श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 287
☆ देव काळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कौतुकाचा होत गेला पावसाळा
मी स्वतःला वाटतो आहे निराळा
*
धन्य झाले अमृताने नाहले मी
जन्म पोटी घेतला तू आज बाळा
*
पाय दिसती हे तुझे मज पाळण्यातच
पाळण्यातच पाहते मी नेक चाळा
*
का विदेशी श्वान हे दारात असता
उच्चभ्रू वस्तीत आला हा गबाळा
*
बायको का पाहिजे ही फक्त गोरी
हा तुम्हाला चालतो जर देव काळा
*
कावळ्यांनी फार येथे प्रश्न केले
चालली आहे इथे का कार्यशाळा?
*
पाखरे चोचीत घालुन चोच बसली
माणसे म्हणतात का संसर्ग टाळा
*
हे तुझे पाणी कसे झाले सुगंधी
त्यात तर तू घातला नव्हतास वाळा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈