श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 286
☆ गातोय विराणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कुणी आहे येथे दुःखी, कुणा दिसतो प्रकाश
कुणी गातोय विराणी, येथे झकास झकास
*
दुःख विचारांचे जाळे, सुख कल्पनांचा खेळ
सुखदुःखाची ही भेळ, छान साधलेला मेळ
दुःख आहे म्हणूनच, अर्थ सुखास सुखास
*
रान वाटा झाल्या रुंद, काल होत्या ज्या अरुंद
गतीमान मोटारींना, इथे झालेला आनंद
वृक्ष तोडून टाकता, रान उदास उदास
*
धान्य सुखाचे पाखडा, जाई उडून फुफाटा
काटे बाजूला सारून, करू मोकळ्या ह्या वाटा
काट्यांमधल्या फुलात, आहे सुवास सुवास
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈