मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 88 ☆ वांझोटी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 88 ☆

☆ वांझोटी ☆

जन्म नाही दिला तिनं

तरी तीच माझी आई

अनाथाला ही पोसते

आहे थोर माझी माई

 

काही म्हणतात तिला

आहे वांझोटी ही बाई

त्यांना बाई म्हणायला

जीभ धजावत नाही

 

बाळ श्रावण होण्याचं

स्वप्न पाहतोय मीही

त्यांना डोईवर घ्यावं

फिराव्यात दिशा दाही

 

मुक्ती मिळूदे मजला

त्यांच्या ऋणातून थोडी

त्यांच्या पायात असावी

माझ्या कारड्याची जोडी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तेजस्विनी की…. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ तेजस्विनी की…. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

रुपवंत, शीलवंत

स्त्री ही अशी बुद्धिमंत

स्वतःसवे घरादारा

बनविते नीतीमंत

ती शिकते

शिकवतेही तीच

बछड्यांच्या संगोपना

ती तर नित असे दक्ष.

ती कधी घडी बसवी

मार्गी लावी द्रष्टी होत.

अशी ही स्त्री स्वतः जळत

दीपदान करी सतत

घोर तमा दूर नेत

तेजस्विनी ठरे लखलखत.

स्त्री अशीही

शिक्षणापासून वंचित

डोक्यावर छत्र नसलेली

अब्रू लक्तरात झाकलेली

समाजातील कावळ्यांच्या

नजरापासून लपणारी

क्षणोक्षणी ठेच खात

कसंबसं सावरणारी

झाशीची राणी तीच

आजही अबलेचं जिणं

जगणारी तीच.

स्त्री अशी -स्त्री कशी ?

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महिला दिन विशेष – शापित अहिल्या ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ महिला दिन विशेष – शापित अहिल्या ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆ 

पदस्पर्श रामाचा

त्याने शिळा धन्य झाली

शापातून सती अहिल्या

त्या स्पर्शाने मुक्त झाली

 

दिव्य होती  ती साध्वी

दिव्य तो पावन स्पर्श

युगायुगांची कथा

गातो रामायण सहर्ष

 

आज…. संपली ती राम कथा

सत्यातून ‘राम’ गेला

स्वार्थापायी ‘राम -राम’

झाले सारे मलाच मला

 

स्पर्श झाला भयानक

.  नको नको ती बला

बलात्कार,अन्याय, बळजबरी

अत्याचार  सोसतेय अबला

 

आहे शापित अजुनी अहिल्या

शीळेहूनही घोर दशा

कधी काळी अवतरेल ‘राम’

.  पद स्पर्शाची आर्त आशा.

 

© सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

दुसऱ्या दिवशी सकाळीही वातावरण तंगच होतं. तसा सकाळी कोणाला हसाबोलायला वेळ नसतो.पण तरी फरक जाणवण्याजोगा होता.

बाईने उपमा करुन ठेवला होता. दोन्ही गॅसवर आमटी आणि भाजी शिजत होती. तिसऱ्यावर बाई चपात्या करत होती.

मग चौथ्या शेगडीवर आरतीने चहाला ठेवलं. स्वतःसाठी आणि समरसाठी उपमा वाढून घेतला. तोपर्यंत भाजी, कोशिंबीर तयार झाली होती. तिने मग समरचे आणि स्वतःचे डबे भरले आणि त्या त्या बॅगमध्ये नेऊन ठेवले. स्वतःसाठी आणि समरसाठी चहा गाळून घेतला आणि ती उपमा खायला बसली.

मधूनमधून समरला हाका मारणं चालूच होतं -“समर, आटप लवकर. आठ पंचवीस झालेत.”

समरचा पत्ता नव्हता. आई नेहमीप्रमाणे समरला घाई करायला गेल्या नाहीत.

आरतीने ब्रेकफास्ट आटोपला आणि समरची वाट बघत न बसता ती ऑफिसला निघाली.

ट्रेनमध्ये चढली, तरी तिचा वैताग कमी झाला नव्हता.

“काय ग? आज सकाळी सकाळी भांडायबिंडायला वेळ बरा मिळाला,” निमाने विचारलं.

“अगं, वेळ कुठचा मिळायला!स्वयंपाकाला बाई ठेवली, तरी इतर कामं असतातच ना. डबे भरणं, बॅगमध्ये ठेवणं, चहा करणं, खायला वाढणं, शिवाय मुलांचं बघणं -सगळी कामं मी करायची. हा आयता येऊन बसणार. म्हणून तर याला रुसायफुगायला वेळ मिळतो ना.”

“अच्छा!आज ‘आप रुठा ना करो’ होतं वाटतं?”निमाने चिडवलं.

“काल रात्रीपासूनच. म्हणजे होतं आधीपासूनच;पण मला कळलं काल रात्री.”

“अगं, झालं तरी काय?”

“तुला सांगते निमा, आठवण झाली, तरी डोकं सणकतं. अगं, मी प्रमोशनसाठी अप्लाय केलंय ना, तर आईंचं आणि समरचंसुद्धा म्हणणं असं की, प्रमोशन फक्त समरनेच घ्यावं. बायकांना काय करायचीत पुढची प्रमोशन्स? आणि म्हणे समरची एकट्याची ट्रान्सफर झाली, तर तो एकटा जाऊ शकेल ; पण माझी एकटीची ट्रान्सफर झाली, तर मी मुलांना घेऊन जायचं. म्हणजे तशी मुलांची काळजी मलाही आहेच. त्यांच्यापासून लांब मी राहूही शकणार नाही. पण हा सगळा विचार मी स्वतः करीन ना. हे कोण माझ्यावर सक्ती करणारे?”

“काही नाही आरती. तू सरळ सांगून टाक -मी प्रमोशन घेणार म्हणजे घेणार. आणि ट्रान्सफरचं म्हणशील, तर मीरा कशी ग गेली?”

“बघ ना. एवढ्या लांब यु.पी.ला जाऊन राहिली. तीसुद्धा एक नाही, दोन्ही नाही, चांगली साडेतीन वर्षं!आणि चार वर्षाच्या मुलाची जबाबदारी सासू आणि नवऱ्याने घेतली.”

“तू काहीही म्हण, आरती. पण घरच्यांचं सहकार्य असल्याशिवाय आपण बायका काहीच करू शकत नाही. आपली हुशारी, टॅलेंट, कर्तबगारी सगळं फुकट जातं, हेच खरं.”

याविषयी दोघींचं एकमत झालं. निमाने पूर्णविराम देऊन हा विषय संपवून टाकला.

पण आरती मात्र दिवसभर त्यावर विचार करत होती. आणि ती जितका जास्त विचार करत होती, तितका प्रमोशन घेण्याचा तिचा निर्णय आणखी दृढ होत होता.मग तिने ठरवलं -घरातल्यांना तोंड कसं द्यायचं, याचा विचार करण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे.

मग भराभरा तिने सगळं काम हातावेगळं केलं. मग इंटरव्ह्यूच्या दृष्टीने कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी कोणती सर्क्युलर्स, मॅन्युअल्स, पुस्तकं वाचायची, याची यादी केली. महत्त्वाच्या क्रमानुसार त्यांना नंबर दिले. पहिल्या क्रमांकाच्या टॉपिकची सर्क्युलर फाईल घेऊन तिने वाचायला सुरुवात केली. वाचतावाचता नोट्सही काढल्या. काही काही गोष्टी तिला अगदी तोंडपाठ होत्या; पण कदाचित  समरच्या लक्षात नसू शकतील, म्हणून तिने त्याही लिहून काढल्या. साधारण पन्नास एक मिनिटात तिने ती फाईल संपवली. मग पुन्हा एकदा तिने आपण काढलेल्या नोट्सवरून नजर फिरवली. फर्स्टक्लास जमल्या होत्या. समरलाही उपयोग होणार होता. त्याने ती पूर्ण फाईल न वाचता फक्त या नोट्स वाचल्या असत्या, तरी त्याचं कामं झालं असतं.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन आया ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ दोन आया ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

त्या दोघींनाही एक एक मुलगी होती. त्यांचा पालन-पोषण करण्यासाठी त्यांना नोकरीची गरज होती. नोकरी मिळतही होती. नोकरी चांगली होती. पगारही चांगला होता. पण ती मिळवण्यासाठी एक अट होती. अट अशी होती की ती मिळवण्यासाठी मॅनेजरला एक तर दहा लाख रुपये द्यायचे किंवा मग स्वत:ला तरी त्याच्या स्वाधीन करायचं.

पहिलीने एकदा आपल्या मुलीकडे बघितलं आणि ती निघून गेली. परत आली तेव्हा तिच्या हातात नियुक्ती-पत्र होतं. तिने मोठ्या गर्वाने मुलीकडे बघितलं, आणि मनातल्या मनात म्हणाली, ‘बघ! घर विकून नोकरी मिळवलीय. तुझ्या आईने घर विकलं, पण स्वत:ला नाही विकलं. नोकरी चांगली आहे. तू मोठी होईपर्यंत घरही होईल.’

तिने मुलीचा मुका घेतला आणि तिला आपल्या छातीशी कवटाळून धरलं.

दुसरी जवळ विकायला घर नव्हतं. तिने क्षणभर मुलीकडे बघितलं आणि तीही निघून गेली. ती परत आली, तेव्हा तिच्याही हातात  नियुक्ती-पत्र होतं. तिनेही काहीशा गर्वाने मुलीकडे पाहीलं आणि मनातल्या मनात म्हणाली, ‘ बघ बेटा, मी स्वत:ल विकून नोकरी मिळवलीय. काय करणार? माझ्याकडे विकायला घर नव्हतं ना! नोकरी खूप चांगली आहे. तू मोठी होईपर्यंत आपलं घर बनेलच आणि मग तू जेव्हा मोठी होशील ना, तेव्हा नोकरीसाठी विकायला तुला आपले घर असेल. तुला स्वत:ला विकायची वेळ येणार नाही.’

तिनेही मुलीचा मुका घेतला आणि तिला आपल्या छातीशी कवटाळून धरलं.

 

मूल कथा – दो माँएं – मूल लेखक – श्री घनश्याम अग्रवाल   

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिनांच्या निमीत्ताने… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ विविधा ☆ जागतिक महिला दिनांच्या निमीत्ताने… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिन १९४३ साली साजरा झाला. १९७१ साली आठ मार्चला एक महिला संघटन, समस्या निवारण, सुरक्षितता असे मूलभूतत प्रश्न घेऊन पुण्यात, एक व्यापक असा मोर्चा काढला होता. पुढे १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून युनोने जाहीर केले… आणि त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी येऊ लागली. बदलत्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार स्त्रियांच्या समस्या, प्रश्न ही बदलत गेले… जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मूळ हेतु, महिलांचे अधिकार जपणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे हाच आहे.. या सर्व पार्श्वभूमी चा विचार करता, या महिला दिनी, एक स्त्री म्हणूनच नव्हे, एक जागरुक, सामाजिक भान असणारी व्यक्ती म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न ऊभे राहतात… स्त्रीवाद म्हणजे ढोबळमानाने असे मानले जाते की पुरुषांविरुद्धची चळवळ. मात्र स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचार प्रवाह….

वास्तविक आपल्या संस्कृतीत..

।।यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।।

ही विचारधारा आहे. आपले अनेक सण स्त्री शक्तीचा जागर करतात. पण मग मखरात पूजल्या जाण्यार्‍या या स्त्री शक्तीचे प्रत्यक्ष समाजातले स्थान सुरक्षित तरी आहे का?

तितकेच पूजनीय आहे का?

समानतेची वागणूक खरोखरच तिला मिळते का?

“मुलगी झाली” म्हणून तिच्या जन्माचा सोहळा होतो का?

ती गृहित, ती दुय्यम हे तिच्या जीवनाचं पारंपारीक स्टेटस पूर्णपणे बदलले आहे का?

जेव्हां ‘मी टु’ सारखी अंदोलने घडतात, हाथरस सारख्या घटना वेळोवेळी वाचायला मिळतात, तेव्हां वरील सर्व प्रश्नांची ऊत्तरे संपूर्णपणे सकारात्मक मिळत नाहीत हे दु:खं आहे.

महिला दिनी, महिला शिक्षणासाठी जीवन समर्पित करण्यार्‍या पूज्य सावित्रीबाईंचे स्मरण होईल. अनेक पौराणिक, ऐतिहासिक, ऊंबरठा ओलांडून जगलेल्या विसाव्या, एकविसाव्या शतकातील, सर्व स्तरांवर, सर्व क्षेत्रांत ऊच्च स्थानी पोहचलेल्या महिलांची गौरवाने नावे घेतली जातील… पण म्हणून स्त्रीच्या आयुष्यातला संघर्ष संपला असे म्हणू शकतो का? गुलामगिरीच्या जोखडातून ती पूर्ण मुक्त झाली असे सामाजिक चित्र आहे का..???

पुन्हा ऊत्तर नाईलाजाने नकारात्मकच….

परवाच माझी एक अत्यंत सुविचारी, समंजस, कुटुंबवत्सल, नाती जपणारी मैत्रीण सासुच्या भूमिकेत सुनेविषयी सांगताना म्हणाली.. “अग! शांभवीचं घरात लक्षच नसतं..सदा आॅफीसच्या मीटींग्ज, करीअर, पैसा. प्रमोशन्स… घरासाठी वेळच नाही. मुलांसाठी वेळच नाही.. काही सण, रिती, सोहळे परंपरा… कश्शाची पर्वा नाही…. वेळच नसतो तिला.. आज मुलं  सगळं स्वत:चं स्वत: करतात, सगळ्यांची वेळापत्रकं सांभाळली जाताहेत… पण ऊद्या मुलांना  आईबद्दल नेमकं काय वाटेल ग….मायेचा  सहवास नसेल तर या पीढीचं काय होणार?…”

तिचं हे भाष्य, हे प्रश्न ऐकल्यावर मी थक्क झाले!!  माझ्याकडे ऊत्तरं होतीही. नव्हतीही. तिला विचारावेसे वाटणारे प्रश्नही मनात ऊभे राहिले… पण प्रातिनिधीक स्वरुपातच मला शांभवी दिसली.. एका महत्वाकांक्षी पुरुषाच्या मागे स्त्री सर्वस्वाचा त्याग करून जबाबदारीने उभी असते, तेव्हांही ती दुय्यम स्थानांवर, आणि स्त्रीपणाचा ऊंबरठा ओलांडून  चार पाऊले पुढे टाकते,  तेव्हांही ती गौरवमूर्ती न बनता, समाजाच्या नजरेत अपराधीच….. हीच समस्या कालही होती आजही आहे…..!!

म्हणूनच आजच्या महिला दिनी स्त्री शक्तीचा ऊदो ऊदो करताना “जोगवा” मागायचाच असेल तर तो संपूर्ण सक्षमतेचा.. स्वशक्तीचा, खंबीर बनण्याचा…  आत्मनिर्भरतेचा… निर्णयक्षमतेचा आणि त्याच बरोबर एक नवा जाणीव असलेला, समान दृष्टीकोन असलेला, अविकृत समाजबांधणीचा…. कारण, जरी चढलो असलो उंचावरी तरी पायर्‍या अजुन बाकीच आहेत…..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

 ☆ विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

गावाकडे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया या आत्मनिर्भर  असतात.  शेतातील जवळ जवळ ऐंशी टक्के कामे स्त्रियाच करतात. पेरणी टॅक्टरने केली तरी काही ठिकाणी हाताने रोपे लावणे, बी टोकणे यासाठी स्त्रियाच लागतात. नंतर खुरपणी, भांगलन आहेच. साधारण एका पिकाला दोन तीन वेळा भांगलन करावेच लागते. त्यातून स्त्रियांना रोजगार उपलब्ध होतो. या कामासाठी शिक्षणाची अट नसते. शिकण्यासाठी एखादा दिवस पुरतो. त्यामुळे तुमची इच्छा असेल आणि  तुम्हाला गरज असेल तर कुणीही शेतीत काम करून रोजगार मिळवू शकतो.

भांगलन झाल्यानंतर काढणी, मळणी असते. मळणी यंत्रावर असली तरी मदतीला स्त्रिया लागतात. बरं या कामाची शेतकर्‍याला तातडीची गरज असतेच.  सुगीमध्ये अगदी जास्त रोज देऊन बायकांना बोलावले जाते.

शेतीची कामे बारमाही चालतात. त्यामुळे रोजगार सतत उपलब्ध असतो. शेतात काम केल्यामुळे मोकळी ताजी हवा मिळते. आपोआप व्यायाम होत असल्यामुळे आरोग्य चांगले राहते.

कुठे ना कुठे भाजी, तरकारी पिकवली जाते. येताना कुणीही भाजीचा वानवळा देतात. नाहीतर अगदी कमी दरात ताजी भाजी मिळते.

कित्येक बायका शेतात जाताना दोन तीन शेळ्या चरायला नेतात. जिथं भांगलन  वगैरे चालू असेल तिथेच बांधावर झुड्पाला शेळ्या बांधायच्या. गळ्यातलं दावं जरा लांब सोडायचे. त्यांचं त्या चरतात. येताना जळण, गवत डोक्यावरून आणतात. शेळीचं औषधी ताजं दूध मिळते. बोकड असेल तर तो विकून बरेच पैसे मिळतात. यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नसते. फारसा खर्चही येत नाही. फक्त कष्ट करायची तयारी हवी. आणि खेडयातील स्त्रिया ते करतात. असे समुहाने काम केल्यामुळे त्यांचा मैत्रभाव वाढीस लागतो. एकमेकांना मदत करणे. लग्न कार्याला एकत्र काम करणे, मोठ्यांचा सल्ला मिळणे यासाठी खर्चही कमी किंवा जवळ जवळ नसतोच. कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही.

आपल्याच माणसात काम करणामुळे आत्मविश्वास, निर्भयता येते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. त्यामुळे झोपडीतही ती फार दुःखी नसते.

आता बचत गट खेड्यातही असतात. त्यामुळे पैशाचा योग्य विनियोग त्या करू शकतात.

शेतातील सुगीच्या दिवसात मूग, उडीद, चवळी, घेवडा, हरभरा ही कडधान्ये आपल्या शेतात नसतील तर शेजारणी कडून घेऊन त्यांना राख, किटकनाशक पावडर लावून वर्षभराची साठवण करतात. या कडध्यान्याच्या डाळी करून साठवतात. गहू, ज्वारी यांची वर्षभरासाठी साठवण करता येते. सुगी मध्ये धान्य स्वस्त मिळते. खेड्यात भुईमुगाच्या शेंगाही अशाप्रकारे साठवूण ठेवतात.

घरात जर असे वर्षभर पुरेल एवढे धान्य असेल तर ती गृहिणी केवढी तणावमुक्त राहू शकते.

एखादीचा नवरा मुलगा दारुडा , जुगारी असतो तेव्हा तिला त्रास होतो. पण ती एकटी पडत नाही. तिच्या साठी मदतीचे हात सदैव तत्पर असतात.

 

© सौ. सावित्री जगदाळे

१७/२/१९

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

त्या काळाच्या मानाने जयंती बाईंचा प्रथम विवाह उशिरा झाल्यामुळे त्यांना फार मानसिक आघात सहन करावे लागले होते. शिवाय वर्षाच्या आत पतीच्या  मृत्यूचा  आघात त्याच्यावर झाला. रखमा बाईंच्या वाट्याला असे कटू अनुभव नकोत असे त्या मातृहृदयाला वाटले असावे. म्हणून केवळ त्यांच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी नात्यातील दादाजी नावाच्या एकोणीस वर्षाच्या मुलाशी करून दिला. परंतु त्यांच्या मनात रखमा बाईंच्या या विवाहाची सल कायम होती.विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहत होत्या.आणि दादाजी व त्यांची आई दादाजींच्या मामाकडे राहात होते. दादाजी फारसे शिकलेले नव्हते. बुद्धी बेताची होती. प्रकृतीच्या कुरबुरी नेहमी असत. त्यांच्या मामांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुठल्याही सामाजिक निकषावर दादाजी रखमाबाईंनी साठी योग्य जोडीदार नव्हता.  फक्त हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले म्हणून तो रखमावर पत्नी म्हणून अधिकार सांगे. रखमाबाई कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या.डॉक्टर सखाराम राऊत यांच्या घरात वैचारिक व आर्थिक संपन्नता होती. आपल्या पित्याप्रमाणे डॉक्टर बनण्याचे स्वप्न  रखमाबाईनी पाहिले होते. डॉक्टर सखाराम यांना समाजात खूप मान होता. त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता.तो पुरोगामी व प्रागतिक विचारांचा वारसा रखमाबाईना मिळाला. दादाजी व रखमाबाई यांच्यात वैचारिक,बौद्धिक आणि आर्थिक दरी होती. रखमाबाईंची या विवाहाला संमती नव्हती. मुलीला तिचा पती निवडण्याचा हक्क हवा अशी त्यांची विचारधारा होती. बालविवाहा मुळे त्यांचा हा हक्क हिरावला गेला.दादाजी रखमासाठी अनुरूप नाहीत म्हणून डॉक्टर सखाराम व जयंतीबाई तिला सासरी पाठवण्याचे नाकारत असत.

लग्नानंतर आठ वर्षांनी दादाजींनी रखमाबाईवर हाय कोर्टात केस दाखल केली बॉम्बे हायकोर्टात,न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर रखमाबाईंनी स्पष्ट निवेदन केले. त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे.कमी शिकलेला, सतत आजारी असलेला, मामावर अवलंबून असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला असा हा पती माझे पालनपोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीच वाटत नाही. नवरा म्हणून त्याला  स्वीकारणे मला मान्य नाही.’

संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी खटल्याचा निकाल दिला. ‘रखमाबाई आणि  दादाजी यांचे वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याने ते विस्थापित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, अल्पवयात आई-वडिलांनी लग्न लावून दिल्यानंतर, मुलीला जेव्हा समज येते,तेव्हा तिची इच्छा नसताना,तिला पती नावाच्या माणसाकडे रहायला जाण्याची सक्ती करणे हा अत्यंत क्रूरपणा आणि रानटीपणा आहे असे मी मानतो.’

न्यायमूर्ती पिन्हे यांनी असा निकाल दिल्यानंतर रखमाबाईवर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव झाला आणि तेवढीच त्यांच्यावर आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली.

इंडियन स्पेक्टेटर, केसरी आणि नेटिव्ह  ओपिनियन यासारख्या वृत्तपत्रांनीही टीका केली.  हिंदू धर्मशास्त्राने मान्यता दिलेला विवाह बेकायदेशीर ठरविण्याचा इंग्रजांचा कायदा हा हिंदूंच्या समाजजीवनास अत्यंत घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना, पश्चिम राष्ट्रां प्रमाणे, स्त्रियांची संमती आवश्यक नाही. नेटिव्ह  ओपिनियन या वर्तमानपत्राने आपल्या 11:10. 1885 च्या बातमीत या निकालाची खिल्ली उडवताना असे म्हटले की, आपण नेटिव लोक बायकांविषयी इतकी प्रतिष्ठा ठेवणारे मुळीच नाही. एक नाही तर दुसरी, दुसरी  नाही तर तिसरी बायको मिळेल. देशात काय वाण पडली आहे का बायकांची?’

अशावेळी रखमाबाईंनी साथ देण्यासाठी काही समाजसुधारक, विचारवंत पुढे आले. बेहरामजी मलबारी, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकाराने’ हिंदू लेडी’ संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी भारतातील पुरुषी श्रेष्ठत्वाचे राज्य, पुरुषी अहंकार, स्त्रीचे अ लिखित दास्यत्व यावर टाइम्स ऑफ ऑफ इंडिया मधून घणाघाती आघात केले. स्त्रियांना घरात तसेच कायद्याने कसलीही सुरक्षा नाही. त्यांचा कोणी पाठीराखा नाही. वयात आल्यावर, किंवा बारा वर्षाच्या मुली लग्नाच्या राहिल्या तर त्या कुटुंबाला तुच्छतेने वागविले जात असे. प्रौढ वयात लग्न म्हणजे बारा वर्षानंतर लग्न हा सामाजिक आणि धार्मिक गुन्हा मानला जाई.बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची पद्धत अस्तित्वात होती.सती जाणार्‍या स्त्रीचे आक्रंदन  ऐकवत नसे. स्त्रियांची दुखे, बालविवाह, केशवपन,जरठ विवाह, सती जाणे किंवा वैधव्य आल्यावरचे स्त्रियांचे अंधारे आणि मुके जीवन यावर समाजमन जागृत करण्यासाठी रखमाबाईंनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने घणाघाती लेखन केले. समाजाच्या हिंस्त्र मनोवृत्तीवर कोरडे ओढले. पुरुषी समाजव्यवस्थेला मार्मिक प्रश्न विचारले. या विषयांवर त्यांनी 26 जून 1885 रोजी बालविवाह, 19 सप्टेंबर 1885 रोजी सक्तीचे वैधव्य यावर लेख लिहिले. या लेखामुळे सर्वत्र खळबळ माजली. या पत्रात् त्यांनी स्त्रियांना दिलेला अतिनिम्न दर्जा,स्त्रियांचे वस्तुरूप स्थान, स्त्रियांना दिली जाणारी अमानुष वागणूक, त्यांना विवाहात दान देण्याची संकल्पना, आणि स्त्रीचे भयग्रस्त गुलामी जीवन, स्त्री म्हणजे पुरूषाच्या सुखाचे साधन अशा तत्कालीन  समाजमनावर प्रहार केले.  यामुळे पुरुषप्रधान समाज चिडला. सक्तीचे वैधव्य यामध्ये तर त्यांनी नागाच्या फण्यावर पाय ठेवल्यासारखे लेखन केले. स्त्रियां सारखेच,पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवले जात नाही ?असे त्यांनी लिहिले.हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला. मृत्यू पावलेल्या  पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना दुसरा असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कुणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. टाइम्स ऑफ इंडिया मधून ‘हिंदू लेडी ‘या  टोपण नावाने लढा दिला. टाइम्स ऑफ इंडियावर  हिंदू लेडीचे नाव जाहीर करण्यासाठी दबाव आला. पण रखमाबाईंनी कुणालाही भीक घातली नाही.लेखनाच्या मार्गाने लढा दिला.हा दीडशे वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढयाचे महत्व लक्षात येते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

हळूहळू त्यांना मैफिलींसाठी आमंत्रणं येऊ लागली. मैफिली व्हायलाही लागल्या होत्या–रसिकांची भरपूर दाद अर्थातच मिळत होती.पण अचानकच त्यांनाआवाजाला खर येण्याचा त्रास व्हायला लागला.खरं तर लोकांची प्रशंसा, कौतुक यांची चटक एकदा लागली की त्यापासून आपणहून लांब जायचं ही प्रत्यक्षात खूपच अवघड गोष्ट असते. पण शोभाताईंनी मात्र आपणहून मैफिली थांबवायचा निर्णय घेतला, आणि इथेच त्यांचं वेगळेपण, त्यांचा समतोल विचार प्रकर्षाने दिसून आला. आणि त्याचबरोबर, माघार घ्यायची म्हणजे पराभूतासारखे रडत रहायचे नाही–तर चार पावले मागे येऊन, आणखी जोमाने आणि आत्मविश्वासाने दुसरी उडी मारायची, हा त्यांच्यातला विशेष आणि अपवादात्मक गुणही अधोरेखित केला गेला. एव्हाना अनेक गायनोत्सुक विद्यार्थी ‘आम्हाला तुमच्याकडेच गाणं शिकायचं आहे’ असा आग्रह करायला लागलेच होते. आणि शोभाताईंचा निर्णय झाला. त्यांनी गाणं शिकवायला सुरुवात केली. ज्ञानाचं अफाट भांडार त्यांच्याकडे होतंच. आई-वडलांकडून शिकवण्याच्या कलेचा वारसा मिळालेलाच होता. मग काय, बघताबघता शिष्यांची संख्या सत्तराच्याही पुढे गेली. पण शोभाताईंचे वेगळेपण असे की, त्यांनी रूढार्थाने गाण्याचे क्लास सुरु केले नाहीत. एका बॅचमध्ये साधारण सारख्या गुणवत्तेचे ४ ते ६ पेक्षा जास्त शिष्य असणार नाहीत याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवले. शिकवण्यातून उत्पन्न मिळवणे हे प्राधान्य  नव्हतेच. पैशाचा हव्यास तर कधीच नव्हता, हे आवर्जून सांगावेसे वाटते. दिवसभर त्यांच्या शिकवण्या चालू असत. दमले-थकले-वैतागले हे शब्द त्यांच्या कोशात नव्हतेच. प्रत्येक बॅचला उत्साह तेवढाच, जीव तोडून शिकवणेही तसेच. शिष्य म्हणजे आपली मुलंच या दृढ भावनेने प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेण्याचे कामही तितकेच सहजपणे, निरपेक्षपणे सुरु असायचे. कुणाहीबद्दल अशी प्रामाणिक आपुलकीची आणि तळमळीची भावना सातत्याने बाळगणे, आणि प्रत्यक्षात तसे वागणे, हा शोभाताईंचा आणखी एक फार मोठा आणि दुर्मिळ गुण. आणि वैयक्तिक आयुष्यातल्या एकाही कर्तव्याबाबत काडीचीही तडजोड कधीही करायची नाही हा तर जणू त्यांचा बाणाच.

अशातच पी.एच.डी. करण्याच्या ऊर्मीने पुन्हा उसळी मारली, आणि त्यासाठी शोभाताईंचे अथक प्रयत्न सुरू झाले. “मराठी भावगीताची ८० वर्षांची वाटचाल, त्यांचे बदलते स्वरूप, आणि त्यातील सांगीतिक सौंदर्य स्थळे” असा, मुळातच खूप मोठा आवाका असणारा विषय त्यांनी निवडला. त्यासाठी खूप मागे जात, त्यांनी अगदी मुळापासून जास्तीतजास्त माहिती मिळवली. तेव्हा जे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रसिद्ध गीतकार-संगीतकार-गायक हयात होते, त्यांना प्रत्यक्ष भेटून,यासंदर्भात त्यांच्या मुलाखती घेतल्या, ज्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखे जपून ठेवलेले आहे. या अभ्यासाच्या ओघात १०० वर्षांच्याही आधीच्या भावसंगीताच्या इतिहासाचा नेटका आढावा त्यांनी प्रबंधात घेतलेला आहे. शास्त्रीय संगीतातली सौंदर्यस्थळे हा तर त्यांचा हुकुमाचा एक्काच. भावगीतात त्यांचा कुठे कसा वापर केला गेला आहे याची तपशीलवार उदाहरणे त्यांनी  दिलेली आहेत. भावगीताचे बदलते स्वरूप सांगतांना, आजच्या तरुण गीतकार-संगीतकार- गायकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींचा समावेशही केलेला आहे. हे सगळे  दमछाक करणारे होतेच. त्यात कॅन्सर नावाचा महाभयंकर राक्षस अचानक वाट अडवून उभा राहिला. पण मनाची उमेद आणि ध्यास प्रचंड,आणि त्याला जिद्द-चिकाटी-सातत्य यांची प्रबळ साथ. त्यामुळं अजिबात ढासळून न जाता त्यांनी आपले काम चालूच ठेवले आणि एक अत्त्युत्तम प्रबंध आकाराला आला. त्यानंतरची तोंडी परीक्षा म्हणजे तर जणू शोभाताईंचा गाण्याचा एक छोटेखानी कार्यक्रमच ठरला. या प्रबंधावर आधारित पुस्तक काढावे या परीक्षकांच्या लेखी अभिप्रायानुसार, राजहंस प्रकाशनाने त्यावर आधारित “ सखी भावगीत माझे” हा पुस्तकरूपी संदर्भग्रंथच  प्रकाशित केला.

अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वार्थाने गुरू असलेल्या शोभाताईंचे नाव, ‘गुरू ’या कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या “ रागऋषी पुरस्कार”,”पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार”, “पं. ना. द. कशाळकर पुरस्कार” यासारख्या विशेष सन्माननीय पुरस्कारांवर साहजिकच  कोरले गेले. जातिवंत गुरु  अष्टपैलू शिष्य कसा घडवतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे,त्या ज्यांच्या पहिल्या गुरु होत्या असे आजचे  जागतिक कीर्तिप्राप्त शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर होत. विजय नावाच्या सोनेरी कोंदणात शोभा नावाचा हा पैलूदार अस्सल हिरा अखेरपर्यंत कमालीचा लखलखता राहिला.

अशा गुरुवर्य शोभाताईंचं आज महिला दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक संस्मरण आणि नमस्कार.?

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ लेखनी सुमित्र की#41 – दोहे ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  लेखनी सुमित्र की #41 – दोहे  ✍

मन ने जब मांगा तुम्हें, मिला सहज ही साथ ।

याचक की तृष्णा बढ़ी, फैलाए  हैं हाथ ।।

 

अकुल होता मन मगर, रह जाता मन मार ।

खंडहर भी तो चाहते, शब्दों की झंकार ।।

 

शिरोधार्य संकेत है, इच्छा करें उपास।

मैं चातक की भांति ही, रोक सकूंगा प्यास।।

 

शब्द और संकेत के, सारे व्यर्थ प्रयास।

चातक भी कहने लगा, मुझे लगी है प्यास।।

 

मूरत का मन हो गया, चलें दूसरे गांव।

भक्त बेचारे भटक कर, तोड़ रहे हैं पांव।।

 

यार बना जाएं कहां, तुमने किया अनंग।

डोर तुम्हारे हाथ है, हम तो बनी पतंग।।

 

मृग ने किस से कब कहा, मुझे लगी है प्यास ।

उत्कटता यह मिलन की, जल दिखता है पास।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares