श्री सुजित कदम
साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #93
☆ हिशोब ☆
आयुष्याचे हिशोब खडतर जमले नाही
सवाल कुठला कुठले उत्तर कळले नाही
हवे तसे मी उनाड जगणे जगून गेलो
किती कमवले जीवनात या पुरले नाही.
सुखात हसलो दुःखी रडलो खचलो नाही
चौकटीतल्या जगण्याला मी भुललो नाही
थोडे थोडे आयुष्याशी करार केले
गेले फसवून त्यांच्या वर मी रूसलो नाही.
अनुभवाच्या चार क्षणांना मुकलो नाही
संसाराचे हळवे नाते सुटलो नाही
जे जे जमले करून गेलो निर्धाराने
वही संपली हिशोब चुकला अडलो नाही.
घाव मनाचे भरून आले थकलो नाही
देणे घेणे यात कधी ही चुकलो नाही
तरी राहिलो बराच मागे या दुनियेच्या
सुखदुःखाची सलगी करण्या मुकलो नाही.
कित्तेक आले कित्तेक गेले अडले नाही
दूरदूरच्या नभात उडणे जमले नाही
पडलो घडलो धडपडलो मी अनेक वेळा
पंखांमधले बळ अजूनही सरले नाही.
© सुजित कदम
संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈