श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “हम Indian Army है… Tension मत लो !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ते सैनिक किंवा पोलिस घालतात तशा गणवेशात आले होते… आणि त्यांनी निष्पाप पर्यटकांना ठार मारले… बचावलेले पर्यटक जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागले.. काही वेळाने त्यांच्याजवळ सैनिकी गणवेशात असलेले आणि शस्त्रे असलेले काही लोक पोहोचले… बचावलेल्या लोकांना आपलाही मृत्यू जवळ आल्याचे दिसू लागले… आमच्या माणसांना मारले… आता आम्हांलाही मारून टाका… असं अगदी हताश, असाहाय्य स्वरात त्यातील काही स्त्रिया म्हणू लागल्या… लहान मुलं तर अत्यंत भेदरलेली होती…. आलेल्या सैनिकांमधील एक ज्येष्ठ सैनिकाच्या दोन वाक्यांनी या लोकांच्या जीवात जीव आला…. हम फौज ही… हम Indian Army है… आपकी सुरक्षा के लिये आये हैं… आप Tension मत लो!
हे शब्द ऐकल्यानंतरही ही माणसं काही क्षण अविश्वासाने नुसती पहात राहिली.. धापा टाकीत, रडत राहिली.. सैनिकांनी या लोकांना पिण्याचे पाणी दिले… लहान मुलांना जवळ घेतले… आणि त्यांच्या भोवती सुरक्षेचे कडे करून ते उभे राहिले… काहीवेळाने त्या सर्वांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्यात आली!
या हल्ल्यात २६ बळी घेतले गेले… आणि सबंध भारतात शोकाचा आगडोंब उसळला… जे अगदी साहजिकच आहे.
भारतीय सैन्याने गेली साडेसात दशके देशाचं tension अंगाखांद्यावर बाळगलेलं आहे… १९६२, १९६५, १९७१, १९९९ ही चार घोषित युद्धं, श्रीलंकेला पाठवली गेलेली शांतिसेना यांतून हजारो सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहेच… पण तितकाच त्याग देशांतर्गत शांतता राखण्यासाठीही केला आहे… हे ध्यानात घ्यावे, असे आहे.
एकट्या काश्मिरात १९४७ पासून २०२५ पर्यंत बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. हे सैनिक जर आज हयात असते तर आपल्या सीमा आणखीन बळकट झाल्या असत्या… त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सहवासाचा अधिक काळ आनंद घेतला असता!
काश्मिरात भारतीय सैनिकांविषयी रागाची भावना आहे, त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देतात, अतिरेकी त्यांनाच लक्ष्य करतात आणि संधी मिळताच त्यांना ठार केले जाते…. पर्यटकांना ते काही म्हणजे काहीच करीत नाहीत… खुशाल काश्मीर सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जा…. असाच विचार गेली काही वर्षे केला जात आहे. पहलगाम मध्ये बळी पडलेली ही सव्वीस माणसं आपली.. मग सैनिक कुणाचे आहेत? ते कुणासाठी मरण पत्करताहेत? का ते हातात रायफल असूनही त्यांच्या अंगावर येणा-या स्थानिकांच्या शिव्या खाताहेत.. दगड झेलत आहेत? या याचा विचार भारतीय जनता अगदी अभावाने करताना दिसते!
फारच मोठा हल्ला झाला आणि त्यात जास्त संख्येने सैनिक बळी गेले तरच जनमानसात मोठी खळबळ उडते. एखाद दुसरा बळी गेला की त्याची एक साधी बातमी बनते. मृत सैनिकाचे गाव, त्याचे जवळचे नातलग यांच्या पुरतेच हे दु:ख मर्यादित राहते… अमर रहे म्हणाले की, स्मारक बांधले की कर्तव्य संपले!
एक सैनिक हा हजारो नागरिकांच्या जीवनाचा रक्षक असतो आणि म्हणून त्याचे प्राण महत्वाचे असतात. आणि जेंव्हा त्याचाच बळी जातो तेंव्हा नागरिकांतून शोकासंतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित आणि गरजेचे असते. इस्रायल नावाच्या एका छोट्या देशाचे उदाहरण हल्ली सर्वांना ज्ञात आहे.. पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला अजून कुणात हिम्मत आलेली दिसत नाही! त्यांनी सव्वीस मारले म्हणून आपण त्यांचे बावन्न मारावेत, असेही नागरिक म्हणतात. या हिशेबाने तर आजवर हा आकडा काही हजारांच्या वर गेला असता!
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यावर आपली सत्ता आहे, तिथे आपली वहिवाट असावी म्हणून तिथे पर्यटकांनी मोठ्या संख्येने जावे म्हणजे तिथली परिस्थिती भारताला अनुकूल होईल.. असाही एक मतप्रवाह आहे… आणि त्याचेच फलित म्हणजे कश्मिरात वर्षागणिक वाढत गेलेली पर्यटकसंख्या आणि अर्थातच त्यांना मिळालेला भरमसाठ पैसा. यातून काही भाग पैसा अतिरेकी कारवायांना जात असणार अशी शंका आहे.
पहलगामच्या हल्ल्यानंतर बहुसंख्य पर्यटक परत निघून आले आणि ज्यांनी आरक्षण केले होते त्यांनी ते रद्द केले. असे होणे ही पहिली प्रतिक्रिया. पण त्यानंतर दुस-याच दिवशी तिथे राहिलेल्या काही पर्यटकांचा एक विडीओ दिसतो त्यात एक महिला म्हणते… छोटी बाते तो होती रहती हैं!
फेसबुकवरील एका प्रतिक्रियेत एक महिला म्हणते की बळी गेलेला नौदल अधिकारी तर प्रशिक्षित होता.. त्याने प्रतिकार का नाही केला?
अतिरेक्यांनी हिंदू असेल त्यालाच मारले (आणि त्यांच्या कामात मध्ये आला त्याचा धर्म पाहिला नाही) आणि हे मेलेल्यांच्या आप्तांनी तिथेच लगेच सांगितले आणि ते रेकॉर्ड झाले… हे भारतीयांचे नशीब. अन्यथा असे झालेच नाही असे म्हणायला पाकिस्तानी आणि आपलेही लोक मोकळे झाले असते.
हा हल्ला सत्ताधारी पक्षाने पुढे येणा-या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडवून आणला आहे… असा दावा करणा-या भारतीय लोकांना या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यांनीच बघून घ्यावे… जिवंत माणसांना हे शक्य होणार नाही!
काहीही झाले तर लष्कराने येऊन लोकांना वाचवावे असे जणू लोकांनी ठरवून ठेवले आहे… पण लष्कराच्या बाजूने कोण कोण उभं आहे… आणि हे उभं राहणं केवळ घोषणा देणं नसतं हे ही लक्षात घ्यावे.
आजचीच बातमी आहे…. बुकींग केलेले वाया जाऊ नये म्हणून अनेक लोक काश्मिरात दाखल झालेले आहेत… आणि स्वर्गाचा आनंद लुटू पहात आहेत! एवढी निर्लज्ज माणसं जगाच्या पाठीवर कुठे नसतील! आणि या तिथे मौजेसाठी गेलेल्या लोकांना लष्कराने संरक्षण द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे.
काश्मीर मध्ये पर्यटन हा एक फार मोठा व्यवसाय आहे… त्यांच्यासाठी पर्यटक देव असतीलही… पण त्यांना कुठलेही देव चालतील.. फक्त यांनी पैसे दिले पाहिजेत. पहलगाम हल्ल्यानंतरही तिथे जाणा-या लोकांची मानसिकता अनाकलनीय आहे. असो. यावर कोण काय करणार?
कोणत्याही समाजघटकाला या जगाच्या गदारोळात टिकून राहायचे असेल तर एकी हेच बळ. हे पक्ष्यांना समजते…. आपल्या पक्षांना कधी समजणार?
पहलगाम हल्ला झाल्यानंतर सर्व पर्यटक परतले असते तर एक मोठा निषेध नोंदवला गेला नसता का? या पर्यटकांच्या परत जाण्याने तेथील व्यावसायिक कायमचे उपाशी मेले नसते! आणि त्यांनी या आधी गेली कित्येक महिने प्रचंड कमावले होतेच की! त्यांनाही थोडी कळ लागू दिली असती तर काय बिघडले असते? क्रियेला काय प्रतिक्रिया येते त्यावर अनेक बाबी अवलंबून असतात!
एक राष्ट्र म्हणून, एक समाज घटक म्हणून आपण एकमुखी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती…. असे जोवर होत नाही तोवर…… पहलगाम सारखी अनेक ठिकाणे तिथे आहेत… देशात आहेत… सैनिक त्यांच्या कर्तव्यावर आहेत… ते म्हणत राहतील… हम INDIAN ARMY है…. tension मत लो! आणि आपले लोक त्यांना TENSION देत राहतील!
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈