सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता)

पाऊस आला,पाऊस आला, घेऊन मृदगंधाला

ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा कणकण संतोषला

जलधारांनी बरसत आला,थेंबातुनी प्रगटला

बळीराजाही,पेरायाला,शिवारात गुंतला ||१||

 

इंद्रधनुचा मोहक पट तो,आकाशी उमटला

बालचमुसह ,सर्वांसाठी, आनंददायी बनला

जलाशयाचा,तरुवेलींचा ,जीवनदाता ठरला

चिंबही भिजल्या,सृष्टीचा तो,सखा जणू भासला ||२||

 

धरतीनेही हिरवा शालु,अंगभरी ल्यायला

गवतफुलांचा,फळाफुलांचा,सुगंध साकारला

मातीतुनी या,नव कोंबांचा,हर्ष दिसु लागला

तनामनाने चाहुल घेता,आसमंती विहरला ||३||

 

चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला

रिमझिम येता जलधारांचा,नादही झंकारला

पाऊस आला,पाऊस आला, मोद असा जाहला

नव आशांचा,नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||४||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments