सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– ऐक मुकुंदा… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
हाती पावा घेऊ नको रे
अधरावरती धरू नको रे
सचेत होऊन सूर उमटता
विसरतेच मग जग हे सारे !
☆
खट्याळ तू रे किती मुरारी
विनविते तरी घेशी बासरी
हात तुझा मी किती अडवावा
सांगू मुकुदा कोणत्या परी !
☆
सासुरवाशीण मी रे कान्हा
किती सांगू तुज मी पुन:पुन्हा
अवघड होते मन आवरणे
सूर पावरीचे पडता काना !
☆
हात जोडूनी तुला विनवते
सूर अवेळी अळवू नको ते
नंतर भेटू कदंबातळी
स्वतः बासरी हाती देते !!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈