?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

श्री आशिष बिवलकर   

? – एक धागा अंतरीचा गाभा– ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

गुंफल्या या मूक कळ्या 

गजऱ्याची झाल्या शोभा |

शल्य ना मनी कशाचे,

एक धागा अंतरीचा गाभा |

एक एक कळी गुंफली 

एकमेकींचे वाढवले सौंदर्य |

क्षणभंगुर या जीवनात,

जोपासले आनंदाचे औदार्य |

रंग रूप गंध लाभे,

एक दिवसाचा साज |

सुकता कुणी न पाहे,

आनंदे जगून घेती आज |

गजरा म्हणून एक ओळख,

कोणाचे कुंतल सजवती |

हातात कुणाच्या बांधून ,

मैफलीत गंध दरवळती |

प्रारब्ध होई धागा,

गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |

क्षण क्षण सत्कारणी लावावा,

सार्थ करावा जीवनाचा सोहळा |

आनंद या जीवनाचा,

सुगंधापरी दरवळावा |

सार लाभल्या आयुष्याचा,

कळ्यांना पाहून ओळखावा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री ए के मराठे

? – एक धागा अंतरीचा गाभा… – ? ☆ श्री ए के मराठे ☆

( २ )

कळ्या निमूट ओवून घेतात

गजऱ्यामधे स्वतःला

दोष देत बसत नाहीत

सुईला वा सुताला ll

कारण त्यांना माहीत असतं

हेच त्यांचं काम आहे

क्षणभंगुर मिळालेलं आयुष्य

जगण्यामधेच राम आहे ll

रूप,रंग एका दिवसाचा

गंधही उद्या राहणार नाही

फुल होऊन कोमेजल्यावर

ढुंकूनही कुणी पाहणार नाही ll

म्हणून म्हणतो जसं,जेवढं

मिळालंय जीवन जगून घ्यावं

विषालाही अमृत समजून

हसत हसत चाखून प्यावं ll

कवी : श्री ए के मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments