☆ राजधानी में बाल कल्याण एवं बाल साहित्य शोध केंद्र द्वारा बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” सम्मानित ☆
भोपाल। बाल कल्याण एवं बाल साहित्य शोध केन्द्र भोपाल अपना 15 वां वार्षिकोत्सव एवं सम्मान समारोह, मानस भवन श्यामला हिल्स भोपाल में 9 मई 2024 को 9 बजे संपन्न हुआ।
यह गरिमामय कार्यक्रम मप्र की राजधानी के सम्मानित अतिथि महानुभावों की उपस्थिति में आयोजित किया गया हैं। इस कार्यक्रम में प्रो. खेमसिंह डहेरिया, कुलपति-अटल बिहारी वाजपेयी, हिंदी विश्वविद्यालय भोपाल, श्री देवेन्द्र मोरे, अध्यक्ष, बाल अधिकार संरक्षण आयोग, भोपाल, डॉ. राजेश श्रीवास्तव, अध्यक्ष, रामायण केन्द्र भोपाल, श्री विकास दवे, मप्र साहित्य अकादमी भोपाल, डॉ. उषा खरे, रामायण केन्द्र, प्रिंसिपल और ब्रांड एंबेसडर स्वच्छता भोपाल के करकमलों से मानस भवन में संपन्न हुआ। जिसका संचालन प्रख्यात कवि दिनेश प्रभात ने किया हैं। इस गौरवशाली सम्मान कार्यक्रम में मास्टर श्री गेंदालाल जायसवाल, बाल साहित्यकार सम्मान, बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” को प्रदान किया गया हैं। जिसके अंतर्गत पुरस्कार स्वरूप नगद राशि, स्मृति चिन्ह, प्रतीक चिन्ह, शाल, श्रीफल, पुस्तकें आदि देकर सम्मानित किया गया।
स्मरणीय रहे कि बाल कल्याण एवं बाल साहित्य शोध केंद्र भोपाल द्वारा उन्हीं बाल साहित्यकारों को सम्मानित किया जाता है जिन्होंने अपने क्षेत्र में कोई उल्लेखनीय कार्य लंबी अवधि तक किया हो। जिनके साहित्यिक कार्यों से बालहित में श्री वृद्धि हुई हो। ऐसे साहित्यकारों को सम्मानित करना ही बाल साहित्य शोध केंद्र का उद्देश्य रहा है। इस कारण इस संस्था द्वारा किसी बाल साहित्यकार का सम्मानित होना बहुत बड़ी बात मानी जाती है। यह उपलब्धि इस वर्ष ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को मिली है। जिसके लिए उन्हें साहित्यकार साथियों, ईष्ट मित्रों और सगे संबंधियों ने ढेर सारी बधाइयां और शुभकामनाएं दी है।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
दीप हे अग्नीचे व तेजाचे प्रतिक आहे तर ज्योती हे ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतिक आहे. मानवी जीवनात दिव्याला फार महत्व आहे. कारण दिवसा तळपणारा सूर्य असतो पण रात्री अंधार नष्ट करण्यासाठी मानव निर्मित दिव्याची गरज असते.
पूर्वी प्रकाशासाठी व कुठेही नेण्याला सोपे असे कंदील, चिमणी वापरली जायची. देवळात काचेच्या हंड्यातील दिवे असायचे तर बाहेर दीपमाळ असते आणि गाभाऱ्यात नंदादीप अखंड तेवणारा!श्रीमंतांच्या दिवाणखान्यात हंड्या, झुंबरे असत. त्यांचा वापर मेणबत्या लावून व्हायचा. समूहासाठी आधी मशाली मग बत्त्या, नंतर पेट्रोमॅक्स चे दिवे आले. कंदील कालबाह्य झाले तसं घरोघरी विजेवर चालणारे दिवे आले. त्यांच्या अनिश्चिततेमुळे emergency दिवे, मेणबत्या आल्या. आता तर सोलर दिवे वापरात आले आहेत.पूर्वी सजावटीसाठी आधी तेलाच्या पणत्या, मग मेणाच्या पणत्या, अलिकडे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या, विविध आकारातल्या लाईट च्या, LED च्या माळा असतात.
अर्थात दिव्यांचे प्रकार, नमुने, त्यांचं सौंदर्य यात विविधता असली तरी त्यांची गरज बदलली नाही व आपली संस्कृतीही बदलली नाही.आजही तिन्हीसांजेला ‘दीपज्योती नमोस्तुते ‘ म्हणत देवघरात समई लावली जाते, तुळशीसमोर दिवा ठेवला जातो. कांहीही म्हणा पण तेल, तूप यात तेवणारी मंद ज्योत जी प्रसन्नता, मंगलता, सात्विकता, शुभकारकता यांची अनुभूती देते ती दुसरी कोणतीही ज्योत देऊ शकत नाही.आपण नकळत तिच्यासमोर नतमस्तक होतो.
आपल्या संस्कृतीत दीप प्रज्वलनाला फार महत्व आहे. दिवा तमनाशक असल्याने तो प्रकाशाची आस जागवणारा, ऊर्जा देणारा, शुभकारक!म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करतात. कोणतीही पूजा पूर्ण होईपर्यंत तेलाचा व तुपाचा दिवा तेवत ठेवलेला असतो. षोडशोपचारे पूजा करताना शंख, घंटा, कलश याबरोबर दिव्याची ही पूजा करतात. नवरात्रासारख्या कुळाचाराच्या वेळी किंवा अनुष्ठानाच्यावेळी अखंड दीप, नंदादीप ठेवला जातो. आषाढ अमावस्या दिव्याची अवस म्हणून साजरी केली जाते. दीपावली सारखा दिव्याचा सण साजरा करतो. दीप- आवली, म्हणजे दिव्यांची ओळ! कार्तिक पौर्णिमेला पाण्यात दिवे सोडले जातात.
तसं पाहिलं तर हिंदू संस्कृतीत अग्निलाच खूप महत्व आहे. तो अग्नेय दिशेचा रक्षक असून पंचमहाभूतांपैकी एक आहे. इंद्राखालोखाल महत्वाचा देव अग्नि आहे. हिंदू संस्कारात नामकरणापासून मृत्यूपर्यंत सगळे संस्कार अग्निच्या साक्षीने होतात. फक्त नामकरणादिवशी होम नसतो पण तेलाचे दिवे लावले जातात. अग्नि ही उर्जा असल्याने निर्मिती, पोषण, नाश सर्वांना कारणीभूत आहे. म्हणून अग्नि हा परिवर्तनशील मानतात. गर्भ निर्मिती करतो, पोषणाने त्याचे बाल्यात, मग शैशवात , तारुण्यात , गृहस्थात परिवर्तन करतो आणि शेवटी देहाचा नाश करून मुक्त आत्म्याला दुसऱ्या देहात परिवर्तीत करतो. कांही घरात संध्याकाळी अग्निहोत्र करतात. अग्निद्वारे होमातील आहुती देवांपर्यंत पोचविल्या जातात. होळीदिवशी अग्नीची पूजा केली जाते.
दिव्याचा एक प्रकार रोजच्या वापरातला म्हणजे निरांजन!निरांजन हा शब्दच किती शांत, मृदू, नि वत्सल आहे.मूळ शब्द निरंजन, निः + अंजन, पवित्र, निष्कपट, काजळी न धरणारे, शुभकारक, सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांचे वहन करणारे!
आपल्याकडे ज्या ओवाळण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्या सविस्तर सांगणार आहे कारण सिरीयल मधलं ओवाळणं पाहून हीच खरी पद्धत आहे असं वाटायला लागलंय.आपण
देवाला ओवाळतो त्याला देवाची आरती म्हणतात. आरतीसाठी ताम्हनात दोन निरंजने ठेवावी, त्यात तुपाच्या दोन दोन फुलवाती(फुलासारख्या दिसणाऱ्या कापसाच्या तयार केलेल्या )घालव्यात. कापूर घालून कापुरारती ठेवावी व अक्षता ठेवाव्या. आपण आरतीतून देवाची स्तुती करतो व त्याच्याकडे आशीर्वाद मागतो. त्यामुळे आरती करताना ज्या देवाची आरती करणार असू त्या देवावर अक्षता टाकायच्या व ओवळायचं. आरती झाली कि ज्योतीत जे तेज येतं किंवा देवाचा आशीर्वाद येतो, तो उपस्थित सर्वांना मिळावा यासाठी आरतीचं ताट फिरवतात. सगळे ओंजळीने ते तेज घेऊन मस्तकावरून तो हात फिरवतात. आरतीचं ताम्हन परत देवासमोर ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवतात. बऱ्याचवेळा आरती नंतर मंत्रपुष्प म्हणतात त्यावेळी उपस्थितांना फूल व अक्षता किंवा नुसत्या अक्षता देतात. उजव्या हातात अक्षता ठेवून त्यावर डावा हात झाकावा. म्हणजे त्या अभिमंत्रित होतात अशी कल्पना. मंत्रपुष्प झाल्यावर त्या अभिमंत्रित अक्षता देवावर वाहून नमस्कार करावा. कधी कधी निरंजना ऐवजी पुरणाचे पाच दिवे करून त्यात तुपाच्या पाच वाती लावून देवाची आरती करतात. नंतर कांही लोकांच्यात त्या पुरणाच्या आरतीने घरातल्या मुलांना ओवाळतात.ज्योतीमधील देवाचा आशिर्वाद मुलांना मिळावा यासाठी, (इथे सुपारी फिरवत नाहीत ) कारण हे ओवाळणे बहुधा श्रावण शुक्रवारी करतात त्यावेळी आपण ज्या जीवतीच्या कागदाची पूजा व आरती करतो ती लहान मुलांचं रक्षण करणारी आहे.
अक्षताही पवित्र व सकारात्मकता वाहणाऱ्या मानतो. मूळ शब्द अक्षत, म्हणजे छिद्र किंवा जाळी नसलेला, म्हणून अक्षता करण्यासाठी अखंड तांदूळ घेऊन त्याला तेलाचा हात लावून कुंकवाने लाल करतात. तसेच फक्त देवाची पूजा, आरती करताना तूप व फुलवाती लागतात. एरवी केंव्हाही निरांजन किंवा दिवा, समई लावताना तेल व वळलेल्या वाती लागतात.
जेंव्हा आपण माणसांना ओवाळतो त्याला औक्षण म्हणतात. औक्षण म्हणजे आशिर्वाद देणे, दृष्ट काढणे.उदा. वाढदिवस, यासाठी ताम्हनात दोन निरांजने घ्यावीत, त्यात वळलेल्या वाती, प्रत्येक निरांजनात दोन दोन च्या दोन, अशा एकूण आठ वाती व तेल घालतात. ताम्हनात अक्षता व सुपारी ठेवावी. सोन्याची अंगठी प्रत्येक घरात असेलच असे नाही त्यामुळे ती हौस म्हणून असेल तर घ्यावी. महत्व सुपारीला आहे.ज्याचं औक्षण करायचं त्याला उभं किंवा गोल (मुलगा, मुलगी याप्रमाणे )कुंकू लावावे.हे मात्र कुठल्याही प्रसंगी ओवाळताना लावावे.मुलाला उभे कुंकू लावणे यालाच नाम ओढणे म्हणतात. मग डोक्यावर अक्षता टाकून एकदा ताम्हन गोल फिरवावे,हातात सुपारी घेऊन ओवाळणाऱ्याने आपल्या डाव्याबाजूने उजवीकडे अर्धगोलात सुपारी फिरवावी व ताम्हनात टेकवावी, मग उजवीकडून डावीकडे ताम्हनात टेकवावी व शेवटी आणखी एकदा डावीकडून उजवीकडे आणून ताम्हनात ठेवावी. त्यापूर्वी कांही ठिकाणी सुपारी व अंगठी कपाळाला लावतात. हे औक्षण आशीर्वादाचे असल्यामुळे मोठ्यानी छोट्याना ओवाळायचे असते. याशिवाय गणपती, गौर आणणाऱ्यालाही पायावर दूध पाणी घालून दारातून आत आल्यावर ओवाळतो. तेंव्हा आशिर्वाद द्यायचा नसल्याने सुपारी फिरवत नाहीत फक्त दोनदा अक्षदा टाकून ताम्हन फिरवतात. कदाचित ते फक्त देवाचं स्वागत असावं. असं ओवाळून स्वागत, जिंकून आलेल्या व्यक्तीचं दारात करतात.
भाऊबीज, रक्षाबंधन, पाडवा हे नाजूक बंध असणाऱ्या नात्यासाठीचे सण असतात. त्यावेळी ओवाळणी घालणं असल्यामुळे वयाचा विचार केला जात नाही. ओवाळताना सुपारी फिरवली जात नाही. ज्याला ओवाळतो त्याच्या हातात सुपारी द्यायची व त्याने ती ओवाळणीसह ताम्हनात ठेवायची. ओवाळणी म्हणून एक रुपायचं नाणं सुद्धा चालतं, एकमेकांतलं प्रेम ओवाळणी पेक्षा महत्वाचं असतं.नेहमीप्रमाणे दोनदा अक्षता टाकून ताम्हन फिरवायचं.
मोठ्यांच्या 61,75,81,100 अशा महोत्सवाच्या वेळी वयाएवढ्या वातीनी ओवाळतात, त्यावेळी ओवाळणारे बहुधा त्या व्यक्तीपेक्षा लहानच असतात त्यामुळे फक्त वातींचे ताट फिरवतात.
अर्थात यांसगळ्या गोष्टी श्रद्धेच्याच आहेत. हे असंच का याला तर्कशुद्ध उत्तर देता येणार नाही. कदाचित कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी प्रेम भावनेने जोडून ठेवावं, प्रत्येकाला कुटुंबात कांही विशिष्ट स्थान असावं, कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असावी, घर आनंदी असावं. आपलं कुटुंब कोणत्याही संकटापासून दूरअसावं, एवढाच निर्मळ विश्वास किंवा आशावाद असावा.श्रद्धेचा पाया असला कि नात्यांची इमारत सहज कोसळत नाही. आणि असंच करावं, अशी पद्धत घालून दिली कि आत्मियतेने गोष्टी केल्या जातात.ऊरका पाडून प्रसंगाचं, सणाचं महत्व कमी होऊ नये यासाठीही!
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमम् l
गृहाणं मत्कृतां पूजा, सर्वकाम प्रदो भवः॥
हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामधे उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्विकार कर. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
(वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं. पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.) – इथून पुढे
त्यादिवशी बाकावर पागेबाई एकट्याच बसल्या होत्या. नानीनं दुरूनच त्यांना पाहिलं. जरा उदासच वाटत होत्या. मग नानी त्यांच्या शेजारी जाऊन बसली. पागेबाईंनी लगेच त्यांचा हात धरला.
” काय झालं मायाताई ?”
“काही नाही हो! नेहमीचच.”
नानीने थोडा वेळ जाऊ दिला. फारसे काही प्रश्न विचारले नाहीत. मग त्याच सांगू लागल्या,
” किती वर्ष मी या दोघांना सांगत होते मला नातवाची पावलं दाखवा रे! आठ वर्षे झाली यांच्या लग्नाला. विषयच काढू द्यायचे नाहीत. मुल जन्माला घालण्यापूर्वीचं यांचं बजेट ठरलेलं असतं म्हणे! ते गाठेपर्यंत थांबायचं. अरे पण तुमच्या वयाचं काय रे? ते थांबणार आहे का? मूल जन्माला येणं महत्त्वाचं नाही का? ते वाढेलच की आपोआप. त्यासाठी बजेट कशाला हवं? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याची किंमत आता मोजावी लागते. तारुण्य सरलं आता ivf च्या पाठी लागलेत. काय म्हणाव यांना? मोठ्यांचे सल्ले यांना पटत नाहीत. त्यांच्या अनुभवांशी यांचं काही देणंघेणं नसतं. यांचा विश्वास प्रगत विज्ञानावरच. फक्त विज्ञान हाच त्यांचा आधार हो! बाकी निसर्ग तत्वांशी यांचं नातच नाही. मान्य आहे रे बाबांनो तुम्ही सारे खूप प्रगत आहात, खूप पुढे गेली आहेत तुमची तंत्र. पण तंत्र, यंत्र आणि निसर्ग यांचा काही ताळमेळ आहे की नाही? सगळी नैसर्गिक मजाच हरवून बसतात जीवनातली. नाही का हो?”
नानी एकदम भानावर आली मायाताईंच्या प्रश्नाने. मायाताईंच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर नैराश्य होतं. सगळे पेशन्स संपले होते.
नानी मात्र एवढेच म्हणाली, “नका इतके गुंतून घेऊ स्वतःला. काळ बदलतो, जीवन बदलतं. त्यांचं आयुष्य त्यांचे निर्णय. जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. आपण फक्त प्रार्थना करायची. ठेच लागली तर आधार द्यायचा. तोही त्यांना हवा असेल तर?”
” काय बोलताय तुम्ही? असं कुठे असतं का?”
असं म्हणत पागेबाई उठून गेल्या. त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे नानी पहात बसली. क्षणभर तिला वाटलं “हे कालचक्र फिरताना प्रत्येक मागच्या पिढीचं या पागे बाई सारखंच होतं का?”
नानीचीही पंच्याहत्तरी उलटली होती. नाना जाऊन वीसेक वर्ष झाली असतील.नानी निवृत्त झाल्यावर राघव म्हणाला, “नानी तू आता एकटी राहू नकोस.”
तसा हा निर्णय खूप मोठाच होता आणि नानीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला पलटी देणारा होता. नानीला एकटं राहण्याची सवयी झाली होती. शिवाय दोघात तिसरा नकोच हाही एक विचार होताच. तशी नानी आर्थिक दृष्ट्या अवलंबूनही नव्हती. तिचे भरभक्कम पेन्शन होते. स्वतःची सेविंग्ज होती. नानांची थोडीफार पुंजी होती. पण त्याला तिने कधीही हात लावला नाही. फक्त नियोजन केलं आणि राघव साठीच राखून ठेवलं.
अनेक कडू गोड आठवणींना मागे ठेवून घराचा उंबरठा कायमचा ओलांडणं नानीला जड गेलं होतं. पण राघव बरोबर राहताना दोघांच्याही आयुष्यात होणाऱ्या बदलांचं काय करायचं याचं एक निश्चित धोरण तिनं आखलेलं होतं आणि म्हणूनच असेल राघव, राघवची बायको आणि रिमा यांच्या आयुष्यातलं तिचं होणार आगमन त्या वेळेपासून कुणालाही त्रासदायक वाटलंच नाही.
नानी खूप वेळा विचार करते की कुठलाही बदल ही समस्या कशी होऊ शकते? बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खरी समस्या असते. नानी सतत एक सकारात्मक दृष्टिकोन जपत आली. तिचं एकच उत्तर असतं सगळ्यांवर,
” बरं.”
या “बरं” मध्ये खूप काही व्यक्त, अव्यक्त साठलेलं असतं. पण याचा अर्थ ती नव्या पिढीच्या ताब्यात गेली आहे असं मुळीच नाही. तिच्या अस्तित्वावर फक्त तिचाच हक्क आहे. त्यावर कुणीही कुरघोडी करू शकलेलं नाही. फक्त दोन वेगळ्या विश्वातली एक अस्पष्ट रेषा तिने जाणीवपूर्वक सांभाळलेली आहे. ती सांभाळताना होणारी उरातली धडधड, उदासीनता, चीड, तुलना या साऱ्या भावनांवर तिने मात नसेल केली पण त्यांना नीट हाताळले आहे. हे नक्की.
या साऱ्यांसोबत नानीबरोबर तिची आई, आजी यांच्या आयुष्याची ही आठवण असते. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक रिकाम्या जागा नानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असते.
रात्र खूप झाली आहे. राघव दिल्लीला गेलाय. अवंती काही दिवसांसाठी ऑफिसच्या प्रोजेक्ट निमित्त सिंगापूरला गेली आहे. रिमा अजूनही घरी आलेली नाही. तिचाही कोणी मित्र आहेच. सकाळी निघताना तिने आजीला सांगितले होते की, ती त्याच्याबरोबर आज एका लाईव्ह कन्सर्टला जाणार आहे. मालतीबाईंचीही सुट्टी होती. नानीच्या मनात पुष्कळदा येतं रिमाला एकदा विचारावं,” तुझं आणि त्याचं नक्की नातं काय आहे?”
पण नानीला खात्री आहे ती म्हणेल “अग आज्जी आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आत्ता तरी.”
” आत्ता तरी” याचा नक्की अर्थ काय? अवंती जवळ सहजच बोलता बोलता नानीने विचारलं होतं,
” त्यांच्यात काही ठरतंय का?”
तेव्हां ती म्हणाली होती,
“नानी आज-काल मुलं काय मुली काय पटकन लग्नाच्या बंधनात पडत नाहीत. त्यांना सहवासातून एकमेकांची खरी ओळख करून घ्यायची असते. लग्न हा त्यांच्यासाठी फार पुढचा विचार असतो. नानीला प्रश्न तर पडलेच होते पण न विचारण्याचं धोरण तिने याही वेळेला राखलंच. फक्त अवंतीला म्हटलं मात्र, “तुम्हाला चालतय का हे सारं?म्हणजे तुला आणि राघवला?”
अवंती नुसतीच हसली.
” अहो नानी आमच्या चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आजकाल मुलांना फारसं विचारलेलंही आवडत नाही. विचारत राहिलं की संवाद तुटायला लागतो आणि त्यांच्या जीवनाचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहेत.
नानीला एवढंच जाणवलं हळूहळू सूनही मागच्या बाकावर येत चालली आहे. नानीला गंमत वाटली.
आकाशात भुरकट ढगांच्या पदरातून चंद्र संथपणे सरकत होता. कुणाच्याही सुखदुःखाची त्याला जाणीव नव्हती.अथांग आभाळात तो मुक्तपणे भटकत होता. आजचा चंद्र ही नानीला वेगळाच भासला. तिच्या अंतरातून जणू काही नकळतच स्वर आले,” अरे बाबा! या मानवाने तुला तरी कुठे सोडले? विश्वाच्या मनातल्या तुझा गोजिरवाण्या रूपाची चिरफाडच झाली ना?”
मग नानी बेडरूम मध्ये आली. थोडा वेळ तिने टीव्हीवरची एक मालिका लावली. तिथेही हेच सारं होतं. ती कुणी एक इशा, अरुंधतीला म्हणजे तिच्या आईला जोरजोरात तिचं म्हणणं पटवत होती. ताड ताड तिच्या बाबतीत घडलेल्या सगळ्या गोष्टींबाबत तिला दोष देत होती. बिनदिकतपणे ती बोलतच होती. शेवटी नानीने टीव्ही बंद केला.
मोबाईलवर मेसेजची ट्युन वाजली. मेसेज रिमाचा होता.
” आज्जी प्रोग्रॅम नंतर आम्ही सगळे विक्रमच्या फार्मवर जाणार आहोत. खूप जण आहोत आम्ही. काळजी करू नकोस. सकाळी ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघू. गुड नाईट! टेक केअर!
नानीने मेसेजला उत्तर दिलं.
” बरं.”
त्याही वेळेला तिच्या मनात एकच विचार आला निदान रिमाने कळवले तरी.
☆ “सज्जनगडावरीलप्रसादाचीखीर!…” – लेखक : डॉ. वीरेंद्र ताटके☆ श्री मोहन निमोणकर ☆
सज्जनगडावर भोजनप्रसादात मिळणारी गव्हाची खीर हा पीएचडीचा विषय होऊ शकतो. गेल्या शेकडो वर्षात गडावरील रामदासी लोक बदलले, त्यांची खीर करायची पद्धत देखील इतक्या वर्षांमधये बदलली असेल पण खिरीची चव मात्र जैसे तैशीच !
लहानपणी गडावर जाण्याचे मुख्य आकर्षण असायचे ते या खिरीचे….. आणि आता वयाने मोठं झाल्यावर…. खोटं कशाला बोलायचं…. आजही त्या खिरीचे आकर्षण तेवढेच आहे. काहीजण या खिरीला लापशी म्हणतात परंतु ‘खीर’ या शब्दात जो जिव्हाळा आहे तो ‘लापशी’ या शब्दात नाही.
भोजनप्रसादात या खिरीचे आगमन होण्यासाठी मोठी वाट पाहावी लागते. आधी प्रसादाच्या रांगेत उभे राहून आतून येणाऱ्या सुगंधावरून आज पानात भातासोबत फक्त आमटी आहे की एखादी भाजी सुद्धा आहे याचा अंदाज लावायचा… त्यानंतर थोड्या वेळाने ताटं-वाट्यांचा आवाज येतो. नंतर भोजनगृहात प्रवेश मिळाला की नामस्मरण झालं की सर्वप्रथम भात -आमटी मीठ, चटणी यांचे पानात आगमन होतं….. आणि मग खरपूस सुगंधाचा सांगावा आधी पाठवत त्यानंतर त्या बहुचर्चित खिरीच्या बादल्यांचे आगमन होते….. पण सांभाळून…. डेक्कन एक्सप्रेसच्या वेगाने तुमच्याकडे येणारी खीर तुमच्या पानापर्यंत पोहचण्याआधी भात आमटी संपवून ताट चकचकीत करायचं कसब तुमच्याकडे हवं. भोजन-प्रसादाला नियमित येणाऱ्या बंधू-भगिनींना हे अंगवळणी पडलेलं असतं.
अर्थात हा भोजनप्रसाद घेणारा मनुष्य सुद्धा चांगला बलदंड असला पाहिजे. उगाच ‘नको-नको ‘ म्हणणारा ( आदरणीय मकरंद बुवांच्या शब्दात -‘कायमचूर्णवाला’ ) नको. त्यासाठी पंगतीच्या त्या टोकाला खिरीने गच्च भरलेली बादली घेतलेले काका दिसले की त्यांच्या वाढण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचण्याआधी आपल्या पानातील खीर संपविण्याचा वेग पाहिजे. टाईमपास करत – गप्पा मारत प्रसाद घेणाऱ्याचे हे कामच नाही.
काही गृहिणी म्हणतात की आम्ही आमच्या घरी सुद्धा अशी खीर करतो पण तुम्ही गडावर मिळते तशी खीर घरी करून दाखवली तर मी कसलीही पैज हरायला तयार आहे. मुळात रेसिपीची पुस्तके वाचून – “अमुक एवढा गुळ, अमुक एवढे पाणी, तमुक मुठी गहू, मंद आचेवर इतका वेळ ठेवावी ” असली वाक्ये वाचून करण्याचा हा पदार्थच नाही.
गडावर मिळणारी खीर ही ‘रेसिपी’ नसते तर ‘प्रसाद’ असतो. त्यात भिक्षाफेरीत रामदासी मंडळींनी दारोदारी अनवाणी जाऊन, मनाच्या श्लोकांचा जागर करत गोळा केलेला आणि असंख्य भक्तांनी प्रेमाने दिलेला शिधा असतो, गडाच्या पायथ्यापासून घाम गाळत गव्हाची पोती गडावर पोहचविणाऱ्या सेवेकऱ्यांचे श्रम असतात, जमा झालेले गहू निवडून-पाखडून, त्याला ऊन दाखवून वर्षभर जपून ठेवणाऱ्या माता-भगिनींचे कष्ट असतात.
या सर्वांसोबत मला सर्वाधिक आश्चर्य वाटतं ते भोजनप्रसादाची खीर तयार करणाऱ्या बल्लवाचार्य मंडळींचे ! प्रसादाला नक्की किती लोक आहेत हे पहिली पंगत बसेपर्यंत सांगता येत नाही. तरीही आलेल्या सर्वांना पुरेल एवढी आणि नेमकी त्याच चवीची खीर रोज तयार करायची. या सेवकांच्या या ‘स्कील’पुढे तर नतमस्तकच व्हावेसे वाटते. (आपल्या घरी एखादा पाहूणा अचानक आला तर जेवणासाठी आपली किती तारांबळ उडते याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे).
आदर्श दिवसाची कल्पना काय असं विचारलं तर मी उत्तर देईन, ” सकाळी प्रसादापूर्वी गडावर पोहचावे. रामराया, मारुतीराय, समर्थ, परमपूज्य श्रीधर स्वामी यांचे दर्शन घेऊन प्रसादाच्या रांगेत वेळेत उभे राहावे, भोजनप्रसादात खिरीची बादली आपल्यापुढे तीन-चार वेळा यावी आणि त्यावेळी आपले पान चकचकीत असावे, भोजनप्रसादानंतर थोडा वेळ कलंडून दुपारचा चहा घेऊन धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन यावे. सायंउपासनेला, दासबोध-वाचनाला हजर रहावे. शेजारती झाल्यानंतर रात्रीच्या पंगतीला पिठलं-भातासोबत पुन्हा एकदा सकाळची मुरलेली खीर असावी आणि त्यानंतर मुक्कामाला खोली मिळालेली असावी…… सगळं जग विसरून जाण्यासाठी यापेक्षा अधिक काय हवं ?
लेखक : डॉ वीरेंद्र ताटके
पुणे, ९२२५५११६७४
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.
अशी आहे भिशी ….
सुरवातीला बारा डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत. प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात. त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते. भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते. सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.
दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला. हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले.
झाडांचा वाढदिवस – –
लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात. डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात, असं हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल. कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर .. ..
‘गेस्टापो‘ या हेरखात्याची सुरवात २६ एप्रिल ,१९३३ रोजी झाली.
नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आजही छातीत धडकी भरते.तर मग दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ज्यांनी त्यांचे क्रौर्य , निर्दयीपणा , माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना प्रत्यक्ष अनुभवल्या असतील त्याची काय हालत झाली असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही.
हिटलर तरुण वयात ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहरात रहात होता. धड शिक्षण पुरे झाले नव्हते ,त्यातच त्याने काढलेली चित्रे पाहून तेथील बेली स्कुल ऑफ आर्टस् ने प्रवेश नाकारला होता. पोटासाठी पोस्टकार्डच्या आकाराची चित्रे बनवून त्याने उदरर्निवाह चालवला होता. जर त्याला प्रवेश मिळाला असता तर आज जग वेगळेच दिसले असते.
त्या वेळी सर्व अवैध धंद्यामध्ये ज्यू लोक प्रामुख्याने आढळून येत होते. ते लोक वेश्याव्यवसाय चालवत असत त्या मध्ये जर्मन स्त्रियांची पिळवणूक आणि लैंगिक शोषण होताना त्याने पहिले.सावकारी करताना प्रचंड व्याजदर लावून गरीब लोकांना पिळणारे ज्यू त्याने पहिले. ही जात नालायक असे त्याच्या मनाने घेतले.या जातीचे उच्याटन करून पृथ्वी ज्यू विरहीत करावी असे त्याला वाटे. नंतर योगायोगाने तो राजकीय पक्षामध्ये खेचला गेला आणि बघता बघता त्याने त्या पक्षावर कब्जा मिळवला. अस्खलित वक्तृत्व ही त्याला मिळालेली मोठी देणगी होती. ऐकणारे मंत्रमुग्ध होत असत आणि तो काय म्हणतोय त्याला माना डोलवत.आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असत.
थोड्याच दिवसात जर्मनीमध्ये हिटलरच्या शासनाला सुरवात झाली,वर्ष होते १९३३ . तेंव्हा सुरवातीपासूनचा त्याचा सोबती हर्मन गोअरिंग याला गुप्तहेर संघटना उभी करायला सांगितली आणि तिला नाव दिले “गेस्टापो” . नाझी पक्षात हिटलरच्या खालोखाल दोन नंबरचे खाते होते गोअरिंग चे (अंतर्गत पोलीस खाते ) गोअरिंगने रुडॉल्फ डिएल्स याला गेस्टापो प्रमुख नेमले होते. त्याच्याकडून अपेक्षित असलेले काम करण्यास तो कमी पडत होता म्हणून गोअरिंग ने ते खाते त्याच्या ऐवजी हेनरिक हिमलरला सोपवले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्यूंची धरपकड सुरु झाली.
या खात्याला अमर्याद अधिकार दिले. कोणाही व्यक्तीला कोणतेही कारण न देता पकडून नेले जात असे . आणि पुढे हेनरिक हिमलरच्या एस.एस. गार्ड्सच्या ताब्यात दिले जात असे,जो पर्यंत काम करून घेता येईल तो पर्यंत काम करवून घ्यायचे आणि नंतर रवानगी भयाण मृत्यूच्या छळछावण्यांमध्ये केली जात असे.
ज्यू जात नष्ट व्हावी म्हणून सामूहिक नरसंहार (Racial massacre) केला जात असे. मोठं मोठ्या गॅस चेंबर मध्ये कोंडून विषारी वायूने वांशिक नरसंहार केला जात होता आणि हे करण्यात पुढे असायचे हे गेस्टापो हेरखाते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अंदाजे पन्नास ते ऐशी लाख लोक मारले गेले असे म्हटले जाते, सैनिक सोडले तर जादा करून ज्यू लोकच मारले गेले.
युद्धाचे पारडे फिरल्यावर हेनरिक हिमलर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. रशियन सुरक्षा चौकीवर त्याला पकडले गेले. त्याची चौकशी करण्यापूर्वीच त्याने लपवून ठेवलेली सायनाईड ची कॅप्सूल चावली आणि मृत्यूला कवटाळले.
दुसरे महायुद्ध संपल्यावर या युद्धातील गुन्हेगारांवर न्यूरेंबर्ग येथील न्यायालयात खटले चालवले गेले आणि गोअरिंगला फाशीची शिक्षा सुनावली गेली ,परंतु फाशीची अंमलबजावणी होण्याआधीच त्याने कडेकोट बंदोबस्तातील कोठडीमध्ये सायनाईड मिळवले आणि ते खाऊन आत्महत्या केली आणि त्याने गुप्तहेर प्रमुख असल्याचे सिद्ध करून दाखवले.
३० एप्रिल ,१९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केली,आणि ८ मे १९४५ रोजी गेस्टापो खाते बरखास्त केले . व जगभरातील ज्यूंनी काहीसा निश्वास टाकला .
जगभरात वेगवेगळ्या जाती,धर्म, पंथ आहेत, त्या मध्ये मृत्यूनंतर केलेल्या कृत्यांची फळे स्वर्ग अथवा नरक या मध्ये मिळतात असे मानले जाते . पण या क्रूरकर्मा लोकांची कृत्ये एवढी तिरस्करणीय आहेत की त्यांना स्वर्गातच काय नरकामधे देखील घेतले नसेल आणि हे अतृप्त आत्मे चराचरात फिरत असतील त्यांना मोक्ष मिळणे अशक्य .
जे निष्पाप जीव यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे मृत्युमुखी पडले त्यांना सद्गती लाभली असेल अशी आशा करायची .
☆ व. पु. काळे यांची एक बोधकथा –कथालेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
गावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? हे समजावणारी सुंदर अशी व.पु.काळेंची बोधकथा
बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची.
पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…
एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.
घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.
त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे,
टी पॉय वरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.
मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली.
मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला.
नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.
नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही.”
“मला माहितेय..! पण मला जायचंय आता.” मन्या शांतपणे बोलला.
“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.
मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”
“म्हणजे काय शंकाय का तुला?”
“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा
पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?”
नॉट सो स्ट्रेंज यार…!!
वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……
जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?
समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.
पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.
भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.
आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?
आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.
अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!
कथालेखक : व.पु.काळे
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझा अभिप्राय मी देणारच आहे पण त्या आधी लेखकाने त्यांच्या मनोगतात जे सांगितलंय ते त्यांच्याच शब्दात : .. ” प्रत्येकाला आपलं बालपण आणि शालेय जीवन खूपच महत्वाचं वाटतं असतं. आपली जडण घडण खऱ्या अर्थाने याच काळात होत असते. आपली जन्मभूमी सभोवतालचे वातावरण, निसर्ग, समाज व्यवस्था, या साऱ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो. यातूनच या काळात असे काही प्रसंग, घटना घडतात की ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. बालपणीच्या काळातला सभोवातीचा निसर्ग, शिक्षणासाठी केलेली धडपड, या धडपडीतून मिळालेले बळ या साऱ्यांचा आपल्या मनावर विलक्षण प्रभाव पडतो. शालेय जीवनातल्या संघर्षमय घटना आपल्या आयुष्यात उर्जादायी ठरत असतात.”
त्यांचे बालपणीच्या जगाचे र्हृद्य दर्शन त्यांनी या पुस्तकात आपल्याला घडवले आहे. यात लेखांचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात ते त्यांच्या – माझा माणदेश – जीवनाचा पूर्वार्ध मांडतात. यात एकूण ३१ गोष्टीरूपी लेख आहेत. भाषा सोपी व ओघवती आहे. वाचक जणू काही आपणच ती वास्तवता जगतोय असा रंगून जातो. ” भाकरीचा प्रवास “, ” ” करंजछाया “, ” आयुष्यातले संगीत “, ” माझा अक्षरांचा प्रवास ” हे लेख तर खूपच हृदयस्पर्शी आहेत. खरं तर हे लेख असे वेगळे करताच येणार नाहीत.
पुस्तकातील दुसरा भाग ललित लेखांचा आहे. यातील १५ ही लेख म्हणजे एकेक हिराच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती या लेखांमधून दिसून येते.
” ते एक मिनिट “, ” ओले मूळ भेदी, पाषाणाचे अंग “, हे लेख मनात घर करून राहतात.
” वाचन, ग्रंथ, माणूस आणि निसर्ग ” या सर्वांचे एकमेकाशी असलेले जवळीकतेचे नाते किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे ते, तो लेख वाचल्यावरच समजेल. या लेखाच्या शेवटी ते म्हणतात – ” पुस्तकं घरात वाचता येतात. ग्रंथालयात वाचता येतात. मात्र माणसं व निसर्ग वाचण्यासाठी भटकाव लागतं. मग कधी झळा सोसाव्या लागतात तर कधी छानसा शिडकावा अंगावर येतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जसे हार – प्रहार सोसावे लागतात तसेच पुस्तकं, माणसं आणि निसर्ग वाचण्यासाठी आपणाला या वाचनाचा लळा लागावा लागतो ” तसेच ” रुमाल” हा लेख खरोखरीच वाचनीय आहे. रुमाल हा शब्द आपण किती सहजतेने वापरतो. हा उर्दू शब्द आहे. पण आपल्या जीवनात ती किती चपखल बसतो हे या लेखात समजते.
एकंदरीत हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलंच पाहिजे.
या पुस्तकाला डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दिलेली प्रस्तावनाही खूप सुंदर वाचनिय आहे.
परिचय – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈