीमुळे गावलेली आर्थिक सुबत्ता! याच्या परिणामस्वरूप तेथे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले.
मतदानाचा हक्क महत्त्वाचाच मंडळी, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?
यंदाच्या युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस ८ मार्च २०२५ साठी “Accelerate Action” अर्थात “कृतीला गती द्या” हा विषय निवडण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश महिलांना पुरुषांबरोबर समान दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गतिमान करणे होय. ही थीम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर देते. म्ह्नणजेच केवळ चर्चा करण्याएवजी आता महिलांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे परिणाम साधणारी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. याअंतर्गत महिलांसाठी विशिष्ट योजना लागू करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन महिलांना रोजगार आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. (यात लाडकी बहीण सारख्या योजनेचे प्रयोजन नसावे, अशी इच्छा! ) स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
मला या दिनाविषयी इतकेच वाटते की स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे सामाजिक स्थान अत्यंत महत्वाचे आहे आणि ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच नवसाचा दिवस नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार?
“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights.” – Hillary Clinton.
(“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. “- हिलरी क्लिंटन)
(या निमित्ताने तुराज लिखित शंकरमहादेवन यांनी गायलेले Womens Anthem हे स्फूर्तिदायक गाणे आपल्याला नक्कीच आवडेल.
☆ “एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…” मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री सुनील देशपांडे ☆
श्री के पी रामास्वामी
एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…
२७, ५०० मुली असलेला माणूस ?
हो! त्याला असेच म्हणतात – अप्पा.
(दक्षिणेमध्ये वडिलांना आप्पा असे संबोधतात)
त्याचे खरे नाव? के पी रामास्वामी. कोइम्बतूर येथील केपीआर मिल्सचे मालक. व्यवसायाने कापड उद्योगपती. कर्मचारी त्यांना अप्पा असे संबोधतात
कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते कर्मचारी टिकवून कसे ठेवावे? खर्च कसे कमी करावे आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे. असेच सर्व बोलत असताना, हा माणूस संपूर्ण जीवनक्रम बदलण्यात व्यस्त आहे.
कसे?
गिरणी कामगारांना पदवीधर बनवून. शिक्षणाला चांगल्या जीवनाची पायरी बनवून.
हे सर्व एका साध्या विनंतीने सुरू झाले. त्याच्या गिरणीतील एका तरुण मुलीने एकदा त्याला सांगितले होते –
“अप्पा, मला शिक्षण घ्यायचे आहे. माझ्या पालकांनी गरिबीमुळे मला शाळेतून काढून टाकले, पण मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. “
त्या एका वाक्याने सर्व काही बदलले…
त्याच्या कामगारांना फक्त पगार देण्याऐवजी, त्याने त्यांना भविष्य देण्याचा निर्णय घेतला.
त्याने गिरणीतच एक पूर्ण शिक्षण व्यवस्था उभारली.
आठ तासांच्या शिफ्टनंतर चार तासांचे वर्ग.
वर्गखोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, अगदी योग अभ्यासक्रम देखील.
सर्व काही पूर्णपणे निधीयुक्त. कोणतीही फी नाही, अट नाही.
आणि निकाल?
२४,५३६ महिलांनी त्यांच्या १०वी, १२वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्या आहेत.
अनेक आता परिचारिका, शिक्षिका, पोलिस अधिकारी आहेत.
या वर्षीच तामिळनाडू मुक्त विद्यापीठातून २० मुली सुवर्णपदक विजेत्या झाल्या
आता, तुम्हाला अपेक्षा असेल की एखाद्या व्यावसायिकाला कामगार नोकरी सोडून जाण्याची चिंता असेल. जर या महिला निघून गेल्या तर काय? कामगार स्थिरतेचे काय?
के पी रामास्वामी काय म्हणतात ते येथे आहे –
“मी त्यांना गिरणीत ठेवून त्यांची क्षमता वाया घालवू इच्छित नाही. त्या गरिबीमुळे येथे आहेत, स्वेच्छेने नाही. माझे काम त्यांना भविष्य देणे आहे, पिंजरा नाही. “
आणि तो नेमके तेच करतो….
त्या निघून जातात. स्वतःचे करिअर घडवतात.
आणि मग? त्या त्यांच्या गावातील अधिक मुलींना गिरणीत पाठवतात. हे चक्र सुरूच आहे.
हा केवळ सीएसआर उपक्रम नाही. हा खऱ्या अर्थाने मानव संसाधन विकास आहे.
अलिकडेच झालेल्या एका दीक्षांत समारंभात ३५० महिलांना त्यांच्या पदव्या मिळाल्या. आणि के पी रामास्वामी यांनी एक असामान्य विनंती केली –
“जर तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणी त्यांना कामावर ठेवू शकलात, तर त्यामुळे इतर मुलींना पुढे शिक्षण घेण्याची आशा मिळेल. “
विचार करा. कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य चालवणारा माणूस व्यवसाय मागत नाही. तो नोकऱ्या मागत आहे – त्याच्या कामगारांसाठी.
आपण हे कधी कुठे पाहिले आहे?
ही कथा फक्त केपीआर मिल्सबद्दल नाही. ही नेतृत्व, कॉर्पोरेट नीतिमत्ता, राष्ट्र उभारणीचा धडा आहे.
बी-स्कूलने हे शिकवले पाहिजे.
एचआर व्यावसायिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे.
आणि जगाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येकाला समजेल अशी ही सगळीकडे पसरवण्यासारखी सत्यकथा. तुम्ही काय करणार. पोहोचवणार इतरांपर्यंत?
☆ पुस्तकंसुद्धा युद्धावर गेली होती त्याची गोष्ट – – ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
मध्यंतरी ‘लोकसत्ता’ मधील बुकमार्कच्या पानावर आलेला ‘आणि पुस्तके चालू लागली’ हा लेख वाचल्यावर साहजिकच नुकतंच हाती आलेलं पुस्तक आठवलं. पुस्तकाचं नाव: ‘When Books Went To War’ आणि लेखिका आहे, मॉली गप्टील मॅनिंग. माझी एक सवय आहे पूर्वीपासून, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचत असताना, त्यात कधी, कुठे त्यांनी वाचलेल्या चांगल्या पुस्तकाचं नाव, संदर्भ आला, की मी लगेच ते नाव माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत लिहून ठेवते. असंच या पुस्तकाबद्दल मी बहुधा निरंजन घाटे यांच्या ‘मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट’ या पुस्तकात वाचून लिहून ठेवलेलं होतं. हे पुस्तक तेंव्हा माझ्या मुलानं मला पाठवलं होतं.
1933 च्या सुमारास जर्मनीमधे अर्थातच, हिटलर आणि त्याचा लाडका सेनापती गोबेल्स यांच्या डोक्यातून निघालेली आणि शाळा-कॉलेज मधे शिकणाऱ्या उत्साही किशोरवयीन आणि तरुण मुलांमार्फत राबवून घेतलेली एक भयंकर मोहीम होती. दुसऱ्या महायुद्धाबद्दल आपण बरंच काही वाचलेलं असतं, पण या मोहिमेबद्दल मात्र या आधी मी तरी कुठेही, काहिही वाचलेलं नव्हतं.
जर्मनीतील मोठमोठ्या शहरात, मध्यवर्ती चौकात मोठ्ठाल्ले ओंडके चितेसारखे रचून त्यात शेकडो, हजारो पुस्तकांच्या आहुती दिल्या गेल्या! बर्लिन, फ्रॅन्कफर्ट अशांसारख्या शहरातील विद्यापिठांच्या वाचनालयातील उत्तमोत्तम ग्रंथ आणून या होमात त्यांची आहुती देण्यात आली!
हजारो विद्यार्थी आपापल्या विद्यापिठांचे विशिष्ट रंगाचे कपडे घालून, हातात मशाली घेऊन मोठ्या अभिमानाने या मिरवणुकीत सामील झालेले होते. बर्लिनच्या मुख्य चौकात होणाऱ्या या ‘समारंभां’ साठी पावसाळी हवा आणि प्रचंड गारठा असतानाही चाळीस हजार प्रेक्षक हजर होते. आणि अशा पावसाळी हवेतही या मुलांचा उत्साह, आनंद उफाळून ओसंडत होता!
कितीतरी गाड्या “अन-जर्मन” पुस्तकं भरून घेऊन या मिरवणुकीत सामील झालेल्या होत्या. आणि हे विद्यार्थी(?) मानवी साखळी करून एकमेकांकडे देत, ही पुस्तकं त्या चितेत भिरकावत होते. नाझी एकतेच्या विरोधी विचार असलेली सर्व पुस्तकं ही देशद्रोही ठरवून नष्ट केली जात होती. देशाच्या प्रगतीला विरोधी विचारांमुळे अडथळा निर्माण होत आहे, म्हणून, हे विचार असलेली पुस्तकं जाळण्यायोग्य आहेत, असं या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आलेलं होतं. सिग्मंड फ्रॉईड, एमिल लुडविग, एरिक मारिया रिमार्क हे सगळे लेखक, तज्ञ देशविरोधी लिखाण करत आहेत, असं सांगून त्यांची पुस्तकं जाळण्यात आली. एका मागून एक मोठमोठ्या लेखकांची, शास्त्रज्ञांची पुस्तकं जाळली जात होती, आणि गर्दीमधून हर्षनाद, आरोळ्या उठत होत्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घडवून आणलेला आहे, अशा अफवा उठलेल्या असल्या, तरी, या कार्यक्रमात येऊन गोबेल्सने भाषण दिल्याने हा कार्यक्रम कोणाच्या आशीर्वादाने घडवून आणला गेलेलं आहे, हे जाहीर झाले! हिटलरच्या आदर्शवादाशी जुळणारी विचारसरणी समाजात निर्माण करण्यासाठी तो आपली ताकद वापरत असे.
बर्लिनच्या या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून तो चालू असताना, रेडिओवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि तो चित्रितही करण्यात आला. आणि नंतर देशभरातल्या थिएटर्समधे ही फिल्म मुख्य चित्रपटाआधी दाखवण्यात येऊ लागली. जसजसा हा प्रचार होत गेला, तसतसे ठिकठीकाणी असे पुस्तकं जाळण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. ज्यू विद्वान व लेखकांची तर सर्व पुस्तकं जाळण्यात आलीच, पण समता, बंधुत्व, समन्यायी व्यवस्था यावर लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांनाही तोच रस्ता दाखवण्यात आला!
नंतर तर नाझींनी लेखकांची, पुस्तकांची यादीच जाहीर केली. कार्ल मार्क्स, अप्टन सिंक्लेयर, जॅक लंडन, हेन्रीक मान, हेलन केलर, अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस मान आणि ऑर्थर स्च्नित्झलर. प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तकं जाळण्याच्या कार्यक्रमाला असाच हजारोंचा समुदाय जमलेला असायचा आणि या प्रत्येक कार्यक्रमाची प्रचंड प्रसिद्धी देशभर केली जात असे.
पण हेलन केलर पासून अनेक मोठ्या, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांनीही या गोष्टीचा विद्यार्थ्यांच्या नावे पत्र लिहून निषेध केला. एच. जी. वेल्सने लंडनमधे निषेधपर जोरदार भाषण केले. 1934 मधे, पॅरीसमधे अशा जर्मनीत जाळलेल्या आणि बंदी घातलेल्या पुस्तकांची लायब्ररी स्थापन करण्यात आली. जर्मनीतून आलेल्या काही निर्वासितांनी देणगी म्हणून अशी पुस्तके या लायब्ररीला दिली. आणि युरोपातील लोकांनीही आपल्याकडे असलेल्या अशा चांगल्या लेखकांची पुस्तकं या लायब्ररीला देणगीदाखल दिली.
अमेरिकेतही वर्तमानपत्रांमधून जर्मनीतील या असंस्कृत मोहिमेचा जाहीर निषेध करण्यात आला.
नंतर हळुहळू हिटलरची मजल पुस्तकांकडून ज्यू लोकांच्या छ्ळापर्यंत, त्यांच्या उच्च्चाटनापर्यंत जाऊन पोचली आणि मग त्याने युरोपातले लहान-सहान देश आक्रमण करून गिळंकृत करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, तर फ्रेंच रेडीओ वरून त्यांच्या विरूद्धच अपप्रचाराची राळ उडवत आपली वक्र नजर फ्रान्स आणि इंग्लंड वरही असल्याचं जाहीर केलं! आणि मग सगळा युरोपच युद्धाच्या ज्वाळांमधे होरपळू लागला.
हिटलरचा लोकशाही विरोध शेवटी अमेरिकेपर्यंत पोचणार याची निश्चिती वाटू लागल्यावर अमेरिकेलाही खडबडून जागं व्हावं लागलं. पहिल्या महायुद्धानंतर विस्कळीत झालेली सर्व युद्धयंत्रणा परत रुळावर आणण्याचं अवघड काम आधी करावं लागणार होतं.
सुरुवातीला जेंव्हा 1939-40 मधे युरोपात युद्धज्वाळा फैलावू लागल्या होत्या, तेंव्हा अमेरिकन नागरिकांचा या युद्धात सामील व्हायला विरोधच होता. पण बरेच जण असे होते, की ज्यांना यातली अपरिहार्यता कळत होती. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सह अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा अप्रिय सल्ला सरकारला दिलेला होता. त्यांनी हिटलरचे लष्कर किती शक्तिमान आणि यंत्र-शस्त्र सज्ज आहे, आणि त्याने फ्रांसला कसे जेरीस आणले आहे, याचाही दाखला दिला होता. आणि आपण बेसावध असताना जर या सुसज्ज लष्कराला तोंड द्यायची वेळ आली तर कशी दुर्दशा होऊ शकते, याचीही कल्पना दिलेली होती.
हिटलरने स्वतःला लोकशाहीचा कट्टर शत्रू म्हणून जाहीर केले होते आणि अमेरिका ही सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सौम्य-सभ्य अशी लोकशाही नव्हती काय? आणि ‘शत्रू बेसावध असतानाच त्याच्यावर हल्ला करून त्याला गारद करायचा’ हाच हिटलरचा प्रमुख डावपेच असायचा. तेंव्हा आपण वेळीच सावध होऊन तयारीला लागलं पाहिजे, असा त्या वृत्तपत्रांमधील लेखांचा एकूण रोख होता.
1940 च्या सप्टेंबर मधे अमेरिकेच्या कॉन्ग्रेसने ‘सिलेक्टिव्ह ट्रेनिंग अॅन्ड सर्व्हिस’ कायदा मान्य केला. या कायद्यानुसार 21 ते 35 या दरम्यान वय असलेल्या सर्व पुरुषांना लष्करी सेवेत भारती होणे आवश्यक होते. नंतर या कायद्यात दुरुस्ती करून 18 ते 50 वयाच्या पुरुषांना लष्करी सेवेत भरती होणे अनिवार्य करण्यात आले.
लष्करात भरती झालेल्या या लाखो लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी, लष्कराने 46 केंद्र बांधून फर्निचरसकट सज्ज करायचं ठरवलं होतं, पण तेवढा निधीच त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे या सक्तीची भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षण देणं तर दूरच, उलट त्यांच्या रहाण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे मोठेच आव्हान लष्करापुढे उभे राहिले. अगदी तळामुळापासून करायच्या या तयारीला खूप दिवस लागणार होते. आणि त्यासाठी लागणारा पैसा सरकारकडून मंजूर होऊन मिळायलाही वेळच लागणार होता!
आधी सक्तीची लष्कर भरती आणि नंतर पैसा हातात येईल तेंव्हा कॅम्प तयार करणं यामुळे या भरती झालेल्या लोकांचे विलक्षण हाल झाले. त्यामुळे त्याचं मानसिक धैर्य खूप खच्ची झालं! अनेक कॅम्प्समधे रहाण्याची, जेवणखाण्याची आणि शौचालये किंवा स्नानगृहांची व्यवस्था नव्हतीच जवळपास! आणि या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा युद्धसामग्रीचाही पत्ता नव्हता. लष्कराची अवस्था खरोखरच शोचनीय झालेली होती!
अशा तऱ्हेने उपलब्ध साधनसामग्री मर्यादित कसली, जवळपास नसतानाही, संगीत (गाणा-यांनी गाणे!) आणि मर्दानी खेळ यांनी थोडीफार करमणूक करून घेत असत हे प्रशिक्षणार्थी. पण एकमेकांना अनोळखी असलेल्या या लोकांना इतक्या वाईट परिस्थितीत सतत एकमेकांबरोबर रहावं लागत असल्यामुळे, मोकळा वेळ असेल तेंव्हा शक्यतो एकटं बसावं, घरच्यांना पत्रं लिहावीत किंवा एकट्यानेच काहीतरी वाचत बसावंसं वाटत असे.
लष्करातील वरचे अधिकारी हे जाणून होते, की या कॅम्प्समधील रहाणीचा दर्जा सुधारल्याशिवाय आणि या प्रशिक्षणार्थींना हवी असलेली करमणूक, मनोरंजन याची व्यवस्था केल्याशिवाय त्यांचं मानसिक धैर्य उंचावणार नाही, आणि परिणामकारक प्रशिक्षणही देता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची, निर्णायक आहे!
पण जिथे रहाण्यासाठी इमारती आणि चालवण्यासाठी बंदुकी अशा लष्करी प्रशिक्षणासाठी आवश्यक अशा प्राथमिक गोष्टी पुरवण्यासाठीच धडपड चाललेली असताना चित्रपटगृहे आणि खेळांसाठीच्या उत्तम सुविधा पुरवणं अशक्यच होतं! तेंव्हा, त्यांना अशी करमणूक द्यायला हवी होती, की जी लोकप्रियही असेल आणि परवडणारीही! आणि ती म्हणजे पुस्तकंच होती त्या काळात!
मोबाईल फोन नव्हते, आणि टी. व्ही. पण प्रत्येक काना कोपऱ्यात पोचलेले नव्हते असा तो काळ होता. इतके लोक पुस्तकं वाचण्यासाठी इतके उत्सुक होते, हे वाचूनच मन भरून येतं!
पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुस्तकं पुरवण्यात आली होती, पण या दुसऱ्या महायुद्धात जितक्या जास्त संख्येने पुस्तकं पुरवण्यात आली, तो जागतिक विक्रम अजून मोडला गेलेला नाही!
या पुस्तकांसाठी एक मोठी मोहीमच अमेरिकेत, देशभरात चालवली गेली! देशभरातील ग्रंथपालांची (लायब्ररीयन्स) एक संघटना होती. तिच्या सभासदांनी एकत्र येऊन, स्वयंसेवकांची मदत घेऊन एक देशव्यापी मोहीम आखली. जागोजागी, ठिकठिकाणी छापील पत्रकं लावली. या पत्रकांमध्ये आपापल्या घरी असलेली पुस्तकं सैनिकांसाठी दान करायचं आवाहन केलेलं होतं. ही पुस्तकं ज्या त्या गावातल्या लायब्ररीत आणून द्यायची होती. मग तिथून ती एका ठिकाणी गोळा करून जिथे जिथे सैनिक लढत होते, किंवा प्रशिक्षण घेत होते, तिथे तिथे पोचवण्यात आली.
जवळपास 40 लाख पुस्तकं अशा प्रकारे गोळा करून सैनिकांसाठी पाठवण्यात आली. या मोहिमेसाठी कित्येक जणांचा हातभार, कष्ट, पैसा सगळंच कामी आलं होतं. हे सगळे तपशीलही मुळातून वाचण्याजोगे आहेत. विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत.
या पुस्तकांनी सैनिकांसाठी काय केलं, हे अमेरिकन लष्करातील एका मेजरच्या शब्दात : “आमच्या, आणि आमच्याबरोबर लढणाऱ्या इतर देशांच्याही सैनिकांचं आयुष्य जगण्याजोगं केलं या पुस्तकांनी! अमेरिकन सैनिकांचं ते विलक्षण चैतन्यही जागं केलं या पुस्तकांनी! आणि आमचे सैनिक अजूनही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिलेत तेही या पुस्तकांमुळेच!”
अशा प्रकारे, हिटलरने सुरु केलेल्या फक्त युद्धालाच नव्हे, तर त्यानं प्रत्यक्षात आणलेल्या पुस्तकं जाळण्याच्या अमानुष, असंस्कृत मोहिमेला अमेरिकेने हे सुसंस्कृत, जोरदार उत्तर दिलेलं होतं आणि माणसाविरुद्ध आणि माणुसकीविरुद्ध चालवलेल्या प्रत्यक्ष युद्धात आणि सांस्कृतिक युद्धातही हिटलरचा दणक्यात पराभव केला, त्याची ही कहाणी!
☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३”☆ श्री संभाजी बबन गायके☆
(खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता !) – इथून पुढे —
दुसरी रात्र… पुन्हा एक चढाई.. आज आणखी एक शिखर काबीज करायचे होते…. जाताना एक सैनिक म्हणाला… ”जा रहा हूं साहब. ” त्यावर डॉक्टर साहेब सहज म्हणाले होते… ”देखो, जा तो रहे हो… लेकीन जीत के ही वापस आना!” तासाभरात तोच सैनिक जखमी होऊन उपचारासाठी परत आला! प्रचंड गोळीबारात त्याच्या कमरेला गोळी लागली होती… पण कमरेला बांधलेल्या गोळ्यांच्या सहा मॅगझीन (गोळ्या ठेवण्यासाठीची व्यवस्था) पैकी एका मॅगझीन मधल्या एका स्प्रिंगमध्ये ती गोळी अडकून बसली… हा बचावला! दुसरी गोळी डाव्या खांद्याला लागली…. हा उजव्या हाताने लढला… मग उजव्या हातालाही गोळी लागली… नाईलाज झाला! “साहब, मुझे पैरोंसे फायरींग सिखाई गयी होती तो मैं पैरोंसे भी लडता! लेकीन वापस नहीं आता… आप मुझे ठीक कर दो.. मै फिरसे जाना चाहता हूं लडने के लिये!”
एका सैनिकाच्या तर नाकात गोळी घुसली होती… त्याचे नाकच नाहीसे झाले होते… पण निष्णात डॉक्टर राजेश यांनी त्यालाही वाचवले… आता तो माजी सैनिक व्यवस्थित आहे.
हे एवढे देशप्रेम, एवढी हिंमत सैनिकांच्या मनात येते तरी कुठून हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीत आहे डॉक्टरांच्या मनातला. पण यातून एक निश्चित होते.. ते म्हणजे आपल्या देशाला अशा सैनिकांची वानवा नाही… आणि असणारही नाही!
आपल्या महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात एक गांव आहे.. आष्टी नावाचे. या गावाला शहीद आष्टी म्हणून इतिहासात ओळख आहे… १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात या गावातील पाच नागरीकांनी महाराष्ट्रात सर्वांत प्रथम प्राणांची आहुती दिली होती म्हणून हे गाव शहीद अर्थात हुतात्मा आष्टी! येथे एक हुतात्मा स्मारक उभारले गेले आहे. राजेश यांचा जन्म याच गावातला. वडील वामनराव डॉक्टर तर आईचे नाव कुमुदिनी. त्यांची शाळा या स्मारकामध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रम करीत असे. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते गायली जात… शाळकरी राजेश या गाण्यांच्या वाद्यवृंदामध्ये बासरी वाजवणा-या मुलांच्या पहिल्या रांगेत असत. तिथूनच त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले. राजेश यांनी पुढे उत्तम शिक्षण घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजात एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाले! समाजासाठी काही तरी उत्तुंग करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. आपण आय. ए. एस. अधिकारी व्हावं, ग्रामीण भागात जनतेची प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करावी, असे त्यांच्या मनाने घेतले आणि ते घरी न सांगता थेट दिल्लीला पळून गेले… तेथे त्यांनी आय. ए. एस. होण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. दिल्लीत राहण्याची सोय नव्हती म्हणून खासदार महोदयांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यु. पी. एस. सी. ची तयारी करीत असताना काही पैसे कमवावेत म्हणून त्यांनी तिथल्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टर म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली.. दिवसातील जवळजवळ वीस तास ते डॉक्टर म्हणून सेवा बजावत. त्यातच त्यांच्या एका वरिष्ठ सहकारी डॉक्टरांनी त्यांना लष्करी डॉक्टर होण्याचा सल्ला दिला… आणि तीन हजार उमेदवारांमधून डॉक्टर राजेश आढाव पहिल्या साडेतीनशे मध्ये निवडले गेले. पहिलेच जबाबदारी मिळाली ती जम्मू-कश्मीर मध्ये तैनात असलेल्या १३, जम्मू & काश्मीर रायफल्सचे वैद्यकीय अधिकारी म्हणून. सुमारे आठशे ते हजार सैनिक-अधिकारी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे काम! लवकरच डॉक्टर राजेश या कामांत रुळले… सैनिकी गणवेश अंगावर चढताच त्यांच्यातील देशभक्त, समाजसेवक पूर्ण जागा झाला!
जवान राजेश यांना डॉक्टर देवता म्हणून संबोधत असत. त्यांनी उपचार केले तर रुग्ण निश्चित जगतो.. असे ते मानीत असत. आणि ते खरे ही होते.. कारगिल लढाईत त्यांनी ९७ जवान आणि अधिकारी यांचे प्राण वाचवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांना विशेष सन्मान देण्यात आला!
सैनिकांचा खूप विश्वास त्यांनी कमावला होता. लढाईच्या काळात…. उंच पहाडावर असलेल्या सैनिकांना जेवण पोहोचवले जायचे. पहाटे बनवलेले खाद्यपदार्थ पहाडावर पोहचेपर्यंत खूप उशीर व्हायचा. एकदा भात दही असा बेत होता. तेथील वातावरणामुळे त्या भातावर असलेल्या दह्यावर एक वेगळाच थर दिसू लागला. जवानाना वाटले की दही खराब झाले… खायचे कसे? यावेळी डॉक्टर राजेश यांनी स्वत: ते दही खाल्ले… आणि म्हणाले… ”अगर मुझे आधे घंटे तक कुछ नहीं होता है.. तो यह दही खाने लायक है ऐसा समझो… ! ते पाहून ते भुकेलेले सर्वजण दही भातावर तुटून पडले! जवान मजेने म्हणायचे यह डॉक्टर साहब तो जादू टोना के डॉक्टर है!
एल. ओ. सी. कारगिल चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी डॉक्टर राजेश यांची भूमिका केली होती. विक्रम बात्रा साहेबांच्या जीवनावर आधारीत चित्रपटातही डॉक्टर राजेश यांची भूमिका दाखवली गेली आहे.
कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या पत्नी दिपाली या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. कारगिल मधून परतल्यावर 2 डिसेंबर २००१ रोजी डॉक्टर साहेब दिपाली यांचेशी विवाहबद्ध झाले… आणि तेरा दिवसांनी कर्तव्यावर पोहोचले… ऑपरेशन पराक्रम मध्ये भाग घेण्यासाठी!
त्यांचे चिरंजीव ओम एम. बी. बी. एस. चा अभ्यास करत आहे. ओम लहान असताना जेंव्हा राजेश साहेबांच्या कारगिलच्या कहाण्या ऐकायचा… तेंव्हा त्याला त्या ख-या वाटत नसत… पण तो मोठा झाला आणि त्याला आपल्या पित्याची महान कामगिरी माहीत झाली!
कारगिल लढाईत एका डॉक्टर साहेबांना गोळी लागून ते हुतात्मा झाल्याची बातमी पसरली होती. ही बातमी घेऊन जेंव्हा बातमीदार डॉक्टर राजेश यांच्या घरी पोहोचले तेंव्हा यांच्या मातोश्री यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते… त्या म्हणाल्या… आम्ही दूध विकतो.. त्यात मी कधी एक थेंब पाणी मिसळले नाही… माझ्या मुलाला असे काही होणारच नाही! आणि त्यांचे शब्द खरे झाले… डॉक्टर साहेब सुखरूप होते… बातमी अर्धवट होती… राजेश यांना बॉम्बमधील धारदार splinter लागून त्यांना जखम झाली होती! दुधात थेंबभरही पाणी न घालणे याचाच अर्थ पूर्ण प्रामाणिक व्यवहार! यातून संस्कारही दिसतात!
कारगिल युद्धावेळी captain असलले डॉक्टर राजेश पुढे कर्नल पदावर पोहचले… त्यांना सेना मेडल दिले गेले. अशी कामगिरी करणा-या मोजक्या आर्मी डॉक्टर्समध्ये राजेश साहेबांचा समावेश आहे.
पुढे कोरोना काळातही डॉक्टर राजेश यांनी सैन्याची काळजी यशस्वीरीत्या घेतली. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.
२९ जानेवारी, २०२५… आफ्रिकेतील कांगो येथून एक बातमी आली… संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत तिथल्या लष्करी रुग्णालयाचे प्रमुख कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर एक नव्हे तर दोन RPG अर्थात Rocket Propelled Grenade म्हणजे रॉकेटवर बसवून डागला जाणारा हातगोळा पडला! पण सुदैवाने राजेश साहेब केवळ दहा सेकंद आधीच तिथून बाहेर पडले होते! त्यांचे आई-वडील, पत्नी यांची पुण्याई थोर आहे.. हेच खरे!
काल ६ फेब्रुवारी रोजी कर्नल डॉक्टर राजेश आढाव साहेबांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त माहिती घेऊन हा लेख लिहिला आहे. यात चुका तर असतीलच. पण डॉक्टर साहेबांचा पराक्रम अधिक लोकांना माहीत व्हावा… म्हणून हे धाडस केले आहे. विविध मुलाखाती, बातम्या पहिल्या… आणि किंचित लेखन स्वातंत्र्य घेऊन, कोणाचीही परवानगी न घेता लिहिले आहे.. क्षमस्व! पण माझी भावना प्रामाणिक आहे! कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ (Adhau असे spelling लिहिले जाते बऱ्याच ठिकाणी) यांच्यावर एक छान चित्रपट निघावा.. ही इच्छा आहे. किमान नव्या पिढीला आपल्या बहाद्दर माणसाची माहिती तर होईल. जयहिंद.
☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – १”☆ श्री संभाजी बबन गायके☆
कर्नल डॉक्टर साब !
“मर्द गड्यांनो… मी येईपर्यंत दम धारा… श्वास घेत रहा… हिंमत हरू नका! मी पाचच मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचेन… आणि एकदा का माझा तुम्हांला स्पर्श झाला… की मृत्यू तुमच्या जवळपासही येणार नाही… यह जबान है मेरी!”
13, Jammu And Kashmir Rifles चे Regimental Medical Officer Captain डॉक्टर आढाव साहेब जवानांशी, अधिका-यांशी बोलत होते…. वर्ष होते १९९९.
पाकिस्तानने कारगिल पर्वतावरील भारताच्या सैन्यचौक्या घुसखोरी करून ताब्यात घेतल्या होत्या. घुसखोरांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी नियमित सैन्याला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य ठरले होते. अन्यथा भारत मोठ्या संकटात सापडला असता. त्यासाठी 13, Jammu And Kashmir Rifles चे जवान आणि अधिकारी मोहिमेवर निघाले होते.
Commanding Officer आणि त्यावेळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या श्री. योगेश कुमार जोशी साहेबांनी उपस्थित सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य मोठ्या आवेशात लक्षात आणून दिले…. इतिहास के पन्नोपर अपना नाम सोने के अक्षरों में दर्ज कराने का ऐसा मौका न जाने फिर कब मिलेगा? साहेबांनी विचारले! कुणालाही तो मौका गमवायचा नव्हता. मर्दमुकी गाजवायला उत्सुक शेकडो हृदये सज्ज होती…. एकमुखाने जयजयकार झाला… दुर्गा माता की जय!
“किसी को कुछ कहना है?” जोशी साहेबांनी प्रश्न केला. कुणाचा काहीही प्रश्न नव्हता! पण त्या गर्दीतून एक हात वर झाला. “बोलिये, डॉक्टर साहब!” साहेबांनी Regimental Medical Officer Captain डॉक्टर आढाव यांना प्रश्न केला. डॉक्टर साहेब एक वर्षभरापासून या सैन्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रश्न साधारण असा होता…. सैन्य प्रचंड उंचीवर लढाई करणार.. अर्थात काहीजण जखमी होणार… त्यांना खाली आणेपर्यंत खूप वेळ जाणार…. त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण साहजिकच अधिक असणार… अशावेळी डॉक्टर सैनिकांच्या सोबत असला पाहिजे!
जोशी साहेब विचारात पडले…. तोपर्यंत सैन्यासोबत डॉक्टर थेट पहिल्या फळीत जाण्याची पद्धत नव्हती. वैद्यकीय पथक साधारणत: तिस-या फळीत राहून त्यांच्याकडे आणल्या जाणा-या जखमीवर उपचार करीत असते. आणि हे डॉक्टर साहेब तर त्या उंचीवर मी सैन्यासोबत येतो असे म्हणताहेत! ही मागणीच जगावेगळी होती. जोशी साहेबांनी परवानगी दिली!
दुस-या दिवशी पहाटे साडेचार वाजता जोशी साहेब आणि डॉक्टरसाहेबांनी पर्वत चढायला आरंभ केला. दिवसभर चालून चालून डॉक्टरसाहेब थकून गेले होते. सायंकाळचे साडे पाच सहा वाजले असावेत. शेवटी सैनिक, अधिकारी आणि डॉक्टर यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये काही फरक तर असणारच!
तिथल्या एका मोठ्या खडकावर डॉक्टर साहेबांनी बैठक मारली… म्हणाले.. ”साहब… मैं बडा थक गया हूं.. अब इसके आगे नहीं चल सकता!”
यावर साहेब म्हणाले, ”ऐसा नहीं हो सकता. अब बस कुछ सौ मीटर्सही तो चढना है और रात भर रुकना है! मैं आपको ऐसे अकेले छोड के आगे नहीं जा सकता… और ना ही आपको पीछे भेज सकता हूं… !” यावर डॉक्टर साहेब नाईलाजाने उठले… काही पावले चालले असतील… एवढ्यात शत्रूने डागलेला एक बॉम्बगोळा डॉक्टर साहेब ज्या खडकावर बसले होते त्या खडकावर आदळला! मृत्यू डॉक्टर साहेबांच्या अगदी अंगणात येऊन गेला होता! ज्या अर्थी दैवाने आपला जीव वाचवला त्या अर्थी आपल्या हातून पुढे काही मोठे काम होणार आहे… अशी खूणगाठ डॉक्टर साहेबांनी मनाशी बांधली.. आणि ते निर्धाराने पर्वत चढू लागले.
एक दोन दिवसांत एक मोठा हल्ला करून एक शिखर ताब्यात घेण्याचे घाटत होते. त्यासाठी पाहणी करण्यासाठी एक पथक पुढे गेले होते. शत्रू वरून सर्व काही स्पष्ट पाहू शकत होता.. अचूक नेम धरून फायर करीत होता. त्यामुळे दिवसा काहीही हालचाल करणे धोक्याचे होते. म्हणून पाहणी पथक एका आडोशाला लपून छपून पाहणी करीत होते. काही अंतर अलीकडे डॉक्टर साहेब आपल्या साहाय्यकासह थांबलेले होते. एका मोठ्या खडकाआड त्यांनी आपले युद्धाभूमीवरचे इस्पितळ उभारले होते… जे काही उपलब्ध होते त्या साधनांच्या साहाय्याने. त्यांच्यापासून साधारण १०० मीटर्स वर एक खोल नाला होता. तिथे बसलेल्या आपल्या एका जवानाच्या मांडीत शत्रूने फायर केलेली एक गोळी खडकावर आपटून उलट फिरून घुसली होती… आणि तिथून ती पोटाच्या आरपार गेली होती. त्याचा रक्तस्राव त्वरीत थांबवणे गरजेचे होते. त्या सर्च पार्टीकडून डॉक्टरसाहेबांना संदेश आला…. ”किसीको गोली लगी है!
आडोसा सोडून त्या नाल्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे पाकिस्तानी गोळीबाराच्या पावसातून पळत जावे लागणार होते. डॉक्टर साहेब त्यांच्या साहाय्यकाला, Battle Nursing Assistant शिवा यांना म्हणाले.. ”शिवा, क्या करें? तो म्हणाला, ”साब, आपने तो कह रखा हुआ है… पांच मिनट में पहुंचुंगा.. अब जाना तो है ही!” मग दोघे तयार झाले… ते ऐंशी ते शंभर मीटर्स अंतर धावत पार करण्याचे ठरले… हातात मेडिकल कीट घेऊन! आपले सैन्य कवर फायर देणार होते…. म्हणजे पाक्सितानी सैन्याचे लक्ष थोडेसे विचलीत होईल.
बर्फात तयार झालेल्या पायावाटेवरून सरळ पळत गेले तर वरून पाकिस्तानी अचूक नेम साधणार…. मग…. नागमोडी पळायचे ठरले… आणि दोघेही तसेच धावत सुटले… आपल्या सैन्याच्या गोळ्या सुसाट वेगाने या दोघांच्या डोक्यांवरून वर फायर केल्या जात होत्या.. आणि वरून पाकिस्तानी फायर येत होता…. एक गोळी पुरेशी ठरली असती…. पण निम्मे अंतर पार झाले तरी दोघे सुरक्षित होते… साहाय्यक नाल्यापर्यंत पोहोचला…. एवढ्यात त्याच्या मागोमाग धावणारे डॉक्टर साहेब खाली कोसळले… पायांत अडीच अडीच किलोचे बर्फात वापरायचे बूट असताना पळणे सोपे नव्हते… वाटले… आता डॉक्टर दगावले…. पण त्यांना गोळी लागली नव्हती. बुटाची लेस सुटली होती… त्यामुळे ते खाली कोसळले होते…. भारताच्या बाजूने सुरु असलेला कवर फायर थांबवण्यात आला… शत्रूला वाटले… लक्ष्य टिपले गेले.. त्यांनीही फायर थांबवला… एवढ्यात डॉक्टर साहेबांनी निर्धार केला.. एका हाताने बुटाची लेस अगदी घट्ट ओढून तशीच बुटाला गुंडाळली… उठले… आणि वायुवेगाने धावत सुटले…. आणि त्या नाल्यात पोहचले… सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला…. नाल्यात जखमी झालेला जवान डॉक्टर साहेबांच्या त्वरीत उपचाराने बचावला!
अगदी चार दोन दिवसांत मृत्यूने डॉक्टर साहेबांना दिलेली ही दुसरी धावती भेट होती… आता तर डॉक्टरसाहेबांच्या काळजातून भीती हा शब्द कायमचा निघून गेला.
त्या वेळी डॉक्टर साहेब अविवाहित होते. घरी आई-वडील होते. एका जवानाने विचारले… ”साहेब, असे धाडस करताना तुम्हांला आई-वडिलांची चिंता नाही का वाटत?” त्यावर त्यांनी उत्तर दिले… ”आई-वडील तर देव असतात… आपण देवाची चिंता करतो का कधी?”
या लढाईत डॉक्टर साहेबांना अनेक शूर वीरांचा सहवास लाभला… त्यांत सर्वांत संस्मरणीय होते ते Captain विक्रम बात्रा साहेब… शेरशहा! डेअरडेविल… एकदम नीडर, हसतमुख. त्यांना प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी व्हायला हवे असायचे. आणि ती मोहीम झाल्यावर ‘यह दिल मांगे मोअर’ म्हणत शत्रूवर तुटून पडायला हा सिंह तयार!
मोहिमेवर जाण्याआधी या काही अधिकारी-जवानां सोबत एकत्रित छायाचित्र काढले गेले होते… यातील कोण परतेल… कोण परतणार नाही… अशीही चर्चा हास्यविनोद म्हणून झाली होती. यावर डॉक्टर साहेब म्हणाले होते… ”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे!
दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !