डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

बघता बघता अख्खा मार्च महिना सुद्धा संपला की राव … ! 

मला आठवतं… लहानपणी मार्च महिना म्हणजे एकतर परीक्षा किंवा पुढील महिन्यातील परीक्षेचे टेन्शन….! 

डॉक्टर झाल्यानंतर असं वाटलं…. चला परीक्षांचे टेन्शन कायमचं संपलं…. 

पण खऱ्या परीक्षा तिथूनच पुढे सुरू झाल्या… त्या आजपर्यंत सुरूच आहेत…. ! 

एकूण काय ? आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाहीत…! 

पूर्वी मला वाटायचं, परीक्षेत जास्त “मार्क” पाडले म्हणजे मी जिंकलो…. 

खरंतर दर दिवशी… दरवर्षी तुमच्यातले “गुण” किती वाढले हे जास्त महत्त्वाचं असतं, मार्क हा फक्त आकडा असतो…. पण दुर्दैवाने चार भिंतीतली शाळा आम्हाला ते शिकवू शकली नाही… !

मला आठवून सांगा, आज पर्यंत तुम्हाला आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे मार्क कोणी विचारलेत… ? मी छातीठोकपणे सांगतो; तुम्हाला आजपर्यंत ते कोणीही विचारलेले नाहीत…!

आपण काटकोन -त्रिकोण -लघुकोन -चौकोन सर्व कोन शिकलो …. एक “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला…!!! खरं आहे ना ??? 

माकडापासून आपण माणूस झालो…..! .. खरंच झालो का …. ??? हा वादाचा विषय आहे…! 

साइन कॉस थिटा बीटा…. अल्फा गॅमा लॉगरिदम…  यात मला कधीही रस नव्हता… जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत मला या गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही…! इंजिनीयरिंगला या बाबी कदाचित उपयोगी असतील…! 

मला मात्र लहानपणापासून कायम हृदयाची धप धप आवडायची…. आमच्या मेडिकलच्या भाषेत याला Lub Dub असं म्हणतात…. ! .. नाव काहीही द्या हो…. शेवटी जगवते ती हृदयातली धडधड …! 

यानिमित्तानं एक प्रसंग आठवला…

लहानपणी शाळेत त्यावेळी, डब्यात वयानुसार एक पोळी आणि भाजी सोबत लोणचं असणं, हि आमची श्रीमंती होती… दिवसा शाळा आणि रात्री एसटी स्टँडवर हमाली काम करणारा आमच्यासोबत त्यावेळी शाळेत एक मुलगा होता… खिशात तो त्यावेळी एक गुळाचा खडा आणायचा… आम्ही मिटक्या मारत; पोळी भाजी लोणचं खात असताना तो आमच्याकडे बघत, हसत गुळाचा खडा चघळायचा आणि शाळेतल्या नळाशी, ओंजळ धरून घुटुक  घुटुक पाणी प्यायचा… वरून मस्त हसायचा…! 

… पण ते हसू कारुण्यपूर्ण होतं हे आज कळतंय…आम्ही वॉटर बॅग मधून पाणी प्यायचो….उपाशी राहून तो तृप्त होता…. पोटभर खाऊन आम्ही मात्र अतृप्त होतो…. ! 

का नाही मी कधीच बोलावलं त्याला माझी भाजी पोळी खायला… ? 

का नाही काढून घेतला मी तेव्हा त्याच्याकडून गुळाचा तो खडा…. ? 

माझा डबा त्यावेळी त्याला खायला देऊन, माझी वॉटर बॅग त्याच्यापुढे धरून, त्याच्या खिशातला गुळाचा खडा काढून, चघळत चघळत शाळेतल्या नळाला ओंजळ धरून मी सुद्धा घुटुक  घुटुक पाणी प्यायलो असतो एखाद वेळी तर ??? … तर… मी सुद्धा माणूस झालो असतो…!!

पोटार्थी मी…. एक चपाती, थोडी भाजी आणि नखभर लोणचं माझ्याकडून सोडवलं गेलं नाही तेव्हा…. 

मात्र गुळाचा तो खडा मी हरवून बसलो कायमचा … !!! 

कारण…. कारण , “गाढवाला गुळाची चव काय”… ? 

मराठीत हा वाक्प्रचार सुद्धा माझ्याच मुळे रूढ झाला असावा…. आता कुठेही गुळ बघितला, की मला त्याचं ते कारूण्यपूर्ण हसू डोळ्यासमोर येतं… आणि मग गुळ पाहून सुद्धा माझा चेहरा कडवट होतो…! 

आज तो कुठे असेल … ? असेल तरी का ???

तो नक्कीच असेल; आणि कुठेतरी चमकतच असेल, कारण आयुष्यामध्ये असे संघर्ष करणारेच नेहमी यशस्वी होतात…!  तो जिंकला नसेलही कदाचित, परंतु यशस्वी मात्र नक्की असेल…

जिंकणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे… ! जिंकलेला प्रत्येक जण यशस्वी असतो असं नाही….  परंतु यशस्वी असलेला प्रत्येक जण जिंकलेला असतो….! 

जिंकणं म्हणजे शर्यतीत दरवेळी पहिलं येणं नव्हे ….  शर्यतीत धावताना, वाटेत आलेल्या काट्याकुट्या दगड धोंड्यांना तुडवत त्यांना पार करणं… धावताना छाती फुटायची वेळ येते, त्यावेळी स्वतःला सावरत, आपल्या सोबत पळणाऱ्याला धीर देणं म्हणजे शर्यत जिंकणं….!  यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

आपल्या सोबत धावणारा एखादा प्रतिस्पर्धी पायात पाय अडकून पडला, तर त्याला उठवून पुन्हा धावायला प्रवृत्त करणं,  म्हणजे शर्यत जिंकणं…. यावेळीही तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे पण कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

नाती जोडता जोडता नेमकं कुठं हरायचं ते कळणं, म्हणजे शर्यत जिंकणं…

यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पडल्यानंतर उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं, हे समजणं….म्हणजे शर्यत जिंकणं….! … दुर्दैवानं…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

असो, विषय लांबत जाईल… मुळ मुद्द्यावर येतो…. 

तर, अशाच पडणाऱ्या आणि पडून उठणाऱ्या अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आपण सर्वांनी मदत केली आहे…. आणि म्हणूनच, मार्च महिन्यातील हा गोषवारा …. आपणासमोर सविनय सादर… ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

– श्री बाकले सर यांनी शेकडो नवीन शर्ट (पॅकिंग आणि प्राईस टॅग सुद्धा न काढलेले) आम्हाला दिले. 

हे सर्व शर्ट आम्ही 6 अपंग लोकांना विक्रीसाठी दिले.       “आयुष्यात अंधार असेलही; परंतु मनातला प्रकाश विझलेला नाही, आम्हाला भीक नको, आमच्याकडून वस्तू विकत घ्या” अशा आशयाची पाटी, व्यवसाय करताना त्यांच्या जवळ दिसेल अशा पद्धतीने ठेवली आहे…. एक रुपया …. दोन रुपये भिक द्या हो…. म्हणून लाचार होणारे हे लोक, आज दर दिवशी कमीत कमी 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत आहेत…! आज ते भिक्षेकरी नाहीत, कष्टकरी झाले आहेत…! 

एका महिन्यात 6 दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले याचे सर्व श्रेय मी समाजाला देतो. 

मला जर कोणी पाच मूठ गहू दिले, तर मी ते तसेच कोणाला वाटणार नाही … 

मी गहु जमिनीत रुजवेन, खत पाणी घालेन आणि मग जेव्हा पाच पोती धान्य होईल, तेव्हा ते माझ्या लोकांना मी विकायला लावून व्यवसाय करायला लावेन… यातल्या पाच मुठी पुन्हा बाजूला काढून त्यांनाही त्या जमिनीत पेरायला लावेन…! 

आपण अशा पाच मुठी नाही…. हजारो मुठी आम्हाला दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्यासमोर नतमस्तक आहोत… ! 

वैद्यकीय सेवा, अन्नपूर्णा प्रकल्प, खराटा पलटण  हे सर्व इतर उपक्रमही नियमितपणे सुरु आहेत. 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतलं आहे. हे सर्व खर्च आता माझ्या अंगावर साधारण मे महिना अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पडतील. 

माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर आधारित जे पुस्तक लिहिले आहे, त्याच्या विक्रीच्या पैशातून या सर्व मुलांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे. 

माझं पुस्तक आपण विकत घेत आहात… पुस्तक आवडो न आवडो माझं कौतुक करत आहात… मुलगा म्हणून स्वीकारून; आई बापाच्या प्रेमळ नजरेने पाठीवर हात ठेवत आहात… आपण माझ्या सोबत आहात याचा काही वेळा मलाच माझा हेवा वाटतो…!

आपल्या एका मुलीला कलेक्टर व्हायचे आहे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत…. काही वेळा बाप म्हणून मी हतबल होऊन जातो… पण तुम्ही सोबत आहात; याची आठवण झाली की मी पुन्हा निर्धास्त होतो…! 

मनातलं काही …

  1. Zee Yuva TV यांनी”सामाजिक” या कॅटेगरीमध्ये मला आणि मनीषाला एक मोठा पुरस्कार दिला.

अगदी खरं सांगायचं तर या पुरस्कारावर आमचा हक्क नाही, तुम्हा सर्वांचा हक्क आहे….! 

अगदी मनापासून बोलतोय मी हे…. कारण तुम्ही सर्वजण काहीतरी देत आहात;  आम्ही फक्त ते तळागाळात पोचवत आहोत… 

रेल्वे स्टेशनवर एखादी बॅग हमालाने डोक्यावर घेतली म्हणून तो त्याचा मालक होत नाही…. मालक कुणीतरी वेगळा असतो….! आमच्याही बाबतीत तेच आहे…. आपण दिलेली जबाबदारी; आम्ही फक्त आमच्या डोक्यावर घेतली आहे, आम्ही मालक नाही…. आम्ही फक्त भारवाहक आहोत…. मालक आपण सर्वजण आहात….!!! 

  1. माझे आजोबा कै. नामदेवराव व्हटकर ! (माझ्या आईचे वडील)… कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेता असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व….!ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त होते. 

आदरणीय बाबासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतर, आजोबांनी स्वतःचे घर आणि छापखाना विकून बाबासाहेबांची अंतिम यात्रा चित्रबद्ध करून ठेवली आहे…. या एका चित्रफिती शिवाय, बाबासाहेबांची अंतिम यात्रेची चित्रफीत जगामध्ये इतरत्र कुठेही नाही… 

जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाची धडपड असते, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घ्यावे. 

आदरणीय बाबासाहेबांना आई किंवा वडीलच मानणाऱ्या करोडो कुटुंबीयांना मात्र या अंतिम दर्शनाचे भाग्य मिळाले नाही… 

माझ्या आजोबांनी तयार केलेल्या, जगात एकमेव असणाऱ्या, या चित्रफितीमुळे आदरणीय बाबासाहेबांच्या समस्त भारतीय कुटुंबीयांना आता आदरणीय बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता येईल. 

आदरणीय बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित महापरिनिर्वाण या नावाने एक सिनेमा नुकताच येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेचे दर्शन सर्वांना नक्की घडेल…! 

या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांचाही जीवनपट ओघाओघाने आला आहे…. 

माझ्या आजोबांची भूमिका करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रसाद ओक..! 

हि चित्रफीत बनवून माझ्या आजोबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत…. असं माझं प्रांजळ मत आहे….!

असो, भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात….! 

मनातील सर्व भावना आज आपल्या पायाशी ठेवत आहे…. !!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments