श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ चंद्र काचेचा ☆
लावली शब्दास तूही धार आता
म्यान झाली बघ मुकी तलवार आता
पापण्यांखाली लपवले शस्त्र आहे
फक्त नजरेनेच करते वार आता
उंबऱ्यातच ती उभी, का भास आहे ?
रात्रभर उघडे घराचे दार आता ?
एक नाही दोन नाही तीन नाही
कैक पक्षी तूच केले ठार आता
छान झाले संपण्या आधी बहर तू
टाकला देऊन मज होकार आता
चंद्र काचेचा इथे जन्मास येता
अंगणातिल संपला अंधार आता
सात फेरे घेतले मी सोबतीने
टाकला पदरी तिच्या संसार आता
भूल नाही कोणत्याही अत्तराची
घाम हा माझा तिला स्वीकार आता
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈