(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण रचना – “सबके भगवान तो एक ही हैं” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ “सबके भगवान तो एक ही हैं” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆
दुनियाँ है बड़ी बिखरी सी कड़ी, पर सबकी बनावट एक सी है
हर रोज छटा नई होती है पर धरती की सजावट एक सी है
जलथल नभ ताप पवन मौसम सारी दुनियाँ में एक से हैं
रोना गाना खुशियाँ औ गम, हर देश में सबके एक से हैं ।।
☆
पूरब पश्चिम हो देश कोई इन्सान की सूरत एक सी है
गति मति रति चाल चलन जीवन की जरूरत एक सी है।
दिन रात सुबह और शाम कहीं भी हों, सब होते एक से हैं
सब सूरज, चाँद सितारों के संग जगते और सोते एक से हैं
☆
संसार में हर एक प्राणी की अपनी सक्रियता एक सी है
है साफ इसी से इस सारी दुनियाँ का रचियता एक ही है।
है तथ्य यही है तत्व वही उसे राम कहो या रहीम कहो
रब, वाहे गुरु, अल्लाह, मसीह, जरश्रुस्त या कृष्ण, करीम कहो
☆
जो जैसा चाहे ध्यान करे, पूजा अर्चन या याद करे
मंदिर मस्जिद गिरजा गुरुद्वारे में जाके अरदास करे।
जब तत्व है एक तो भेद कहाँ ? उसका सन्मान तो एक ही है
साकार हो या आकार रहित जग का भगवान तो एक ही है
☆
अपने अज्ञान के चक्कर में, हम अलग नाम ले फूले हैं
रंग रूप धर्म या बोली के फिरकों में बँट कर भूले हैं ।।
माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢
तो फेब्रुवारी महिना होता. बाहेर उन मी मी म्हणत होते. आम्ही गावी चाललो होतो. अन्शीच्या घाटातून गाडी वळणे घेत जात होती. शिशिराचे आगमण झाल्यामुळे पानगळ चालू होती. झाडांची पाने गळून झाडे नुसत्याच फांद्याबरोबर झुलत होती. येरवी गर्दहिरव्या घनदाट झाडीतून न दिसणारी घरे तुरळक दिसत होती. भोवताली गर्द झाडी आणि कुठेतरी ओहळातून शेतीसाठी तयार केलेले वाफे नजरेस पडत होते. पहावे तिकडे घनदाट जंगल ,उंच डोंगर , कुठेतरी उतारावर दिसणारे चार घरांचे खेडे. उदरनिर्वाहासाठी केलेली भातशेतीची छोटी छोटी
वाफाडी .मुख्य रस्त्यावरून आत जंगलात पायवाट जाताना दिसली की, लक्षात येते तिथे लोकवस्ती असेल. मनात विचार आला इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन कसे रहात असतील इथले लोक ?
गायींचे कळप रस्त्याच्या कडेने धुळ हुंगताना दिसत होते. त्यांच्या मागे कुणी राखणदार दिसत नव्हता.घनदाट झाडीतून पाखरांचे विविध आवाज कानावर पडत होते. आमची गाडी घाटातून वर आली तेंव्हा रस्त्याच्या कडेला एक चौदा-पंधरा वर्षाची मुलगी हातात रानफुलांचा हार घेऊन उभी दिसली.आम्ही गाडी थांबवताच तिचा चेहरा आनंदानी खुलला .तीने गाडी जवळ येऊन हातातील हार घेण्यास आम्हाला विनवू लागली. इतक्या रखरख उन्हात ती हार विकण्यास उभी होती. मला तिचे कौतुक वाटले. म्हणावे असे चांगले कपडे अंगावर नव्हतेच. तिच्या कपड्यावरून तिची गरिबी जाणवत होती.
हार पुढे करून ती आम्हाला विनवू लागली,” दहा रूपयाला हाय!घ्या यकच राहिलाया “.
मी तिला विचारले ,” इथे घर तर दिसत नाही. तू कुठे रहातेस?”.
तिने झाडीतून दुर बोट दाखवत एक घर दाखविले आणि स्मितहास्य करत म्हणाली “तिथं “.
नंतर मी विचारले, “हा हार कुणी गुंफला “.
तीने लगेच सांगितले ,मी फुलं आणून दिली. आणि आजीनं हार बनवला. मी शाळेत जायाच्या आधी फुलं आणून ठेवती.आजी हार बनवून देती . शाळेतनं आल्यावर रोजच मी हार इकायला इथं उभी रहाती .आईला तेवढीच मदत ह्युती खर्चाला “
ती मोठ्या धैर्याने बोलत होती. ती पुन्हा कविलवाणी होऊन आम्हाला आम्हाला हार घेण्यास विनवू लागली.मी तिला विस रूपये देवून तिच्या कडून हार घेतला. लगेच ती दहा रूपये परत करू लागते मी म्हटले “राहुंदे ठेव तूला”.
पैसे पाहून तिचा चेहरा आनंदात उजळतो. ती खूप आनंदी होते.
आम्ही पुढे निघून गेलो. पण त्या मुलीचा गोड, आनंदी चेहरा कितीतरी वेळ नजरेत रेंगाळत राहिला. लोक रोज हजारानी पैसे कमावतात पण समाधानी नसतात. तो हार विकून विस रूपये मिळताच तिचा चेहरा आनंदानी फुलून गेला. उन्हातान्हाचे ,घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्यावर हार विकून मिळालेल्या दहा-विस रूपयांचे पण केवढे ते समाधान ! केवढा आनंद! .आपण किती पैसे कमावले तरी आपला हव्यास संपत नाही. त्या निरागस , गरीब , कोवळ्या वयातील मुलीला आपली आजची गरज भागली या कल्पनेनेच किती आनंद झाला. खरा आनंद हाच असेल का ?आपल्या मुलांना आपण किती खाऊ महागाची खेळणी आणून दिले , तरीपण त्यांच्या मागण्या बंद होत नाहीत . वाढत्या वयासोबत त्यांच्या मागण्या सुध्दा वाढत जातात. पण प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले दहा-विस रूपये पण किती आनंद देतात हे त्या मूलीकडे पाहून कळले.
आम्ही घरी पोहचेपर्यंत तो रान फुलांचा हार सुकून गेला . पण त्या मुलीच्या चेहर्यावरचा आनंद तसाच ताजाटवटवीत राहून कितीतरी दिवस मनात रेंगाळत
राहीला आणि त्या रानफुलांचा गंध मनाला सुखावत राहिला.
(एक दिवस आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून.) इथून पुढे –
मी दहावीची परीक्षा दिली होती. मी मामाकडे आले. त्याच्या संसारात मी जडच होते त्यांना ! मामा म्हणाला, “ बकुळ,आपण लग्न करूया तुझं ! “ पण बाई, हे असले किळसवाणे अनुभव घेऊन मला पुरुष देहाबद्दल प्रचंड तिटकारा वाटायला लागला होता..मी मामाला सांगितलं, “ मी जन्मात नाही लग्न करणार. तू जर माझं लग्न बळजबरीने लावलंस तर मी जीव देईन.” त्यांना दोघांना मी घडलेली हकीकत सांगितल्यावर तर रडूच आलं त्यांना. मी गावाकडे केली बारीकसारीक कामं, पण तिथे कोण देणार एवढा पैसा? मग मला एका बाईंनी पुण्याला आणलं. त्या मावशींनी छान काम दिलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं पण मिळाली. बाई, मी कायम राहीन तुमच्याकडे. मला आता दुसरीकडे नका ना पाठवू. “
देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. “ बकुळ, तू फार गुणी आणि हुशार आहेस. तू असं आयुष्य वाया नको घालवू ग. पुढे शीक, असं काहीतरी शिक्षण घे की तुला सन्मानाने जगता येईल. मी शिकवीन, सगळी मदत करीन तुला. शिकशील का पुढे? बघ ! किती मार्क होते तुला दहावीला? “ बकुळ म्हणाली “ ऐशी टक्के “ “अग वेडे, मग तर तू घरकाम नाहीच करायचं. आपण तुला डी एड ला घेऊया प्रवेश. करशील ना? दोन वर्षे शिकावे लागेल पण जन्माचं कल्याण होईल ग बाळा तुझं !”
“ बाई,मी नक्की करीन तुम्ही म्हणताय तर ! तुम्हाला अपयश देणार नाही मी .आणि तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन मी! “
“ वेडे, ते बघू नंतर. मला काय कमी आहे बकुळ? तू फक्त वीस वर्षाची आहेस जेमतेम. बघूया काय करता येतं ते.” एका प्रख्यात कॉलेजमध्ये बकुळला डी एड ला सहज प्रवेश मिळाला. बकुळ लवकर उठून जमेल तेवढं काम करून कॉलेजला जायची. राहीने आनंदाने बकुळला आपली सायकल दिली. तिने नवीन टू व्हीलर घेतल्याने सायकल पडूनच होती तिची. बघता बघता बकुळच्या डीएडचं पहिलं वर्ष संपलं. बकुळला खूप सुंदर मार्क्स मिळाले. आता ती त्या कॉलेजमध्ये रुळून गेली. तिला काही वेळा वाटायचं, आपण काम करणारी मुलगी आहोत, आणि दिवसभर हा कोर्स करत असल्याने आपला घराला पूर्वीसारखा उपयोग होत नाही. ही खंत ती बोलून दाखवायची देवकीला. देवकी तिला म्हणायची, “असं नको म्हणू. माझी मुलं लहान असताना तू खूप मदत केली आहेस बकुळ ! आता निवांत शीक, लक्ष लावून अभ्यास कर बेटा. सगळं छान होईल तुझं बघ.” बकुळ चांगल्या मार्कानी डीएड झाली. तिला एका शाळेत नोकरीची ऑफर सुद्धा आली.
.बकुळ पेढे घेऊन आली आणि तिने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ अग वेडे, हे काय करतेस? “ देवकीने तिला पोटाशी धरलं. “ नाही हो बाई, मी बघते ना, आमच्या डी एड कॉलेजमध्ये कुठून कुठून मुली येतात हो ! त्या किती कष्ट करून शिकतात, कोणी पहाटे मेसमध्ये दोनशे पोळ्या करून येतात, तर कोणी चाकणहून रोज अपडाऊन करतात. किती हाल आहेत बाई बाहेर ! कोणाचे वडील दारुडे तर कोणाची आईच अपंग ! किती किती सोसतात हो मुली बाहेरच्या जगात !” बकुळच्या डोळ्यात पाणी होतं हे सांगताना. “ बाई,एक मुलगी तर पोलिओ झालेली आहे पण किती जिद्दीने शिकतेय. मी तर किती भाग्यवान आहे हो, तुमच्या घरी सुरक्षित राहून शिकले आहे. मुलीसारखी मानता मला तुम्ही. बाई, हे बघा ना माझं लेटर. मला पंधरा हजार पगार देणार आहेत सुरुवातीला. मी करू ना ही नोकरी? “
“ अग जरूर कर बकुळ ! खूप खूप अभिनंदन तुझं ग !”
“ बाई,” संकोचून बकुळ म्हणाली.. “ मी आता इथे किती दिवस रहाणार? मी डी एड कॉलेजच्या वसतिगृहात राहीन आता. मला ते कमी खर्चात तिकडे राहू देणार आहेत. आता आणखी नका लाजवू. जाऊ द्या मला आता बाई !” बकुळ रडायला लागली. सगळं घर तिच्याभोवती जमलं.आजींना सुद्धा गहिवरून आलं… “ जा तू बकुळ. अशीच स्वतःच्या पायावर उभी रहा.” आजींनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले. “ सुट्टीच्या दिवशी येत जा हो रहायला हक्काने!” त्या म्हणाल्या.
देवकीने बकुळला छानशी बॅग दिली, छान साड्या घेऊन दिल्या. बकुळ होस्टेलवर राहायला गेली. तिने देवकीशी कायम संपर्क ठेवला. बकुळ आता पर्मनंट झाली नोकरीत. मग तिचं फारसं येणं जाणं होऊ शकेना देवकीकडे. देवकीची मुलं मोठी झाली. रोहन राही पुढचं शिकायला अमेरिकेला गेले आणि घरात देवकी आणि तिचा नवरा एवढेच उरले. आजीही मध्यंतरी कालवश झाल्या.
आज अचानक खूप वर्षांनी बकुळ देवकीला भेटायला आली. “ बाई, कशा आहात? “ म्हणून तिने मिठीच मारली देवकीला. “ बाई मी आता एका शाळेत सुपरवायझर झाले, आणि मी त्या शाळेच्या हॉस्टेलची मेट्रन म्हणून पण काम करते. मला शाळेने रहायला क्वार्टर्स पण दिले आहे बाई ! तुमची कृपा सगळी … “ बकुळच्या डोळ्यात अश्रू होते. “ बाई, मला लग्न कधीच नाही करावंसं वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाहीये. मी आता अशीच मस्त राहीन. नको वाटतो तो अनुभव मला. आणि खूप मिळवतेय की मी ! बाई तुमचे उपकार कसे फेडू? नाही तर ही बकुळ अशीच घरकाम करत, कदाचित अशीच मरूनही गेली असती. तुम्ही देवमाणसं आहात बाई ! “ बकुळने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ बाई डोळे मिटा ना जरा….” बकुळ हसत म्हणाली.
देवकीने हसत डोळे मिटले. बकुळने तिच्या हातावर काय ठेवले हे बघायला डोळे उघडले तर हातात सोन्याचे चांगलेच जड नाणे होते. “ बाई, तुम्ही माझ्यासारख्या दगडातून सोनं घडवलं म्हणून हे माझी आठवण म्हणून तुम्हाला ! नाही म्हणू नका ना ! तुम्ही केलंत ना, त्यापेक्षा याची किंमत कमीच आहे, पण आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला घडवणाऱ्या पहिल्या गुरूला ही गुरुदक्षिणा ! ”
देवकीने बकुळला जवळ घेतले आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “आनंदाश्रू आहेत हे बकुळ… नको पुसू !” देवकी म्हणाली आणि आत चहा करायला वळली.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
ऑक्टोबर महिना…. ! अर्थात भाद्रपद अश्विन…,,!!
या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली…. !
तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते…. !
आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी…. ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता…. !!!
यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा…. असं नाही…. !
या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिची पुजा…. !!!
आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तिच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तिच्यापुढे जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे ही त्या आईची पूजा….!
काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं… ही त्या आजीची पूजा… !
येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे…. ! मी कशासाठी आहे… ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा…. !!
अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू…. तिथं आभाळात जाऊन झेप घे… तिथं काय अडचण आली तर मला हाक मार… मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा…. !!!
आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत… पण अक्षरशः आम्ही “नव रात्री” जगलो…. !
पहिला दिवा –
अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याकडेला पडलेल्या “निराधार” आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं… … यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत…. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही….!
बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ?
आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ??
…. असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत… खत पाणी घालत आहोत….
…. आम्हाला फळं नकोच आहेत. एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे….!
दुसरा दिवा –
फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या… एक? दोन ?? तीन??? नाही… तब्बल १३४१ …!!!
पूर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनींनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून… पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत.
या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल… त्यांचे समाजात कौतुक होईल आणि भीक मागणाऱ्या इतर माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.
या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे …. ज्यांच्या दहा फुटावर सुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले…
… कुठुन येतं हे…? कसं येतं…?? आणि का ??? काय मिळत असेल यांना…????
या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले…!
तिसरा दिवा –
भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या “कुमारिकांचे” या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता.
सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती…!
आम्ही या सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सरस्वती पूजन केले.
संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले.
…… मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो…!
आई आणि बापाला अजून काय हवं ?
माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले…. आणि काय सांगू राव…. हे “ड्राय” फ्रूट अश्रुंनी “ओले” होवून गेले… !!!
चौथा दिवा –
ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले… !
गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत…!!!
घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत.
हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, आणि आमच्यासाठी त्यादिवशीच विजयादशमी होती!!!
☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे ☆
अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधली ही नदी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडी पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती.
बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचे लक्षात आले.
येलो स्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकाच नव्हे, तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे सन १९०० पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते.
लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल ‘हे कसं शक्य आहे?’ तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल….
…अन् नदी जीवंत झाली.
ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे आणून सोडण्यात आले. आणि पुढच्या पंचवीस वर्षांत परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. २०१९ मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले. तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला.
…. तर त्याचं झालं असं, की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्षे जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचेच काम केले होते.
गवताबरोबरच जंगली झाडे, त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते.
पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही. परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली.
जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं. त्यामुळे हरणे राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली. अगदी सहा-सात वर्षांतच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले.
मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली. नदी खळखळू लागली… आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज अन् पडझडही थांबली.
अन्नसाखळीचे महत्त्व…
आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे अन् सापांमुळे शिकारी पक्षीदेखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे आला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षीदेखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले.
या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आले, कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले, त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखा बिवरेज वा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले.
हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं, फांद्या टाकून बांध करू लागली. त्यांनी केलेल्या या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळे बदकं आली, हेरॉन, बगळ्यांसारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलेदेखील आली. बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य.
तिथे असलेल्या क्वायटीज या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंदऱ्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी.
याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन् प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित झाली. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ चौदा लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.
ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातल्या सगळ्यांच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम अन् बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जल स्रोतांतील पाणी आटले आहे.
यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे (Food chain pyramid) नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाश ही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या यांचे आकलन आवश्यकच आहे.
☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी काका ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
जेणे जिंकीली रसना ।
तृप्त जयाची वासना ।
जयास नाही कामना ।
तो सत्वगुण ।
…समर्थ रामदास
ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.
एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.
सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !
सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर.थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !
दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळूशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !
पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डॉक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणु काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!
ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !
ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !
आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
तिला जर भगवंताच्या नामात अडकवले तर नराचा नारायण करण्याची ताकद असणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ.
उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना……
त्याची जिरोनी गेली वासना….
लेखक :श्री.चंद्रकांत जोशी काका, ठाणे
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈