श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 182 ☆ मध्वाचार्य… ☆ श्री सुजित कदम ☆

कर्नाटक प्रांतांतील

मध्वाचार्य भाष्यकार

दसऱ्याच्या शुभ दिनी

जन्मा आले तेजाकार…! १

 

बाल नाम वासुदेव

दैवी गुण बाळलीला

बोले लहान बालक

 देव आहे संगतीला…! २

 

परमेश्वर कृपेमुळे

सुरू जगाचा प्रवास

मार्ग दावी ईश्वराचा

द्रष्टा संत  बोले खास…! ३

 

प्रज्ञावान वासुदेव

शुद्ध स्पष्ट उच्चारण

करी ओजस्वी वाणीत

श्लोकार्थाचे निरूपण…! ४

 

मल्लयुद्ध क्रीडा खेळ

पोहण्यात तरबेज

वेदसुक्ते अध्ययन

बुद्धी शक्ती धावे तेज…! ५

 

बलवान शरीरात

वास कुशाग्र बुद्धीचा

वेदांतात बलवान

करी प्रयोग शक्तीचा…! ६

 

करा स्वतः चे रक्षण

हाती कु-हाड घेतली

केला डाकूंचा सामना

शक्ती विराची चेतली…! ७

 

होते जन  ते अस्थिर

यवनांची राजवट

दिली जीवन प्रेरणा

पुर्णज्ञानी मधुघट…! ८

 

धर्मजागृतीच्या साठी

केले भारत भ्रमण

तत्वज्ञान बोधामृत

ग्रंथ चाळीस लेखन…! ९

 

वृत्ती‌ संन्यासी व्रतस्थ

ब्रम्हसूत्र निरूपण

गीताभाष्या प्रवचन

मंत्रमुग्ध श्रोतेजन…! १०

 

कृष्ण मुर्तीची स्थापना

समृद्धसे ग्रंथालय

कृष्णामृत महार्णव

तंत्रसार शब्दालय…! ११

 

तिथी निर्णय गणित

ग्रंथ लेखन विपुल

वाणी माधुर्य  लौकिक

पडे प्रपंचाची भूल…! १२

 

शक्ती श्रेष्ठ परमेश

सत्य मार्ग त्याचा वास

परखड वाणीतून

धैर्य साहस विश्वास..! १३

 

माघ शुद्ध नवमी हा

मध्वनवमीचा  सण

पुण्यतिथी महोत्सव

पुण्यात्माची आठवण.! १४

 

घाली सुख दुःख वीण

मध्वाचार्य प्रवचन

द्वैत भाव संदेशाचे

करी स्मरण चिंतन..! १५

 

परमेश प्रतिबिंब

जीवनात पदोपदी

नाव घ्यारे कोणतेही

साक्षात्कार घडोघडी..! १६

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments