डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ । 

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥ 

कथित भगवान

अव्यय योग कथिला मी विवस्वानाला

त्याने कथिला स्वपुत्राला वैवस्वताला ।। १ ।।

अपुल्या सुतास कथिले त्याने मग मनुला

इक्ष्वाकूला मनुने कथिले या अव्यय योगाला ॥१॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । 

स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥ 

अरितापना राजर्षींनी योग जाणला परंपरेने

वसुंधरेवर नष्ट पावला तो परि कालौघाने ॥२॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । 

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥ 

योग हा तर अतिश्रेष्ठ अन् कारकरहस्य

प्रिय सखा नि भक्त असशी माझा कौन्तेय 

मानवजातीला उद्धरण्या घेउन आलो हा योग

तुजला कथितो आपुलकीने पार्था ऐक हा योग ॥३॥

अर्जुन उवाच 

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । 

कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥ 

कथिले अर्जुनाने

हे श्रीकृष्णा जन्म तुझा तर अर्वाचीन काळाला

अतिप्राचीन सूर्यजन्म  कल्पारंभी काळाला

महाप्रचंड अंतर तुम्हा दोघांच्याही काळाला

मला न उमगे आदीकाळी कथिले कैसे सूर्याला ॥४॥

श्रीभगवानुवाच 

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । 

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥ 

कथित श्रीभगवान

कितीक जन्म झाले माझे-तुझे ऐक परंतपा कुंतीपुत्रा

तुला न जाणिव त्यांची परी मी त्या सर्वांचा ज्ञाता ॥५॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ । 

प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥ 

अजन्मा मी,  मी अविनाशी मला न काही अंत

सकल जीवांचा ईश्वर मी नाही तुजला ज्ञात

समग्र प्रकृती स्वाधीन करुनी देह धारुनी येतो

योगमायेने मी अपुल्या प्रकट होत असतो ॥६॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ 

जेव्हा जेव्हा धर्माची भारता होत ग्लानी 

उद्धरण्याला धर्माला येतो मी अवतरुनी ॥७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । 

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥ 

विनाश करुनीया दुष्टांचा रक्षण करण्या साधूंचे

युगा युगातुन येतो मी  संस्थापन करण्या धर्माचे ॥८॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । 

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥ 

जन्म माझा दिव्य पार्था कर्म तथा निर्मल

मोक्ष तया मिळेल जोही या तत्वा जाणेल

देहाला सोडताच तो मजला प्राप्त करेल

पुनरपि मागे फिरोन ना पुनर्जन्मास येईल ॥९॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । 

बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥ 

क्रोध भयाला नष्ट  करुनी निस्पृह जे झाले होते

अनन्य प्रेमाने माझ्या ठायी वास करूनि स्थित होते

ममाश्रयी बहु भक्त पावन होउनिया तपाचरणे ते

कृपा होउनी प्राप्त तयांना स्वरूप माझे झाले होते ॥१०॥

– क्रमशः भाग चौथा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments