डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ – ऋचा ७ ते १५  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्‌सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व

देवता : ७-९ इंद्रमरुत्; १०-१२ विश्वेदेव; १३-१५ पूषन्;

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी हे  मुख्यतः जलदेवतेला उद्देशून असल्याने हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सात आणि नऊ या  ऋचा इंद्राचे आणि मरुताचे, दहा ते बारा  ऋचा विश्वेदेवाचे आणि तेरा ते पंधरा  या  ऋचा पूषन् देवतेचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र, मरुत् विश्वेदेव  आणि पूषन्  या देवतांना उद्देशून रचलेल्या सात ते पंधरा या  ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद :: 

म॒रुत्व॑न्तं हवामह॒ इंद्र॒मा सोम॑पीतये स॒जूर्ग॒णेन॑ तृम्पतु

सवे घेउनी मरुद्देवता यावे सोमपाना

गणांनी तुमच्या अंकित केले आहे ना त्यांना 

त्यांचाही सन्मान करावा ही अमुची मनीषा

आवाहन तुम्हासी करितो इंद्राणीच्या ईशा ||७|| 

इंद्र॑ज्येष्ठा॒ मरु॑द्‍गणा॒ देवा॑स॒ः पूष॑रातयः विश्वे॒ मम॑ श्रुता॒ हव॑॑म्

वंदनीय हे मरुद्देव हो सुरेंद्र तुमचा नेता

तुमच्या स्नेहवृंदी पूष मानाची देवता

तुम्हा सकलांना पाचारण यावे यज्ञाला 

प्रार्थनेस प्रतिसाद देऊनी धन्य करा आम्हाला ||८||

ह॒त वृ॒त्रं सु॑दानव॒ इंद्रे॑ण॒ सह॑सा यु॒जा मा नः॑ दु॒ःशंस॑ ईशत

अभद्रभाषी वृत्रासुर तो आहे अतिक्रूर

त्याच्या क्रौर्याचा अमुच्या वर पडू नये भार

उदार देवांनो इंद्राचे सहाय्य घेवोनी 

निर्दाळावी विघ्ने त्यासी पराक्रमे वधुनी ||९||

विश्वा॑न्दे॒वान्ह॑वामहे म॒रुत॒ः सोम॑पीतये उ॒ग्रा हि पृश्नि॑मातरः १०

पृश्नीपुत्र अति भयंकर आम्हास भिवविती

मरुद्देवांनो आम्हा राखी त्यांना निर्दाळुनी

येउनिया अमुच्या यज्ञाला सोम करा प्राशन

सुखरुपतेचे आम्हासाठी द्यावे वरदान ||१०||

जय॑तामिव तन्य॒तुर्म॒रुता॑मेति धृष्णु॒या यच्छुभं॑ या॒थना॑ नरः ११

विजयी वीरासम गर्जत ये मरूत जोशाने

व्योमासही व्यापून टाकितो गगनभेदी स्वराने

कल्याणास्तव अमुच्या जेथे तुम्ही असणे उचित

देवांनो आगमन करावे तेथे तुम्ही खचित ||११||

ह॒स्का॒राद्वि॒द्युत॒स्पर्यतो॑ जा॒ता अ॑वन्तु नः म॒रुतः॑ मृळयन्तु नः १२

कडकडाडते भीषण भेरी सौदामिनीची गगनी

त्यातूनिया अवतीर्ण जाहले मरुद्देव बलवानी

चंडप्रतापी महाधुरंधर पवनराज देवा

कृपादृष्टी ठेवून अम्हावरी सुखात आम्हा ठेवा ||१२||

पू॑षञ्चि॒त्रब॑र्हिष॒माघृ॑णे ध॒रुणं॑ दि॒वः आजा॑ न॒ष्टं यथा॑ प॒शुम् १३

पिसांनी मोराच्या नटवीले बालक गगनाचे

हरविले जणू पाडस  गोठ्यातील कपिलेचे

तेजःपुंज पूषा त्यासी आणी शोधुनिया

समर्थ तुम्ही  त्यासी अपुल्या सवे घेउनी या ||१३||

पू॒षा राजा॑न॒माघृ॑णि॒रप॑गूळ्हं॒ गुहा॑ हि॒तम् अवि॑न्दच्चि॒त्रब॑र्हिषम् १४

रंगीबेरंगी मयुराच्या पुच्छांनी नटलेला 

पळवुनी त्यासी गुंफेमध्ये लपवूनिया ठेविला

अदृश्य जाहल्या अमुच्या राजा शोधाया गेल्या

तेजोमय पूषास अहा तो सहजी सापडला ||१४||

उ॒तो मह्य॒मिन्दु॑भि॒ः षड्यु॒क्ताँ अ॑नु॒सेषि॑धत् गोभि॒र्यवं॒ च॑र्कृषत् १५

आवाहन त्या सहा ऋतूंना भक्तीभावे करतो

कृषीवल जैसा वृषभा जुंपुन धान्य गृही आणितो

सोमपान करुनी अमुच्या वर पूषा तुष्ट व्हावे

शृंखलेसम सहा ऋतूंच्या सवे घेउनी यावे ||१५||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/UddnnAJxNRY

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 7 to15

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments