मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रीतिरिवाज ऋतूचक्राचे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ रीतिरिवाज ऋतूचक्राचे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

संपून गेल्या वयाकडे थोडेस

वळून पहा.

गळून गेल्या पानाकडे पहात

वृक्षवत रहा.

वाटेवर की पावलांवर विश्वासावं,

मूलतः हा प्रश्न आहे.

वाटचाल कशी करावी

हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.

ऋतुचक्राचे कांही रीतरिवाज

असतात.

पानगळीला कोणतेही आवाज

नसतात .

बाकी एवढ्याच घटना घडल्या .

तुम्ही दरवाजे बंद केले.

मीही मग खिडक्या मिटल्या.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ तहान ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : तहान ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.

तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले तिथे येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीचा चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. नन मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख आजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत.’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्‍या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.

माझं मन त्यावेळी ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशच्या लोक बघत असलेले स्वप्न यातच गुंतून गेले होते.

त्यांची माहिती सांगून झाली होती. आम्ही कॉलेजमधे परत आलो. घटना घडली, ती एवढीच. पण माझ्या डोक्यातून ती मुलगी काही जाईना. बघता बघता डोक्यात एक कथा आकार घेऊ लागली. रात्री सगळं आवरलं, पण मला काही झोप लागली नाही. मग मे उठले. कागद पुढे ओढले आणि लिहायला बसले.

मी त्या मुलीचं नाव ठेवलं जस्मिन. आणि क्रेशचं नाव ठेवलं ‘करुणा निकेतन क्रेश’. हे क्रेश म्हणजे, शहरातील दरिद्री, मागास वस्ती असलेल्या भागातील ‘ग्रीन टेंपल चर्च’ची सिस्टर इंस्टिट्यूट. चर्चचे बिशप फादर फिलिप जर्मनीहून आले होते. त्यांच्या सोबत आल्या होत्या सिस्टर नॅन्सी, सिस्टर ज्युथिका, सिस्टर मारीया. हे सारेच जण ‘दीन-दुबळ्यांची सेवा ही प्रभू येशूची सेवा’, या श्रद्धेने काम करत होती. थोड्याच काळात क्रेशचा नावलौकिक वाढला. आता इथे ३५० च्या वर मुली आहेत. त्या वेगवेगळ्या वयाचा वेगवेगळ्या इयत्तेतल्या आहेत. कुणी तिथेच रहाणार्‍या आहेत. कुणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून संध्याकाळी घरी जाणार्‍या आहेत.  स्थानिक लोकांनीही मदत केलीय, अशी पार्श्वभूमी मी तयार केली.

कथेची सुरुवात मी जस्मिन डॉक्टर झालीय आणि जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निघालीय. क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये तिचा निरोप समारंभ झालाय. सर्वांनी तिला तिच्या कार्यात यश लाभावे, म्हणून प्रभू येशूची प्रार्थना केलीय आणि तिला शुभेच्छा दिल्यात.

ती जर्मनीला लेप्रसीवर विशेष संशोधन करणार आहे आणि आल्यावर लेप्रसी झालेल्यांसाठी क्रेश सुरू करणार आहे. आता ती पायर्‍या उतरतेय. तिच्या मागे क्रेशचे लोक, मुली तिला निरोप देण्यासाठी गेटपर्यंत आल्या आहेत. गेटशी आल्यावर तिचे लक्ष नेहमीप्रमाणे महारोगी असलेल्या भिकार्‍यांकडे जाते आणि ती मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. मला माझे स्वप्न पुरे करता येऊ दे. माझे ध्येय साध्य करता येऊ दे, अशी प्रभूपाशी प्रार्थना करा.’

मी पुढे लिहिलं, क्रेशमध्ये अगदी लहानपणी आलेली जस्मिन हळू हळू मोठी होऊ लागली. तशी इतरांच्या बोलण्यातून तिला आपली जीवन कहाणी तुकड्या तुकड्याने कळली. आपण लेप्रसी झालेल्या भिकार्‍याची मुलगी आहोत, हे तिला कळलं. मग त्यांच्याकडे बघायचा तिला नादच लागला. कोण बरं असतील यातले आपले आई-वडील. तिला कुणाचा नाक आपल्यासारखं वाटे, कुणाची हनुवटी, तर कुणाचे कपाळ. कोण असतील यातले आपले आई-वडील?  ती पुन्हा पुन्हा विचार करी. ती आपल्याकडे बघते आहे, हे पाहून भिकारी आपली थाळी, वाडगा वाजवत भीक मागत. म्हणत, ‘एक रुपया दे. देव तुला श्रीमंत करेल.’ तिला हसू येई, आपण त्यांना पैस दिल्यावर, जर देव तिला श्रीमंत करणार असेल, तर तो डायरेक्ट त्यांनाच का पैसे देणार नाही? अर्थात तिला कितीही द्यावेसे वाटले, तरी तिच्याकडे पैसे नसत. तिच्या सगळ्या गरजा क्रेश भागवत असल्यामुळे तिच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.

जस्मिन कथेची नायिका. तिचं व्यक्तिमत्व उठावदार, आकर्षक असायला हवं. मी दाखवलं, की ती प्रेमळ, मनमिळाऊ आहे. इतरांना मदत करायाला ती नेहमीच तत्पर असते. प्रभू येशूवर तिची अपार श्रद्धा आहे. त्याच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. नाताळ आणि इस्टरच्या वेळी चर्चच्या समोर बसलेल्या भिकार्‍यांना मिठाई, केक वगैरे वाटले जायचे. जस्मिन या कामात नेहमीच पुढाकार घेई.

अनेकदा जस्मिनच्या मनात विचार येई, आपण सिस्टर मारीयाच्या नजरेस पडलो नसतो आणि आपल्याला अ‍ॅडॉप्ट करण्याचा त्यांच्या मनात आलं नसतं किंवा आपल्या आई-वडलांनी त्यांची अट मान्य केली नसती, तर आपलं आयुष्य कसं घडलं असतं? या समोरच्या भिकार्‍यांमध्ये आणखी एकाची भर पडली असती. मग तिच्या अंगाचा थरकाप होई.

आज मात्र येशूच्या, चर्चच्या आणि क्रेशच्या कृपेमुळे ती डॉक्टर झालीय आणि उच्च शिक्षणासाठी आणि लेप्रसीवरील संशोधनासाठी जर्मनीला चाललीय. तिचा निरोप समारंभ झाला, तिथे तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठा पोस्टर लावलेलं आहे. त्यात एक मध्यमवयीन स्त्री रेखाटली आहे. तिने हाताची ओंजळ केली आहे. आणि येशू त्यात वरून पाणी घालत आहे. खाली लिहिलं आहे, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’

हे पोस्टर मी मिरज मिशन हॉस्पिटलच्या दारातून आत गेल्याबरोबर दिसेल असं दर्शनी भिंतीवर लावलेलं पाहिलं होतं. ते तिथून आणून, मी या कथेत रिक्रिएशन हॉलच्या भिंतीवर लावलं. जस्मिनचं लक्ष वारंवार त्या पोस्टरकडे जातय. तिला फादर फिलीपचं सर्मन आठवतं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा त्यांनी सांगितली होती. त्या पापी स्त्रीला प्रभू येशूंनी दर्शन दिलं. तिला क्षमा केली. तिला जीवंत पाणी प्यायला दिलं. आध्यात्मिक पाणी. त्या प्रसंगावर ते पोस्टर आहे. तिची तहान कायमची भागली, असं पुढे कथा सांगते.

स्मिनला वाटतं, आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यातच आकंठ डुंबत असतो. फादरनी आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. आपल्या न पाहिलेल्या आई- वडलांना पाहण्याची तहान. खूप तहान…. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरलाय, एवढी तहान . ..

क्रेशच्या बाहेर पडताना जस्मिनच्या मनावर या सार्‍या विचारांची गडद छाया आहे. टॅक्सीजवळ उभी राहून सुनीता तिला लवकर येण्यासाठी खुणावते आहे. ती जस्मिनला विमानताळावर पोचवायला निघलीय. जस्मिन टॅक्सीत बसते. मग तिला पुन्हा काय वाटतं, कुणास ठाऊक? ती दरवाजा उघडून बाहेर येते. आज तिच्या पर्समध्ये पैसे आहेत. ती भिकार्‍यांच्या थाळ्यात, वाडग्यात पैसे टाकते. मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला माझ्या कार्यात यशयावे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’

जस्मिन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पहात रहातात.

इथे मी कथेचा शेवट केलाय.

कधी कधी मनात येतं, या दिवशी आम्ही त्या क्रेशला भेट दिली नसती, तर ही अशी कथा  माझ्याकडून लिहून झालीच नसती

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्वला सहस्रबुद्धे यांचा  ‘कवडसे’ हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे.त्यांच्या या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा   !

 

– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कारप्राप्त आलेख – “कवडसे…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

🔅 विविधा 🔅

☆ कवडसे ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले पंधरा दिवस पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता. जून मध्ये सात जूनला पावसाची थोडी सुरुवात तर झाली पण नंतर पाऊस  गायब झाला.  जवळपास एक दोन नक्षत्रे पावसाने हुलकावणी दिली पण नंतर गणपती बाप्पा आले तेच मुळी पाऊस घेऊन! मग काय सर्वांनाच खुशी झाली. पाऊस पाणी चांगलं झालं तरच शेत पिकणार आणि पावसाची नऊ नक्षत्र अशी नवरात्रीपर्यंत पडली की  पीक पाणी चांगले येणार.. त्यावेळी नवरात्रात येणारे  उन्हाचे कवडसे आपल्याला मनापासून आनंद देतात!

आज खूप दिवसांनी खिडकीतून उन्हाचा कवडसा घरात आला आणि त्याच्या सोनेरी उबेत घराचा कोपरा न् कोपरा सुखावला! बाहेरची सुंद, ढगाळ हवेने इतके दिवस आलेली मरगळ त्या एका कवडशाने घालवून टाकली! खरंच हा सूर्य नसता तर..!

लहानपणी आपण असे निबंध लिहीत असू. सूर्य, पाऊस, हवा, वातावरण यातील काहीही नसतं तर आपलं जीवन कसं वैराण झालं असते याची कल्पनाच करवत नाही!

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंचे चक्र फिरत राहते, तेव्हा कुठे सूर्याचे फिरणं आपल्या लक्षात येतं! पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे हे ऋतू आपण उपभोगतो .या प्रत्येक ऋतूचा आपण अनुभव घेत असतो. एका ऋतू नंतर दुसरा ऋतू सुरू होताना नकळत त्याचा कवडसा त्यात डोकावत असतो. पाऊस संपून हिवाळ्याची चाहूल लागते तेव्हा हळूहळू ऋतू बदलाचा कवडसा दिसू लागतो. ऋतू बदलताना ती काही आखीव रेखीव गोष्ट नसते की, एका विशिष्ट तारखेला हा ऋतू संपेल, आणि दुसरा ऋतू येईल! तर हा बदल होतो अलगदपणे! एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाताना  त्या दोन्ही ऋतूंची सरमिसळ होत असते.त्यांची एकमेकात मिसळण्याची प्रक्रिया चालू असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलीकडे या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी आधी कळतात ही गोष्ट अलहिदा! तरीही एखाद्या वेळी अचानक येणारे वादळ या अंदाजावर पाणी फिरवते! असे हे ऋतूंचे चक्र आपल्याला त्यातील असंख्य धुली कणांच्या रूपात सतत दिसून येत असते.

जेव्हा घरात उन्हाचा कवडसा डोकावतो, तेव्हा आपल्याला त्या कवडशात दिसणारे असंख्य धुलीकण वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देत असतात!

तसेच जीवनात येणारे चांगले वाईट असे विविध प्रसंग हे आपल्या आशेने भरलेल्या मनाचे प्रतिक आहे! खूप निराशा, खूप दुःख जेव्हा वाट्याला आलेले असते  तेव्हा नकळतच कुठेतरी आशेचा कवडसा  दूरवर दिसत असतो. नुकतीच घडलेली एक घटना.. माझी पुतणी कॅन्सरच्या आजाराने मृत्यूला सामोरे गेली. खूप वाईट वाटले.. असं वाटलं, परमेश्वर इतका का दुष्ट आहे की त्या तरुण मुलीला मृत्यू यावा! जिचे आता उमेदीचे वय होतं. संसारात जोडीदाराबरोबर उपभोगायचं वय होतं, ते सगळं टाकून तिला हा संसाराचा सारीपाट  अकाली उधळून टाकून जावे लागले! सगळेच अनाकलनीय होतं! इतक्या दुःखद प्रसंगा नंतर हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा नवीन बातमीचा कवडसा आम्हाला दिसू लागला! तिची बहीण प्रेग्नेंट आहे असे कळले, पुन्हा एक नवीन जीव आपल्याला आनंद देण्यासाठी जन्माला येणार आहे, नकळतच त्या बातमीने मन व्यापून टाकले. मनाचा गाभारा उजळून गेला नुसत्या आशादायक  विचाराने! हाच तो कवडसा खूप मोठ्या तेजोवलयाचा भाग असतो! असंच काहीसं या कवडशात दिसत रहातं  ते गेलेल्या गोष्टींचं अस्तित्व!

लहानपणी काचा कवड्या  खेळताना कधी मनासारखं दान पडे तर कधी नाही! पण म्हणून काही त्यातलं यश- अपयश मनाला  लावून घेऊन खेळणं कधी कोणी सोडत का?

अशीच एका जवळच्या नात्यातली गोष्ट! त्या मुलीच्या नवऱ्याचा एक्सीडेंट होतो आणि कित्येक महिने त्याला हॉस्पिटलायझेशन करावे लागते. त्या मुलीला दोन लहान मुली असतात. शिक्षण पदवीपर्यंत झालेले असते. नवरा आजारी, घरात मिळवते कोणीच नाही, अशावेळी ती मनाने खचून गेलेली असते…., पण अचानक तिने  एका नोकरीच्या  ठिकाणी अर्ज केला होता तिथून नोकरीचा कॉल येतो. ती मुलाखत योग्य तऱ्हेने देते, तीन महिने तिला ट्रेनिंग असते.. लहान दोन मुली पदरात.. पण सर्वांनी तेव्हा तिची अडचण काढली. तिने ट्रेनिंग पूर्ण केले आणि कामावर जॉईन झाली.. हा किती सुंदर सोनेरी कवडसा तिच्या जीवनात आला! पुढे तिने दोन्ही मुलींना चांगले शिकवले. तिचा नवराही बऱ्यापैकी ठीक झाला. एक जीवन मार्गाला लागले. असे हे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात संकट प्रसंगी येत असतात, पण त्या  संकटांना न घाबरता ती संधी म्हणून त्याचा लाभ घेता आला पाहिजे! कवडसा हा आशादायी असतो. तो कुठूनही कसाही आला तरी त्यातील धुलिकण न बघता त्याचे तेज पाहिले पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे.. तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल, अशा या कवडशावर माझा विश्वास आहे. पुढे पूर्ण अंध:कार आहे असं भवितव्य कधीच नसतं! तर दयाळू परमेश्वर एक तरी झरोका असा देतो की तिथून हा  कवडसा आपल्या आयुष्यात डोकावतो आणि आपला जीवन प्रवास सुकर करण्यासाठी आशावादी ठेवतो….

रोज दिसतो एक कवडसा,

मनात माझ्या आशेचा !

विरतील निराश ढग मनातून,

येईल उत्साह जगण्याचा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(ज्ञानेश गप्प बसून होता. पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती.) – इथून पुढे —- 

 ज्ञानेश बापूसाहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. केरबा सारखी प्रामाणिक माणसं आता क्वचित. पण मला सांगा हा केरबा राहतो कुठे?

बापूसाहेब इथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे, तेथील बाजूच्या जंगलात याची झोपडी आहे. याची म्हातारी मेली. आता हा आणि त्याचा मुलगा म्हदबा दोघेच राहतात. बरं तर मग असं म्हणून ज्ञानेश उठला आणि आपल्या हॉटेलवर गेला.

ज्ञानेश च्या लक्षात आलं आता केरबाचा मुलगा  म्हदबा याला गाठावं लागणार. त्याने त्याच्या कंपनीचा सेल्समन अजय याला बोलावले आणि ताबडतोब हॉटेलकडे बोलावले.

ज्ञानेश अजय एक कंपनीचे महत्त्वाचे काम आहे. आणि तुझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. येथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे हे तुला माहित असेलच. त्या गावात जायचं. तेथे केरबा धनगर नावाचा माणूस राहतो. अर्थात तो जंगलात झोपडीत राहतो. शेळ्या मेंढ्या राखत असणार. त्याचा मुलगा आहे महादबा. त्याची माहिती काढायची. त्याला जास्त काय आवडते हे चौकशी करायची. पण लक्षात ठेव. त्याची चौकशी करत आहोत हे  म्हदबाला कळता कामा नये. तू हे महत्त्वाचे कंपनीचे काम आहे, ते व्यवस्थित केलेस तर मी तुझी शिफारस करीन.

अजय मोटार सायकलने भडगाव मध्ये गेला.  भडगाव मधील केमिस्ट मनोहर त्याच्या खास ओळखीचा.

अजय मनोहर तुला या गावातला केरबा धनगर माहित असेल. त्याचा मुलगा म्हदबा याला ओळखतॊस का, कसा आहे आणि कसले व्यसन वगैरे आहे का?

मनोहर केरबा हा सरळ माणूस आहे, दारूच्या थेंबालाही शिवत नाही, पण त्याचा मुलगा महादबा हा पक्का बेवडा आहे. दिवस-रात्र दारूच्या नशेत पडून असतो. आता थोड्यावेळाने या देशी दारूच्या दुकानात येईल.

आणि खरंच थोड्या वेळाने म्हदबा देशी दारूच्या दुकानाकडे जाऊ लागला. अजयला अंदाज होताच म्हणून जाताना त्याने पाच सहा इंग्लिश दारूच्या बाटल्या बरोबर घेतल्या होत्या. त्याने म्हदबाची ओळख काढली दारूच्या बाटल्या दाखवून त्याला गाडीवर बसवले आणि ज्ञानेश च्या हॉटेल कडे घेऊन आला. एवढं मोठं हॉटेल बघून म्हदबा बावचाळून गेला. खोलीत आल्यावर ज्ञानेशने त्याला आपल्याकडच्या बाटल्या दाखवल्या.

म्हदबा मला इत कशाला आणलंय?

ज्ञानेश दारू प्यायला! पी हवी तेवढी दारू.’

ज्ञानेशने दारूची बाटली उघडली आणि ग्लासात ओतली, म्हडबाने एका दमात ग्लास रिकामा केला. दुसरा भरला दुसरा रिकामी, असे पाच ग्लास पटापट रिकामी केली.

ज्ञानेश मादबा लेका, एक काम होत, तुझ्या बाबाकड एक औषधाची मुळी आहे, त्याच्यामुळे पोटाचे आजार बरे होतात. ती मुळी कोणत्या झाडाची हे फक्त तू आम्हाला सांगायचे. तू जर ते सांगितलेस तर तुला हवी तितकी दारू देतो. आणि भरपूर पैसे देतो. ज्ञानेशने पैसे भरलेली सुटकेंस दाखवली. तुझा बाबा तसा मुळी द्यायला ऐकायचा नाही, जर ऐकला नाही  तर त्याला हे दाखवायचं, अस म्हणून ज्ञानेशने एक सुरा म्हडबाच्या हातात दिला. हा सुरा मानेवर ठेवलास की तो घाबरून ती मुळी तुला दाखवेल. त्या मुलीचे झाड आम्हाला दाखवायचे. मग तुला हे सगळे पैसे हवी तेवढी दारू  “.

दारू पिऊन पिऊन तोल जाणाऱ्या म्हदबाला अजय ने त्याच्या गावात सोडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेब घरी हॉलमध्ये चहा घेत होते. एवढ्यात ” बापूसाहेब, बापूसाहेब चला माझ्याबरोबर ” असं म्हणत केरबा धावत धावत बापूसाहेबांच्या घरी आला,

” अरे कुठे?

” बापूसाहेब, माझ्या जीवाचं मला काय खरं वाटत नाय, माझा पोरगा राती सुरा घेऊन माझ्या मागे धावत होता. त्या मुळीच झाड मला दाखव म्हणूंन सांगत व्हता. बापूसो, तुमास्नी त्ये झाड दाखवितो आणि जबाबदारीतून मोकळा होतो. “.

” कसली जबाबदारी?’

“माझ्या आजानं मला सांगितलं व्हतंमुळीचा बाजार करायचा न्हाई, झाड कधी दाखवायचं असलं तर फकीत राज वैद्यना दसखवायचं. कारण त्या घराण्याने आमच्या राजाला बर केल व्हतं.’.

” आरो पण मी त्या मुळीच झाड बघून काय करू?

” बापूसो, तुमी राज वैद्यसाच्या घराण्यातले, परत एकदा दवा तयार करा, “.

आर, पण तू त्याचा बाजार करायचा नाही असं म्हणतोस ना?”.

“तुमी सोडून कुंनी नाही करायचं, फक्त तुमी करू शकत “. चला चला बापूसाहेब घाई करा “.

 बापूसाहेबांनी आपला मुलगा दिलीप ला सोबत घेतला. दिलीप ने गाडी बाहेर काढली  आणि केरबा आणि बापूसाहेब मागे बसले. किरबा दाखवत होता त्या रस्त्याने दिलीप गाडी चालवत होता. वीस पंचवीस किलोमीटर गेल्यावर कीरबानी गाडी थांबवायला सांगितली. आणि खूप उभ्या चढणीवर तो चालायला लागला. बापूसाहेबांना एवढं चढणे शक्य नव्हते म्हणून फक्त दिलीप त्याचे बरोबर गेला.

केरबाने तेथेच दिलीप ला ती झाडे दाखवली. त्याची मुळी कशी काढायची हे पण दाखवले. बापूसाहेब केरबाला आपल्या घरी चल आज तिथेच रहा म्हणून आग्रह करत होते, पण केरबा ने  मानले नाही.

त्याच रात्री दारूच्या नशेत केरबाच्या मुलाने म्हडबाने केरबाचा सुरा पोटात खुपसून खून केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेबांना ही बातमी कळली, बापूसाहेब मुलगा दिलीप सह धावले, केरबाचे प्रेत झाडीत टाकून दिलेले होते. आणि बाजूला दारू पिऊन म्हडबा पडला होता. बापूसाहेबांनी दोन-तीन माणसांना बोलावून केरबाचे प्रेत आपल्या गाडीत घेतले आणि दोन किलोमीटर वरील आपल्या स्वतःच्या जमिनीत त्याचे पुढचे विधी केले.

बापूसाहेब कित्येक दिवस सुन्न सुन्न होते, आपल्यामुळे केरबा हकनाक मेला असे त्यांचे मत झाले. मुंबईच्या शिर्के साहेबांना किरबाच्या मरण्याची बातमी कळली. ते मुद्दाम बापूसाहेबांना भेटायला आले. बापूसाहेबांनी त्या दिवशी मुद्दाम केरबा धावत धावत आला आणि त्या मुळीची वनस्पती दाखवली हे पण सांगितले.

शिर्के साहेब बापूसाहेब तुम्ही राजवैद्य आहात. तुम्ही पुन्हा औषधाच्या व्यवसायातउतरायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान आहे आणि आता ही मुळी आणि तिची वनस्पती पण तुम्हाला कळली आहे, मग आता वाट कसली बघता?

बापूसाहेब शिर्के साहेब, आम्ही राजवैद्य असलो तरी आमच्याकडे पैशाची कमी आहे, आमच्याकडे दाम नाही आम्ही एवढी वर्ष गप्प आहोत.

शिर्के साहेब बापूसाहेब, . तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला वाटेल तेवढे कर्ज बँक देईल. तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था मी करतो. आणखी काही रक्कम कमी पडत असेल तर मी तुमच्या मागे आहे. पण तुम्ही आता आयुर्वेदिक कंपनी सुरू करायलाच हवी. केरबाचीमुळीचा लोकांना फायदा व्हयला हवा “.

आणि शिर्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका बँकेचा मॅनेजर सकाळीच त्यांच्या घरी हजर झाला. शिर्के साहेबांनी तुम्हाला हवे तेवढे कर्ज द्यायला सांगितले आहे, जामीन स्वतः शिर्के साहेब राहणार आहेत, तुम्हाला किती कर्ज हवे ते मला सांगा ‘. बापूसाहेबांनी मुलगा दिलीप याला हाक मारली. दोघांनी म्हणून विचार केला आणि कर्जाच्या अर्जावर सही केली.

ज्या ठिकाणी केरबाचे अंत्यविधी केले गेले, त्याच्या शेजारीच ” केरबा फार्मा ‘ उभी राहिली. गेटमधून आत गेल्यावर केरबा धनगरच पुतळा तुमचे स्वागत करेल, त्याला नमस्कार करून आत गेल्यावर  केरबा फार्मा ची भली मोठी फॅक्टरी आणि दिलीप रावांचे मोठे सेल्स ऑफिस भेटेल.

दिलीप रावांनी आपल्या मित्रमंडळींची मदत घेऊन केरबा फार्मा चा व्यवसाय खूप वाढवला. यावर्षी केरबा फार्माने शंभर कोटीचा व्यवसाय पुरा केला.

आपले राज वैद्य बापूसाहेब नवीन नवीन आयुर्वेदिक संशोधनात मग्न आहेत, हे सर्व केरबा धनगराच्या कृपेने याची जाणीव राजवैद्यन आहे.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “What a level of confidence!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “What a level of confidence!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

What a level of confidence !

माझ्या स्कुटरचा हेड लाईट ७ – ८ दिवसांपासून बिघडला होता. रोज बावधनहून घरी परत येतांना अंधार झालेला असतो, त्यामुळे हेड लाईट शिवाय गाडी चालवणे, जरा किंवा चांगलेच रिस्की वाटायचे. आळस केंव्हातरी अंगाशी येतोच – येतो, असं आपण मानतो. कल करे सो आज कर, वगैरे, अशा सगळ्या म्हणी मला पाठ आहेत. तरीही रिपेअर करायला मुहूर्त लागत नव्हता. आणि टाळाटाळ करण्याचं शुल्लक कारण होतं, आणि, ते म्हणजे, माझ्या नेहेमीच्या मेकॅनिकचे दुकान, माझ्या रोजच्या जाण्या – येण्याच्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला होते.  

त्यामुळे, लाईट दुरुस्त करायचा, म्हणजे सकाळी त्याच्याकडे गाडी न्यायची, तो म्हणणार, साहेब तासाभरानी या, करून ठेवतो. चालत घरी यायचं. तो वेळेत करून ठेवेल, यावर आपला कधीच विश्वास नसतो. म्हणून आपण त्याला फोन करणार, ‘झालीय का’.  मग चालत जाणार आणि गाडी आणणार.  दिव्यासारख्या किरकोळ कामाकरता इतके सोपस्कार नकोत, म्हणून, ‘आज करे सो कल कर, आणि कल करे सो परसो कर ’ असा माझा उलटा प्रवास सुरु होता.

काल रविवार होता. दुपारी आमचे युरोप मित्र श्री नेरकर यांच्याकडे गेलो होतो. घरी परत येतांना लक्षात आलं, की, मेकॅनिकचे दुकान याच रस्त्यावर आहे. विचार केला, की, गाडी त्याच्याकडे टाकू, रिपेअर होईपर्यंत इकडे -तिकडे बघू, टाईम पास करू. बायको घरी चालत जाईल.  ‘कल करे सो आज कर, आणि आज करे सो अभी’, असा  विचार पक्का झाला. कार्पोरेशन बॅंकेजवळ पोहोचलो आणि लक्षात आलं, की, इथे एक स्पेअर पार्टचं दुकान आहे आणि तिथे मेकॅनिक पण असतो. विचार बदलला. इथेच गाडी टाकली तर काम लवकर होणार, हे नक्की. 

बायको चालत घराकडे निघाली, मेकॅनिकला लाईटबद्दल सांगितले. त्यानी चेक केले आणि म्हणाला स्विच बदलावा लागेल. मी पैसे विचारले आणि दुकानात पैसे देईपर्यंत, यानी स्विच काढला – नवीन बसवला, म्हणाला साहेब गाडी झाली, घेऊन जा. जुना स्विच त्यानी माझ्या हातात दिला. 

मी : (सवयीप्रमाणे विचारलं) गाडी चालू करून लाईट लागतो, हे चेक केले ना ? 

मेकॅनिक : साहेब, त्याची काही गरज नाही. गाडी चालवतांना अंधार पडला, की, बटन ऑन करा. लाईट लागणार 

मी : एकदा चेक तर करून घ्या 

मेकॅनिक : साहेब, दुकानात सगळा  माल ओरिजिनल असतो. त्यामुळे मालावर माझा पूर्ण विश्वास आहे. काम करतांना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही  विचार मी कधीच मनात आणत नाही. त्यामुळे Always do it right, first time हा माझा मोटो आहे. काम चुकायची गुंजाईश – झिरो. 

मी (मनांत)  : हा माणूस आपल्यापेक्षा खूपच वर पोहोचलेला दिसतोय. 

मी मेकॅनिक ला थँक्स म्हणालो आणि गाडी सुरु केली. अजून लख्ख उजेड होता, पण सवयीप्रमाणे, माझा अंगठा लाईटच्या बटनावर गेला, की, निघण्यापूर्वी लाईट लावून बघावा म्हणून. पण लगेच विचार आला, की, मेकॅनिक ला बटणाच्या क्वालिटीवर आणि स्वतःच्या कामावर इतका विश्वास आहे, तर मला त्याच्या कामावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. माझा अंगठा आपोआप मागे आला. तेवढ्यात एका जवळच राहणाऱ्या मित्राचा फोन आला, थोडावेळ घरी येऊन जा, एक स्पेशल डिश आहे. 

मित्राकडून निघतांना चांगलाच अंधार पडला होता. गाडी सुरु केली. लाईट चे काम झाले आहे, हे माहित होते. बटन सुरु केलं आणि लाईट सुरु. मेकॅनिक बद्दल तोंडातून आपोआप शब्द आले – What a level of confidence !

घरी आल्यानंतर, मेकॅनिकचे, “काम करतांना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही  विचार मी मनात आणत नाही”, “Always do it right, first time हा माझा मोटो आहे. त्यामुळे काम चुकायची गुंजाईश – झिरो”, हे शब्द मनात घुमायला लागले. आणि मी भूतकाळात गेलो —

* कुणाच्या खात्यात बँकेत चेक भरायचा असेल, तर चेक लिहिल्यानंतर मी २-३ वेळा सगळे बरोबर आहे ना ! हे चेक करतो आणि बँकेत चेक बॉक्स मध्ये टाकण्यापूर्वी पुन्हा बघतो, कि, काही चुकले तर नाही ना !

* घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे असेल, तर ५-६ वेळा तरी कुलूप ओढून बघतो. नंतर गाडीत बसल्यानंतर काही वेळा मनात रुख-रुख राहते, की, कुलूप बरोबर लागलय ना, कार्पोरेशन चा पाण्याचा नळ बघायचा राहिला आहे – सुरु राहिला असेल तर काय होणार 

* कार लॉक करून आपण घरात येतो आणि मनात पाल चुकचुकते कि पार्किंग लाईट ऑन तर नसतील 

* एकदा आम्ही मित्र कारनी बाहेरगावी निघालो. थोडं पुढे गेलो आणि एक जण म्हणाला, गाडी मागे घे. दाराला बाहेरून कुलूप लावले आहे का नाही, आठवत नाही. संध्या चोऱ्या खूप होतायत. एक जण म्हणाला, बाहेरून एक्स्ट्रा कुलूप लावणे जास्त अनसेफ आहे. चोरांना खात्री असते, की, आत कुणी नाही आणि आपला मार्ग मोकळा आहे. लॅच चे कुलूप जास्त सेफ आहे, काळजी करू नको. पण मित्राला ते पटले नाही. आम्ही कार वळवली. घरी गेलो. कुलूप व्यवस्थित होते. तरी मित्रानी २-३ दा ओढून बघितले आणि आम्ही निघालो. 

* बऱ्याच वेळा आपण छोटा मोठा प्रवास करून, एखाद्या जागृत देवस्थानाला जातो. आत जातांना काहीतरी इच्छा घेऊनच आत जातो. मुद्दाम पूजेचे साहित्य विकत घेतो, फुलं घेतो. आत गेल्यावर व्यवस्थित दर्शन होतं. प्रसन्न मनानी आपण बाहेर पडतो. आणि मंदिराच्या बाहेर पडल्यावर लक्षात येतं, की, अरे, देवाकडे जे मागण्याकरता आपण इथपर्यंत आलो होतो, ते तर मागायचंच राहीलं .  

अशी भली मोठी यादी नजरेसमोरून जायला लागली. माझ्यासारखे अजून बरेच ‘मी’ नक्कीच असतील. आणि सगळ्यांचे असेच वेगळे वेगळे अनुभव पण असतील. या आपल्या अशा सवयीमुळे, वेळ तर वाया जातोच जातो आणि ताणतणाव पण वाढतात. जेवतांना कधी जोरदार ठसका लागतो, कधी पाय घसरून पडायला होतं, कधी भाजी चिरतांना चाकू हाताला लागतो, अपघात होतात, तब्येत बिघडते वगैरे, वगैरे.  

आणि या सगळ्याचं कारण काय? तर, कहींपे निगाहे – कहींपे निशाना आणि  Not doing things Right, at first time. ‘जहापे निगाहे – वहींपे निशाना’ हे जर जमवलं, तर काहीच कठीण नसतं. ह्याच आधारावर  स्वयंवर जिंकल्याचं महाभारतामधलं उदाहरण आहेच. आणि त्याकरता गरज आहे – मन लावून काम करण्याची – हातातले काम आणि मी यामध्ये इतर विचार न आणण्याची. असं म्हणतात, आंघोळ करत असाल तर – फक्त मी आणि आंघोळ यावर लक्ष ठेवा, जेवत असाल तर – समोरचे चविष्ट अन्न चावून खाणे आणि  मिळणारा आनंद यावर लक्ष केंद्रित करा. टीव्ही बघत असाल तर फक्त टीव्ही एन्जॉय करा. टॉयलेट ला गेला असाल तर फक्त तेच – फोन नाही / फेस बुक नाही.  एका वेळेस एकच काम आणि ते पण मन झोकून. 

मी मनात खूणगाठ बांधली, की, या क्षणापासून Do it right – First time चा अवलंब करायचा. रोज सकाळी उठल्यावर मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे. रोज रात्री झोपण्यापूर्वी मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे, म्हणजे ते अंतर्मनात रुजतील. असं सांगतात, की, एखादी गोष्ट सतत ३० दिवस केली, तर ती सवय लागते आणि ६० दिवस केली, तर तो स्वभाव बनतो. 

आणि मग एक दिवस, आपलेच अंतर्मन, आपल्या कामाकडे बघून म्हणेल – What a level of confidence!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

(दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!) – इथून पुढे —-

पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई… दया, करुणा, प्रेम निर्माण होण्यासाठी अशांना एखादा प्रसंग किंवा व्यक्ती समोर असण्याची गरज वाटत नाही… यांचे पात्र कायम प्रेम आणि करुणा यांनीच काठोकाठ भरलेले आणि भारलेले असते…

तहानलेल्या बाळाला पाहून आईला जसा पान्हा फुटावा, तसं एखाद्या गोरगरिबाचे दुःख आणि वेदना पाहून यांच्या पात्रालाही पान्हा फुटतो… आणि मग झिरपत राहतात जिव्हाळा, माया आणि प्रेम नावाच्या भावना…! यातलंच एक नाव श्री. दानिश भाई…!!!

आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली. दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर, आता मला काय वाटत असेल, हे मी कोणत्या शब्दात, कसं सांगू ? 

आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार  केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच; परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो…. असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे. 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण) –

वैद्यकीय, त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले, डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक / नैसर्गिक चा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे ) हे आमच्या पथ्यावर पडले…! अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत.

अनेक फुलं देवाच्या दारात, मंदिराबाहेर पडलेली असतात, त्याला “निर्माल्य” म्हटले जाते…. अनेक फुलांच्या पाकळ्या, फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला “कचरा” म्हटले जाते… आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं …! आपण “निर्माल्य” की “कचरा”… ? हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. असो. 

* आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील, किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. 

* ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जाती नुसार (जात म्हणजे गुलाब, झेंडू, निशिगंधा, जास्वंद वगैरे वगैरे 😊) वर्गवारी करतील. 

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल. या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. 

* यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. 

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. 

यातील बऱ्याचशा बाबी मशीन वर होणार आहेत, या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत… जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला  सेंचुरी एन्का कंपनी देणार आहे. माझे ज्येष्ठ स्नेही डॉ निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे. 

तर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत…. रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) कचरा आणि निर्माल्यामधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. माझी आई, जो बुके बनवते, त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं… आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 

माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका, प्रथम प्रशिक्षिका माझी आई… लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती…  तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो…. आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली… आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे… या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे… आईच ती… नाही म्हणेल कशी…. ? 

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू. रोटरी क्लब, लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्या ऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. यातून जो निधी मिळेल, तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल. 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. 

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही‌)

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. 

Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. 

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे.

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. पिशव्यांची विक्री करून, मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे… ! हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे… ! बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे… 

भिक्षेकर्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र / रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी…  हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही, मी आशा सोडली होती… जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो, तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा… अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्या सुद्धा नकळतपणे घडत गेल्या, आणि हे राखेत निपचित पडलेलं… विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं… या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले… डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला… !

ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे ; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल… सन्मानाने ! 

दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात…. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात… आजपर्यंत माझ्या आणि मनीषा च्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत, ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील…. आयुष्याच्या या टप्प्यावर, काळ्याकुट्ट मध्यरात्री, आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… ते स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!

ठरलं… आता ठरलं…. 

आपल्या या नवीन बाळाचं नाव ‘मध्यरात्रीचे सूर्य…!!!” हेच ठेवायचं ठरलं… 

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो…. आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल…

सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे 25 लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून …

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 150 प्रतिदिन.
  2. सकाळचा चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  3. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा.

अंदाजे रुपये 300 दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे…  25 लोकांसाठी रुपये 7500 प्रति दिवस… सुट्ट्या वगळता 25 दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये 1, 87, 000 (एक लाख सत्याऐंशी हजार)… यात कच्चा माल, फिरतीसाठी वाहन, पेट्रोल, मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. 

आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे… रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडं सुद्धा घालावी लागतील…! असो…

हा प्रकल्प नेमका काय आहे, कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर, वरील प्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे. 

चैत्र शु. १ गुढीपाडवा, अर्थात 30 मार्च 2025  या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची “मनीषा” आहे…! पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन…

प्रश्न खूप आहेत, पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील, असा विश्वास आहे… इथवर ज्याने आणून सोडलंय, तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल… हि श्रद्धा आहे… आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे…

मला काही नको… फक्त सोबत रहावे, मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा, तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा…!!!

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे,

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

सूर्योदय तो पूर्वेला अन्

पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

त्रिकालाबाधित सत्य असे ||

 *

रवि जरासा अवखळ भारी

एका जागी स्थिर नसे

एका जागी नित्य उगवणे

हेच तया मंजुर नसे  ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

मजला येईल कंटाळा   ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेवही हसले किंचित

हट्ट पाहुनी सूर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

हा मेळ कसा साधायाचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

पश्चिमेस जा अस्ताला  ।।

 *

परि उगवता पूर्व दिशेला

उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

जागा बदले नित्याची  ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

उत्तरायणी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

हे देवाचे दान असे ।


कवी :ॲड .समीर आठल्ये

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बहावा… (विषय एकच… काव्ये तीन) ☆ सुश्री नीलांबरी शिर्के  – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  बहावा… (विषय एकच… काव्ये तीन) ? सुश्री नीलांबरी शिर्के  – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

सुश्री नीलांबरी शिर्के

हिरवा चुडा हातात लेऊन

झाड हळदुले नवरी झाले ..  की ..  

रविराजाने विसरून जाऊन

सुवर्ण घडे इथे ओतले

*

रखरखत्या उन्हात फिरता

दृश्य असे दृष्टीस पडता

निसर्ग संपन्नतेपुढे आपला

आपसुक झुकतोच ना माथा  

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ )

डॉ.सोनिया कस्तुरे

निसर्गाची गुढी | उभी उंच नभी 

तम, प्रखरता | नाही तमा मनी

*
डौलदार बांधा | हळद पिऊनी 

सोनेरी झुंबर | जणू नभांगणी

*

कोवळी नाजुक | हिरवी पालवी

अंगीखांदी कशी | मधून डोकावी

*
रुणझुण तिला | पवन डोलवी

गाणे सुखे गाते | रणरणत्या उन्ही

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

( ३ )

श्री आशिष बिवलकर   

ऋतू चक्राचा

घेऊन सांगावा |

चैत्र पावलांनी,

फूलला बहावा |

*
ग्रीष्माचा कहर,

तापले माळरान |

पिवळ्या फुलांनी,

सजला तरु छान |

*
उकाड्याने हैराण,

जीवास लागे उमासा |

रंगांची चाले उधळण,

दृष्टीस मिळे दिलासा |

*
तरुवर लटकली झुंबरे,

तरुतळी गालिचा सुवर्ण |

उष्ण गंधीत समीर,

डुलती तालावर पर्ण |

*
रंगांनी रंगला बहावा,

नादच त्याचा खुळा |

निरंतर चालत असे,

निसर्गाचा सोहळा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

मड व्होल्कॅनो 

व्होल्कॅनो अर्थातच ज्वालामुखी हा तसा परिचित शब्द. पण मड व्होल्कॅनो हा काहीसा वेगळा शब्द. आमचं कुतूहल चांगलंच चाळवलं गेलं होतं. आज अंदमानच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. रामनं, (आमचा टूर लिडर) रात्री झोपताना निक्षून सांगितलं होतं की भल्या पहाटे तीन वाजता आपण हॉटेल मधून बाहेर पडणार आहोत. जो बरोबर तीन वाजता बस मध्ये नसेल त्याला न घेता बस निघेल.पावणेतीन वाजताच आम्ही सगळे हॉटेल लाऊंजमध्ये हजर होतो. 

वीर सावरकरांना मानवंदना करून, बाप्पाच्या जयजयकारात प्रवास सुरू झाला. आमच्या हॉटेलपासून साधारण अडीच तास प्रवास करुन आम्ही मध्य अंदमानला आलो. इथं जलडमरु बॉर्डरवर बाराटांगला जाण्यासाठी गेट आहे. हे गेट सकाळी सहा वाजता व नऊ वाजता उघडते. दुपारी तीन वाजता ते बंद होते. बारटांगला जाणारा रस्ता जंगलाच्या अशा भागातून जातो जेथे आदिवासी लोकांचा भाग आहे. जारवा जातीच्या या आदिवासींच्या सुरक्षिततेकरता हा भाग प्रतिबंधित आहे. गेटवर आधारकार्ड (परदेशी प्रवाशांना पासपोर्ट ) दाखवावे लागते. मगच प्रवेश करता येतो. 

आपण फार लवकर आपली झोप सोडून आलोय.  गेटवर आपलीच बस पहिली असेल हा भ्रमाचा भोपळा तिथं पोचतात फुटला. आमच्या पुढे एकशे छत्तीस गाड्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे स्टॉल्स होते. गरमागरम मेदूवडे आणि डाळवडे तयार होते. पट्टीचे खाणारे मात्र हवेत. 

आदिवासी पाड्यातील जारवा लोक रस्त्यात दिसण्याची शक्यता होती. ते लुटारू आहेत असं ऐकलं होतं. या रस्त्यावर बसच्या वेगाला मर्यादा आहे. कारण क्वचित एखादा प्राणी रस्त्यावर आलेला असू शकतो. जारवांना बघून उत्साहित होऊन काही करायचं नाही. हात हलवायचा नाही. थांबायचं नाही. फोटो काढायचा नाही. त्यांना काही खाऊ द्यायचा नाही. अशा सूचनांचे फलक रस्त्यावर लावलेले आहेत. आम्हाला कोणताच वाईट अनुभव आला नाही. परतीच्या प्रवासात आम्हाला जारवांचे बच्चू दिसले. एक दोन नाही तर सहा बच्चू. काळीकुळकुळीत, उघडबंब, कोरीव शिल्पासमान ती सहा कोकरं रस्त्याच्या कडेला ओळीनं उभी होती. हसरे चेहरे, काळेभोर टप्पोरे डोळे बसकडे मोठ्या आशेनं बघतायत का? 

खूप कडक सूचना दिल्या गेल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या पाळल्या. 

जारवा ही आदिवासी भागात राहणारी जमात. दक्षिण आणि मध्य अंदमानच्या पश्चिम किनारपट्टीवरील जंगलात यांची वस्ती आहे. बांबू, नारळाच्या झावळ्या, काठ्या यापासून घरं बांधून राहतात. घर नव्हे खरंतर झोपडीवजा आडोसा म्हणावा. हे निसर्गाशी एकरूप होऊन गेले आहेत. निसर्गाचे नियम त्यांना मान्य आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. त्सुनामी मध्ये हे लोक मृत्युमुखी पडले नाहीत. या संकटाची कल्पना त्यांना आधीच आली असावी. फळं कंदमुळं मासे हे त्याचं प्रमुख अन्न. न शिजवता कोणतीही प्रक्रिया न करता हे लोक अन्न खातात. मीठ मसाला तेल यांचा वापर न करता आपण ज्याला ब्लाण्ड म्हणतो तसं अन्न ते घेतात. आपल्या जगातील आधुनिक तंत्रज्ञानापासून कोसो दूर आहेत हे लोक. त्यांना त्याची काही गरजही नाही. पण भारत सरकार त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलिकडेच एकोणीस जारवांना त्यांचे ओळख पत्र दिले गेले आहे. 

जेटीवर पोचतात आम्ही बसमधून उतरलो आणि एका मोठ्या क्रूझ मध्ये चढलो. आमची बस आणि काही गाडय़ा या क्रूझमध्ये चढवल्या गेल्या. चारशे पाचशे माणसं बसू शकतील अशी क्रूझ अर्धा पाऊण तास प्रवास करुन बारतांग बेटाला लागली. तिथून पुढे आम्ही छोट्या छोट्या जीपनं बॅरन बेटावर गेलो. जाताना वाटेत आदिवासी आणि त्यांची वस्ती दिसत होती. आता साधारण पंधरावीस मिनिटांचा ट्रेक होता. टेकडीवजा रस्त्यानं चढ चढून आम्ही माथ्यावर पोचलो. आजूबाजूला चढताना थोडी झाडी होती. पण दाट जंगल नव्हते. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र स्तंभित झालो आम्ही. कारण समोर ठिकठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी दिसत होते. हे ज्वालामुखी सक्रिय नव्हते. तरी त्यातून हळुहळू बुडबुडे येताना दिसत होते. काही लहान काही मोठे. चिखलाचे लहान मोठे डोंगर किंवा ढीग म्हणावेत . आणि प्रत्येक डोंगराच्या टोकावरून हलकेच येणारे बुडबुडे. निसर्गातला हा चमत्कार बघताना मन थक्क होतं. निसर्ग पोटात काही ठेवून घेत नाही. काही सजीवांचे निर्जीव घटकांचे पृथ्वीच्या पोटात खोल कुठेतरी विघटन होत आहे. त्या विघटनात उत्सर्जित होणारे काही वायू बाहेर पडताना स्वतःबरोबरच तिथला थंड झालेला चिखलाचा ज्वालामुखी घेऊन बाहेर पडतात. विश्वंभरानं किती विचार करून हा खेळ मांडला आहे. किती जटील आणि गुंतागुंतीची रचना केली आहे. आणि ती जटीलता सोपी करण्याचे मार्ग देखील तयार केले आहेत. गुंतागुंतीची कोडी तितक्याच हलक्या हातानं नाजूक बोटांनी कुशलतेने सोडवली आहेत. म्हणूनच तर आपण सुरक्षित आनंदी जीवन जगत आहोत. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची… 

– क्रमशः भाग चौथा

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “विश्वास…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “विश्वास…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

वे हमारे पडोसी थे। महानगर के जीवन में सुबह दफ्तर के लिए जाते समय व लौटते समय जैसी दुआ सलाम होती, वैसी हम लोगों के बीच थी। कभी कभी हम सिर्फ स्कूटरों के साथ हाॅर्न बजाकर, सिर झुका रस्म निभा लेते।

एक दिन दुआ सलाम और रस्म अदायगी से बढ कर मुस्कुराते हुए वे मेरे पास आए और महानगर की औपचारिकता वश मिलने का समय मांगा। मैं उन्हें ड्राइंगरूम तक ले आया। उन्होंने बिना किसी भूमिका के एक विज्ञापन मेरे सामने रख दिया। मजेदार बात कि हमारे इतने बडे कार्यालय में कोई पोस्ट निकली थी। और उनकी बेटी ने एप्लाई किया था। इसी कारण दुआ सलाम की लक्ष्मण रेखा पार कर मेरे सामने मुस्कुराते बैठे थे। वे मेरी प्रशंसा करते हुए कह रहे थे – हमें आप पर पूरा विश्वास है। आप हमारी बेटी के लिए कोशिश कीजिए। मैंने उन्हें विश्वास दिलाया कि मैं इसके लिए पूरी कोशिश करूंगा। नाम और योग्यताएं नोट कर लीं।

दूसरे दिन शाम को वे फिर हाजिर हुए। मैंने उन्हें प्रगति बता दी। संबंधित विभाग से मेरिट के आधार पर इंटरव्यू का न्यौता आ जाएगा। बेटी से कहिए कि तैयारी करे।

– तैयारी? किस बात की तैयारी?

– इंटरव्यू की और किसकी?

– देखिए मैं आपसे सीधी बात करने आया हूं कि संबंधित विभाग के अधिकारी को हम प्लीज करने को तैयार हैं। किसी भी कीमत पर। हमारी तैयारी पूरी है। आप मालूम कर लीजिएगा।

मैं हैरान था कि कल तक उनका विश्वास मुझमें था और आज उनका विश्वास…?

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares